भारत हा हिंदू बहुल देश आणि या देशाची संस्कृती ही सनातनशी जोडलेली आहे. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि बंगालपासून गुजरातपर्यंत, ते ईशान्येसह पसरलेल्या या खंडप्राय देशात आज एकूण सहा लाख आठ्ठेचाळीस हजार सहाशे सात मंदिरे आहेत असे टेम्पल ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर दिसते. हे आकडे राज्यांनी दिलेले आकडे आहेत. प्रत्यक्षात ही संख्या साडेसात लाखाच्या आसपास असेल.
देशात सर्वाधिक मंदिरे ही तमिळनाडू राज्यात आहेत. या राज्यात गेली पन्नास वर्षे द्रवीड राजकारण हे हिंदूत्वाच्या पूर्ण विरोधात आहे ते सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर धर्मातरणाच्या घटना घडत आहेत. तरीही या राज्यात सनातन संस्कृतीची साक्ष देणारी 79154 मंदिरे आहेत. त्या खालोखाल महाराष्ट्रात 77283 मंदिरे आहेत. उत्तराखंड ही देवभूमी मानली जाते, त्या राज्यातही केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री या चार धामसह 3695 मंदिरे आहेत.
उत्तरप्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य. या राज्यात वाराणसी, आयोध्या, मथुरा अशी तीर्थक्षेत्रे आहेत. गोरक्षनाथांचे गोरखपीठ आहे. ज्याचे प्रमुख आजही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आहेत. या शिवाय गंगा यमुना सरस्वतीचा त्रिवेणी संगम प्रयागराजला आहे. या राज्यात मंदिरांची संख्या 37518 आहे. यात आयोध्येत उभे रहात असलेल्या रामलल्ला मंदीर संकूलाची भर पडणार आहे. आयोध्येतील जुन्या मंदिरांचे पुर्ननिर्माण करण्यात येणार आहे.
समाजकारण आणि राजकारणावर वर्चस्व ख्रिश्चनांचे असलेल्या केरळ राज्यात 22931 मंदिरे आहेत, तर आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातही मिशन-यांचे वर्चस्व असले तरी तेथील मंदिरांची एकूण संख्या 85162 आहे. जगप्रसिद्ध तरूमला तिरूपती बालाजीचे मंदिरही आंध्रप्रदेशात असून ते कर्नाटक, तमीळनाडू राज्यांच्या सीमेलगत आहे.
दक्षिणेप्रमाणेच ईशान्य भारतातही स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ख्रिश्चन धर्मांतरण करून ही राज्ये ख्रिश्चन वर्चस्वाखाली आणण्याचे सरकारच्या मदतीने प्रयत्न झाले. हा आदिवासी बहुल प्रदेश असल्याने धर्मांतरणाचे काम बिनबोभाट होत होते. ख्रिश्चन वर्चस्वाने हा भूभाग भारतपासून तोडण्याचा डाव असावा. पण त्यात त्यांना शंभरटक्के यश मिळाले नाही, कारण या सर्व राज्यातील सनातन संस्कृती जपण्याचे काम येथील मंदिरांनी केले आहे. त्यात त्यांना यशही थोडेफार मिळाले. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड, सिक्कीम आणि अरूणाचल प्रदेश या ईशान्येकडील राज्यातही मंदिरांचे अस्तित्व ठळकपणे अधोरेखीत होते. या आसाममध्ये सर्वाधिक म्हणजे 5394 मंदिरे आहेत. याशिवाय मणिपूर (441), सिक्कीम (87), अरूणाचल प्रदेश (96), मेघालय (128), त्रिपुरा (528) आणि मिझोराम (32) अशी मंदिरांची संख्या आहे.
जम्मू काश्मीर लडाख……
गेली तीन चार दशके दहशतवादाच्या झळा सहन करणा-या जम्मूकाश्मिर आणि लडाखमधूल कलम 370 आणि 35 ए हे मोदी सरकारने काढून टाकल्यावर तेथील मंदिर पुर्ननिर्माणाचेही काम हाती घेण्यात आले. भारत पाकिस्तान दरम्यानच्या एलओसीवर शारदा मातेचे सुंदर ऐतिहासिक मंदिर होते. दहशतवाद्यांनी ते उध्वस्त केले होते. पण यंदाच्या वर्षी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शारदामाता मंदीर हे भक्तांसाठी खुले केल्यानंतर प्रथमच नवरात्रौउत्सव तेथे धुमधडाक्यात साजरा झाला. येथे शंकराचार्यांचेही मंदिर आहे. काश्मिर लडाखमधील अनेक मंदिरे जी भक्तांसाठी दहशतवाद्यांनी बंद केली होती, ती खुली कऱण्याचे काम जोरात सुरू आहे. यंदा काश्मिरमध्ये दीपावलीचे पर्वही उत्साहात लोकांनी साजरे केले. अनेक वर्षानंतर काश्मीर खोरे प्रकाशमान झाले आणि येथील अंधार मिटत असल्याची जाणिव प्रत्येकाला करून दिली. अशा या जम्मूकाश्मिर लडाख मध्येही आज एकूण 470 मंदिरे उभी आहेत. यात अमरनाथची गुंफा आणि वैष्णवीदेवीचेही मंदिर आहे.
गोवा…..
गोवा राज्याबद्दल सांगितले जाते की तिथे पोर्तुगिजांची सत्ता अनेक वर्षे असल्याने ते ख्रिश्चन बहुल राज्य आहे. त्यासाठी तेथे असलेली मोठी मोठी चर्चेस दाखवली जातात. कार्निव्हल सारख्या उत्सवांचा गाजावाजा केला जातो. ख्रिश्चन संस्कृतीच्या खूणा दाखवल्या जातात. मात्र त्याचवेळी दक्षिण गोव्यातील जुन्या ऐतिहासिक मंदिरांबद्दल कधीच फारसं बोललं जात नव्हतं. खरं तर गोवा राज्यात असलेली 1855 मंदिरे हा ऩॅरेटिव्ह साफ खोटा ठरवतात. गोव्यामध्ये सनातनला मानणा-यांची संख्या जास्त आहे. परदेशी पर्यटक आणि त्यांच्यासाठी नाताळचा सण मोठ्या गाजावाजा करत साजरा केला जात असला तरी गोवा हे अन्य राज्यांसारखे सनातन संस्कृती जपणारे राज्य आहे. त्यामुळे गोव्याला फिरायला गेलेले अगोदर दक्षिण गोव्यातील सुंदर मंदिरे बघून येत.
देशातील राज्यनिहाय मंदिरांची संख्या अशी –
जम्मूकाश्मिर लडाख 470, हिमाचल प्रदेश 4560, पंजाब 4827, उत्तराखंड 3695, हरयाणा 10329, दिल्ली 5367, उत्तरप्रदेश 37518, राजस्थान 39392, बिहार 29748, बंगाल 53658, झारखंड 14680, मध्यप्रदेश 27947, छत्तीसगड 9484, ओडिशा 30887, गुजराथ 49995, महाराष्ट्र 77283, कर्नाटक 61232, तेलंगणा 38392, आंध्रप्रदेश 47152, तमिळनाडू 79154, केरळ 22931, पदुचेरी 1201, गोवा 1855, दीवदमण 186.
ही मंदिरांची आकडेवारी का महत्वाची आहे ?
तर मंदिरे ही त्या त्या ठिकाणी आपली परंपरा, जीवनपद्धती, विचारपद्धती मूल्ये शाबूत ठेवतात. आपली विचार पद्धती आणि त्यावर आधारित आचरण पद्धती ही आपली मूल्ये आणि संस्कारांवर अवलंबून असतात. त्याची रुजवण धार्मिक आध्यात्मिक कृतीतून होत राहते.
पण एव्हढेच नाही तर मंदिरे गावाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना देणारी असतात. पंढरपूर, कोल्हापूर, नृहसिंहवाडी अशी अनेक गावे ही वर्षानुवर्षे यात्रांवरच चालत होती. आता कोल्हापूरसारख्या ठिकाणी औद्योगिक विकास झाला आहे. पण पंढरपूर तर केवळ यात्रेवरच चालणारे गाव आजही आहे. येथे आषाढी, कार्तिकीसह वर्षातून पाच मोठ्या यात्रा भरतात, त्यावेळी येथे येणारे लाखो भक्त येतात. त्यांचं येणं, जाणं, रहाणं, त्यांनी खरेदी केलेली फूलमाळा, नारळ प्रसाद आणि घोंगड्या, वाद्ये यातूनच गावात आर्थिक उलाढाल होत असते. यातून रोजगार निर्माण होतो आणि अर्थचक्राला गतीही मिळते. यासारखीच शेगाव, अक्कलकोट, ज्योतिबा, नाशिक, कोकणातील गणपतीपुळे, राजापूर, गुहाघर अशी अनेक नावे सांगता येतील. पुरातन काळापासून आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही पाश्चिमात्यांच्या अर्थशास्त्रांच्या नियमानुसार कधीच चालत नव्हती. आपली अर्थव्यवस्था ही कौटिल्यच्या अर्थशास्त्राच्या सिद्धांतानुसार चालते. समाजाच्या उतरंडमध्ये (पि-यामिड) सर्वात शेवटच्या पायरीवर असलेल्या व्यक्तीला आर्थिक बळ दिले की तेथूनच समाजाच्या, गावच्या, शहराच्या राज्याच्या आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चाकांनाही गती मिळायला सुरूवात होते. देशाची अर्थव्यवस्था गतीमान ठेवण्यासाठी सनातनच्या मंदिरांचे मोठे योगदान आहे.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी (माजी आमदार) – 94220 37306
राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा.