आस्था फाऊंडेशन प्रस्तुत व कलांगण चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे स्तन कर्करोग जनजागृतीसाठी हीलिंग हार्मनी कार्यक्रम
पुणे : कुहू कुहू बोले कोयलिया, जब दिल जले आना जब शाम ढले आना, निगाहे मिलाने को जी चाहता है… अशा एकाहून एक सुरेल गाण्यांच्या साथीने स्तनांच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारावर अतिशय उभारत्या शैलीमध्ये मार्गदर्शन, त्याचबरोबर आहार-व्यायाम यांचे संतुलन कसे राखावे याचे मार्गदर्शन करताना डॉक्टर आणि रुग्णांनी एकत्रितरित्या सादरीकरण केले. हीलिंग हार्मनी या कार्यक्रमातून सूर आणि संवादाच्या माध्यमातून आनंदी जीवनाचा प्रवास पुणेकरांसमोर उलगडण्यात आला.
आस्था फाउंडेशन प्रस्तुत आणि कलांगण चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित हीलिंग हार्मनी हा विशेष कार्यक्रम कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात पार पडला. प्रख्यात स्तन कर्करोगतज्ञ डॉ. शेखर कुलकर्णी यांच्यासह प्रतिभा कर्णिक, स्वाती देव ,माधवी फडणीस या कलाकारांनी आणि रुग्णांनी आपले स्तन कर्करोगा संदर्भातील अनुभव प्रेक्षकांना सांगितले.
स्तनांचा कर्करोग टाळण्यासाठी आणि कर्करोग झालाच तर तो कशाप्रकारे लवकर बरा करता येईल, यासाठी कोणत्या प्रकारची आहार आणि व्यायाम आवश्यक आहे, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कलांगण च्या संचालिका आणि गायिका चैत्राली अभ्यंकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन व निवेदन देखील केले.
स्तनांच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारासंदर्भात मार्गदर्शन करतानाच रुग्णांनी अतिशय सुरेल आवाजामध्ये हिंदी आणि मराठी गीते सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. चितळे उद्योग ग्रुपच्या संचालिका अनघा चितळे, उम्मीद कॅन्सर सपोर्ट ग्रुपचे अनुप मेहता यावेळी उपस्थित होते. उम्मीद संस्थेच्या सहयोगाने हा कार्यक्रम पार पडला.
डॉ. शेखर कुलकर्णी म्हणाले, निसर्गासोबत जगण्यामुळे पूर्वी आजारांचे प्रमाण कमी होते. परंतु आता माणसाला मॉडर्न होण्याची घाई लागल्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढत आहे. आपल्या जीवनशैलीमध्ये झालेल्या बदल हे सुद्धा स्तनांच्या कर्करोगासाठी कारणीभूत आहेत. स्तनांच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर निराश न होता योग्य वेळी उपचार, आहार आणि व्यायाम केल्यास आपल्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल घडून आपण त्यामधून सुखरूप बरे होऊ शकतो.
अनघा चितळे म्हणाल्या, हीलिंग हार्मनी हा समाजाला सकारात्मक दिशा आणि ऊर्जा देणारा कार्यक्रम आहे. हा केवळ संगीताचा कार्यक्रम नव्हे तर कर्करोगाशी दोन हात करून आनंदी जीवन जगणा-या लढवय्या महिलांनी इतर महिलांना दिलेला आधार आहे.