Home Blog Page 1373

शिक्षणात आरक्षणाची मुस्लिम धर्मियांची मागणी

पुणे : राज्य सरकारने शिक्षणात मुस्लिम धर्मियांना पाच टक्के आरक्षण द्यावे, अन्यथा मराठा आणि धनगर समाजाप्रमाणे रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा ऑल इंडिया उलेमा बोर्डाने दिला आहे. उर्दु शाळांमध्ये अरेबिक भाषा सक्तीची करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ऑल इंडिया उलेमा बोर्डाच्या कार्यकारणीची बैठक नुकतीच पुण्यात झाली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती बोर्डाच्या वकफ कक्षाचे अध्यक्ष सलीम सारंग यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पत्रकार परिषदेस मौलाना इूनाई हुसेनी, नानशद सिदिक्की, फैजल शेख, मोईन सिद्दीकी, आयुब जमादार, माहद जाहिर, अंजुम शेख, अहमद तेली उपस्थित होते.
सारंग यांनी सांगितले की, कार्यकारणीच्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. आरक्षणासाठी आज मराठा आणि धनगर समाज रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करत आहे. शिक्षणात मुस्लिम धर्मियांना पाच टक्के आरक्षणाची तरतुद अंमलात आणावी, अन्यथा मुस्लिम समुदायाला रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. मुस्लिम समुदायाच्या मूलभूत गरजांकडे ऑल इंडिया उलेमा बोर्ड डोळेझाक करू शकत नाही. भलेही मुस्लिम समुदायाला एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत हमखास विजयी करता येणार नाही, मात्र हा मतदार कोणत्याही उमेदवाराला निवडणुकीत निश्‍चितपणे पराभूत करु शकतो, हे राजकीय मंडळींनी लक्षात ठेवावे! आम्ही आमच्या मागण्या मुख्य मंत्री आणि दोन्ही उपमुख्य मंत्र्यांपर्यंत पोहोचविल्या आहेत, असे नमूद करून सारंग म्हणाले, आतापर्यंत तरी त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. मात्र आम्ही आशावादी आहोत. महाराष्ट्रात मुस्लिमांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण द्यावे, याला न्यायालयाने मान्यता दिली असली तरी एकाही सरकारने अंमलबजावणीसाठी उत्सुकता दाखवलेली नाही. शिक्षणात आरक्षणाची मागणी पुढे जावी यासाठी आम्ही मुस्लिम धर्मातील विचारवंत, समाजातील नेते, राजकीय व्यक्ती यांच्याशी संवाद सुरु केला आहे. जर मागणी मान्य झाली नाही तर आंदोलनाशिवाय आमच्यासमोर पर्याय राहणार नाही. आखाती देशात नोकरी मिळवण्यासाठी अरेबिक भाषेचे ज्ञान ही अतिरिक्त गुणवत्ता मानली जाते, याकडे लक्ष वेधून सारंग यांनी सांगितले की, अर्जदारांच्या बायोडाटाचे वजन अरेबिक भाषा अवगत असल्यास वाढते. पण आपल्याकडे मदरशांविरुद्ध बोलले जाते. राज्यातील उर्दु माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये अरेबिक भाषा हा स्वतंत्र आणि सक्तीचा विषय असला पाहिजे. राज्यात वकफ बोर्डाकडून व्यवस्थापन होत असलेल्या अनेक मालमत्तांवर अतिक्रमण झाले आहे, असे सांगून सारंग म्हणाले की, सरकार आणि सरकारी कायद्यामुळे ते होत आहे. दोष मात्र मौलाना आणि मौलवींना दिला जातो. मदरशातील शिक्षकांच्या पगाराचा प्रश्‍न देखील गंभीर बनला आहे. त्याबद्दल देखील आम्ही पाठपुरावा करणार आहोत.

चार ज्येष्ठ तरुणांची काश्मीर ते कन्याकुमारी सायकल यात्रा

ग्यान की ज्योत’मधून नवीन शिक्षण धोरणाबाबत करणार जनजागृती 
पुणे: चार ज्येष्ठ नागरिक साहसी मोहिमेवर निघाले आहेत. ‘ग्यान की ज्योत’ हाती घेत काश्मीर ते कन्याकुमारी ही ३३ दिवसांची सायकल यात्रा करणार आहेत. नवीन शिक्षण धोरणाबाबत जनजागृती या सायकल यात्रेद्वारे करण्याचा त्यांचा मानस आहे. पुण्यातील दोन ज्येष्ठांचा यामध्ये सहभाग आहे. या सायकल यात्रेचा संदेश ‘वय हा सायकलिंगसाठी फक्त एक आकडा आहे’ असा आहे.
पुण्यातील संजय कट्टी (६५ वर्षे) आणि मोनिश चक्रवर्ती (५१ वर्षे) यांच्यासह डेहराडूनयेथील अनुभवी दाम्पत्य विश्व धीमान (७० वर्षे) आणि कमलजीत सिंग (७४ वर्षे) हे चौघे तरुण भारताच्या उत्तरेकडून श्रीनगर (काश्मीर) ते भारताच्या दक्षिणेकडे कन्याकुमारी (तामिळनाडू) असा महत्त्वाकांक्षी आणि आव्हानात्मक स्व-समर्थित (नो बॅकअप वाहन) ३६९९ किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.
या चौघांनाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रिसर्च पार्क फाउंडेशन, पुणे विद्यार्थी गृह, अस्पायर स्किल्स, शुगर वॉलेट या संस्थांच्या, तसेच पुणेकरांच्या वतीने शनिवारी शुभेच्छा आणि पाठिंबा देण्यात आला. तसेच हे चौघे परिधान करणाऱ्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध धावपटू आशिष कसोदेकर, रिसर्च पार्क फाउंडेशनचे डॉ. अरविंद शाळीग्राम, शुगर वॉलेटचे विश्वेश कुलकर्णी, पुणे विद्यार्थी गृहाचे सुनील रेडेकर, यंग सिनिअर्सचे लोकेश मराठे, भुवनेश कुलकर्णी, डॉ. अपर्णा कुलकर्णी, विनायक माढेकर, अविनाश माढेकर, एस. ए. चव्हाण, जुगल राठी, भगवान चवले, महेश मैथिली जोग आदी उपस्थित होते.
२७ नोव्हेंबर २०२३ रोजी श्रीनगरमधील लाल चौक येथून हिरवा झेंडा फडकवल्यानंतर ही यात्रा दक्षिणेकडे जाईल. पुढील ३३ दिवस भारतातील ११ राज्यांमधून प्रवास करत कन्याकुमारी येथे पोहोचेल. जम्मू-कश्मीर (श्रीनगर, वैष्णोदेवी), पंजाब (अमृतसर, लुधियाना, अंबाला), हरियाणा (पानिपत), दिल्ली (नवी दिल्ली), उत्तर प्रदेश (आग्रा, मथुरा, झाशी), मध्य प्रदेश (सागर), महाराष्ट्र (नागपूर), तेलंगणा (आदिलाबाद), आंध्र प्रदेश (हैदराबाद), कर्नाटक (बेंगळुरू), तामिळनाडू (सेलम, मदुराई आणि कन्याकुमारी) या ठिकाणाहून ही यात्रा प्रवास करेल.
संजय कट्टी म्हणाले, “संपूर्ण भारतात सायकलिंगचा अनुभव असलेल्या महाराष्ट्र आणि उत्तराखंड (पुणे आणि डेहराडून) येथील मल्टीस्टेट टीमने ही मोहीम हाती घेतली आहे. सरासरी ६६ वर्षे वय असलेले हे पथक अशा आव्हानात्मक मोहिमेसाठी ज्येष्ठ नागरिकांमध्ये आदर्श निर्माण करणार आहे. डेहराडूनचे सायकलस्वार दाम्पत्य मोठ्या जोमाने आणि उत्साहाने काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास सायकलवरून करणार आहेत. दररोज सरासरी ११२ किलोमीटर सायकलिंग होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना तंदुरुस्त, आनंदी राहण्यासाठी आणि मुख्य म्हणजे जीवनाचा जास्तीत जास्त आनंद घेण्यासाठी प्रेरित करत राहण्याची आमची इच्छा आहे. तरुणांनी तंदुरुस्त, एकाग्र, आव्हाने पेलण्यासाठी आणि भारताला अभिमान वाटावा यासाठी तयार राहावे.”
“पश्चिमेपासून भारताच्या पूर्वेपर्यंत देशभरात ३९०० किलोमीटरच्या यशस्वी सायकलिंग राइडने आम्हाला पुढील सायकलिंग मोहिमेवर जाण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास दिला. मग आम्ही उत्तर ते दक्षिण म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी सायकल चालवायचे ठरवले,” असे मोनीश चक्रवर्ती म्हणाले.

प्रसाद आणि श्रेया यांच्यात रंगणार विनोदाची जुगलबंदी 

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे तसेच आपल्या मिश्किल स्वभावाने सगळ्यांच्या फिरक्या घेणारे अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री श्रेया बुगडे हे दोघे एका मंचावर एकत्र येत धमाल उडवणार आहेत. हे  दोघे नेमके कशासाठी एकत्र आलेत हा प्रश्न तुम्हालाही पडला असलेच. ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचलनासाठी हे दोघे प्रथमच एकत्र येणार आहेत. ‘आपला बायोस्कोप २०२३’हा दिमाखदार सोहळा ३० नोव्हेंबरला मुंबईत संपन्न होणार आहे.

पहिल्यांदाच एकत्र सूत्रसंचलन करण्याचा आनंद या दोघांनीही व्यक्त केला. या दोन्ही कलाकारांचा हजरजबाबीपणा, भाषेवरील प्रभुत्व याद्वारे अचूक टायमिंग साधणारे प्रसाद आणि श्रेया सूत्रसंचलनाची बॅटिंग ही दमदार करतील हे वेगळं सांगायला  नको. 

TV9 मराठी आयोजित ‘आपला बायोस्कोप २०२३’ पुरस्कारासाठी ‘वाळवी’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘गोदावरी’, ‘सुभेदार’, ‘बालभारती’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.  तर मालिका विभागात  ‘रमा राघव’,’भाग्य दिले तू मला’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘ठरलं तर मग’, ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिका स्पर्धेत आहेत.

पिस्तूल घेऊन जांभुळवाडी तलावाजवळ थांबलेल्या एकास अटक

पुणे- पुण्यात गावठी कट्टे,पिस्तूल यांचा पुरवठा बऱ्यापैकी होत असावा किंवा बाहेरून कुठून आणता येते याची माहिती आता अनेकांना होत असावी,पोलीस सातत्याने अशा पद्धतीने गावठी कट्टे किंवा पिस्तुलं घेऊन रस्त्यावर थांबलेल्या,फिरणाऱ्या युवकांना पकडत आहेत आज भरती विद्यापीठ पोलिसांनी एकाला पकडले. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक २४/११/२०२३ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे दैनंदिन कर्तव्य करीत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर, निलेश ढमढेरे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आंबेगाव बु, जांभुळवाडी तलाव येथे एक इसम गावठी कट्टा घेवुन थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी जांभुळवाडी तलाव येथे जावुन बातमीप्रमाणे इसमाचा शोध घेतला असता तेथे मामा पान शॉप पुढील पुलावर बातमीप्रमाणे इसम नामे योगेश हनुमंत मालुसरे, वय ४१ वर्षे, रा. सध्या फ्लॅट नंबर ४०१, ओम हाईटस, सिध्दीविनायक सोसायटी, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे हा त्याचे ताब्यात एक ४०,०००/- रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व ४००/- रुपये किंमतीचे २ जिवंत काडतुस असा एकुण ४०,४००/- रुपयांचे मुद्देमालासह मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले असुन आरोपी विरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७६५/२०२३, भारतीय हत्याराचा अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ हे करीत आहे.सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विदयापीठ पोलीस स्टेशन विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार निलेश ढमढेरे, महेश बारवकर, सचिन सरपाले, मितेश चोरमोले, शैलेश साठे, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश जमदाडे, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली

सावकाराचा सततच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या:पुण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल

पुणे-कर्जाने घेतलेल्या पैशाच्या बदल्यात सावकारांच्या सततच्या धमकीमुळे एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी नऊ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राम परशुराम भोसले (वय -51, रा. साईसृष्टी बिल्डींग, केशवनगर, मुंढवा,पुणे) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत भोसले यांची पत्नी सुरेखा यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राजेश, राज तावदान, सिद्धू मंगवाणी, बलविंदर सिंग, नंदकुमार अडसूळ, शंकर पाटील, पाटील याची पत्नी, तसेच अजित इरकल आरोपी विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम भोसले यांची आई काही वर्षापूर्वी आजारी होती. आईचे आजारपण आणि वैयक्तिक अडचणींमुळे त्यांनी सात वर्षांपूर्वी आरोपी राजेश, राज तावदान, सिद्धू मंगवाणी यांच्याकडून व्याजाने काही पैसे उधारीवर घेतले होते. व्याजाची परतफेड केल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली. त्यामुळे भोसले यांनी आरोपी अडसूळ याच्याकडून पाच लाख रुपये व्याजाने घेतले. पाटील, त्याची पत्नी, इरकल यांनी त्यांना व्याजाने पैसे मिळवून देण्यास मदत केली होती. त्यांना भोसले यांनी 50 हजार रुपये दिले होते.

व्याजाने दिलेल्या पैशांची परतफेड करताना आरोपी त्रास देऊन धमकी देत असल्याने भोसले यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बेकायदा सावकारी करणाऱ्या आरोपींच्या धमकीमुळे पतीने आत्महत्या केल्याचे भोसले यांच्या पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक समीर करपे पुढील तपास करत आहेत.

एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन आराखडे तयार करा- अजित पवार

पुणे, दि.२६:  प्रशासकीय इमारतीचे आराखडे करतांना आगामी ५० वर्षाचा सर्वांगीण विचार करता एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन इमारतीचे आराखडे तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्याच्यावेळी दिले.

यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, अपर कामगार आयुक्त शैलेश पोळ आदी उपस्थित होते.

विकास कामांची पाहणी  करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर काळानुरुप गरजेनुसार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची विस्तारित इमारत आदी शासकीय इमारतीचे काम नव्याने पूर्ण करण्यात आले आहेत. नोंदणी भवन, शिक्षण भवन, कृषी भवन, सहकार भवन, कामगार भवन आदी इमारतींचे काम सुरु आहेत तर काही इमारतींच्या कामांच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यताही देण्यात आल्या आहेत.

आगामी काळातही विविध शासकीय इमारती नव्याने बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहेत. प्रशासकीय इमारतीचे आराखडे तयार करताना संबंधित विभाग प्रमुखाला विश्वासात घेऊनच आराखडे तयार करावेत. आराखड्यात प्रामुख्याने वीज, वाहनतळ, अग्निशमन यंत्रणा या बाबतीत सुरक्षितेच्यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करा. यासाठी नामांकित, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक करावी.

इमारती पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्तीवरचा खर्च कमीत कमी झाला पाहिजे. वाहनतळाचे नियोजन करताना कार्यालयातील मनुष्यबळाबरोबर नागरिकांच्या वाहनाचांही विचार करावा. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचे वारंवार मार्गदर्शन घ्यावे. इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटले पाहिजे.

सारथी येथील बैठक सभागृहात ध्वनी प्रणाली व प्रकाश व्यवस्था अत्याधुनिक बसवावी. पुरेसा सुर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन काम करावे. नूतन कार्यालयाच्या इमारतीचे दरवाजे, खिडक्या मजबूत आणि पुरेशा उंच बनवाव्या. सहकार आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचा आराखडा पारंपरिक न राहता त्यामध्ये नाविन्यता असली पाहिजे. वाहनतळ जागेचा विचार करता ते दुमजली करा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

प्रस्तावित कामगार भवन परिसरातील येथील नागरिकांसोबत चर्चा केल्यानंतर ते म्हणाले, कामगार भवन बांधकामाच्यावेळी विरोध करु नये. या कामांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल. विकासकामांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील श्री. पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी भांबुर्डा येथील सारथी मुख्यालय, ‘शिक्षण भवन’ वास्तू बांधकाम, शिवाजी नगर येथील प्रस्तावित ‘कृषी भवन’ इमारत, साखर संकुल येथील सहकार आयुक्त कार्यालय आणि वाकडेवाडी येथील ‘कामगार भवन’ इमारतीच्या जागेची पाहणी केली.

पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिरात सव्वा लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांनी घेतला मोफत आरोग्य सेवेचा लाभ

0

पुणे दि. २५: कार्तिकी वारीनिमित्त २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान पंढरपूर येथील ६५ एकर परिसरामध्ये आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आयोजित तीन दिवसीय महाआरोग्य शिबिरामध्ये सव्वा लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला.

शिबिराला वारकरी आणि ग्रामीण भागातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरांमध्ये वारकऱ्यांना विविध रोगांवर मोफत उपचार आणि आरोग्य सेवा पुरविण्यात आली. शिबिरासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टर, तज्ज्ञ, तंत्रज्ञ, परिचारिका व कर्मचारी, स्वयंसेवक यांच्यासह सुमारे ३ हजार वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात आले.

रुग्णांच्या सुविधेसाठी १०८ क्रमांकाच्या ७ रुग्णवाहिका ६५ एकर परिसर, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर आणि इतर ठिकाणी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे सहा ठिकाणी अतिदक्षता विभाग, तीन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ११ प्राथमिक उपचार केंद्रे आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले होते. महाआरोग्य शिबिरात भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती.

या महाशिबिरातून नेत्रविकार, हृदयरोग, किडनी, पोटाचे विकार, त्वचेचे विकार, मधुमेह, हाडांची तपासणी, ईसीजी व सोनोग्राफी तपासणी, रक्त तपासणी, उच्च रक्तदाब, त्वचारोग, दंतरोग, संसर्गजन्य रोग (क्षयरोग, कुष्ठरोग), कॅन्सर यासारख्या रोगांवर मोफत उपचार सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचप्रमाणे रुग्णांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले. महाआरोग्य शिबिरासाठी भैरवनाथ शुगर्स व जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्वयंसेवकांचे सक्रिय योगदान लाभले.

शिबिराची काही ठळक वैशिष्ट्ये –

  • या महाआरोग्य शिबिरामध्ये डेंटल व्हॅनमध्ये एकूण २७४ रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्यात आली.
  • फिरता दवाखान्यामध्ये एक्स रे, रक्ताच्या चाचण्या आदी सुविधांचा एकूण २४६ रुग्णांनी लाभ घेतला.
  • नेत्र विभागामध्ये एकूण १८ हजार ६३७ मोफत नेत्र तपासणी करण्यात आलेली असून १५ हजार ४९६ मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
  • मोतीबिंदु निदान झालेल्या ६६१ रुग्णांची यादी करून त्यांच्यावर शासकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
  • शिबिराच्या ठिकाणी ५ बेड मनुष्यबळासह अतिदक्षता विभाग कार्यरत होता. त्यामध्ये ६६ रुग्णांना सेवा देऊन वारकऱ्यांचे प्राण वाचविण्यात आले.
  • आरोग्य दूतामार्फत गर्दीच्या ठिकाणी बाईक ॲम्बुलन्सची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याद्वारे एकूण १८ हजार ८०१ रुग्णांना आरोग्य सेवा पुरवण्यात आली.
  • महाआरोग्य शिबिरासाठी ईएमएस १०८ च्या ३ रुग्णवाहिका प्रशिक्षित मनुष्यबळासह सज्ज होत्या. त्याद्वारे एकूण २ हजार ८६१ रुग्णांना सेवा देण्यात आली.
  • शिबिरामध्ये अवयव दान आणि नेत्रदान याबाबत एकूण ५७ जणांना माहिती व समुपदेशन करण्यात आले. त्यापैकी अवयव दान ३, नेत्रदान २, देहदान १ यासाठी नोंदणी करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाआरोग्य शिबिराला भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाआरोग्य शिबिराला भेट दिली. केंद्र व राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असून, आरोग्याविषयक पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार, भैरवनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत आदी उपस्थित होते.

मा.उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस म्हणाले, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा उभारण्याकरिता ५ हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले असून १४ वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची व्यवस्था करण्यात येत आहे.

आषाढी यात्रेत आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ११ लाख ६४ हजार भाविकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले होते. त्याची नोंद जागतिक बुक रेकॉर्डमध्ये झाली होती.

भारतीय हवाई दलाच्या तेजस या लढाऊ विमानातून पंतप्रधानांनी केले उड्डाण

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान तेजसमधून यशस्वीरित्या उड्डाण केले.

पंतप्रधानांनी X वर त्यांचा अनुभव शेअर केला:

“तेजसमधून यशस्वीरित्या उड्डाण केले. हा अनुभव अतिशय समृद्ध करणारा होता, आपल्या स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढवणारा होता आणि आपल्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान आणि आशावादाची नवीन भावना मला देऊन गेला.” असे पंप्रधान म्हणाले.

“मी आज तेजसमधून उड्डाण करताना अतिशय अभिमानाने सांगू शकतो की आपली मेहनत आणि दृढ निर्धार यामुळे आपण स्वयंपूर्णतेच्या बाबतीत जगातील कोणाहीपेक्षा कमी नाही. भारतीय हवाई दल, डीआरडीओ आणि एचएएल यांच्याबरोबरच समस्त देशवासियांचे हार्दिक अभिनंदन.”

‘एमआयटी एडीटी’ महिला संघाची रौप्य कामगिरी:राष्ट्रीय रोईंग स्पर्धा

पुणेः तेलंगणा रोईंग संघटनेच्या हैदराबाद बोट क्लब येथे भारतीय रोईंग संघटना (आरएफआय) च्या वतीने आयोजित २४ व्या सब ज्युनियर आणि ७व्या आंतरराज्य चॅलेंजर राष्ट्रीय रोईंग चॅम्पियनशिपमध्ये येथील एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या डाॅ.विश्वनाथ कराड क्रीडा अकादमीच्या महिला संघाने रौप्य पदकाची कमाई केली आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत देशभरातील २० राज्यांच्या संघांनी सहभाग नोंदविला होता. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या महिला रोईंग संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुष्का अर्जून गर्जे, भाग्यश्री केशव घुले, स्नेहा योगेशसिंग सोळंकी आणि नेहा गजानन बधे यांच्या संघाने ५०० मीटर स्प्रिंट प्रकारात १ :५१.३९ अशा वेळेची नोंद करताना रौप्य पदकाची कमाई केली. तर याच प्रकारात हरियाणा संघाने १:५०.५६ अशी वेळ नोंदविताना सुवर्णपदक पटकावले तर केरळ संघाला(१:५२.०५) कांस्यपदक मिळाले. राष्ट्रीय रोईंग प्रशिक्षक संदीप भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एमआयटी एडीटी’च्या महिला रोईंग संघाच्या रौप्य कामगिरीनंतर विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, प्रा.डाॅ.सुनिता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक पद्माकर फड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

रोजगार मेळाव्यात २६२ उमेदवारांची निवड

पुणे दि. २५: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग पुणे व सिम्बायोसिस स्किल ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिम्बायोसिस भवन येथे आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २६२ उमेदवारांची निवड करण्यात आली.

रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील एकूण २० पेक्षा जास्त उद्योजकांनी त्यांच्याकडील विविध प्रकारची एकूण ३ हजार ६६ रिक्तपदे कळवून सहभाग दर्शविला. या पदांसाठी एक हजारापेक्षा अधिक बेरोजगार युवक-युवतींनी सहभाग नोंदविला. उपस्थित उद्योजकांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन २६२ उमेदवारांची निवड केली.

रोजगार मेळाव्याचे उद्घाटन सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती तथा संस्थापक अध्यक्ष डॉ. एस.बी.मुजुमदार यांच्या हस्ते झाले. मेळाव्याच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी प्रास्ताविकात मेळाव्या विषयी माहिती दिली. उद्योजक आणि उमेदवार यांच्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देत उमेदवारांना उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी मिळवून देणे हा रोजगार मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. मेळाव्यात विविध शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकच्या जागा असून अनेक नामांकित उद्योजक उपस्थित असल्याची माहितीही त्यांनी दिली.
***

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

सातारा दि. २५ :- राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पर्णकुटी या समाधी स्थळावरील आयोजित भजनकार्यक्रमास उपस्थिती लावली.

यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचे विचार , त्यांचे साहित्य हे आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.
00000

बृहन्मुंबई हद्दीत ४ डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश जारी

0

मुंबई, दि. 24 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत 4 डिसेंबर 2023 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध, मिरवणूक काढणे, मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, वाद्य बँड आणि फटाके फोडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था तसेच अन्य संघटना यांच्या बैठका यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे  पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी आदेशान्वये कळविले आहे.

नव्या लोधासह तिघांवर मोक्काची कारवाई

पुणे- घरात घुसून गोळ्या झाडून खून केल्या प्रकरणी नव्या लोधा व त्याच्या 3 साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही घटना 30 ऑक्टोबर रोजी घडली होती.

टोळी प्रमुख नवनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा (वय 37 रा. घोरपडे पेठ), गणेश उल्हासराव शिंदे (वय 41, रा., धनकवडी), रोहीत संपत कोमकर, (वय 33 रा. गुरूवार पेठ, पुणे), अमन दिपक परदेशी (वय 29 वर्षे, रा. घोरपडे पेठ) यांना अटक करून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरी झोपले असताना त्यांचा घराचा दरवाजा वाजवल्यामुळे फिर्यादी यांनी घराचा दरवाजा उघडला. दरवाज्या बाहेर उभा असलेल्या नवनाथ ऊर्फ नव्या याने फिर्यादीस ‘तेरा भाई किधर हैं’ असे विचारून उसको बुला असे सांगितले.

फिर्यादी यांनी त्यांचा चुलत भाऊ अनिल यास बाहर कोई आपको बुला रहा है असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी हे किचनमध्ये पाणी पिण्यास गेले.. त्यावेळी त्यांनी पाहिले की लोधा याने अनिलला काहीतरी विचारले. त्याचे उत्तर अनिलने मान हलवून नाही असे सांगितले. त्याच क्षणी नव्याने बंदुक काढून फिर्यादीचा चुलत भाऊ अनिल याच्या कपाळावर लावून गोळी झाडून त्याचा खून केला.आरोपी लोधा याच्यावर संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करून टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी व अवैध मार्गाने जबरी चोरी किंवा दरोडा टाकणे, धमकी देणे किंवा धाक दाखवून जबरदस्ती करून बेकायदेशीर कृत्ये करणे, इतर साथीदारांसोबत खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, दुखापत करणे, घातक शस्त्र जवळ बाळगणे अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत.त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये सुधारणा होत नसल्याचे दिसून आल्याने त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा-पुन्हा गुन्हेगारी केल्याने त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दुबईला नेले नाही म्हणून पत्नीने तोंडावर मारला ठोसा ,बांधकाम व्यावसायिक पतीचा मृत्यू

पुणे पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने केलेल्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीचा मृत्यू झाला. घरगुती भांडणातून वाद झाल्यानंतर पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वानवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला.

निखिल पुष्पराज खन्ना (वय 36) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी रेणुका निखिल खन्ना (वय 38) यांना वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, निखिल आणि त्यांची पत्नी रेणुका यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. दरम्यान आज दुपारच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात रेणुकाने पतीच्या तोंडावर ठोसा मारला.

त्यानंतर तिने फोन करून सासरे असलेल्या डॉक्टर खन्ना यांना याची माहिती दिली. डॉक्टर खन्ना घरी आले आणि त्यांनी निखिल यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. आणि निखिल यांचा मृत्यू झाला होता.मयत निखिल हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आहेत. वानवडी परिसरातील एका उच्चभूमी सोसायटीत आई-वडील पत्नी असे चार जण ते राहतात. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी  रेणुकाला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.

भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे  ‘सत्रिय ‘नृत्यपर्व’ महोत्सवात सादरीकरण

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स : संगीत नाटक अकादमी तर्फे कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : आसाम मधील सत्रीय या शास्त्रीय नृत्य शैलीला प्रोत्साहन देण्यासाठी संगीत नाटक अकादमीतर्फे दरवर्षी शास्त्रीय ‘नृत्यपर्व’ महोत्सव गुवाहाटी आसाम येथे आयोजित करण्यात  येतो. या वर्षीच्या सत्रीय नृत्यपर्व’ महोत्सवात पुण्यातील  भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आसाम मधील नृत्य प्रकार शिकून अतिशय सुंदर पद्धतीने सत्रीय नृत्यशैली सादर केली. 
तीन दिवस चाललेल्या या  महोत्सवात भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरण्याला आसाम येथील अनेक मान्यवर सत्रीय नृत्यगुरु उपस्थित होते.  या सादरीकरणाला संगीत नाटक अकादमीचे सेक्रेटरी राजूदास  उपस्थित होते. आसाम मधील काही निवडक संस्था आणि आसाम मधील दोन विश्वविद्यालये यांच्या बरोबरीने आसाम बाहेरील एकमेव विद्यापीठ म्हणजे भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 
यावेळी भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थी आणि शिक्षक कलाकार यांचा सांस्कृतिक आदान-प्रदान कार्य्रक्रम तेझपूर केंद्रीय विश्वविद्यालय येथे झाला.

या सर्व कार्यक्रमात भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांबरोबर सत्रीय नृत्य शिक्षिका डॉ. देविका बोरठाकूर यांचा सहभाग आणि मार्गदर्शन होते. तसेच या प्रकल्पात   भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले.

याच बरोबर प्रगज्योतिषपूर विश्वविद्यालय गुवाहाटी आसाम येथे ‘ललित कलांचे महत्त्व आणि उपयोग’ या विषयावर  भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांचे विषयतज्ज्ञ म्हणून मार्दर्शनपर व्याख्यान झाले. या व्याख्यानाला प्रगज्योतिषपूर विश्वविद्यालयाचे कुलगुरु, कुलसचिव, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.