पुणे, दि.१०: कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पीएमकेव्हीवाय ४.० अंतर्गत बेरोजगार अल्पसंख्यांक युवक-युवतींसाठी २० मार्चपासून अल्प मुदतीच्या रोजगारक्षम विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या प्रशिक्षणात तांत्रिक प्रशिक्षण घेण्याची इच्छा असलेले बेरोजगार युवक-युवती किंवा तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण उमेदवारांना अधिकचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी या अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल.
पीएमकेव्हीवाय ४.० अंतर्गत महिला व युवकांसाठी एकूण सहा अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत. त्यामध्ये मेकॅनिक हायड्रोलिक ॲण्ड न्यूम्यॅटिक सिस्टीम, योग प्रशिक्षक, सीएनसी ऑपरेटर टर्निंग, सीएनसी ऑपरेटर व्हर्टिकल मशीनिंग सेंटर, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग/शिल्डेड मेटल आर्क वेल्डर, असिस्टंट सर्व्हेअर –कस्टमाईझ्ड कोर्स या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ४० असावी. उमेदवार किमान ८ वी ते १२ वी उत्तीर्ण असावेत. या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक व्यवसायातील प्रवेश क्षमता ३० ते ६० आहे. किमान ३ महिन्याचा हा अभ्यासक्रम असून प्रवेश घेण्यासाठी गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट, आधार कार्डची झेरॉक्स इ. कागदपत्रे तसेच दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी एस.एम. तुपलोंढे (मो. क्र. ९८५०१५१८२५), जे. आय. गवंडी (मो.क्र.८०८७१५०५०५) व सोहेल शेख (मो.क्र.९६३७३९५८३३) यांचेशी संपर्क साधावा. अधिकाधिक उमेदवारांनी या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाचा लाभ घेवून कौशल्य वृद्धी करावी, असे आवाहन संस्थेचे उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.