गोवा 26 नोव्हेंबर 2023
इफ्फीचा भागीदार युनिसेफच्या सहकार्याने प्रस्तुत पाच उल्लेखनीय चित्रपट 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान विविध ठिकाणी प्रदर्शित केले जात आहेत. हे चित्रपट बालपणाची जडणघडण करणार्या गतिमान शक्ती प्रतिबिंबित करतात आणि त्याचे सामाजिक-आर्थिक संदर्भ तपासतात.
या वर्षी, युनिसेफ आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) मुलांच्या हक्कांवर चित्रपट उद्योग आणि प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी एकत्र आले आहेत. ही भागीदारी चित्रपटांमधील मुले, किशोरवयीन आणि महिलांवरील हिंसाचाराच्या चित्रणाकडे लक्ष वेधते. नागरी समाजाला प्रभावित करणार्या संबंधित मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या प्रयत्नांचा देखील ही भागीदारी भाग आहे.
“इफ्फीमध्ये एनएफडीसीचा दुसऱ्या वर्षासाठी भागीदार बनल्याचा युनिसेफला आनंद होत आहे, आम्हाला आशा आहे की चित्रपटांची निवड केलेल्या पॅकेजमुळे लोकप्रिय चित्रपटांमध्ये बालहक्कांना मान्यता देण्याबाबत सकारात्मक चर्चा होईल”, असे मत युनिसेफ इंडियाच्या संपर्क प्रमुख, वकिल आणि भागीदार जफरीन चौधरी यांनी व्यक्त केले. मुले केंद्रस्थानी असलेल्या अनुकरणीय चित्रपटांचा प्रचार आणि समावेश केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नेतृत्वाची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले युनिसेफसाठी इफ्फी हे चित्रपट निर्माते, कला आणि संस्कृतीतील लोक, समीक्षक आणि प्रेक्षकांपर्यंत मुलांच्या हक्कांबाबत व्यापकपणे पोहोचण्यासाठी एक सक्षम व्यासपीठ आहे, जे मुलांवर आणि युवकांवर होणारे भयंकर परिणाम टाळण्यासाठी हिंसेला सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्ह बनविण्यावर लक्ष केंद्रित करते.
खालील चित्रपट विशेष निवड केलेल्या विभागात समाविष्ट केले आहेत:
दामू: राजा सेन दिग्दर्शित, हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता बंगाली चित्रपट एका अनाथ मुलाबद्दल आहे, ज्याला एका दयाळू माणसाने आश्रय दिला आणि वाढवले. तो त्या माणसाची नात रुंकू हिच्याशी मैत्री करतो आणि एकदा बेफिकीरपणे, तो तिला गावातून हत्तीवरून फिरवून आणण्याचे वचन देतो. जेव्हा ते पूर्ण होत नाही, तेव्हा रुंकू निराश होतो. दामूची निराशा सतर्कतेत बदलते .जेव्हा सर्कस लुटण्याची योजना त्याला समजते. छोटा दामू सर्कस वाचवू शकतो का आणि रुंकूला दिलेले वचन पूर्ण करू शकतो का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
फॉर द सेक ऑफ अवा : इराणी चित्रपट दिग्दर्शक मोहसेन सेराजी यांचा पहिला चित्रपट असलेला हा पर्शियन चित्रपट एका इराणी रंगकर्मी चमूची कथा सांगतो. त्यांच्या नाटकाची प्रमुख अभिनेत्री असलेली अवा, हिच्या मिश्र वारशामुळे तिच्याकडे योग्य दस्तऐवजांची कमतरता असते. त्यामुळे या चमूला पारपत्राच्या समस्येचा सामना करावा लागतो. परदेशातील प्रतिष्ठेच्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी अवाला मदत करून तिचे पारपत्र सुरक्षित करायचे ठरवून हा ग्रुप लाचखोरी, मानवी तस्करी यासारखे नेहमीपेक्षा वेगळे आणि धोकादायक मार्ग अवलंबतो.
गांधी अँड कं: सर्वोत्कृष्ट बालचित्रपट- सुवर्ण कमळ पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023, या पुरस्कारांनी गौरविण्यात आलेला मनीष सैनी दिग्दर्शित हा गुजराती चित्रपट दोन खोडकर मुलांची गोष्ट सांगतो. ही मुले गांधीजींची शिकवण अनुसरणाऱ्या एका वडिलधाऱ्या व्यक्तीला पाहतात. त्यानंतर त्यापैकी एक मुलगा गांधीजींचे अनुकरण करण्याचा निर्णय तर घेतो, पण त्याच्यातला खोडकरपणा मात्र तसाच राहतो.
पीकॉक लॅमेंट: टोकियो IFF 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट कलात्मक योगदान पुरस्काराने सन्मानित, संजीव पुष्पकुमारा दिग्दर्शित हा सिंहली चित्रपट, आपली हृदयविकाराने आजारी बहीण इनोका हिच्या शस्त्रक्रियेसाठी 15,000 डॉलर्स जमवण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीलंकेतील अमिला या तरुणाची कथा सांगतो. हताश होऊन तो बाल तस्करीच्या गुन्ह्यात गुंततो. जसजसा तणाव वाढत जातो, अमिलाला आपल्या बहिणीचे प्राण वाचवण्यासाठी आणि गुन्हेगारी जगाचा पिच्छा सोडवण्यासाठी कठीण निर्णय घ्यावे लागतात.
सिंगो: अलीरेझा मोहम्मदी रौजबहानी दिग्दर्शित, हा पर्शियन चित्रपट शफा नावाच्या एका लहान मुलीबद्दल आहे. एका बेटावरचे लोक एका मच्छीमाराने पकडलेले हॉर्सशु खेकडे विकायला जातात. ते खूप मौल्यवान आहेत. ही लहान मुलगी ते विकले जाण्यापासून वाचवण्याचा निर्णय घेते आणि त्यामुळे तिचे कुटुंब बेटावरच्या नागरीकांच्या रोषाला बळी पडते, आणि ते त्या कुटुंबाला तिथून बाहेर काढण्याचा निर्णय घेते. आता, शफाला तिच्या कुटुंबाचे हित आणि खेकड्यांचा जीव यापैकी एकाची निवड करावी लागेल.
1989 मध्ये, जागतिक नेत्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय बालहक्क कराराला मान्यता देऊन जगभरातील मुलांसाठी एक ऐतिहासिक वचनबद्धता दर्शविली. हा इतिहासातील सर्वात व्यापकपणे मंजुरी मिळालेला मानवी हक्क करार असून, त्याने जगभरातील मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सहाय्य केले आहे. पण तरीही प्रत्येक मुलाला आपले बालपण अनुभवता येत नाही, आजही अनेक मुले त्यापासून वंचित आहेत.
या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी आणि बाल हक्कांबाबत कृती करायला सर्व भागधारकांनी एकत्रितपणे काम करण्याची मागणी करणे आपल्या पिढीवर अवलंबून आहे असे युनिसेफ मानते. 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एनएफडीसीची युनिसेफ बरोबरची भागीदारी या मुद्द्यांवर अधिक जागरूकता निर्माण करण्याच्या आणि या विषयावर व्यापक माहिती प्रसारित करण्याच्या प्रयत्नांना अधोरेखित करते.