‘जागतिक रंगकर्मी’ दिवसानिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा सत्कार
मुंबई : नाट्यगृहांच्या सुधारणांचा प्रयत्न करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतो. बऱ्याच ठिकाणी अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. कलाकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात विधानभवनात बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. तसेच राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रंगकर्मी भवन उभारले गेले पाहिजे. त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
जागतिक रंगकर्मी दिनानिमित्त रोहिणी हट्टंगडी यांचा सत्कार माझ्या हस्ते झाला हे माझे भाग्य समजते. समाजाला प्रबोधनाच्या कामासोबतच कलेमध्ये हरवून जाण्याचं काम नाट्य,साहित्य व संगीत क्षेत्राने केले असल्याची भावना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
शनिवार दि. २५ नोव्हेंबर रोजी यशवंत नाट्य संकुल माटुंगा येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संलग्नित मराठी नाट्य कलाकार संघ आयोजित ‘जागतिक रंगकर्मी दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावर्षी सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांचा सन्मान विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला असून त्यांच्या कारकिर्दीला मानवंदना म्हणून त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. यासोबतच, मराठी नाट्य कलाकार संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्री. रोहिदास पानगे या जेष्ठ कलाकाराला संस्थेच्यावतीने २५ हजार रुपये अर्थसहाय्याचा धनादेश डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या जयंती आणि विद्याधर गोखले आणि पं राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त सांगीतिक आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी, माजी नगरसेविका श्रीमती. शीतल म्हात्रे, श्री. गिरीश धानोरकर, अभिनेते श्री. विजय गोखले, अभिनेत्री श्रीमती. अर्चना नेवरेकर, निर्माता श्री. यतीन जाधव, श्री. सुशांत शेलार, श्री. विजय सूर्यवंशी, श्री. ज्ञानेश पेंढारकर, संगीतकार श्री. मुकुंद मराठे, श्री. प्रदीप कबरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.