Home Blog Page 1371

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’चा शुभारंभ

बारामती, दि.२६ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’ मधील अर्धमॅरेथॉन स्पर्धेला विद्या प्रतिष्ठानच्या बायोटेक्नोलॉजी मैदान येथे हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, स्पर्धेचे आयोजक आयर्नमॅन सतीश ननवरे आदी उपस्थित होते. ४२ कि.मी ची मॅरेथॉन, २१ कि.मी. ची अर्धमॅरेथॉन आणि १० कि. मी. दौड अशा तीन प्रकारात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याशिवाय ५ कि. मी. फन दौडचे सुद्धा आयोजन करण्यात आले.श्री. बनसोडे यांच्या हस्ते १० कि. मी. आणि ५ कि. मी. दौड स्पर्धेला झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.श्री. बनसोडे यांच्या हस्ते विजेत्या धावपटुला पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, खेळाडूंच्या सोईसाठी हरियाणा, पंजाब, ओडीसा राज्यातील ऑलिम्पिक भवनच्या धर्तीवर राज्यातही ऑलिम्पिक भवन उभारण्यात येणार असून त्यासाठी ७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच पुण्यामध्ये त्याचे भूमीपूजन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मागील चार महिन्याच्या कार्यकाळामध्ये विविध निर्णय खेळाडूंना समोर ठेवून आपण घेतले आहेत. कोविडच्या काळापासून रखडलेले मागील तीन वर्षाचे शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. क्रीडा पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. स्व. खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस १५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

चीन मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत राज्यातील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूला १० लाखावरुन १ कोटी रुपये, रौप्य पदक ७५ लाख आणि कास्य पदक विजेत्या खेळाडूला ५० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. सहभागी खेळाडूला जाण्या-येण्याकरीता १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रीडा सुविधांचा विकासासाठी क्रीडा संकुल बांधकामासाठीही भरीव निधी देण्यात येत आहे.

बारामती परिसरात कृषी, उद्योग, क्रीडा, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उत्तम काम होत असून त्याला चालना देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलातील सुरू असलेल्या नवीन इमारती करिता १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ‘बारामती पॉवर मॅरेथॉन’करीता राज्य शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत करण्यात येईल. या स्पर्धेचे बारामती सोबत राज्यातही आयोजन करण्याच्या प्रयत्न करण्यात येईल, असेही श्री. बनसोडे म्हणाले.यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि स्पर्धेचे आयोजक आयर्नमॅन सतीश ननवरे यांनीही विचार व्यक्त केले.

या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, तहसीलदार गणेश शिंदे, न.प.चे मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.

अयोध्या राम मंदिरातील अक्षतांची मंगल कलश यात्रा पुण्यात

पुणे :  प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा असलेला रथ…ढोल ताशांचा गजर…शंखांचे वादन…जय श्री रामचा जयघोष अशा आनंद आणि उत्साहपूर्ण राममय वातावरणात अयोध्येतील रामलल्लांची मूर्ती असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात पूजन करून आलेल्या अक्षतांचे पूजन करीत ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरापासून भव्य मंगल कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी महिला डोक्यावर अक्षता कलश घेऊन यात्रेत सहभागी झाल्या होत्या. यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने या २४ कलशातील अक्षता पश्चिम महाराष्ट्रातील सर्व गावातील प्रत्येक घरात देण्यापूर्वी पुण्यात कलश यात्रा काढण्यात आली. त्यानंतर स्वारगेट जवळील दादावाडी जैन मंदिरामध्ये या अक्षतांचे कलश ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. यशोधन साखरे यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्रातील २४ भागातील विश्व हिंदू परिषदेच्या प्रतिनिधींकडे कलश सोपविण्यात आले. 

कसबा गणपती मंदिरात या सर्व कलशांचे विविध जाती व संप्रदायांमधील २४ दांपत्यांच्या हस्ते विधिवत मंत्रोच्चाराने पूजन करण्यात आले. कसबा देवस्थानचे प्रमुख ठकार यांनी पूजेला बसलेल्या सर्वांना संकल्प दिला. सज्जनगडावरील समर्थ सेवा केंद्राचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी, रा. स्व. संघ प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, प्रांत संघचालक नाना जाधव, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री संजय मुद्राळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यावेळी उपस्थित होते. संपूर्ण यात्रेचे नियोजन विश्व हिंदू परिषदेचे प्रांताचे विशेष संपर्कप्रमुख किशोर चव्हाण यांनी केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर व कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर येथे कलशांचे पूजन व यात्रेचे स्वागत करण्यात आले. 

योगेश बुवा रामदासी म्हणाले, समर्थ रामदासांनी ज्याप्रमाणे प्रभू रामरायाची भक्ती करून रामरायाचा आदर्श ठेवून लोकांना धर्माभिमानी आणि देशाभिमानी बनविण्याचा प्रयत्न केला आणि बलोपासनेचे महत्त्व प्रतिपादन करून श्री रामचंद्र यांच्या चारित्र्याचा आदर्श लोकांसमोर उभा केला, त्याप्रमाणे या अयोध्येतील मंदिरापासूनही प्रेरणा घेऊन धर्माभिमानी आणि राष्ट्रभिमानी नागरिक निर्माण होतील.

संजय मुद्राळे म्हणाले,  भगवान श्रीराम हे सगळ्यांचे आदर्श आहेत ते राष्ट्रनिर्माते आणि राष्ट्र जागरणाचे अखंड प्रेरणा स्रोत  आहेत जोपर्यंत प्रभू श्रीरामाचा आदर्श आपण समोर ठेवतो आहोत तोपर्यंत आपल्या देशाला आपल्या धर्माला आणि आपल्या संस्कृतीला कोणीही धक्का लावू शकणार नाही. त्यामुळे अयोध्येत निर्माण होणारे मंदिर हे केवळ राम मंदिर नसून राष्ट्र मंदिर आहे, असेही त्यांनी सांगितले. श्रीराम पथक चॅरिटेबल ट्रस्ट, केशव शंखनाथ पथक यांनी यावेळी वादन केले. अभिजीत बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पुणे शहर पोलिसांची २६/११ हल्ल्यातील शहिदांना मानवंदना व पुणेकरांची चित्र श्रद्धांजली 

पुणे : मुंबईमध्ये झालेल्या २६/११ हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुण्यात सारसबागेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहीद सैनिकांच्या शौर्याचे प्रतिक म्हणून स्तंभ उभारण्यात आला होता. यावेळी बँडचे वादन करीत मानवंदना देण्यात आली. उपस्थित नागरिकांनी देखील शहिदांना मानवंदना देत ‘भारत माता की जय’ चा जयघोष केला. यावेळी चित्रकलेच्या माध्यमातून ७ हजार विद्यार्थ्यांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुंबईमध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टर्फे सारसबागेमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार, आमदार रवींद्र धंगेकर, सेवा मित्र मंडळ चे अध्यक्ष गणेश सांगळे, सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, प्रवीण कुमार पाटील, विशेष शाखेचे उपायुक्त ए राजा, स्मार्तना पाटील, संभाजी कदम, विक्रांत देशमुख, वाहतूक शाखेचे एसीपी मुल्ला, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, विनायक गायकवाड, सुरेंद्र माळाळे, सुनील माने, सोमनाथ जाधव, श्री हटकर, इनुस शेख, प्रशांत संडे, हनुमंत भोसले, तसेच स्वारगेट पोलीस स्टेशन येथील इतर अधिकारी व अंमलदार वर्ग, पोलीस मुख्यालय पुणे शहर कडील पोलीस उपस्थित होते. 
मुस्लिम महिला आपल्याला पाल्यांना घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पुणे पीपल्स बँकेने मुलांसाठी खाऊ दिला बँकेचे अध्यक्ष जनार्दन रणदिवे रणदिवे व उपाध्यक्ष मिलिंद वाणी उपस्थित होते.

स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे यांनी उपस्थितांना संविधान दिनाची शपथ दिली. यावेळी पुणे शहरातील विविध शाळांमधून विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले होते देशभक्तीपर व सामाजिक विषयांवरील कल्पना विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून मांडाव्यात यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शहिदांना चित्ररूपी श्रद्धांजली यावेळी अर्पण केली. 
प्रा. डॉ. मनोहर देसाई, प्रा. डॉ.गिरीश चरवड, विवेक खटावकर, संदीप गायकवाड, नितीन होले, वर्षा होले, प्रा. विनोद महाबळे, जितेंद्र जामादार, शेखर देडगावकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. उपक्रमाच्या संयोजनामध्ये मंडळाचे तन्मय तोडमल, अमर लांडे, उमेश कांबळे, सचिन ससाणे, विक्रांत मोहिते, पराग शिंदे, मीत नानावटी, नमन कांबळे, चेतन पवार, विशाल भोसले यांनी सहभाग घेतला. प्रसाद भारदे यांनी सूत्रसंचालन केले. 


* निकाल (अनुक्रमे – प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ)
इयत्ता १ ली व २ री – आरुष सय्यद, माहिरा काशीद, आनंदी सवडे, शर्व तरलगट्टी, गंधाली ढमाळ
इयत्ता ३ री व ४ थी – काव्या खामकर, कावेरी तायडे, श्रीमयी वाडेकर, तन्मय शिंदे, तेनुल पवार
इयत्ता ५ वी ते ७ वी –  मोईन शेख, वैष्णवी घडशी, सिद्धी धुमाळ, गणश्री बांदल
इयत्ता ८ वी ते १० वी – अनुष्का कडू, संस्कार पिसे, झेबा शेख, प्रियंजना पाल
खुला गट – ओमकार घुगे, यश नागरे, निसर्ग लोहार

भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

0

मुंबई दि. 26 : संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

संविधान उद्देशिकेच्या सामूहिक वाचन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव विकास खारगे,सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव र.रा. पेटकर तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

धार्मिक मूल्य शांतीसाठी महत्वाचे- वैश्विक स्तरावरील व्यावसायिक सल्लागार प्रा.डॉ. रामचरण

२८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प

पुणे, दि.२६ नोव्हेंबर: “प्रत्येक देशांची संस्कृती वेगळी असली तरी शांती ही संकल्पना एकच आहे. संस्कृती म्हणजे मूल्य व व्यवहार यांचा संगम आहे. चीनचा सर्व क्षेत्रात विकास झाला असला तरी भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्य सर्वेश्रेष्ठ असल्याने भारतच विश्वशांतीसाठी पुढाकार घेऊ शकतो. येथील धार्मिक मूल्य शांतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे.”असे मत वैश्विक स्तरावरील व्यावसायिक सल्लागार प्रा.डॉ. रामचरण यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २८व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना विश्व शांतीचे नेतृत्व या विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी ‘भारत ज्ञान’ चे संस्थापक डॉ. डी.के. हरी व डॉ. हेमा हरी हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
तसेच एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल वि. कराड,  सल्लागार व गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये व व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक व प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते.
प्रा.डॉ. रामचरण म्हणाले,” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी २०चे आयोजन केल्याने संपूर्ण जगाची दृष्टी भारताकडे वळली आहे. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी भारताचा दृष्टीकोण अत्यंत महत्वाचा आहे. ग्रामीण क्षेत्रातील मूल्यांना परावर्तीत करून त्याचा उपयोग विकासासाठी करावा. तंत्रज्ञानाच्या युगात जागतिक स्तरावरील कंपन्या भारतात येत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात सर्वक्षेत्रात मुभा असल्याने संशोधन, शिक्षण, तंत्रज्ञान आणि वैयक्तिक विकासासाठी वाव आहे. ”
“शांततेसाठी शिक्षण हे जीवनासाठी शिक्षण आहे. केवळ उपजीविकेसाठी प्रशिक्षण नाही. त्याचे उद्दिष्ट लोकांना मूल्ये, कौशल्ये आणि दृष्टीकोनांनी सुसज्ज करणे आहे. शांती ही संकल्पना खूप सुंदर आहे. परंतू त्या साठी प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असू शकते. अशा वेळेस धार्मिकतेच्या आधारावर चारित्र्य निर्माण करून मूल्याधिष्ठित शिक्षण देणे गरजेचे आहे. अध्यात्मामुळे ऊर्जेचा स्त्रोत मिळतो आणि तोच धागा शांतता निर्मितीसाठी महत्वपूर्ण आहे.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांनी नितिमत्ता कशी असावी या स्पष्टीकरण केले. बुध्दिमत्ता असली तर कुठे आणि कशी वापरावी हे उदाहरणाने स्पष्ट करून सांगितले. संत साहित्यात मनःशांती मिळत असल्याने त्याचे आत्मसात करावे असा सल्ला ही दिला.
इन्स्टिट्यूट ऑफ आर्टिफिशिअल इंटेलिजेन्टचे संचालक डॉ. आनंद कुलकर्णी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता हे दुधारी शस्त्र असल्याचे सांगून त्याचा वापर कसा करावा मानवाच्या हातात आहे.
त्यानंतर योगाचार्य डॉ ज्ञानेश्वर विद्याअलंकार व दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरचे विश्वस्त महेश सुर्यवंशी व वेगवेगळ्या विषयांवर विचार मांडले.
प्रा.डॉ.शालिनी टोणपे यांनी सूत्रसंचालन केले व डॉ.मृदुला कुलकर्णी यांनी आभार मानले.

प्रत्येक भारतीयावर लोकशाही, संविधान टिकवण्याचे दायित्व-ॲड. उल्हास बापट

-संविधान सन्मान समिती, सम्यक ट्रस्ट, ‘रिपाइं’तर्फे ‘भारतीय संविधानाचा अमृतमहोत्सव’वर परिसंवाद
पुणे : “भारतीय हीच जात व धर्म मानून प्रत्येकाला समान संधी, अधिकार व सन्मान देणारे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिले. याच संविधानावर आधारलेली भारतीय लोकशाही जगात आदर्शवत आहे. परंतु, अलीकडच्या काही दिवसांत लोकशाही, संविधानाची मूल्ये पायदळी तुडवत त्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु, धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा पाया असून, संविधानाच्या मूळ रचनेला हात घालता येत नाही. संविधान व लोकशाहीवर होणारे हे आघात परतवून लावण्याचे आणि ते टिकवण्याचे दायित्व प्रत्येक भारतीयांवर आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ घटनातज्ज्ञ व विधिज्ञ ॲड. उल्हास बापट यांनी केले.
संविधान सन्मान समिती, सम्यक ट्रस्ट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या संयुक्त विद्यमाने अमृतमहोत्सवी संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन व ‘भारतीय संविधानाचा अमृतमहोत्सव’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. प्रसंगी ॲड. उल्हास बापट बोलत होते. ‘रिपाइं’चे राज्य सचिव बाळासाहेब जानराव अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक प्रा. डॉ. प्रकाश पवार, शहराध्यक्ष संजय सोनावणे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते अंकल सोनवणे,ॲड. मंदार जोशी, ॲड. अर्चिता जोशी , बाबुराव घाडगे, रघुनाथ ढोक, शाम सदाफुले, निलेश आल्हाट, निलेश रोकडे, जयदीप रंधवे आदी उपस्थित होते. उल्लेखनीय यश मिळवलेल्या उज्ज्वला जयदेव रंधवे, चंद्रिका पुजारी, श्रावणी रोकडे, ऋतिका धिवार या विद्यार्थ्यांचा गौरव, तसेच नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्या व अपेक्षित प्रश्नसंच वितरण यावेळी करण्यात आले.
प्रा. डॉ. प्रकाश पवार म्हणाले, “संविधानानाने देशाची एकता, एकात्मता अणि राष्ट्रीयत्व बहाल केले आहे. त्याचे संरक्षण करण्याचे दायित्व १४० कोटी लोकांवर आहे. संविधान हा आपल्या जगण्याचा मुख्य दस्तावेज असून, त्याचा उचित सन्मान व्हावा. गेल्या ७५ वर्षात संविधान केवळ एक टक्के लोकांपर्यंत पोहोचले आहे. ९९ टक्के लोक जेव्हा संविधान समजून घेतील, अंगीकार करतील, तेव्हा सामाजिक व आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही. आरक्षणाच्या नावाने आवाज उठवणारे लोक खासगीकरण, संवैधानिक संस्था विक्रीला काढल्यात, त्यावर बोलत नाहीत, हे खेदजनक आहे. पुढील काळात संविधान अधिक व्यापकपणे रुजवण्याचे काम करावे लागेल.”

बाळासाहेब जानराव म्हणाले, देशाला एकसंध ठेवत जनतेला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणाऱ्या भारतीय संविधानाचा समावेश प्राथमिक शाळांमधून शिकवणे गरजेचे आहे. संविधान साक्षरतेची शालेय अभ्यासक्रमात संविधानाचा समावेश व्हावा. त्यातून संविधानाबद्दल अनेकांच्या मनात असणारे अज्ञान दूर होण्यास मदत होईल. डॉ. आंबेडकरांचे विचार समजून घ्यावेत. संविधान सन्मान समितीच्या संविधानाबद्दलचे अज्ञान दूर करण्यासाठी माध्यमातून शाळा, महाविद्यालयातून आम्ही जागृती करत आहोत.”
अशोक कांबळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. बाबुराव घाडगे यांनी आभार मानले. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची फुलांनी सजावट संस्थेच्या वतीने करण्यात आली.

`सुशिं`चं `अस्तित्व` पुन्हा बहरणार!

·    `मिशन गोल्डन कॅटस्` ही श्रोत्यांपुढे उलगडणार!!

·     २७ नोव्हेंबर (सोमवार) रोजी, पुण्यात, `मिशन गोल्डन कॅटस्` व `अस्तित्व`चे ऑडिओबुक प्रकाशन समारंभ!!!

सुहास शिरवळकर म्हणजे मराठीतील सर्वाधिक वाचकप्रियता लाभलेल्या लोकप्रिय लेखकांपैकी एक. आज त्यांनी जगाचा निरोप घेऊन २० वर्षे झाली तरी वाचकांच्या मनातील त्यांचं गारुड अजूनही कायम आहे. आजही ते मराठीतील सर्वाधिक वाचले जाणारे तसेच ऐकले जाणारे लेखक आहेत, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. याच पार्श्वभूमीवर,`सुशिं`च्या अमृतजयंतीच्या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात दोन आगळ्या उपक्रमांतून ते रसिकांना भेटणार आहेत.

सुहास शिरवळकर यांच्या स्मरणार्थ, `स्टोरीटेल`च्या वतीने राज्यात कादंबरी लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची विजेती कादंबरी ठरली आहे ती, रवींद्र भयवाल लिखित `मिशन गोल्डन कॅटस्`. ही कादंबरी तसेच,  सुहास शिरवळकर लिखित १९९३ साली लोकप्रभा साप्ताहिकात क्रमशः प्रसिद्ध झालेली ‘अस्तित्व’ ही अप्रकाशित कादंबरी याच कार्यक्रमात `स्टोरीटेल`च्या माध्यमातून ऑडिओ स्वरुपात प्रकाशित होणार आहे.

मिशन गोल्डन कॅटस् ही एक रहस्यमय कादंबरी असून बेपत्ता झालेल्या एका तरुण मुष्टियोद्ध्याचा भाऊ त्याच्यासाठीची शोधमोहिम कशी चालवतो आणि त्यातून काय काय गोष्टी उलगडत जातात, याचा थरार त्यात लेखक रवींद्र भयवाल यांनी चितारला आहे. सुशिंच्या स्मरणार्थ आयोजित कादंबरी लेखन स्पर्धेत ही साहित्यकृती विजेती ठरली. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे.  या स्पर्धेसाठी राज्यभरातील लेखकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून, प्रसिद्ध लेखक हृषिकेश गुप्ते व संजय सोनवणी, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ, सुहास शिरवळकरांच्या साहित्याचे अभ्यासक अजिंक्य विश्वास व सुधांशू अंबिये यांनी काम पाहिले.

सुहास शिरवळकर यांनी १९९३ मध्ये लोकप्रभा या साप्ताहिकामध्ये `अस्तित्व` ही  कादंबरी क्रमशः लिहिली होती. कला आणि व्यवसाय या दोन्ही डगरींवर पाय ठेवत आयुष्याशी संघर्ष करणाऱ्या सृजन या कलाकाराचा विलक्षण संघर्ष यात सुशिंनी त्यांच्या थक्क करणाऱ्या शैलीत मांडला आहे. स्वतः शिरवळकरांचे साहित्य, नाट्य, कला आणि व्यवसाय या सर्व क्षेत्रांमधले सखोल ज्ञान, त्यात आलेले अनुभव यांचंही अप्रत्यक्ष दर्शन या संघर्षमय शब्दचित्रणातून घडतं. विशेष म्हणजे, स्वतंत्र कादंबरी म्हणून मुद्रित स्वरुपात प्रकाशित होण्याआधी श्राव्य म्हणजेच ऑडिओबुक स्वरुपात प्रकाशित होणारी अस्तित्व ही सुशिंची पहिली निर्मिती, त्यांच्या अमृतजयंतीनिमित्त रसिकांपर्यंत पोहोचते आहे.

या दोन्ही कादंबऱ्यांचा प्रकाशन समारंभ व पारितोषिक वितरण समारंभ, २७ नोव्हेंबर (सोमवार) रोजी, पुण्यात, संचेती सभागृह, डॉ. नीतू मांडके आयएमए इमारत, टिळक रोड येथे, सायंकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास, वक्ते म्हणून हृषिकेश गुप्ते, संजय सोनवणी उपस्थित असतील तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. अभिजित वैद्य अध्यक्षस्थानी असणार आहेत.

सुहास शिरवळकर यांच्या स्मरणार्थ, राज्यात कादंबरी लेखन स्पर्धेत विजेती ठरली रवींद्र भयवाल लिखित `मिशन गोल्डन कॅटस्` आणि दस्तुरखुद्द सुहास शिरवळकर लिखित १९९३ ‘अस्तित्व’ ही अप्रकाशित कादंबरी `स्टोरीटेल`च्या माध्यमातून ऑडिओ स्वरुपात ऐकण्यासाठी लिंक

https://www.storytel.com/in/books/astitva-2726435

https://www.storytel.com/in/books/mission-golden-cats-2726436

मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांच्या ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

मुंबई: मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांचा ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा ४ डिसेंबर २०२३ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले असून स्वतंत्र गोयल यांनी निर्मिती केली आहे.

लग्न म्हणलं की घरात सनईच्या आवाजाबरोबर उत्साहाचं वातावरण दाटतं. पण गौरीच्या लग्नाचा विषय काढताच घरात एक गंभीर वातावरण पसरतं. गौरी सर्वगुण संपन्न असली तरी तिच्या काळ्या रंगामुळे तिला लग्नासाठी नवरा मिळणं कठीण झालं आहे. तिची नैराश्य अवस्थाही वाढत चालली आहे, पण तिला समजून घेणारा शाळेतला एक मास्तर तिच्या आयुष्यात आला आहे. गौरी मास्तराच्या प्रेमात पडली आहे खरं, पण मास्तर तिला स्वीकारेल का?

“या चित्रपटाच्या प्रीमियर संदर्भात, ‘नाही निर्मळ जीवन, काय करील साबण, तैसे चित्तशुद्ध नाही, तेथे बोध करील काई’ हे संत तुकारामांचे बोल आठवतात. माणसाचं सौंदर्य त्याच्या रंगावरून ठरत नसतं, तर मन साफ असावं लागतं, सांगणारा हा चित्रपट सादर करताना अत्यंत आनंद होत आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी. ई. ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

*App link:*

https://ultrajhakaas.app.link

*मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांच्या ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा प्रोमो पाहण्यासाठी लिंक*

https://www.facebook.com/UltraJhakaas

https://www.instagram.com/ultrajhakaas

https://www.youtube.com/@ultrajhakaas

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘विकसित भारत’ संकल्प यात्रेचा शुभारंभ

बारामती, दि.२६: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पंचायत समिती आवारात भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत’संकल्प यात्रेचा एलईडी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी चित्ररथाची पाहणी केली. ‘विकसित भारत’संकल्प यात्रेची उद्दिष्टपूर्तीकरीता लोकप्रतिनिधी, प्रशासन व लाभार्थ्यांनी मिळून मोहीम यशस्वीपणे राबवावी, असे श्री. पवार म्हणाले. यावेळी लाभार्थ्यांना लाभ पत्राचे वाटपही करण्यात आले.

विकसित भारत संकल्प यात्रा रथ तालुक्यातील एकूण ९९ गावात जाणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामंपचायत स्तरावर उपसमिती गठीत करण्यात आली आहे. ‘विकसित भारत’संकल्प यात्रेचे उद्दिष्टपूर्तीकरीता लोकप्रतिनिधी व लाभार्थ्यांनी सोबत मिळून मोहीम प्रयत्न करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी अनिल बागल म्हणाले.

यावेळी उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, तहसीलदार गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, न.प.चे मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, माजी उपनगराध्य जय पाटील आदी उपस्थित होते.
000

राज्यात ‘रंगकर्मी भवन’ उभारण्यासाठी प्रयत्न करणार

जागतिक रंगकर्मी’ दिवसानिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा सत्कार

मुंबई : नाट्यगृहांच्या सुधारणांचा प्रयत्न करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतो. बऱ्याच ठिकाणी अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. कलाकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात विधानभवनात बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. तसेच राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रंगकर्मी भवन उभारले गेले पाहिजे. त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

जागतिक रंगकर्मी दिनानिमित्त रोहिणी हट्टंगडी यांचा सत्कार माझ्या हस्ते झाला हे माझे भाग्य समजते. समाजाला प्रबोधनाच्या कामासोबतच कलेमध्ये हरवून जाण्याचं काम नाट्य,साहित्य व संगीत क्षेत्राने केले असल्याची भावना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

शनिवार दि. २५ नोव्हेंबर रोजी यशवंत नाट्य संकुल माटुंगा येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्नित मराठी नाट्य कलाकार संघ आयोजित ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावर्षी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांचा सन्मान विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला असून त्यांच्या कारकिर्दीला मानवंदना म्हणून त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. यासोबतच, मराठी नाट्य कलाकार संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्री. रोहिदास पानगे या जेष्ठ कलाकाराला संस्थेच्यावतीने २५ हजार रुपये अर्थसहाय्याचा धनादेश डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जयंती आणि विद्याधर गोखले आणि पं राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त सांगीतिक आदरांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी, माजी नगरसेविका श्रीमती. शीतल म्हात्रे, श्री. गिरीश धानोरकर, अभिनेते श्री. विजय गोखले, अभिनेत्री श्रीमती. अर्चना नेवरेकर, निर्माता श्री. यतीन जाधव, श्री. सुशांत शेलार, श्री. विजय सूर्यवंशी, श्री. ज्ञानेश पेंढारकर, संगीतकार श्री. मुकुंद मराठे, श्री. प्रदीप कबरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

रंगभूमीवर प्रामाणिक प्रेम करणाऱ्या सक्रिय रंगकर्मीचाही हक्काचा एक दिवस असावा, या दिवशी सर्व रंगकर्मींच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्दिष्टाने रंगभूमीवर सर्वस्व वाहीलेल्या भालचंद्र पेंढारकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून “२५ नोव्हेंबर” हा दिवस “जागतिक रंगकर्मी दिवस” म्हणून २०१४ साला पासून कलाकार संघाच्या वतीने साजरा केला जातो, यानिमित्त रंगभूमीवर ज्यांनी अनमोल कार्य केले आहे अश्या एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रंगकर्मीचा सन्मान करून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यात येत असते.

26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मानवंदना

0

मुंबई दि. 26 : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी यांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली तसेच त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणातील शहीद स्मारक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि शहीद कुटुंबीयांचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनीही पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले.

यावेळी सर्व मान्यवरांनी उपस्थित शहिदांच्या कुटुंबाची भेट घेऊन सहसंवेदना व्यक्त केल्या.

संविधानाच्या सन्मानासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसह धावले पुणेकर

पुणे : आज २६ नोव्हेंबर अर्थात संविधान दिन. यानिम्मित्त आयोजित “संविधान सन्मान दौड 2023” मध्ये तब्बल 31 देशातील विद्यार्थ्यासह एकूण सात हजार स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेचे आयोजन डॉ .बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे ,सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डॉ .बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) आणि पुणे जिल्हा हौशी अॅथलेटीक्स असोसिएशनयांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. स्पर्धेच्या सुरवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे  सामूहिक वाचन करण्यात आले.

या मिनी मॅरेथॉन स्पर्धेला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या हस्ते ध्वज दाखवून  उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, मुख्य संयोजक परशुराम वाडेकर ,प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे ,पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार , राहुल डंबाळे यासह विविध मान्यवर उपस्थित होते .

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या संसदेने संविधान स्वीकारलं याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त दरवर्षी संविधान सन्मान दौड आयोजित केली जाते. सगळीकडेच विविध कार्यक्रमातून हा दिवस साजरा केला जातो. मात्र, संविधान दीन साजरा करण्यापेक्षा संविधाना बद्दल जागरूकता निर्माण करणे जास्त आवश्यक आहे. आज परशुराम वाडेकर यांनी ही संविधान सन्मान दौड आयोजित केली आहे. तेव्हा दौडकडे केवळ लक्ष न जाता. संविधानाकडे आपले लक्ष गेले पाहिजे. डॉ. आंबेडकरांचे समस्त भारतीयांवर खूप मोठे उपकार आहेत. भारताची लोकशाही सुद्रूड करण्याचे काम त्यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी असं संविधान लिहिलं आहे जे हजारो वर्ष बदलावेच लागणार नाही. काय झाल्यास काय करावे, असं व्यवस्तीत विवेचन यामध्ये आहे. नव्याने तयार झालेल्या अनेक देशांनी या संविधानाकडे पाहून आपले संविधान तयार केले.  तसेच  आपल्याकडे सुट्ट्यांचा आग्रह जास्त होतो. मात्र त्या ऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या प्रमाणे पाव खाऊन काम करायचे, त्या प्रमाणे आपण या दिवशी काम करण्याचा संकल्प करावा असे पाटील यांनी सांगितले. 

पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व सहभागी नागरिकांचे मी अभिनंदन करतो, सदृढ आणि सक्षम समाजासाठी खेळ महत्वाचे आहेत. 

दरम्यान,  या स्पर्धेत धावू शकल्या नाही अशा महिलांनी  ‘वॉक फॉर संविधान’ रॅली काढली होती. . या वॉक ची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली, पुढे जाऊन  विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि विद्यापीठातीलच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप झाला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक परशुराम वाडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समितीचे सचिव दीपक म्हस्के आणि मानसी बोकिल यांनी केले. 

संविधान सन्मान दौड स्पर्धेचा निकाल

10 किमी पुरूष 
अंकुश लक्ष्मण हाके 
प्रवीण बबन कांबळे 
दयाराम रमेश गायकवाड 

5 किमी पुरूष 
हितेश संतोष शिंदे 
देविदास धनराज बारे
धीरज रामप्रकश चंदेल

3 किमी पुरूष 
मनीष संजय मेश्राम
अशोक गणपत उंडे
सुभाष ज्ञानेश्वर कानोजिया 

10 किमी महिला 
राणी सदाशिव मुचंडी
अर्चना आढाव
ऋतुजा शंकर माळवदकर

5 किमी  महिला
प्रियांका लालस ओकास
गायत्री गणेश चौधरी
सुहानी खोब्रागडे 

3 किमी  महिला 
माधुरी चंद्रकांत वानवारे
नेत्रा गणेश मच्छा 
श्रद्धा संदीप निकम

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी

10 किमी  महिला 
सलाम – इथोपिया
मासाऊ – बांगलादेश
इव्हा – पोलंड

5 किमी  महिला 
सुचेता – थायलंड
मकारा – कंबोडिया
ओलव्हिया – पोलंड

3 किमी महिला 
ऊर्मिला – बांगलादेश
नफोसिया – उसबेगिस्तान 
दृष्टी – बांगलादेश

10 किमी  पुरूष 

महम्मद – झांबिया
रेहमान – अफगाणिस्तान
मामाझिया – अफगाणिस्तान

5 किमी  पुरूष

हारून – अफगाणिस्तान
मोहित – नेपाळ 
इगोर – मोझांबिक

3 किमी  पुरूष 

अली –  चार्ड 
इस्माईल – सोमालिया
दीपो – बांगलादेश

शहरातील हवेच्या प्रदुषणासंदर्भात क्रेडाई पुणे मेट्रोची भूमिका

पुणे-अनेकविध कारणांमुळे शहरातील  नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम करणारा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक खालावल्याबद्दल क्रेडाई पुणे मेट्रो देखील गंभीरपणे चिंतित असून वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी प्राधिकरणांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने आम्ही स्वागत करतो. याबरोबरच प्राधिकरणांकडून होत असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अमंलबजावणीत देखील आम्ही सहकार्य करू, अशी भूमिका क्रेडाई पुणे मेट्रो मंडळी आहे.

सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग यांनी जारी केलेल्या सूचना , मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे आम्ही आमच्या सदस्यांना बांधकाम प्रकल्पाच्या जागेवर आवश्यक व्यवस्था आणि यंत्रणा बसवण्याची, बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी हिरवी जाळी बसविण्याची विनंती केली आहे.

इतकेच नव्हे तर प्रकल्पस्थळी होणाऱ्या वाहतुकीदरम्यान बांधकामाचा मलबा हवेत जाऊ नये, यासाठी प्रत्येक पुरवठादार व ट्रकची व्यवस्था पाहणाऱ्यांना बांधकाम प्रकल्पावर येणारे ट्रक, पुरवठादारांची वाहने ही पूर्णपणे झाकलेली आहेत याची, खात्री करण्यास सांगितले जात असल्याचेही त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

याशिवाय वाहनाचे पीयुसी वैध असल्याची खात्री करण्यासोबतच मुख्य स्टॉकयार्डमध्ये असलेले सैल बांधकाम साहित्य ताडपत्रींनी झाकण्याविषयीच्या सूचना बांधकाम प्रकल्पावर देण्यात आल्या आहेत.

तथापि व्यावहारिक अडचणी लक्षात घेता, आम्ही किमान 14 फूट उंचीची जीआय /मेटल शीट आणि त्याहून वर चहुबाजूंनी 6 फूट हिरवे कापड परिघाभोवती असावे असे सुचवले आहे. 14 फुटांपेक्षा जास्त जीआय / मेटल शीटच्या उंचीमध्ये जर वाढ केली तर शेजारील इमारतींच्या प्रकाश आणि वेंटिलेशनमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. शिवाय हवेच्या / वाऱ्याच्या दाबामुळे सुरक्षेचे धोके देखील निर्माण होऊ शकतात इतकेच नाही तर झाडे तोडण्याची देखील आवश्यकता भासू शकते.

– हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणारी यंत्रणा ही पुरवठादाराकडे उपलब्ध नसल्याने त्यांनी पुरवठादाराने सांगितलेल्या वेळेनुसार प्रकल्प प्रमोटर 90 दिवसांच्या कालावधीत बांधकाम प्रकल्पावर ही यंत्रणा खरेदी करेल.

– प्रकल्प प्रमोटर 60 दिवसांच्या कालावधीत प्रकल्पाच्या बांधकाम जागेवर ज्या ठिकाणी सामग्रीचे लोडिंग / अनलोडिंग होते त्या ठिकाणी स्प्रिंकलर सिस्टीम बसवेल.

– बांधकाम प्रकल्पावरील सर्व कर्मचार्‍यांना न चुकता आपल्या वैयक्तिक संरक्षणासाठी असलेली मास्क, हातमोजे, गॉगल्स, हेल्मेट आदी साधने अनिवार्यपणे परिधान करावी लागणार आहेत.

– बांधकाम प्रकल्पावर प्रशस्त ड्राईव्ह वे असल्याची खात्री प्रकल्प प्रमोटर्सने आधीच करून घ्यावी. जर पक्का रस्ता नसेल तर प्रकल्प प्रमोटरला त्या ठिकाणी होणारी धूळ कमी करण्यासाठी नियमितपणे जमिनीवर पाणी शिंपडणे आवश्यक आहे.

आम्हाला कल्पना आहे की अधिकाऱ्यांनी शहरातील वायू प्रदूषण रोखण्‍यासाठी जारी करण्‍याच्‍या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य ती अंमलबजावणी करण्‍याच्या दृष्टीने आमच्‍या काही सदस्‍यांना नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे.

मात्र क्रेडाई पुणे मेट्रो हे स्पष्ट करू इच्छिते की, देण्यात आलेल्या या नोटिस केवळ सावधगिरीच्या स्वरूपाच्या आहेत, यामुळे कोणत्याही प्रकल्पावरील काम थांबविण्यात आलेले नाही. प्राधिकरणांनी दिलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात कुचराई झाल्यास त्याला क्रेडाई पुणे मेट्रोचे समर्थन नसेल , अशी भूमिका क्रेडाई पुणे मेट्रोने मंडळी आहे.

श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ४५१ मिष्टान्नांचा महानैवेद्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजन

पुणे : मिठाई, फराळाच्या तिखट-गोड अशा वेगवेगळ्या पदार्थांचा तसेच विविध प्रकारच्या फळांचा व भाज्यांचा महानैवेद्य श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर दाखविण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीं ना तब्बल ४५१ प्रकारचे मिष्टान्न अर्पण करण्यात आले होते. लाडक्या बाप्पासमोर मांडलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा भव्य अन्नकोट पाहण्याकरिता पुणेकरांनी सकाळपासूनच मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल ४५१ हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद मंदिरातील भक्तांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हजारो लखलखत्या दिव्यांनी उजळला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा परिसर

संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला ‘रिपाइं’, सम्यक ट्रस्ट व संविधान सन्मान समितीचा उपक्रम

पुणे : भीम अनुयायांनी लावलेल्या पाच ते सहा हजार लखलखत्या दिव्यांनी पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा परिसर उजळून निघाला. संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), सम्यक ट्रस्ट आणि संविधान सन्मान समितीच्या वतीने शनिवारी दिवे प्रज्वलित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन करण्यात आले.
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत पहिला दिवा प्रज्वलित करून या दीपोत्सवाची सुरुवात झाली. प्रसंगी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष संजय सोनवणे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, हिमाली कांबळे, प्रा. डॉ. निशा भंडारे, बाबुराव घाडगे, श्याम सदाफुले, निलेश रोकडे, मुश्ताक शेख, रजाक सय्यद, आसिफ शेख, रिजवान शेख, मेहमूद खान आदी उपस्थित होते.
बाळासाहेब जानराव म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे लाखो लोकांचे जीवन प्रकाशमय झाले आहे. अमृतमहोत्सवी संविधान दिनाच्या निमित्ताने दिव्यांना प्रज्वलित करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्याचा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवत आहोत. यातून प्रेरणा घेऊन संविधानाचा प्रकाश समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य व्हायला हवे.”
डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत. त्यामुळेच आज आपण सन्मानाने जगत आहोत. संविधानाचा जागर करण्यासाठी बालपणापासूनच त्याविषयीचे शिक्षण देण्याची गरज आहे. शाळा-महाविद्यालयांतून संविधानाचे धडे द्यायला हवेत.”
सुनीता वाडेकर यांनी संविधानाचे महत्व विशद करत संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संजय सोनावणे यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे नमूद केले.