Home Blog Page 1370

पिंपरी-चिंचवड मध्ये पहिल्यांदाच ऑटो, टॅक्सी व असंघटित कष्टकरी जनतेचे राष्ट्रीय अधिवेशन

पुणे – पिंपरी-चिंचवड मध्ये पहिल्यांदाच ऑटो, टॅक्सी व असंघटित कष्टकरी जनतेचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात 1 व 2 डिसेंबर 2023 रोजी हे अधिवेशन होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरातून प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. यामध्ये ऑटो, रिक्षा, टॅक्सी, बस, टेम्पो, ट्रक व सर्व प्रकारचे ड्रायव्हर वाहतूकदार व फेरीवाले, घरकाम करणार्‍या महिला, साफसफाई कामगार, बांधकाम मजूरांसह असंघटित कामगार कष्टकऱ्यांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती ऑटो, टॅक्सी, बस, ट्रान्सपोर्ट फेडरेशन व कष्टकरी जनता आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली आहे.

पुणे येथे आयोजित रिक्षा रिक्षा चालकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बाबा कांबळे यांनी माहिती दिली.
परिषदेच्या तयारीसाठी पुणे कॅम्प येथे पुणे शहरातील रिक्षा स्टँड प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी अधिवेशनाच्या पत्रकाचे वाटप देखील करण्यात आले यावेळी रिक्षा चालकांना व रिक्षा स्टॅन्ड प्रमुखांना मार्गदर्शन करताना बाबा कांबळे बोलत होते,
अधिवेशनात दिल्ली, जम्मू, कश्मीर, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, आसाम, ओडिसा, बिहार, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेशसह देशभरातील सर्व राज्यातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

बाबा कांबळे म्हणाले की, देशभरात 25 कोटी ऑटो, टॅक्सी, बस, टेम्पो, ट्रक व सर्व प्रकारचे ड्रायव्हर आहेत. 45 कोटी पेक्षा अधिक बांधकाम मजूर, फेरीवाले, घरकाम महिला यांच्यासह संघटित कामगार कष्टकरी आहेत. या सर्व घटकांना एकत्र करण्यासाठी जनजागृती मोहिम राबवली. राज्यानिहाय बैठका घेतल्या. सर्वांना संघटित करण्यासाठी नुकताच देशातील 17 राज्यांचा व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा दौरा केला आहे. आगामी काळात कष्टकर्‍यांच्या मागण्यांसाठी मोठा लढा उभारू, असा निर्धार बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.

अधिवेशनातील मुद्दे –
या अधिवेशनात विविध मागण्यांवर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. या मागण्यांमध्ये ऑटो, टॅक्सी, बस, ट्रक, टेम्पो व सर्व प्रकारच्या ड्रायव्हर साठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात यावा. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या ड्रायव्हरसाठी वेल्फेअर बोर्ड स्थापन करून देशातील 25 कोटी ड्रायव्हर यांना सामाजिक सुरक्षा, म्हातारपणी पेन्शन द्यावी. महाराष्ट्रातील 20 लाख ऑटो, टॅक्सी, चालक-मालकांसाठी तातडीने कल्याणकारी महामंडळ घटित करण्यात यावे. महाराष्ट्रातील रिक्षाचा मुक्त परवाना तातडीने बंद करून देशभरातील सर्व इलेक्ट्रिक रिक्षांना परमिट सक्ती करण्यात यावी. फेरीवाले, बांधकाम मजूर, सफाई कामगार, घरकाम महिला, कंत्राटी कामगारांसह महाराष्ट्रातील तीन कोटी व देशभरातील 45 कोटी पेक्षा अधिक असंघटित कामगार कष्टकरी जनतेला सामाजिक सुरक्षा, आरोग्य विमा, मुलांना उच्च शिक्षण, म्हातारपणी पेन्शन देणारा कायदा तातडीने करून त्याची अंमलबजावणी करावी.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजन ; महालक्ष्मी मंदिरात ११ हजार दिव्यांची आरास

पुणे : प्रभू श्रीरामांची चित्ररंगावली….विविधरंगी पणत्यांसह दिव्यांची आकर्षक आरास…  नानाविध फुलांची सजावट व विद्युतरोषणाईने उजळलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराचे विलोभनीय दृश्य त्रिपुरारी पौर्णिमेला पहायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगलमय, धार्मिक वातावरणात जय श्रीराम… श्री महालक्ष्मी माता की जय… च्या नामघोषात तब्बल ११ हजार पणत्यांचा दीपोत्सव मंदिरामध्ये करण्यात आला.

श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते.

विश्वकर्मा युनिव्हर्सिटी व विश्वकर्मा विद्यालय यांनी दीपोत्सवातील पणत्यांची आरास केली. महिलांनी विविधरंगी वेशभूषेत दीपोत्सवात सहभाग घेतला. सुगंधी फुलांद्वारे आणि दिव्यांच्या प्रकाशातून अयोध्येतील श्रीराम मंदिर उजळून निघू देत, अशी शुभेच्छा व प्रार्थना यानिमित्ताने देवीचरणी करण्यात आली.

ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमेला आम्ही दरवर्षीप्रमाणे उत्साहाने दीपोत्सव साजरा करीत आहोत. दिव्यांच्या प्रकाशाने ज्याप्रमाणे अंधकार दूर होतो, त्याप्रमाणेच समाजातील वंचित व गरजू घटकाच्या आयुष्यातील  अंधकार दूर व्हावा, अशी प्रार्थना देखील करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पुणे- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात संविधान सभेने भारतीय संविधान निर्माण केले. दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने हे संविधान देशाला अर्पण केले. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून दर वर्षी संविधान दिन साजरा केला जातो.
यावर्षीही संविधान दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात माजी आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रशांत जगताप यांनी उपेक्षित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना लोकशाही मूल्यांचे जतन करून संविधानाचे रक्षण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मा. जयदेवराव गायकवाड़, भगवानराव सालुंखे, डॉ. सुनील जगताप, किशोर काम्बले, रोहन पायगुड़े, सुवर्णाताई माने संजय गाड़े आदि मान्यवर उपस्थित होते.

‘सेल्फि विथ मेरी माटी’ विश्वविक्रम शहीदांना समर्पित- चंद्रशेखर बावनकुळे

पुणे, ता. 26 : सेल्फि विथ मेरी माटी हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा गिनिस वर्ल्ड बूकमध्ये नोंदविला गेलेला विश्वविक्रम राज्यासाठी आणि देशासाठी मोठा असून, तो शहीदांना समर्पित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या राष्ट्रभक्तीच्या भावनेशी जोडणारा असल्याचे मत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

हा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी विशेष योगदान देणाऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्तिंचा सन्मान करताना बावनकुळे बोलत होते. राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांतदादा पाटील, संयोजक राजेश पांडे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे,भाजप महाराष्ट्र सरचिटणीस. मुरलीधर मोहोळव्यासपीठावर उपस्थित होते.

बावनकुळे पुढे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण केलेला विश्वविक्रम पुढील पंचवीस वर्षांत अन्य कुठलाही देश तोडू शकणार नाही. हा एकविसाव्या शतकातील मोदींनी निर्माण केलेला आत्मनिर्भर भारताचा आत्मिक, भावनात्मक विश्वविक्रम आहे. या विक्रमाची कल्पना, नियोजन, अंमलबजावणी, तंत्रज्ञानाचा वापर, मोठा लोकसहभाग याची केंद्राने नोंद घेत कौतुक केले आहे, ही बाब सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.

पाटील म्हणाले, या विक्रमासाठी 25 लाखांहून अधिक छायाचित्रे अपलोड करण्यात आली. देशभक्तीने वेडे झालेले तरूण ज्या देशात असतील, त्या देशाचा पराभव करणे कोणालाही शक्य होणार नाही. या उपक्रमातून मोठी उर्जा निर्माण झाली आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना नवीन कामाची प्रेरणा मिळते.

पांडे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी विश्वविक्रमासाठी 75 दिवस चोवीस तास अथकपणे परिश्रम घेतले. नेतृत्वाचा विश्वास आणि सामुहिक प्रयत्नांचा आविष्कार यांच्या जोरावर तिसरा विश्वविक्रम करता आला. असे यश मिळविणारे पुणे विद्यापीठ पहिलेच आहे.

पांडे यांनी प्रास्ताविक, डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन आणि पुनीत जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

अयोध्येला राज्यातून जाणार 15 लाख नागरिक
या वर्षी 22 जानेवारी रोजी देशातील सर्वात मोठी दिवाळी साजरी केली जाणार आहे. या दिवशी अयोध्येतील राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर आठ महिन्यात राज्यातून 15 लाख नागरिकांना अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी नेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी राजेश पांडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

पुण्यात संकल्प नव्या पर्वाचा, आम आदमीच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम आदमी पक्षाचा ११ वा वर्धापन दिनी निर्धार ….

पुणे- अकरा वर्षाच्या अल्पशा कालखंडात दिल्ली आणि पंजाब सारख्या दोन राज्यात एक हाती सत्ता मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाने आज आपला वर्धापन दिन आणि संविधान दिन अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात आपटे रोड येथील सेंट्रल पार्क च्या हॉलमध्ये साजरा केला. यावेळी आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत आणि महाराष्ट्र सचिव प्राजक्ता देशमुख या उपस्थित होत्या. तसेच संपूर्ण पुणे शहरातील सर्व राजकीय पक्षातील आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. इंडिया अगेंस्ट करप्शन सारख्या चळवळी च्या प्रेरणेतून निर्माण झालेला हा पक्ष हा संपूर्ण देशभरात वेगाने आपली घोडदौड करत आहे. अकरा वर्षाच्या अल्पशा काळात पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यापर्यंतची मजल मारली आहे. ही मजल मारताना पक्षाने दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात संपूर्ण बहुमताने सत्ता मिळवली आणि पक्षाची विचारसरणी जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला. दिल्ली सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सरकारी शाळांचा दर्जा सुधारणे, दिल्लीतील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने महिलांसाठी मोफत बस सेवा, मोफत वीज, मोफत पाणी, मोहल्ला क्लिनिक, अनेक सरकारी दाखले तसेच कागदपत्रे यांची घरपोच सुविधा देणे यासारख्या जनहिताच्या अनेक योजना या अकरा वर्षाच्या कालावधीत पक्षाने राबवल्या ज्या अत्यंत लोकप्रिय झाल्या असून नागरिकांना या सर्व भ्रष्टाचार विरहित योजनांचा खऱ्या अर्थाने फायदा झालेला आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येण्यापूर्वी २०१४-१५ चे बजेट हे ३५,००० करोडचे होते जे आज वाढून २०२२-२३ मध्ये ७९,००० करोडचे झाले आहे यावरून दिल्ली सरकारच्या गुड गव्हर्नन्स चा प्रत्यय येतो.

भविष्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांचा विचार करता दिल्ली सरकारने राज्यात अनेक ठिकाणी चार्जिंग पॉइंट्स बनवण्यास सुरुवात केली आहे, दिल्ली मधील अनेक तलावांचे सुशोभीकरण करत दिल्ली सरकारने एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे. उदयन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दिल्ली सरकारतर्फे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी ची सुरुवात देखील करण्यात आली आहे. दिल्ली आणि पंजाब या दोन्ही राज्यात सरकारी क्षेत्रातील अनेक नोकऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिला जात आहेत. शिक्षक भरती सारखा विषय उत्कृष्टपणे हाताळून दोन्ही राज्यांना अधिकाधिक सुशिक्षित बनवण्याचा आटोकाट प्रयत्न आम आदमी पक्षाच्या सरकारतर्फे केला जात आहे. जुनी पेन्शन योजना देखील दिल्ली सरकारने पुन्ह:च्या लागू करताना सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

गुजरात आणि गोवा यासारख्या राज्यात काही प्रमाणात विधानसभेच्या निवडणुका जिंकतानाच, अनेक राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये आम आदमी पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच काही ग्रामपंचायती देखील आम आदमी पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत आणि भविष्यात यात आणखी जोमाने वाढ होईल असे सध्या चित्र आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय संघटन सचिव संदीप पाठक आणि महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया यांच्याकडून नियमितपणे मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्रातही लवकरच आम आदमी पक्षाचा झाडू इतर पक्षांची राजकारणाच्या मैदानातून सफाई करताना दिसेल असे यावेळी बोलताना आम आदमी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी सांगितले.

अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात स्वतः लक्ष घातले असल्याने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे उमेदवार दिले जाणार आहेत याची सुरुवात लवकरच येऊ घातलेल्या निवडणुकांपासून सुरू होईल. तसेच आम आदमी पक्ष हा लवकरच पुणे महानगरपालिकेत देखील आपले खाते उघडेल अशी आशा यावेळी बोलताना पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.शाहीन पठाण, ॲड.अमोल काळे आणि किरण कद्रे यांनी केले.

संधी मिळाली तर मला आध्यात्मिक गुरू ओशो यांची भूमिका करायला आवडेल: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी

गोवा-

आनंद सुरापूर दिग्दर्शित “रौतू की बेली” या हिंदी चित्रपटाचा आज गोव्यात 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भव्य प्रीमियर पार पडला. हा चित्रपट उत्तर भारतातील  पर्वतीय भागातील  रौतू की बेली या सुंदर शहरावर आधारित आहे. या शहरातील एका शाळेचा वॉर्डन मृत आढळल्यानंतर पोलीस निरीक्षक नेगी आपल्या सोबत प्रेक्षकांना  देखील तपास मोहिमेवर घेऊन जातो.

पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रौतू की बेलीचा प्रमुख अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी सांगितले की, देशभरातील स्थानिक पार्श्वभूमी असलेल्या  अस्सल कथा दाखवणाऱ्या चित्रपटांना जागतिक स्तरावर ओळख  मिळेल; जितके स्थानिक असतील, तितके जागतिक स्तरावर पोहचतील.

चित्रपटातील भूमिका निवडण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाले की, मला केवळ  एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिरेखांपुरतेच मर्यादित रहायचे नाही, व्यक्तिरेखांच्या वैविध्यतेला माझे प्राधान्य असेल.

कोणतीही व्यक्तिरेखा साकारताना त्या व्यक्तिरेखेचे जीवन जगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो जेणेकरुन त्या व्यक्तिरेखेचे  आयुष्य आणि त्याचे स्वतःचे जीवन एकमेकात विलीन होईल.

भविष्यात कोणती भूमिका साकारण्यासाठी उत्सुक आहात असे विचारले असता अभिनेते सिद्दीकी म्हणाले की “संधी मिळाली तर मला आध्यात्मिक गुरू ओशो यांची भूमिका साकारायला आवडेल”.

चित्रपट निर्मितीमागची प्रेरणा या प्रश्नाला उत्तर देताना दिग्दर्शक आनंद सुरापूर म्हणाले की, कथा सांगण्याची आवड आणि अनोख्या कल्पना हेच माझ्या प्रेरणेचे मुख्य स्त्रोत आहेत.

झी स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रौतू की बेली चित्रपटाचे पटकथा लेखक शरिक पटेल म्हणाले की हा चित्रपट त्याच्या व्यक्तिरेखांच्या बाबतीत पठडीबाहेरचा आहे आणि हे एक हत्याकांडावरील अनोखा रहस्यपट आहे.

संविधान दिननिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिवादन

संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन

पुणे (दि. २६ नोव्हेंबर २०२३-) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि.२६) भारतीय संविधान दिननिमित्त पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्वाखाली संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष
मयूर जाधव यांच्या वतीने पानसरे यांच्या हस्ते संविधान पुस्तिकेचे आणि कामठे यांच्या हस्ते प्रास्ताविकेचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर, जेष्ठ नेते शिरीष जाधव, देवेंद्र तायडे, राजन नायर, ज्योती निंबाळकर, काशिनाथ जगताप, प्रशांत सपकाळ, भारत कुंभार, राजेंद्र कडू, सुहास देशमुख, के. डी. वाघमारे, बिरुदेव मोटे, कमलेश वाळके, रेखा मोरे, अनिल भोसले, सुगंधा जाधव, सुवर्णा वाळके, संगीता जाधव, सुदाम शिंदे, विनोद वाघमारे, विशाल क्षीरसागर, सुभाष गालफाडे आदी उपस्थित होते.

 गुजरातमधील वाडीनार येथे राष्ट्रीय स्तरावरील 9 व्या प्रदूषण प्रतिसाद सरावाचे (NATPOLREX-IX) आयोजन

0

वाडीनार-भारतीय तटरक्षक दलाने 25 नोव्हेंबर 2023 रोजी गुजरात मधील वाडीनार येथे राष्ट्रीय स्तरावरील  9 वा प्रदूषण प्रतिसाद सराव  (NATPOLREX-IX)  केला.  भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक आणि एनओएसडीसीपीचे अध्यक्ष राकेश पाल यांनी सरावादरम्यान सर्व विभागांच्या  तयारीचा आढावा घेतला. केंद्र आणि किनारी प्रदेशातील राज्य सरकारांची विविध मंत्रालये आणि विभाग, बंदरे, तेल हाताळणी संस्थाचे प्रतिनिधी  आणि इतर संबंधित या सरावात सहभागी झाले होते. या सरावात 31 हून अधिक परदेशी निरीक्षक आणि 80 प्रतिनिधी सहभागी झाले होते.

NATPOLREX-IX ने  समुद्रातील  तेल गळतीला प्रतिसाद देण्यासाठी विविध संसाधन संस्थांमधील सज्जता आणि समन्वयाचा स्तर तपासण्याचे आपले उद्दिष्ट पूर्ण करताना राष्ट्रीय तेल गळती आपत्ती आकस्मिक योजना किंवा एनओएसडीसीपीच्या तरतुदींचे  आवाहन केले. 

भारतीय तटरक्षक दलाने प्रदूषण प्रतिसाद जहाजे  (PRVs), किनारी गस्ती नौका  (OPVs), स्वदेशी  प्रगत लाईट हेलिकॉप्टर Mk-III, आणि सागरी प्रदूषण प्रतिसादासाठी खास तयार केलेले डॉर्नियर विमान यासह पृष्ठभाग तसेच हवाई प्लॅटफॉर्म तैनात केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेअंतर्गत ‘मेक इन इंडिया’वर भर देणारे  भारताचे औद्योगिक सामर्थ्य या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आले. प्रमुख बंदरांसारख्या हितधारकांनी सागरी प्रदूषणाचा सामना  करण्यासाठी समन्वित  प्रयत्नांचे प्रदर्शन करण्यासाठी त्यांची सागरी संसाधने देखील तैनात केली होती .

भारतीय तटरक्षक दलाने 7 मार्च 1986 रोजी भारताच्या सागरी क्षेत्रामध्ये सागरी पर्यावरणाच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली, जेव्हा या जबाबदाऱ्या नौवहन मंत्रालयाकडून हस्तांतरित करण्यात आल्या. त्यानंतर, तटरक्षक दलाने समुद्रातील तेल गळतीच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय तेल गळती आपत्ती आकस्मिक योजना ( एनओएसडीसीपी) आखली ,  या योजनेला सचिवांच्या समितीने 1993 मध्ये मंजुरी  दिली. एनओएसडीसीपी तयार करण्याबरोबरच  तटरक्षक दलाने मुंबई, चेन्नई, पोर्ट ब्लेअर आणि वाडीनार येथे चार प्रदूषण प्रतिसाद केंद्रे स्थापन केली आहेत.

भारताच्या  सागरी हद्दीतील तेल गळती सारख्या आपत्तींसाठी भारताच्या सज्जतेसाठी एक मजबूत राष्ट्रीय तेल गळती प्रतिसाद प्रणाली आवश्यक आहे. विशेष म्हणजे भारताच्या 75 टक्के ऊर्जेची गरज तेलाने भागवली जाते जे आपल्या देशात समुद्रमार्गे आयात केले जाते. जहाजांद्वारे तेलाच्या वाहतुकीत अंतर्निहित जोखीम  असते आणि त्यासाठी जहाज मालकांनी तसेच बंदरांमधील  तेल प्राप्त करणार्‍या सुविधांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असते. मात्र सागरी दुर्घटना  आणि समुद्राच्या अनपेक्षित धोक्यांमुळे तेल प्रदूषणाचा धोका सर्वव्यापी आहे.

भारतीय समुद्र क्षेत्रातील तेल गळतीला प्रतिसाद देण्यासाठी भारतीय तटरक्षक दल केंद्रीय समन्वयक  प्राधिकरण म्हणून काम करते.

चित्रपटांबद्दलचे प्रेम भारतीय संस्कृतीत खोलवर रुजले आहे: बोस्नियन पॉटचे दिग्दर्शक पावो मारिन्कोविच यांचे गौरवोद्गार

गोवा-

“चित्रपटांबद्दलचे प्रेम भारतीय संस्कृतीत खोलवर रुजले आहे” असे बोस्नियन पॉट पावो मारिन्कोविचचे दिग्दर्शक पावो मारिन्कोविच यांनी आज गोव्यामध्ये आयोजित इफ्फी 54 मध्ये माध्यम प्रतिनिधी आणि चित्रपट रसिकांशी संवाद साधताना सांगितले. क्रोएशियन आणि जर्मन भाषेत बनवलेला बोस्नियन पॉट हा चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागामध्ये प्रदर्शित करण्यात आला.

हा चित्रपट इमिग्रेशन  (स्थलांतर), स्वतःची ओळख आणि जीवन घडवण्यामधील कलेची भूमिका  या संकल्पनांचा शोध घेतो. हा चित्रपट फारुक शेगो या बोस्नियन लेखकाची कथा सांगतो, ज्याच्यावर इमिग्रेशनच्या कठोर नियमांमुळे ऑस्ट्रियातून हद्दपार होण्याची वेळ आली आहे. तिथे राहण्यासाठी त्याला हे सिद्ध करावे लागणार आहे, की त्याने ऑस्ट्रियन समाजावर सांस्कृतिक प्रभाव पाडला आहे. या संकटातून त्याची सुटका करणारा शेवटचा आशेचा किरण आहे, तो म्हणजे फारुकने त्याच्या तारुण्यात लिहिलेले नाटक सादर करण्यासाठी उत्सुक असलेला एक ऑफ थिएटर ग्रुप. त्यासाठी काहीशा अनिच्छेनेच  थिएटरकडे परतल्यावर, फारुकचा एक साहसी प्रवास सुरु होतो, जो त्याला कलात्मकदृष्ट्या आव्हान देतो आणि आत्म-शोधासाठी प्रवृत्त करतो.

दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे मारिन्कोविच यांनी, एक नाटककार म्हणून आपल्या कारकि‍र्दीची सुरुवात केली आणि नंतर ते चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक बनले. Trešeta / Tressette – एक बेटाची कथा, या त्यांनी लिहिलेल्या आणि सह-दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाने 6 आंतरराष्ट्रीय आणि 2 देशांतर्गत पुरस्कार जिंकले असून 30 हून अधिक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये तो प्रदर्शित करण्यात आला आहे. 2013 मध्ये त्यांनी ‘Occupation the 27th Picture’  या चेक-क्रोएशियन माहितीपटावर काम केले.

आपल्या बोस्नियन पॉट या चित्रपटाबद्दल बोलताना मारिन्कोविच म्हणाले की, हा प्रवास सोपा नव्हता. क्रोएशिया, ऑस्ट्रिया आणि बोस्निया या तीन देशांमधील कलाकारांच्या सहयोगाने केलेले हे काम होते. क्रोएशियन म्हणून त्यांना स्वत: च्या अनुभवांवरून हा चित्रपट बनवण्याची प्रेरणा मिळाली, कारण चित्रपटाच्या नायकाप्रमाणेच त्यांनाही ऑस्ट्रियामध्ये स्थलांतरित होताना अशाच समस्यांचा सामना करावा लागला होता. “माझे मूळ, हीच माझी प्रेरणा आहे. चित्रपटात दिसतो, तो राजकीय संघर्ष, पण नायक फारुकचा अंतर्गत संघर्ष देखील आहे, बाहेरच्या देशातून आल्यामुळे, इथले लोक त्याच्या कामाला महत्व देत नाहीत.” ते म्हणाले.  त्यांनी स्पष्ट केले की बोस्निया अजूनही युरोपियन युनियनच्या बाहेर असल्यामुळे अजूनही या समस्यांना तोंड देत आहे, आणि चित्रपटाची संकल्पना आजही युरोपमधील राजकीय परिस्थितीशी सुसंगत आहे.

त्यांनी चित्रपटाच्या शीर्षकाचे महत्त्व देखील स्पष्ट केले, जे बोस्नियामधील समुदायाच्या पारंपारिक खाद्य पदार्थाचे प्रतीक आहे, ज्याला बोस्नियन पॉट म्हणतात, जिथे प्रत्येक सदस्य बंधुता आणि ऐक्याचे प्रतीक म्हणून पदार्थात एका व्यंजनाची भर घालतो. हा चित्रपट स्वतःची ओळख, समुदाय आणि स्वीकृती या संकल्पनांच्या माध्यमातून हीच भावना प्रतिबिंबित करतो.   

दिग्दर्शक मारिन्कोविच यांनी भारतीय प्रेक्षकांची प्रशंसा केली आणि त्यांचे आभार मानले. त्यांनी खुलासा केला की भारतीय प्रेक्षकांकडून त्यांना नेहमीच अनपेक्षितपणे सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे, आणि केरळमधील चित्रपट महोत्सवातील त्यांचे अनुभवही त्यांच्या कायम स्मरणात राहतील.  

बालपणीची जडणघडण आणि सामाजिक-आर्थिक संदर्भ: इफ्फी 54 मध्ये युनिसेफच्या भागीदारीत खास निवड केलेल्या विभागात पाच चित्रपट प्रदर्शित होत आहेत

गोवा 26 नोव्‍हेंबर 2023

इफ्फीचा भागीदार युनिसेफच्या सहकार्याने प्रस्तुत पाच उल्लेखनीय चित्रपट 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान विविध ठिकाणी प्रदर्शित केले जात आहेत. हे चित्रपट बालपणाची जडणघडण करणार्‍या गतिमान शक्ती  प्रतिबिंबित करतात आणि त्याचे सामाजिक-आर्थिक संदर्भ तपासतात.

या वर्षी, युनिसेफ आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी)  मुलांच्या हक्कांवर चित्रपट उद्योग आणि प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी एकत्र आले आहेत. ही भागीदारी चित्रपटांमधील मुले, किशोरवयीन आणि महिलांवरील हिंसाचाराच्या चित्रणाकडे लक्ष वेधते. नागरी समाजाला प्रभावित करणार्‍या संबंधित मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या प्रयत्नांचा देखील ही भागीदारी भाग आहे.

“इफ्फीमध्ये एनएफडीसीचा दुसऱ्या वर्षासाठी भागीदार बनल्याचा युनिसेफला आनंद होत आहे, आम्हाला आशा आहे की चित्रपटांची निवड केलेल्या पॅकेजमुळे लोकप्रिय चित्रपटांमध्ये बालहक्कांना मान्यता देण्याबाबत सकारात्मक चर्चा होईल”, असे मत युनिसेफ इंडियाच्या संपर्क प्रमुख, वकिल आणि भागीदार जफरीन चौधरी यांनी व्यक्त केले. मुले केंद्रस्थानी असलेल्या अनुकरणीय चित्रपटांचा प्रचार आणि समावेश केल्याबद्दल  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नेतृत्वाची  त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले युनिसेफसाठी इफ्फी हे चित्रपट निर्माते, कला आणि संस्कृतीतील लोक, समीक्षक आणि प्रेक्षकांपर्यंत  मुलांच्या हक्कांबाबत व्यापकपणे पोहोचण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ आहे, जे मुलांवर आणि युवकांवर  होणारे भयंकर परिणाम टाळण्यासाठी हिंसेला सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्ह बनविण्यावर लक्ष केंद्रित करते.

खालील चित्रपट विशेष निवड केलेल्या विभागात समाविष्ट केले आहेत:

दामू: राजा सेन दिग्दर्शित, हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता बंगाली चित्रपट एका अनाथ मुलाबद्दल आहे, ज्याला एका दयाळू माणसाने आश्रय दिला आणि वाढवले. तो त्या माणसाची नात रुंकू हिच्याशी मैत्री करतो आणि एकदा बेफिकीरपणे, तो तिला गावातून हत्तीवरून फिरवून आणण्याचे वचन देतो. जेव्हा ते पूर्ण होत नाही, तेव्हा रुंकू निराश होतो. दामूची निराशा सतर्कतेत बदलते .जेव्हा सर्कस लुटण्याची योजना त्याला समजते. छोटा दामू सर्कस वाचवू शकतो का आणि रुंकूला दिलेले वचन पूर्ण करू शकतो का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

फॉर द सेक ऑफ अवा : इराणी चित्रपट दिग्दर्शक मोहसेन सेराजी यांचा पहिला चित्रपट असलेला हा पर्शियन चित्रपट एका इराणी रंगकर्मी चमूची कथा सांगतो. त्यांच्या नाटकाची प्रमुख अभिनेत्री असलेली अवा, हिच्या मिश्र वारशामुळे तिच्याकडे योग्य दस्तऐवजांची कमतरता असते. त्यामुळे या चमूला पारपत्राच्या समस्येचा सामना करावा लागतो. परदेशातील प्रतिष्ठेच्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी अवाला मदत करून तिचे पारपत्र  सुरक्षित करायचे ठरवून हा ग्रुप लाचखोरी, मानवी तस्करी यासारखे नेहमीपेक्षा वेगळे आणि धोकादायक मार्ग अवलंबतो.    

गांधी अँड कं: सर्वोत्कृष्ट बालचित्रपट- सुवर्ण कमळ पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023, या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेला मनीष सैनी दिग्दर्शित हा गुजराती चित्रपट दोन खोडकर मुलांची गोष्ट सांगतो. ही मुले गांधीजींची शिकवण अनुसरणाऱ्या एका वडिलधाऱ्या व्यक्तीला पाहतात. त्यानंतर त्यापैकी एक मुलगा गांधीजींचे अनुकरण करण्याचा निर्णय तर घेतो, पण त्याच्यातला खोडकरपणा मात्र तसाच राहतो.  

पीकॉक लॅमेंट: टोकियो IFF 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट कलात्मक योगदान पुरस्काराने सन्मानित, संजीव पुष्पकुमारा दिग्दर्शित हा सिंहली चित्रपट, आपली हृदयविकाराने आजारी बहीण इनोका हिच्या  शस्त्रक्रियेसाठी 15,000 डॉलर्स जमवण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीलंकेतील अमिला या तरुणाची कथा सांगतो. हताश होऊन तो बाल तस्करीच्या गुन्ह्यात गुंततो. जसजसा तणाव वाढत जातो, अमिलाला आपल्या बहिणीचे प्राण वाचवण्यासाठी आणि गुन्हेगारी जगाचा पिच्छा सोडवण्यासाठी कठीण निर्णय घ्यावे लागतात.   

सिंगो: अलीरेझा मोहम्मदी रौजबहानी दिग्दर्शित, हा पर्शियन चित्रपट शफा नावाच्या एका लहान मुलीबद्दल आहे. एका बेटावरचे लोक एका मच्छीमाराने पकडलेले हॉर्सशु खेकडे विकायला जातात. ते खूप मौल्यवान आहेत. ही लहान मुलगी ते विकले जाण्यापासून वाचवण्याचा निर्णय घेते आणि त्यामुळे तिचे कुटुंब बेटावरच्या नागरीकांच्या रोषाला बळी पडते, आणि ते त्या कुटुंबाला तिथून बाहेर काढण्याचा निर्णय घेते. आता, शफाला तिच्या कुटुंबाचे हित आणि खेकड्यांचा जीव यापैकी एकाची निवड करावी लागेल.

1989 मध्ये, जागतिक नेत्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय बालहक्क कराराला मान्यता देऊन जगभरातील मुलांसाठी एक ऐतिहासिक वचनबद्धता दर्शविली. हा इतिहासातील सर्वात व्यापकपणे मंजुरी मिळालेला मानवी हक्क करार असून, त्याने जगभरातील मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सहाय्य केले आहे. पण तरीही प्रत्येक मुलाला आपले बालपण अनुभवता येत नाही, आजही अनेक मुले त्यापासून वंचित आहेत.  

या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी आणि बाल हक्कांबाबत  कृती करायला सर्व भागधारकांनी एकत्रितपणे काम करण्याची मागणी करणे आपल्या पिढीवर अवलंबून आहे असे युनिसेफ मानते.  54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एनएफडीसीची युनिसेफ  बरोबरची भागीदारी या मुद्द्यांवर अधिक जागरूकता निर्माण करण्याच्या आणि या विषयावर व्यापक माहिती प्रसारित करण्याच्या प्रयत्नांना अधोरेखित करते. 

सेवाभावी कार्याला प्रोत्साहन देण्याची गरज-रचना पाटील –

परभन्ना फाउंडेशनतर्फे सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कारांचे वितरण
पुणे : “समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्त्ती व संस्थांना प्रोत्साहन दिले, तर मोठ्या स्वरूपात विधायक कार्य उभा राहते. निःस्वार्थ भावनेने काम करणाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली, तर त्यांनाही आणखी जोमाने काम करण्याची उर्मी मिळते,” असे मत श्रीनिवास पाटील फाउंडेशनच्या उपाध्यक्षा रचना पाटील यांनी व्यक्त केले. सेवाकार्यासाठी जिद्द, इच्छाशक्तीची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

परभन्ना फाउंडेशन, ॲग्रो टुरिझम विश्व यांच्यातर्फे आयोजित सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कारांचे वितरण रचना पाटील यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या सोहळ्यावेळी अभिनेत्री गौरी रत्नपारखी, यशदाचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड, संयोजक परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश चप्पलवार, मनिषा उगले, अँन्डी जाधव आदी उपस्थित होते.  कला, सामाजिक, प्रशासकीय, पर्यटन, पर्यावरण, पत्रकारिता, आरोग्य, सांस्कृतिक, संशोधन, स्टार्टअप, राजकीय, विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना ‘सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार’ देण्यात आला.

नितीन सोनावणे (गांधी शांती पदयात्रा), पुंडलिकराव थोटवे (सेवानिवृत्त अभियंता), विनोद साळवी (अध्यक्ष पेट्स फोर्स), भगवान खोकले (सरपंच, अहमदनगर) यांना ‘विशेष सेवाकार्य पुरस्कार’, तर माधव पाटील (आंघोळीची गोळी संस्था), वैशाली नगराळे (शोभा गर्ल्स पी.जी.), राधिका कुलकर्णी (एस्पायर एंटरटेनमेंट), मुग्धा पंडित (विश्वरंग टुर), डॉ. रोहित बोरकर (फर्स्ट एड डॉक्टर्स असोशिएशन), व्यंकटेश कल्याणकर (वल्लरी प्रकाशन), अक्षय बनसोडे (कार्डझ टेकनोलोजि प्रा.लि.), ऋषिकेश आंधळकर (नंदा फॉउंडेशन), संदीप भिंगारे (बालविकास प्रकल्प अधिकारी, सातारा), डॉ. इलियास बेपारी (आठवले समाजकार्य महाविद्यलय, भंडारा) यांना ‘सेवाकार्य कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
गणेश चप्पलवार यांनी पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. अशोक हिरवे यांनी आभार मानले.

चीनमध्ये गूढ आजार, भारतात अलर्ट:श्वसनविकारांविरुद्धच्या सज्जतेच्या उपाययोजनांचा कृतिशील आढावा घेण्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा निर्णय

0

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालय सज्जतेबाबतच्या उपाययोजनांचा ताबडतोब आढावा घेण्याचा केंद्र सरकारकडून सल्ला

आरोग्य मंत्रालयाचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष;धास्ती नको

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2023

अलिकडच्या काही आठवड्यांमध्ये उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनविकारांत वाढ झाल्याबद्दल आलेले अहवाल पाहता, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुरेशी सावधगिरी म्हणून श्वसनविकारांविरुद्धच्या सज्जतेच्या उपाययोजनांचा कृतिशील आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेली इन्फ्लूएन्झाची साथ आणि हिवाळ्याच्या ऋतूमुळे, श्वसनविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा आहे.  भारत सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, मात्र कोणतीही धास्ती बाळगण्याची गरज नसल्याचेही सरकारने सूचित केले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालय सज्जतेबाबतच्या उपाययोजनांचा ताबडतोब आढावा  घेण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये, मनुष्यबळाची उपलब्धता, रुग्णालयातील खाटा, इन्फ्लूएंझासाठी औषधे आणि लस, वैद्यकीय ऑक्सिजन, प्रतिजैविके, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे, चाचणी संच आणि विविध वैद्यकीय उपचारात्मक रसायने , ऑक्सिजन निर्मितीचे प्लान्ट आणि व्हेंटिलेटर्सची(जीव रक्षक प्रणाली) कार्यक्षमता, आरोग्य सुविधांमधील संसर्ग नियंत्रण पद्धती, या सर्व बाबींची मोठ्या प्रमाणात उपलब्धता, यांचा समावेश आहे.

सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना ‘कोविड-19 च्या अनुषंगाने, परिस्थितीवर लक्ष ठेवण्याबाबत या वर्षाच्या सुरुवातीलाच देण्यात आलेली  सुधारित  देखरेख धोरणांसाठीची  परिचालनात्मक  मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा सल्ला आहे. यात इन्फ्लूएन्झा (ILI) आणि तीव्र स्वरुपाचे श्वसन आजार (SARI), या सारख्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या श्वसनरोग जनकांच्या एकात्मिक देखरेखीची तरतूद आहे. या संसर्गांच्या वाढीवर, एकात्मिक रोग देखरेख प्रकल्पांचे (IDSP), जिल्हा आणि राज्य विभाग, बारकाईने लक्ष ठेवून आहेत की नाही याची खातरजमा करण्याची सूचनाही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली आहे. यात लहान मुले आणि नवजात अर्भके यांची विशेष काळजी घेण्याचा समावेश आहे.

ILI/SARI च्या माहितीचा तपशील,  IDSP- IHIP पोर्टलवर टाकणे आवश्यक आहे. वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांसह सार्वजनिक आरोग्य संस्थांनी हे विशेष करून, करायचे आहे.  SARI ग्रस्त रूग्णांच्या (विशेषत: लहान मुले आणि किशोरवयीन मुले) नाक आणि घशातील स्त्रावांचे नमुने श्वसन विकार जनकांच्या चाचणीसाठी, राज्यांमध्ये असलेल्या व्हायरस रिसर्च अँड डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यास, राज्यांना सांगितले आहे.  या सावधगिरीच्या आणि कृतिशील सहयोगात्मक उपायांच्या अंमलबजावणीचा एकत्रित परिणाम, कोणत्याही संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी अपेक्षित आहे.

अलीकडेच, जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या उत्तरेकडील भागात श्वसनविकारात वाढ झाल्याचे संकेत दिले आहेत.  संघटनेने चिनी अधिकार्‍यांकडून अतिरिक्त माहिती मागितली आहे आणि सध्या तरी कुठल्याही प्रकारच्या धोक्याच्या इशाऱ्याची गरज नाही असे अनुमान काढले आहे.  

 पुणे पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलच्या API अर्चना कटके यांना ‘बाल स्नेही 2023’ पुरस्कार

पुणे :पुणे पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक अर्चना कटकेयांना बालकांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि महिला व बालविकास आयुक्तालय, युनिसेफ यांच्या वतीने ‘बाल स्नेही 2023’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, मुंबई दिपक पाण्डेय, अध्यक्षा बाल हक्क संरक्षण आयोग अॅड. सुसीबेन शहा, बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव शिवराज पाटील, महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

बालकांच्या सर्वांगीण विकास, बाल हक्क संरक्षण त्यांची सुरक्षा, आरोग्य इत्यादीसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातून एकूण 716 विधीसंघर्षित बालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तर 2023 मध्ये 29 पीडितांना मनोधैर्य योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. पोलीस आयुक्तालयामार्फत पोक्सो मधील पीडित बलके तसेच विधीसंघर्षग्रस्त बालकांना बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, संस्थेत दाखल करणे किंवा त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वाहने उपलब्ध करुन दिली आहेत.याशिवाय दोन अल्पवीन मुलांना नोकरीसाठी आवश्यक असलेले चारित्रय पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त करुन दिले आहे.

तसेच कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत पोलीस काका/दिदी या योजनेकरिता एक नोडल अधिकारी व अंमलदार, दामिनी मार्शल यांची नेमणूक केली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थांना गुड टच बॅड टच, सायबरचे वाढते प्रमाण व गुन्हेगारी, व्यसनाधीनता, प्रेम-मैत्री-आकर्षण, पोक्सो गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन केले आहे. पुणे शहर पोलीस व होप फॉर दी चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस आयुक्ताल्यातील 32 पैकी 24 पोलीस ठाण्यात ‘बालस्नेही कक्ष’ तयार करण्यात आला आहे. यामध्ये मोलाचा कार्य केल्याने गुन्हे शाखेच्या विशेष बाल सुरक्षा पथक, भरोसा सेल सहायक पोलीस निरीक्षक अर्चना कटके यांना ‘बाल स्नेही 2023’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त रितेश कुमार, तत्कालीन पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे,सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखालीभरोसा सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगिता जाधवयाच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अर्चना कटके यांनी ही कामगिरी केली आहे.

बहुरूपी भारुडातून उलगडली महाराष्ट्राची संतपरंपरा

नामदेव समजन्नती परिषदे पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर तर्फे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जयंती निमित्त भावार्थ देखणे यांच्या “बहुरूपी भारुड” कार्यक्रमाचे आयोजन
पुणे :  वासुदेवाची वाणी, कडकलक्ष्मीची गाणी आणि संत महतांची भजन अशा सूर आणि तालाने नटलेल्या भावार्थ देखणे यांच्या बहुरूपी भारुड या कार्यक्रमात महाराष्ट्राची संत परंपरा आणि लोककलेची परंपरा उलगडली.

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंतीनिमित्त नामदेव समाजोन्नती परिषद शाखा पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने साहित्य कला प्रतिष्ठान प्रस्तुत ‘बहुरूपी भारुड’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. राजेंद्र झुंजारराव, नामदेव समाजोन्नती परिषदेचे मुख्य विश्वस्त राजेंद्र पोरे, वृषाली तुपसाखरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व नामदेव महाराज मुर्ती पुजन करण्यात आले

यावेळी पुणे परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल, भा.ज.पा. शहर अध्यक्ष धीरज घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात डॉ. भावार्थ देखणे यांच्यासह अवधूत गांधी, अभय नलगे यांसारखे ३५ हून अधिक कलाकार कार्यक्रमात सहभागी झाले होते.

ज्ञानोबा माऊली च्या गजरात रंगमंचावर सादर झालेले वारकरी, कमरेवर हात ठेवून उभा असलेला विठ्ठल, संत नामामध्ये दंग होऊन फेर धरणारे वारकरी अशा भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली. अवधूत गांधी यांनी संत नामदेव महाराज यांच्या वेशात रंगमंचावर प्रवेश करताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर भावार्थ देखणे हे वासुदेवाच्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांसमोर आले. त्यांनी विविध गाण्यांच्या माध्यमातून वासुदेवाची गाणी आणि महाराष्ट्रतून लुप्त होत चाललेली वासुदेव परंपरा यांचे महत्त्व सांगितले. त्यानंतर कडकलक्ष्मीच्या वेशात पारंपारिक गोंधळ सादर करून प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
संदीप लचके म्हणाले, सध्याची तरूण पिढी सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या विळख्यात गुरफटलेली असून संतसाहित्य व लोककला लोप पावत चालली आहे. हीच सामाजिक बांधिलकी ओळखून पिंपरी चिंचवड शहर शाखेचे अध्यक्ष एकनाथ सदावर्ते यांचे संयुक्त विद्यमाने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंती निमित्त बहुरूपी भारुड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ना.स.प. पुणे शहर शाखेचे सचिव सुभाष मुळे, कार्याध्यक्ष रणजीत माळवदे, उपाध्यक्ष कुंदन गोरटे, अक्षय मांढरे, सुभाष पांढरकामे, सोमनाथ मेटे, खजिनदार विजय कालेकर तर पिंपरी चिंचवड शहर शाखेचे उपाध्यक्ष कैलास नेवासकर, सचिव रेखा गाडेकर, सर्व महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रशांत सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.

भारताचे संविधान जगातील अनेक देशांना मार्गदर्शक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे, दि. २६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले देशाचे संविधान हे जगातील अनेक नवनिर्मित देशांना आपल्या संविधान निर्मितीमध्ये मार्गदर्शक ठरले आहे. संविधान दिन साजरा करण्याबरोबरच संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे अधिक महत्वाचे आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

संविधान दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित ‘संविधान सन्मान दौड २०२३’ ला मंत्री श्री. पाटील आणि कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते ध्वज दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे आणि पुणे जिल्हा हौशी ॲथलेटीक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष व स्पर्धेचे मुख्य संयोजक परशुराम वाडेकर, राहुल डंबाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, आपल्या संसदेने संविधान स्वीकारले याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. दरवर्षी संविधान सन्मान दौड आयोजित करण्यासह विविध कार्यक्रमाद्वारे सर्व देशभर हा दिवस साजरा केला जातो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे समस्त भारतीयांवर खूप मोठे उपकार आहेत. संविधानाच्या माध्यमातून भारताची लोकशाही सदृढ करण्याचे काम त्यांनी केले. हजारो वर्षे बदलावेच लागणार नाही असे परिपूर्ण संविधान त्यांनी लिहिले, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

स्पर्धेत सहभागी नागरिकांचे अभिनंदन करून, सदृढ आणि सक्षम समाजासाठी खेळ महत्वाचे आहेत, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले.

या ‘संविधान सन्मान दौड’ मध्ये तब्बल ३१ देशातील विद्यार्थ्यासह एकूण सात हजार स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेच्या सुरवातीला भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

दरम्यान,  या स्पर्धेत धावू शकल्या नाही अशा महिलांनी  ‘वॉक फॉर संविधान’ रॅली काढली होती. या उपक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली.  विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप झाला.