नवी दिल्ली, 11 मार्च 2023
भारत आणि ऑस्ट्रेलियाने दोन्ही देशांमध्ये पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी प्रमुख खनिज प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि ऑस्ट्रेलियाचे संसाधन मंत्री मॅडेलिन किंग यांनी शुक्रवारी द्विपक्षीय चर्चेनंतर घोषणा केली की दोन्ही देशांमधील भागीदारी अंतर्गत पाच प्रकल्प (दोन लिथियम आणि तीन कोबाल्ट) निर्धारित केले आहेत ज्यावर आवश्यक त्या तत्परतेने आणि तपशीलवार काम केले जाईल.
दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान महत्वपूर्ण खनिज गुंतवणूक भागीदारीसाठी सहकार्य अधिक दृढ करण्यास आणि त्यांचा विद्यमान सहभाग वाढवण्यासही सहमती दर्शवली.
या भागीदारी गुंतवणुकीद्वारे ऑस्ट्रेलियामध्ये प्रक्रिया केलेल्या महत्त्वपूर्ण खनिजांद्वारे समर्थित नवीन पुरवठा साखळी सुरु करण्याचा प्रयत्न केला जाईल. या प्रयत्नांमुळे भारताला त्याच्या विजेच्या नेटवर्कमधून होणारे उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल आणि इलेक्ट्रिक वाहनांसह इतर विजेवर आधारित उत्पादनांचे जागतिक केंद्र बनण्याची संधी मिळेल.जगातील लिथियम उत्पादनापैकी जवळपास निम्म्या उत्पादनात ऑस्ट्रेलियाचा वाटा असून कोबाल्टचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक आणि दुर्मिळ खनिजांचा पृथ्वीवरील चौथा सर्वात मोठा उत्पादक आहे. पुढील तीन दशकांत कार्बन-कमी करणार्या तंत्रज्ञानाच्या जागतिक मागणीतील अपेक्षित वाढीचा परिणाम म्हणून, ही भागीदारी परस्पर फायदेशीर खनिज पुरवठा साखळी सुरक्षित करण्याच्या दिशेने महत्वपूर्ण ठरेल.