Home Blog Page 1372

डेव्हिड आणि जेकब ससून इमारतीचे नूतनीकरण वारसा इमारतीला साजेसे व्हावे- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २५: शहरातील प्रत्येक वारसा असलेल्या इमारती या आपल्या सर्वांसाठी वारसा रूपाने मिळालेला खजिना आहे. डेव्हिड ससून आणि जेकब ससून या त्याच प्रकारच्या इमारती असून त्यांचे नूतनीकरण वारसा असलेल्या इमारतीला साजेसे व्हावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज डेव्हिड आणि जेकब ससून रुग्णालय वारसा इमारतीच्या नुतनीकरणाच्या कामाची आणि सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शेखर प्रधान, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, महामेट्रोचे महाव्यवस्थापक राजेंद्र पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण जाधव, महामेट्राचे संचालक अनिल कोकाटे, राजीव त्यागी आदी उपस्थित होते.

डेव्हिड ससून आणि जेकब ससून इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, नुतनीकरणाचे काम गुणवत्तापूर्वक होणे आवश्यक आहे. नूतनीकरणासाठी साहित्य चांगल्या प्रतीचे वापरावे, सिलींग व्यवस्थित असावे, रंगरंगोटी आकर्षक असावी, विद्युतीकरणाची कामे, जिन्याची कामे दर्जेदार होणे आवश्यक आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, वारसा असलेल्या ऐतिहासिक इमारती जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे आपले कर्तत्व आहे. त्याचे नूतनीकरणही त्याच पद्धतीने होणे आवश्यक आहे. या वैशिष्ट्यपूर्ण कामांसह विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

महात्मा गांधी यांच्यावर अपेंडिक्स शस्त्रक्रिया झाली होती त्या खोलीची पाहणी यावेळी श्री. पवार यांनी केली.

सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनची पाहणी करताना श्री. पवार म्हणाले, प्रवाशांच्या सोयीसाठी सूचना फलक आणि दिशादर्शक फलक अधिक ठिकाणी लावण्यात यावेत. मेट्रो भवनाचे काम, दिवाणी न्यायालय ते स्वारगेट भूमीगत मेट्रोचे काम आणि रामवाडी ते रूबी हॉल मेट्रोचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. दीक्षित यांनी मेट्रोस्टेशनच्या कामाबाबत माहिती दिली.
000

वैकुंठ परिवाराचा एक पणती पूर्वजांसाठी हा भावस्पर्शी उपक्रम – ना. चंद्रकांतदादा पाटील.

यमगरवाडी व भटक्या विमुक्तांसाठी निधी समर्पण हे पुण्यकर्म – चंद्रकांतदादांचे भावोदगार.

पुणे:वैकुंठ परिवाराच्या वतीने गत 25 वर्षे सुरु असलेला एक पणती पूर्वजांसाठी हा उपक्रम अत्यन्त भावस्पर्शी असून ह्या निमित्ताने आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याची संधी मिळते असे ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. सालाबादप्रमाणे वैकुंठ परिवाराच्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीत आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी वैकुंठ परिवाराचे पिनाक मोघे,संदीप खर्डेकर, राजू गिजरे, रमेश पायगुडे, भटक्या विमुक्तांसाठी कार्य करणारे धनंजय विचारे, श्री. पोटे, रंगावलीकार प्रसाद करशेट्टी इ उपस्थित होते.
भटक्या विमुक्तांसाठीचे कार्य हे पुण्यकर्म असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मोलाचे असल्याचे चंद्रकांतदादा म्हणाले.
यावेळी यमगरवाडीतील मुलांसाठी ना. चंद्रकांतदादा पाटील, पिनाक मोघे व राजू गिजरे यांच्या हस्ते निधी समर्पण करण्यात आले.यावेळी प्रसाद करशेट्टी यांनी विद्युत दाहिनीच्या हॉल मध्ये काढलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या व अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भव्य रांगोळी चे उपस्थितांनी कौतुक केले व ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले, राजू गिजरे यांनी कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली, धनंजय विचारे यांनी भटक्या विमुक्तांसाठी सुरु असलेल्या सेवाकार्यांची माहिती दिली, पिनाक मोघे यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.
यावेळी वैकुंठ परिसर 5000 पणत्यांच्या प्रकाशात उजळून गेले होते.

लवकर निदान झाले तर कॅन्सर बरा होतो : डॉ. रविकुमार वाटेगावकर

पिंपरी मध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार वाजवी दरात मिळणार

पुणे (दि. २५ नोव्हेंबर २०२३) लवकर निदान झाले तर कॅन्सर शंभर टक्के बरा होतो, तसेच प्रत्येकाने आहार विहार पद्धतीत दारू, तंबाखू सारख्या व्यसनांपासून दूर रहावे, तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळावेत आणि नियमित व्यायाम करावा या त्रीसुत्रीचा अवलंब करून कॅन्सर पासून दूर राहता येईल असे प्रतिपादन एमओसी पिंपरी सेंटरचे वरिष्ठ कर्करोग तज्ञ डॉ. रविकुमार वाटेगावकर यांनी केले.
पिंपरी येथे रविवार (दि.२६) पासून सुरू होणाऱ्या एमओसीचे (मुंबई ओंको सेंटर) उद्घाटन जागतिक कर्करोग तज्ञ डॉ. भरत पारेख यांच्या हस्ते होणार आहे. याची माहितीसाठी देण्यासाठी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. वाटेगावकर बोलत होते. यावेळी डॉ. रितू दवे उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. वाटेगावकर यांनी सांगितले की, पिंपरी मध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार वाजवी दरात एमओसी मध्ये मिळणार आहेत. गेल्या पाच वर्षात नावारूपाला आलेली ही संस्था आहे. एमओसीचे महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये १४ कॅन्सर केअर सेंटर आणि ४ कॅन्सर क्लिनिक्स उपलब्ध आहेत. वर्ष २०२१ मध्ये एमओसीने मॉडेल कॉलनी, पुणे येथे जिल्ह्यातील पहिले कॅन्सर केंद्र सुरू केले. उदात्त हेतू, उपचार कौशल्य आणि तंत्रज्ञान यांचा सुरेख मेळ साधता आल्यामुळे एमओसीने गेल्या पाच वर्षात पुण्यासह महाराष्ट्रात सुमारे १,२५,००० हून अधिक कर्करोगग्रस्तांना उपचार दिले आहेत. आता पिंपरी चिंचवड येथे पुणे जिल्ह्यातील दुसरे कॅन्सर केअर केंद्र पिंपरी मेट्रो स्टेशन लगत गेरास इम्पेरियल ओएसिस येथे अध्ययावत सुविधांनी परिपूर्ण असे सुरू होत आहे. या ठिकाणी रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार, वाजवी दरात घेता येतील. उपचार घेत असताना येणारा आर्थिक भार कमीत कमी करावा असे एमओसी केंद्राचे ध्येय आहे. कर्करोगास प्रतिबंध कसा करावा तसेच कर्करोगाचे लवकर निदान आणि उपचारांच्या दृष्टीने त्याचे महत्त्व यासंबंधी जनजागृती करण्यासाठी देखील एमओसी पिंपरी सेंटर प्रयत्नशील राहील असेही डॉ. वाटेगावकर यांनी सांगितले.

लहान मुलांमध्ये होणारे कॅन्सर ८० ते ९० टक्के बरे होतात. कॅन्सरचे निदान होणे हे रुग्णांसाठी एकदम धक्कादायक असते, त्यासाठी तज्ञ डॉक्टरांकडून उपचार व समुपदेशक तज्ञांकडून सल्ला घ्यावा. स्त्रीयांनी वयाच्या ३५ नंतर भीती न बाळगता गर्भाशयाची (Paps smear) आणि ४० नंतर स्तन (मॅमोग्राफी) तपासणी करावी असे आवाहन डॉ. रितू दवे यांनी केले.

पत्ता- पिंपरी एमओसी सेंटर, दुसरा मजला, गेरास इम्पेरियल ओएसिस, मोरवाडी, पिंपरी मेट्रो स्टेशन जवळ, पिंपरी, पुणे 411 017.

“न्यायालय अवमान प्रकरणी उद्योजकाला एक कोटींचा दंड !”

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी पिंपरीतील फिनोलेक्स कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री दीपक छाब्रिया यांना तब्बल एक कोटी रुपयाचा दंड नुकताच ठोठावण्यात आला. कंपनी क्षेत्रातील या मोठ्या घडामोडीची घेतलेली ही दखल.

जुलै 1945 मध्ये कराची मधून पुण्यात उदरनिर्वाहासाठी आलेल्या श्री प्रल्हाद छाब्रिया व त्यांचे बंधू के. पी. छाब्रिया यांनी इलेक्ट्रिकल केबल विक्रीच्या  एका छोट्या दुकानाद्वारे  व्यवसायाचा  प्रारंभ केला. 1950 मध्ये संरक्षण खात्याकडून मिळालेल्या एका मोठ्या ऑर्डरमुळे त्यांनी या इलेक्ट्रिकल केबलच्या निर्मितीत पदार्पण करण्याचे ठरवले. गेल्या 75 वर्षांमध्ये फिनोलेक्स केबल्सचे नाव देशातील इलेक्ट्रिकल व टेलीकम्युनिकेशन केबल्सचे अग्रगण्य निर्माते म्हणून घेतले जाते. वाहन उद्योगाला लागणाऱ्या पीव्हीसी इलेक्ट्रिकल केबलचे तसेच ऑप्टिकल फायबर केबल, स्विचेस,एलईडी लाइटिंग, पंखे, वॉटर हीटर व एमसीबी अशा विविध उत्पादनांची निर्मिती  कंपनी करते. कंपनीचे आजमीतिस पिंपरी, उर्से ( पुणे जिल्हा) गोवा व रुरकी (उत्तराखंड)अशा चार ठिकाणी अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प आहेत. या कंपनीची आजची उलाढाल 7500 कोटी रुपयांच्या घरात आहे.

फिनोलेक्स केबल्स  कंपनीची सर्वाधिक भाग भांडवल मालकी असलेल्या   छाब्रिया  कुटुंबामध्ये काही अंतर्गत वाद होऊन त्यांच्यात कंपनीचे नियंत्रण कोणाकडे असणार यावरून दोन गट निर्माण झाले आहेत. त्यांच्यात दिवाणी व फौजदारी प्रकरणे सुरु आहेत. या कुटुंबाच्या सुमारे १५०० कोटी रुपयांच्या भाग भांडवल मालमत्ता नियंत्रणावरून हा वाद सुरू आहे. श्री प्रल्हाद जी छाब्रिया यांचे 2016मध्ये निधन झाले. त्यानंतर त्यांचे शेअर्स प्रकाश छाब्रीया यांच्याकडे बक्षीस पत्राद्वारे हस्तांतरण करण्यात आले. त्यावरून प्रकाश व दीपक या दोन्ही चुलत भावांमध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे.

फिनोलेक्स केबल्स लिमिटेड या कंपनीने 29 सप्टेंबर 2023 या दिवशी  55 वी वार्षिक सर्वसाधारण आयोजित केलेली होती. या सर्वसाधारण सभेच्या कामकाजामध्ये श्री दीपक छाब्रिया यांची पूर्णवेळ संचालक नात्याने ‘कार्यकारी अध्यक्ष’ पदावर नियुक्ती करण्याबाबतचा तसेच अन्य पाच संचालकांची फेरनियुक्ती करण्याचे विषय होते.  श्री. छाब्रिया यांच्या नियुक्तीचा कालावधी 1 जुलै 2023  ते 30 जून 2028 असा पाच वर्षांचा होता. यावेळच्या मतमोजणीची छाननी करण्यासाठी श्री. व्ही. एम. बिराजदार यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आलेली होती.  यावेळी  सर्वोच्च न्यायालयाच्या अनुमतीनुसार ऑर्बिट इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड ( 30.75 टक्के भाग भांडवल) व फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (14.51 टक्के भाग भांडवल) असलेल्या  या दोन कंपन्यांनी मतदान केले. त्यांनी सर्व संचालकांच्या नियुक्तीच्या व दीपक छाब्रिया यांच्या विरोधात  मतदान केले. या नंतर मतदानाची छाननी करणाऱ्यांनी दोन्ही कंपन्यांनी केलेले  नकारात्मक मतदान ‘वादग्रस्त व न्यायप्रविष्ट’ असल्याने विचारात घेतले नाही.

दरम्यानच्या काळात श्री दीपक छाब्रिया यांच्या कार्यपद्धतीबद्दल दुसऱ्या गटाने तीव्र आक्षेप घेऊन कंपनीमधील ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’ बद्दल शंका उपस्थित केलेली होती.  यामध्ये काही भागधारकांच्या वतीने स्टेक होल्डर एम्पॉवरमेंट सर्विसेस (एसईएस) व इन-गव्हर्न रिसर्च या दोन सल्लागार संस्थांनी श्री दीपक छाब्रिया यांच्या नेतृत्वाखाली कंपनी कायद्याचे तसेच त्यातील अनेक तरतुदींचे पालन होत नसून सेबीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने या संचालकांच्या नियुक्तीस विरोध करावा असे आवाहन केलेले होते. फिनोलेक्स इंडस्ट्रीज या कंपनीचे श्री प्रकाश प्रल्हाद छाब्रीया हे संचालक आहेत. ते दीपक छाब्रिया यांचे चुलत बंधू आहेत. या मतदानामुळे दि.16 ऑक्टोबर 2023 पासून त्यांचे पूर्ण वेळ संचालक पद संपुष्टात आले.

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर गेलेले असताना त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेतील मतदान निकाला बाबत 26 सप्टेंबर रोजी काही आदेश दिलेले होते. 2018 मध्ये हे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ  ॲपेलेट ट्रायब्युनल (एनसीएलएटी) पुढे नेण्यात आले. त्यात बक्षीस पत्रालाच आव्हान देण्यात आले आहे.  या लवादाचे न्यायिक सदस्य ( ज्युडिशियल मेंबर) श्री. राकेश कुमार व तांत्रिक सदस्य
(टेक्निकल मेंबर) डॉ.  आलोक श्रीवास्तव यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश लक्षात न घेता वेगळा निर्णय दिला. त्यामुळे विरुद्ध पक्षाने सर्वोच्च न्यायालयात न्यायालयाच्या अवमानाची तक्रार दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची  गंभीर दखल घेऊन लवादाचा निर्णय केवळ रद्दबातलच केला नाही तर  त्यांच्यावर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई का करूनये याबाबतची नोटीस दिली.  मात्र लवादाच्या दोन्ही सदस्यांनी न्यायालया समोर उपस्थित राहून सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितल्यामुळे हे अवमानाचे प्रकरण बंद करण्यात आले. मात्र  न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याबद्दल फिनोलेक्स केबल्सचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दीपक छाब्रिया यांना एक कोटी रुपये दंड देण्याचे आदेश यावेळी न्यायालयाने दिले. त्याचप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मतदानाची छाननी करणारे स्क्रुटिनायझर श्री व्ही. एम. बिराजदार यांनाही  दहा लाख रुपये दंड ठोठावला. 

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने एकमताने निकाल देऊन एनसीएलएटीच्या  लवादाचे दोन्ही सदस्य व श्री. बिराजदार यांच्या कार्यपद्धतीवर कडक ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयाने 26 सप्टेंबर 2023 रोजी आदेश दिलेले असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक वार्षिक सर्वसाधारण सभेतील मतदानाचा निकाल जाहीर करण्यास विलंब केला. अशा प्रकारे व्यापारी हित संबंध जपण्याचा प्रयत्न त्या दोघांनी केला. दोन गटातील वादाचा लाभ घेण्याचा प्रयत्न व न्यायालयीन प्रक्रिया लांबवण्याचा प्रयत्न या दोघांनी केल्याबद्दल त्यांनी ही दंडांची  रक्कम चार आठवड्यांच्या आत पंतप्रधान सहाय्य निधी ( रिलीफ
फंडाला ) घावी असे आदेश दिले. यावेळी श्री. छाब्रिया व श्री. बिराजदार यांनीही सर्वोच्य न्यायालयाची माफी मागितली. परंतु त्यांचे वर्तन लक्षात घेऊन त्यांना मोठा दंड ठोठावला व एक प्रकारे कंपनी क्षेत्राला मोठा इशारा दिला आहे.

फिनोलेक्स उद्योग समूहामध्ये फिनोलेक्स केबल व फिनोलेक्स इंडस्ट्रीज अशा दोन प्रमुख  कंपन्या असून प्रवर्तक  छाब्रिया कुटुंबीयांचे त्यात सर्वाधिक भाग भांडवल आहे. फिनोलेक्स केबल मध्ये सध्या प्रवर्तकांचे जवळजवळ 36 टक्के भाग भांडवल असून परदेशी वित्त संस्थांचे 11.8 टक्के तर  म्युच्युअल फंडांची 11.9 टक्के अशी सुमारे 27.40 टक्के गुंतवणूक वित्त संस्थांची आहे. जवळजवळ 37 टक्के भाग भांडवल भारतीय गुंतवणूकदारांकडे आहे. काही वित्तसंस्थांनी दीपक छाब्रिया यांच्या बाजूने मतदान केले होते.मात्र फिनोलेक्स केबल आजही दीपक छाब्रिया यांच्या नियंत्रणाखाली असून त्यांनीच मतदानाचा निकाल  राखून ठेवला होता.

फिनोलेक्स केबल्स कंपनीच्या शेअर्सची नोंदणी मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारांवर करण्यात आलेली असून या कंपनीने आजवर गुंतवणूकदारांना भरपूर परतावा दिलेला आहे. शेअरचा गेल्या वर्षभरातील भाव किमान 491.15  रुपये  तर कमाल भाव 1219 रुपये होता. अगदी अलीकडचा त्याचा भाव 922. 35  रुपयांच्या घरात होता.

भारतीय उद्योग क्षेत्रामध्ये अलीकडे कौटुंबिक कलहापोटी उद्योगांचे तसेच भागधारकांचे  नुकसान झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. पुण्यातही काही मोठ्या उद्योगांमध्ये कौटुंबिक कलह  निर्माण झालेले आहेत.मात्र असे वाद किंवा कलह सामोपचाराने मिटण्यामध्येच संबंधित उद्योगाचे आणि भागधारकांचे हित आहे.अन्यथा चांगल्या उद्योगांवर याचा विपरीत परिणाम होऊन हे उद्योग बंद पडण्याची किंवा तोट्यात जाण्याची  वेळ येऊ नये ही इच्छा.

लेखक प्रा. नंदकुमार काकिर्डे

( लेखक पुणेस्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार आहेत)*

हवामान सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी कार्य करावे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

मुंबई, दि.२४ राज्य सरकार हवामान बदलावरील कृती आराखड्यावर काम करत आहे. त्यासाठी महत्त्वाकांक्षी धोरणे विकसित केली जात आहेत.
तसेच राज्यासाठी “हवामान सुरक्षित भविष्य निश्चित” करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधिमंडळ आणि फिनलँड संसदीय शिष्टमंडळ समितीची पर्यावरण आणि वातावरणीय बदलासंदर्भात आज विधानभवन येथे बैठक पार पडली.

फिनलँड संसदीय शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष श्रीमती जेनी पिटको, उपाध्यक्ष श्रीमती इव्हलिना हेनीलूमा, सदस्य मार्को एसेल, नूरा फेजस्ट्राम, पेट्री हुरू, मे.केविला, हॅना कोसोनेन, मिको ओलिकेनेन, मिको पोल्व्हिनेन, मार्जा इक्रोस, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक वि. मो. मोटघरे,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक विकास सूर्यवंशी,पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे माझी वसुंधरा अभियान संचालक सुधाकर बोबडे, राज्य वातावरणीय बदल कृती सेलचे संचालक अभिजीत घोरपडे संबंधित अधिकारी,पीठासीन अधिकारी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, निसर्ग आणि मानव हे अविभाज्य घटक आहेत प्राचीन भारतीय साहित्याने ही ओळख आपल्या मनात रुजवलेली आहे. आपले सर्व सण या संबंधाचे साक्षीदार आहेत.

प्रत्येक सणाचा त्या भागातील हंगाम, वनस्पती आणि प्राणी यांच्याशी एक वेगळा संबंध असतो. उत्सवादरम्यान झाडे, प्राणी आणि सागरी जीवांचा आदर केला जातो आणि म्हणून भारत हा पर्यावरण आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विविध आंतरराष्ट्रीय करारांवर स्वाक्षरी करणाऱ्या देशांमध्ये पहिला आहे. काही महिन्यांपूर्वी दिल्ली येथे १८व्या जी-२० शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जगभरातील विविध राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी भारताचे या आयोजनाबाबत कौतुक केले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उद्योग विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांनी राज्यातील पर्यावरण बाबत केलेल्या उपाययोजना आणि
पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करुनच शाश्वत विकासाचे उद्दिष्ट कसे साध्य करू शकतो. याविषयी सादरीकरण करून माहिती दिली.
प्रारंभी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी फिनलँडच्या संसदीय कार्यप्रणाली,पर्यावरण संतुलनासाठी केलेल्या उपाययोजना आणि समितीच्या कामकाजाची माहिती जाणून घेत महाराष्ट्र शासनाने पर्यावरणासाठी केलेल्या उपाययोजना आणि विधिमंडळ कामकाजाची माहिती शिष्टमंडळाला दिली.

सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहे. आपत्ती निवारणासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आवश्यक उपाययोजना कशा करता येतील. नुकतेच महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. त्यातून महिलांना राजकीय क्षेत्रात काम करण्याची अधिक संधी मिळणार आहे. या महिलांच्या पुढाकाराने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून पर्यावरण विषयक जनजागृती आणि उपाययोजना करण्यासाठी फिनलँड
संसद आणि राज्य सरकार व महाराष्ट्र विधानमंडळ यांचे सहकार्य असावे, अशी अपेक्षाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केली.

भविष्यात कृत्रिम बुद्धीमत्तेचा नवा धर्म निर्माण होईल-

प्रा.गोविंदन रंगराजन एमआयटी डब्ल्यूपीयूत २८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालाचे उद्घाटन

पुणे: ” जस जसे अर्टिफिशियल इंटेलिजेन्स अधिक अत्याधुनिक आणि व्यापक होत आहे तसे तसे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्या धोक्यांपासून चेतावणी देणारे आवाजही मोठे होत आहे. परंतू भविष्यात कृत्रिम बुध्दीमत्तेचा नवा धर्म निर्माण होण्याचे चिन्हे दिसत आहे.”असे प्रतिपादन बंगलूर येथील पब्लिक युनिव्हर्सिटीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालक प्रा.गोविंदन रंगराजन यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे सल्लागार व गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा व व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
प्रा.गोविंदन रंगराजन म्हणाले,”एआयने काही प्रमाणात सामाजिक सीमा ओलांडल्या आहेत. वंश, वर्ग आणि इतर श्रेण्यांवर आधारित फरक लक्षता ठेवणे ही महत्वाचे आहे. एआयचे बरेच फायदे आहेत. जसे की आरोग्य डेटा जमा करणे या सारख्या बर्‍याच गोष्टींना ते बळ देते. परंतू एआय सिस्टमचा एक धोका आहे. तो म्हणजे लवकरच आपल्यापेक्षा अधिक हुशार होईल. या मुळे समाजतील प्रतिष्ठित व्यक्तीचे वैयक्तिक जीवन धोक्यात येऊ शकते. आरोग्य सेवेत ही डॉक्टरांना याची मदत मिळेल परंतू त्यासाठी काही कायदे व नियमावली तयार करावे. तसेच चैप आणि जीपीटी सारख्या जेनेरिक साधनांचा झपाट्याने होणारी वाढ ही चिंताजनक आहे. बर्‍याच वापरकर्त्यांनी असाइनमेंट लिहिणे टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ज्यामुळे शैक्षणिक अखंडता आणि सर्जनशीलता धोक्यात आली आहे.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली व जगदगुरू तुकाराम महाराज यांचा संदेश मानवजातीपर्यंत पोहचविण्याच्या मुख्य उद्देशाने ही व्याख्यानमाला सुरू केली गेले. येथे विचारवंत, धर्मगुरू, तत्वज्ञ, शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ज्ञ हे मार्गदर्शन करुन ज्ञान दानाचे कार्य करीत आहेत. सदगुणांची पूजा हीच खरी ईश्वराची पूजा आहे. मन आणि आत्मा या गोष्टींचे अधिक चिंतन व्हावे. जीवनाचा हेतू व कर्तव्य काय आहे याची जाणिव यातून होते.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,” वर्तमान काळात मानवाने मशीनची निर्मिती केली आहे. जीवनात सुख आणि शांती निर्मितीसाठी आध्यात्मिक व आत्मज्ञान ज्ञान गरजेचे आहे. सत्याची परिभाषा समझणे ही गरजेचे आहे.”
डॉ.संजय उपाध्ये म्हणाले, ” दिवाळी नंतर ही  ज्ञानाची दिवाळी या व्याख्यानमालेतून सुरू झाली आहे. यातून विचारांबरोबर स्वतःची विवेक बुद्धी जागृत करावी. वर्तमानकाळात मानवाचे शरीर ही यंत्रवत होत असतांना त्यांना कधी काय करावे याचे भान ही राहिले नाही.”
डॉ. मिलिंद पांडे यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. याचा मुख्य उद्देश हा विचारांचे शुद्धीकरण करणे आणि व्यक्तीमत्वाचा विकास करणे आहे.
प्रा.डॉ.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. आर.एम,चिटणीस यांनी आभार मानले.

घराचे स्वप्न साकारण्यासाठी ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो’ उपयुक्त – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई, दि. 25 : आपले स्वतःचे घरकुल असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते साकारण्यासाठी होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो उपयुक्त ठरेल. या क्षेत्राच्या विकासासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊंसिलच्या (NAREDCO) वतीने वांद्रे- कुर्ला संकुलात देशातील सर्वात मोठे ‘होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज दुपारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘नारडेको’चे अध्यक्ष संदीप रुणवाल, सचिव अभय चांडक आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ‘नारडेको’ने देशातील सर्वात मोठे प्रदर्शन भरविले आहे. यामुळे सर्व सामान्य घर खरेदीदारांना मोठे व्यासपीठ मिळवून दिले आहे. या क्षेत्रात वेगवेगळ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांनी प्रवेश केला आहे. घर खरेदीदारांना स्वस्त आणि चांगले घर निवडण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे.

बांधकाम क्षेत्राच्या नियमनासाठी ‘ महारेरा ‘ ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. बांधकाम क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. तसेच अशा प्रकारचे प्रदर्शन पुढील वर्षी आयोजित करावे, अशीही सूचना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली.

यावेळी श्री. रुणवाल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पोलीस गस्त नौकासागरी किनारा सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना

0

मुंबई, दि. 25: राज्यात 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  त्यामध्ये राज्याच्या सागरी किनारा सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांचा समावेश आहे. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक पोलीस गस्त नौका आहेत. सध्या राज्यात 30 पोलीस बोटी कार्यरत आहेत आणि राज्याच्या किनारपट्टीवर नियमितपणे गस्त घालत आहेत.  याशिवाय राज्याने 25 ट्रॉलर भाड्याने घेतले असून, हे सर्व ट्रॉलर्स सातही सागरी पोलीस घटकांमार्फत सागरी किनारीभागात गस्त घालण्यासाठी वापरले जातात.

तसेच राज्य शासनातर्फे  28 नवीन बोटी तीन टप्प्यात घेण्याच्या प्रक्रिया सुरु आहेत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 10 नवीन बोटी खरेदी केल्या जाणार आहेत. राज्य पोलीस दलाकडे सध्या असलेल्या बोटींचे आधुनिकीकरण करण्याच्या अनुषंगाने मुंबई पोलीस दलाकडील एक बोट – मुंबई 2,  हिचे आधुनिकीरण  करण्यात आले आहे. तसेच सदर नौकाच्या सागरी चाचणीनंतर तिचा वापर सागरी गस्तीसाठी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याच मार्गावर इतर बोटींना कार्यान्वित करण्यात येणार आहे.

सर्व गस्ती नौकांच्या गस्तीवर लक्ष ठेवण्यासाठी, राज्याने सर्व 7 किनारी घटकांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी 53 लाख रुपये मंजूर केले आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने हे नियंत्रण कक्ष समुद्रात गस्त घालणाऱ्या पोलीस नौकांवर लक्ष ठेवणार असून, त्यांना मार्गदर्शन देखील करु शकणार आहेत. पुढील पाच वर्षांसाठी 5 इंटरमीडिएट सपोर्ट व्हेसल्स (ISV) भाडेत्तवावर घेण्यासाठी राज्य शासनाने 51 कोटी चा निधी मंजूर केला आहे.  या मोठ्या बोटी असून समुद्रात खोलवर जाण्याची त्यांची क्षमता आहे. तसेच त्या प्रतिकूल हवामानाचा सामना देखील करू शकतात.  तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने अलिकडेच 81 मास्टर्स आणि इंजिन डायव्हर्स आणि 158 खलाशांच्या कायमस्वरूपी भरतीला मंजुरी दिली आहे. पोलीस गस्ती नौका चालवण्यासाठी आणि नौकांच्या देखभालीसाठी मदत करतात.  महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने त्यांच्या जेट्टीचा वापर पोलीस नौकांसाठी करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे पोलीसांच्या गस्ती नौकांच्या देखभाल दुरुस्तीकरीता व पेट्रोलींग करणे सोईचे झाले आहे.

अलिकडेच 16 आणि 17 नोव्हेंबर 2023 रोजी सर्व सागरी सुरक्षेशी निगडीत अस्थापनांच्या सतर्कतेचे मूल्यांकन करण्यासाठी तटरक्षक दलाने ऑपरेशन सागर कवच आयोजित केले होते. या ऑपरेशन मध्ये सर्व 44 किनारी पोलीस ठाण्यांनी भाग घेतला आणि बोटी आणि व्यक्तींच्या अनधिकृत प्रवेशास यशस्वीरित्या प्रतिबंध केला आहे, अशा विविध सुरक्षेच्या उपायोजना राज्य शासनामार्फत करण्यात आल्या आहेत. अशी माहिती गृह विभागाच्यावतीने  दिली आहे.

देशातील मंदिरांची संख्या……(लेखिका: प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी)


भारत हा हिंदू बहुल देश आणि या देशाची संस्कृती ही सनातनशी जोडलेली आहे. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि बंगालपासून गुजरातपर्यंत, ते ईशान्येसह पसरलेल्या या खंडप्राय देशात आज एकूण सहा लाख आठ्ठेचाळीस हजार सहाशे सात मंदिरे आहेत असे टेम्पल ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर दिसते. हे आकडे राज्यांनी दिलेले आकडे आहेत. प्रत्यक्षात ही संख्या साडेसात लाखाच्या आसपास असेल.
देशात सर्वाधिक मंदिरे ही तमिळनाडू राज्यात आहेत. या राज्यात गेली पन्नास वर्षे द्रवीड राजकारण हे हिंदूत्वाच्या पूर्ण विरोधात आहे ते सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर धर्मातरणाच्या घटना घडत आहेत. तरीही या राज्यात सनातन संस्कृतीची साक्ष देणारी 79154 मंदिरे आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्रात 77283 मंदिरे आहेत. उत्तराखंड ही देवभूमी मानली जाते, त्या राज्यातही केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री या चार धामसह 3695 मंदिरे आहेत.
उत्तरप्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य. या राज्यात वाराणसी, आयोध्या, मथुरा अशी तीर्थक्षेत्रे आहेत. गोरक्षनाथांचे गोरखपीठ आहे. ज्याचे प्रमुख आजही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आहेत. या शिवाय गंगा यमुना सरस्वतीचा त्रिवेणी संगम प्रयागराजला आहे. या राज्यात मंदिरांची संख्या 37518 आहे. यात आयोध्येत उभे रहात असलेल्या रामलल्ला मंदीर संकूलाची भर पडणार आहे. आयोध्येतील जुन्या मंदिरांचे पुर्ननिर्माण करण्यात येणार आहे.
समाजकारण आणि राजकारणावर वर्चस्व ख्रिश्चनांचे असलेल्या केरळ राज्यात 22931 मंदिरे आहेत, तर आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातही मिशन-यांचे वर्चस्व असले तरी तेथील मंदिरांची एकूण संख्या 85162 आहे. जगप्रसिद्ध तरूमला तिरूपती बालाजीचे मंदिरही आंध्रप्रदेशात असून ते कर्नाटक, तमीळनाडू राज्यांच्या सीमेलगत आहे.
दक्षिणेप्रमाणेच ईशान्य भारतातही स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ख्रिश्चन धर्मांतरण करून ही राज्ये ख्रिश्चन वर्चस्वाखाली आणण्याचे सरकारच्या मदतीने प्रयत्न झाले. हा आदिवासी बहुल प्रदेश असल्याने धर्मांतरणाचे काम बिनबोभाट होत होते. ख्रिश्चन वर्चस्वाने हा भूभाग भारतपासून तोडण्याचा डाव असावा. पण त्यात त्यांना शंभरटक्के यश मिळाले नाही, कारण या सर्व राज्यातील सनातन संस्कृती जपण्याचे काम येथील मंदिरांनी केले आहे. त्यात त्यांना यशही थोडेफार मिळाले. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, सिक्कीम आणि अरूणाचल प्रदेश या ईशान्येकडील राज्यातही मंदिरांचे अस्तित्व ठळकपणे अधोरेखीत होते. या आसाममध्ये सर्वाधिक म्हणजे 5394 मंदिरे आहेत. याशिवाय मणिपूर (441), सिक्कीम (87), अरूणाचल प्रदेश (96), मेघालय (128), त्रिपुरा (528) आणि मिझोराम (32) अशी मंदिरांची संख्या आहे.
जम्मू काश्मीर लडाख……
गेली तीन चार दशके दहशतवादाच्या झळा सहन करणा-या जम्मूकाश्मिर आणि लडाखमधूल कलम 370 आणि 35 ए हे मोदी सरकारने काढून टाकल्यावर तेथील मंदिर पुर्ननिर्माणाचेही काम हाती घेण्यात आले. भारत पाकिस्तान दरम्यानच्या एलओसीवर शारदा मातेचे सुंदर ऐतिहासिक मंदिर होते. दहशतवाद्यांनी ते उध्वस्त केले होते. पण यंदाच्या वर्षी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शारदामाता मंदीर हे भक्तांसाठी खुले केल्यानंतर प्रथमच नवरात्रौउत्सव तेथे धुमधडाक्यात साजरा झाला. येथे शंकराचार्यांचेही मंदिर आहे. काश्मिर लडाखमधील अनेक मंदिरे जी भक्तांसाठी दहशतवाद्यांनी बंद केली होती, ती खुली कऱण्याचे काम जोरात सुरू आहे. यंदा काश्मिरमध्ये दीपावलीचे पर्वही उत्साहात लोकांनी साजरे केले. अनेक वर्षानंतर काश्मीर खोरे प्रकाशमान झाले आणि येथील अंधार मिटत असल्याची जाणिव प्रत्येकाला करून दिली. अशा या जम्मूकाश्मिर लडाख मध्येही आज एकूण 470 मंदिरे उभी आहेत. यात अमरनाथची गुंफा आणि वैष्णवीदेवीचेही मंदिर आहे.
गोवा…..
गोवा राज्याबद्दल सांगितले जाते की तिथे पोर्तुगिजांची सत्ता अनेक वर्षे असल्याने ते ख्रिश्चन बहुल राज्य आहे. त्यासाठी तेथे असलेली मोठी मोठी चर्चेस दाखवली जातात. कार्निव्हल सारख्या उत्सवांचा गाजावाजा केला जातो. ख्रिश्चन संस्कृतीच्या खूणा दाखवल्या जातात. मात्र त्याचवेळी दक्षिण गोव्यातील जुन्या ऐतिहासिक मंदिरांबद्दल कधीच फारसं बोललं जात नव्हतं. खरं तर गोवा राज्यात असलेली 1855 मंदिरे हा ऩॅरेटिव्ह साफ खोटा ठरवतात. गोव्यामध्ये सनातनला मानणा-यांची संख्या जास्त आहे. परदेशी पर्यटक आणि त्यांच्यासाठी नाताळचा सण मोठ्या गाजावाजा करत साजरा केला जात असला तरी गोवा हे अन्य राज्यांसारखे सनातन संस्कृती जपणारे राज्य आहे. त्यामुळे गोव्याला फिरायला गेलेले अगोदर दक्षिण गोव्यातील सुंदर मंदिरे बघून येत.
देशातील राज्यनिहाय मंदिरांची संख्या अशी –
जम्मूकाश्मिर लडाख 470, हिमाचल प्रदेश 4560, पंजाब 4827, उत्तराखंड 3695, हरयाणा 10329, दिल्ली 5367, उत्तरप्रदेश 37518, राजस्थान 39392, बिहार 29748, बंगाल 53658, झारखंड 14680, मध्यप्रदेश 27947, छत्तीसगड 9484, ओडिशा 30887, गुजराथ 49995, महाराष्ट्र 77283, कर्नाटक 61232, तेलंगणा 38392, आंध्रप्रदेश 47152, तमिळनाडू 79154, केरळ 22931, पदुचेरी 1201, गोवा 1855, दीवदमण 186.
ही मंदिरांची आकडेवारी का महत्वाची आहे ?
तर मंदिरे ही त्या त्या ठिकाणी आपली परंपरा, जीवनपद्धती, विचारपद्धती मूल्ये शाबूत ठेवतात. आपली विचार पद्धती आणि त्यावर आधारित आचरण पद्धती ही आपली मूल्ये आणि संस्कारांवर अवलंबून असतात. त्याची रुजवण धार्मिक आध्यात्मिक कृतीतून होत राहते.
पण एव्हढेच नाही तर मंदिरे गावाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना देणारी असतात. पंढरपूर, कोल्हापूर, नृहसिंहवाडी अशी अनेक गावे ही वर्षानुवर्षे यात्रांवरच चालत होती. आता कोल्हापूरसारख्या ठिकाणी औद्योगिक विकास झाला आहे. पण पंढरपूर तर केवळ यात्रेवरच चालणारे गाव आजही आहे. येथे आषाढी, कार्तिकीसह वर्षातून पाच मोठ्या यात्रा भरतात, त्यावेळी येथे येणारे लाखो भक्त येतात. त्यांचं येणं, जाणं, रहाणं, त्यांनी खरेदी केलेली फूलमाळा, नारळ प्रसाद आणि घोंगड्या, वाद्ये यातूनच गावात आर्थिक उलाढाल होत असते. यातून रोजगार निर्माण होतो आणि अर्थचक्राला गतीही मिळते. यासारखीच शेगाव, अक्कलकोट, ज्योतिबा, नाशिक, कोकणातील गणपतीपुळे, राजापूर, गुहाघर अशी अनेक नावे सांगता येतील. पुरातन काळापासून आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही पाश्चिमात्यांच्या अर्थशास्त्रांच्या नियमानुसार कधीच चालत नव्हती. आपली अर्थव्यवस्था ही कौटिल्यच्या अर्थशास्त्राच्या सिद्धांतानुसार चालते. समाजाच्या उतरंडमध्ये (पि-यामिड) सर्वात शेवटच्या पायरीवर असलेल्या व्यक्तीला आर्थिक बळ दिले की तेथूनच समाजाच्या, गावच्या, शहराच्या राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चाकांनाही गती मिळायला सुरूवात होते. देशाची अर्थव्यवस्था गतीमान ठेवण्यासाठी सनातनच्या मंदिरांचे मोठे योगदान आहे.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी (माजी आमदार) – 94220 37306
राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा.

पुणे जिल्ह्यात वीज पुरवठा सुधारणेसाठी ७३४७ कोटी रुपयांची योजना

स्वतंत्र संचालक श्री. विश्वास पाठक यांची माहिती

पुणे, दि. २५ नोव्हेंबर २०२३: पुणे जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या ध्यानात घेता वीज वितरण जाळे बळकट करण्यासाठी आरडीएसएस योजनेत ७३४७ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली असून त्यामुळे जिल्ह्यातील वीज पुरवठ्याबाबतच्या अनेक समस्या दूर होतील, असे एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी शनिवारी पुणे येथे सांगितले. वाढती वीज मागणी ध्यानात घेता पुणे जिल्ह्यात महावितरण आणि महापारेषणच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले.

महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक यांच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आ. भीमराव तापकीर, आमदार संग्राम थोपटे, आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार संजय जगताप, महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, संचालक (मानव संसाधन) अरविंद भादिकर, महापारेषणचे संचालक संदीप कलंत्री, महावितरणचे पुणे प्रादेशिक संचाल श्री. अंकुश नाळे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार आणि सुनील पावडे, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोलप आणि महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक पंकज तगलपल्लेवार यावेळी उपस्थित होते.

संचालक श्री. विश्वास पाठक म्हणाले की, वाढती वीज मागणी ध्यानात घेऊन वीज पुरवठ्याच्या जाळ्यात सुधारणा करण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशभरात आरडीएसएस ही योजना हाती घेतली आहे. या योजनेत राज्यामध्ये ४२ हजार कोटी तर पुणे जिल्ह्यात ७३४७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या योजनेत वीज वितरण जाळ्यात सुधारणा करून हानी कमी करणे, स्मार्ट मीटर बसविणे आणि फीडर वेगळे करणे ही कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे वीज पुरवठ्याच्या बाबतीत आमूलाग्र बदल घडणार असून दर्जेदार वीज पुरवठा होईल.

त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याच्या हेतूने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० लागू केली आहे. यामुळे सौर ऊर्जेचा वापर करून शेतीसाठी सात हजार मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी साडेतीन हजार मेगावॅट वीजनिर्मितीची टेंडर प्रसिद्ध झाली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील २४४ मेगावॅटच्या टेंडरचा समावेश आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होणार आहे. तसेच क्रॉस सबसिडीचा बोजा कमी झाल्यामुळे भविष्यात उद्योगांनाही स्पर्धात्मक दराने वीज पुरवठा करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आरडीएसएस योजना आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यामुळे राज्याचे ऊर्जा क्षेत्र आमूलाग्र बदलणार आहे, असे ते म्हणाले.

उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपापल्या विधानसभा मतदारसंघांच्या अनुषंगाने विजेसंदर्भात विविध मागण्या केल्या. पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी वाढत्या लोकसंख्येनुसार वीज पुरवठ्याच्या क्षमतेत वाढ करावी आणि वीज कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील उद्योगांची वाढती संख्या आणि त्यांचे विस्तारणारे काम ध्यानात घेऊन वीज पुरवठा जाळे अधिक मजबूत करण्याची मागणीही त्यांनी केली. स्वतंत्र संचालक श्री. पाठक यांनी लोकप्रतिनिधींच्या सूचना प्राधान्याने अंमलात आणाव्यात असे सांगितले. संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी सांगितले की, महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळासोबत बदलणे आणि पुढाकार घेऊन ग्राहकांची सेवा करणे गरजेचे आहे. श्री. संदिप कलंत्री यांनीही मार्गदर्शन केले.

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दक्षता कमिटीची व्याप्ती वाढवावी – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्यावतीने ‘महिलांवरील हिंसाचाराचे निराकरण’ यासंदर्भात एक दिवसीय चर्चासत्राला उपसभापती डॉ. गोऱ्हे यांचे मार्गदर्शन

मुंबई दि.२५: पोलिसांच्या दक्षता कमिटीची व्याप्ती वाढवली पाहिजे. महिला पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्या यांच्या भेटी झाल्या पाहिजेत. तसेच अत्याचारित महिलेला भेटण्यासाठी एक नियमावली तयार करण्यात आली पाहिजे. आज कायद्याच्या सेवकांनी स्त्रियांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. देशात न्याय देण्यासाठी ज्या यंत्रणा उभारण्यात आलेल्या आहेत त्या यंत्रणांकडून वेळेवर न्याय मिळण्यासाठी नियमावलीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्यावतीने ‘महिलांवरील हिंसाचाराचे निराकरण’ यासंदर्भात एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन आज सह्याद्री शासकीय अतिथी गृह येथे करण्यात आले. या कार्यक्रमात उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

याप्रसंगी, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग अध्यक्ष, न्यायमूर्ती श्री. के के तातेड, मा. न्यायाधीश श्रीमती. साधना जाधव, महाराष्ट्र रेल्वे पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे, डॉ. मंजू लोढा, डॉ. कविता लालचंदानी आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटनाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी महिलांना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी महिला आरक्षण विधेयक मंजूर केलेले आहे. यातून महिलांना राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी अधिक प्रमाणात निर्माण झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सर्व जाती धर्मात लिंग समानता असावी. सर्व स्त्रियांना समान न्याय हक्क मिळाले पाहिजेत. स्त्रियांबाबतची मानसिकता बदलण्याची सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे. तसेच कुटुंबात देखील लोकशाही असली पाहिजे तरच स्त्री पुरुषांना स्वतंत्रपणे निर्णय घेता येतील. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

महिला हिंसाचाराचे निर्मूलन करणे हे संयुक्त राष्ट्राचे उद्दिष्ट आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी दर महिन्यातील एक दिवस असणे आवश्यक आहे. त्यानुसार संयुक्त राष्ट्राच्यावतीने ऑरेंज डे साजरा केला जातो. स्त्री आधार केंद्राच्यावतीने देखील तो साजरा करण्यात येत असतो असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले

रेल्वे स्थानकावर महिलांना भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी स्त्री आधार केंद्र काम करणार – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0

‘डीपफेक’ बाबत सरकार लवकरच कायदा तयार करणार; महिलांनी सायबर गुन्ह्यांपासून दक्ष रहावे

मुंबई दि.२५: रेल्वे प्रशासनाकडून महिलांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्त्री आधार केंद्राच्या वतीने कार्य सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये संस्थेच्या महिला रेल्वे स्टेशनवर जाऊन पाहणी करतील तेथील महिलांशी संवाद साधतील. स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करतील. तसेच ‘डीपफेक’ मध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून खोटे फोटो व्हिडीओ तयार केले जात आहेत. याबाबत महिलांनी सावध असावे. यावर कायदा तयार करण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे विधानपरिषद उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

स्त्री आधार केंद्रातर्फे जागतिक महिलांवरील हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने दि. २५ नोव्हेंबर २०२३ ते ११ डिसेंबर २०२३ रोजी पोस्टर प्रदर्शन व चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन स्त्री आधार केंद्र अध्यक्षा व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, संयुक्त राष्ट्रसभेच्या आमसभे तर्फे दरवर्षी २५ नोव्हेंबर हा दिवस महिलांवरील हिंसाचार थांबविण्यासाठी ‘ऑरेंज डे’ नावाने साजरा केला जातो. स्त्री आधार केंद्राच्यावतीने देखील तो स्त्रियांच्या प्रश्नांबात जनजागृती करत साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांवरील हिंसाचार अद्यापही थांबवता आलेला नसून त्याला काही कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये, या विषयावर एकतर कोणीही न बोलणे तसेच जो बोलतोय त्याचं यातील स्थान काय असा प्रश्न विचारला जातो, बलात्कार, लैगिक अत्याचार या विषयावर बोलायची लाज वाटणे यामुळेच त्यासर्वाची खुलेपणाने चर्चा व्हावी यासाठी ‘ऑरेंज डे’ हा कार्यक्रम आयोजीत करण्यात येत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

संस्थेच्या कामाला अधिक व्यापक करणे गरजेचे आहे. दुष्काळ निवारण्यासाठी जे रोजगारपूरक कार्यक्रम आहेत ते सुरू व्हावेत यासाठी दोन डिसेंबर रोजी पुणे येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्यामल देसाई यांनी घनकचरा स्वच्छता व पर्यावरणाची दिशा आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त अपर्णा पाठक यांनी शाश्वत विकास उद्दिष्टे व महिला सक्षमीकरण या विषयावर आपले विचार मांडले.

या प्रसंगी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, अनिता शिंदे, शोभा कोठारी, मीना इनामदार, सविता लांडगे यांसह अनेक महिला उपस्थित होत्या.

पुणे शहर प्रचार प्रसिद्धी प्रमुख पदी संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले

पुणे :भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या विविध आघाडींचे अध्यक्ष व संयोजकांची घोषणा भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पुणे शहर प्रचार प्रसिद्धी प्रमुख पदी संजय मयेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रचार प्रसिद्धी सह प्रमुख पदी पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले यांची नियुक्ती करण्यात आली आहे

विविध आघाडीचे अध्यक्ष व संयोजकांची नावे पुढील प्रमाणे

  1. उद्योग आघाडी अध्यक्ष – अमृता देवगांवकर
  2. सहकार आघाडी अध्यक्ष – समीर रुपदे
  3. कामगार आघाडी अध्यक्ष – ओंकार कदम
  4. वैद्यकीय आघाडी अध्यक्ष – डॉ. गणेश परदेशी
  5. पर्यावरण आघाडी अध्यक्ष – संदीप काळे
  6. ज्येष्ठ नागरीक आघाडी अध्यक्ष – पोपटराव गायकवाड
  7. दक्षिण भारतीय आघाडी अध्यक्ष – राजू श्रीगिरी
  8. उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष – सुरज दुबे
  9. पायाभूत सुविधा आघाडी संयोजक – मंदार देवगावकर
  10. सोशल मीडिया संयोजक – निखिल पंचभाई
  11. सह संयोजक – उमेश खंडेलवार, ऋषिकेश मळेकर
  12. प्रचार प्रसिद्धी प्रमुख – संजय मयेकर
  13. प्रचार प्रसिद्धी सह प्रमुख – पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले
  14. क्रिडा आघाडी संयोजक – शिरीन गोडबोले
  15. सह संयोजक – हर्षल निकम

पाचव्या दिवशी १६०० मुली खेळाडू सहभागी

–  चॅम्पियनशीपच्या पाचव्या दिवशी अथलेटिक्स आणि फुटबॉलमध्ये ९०० मुली खेळाडूंचा सहभाग

– चॅम्पियनशीपच्या पाचव्या दिवशी ‘शी इज गोल्ड’ या उपक्रमाद्वारे मुली खेळाडूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले

पुणे, २५ नोव्हेंबर २०२३ – पुण्यातील एसएफए चॅम्पियनशीपच्या पाचव्या दिवशी शी इज गोल्ड या उपक्रमाद्वारे मुली खेळाडूंवर लक्ष केंद्रित करण्यात आले. हा दिवस स्त्री खेळाडूंना सक्षम करत आणि त्यांना प्रोत्साहन देत साजरा करण्यात आला. आजच्या दिवशी १६०० मुली खेळाडूंनी श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे अथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बुद्धीबळ, फुटबॉल (अंडर-१०, अंडर-१२, अंडर-१४, अंडर-१६, अंडर-१८), जिमनॅस्चिक, टेबल टेनिस, टेनिस आणि व्हॉलीबॉल अशा आठ खेळांत भाग घेतला.

अथलेटिक्सच्या विश्वात एसएफए चॅम्पियनशीपमध्ये पहिल्यांदाच भाग घेणाऱ्या ११ वर्षांच्या आर्या फरांदेनं अंडर१२ लांब उडी खेळात लक्षणीय कौशल्य दाखवले. शिक्षकांच्या मदतीने सुरुवातीला वाटणाऱ्या भीतीवर मात करत तिने आपल्या गुणवत्तेला साजेसे स्थान मिळवले. आर्याच्या प्रवासाने मार्गदर्शन व तरुण खेळाडूंची चिकाटी वृत्ती नव्याने अधोरेखित केली.

श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये जिमनॅस्टिक आणि व्हॉलीबॉल अशा खेळांचे थरारक प्रदर्शन पाहायला मिळाले. खेळाडूंच्या कौशल्याने पूर्ण वातावरण भारलेले होते. दरम्यान टेनिस प्रेमी अंडर-१०, अंडर-१२, अंडर-१४ अशा वेगवेगळ्या वयोगटातील आकर्षक कामगिरीच्या निकालांची वाट पाहात असल्यामुळे उत्सुकतेमध्ये आणखी भर पडली.

चौथ्या दिवसाचे निकाल

  1. अथलेटिक्स, अंडर- १४, मुली ६०० मीटर

सुवर्ण- आरोही पत्मस, हर्षवर्धन हायस्कूल तालेहिप्परगा सोलापूर,

1:56.62 मिनिटे/ 600मीटर

रौप्य: मिताली भामरे, विखे पाटील मेमोरियल स्कूल, पत्रकार नगर

2:00.51 मिनिटे/600मीटर

रौप्य: अनुष्का कुंभार, जय हिंद हाय स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, पिंपरी कॉलनी

2:05.01 मिनिटे /600मीटर

अथलेटिक्सअंडर- १६, मुली १०० मी

सुवर्ण: हंसिका सुंदरम, द बिशप्स को- ड स्कूल, उंड्री

14.50 सेकंद/100मीटर

रौप्य: सुब्रता गायकवाज, स्पायसर हाय सेकंडरी स्कूल, गणेशखिंड

14.58 सेकंद /100मीटर

ब्राँझ: अनुष्का जैसवाल, डॅफोडिल इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी

1/100मीटर

  1. बुद्धीबळअंडर-१५ मुली

सुवर्ण: पलक प्रशांत जाधव, विद्या व्हॅली स्कूल

रौप्य: सारा देवकर, द बिशप्स को- एड स्कूल, उंड्री

ब्राँझ: रुतू योगेश जामदार, द ऑर्किड स्कूल, बाणेर

बुद्धीबळअंडर-१७ मुली

सुवर्ण: मानसी धनंजय टिळेकर, एस. पी. ज्युनियर कॉलेज, पुणे

रौप्य : काव्या अरूण, विद्या व्हॅली स्कूल

ब्राँझ: निशिता रसिक वाघेला, युरो स्कूल, वाकड

  1. जिमनॅस्टिकअंडर- ८ मुली बॅलन्स बीम

सुवर्ण: इरा कुलदीप गोंदाल, सेंट अनीज स्कूल, कॅम्प

रौप्य: संस्कृती, कोठारी इंटरनॅशनल स्कूल, खारोळ

  1. जिमनॅस्टिकअंडर- १२ मुली बॅलन्स बीम

सुवर्ण: स्वरा पळशीकर, पोदार इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव

निकाल: 8.65

  1. जिमनॅस्टिकअंडर- १२ मुली बॅलन्स बीम

सुवर्ण: शर्वरी गंजन, वॉलनट स्कूल, शिवणे

निकाल: 10.8

रौप्य: काश्वी राळेगावकर, वॉलनट स्कूल, शिवणे

निकाल: 09.00

ब्राँझ: शिवानी कुलकर्णी, मिलेनियम स्कूल, नॅशनल स्कूल, कर्वेनगर

निकाल: 7.25

  1. जिमनॅस्टिकअंडर- १० मुली फीमेल फ्लोअर

सुवर्ण: श्रीराम अमोल वाकिंबे,  बाल शिक्षण मंदिर हाय स्कूल, सीबीएसई, मयूर कॉलनी

निकाल: 11.4

रौप्य: आरूष एस वाडकर, विबग्योर हाय, बालेवाडी

निकाल: 10.1

ब्राँझ: अर्जुन चौधरी, एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, सीबीएसई

निकाल: 10

स्व. यशवंतराव चव्हाण यांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आदरांजली अर्पण.


पुणे-महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाचण यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष अरविंद शिंदे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास काँग्रेस भवन येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘जेव्हा जेव्हा हिमालय अडचणीत आलाय तेव्हा तेव्हा सह्याद्री त्याच्या मदतीला धावलाय. असाच सह्याद्रीच्या मातीतला एक राजकारणी! राजकारण कमी पण समाजकारण जास्त. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे खरे पाईक. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांना संबोधले जाते. दिल्लीच्या राजकारणात ज्यांनी महाराष्ट्राचा ठसा आपल्या कर्तृत्वाने उमटवला. महाराष्ट्राची दिल्लीत असणारी ओळख म्हणजेच “यशवंतराव चव्हाण”. पुरोगामी, सुसंस्कृत, निष्कलंक नेतृत्व म्हणजेच यशवंतराव चव्हाण. पदाकडे पाठ आणि लोकांकडे तोंड ठेवणारा सर्वसामान्यांचा नेता अशी ओळख. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजेच यशवंतराव चव्हाण. प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न ज्यांनी बघितलं ते हे यशवंतराव. ज्यांनी पदाला नाही तर माणसाला महत्व दिले असे हे यशवंतराव. ज्यांचा आदर्श आजच्या प्रत्येक राजकारण्यांनी घ्यायला पाहिजे असे हे यशवंतराव. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत असा हा जनतेचा कैवारी जन्माला आला याचा सार्थ अभिमान आहे. आज त्यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.’’
यावेळी माजी महापौर कमल व्यवहारे, हेमंत राजभोज, अनिल पवार, संजय मानकर, ज्योती परदेशी, रेखा घेलोत, ज्ञानेश्वर निम्हण, मनोज पवार, दिलीप लोळगे, हरिभाऊ सणस, विलास हाडके, चंद्रकांत नार्वेकर, भरत इंगुले आदी उपस्थित होते.