Home Blog Page 1276

महाराष्ट्राचा भूगोल धोक्यात! नाट्य संमेलनातून राज ठाकरेंचा इशारा

पहिला रायगड जिल्हा बरबाद होणार

मुंबई-जगाचा इतिहास हा भूगोलावर अवलंबून आहे, सर्व वाद हे जमिनीसाठी होतात, महाराष्ट्राचा भूगोल हा धोक्यात आहे, इथल्या जमिनी विकत घेऊन महाराष्ट्राचं अस्तित्व संपवलं जात आहे असं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. याची सुरूवात रायगडपासून होणार असून न्हावा शेवा शिवडी सीलिंकमुळे रायगडचं वाटोळं होणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ते मराठी नाट्य संमेलनामध्ये बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की, जगाचा इतिहास हा भूगोलावर म्हणजे जमिनीवर अवलंबून आहे. आतापर्यंत सर्व आक्रमकांनी जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भूगोल काबिज करण्यासाठी जो संघर्ष आहे त्याला इतिहास म्हटलं जातंय. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे. तो अतिशय हुशारीने विकत घेतला जात आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचं अस्तित्व संपवलं जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राज ठाकरे म्हणाले की, रायगड जिल्हा पहिला बरबाद होणार. बाहेरचे लोक येतात, जमिनी घेतातयत आणि मालक होणार. त्यामुळे रायगडचे लोक इथे नोकर होणार. न्हावा शेवा शिवडी सीलिंकने रायगडचं वाटोळं होणार. या आधी मी पुण्याबद्दल तसं सांगितलं होतं, आता तेच होतंय.

बुलेट ट्रेनची गरज काय हे मला अजूनही कळालं नाही. दोन तासामध्ये मुंबईमधून अहमदाबादला जाण्याने कुणाचा फायदा होणार आहे? त्यासाठी एक लाख कोटी रपये कशाला खर्च करायला पाहिजे? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय समाजाने सर्व ठिकाणी पुढे आले पाहिजे, राजकारण असो वा समाजकारण असो त्यामध्ये मध्यमवर्गाने भाग घेतला पाहिजे. कारण महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली. देशातल्या सर्व विचारांना महाराष्ट्राने जन्म दिला. जातीपाती आणि इतर गोष्टींमध्ये आपण बरबटून जाण्यापेक्षा आपण सुज्ञ झाले पाहीजे असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र एकसंध राहू नये म्हणून सर्वजण प्रयत्न करत आहेत, आज जे काही जातीपातीच्या नावावर सुरू आहे त्यामागे कुणीतरी वेगळेच आहेत असं राज ठाकरे म्हणाले. जसं आमच्या भाषणाला रिटेक नाही, तसं नाटकाला ही रिटेक नसतो. खरं तर हल्ली सकाळी सकाळी बातमी पाहिली की म्हणावं वाटतं की थोडं रिटेक घ्या असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रायगडावरील समाधी मंदिरातील चित्र झळकणार भाजपच्या कार्यालयात

पुणे -आज भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या नूतन कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्नेह मिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रायगडावरील समाधी मंदिरातील चित्र भेट देण्यात आले. खालापूर ( जि. रायगड ) चे पत्रकार राजीव मुळेकर यांनी त्यांच्या कॅमेर्‍यात टिपलेल्या छायाचित्राची फ्रेम भेट देण्यात आली. या प्रसंगी ना. चंद्रकांतदादा पाटील,शहर अध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,भाजप चे प्रदेश प्रवक्ते व महायुती चे शहर समन्वयक संदीप खर्डेकर, आ. भीमराव तापकीर,माजी शहर अध्यक्ष जगदीश मुळीक,
पत्रकार राजीव मुळेकर, त्यांच्या कन्या सौ.सुरूची मुळेकर / कडलासकर, नात सारा मुळेकर,स्पृहा कडलासकर, पुरूषोत्तम खिरे, संगीता खिरे माधुरी मुळेकर, नितिन भावे, उपस्थित होते.
संदीप खर्डेकर यांच्या माध्यमातून कार्यालयासाठी ही भेट देण्यात आली.देवेंद्रजींनी सदर फ्रेम धीरजजींना भेट देऊन कार्यालयात लावण्याच्या सूचना केल्या.

द्वेषाच्या राजकारणाने विनाश अटळ:डॉ.राम पुनीयानी

पुणे :
‘द्वेषाचे राजकारण नाशाकडे नेते, पाकिस्तान हे त्याचे उदाहरण आपल्या जवळचे आहे,हे विसरता कामा नये. त्यामुळे विविधतेत एकता मानणाऱ्या भारताला द्वेषाच्या मार्गाने नाशाकडे नेण्याचे प्रयत्न यशस्वी होवू देता कामा नयेत.  प्रेम, सद्भावना वाढवणाऱ्या कार्यक्रमांना पाठिंबा दिला पाहिजे ‘, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. राम पुनियानी यांनी रविवारी  केले.

विचारवेध असोसिएशन, युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या वतीने आयोजित विचारवेध संमेलनातील दुसऱ्या दिवशीच्या सत्रांना ७ जानेवारी रोजी   सकाळी गांधी भवन येथे प्रारंभ झाला. यावेळी डॉ. राम पुनियानी बोलत होते.
डॉ. पुनियानी म्हणाले, ‘आधीच्या लढाया टोळ्यांमधील,राजा राजांमधील, सत्तांमधील असायच्या. तरीही आज तो इतिहास बदलताना  त्यांना हिंदू- मुस्लीम लढायांचे रुप दिले जात आहे. भाजप सत्तेवर आल्यावर हे प्रयत्न वाढले.या लढायांकडे धर्माच्या चष्म्यातून पाहिले जात आहे. द्वेष वाढविण्यासाठी हा प्रचार वाढविला जात आहे.भारतीय संस्कृती ही बंधूभाव, सद्भाव मानणारी ‘ मिली जुली ‘ अशी संस्कृती आहे.भारतीय आणि भारताबाहेरील पदार्थांचा मिलाफ झालेला आहे. अनेक शब्द, पेहराव इथे स्वीकारले आहेत.हिंदी सिनेमातील सुंदर भजने लिहिणाऱ्या , गाणाऱ्या नावात मुस्लीम गायक, कलाकार आहेत.त्यांना आपण भारतीय म्हणूनच ओळखतो’. 

 ‘ धर्माच्या नावावर द्वेष वाढविला जात आहे. संघाच्या शाखेपासून सोशल मीडियापर्यंत जाणीवपूर्वक या गोष्टी होत आहेत. प्रत्यक्षात भारत हा विविधतेत आनंद मानणारा देश आहे. भारतात बाहेरुन विविध लोक येत राहिले आहेत.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हिंदू मुस्लिम आणि सर्व जण एकत्रित लढत होते. धर्माच्या नावावर लढणारे मात्र स्वातंत्र्य लढ्यात नव्हते. आपण मिळवलेले स्वातंत्र्य आपल्याला जपायचे आहे. म्हणून,इथुन पुढे संवैधानिक मूल्य रक्षणासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत’,असेही डॉ. राम पुनियानी म्हणाले,
*मारहाणीच्या प्रयत्नांना प्रभावी उत्तर द्या : निरंजन टकले*

निरंजन टकले म्हणाले, ‘ संघापासून लोकशाहीला धोका आहे. बनारस हिंदू विद्यापिठातील विद्यार्थ्यानी केलेला सामूहिक बलात्कार हा राजकीय हत्यार म्हणून केलेला बलात्कार आहे. त्यामागे बलात्कार हे हत्यार म्हणून वापरण्याचे सावरकरांचे विचार आहेत.सावरकरांचे जाणीवपूर्वक उदात्तीकरण केले जात आहे. संवेदनशीलता संपवली जात आहे’.
‘पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण होते. पोलिसांची गाडी कायमस्वरूपी ठेवली जाते. हे विद्यापीठ आहे की दगडी चाळ ? असा प्रश्न टकले यांनी विचारला.आजच्या कालानुरुप आणि कल्पक आंदोलने केली पाहिजे. मारहाणीच्या प्रयत्नाना प्रभावी उत्तर दिले पाहिजे. कारण आपण गांधीजींचे वारस आहोत, तसेच भगतसिंग यांचेही वारस आहोत.युरोप, कॅनडात खून करण्याचे प्रयत्न होत असतील, तर भारतात खूनाचे प्रयत्न झाले नसतील का ? या मुद्यावर पुन्हा न्या.लोया यांच्या संशयास्पद मृत्यूकडे पाहिले पाहिजे’,असेही ते म्हणाले. 
*’सावित्रीच्या लेकी ‘ पुरस्कार*
या संमेलनात भारत जोडो आंदोलनाच्या वतीने निरंजन टकले यांच्या हस्ते  ‘सावित्रीच्या लेकी ‘ पुरस्कार मंगला पाटील, अरुंधती गडाळे, प्रतिभा भोसले, त्रिवेणी गव्हाळे यांना देण्यात आला.यावेळी आनंद करंदीकर,हरीश सदानी उपस्थित होते. 
*दोन दिवस विचारांचा वेध आणि  वेधक विचार*……………………
‘लोकशाहीच्या संरक्षणासाठी लोकांचा जाहीरनामा ‘ ही या संमेलनाची संकल्पना असून विविध आंदोलनातील कार्यकर्ते तसेच विचारवंत सहभागी झाले .यावर्षी लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना पुरेशा माहितीवर आधारित, विचारपूर्वक आणि निर्भय मतदान करता येणे ,हे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवश्यक आहे. लोकशाही रक्षणाच्या तातडीच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी हे विचारवेध संमेलन आयोजित करण्यात आले . ६ जानेवारी रोजी पहिल्या दिवशी योगेंद्र यादव, तुषार गांधी आदींनी तर डॉ. राम पुनियानी, डॉ.कुमार सप्तर्षी, निरंजन टकले, हरीष सदानी, सुनीती सु.र., अजित रानडे, संदीप बर्वे आणि अन्य मान्यवरांनी दुसऱ्या दिवशी   विविध सत्रात मार्गदर्शन केले. 

रविवार, ७ जानेवारी या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सव्वादहा वाजता समूहगीतांनी प्रारंभ झाला. साडेदहा वाजता ‘सद्भावना मिशन’ या विषयावर डॉ.राम पुनियानी यांनी मार्गदर्शन केले. ‘लोकशाही रक्षण’ या विषयावर निरंजन टकले यांचे व्याख्यान झाले. १२ वाजता ‘स्त्रीवादाच्या संदर्भांत लैंगिक हक्क संरक्षण’ या विषयावर हरीश सदानी यांनी संवाद साधला. पाऊण वाजता ‘संविधान प्रचार चळवळीचा अनुभव’ विषयाची माहिती संदीप बर्वे यांनी  दिली. दुपारी सव्वा दोन वाजता ‘स्थानिक स्वराज्य संस्थातील महिला प्रतिनिधींचे सक्षमीकरण’ या विषयावर भीम रासकर यांनी  माहिती दिली. पावणे तीन वाजता याच विषयवार नीती दिवाण हिंदीतून माहिती दिली. सायंकाळी ४ वाजता ‘लोकशाही बळकटीकरणासाठी सामाजिक सलोखा’ या विषयावर अजित रानडे  यांचे व्याख्यान झाले. सव्वा पाच वाजता ‘लोकशाही रक्षणाच्या लढ्याची दिशा’ विषयावर डॉ.कुमार सप्तर्षी यांनी  मार्गदर्शन केले. सहा वाजता सरिता आवाड यांनी संमेलनाचा समारोप केला. 

अन् नाट्य संमेलनात रंगली काव्य पहाट

पिंपरी, पुणे (दि ७ जानेवारी २०२४) पहाटेची गुलाबी थंडी, दर्दी रसिक श्रोते अन् स्वयंस्फूर्तीने आलेल्या काव्याने आज १०० व्या नाट्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीची पहाट संस्मरणीय ठरली.
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात रविवारी ग. दि. माडगूळकर सभागृहाच्या प्रागंणात “..आणि कविता – काव्य पहाट” हा कार्यक्रम रंगला. नाट्य संमेलनात प्रथमच काव्य पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गीतकार वैभव जोशी आणि कवी संदीप खरे यांनी हा बहारदार कार्यक्रम सादर केला. यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल उपस्थित होते.
पहाटेच्या वेळी उद्योग नगरीत रंगलेल्या या काव्य पहाटने सांस्कृतिक वातावरण निर्मिती झाली. सकाळच्या वेळी जसजसा कार्यक्रम रंगत गेला तसा गीतकार वैभव जोशी आणि कवी संदीप खरे यांनी सादर केलेल्या कवितांची रंगत आणखी वाढत गेली. यावेळी संदीप खरे यांनी सादर केलेल्या ‘गगन जाई ..’ या कवितांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, नाट्य संमेलनाच्या १०० वर्षात काव्य पहाट झालेली नाही. आज १०० व्या वर्षी हे पहिल्यांदाच घडत आहे. आपली काव्य परंपरा खूप मोठी आहे. संत कवी, दंत कवी, पंथ कवी ते अगदी कुसूमाग्रजांपासून आधुनिक कवीं पर्यंत ती आहे. अशी रत्न आपल्या महाराष्ट्र भूमीत जन्मल्याने ही काव्य परंपरा जीवंत आहे.

भारतीय स्वातंत्र्यसमरासह उलगडला गणेशोत्सवाचा इतिहास व उद्देश

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टतर्फे जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात ; यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान

पुणे : गणेशोत्सवाचा खरा उद्देश… लोकमान्य टिळकांसह इतर समाजसुधारकांनी विविध मार्गांनी लोकजागृती करुन दिलेला स्वातंत्र्यलढा…कोळी गीतांसह भारताच्या विविध प्रांतातील संस्कृती नृत्य-नाटयाच्या माध्यमातून पुणेकरांसमोर विविधांगी कला सादर झाल्या. जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक, ऐतिहासिक गीतांवर सादर केलेल्या कलाकृतींना भरभरुन दाद मिळाली. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुकही यावेळी करण्यात आले.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे. टिळक स्मारक मंदिर आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ.ल.देशमुख, डॉ. संजीव डोळे, डॉ.भरत देसाई, चंद्रकांत निनाळे, प्राणंद कुलकर्णी, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, मंगेश सूर्यवंशी, माऊली रासने, राजाभाऊ पायमोडे, विजय भालेराव, विजय चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी योजनेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच योजनेतील विद्यार्थी असलेला व आता सीआरपीएफ मध्ये सब इन्स्प्रेक्टर झालेल्या स्वप्नील कांबळे याला गौरविण्यात आले.

स्वप्नील कांबळे म्हणाला, माझ्या यशामध्ये मोठा वाटा दगडूशेठ गणपती ट्रस्टचा आहे. माझ्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. माझे वडिल भवानी पेठेत चप्पल शिवण्याचे काम करतात. मी ट्रस्टच्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करु लागलो आणि माझे आयुष्य बदलले. अभ्यासिकेमध्ये मिळालेले प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे मी हे यश मिळविले असल्याचे त्याने सांगितले.

डॉ.अ.ल.देशमुख म्हणाले, माणसाला घडविण्याचे काम जय गणेश पालकत्व योजना करीत आहे. या योजनेद्वारे आजची पिढी चांगला माणूस म्हणून घडताना दिसत आहे. समाजाला आज उत्तम नागरिकांची गरज आहे. त्याकरिता आजच्या पिढीवर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व वैद्यकीय संस्कार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक अविष्कारांचे सादरीकरण 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय : ५ व्या जाधवर सायन्स फेस्टिव्हलचे आयोजन
पुणे : वेस्ट टू वेल्थ, झिरो गारबेज सिस्टिम, इलेक्ट्रिसिटी जनरेशन यांसह डिझास्टर मॅनेजमेंट, पर्यावरणाच्या समस्या व उपाय, टेक्नॉलॉजी इन बायो मेडिकल एरिया, रोबोटिक्स अशा विविध विषयांवर ५ व्या जाधवर सायन्स फेस्टिव्हलमध्ये शालेय व महाविद्यालयीने विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक अविष्कारांचे सादरीकरण केले. सायन्स सोसायटी आणि टेक्नॉलॉजी या मुख्य संकल्पनेंंतर्गत आयोजित विज्ञान महोत्सवात राज्यभरातून विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 
प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंग विज्ञान विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहयोगाने ‘पाचव्या जाधवर सायन्स फेस्टिव्हल’ या राज्यस्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन न-हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. अतर सिंग पिपल, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते.  
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला. महोत्सवामधील स्पर्धा शालेय (इयत्ता ८ वी ते १० वी) , कनिष्ठ (इयत्ता ११ वी व १२ वी), वरिष्ठ महाविद्यालय  (पदविका शिक्षण) आणि पदव्युत्तर व खुल्या अशा चार गटात पार पडली. विद्यार्थ्यांनी पॉल्युशन कंट्रोल, फ्री एनर्जी जनरेशन,  इनोव्हेशन स्किल इन हेल्थ, विशेष व्यक्तींसाठी तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी इन इंडस्ट्री अशा विविध संकल्पनांवर प्रकल्पाचे सादरीकरण केले. 
अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, ‘जाधवर सायन्स फेस्टिवल’ मध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळाले. विज्ञान विषयाची विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविण्यात येतात. स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशस्तीपत्रक देण्यात येणार असून विजेत्यांना एकूण १ लाख रुपयांची पारितोषिके व ट्रॉफी देण्यात आहे. 
ते पुढे म्हणाले, भारताबाहेरील इतर देशांमध्ये संशोधन करुन पेटंट मिळविण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतामध्ये संशोधन व पेटंटचे प्रमाण कमी असून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटने अभिनव योजना सुरु केली आहे. इन्स्टिटयूटमधील संशोधन करणा-या विद्यार्थ्याला विनातारण १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची गोडी निर्माण होत अधिकाधिक संशोधनास युवावर्ग प्रवृत्त होईल, असेही त्यांनी सांगितले.

‘एमटीएचएल’पाठोपाठ जानेवारीअखेर कोस्टल रोडचा पहिला टप्पा खुला होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई, दि. ७ : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणाऱ्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांची भेट नव्या वर्षात मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि कोस्टल रोड या दोन्ही प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. एमटीएचएलपाठोपाठ कोस्टल रोडचा पहिला टप्पा जानेवारी महिन्याच्या अखेरीस खुला होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबई डीप क्लीन मोहिमेत मुख्यमंत्री सहभागी झाले. सकाळपासून चर्नी रोड, मरीन ड्राईव्ह, नरिमन पॉईंट याठिकाणी ही मोहीम राबवतानाच मुख्यमंत्र्यांनी त्याचा विस्तार वाढवत एमटीएचएल आणि रायगड जिल्ह्यातील चिर्ले येथेही स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला.

सकाळी सुमारे साडेआठच्या सुमारास सुरू झालेली ही मोहीम दुपारी दीडपर्यंत सुरू होती. नेपियन्सी रोडवरील प्रियदर्शनी पार्कजवळील कोस्टल रोडच्या जुळ्या भूमिगत बोगद्यापासून मुख्यमंत्र्यांनी मोहिमेला सुरूवात केली. वरळीकडून मुंबईकडे जाणाऱ्या या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून जानेवारी महिन्याच्या अखेरीस तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

कोस्टल रोड बोगद्यात देशात प्रथमच सकार्डो प्रणाली

भारतात प्रथमच सकार्डो ही अत्याधुनिक वायूविजन प्रणाली बोगद्यात बसविण्यात आली आहे. त्यामुळे बोगद्यात धूर न साठता तो बाहेर फेकण्याचे काम या प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. या बोगद्यात आपत्कालीन उपाययोजना म्हणून प्रत्येक ३०० मीटरवर छेद बोगद्यांची व्यवस्था असून उपयोगिता सेवेसाठी बोगद्यामध्ये युटिलिटी बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. या दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या बोगद्याची पाहणी करत त्यातून गिरगाव चौपाटीपर्यंत प्रवास केला.

कोस्टल रोड बोगद्याचा दुसरा टप्पा मे अखेरीस

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील बोगद्याचे काम झाले असून दुसऱ्या टप्प्यातील बोगदा मे अखेरपर्यंत पूर्ण होईल. या बोगद्याचा आकार देशातील सर्वात मोठा असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. कोस्टल रोडवर टोल नाही असे सांगत मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणारा हा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

१०० टॅंकर्सच्या वापराने एमटीएचएलवर स्वच्छता मोहीम

मरीन ड्राईव्ह भागातील स्वच्छता मोहीम आटोपून मुख्यमंत्री श्री. शिंदे एमटीएचएलकडे रवाना झाले. तेथे सुमारे १०० टॅंकर्सचा वापर करून रस्ता धुतला जात आहे. या भागात ग्रीन पॅच तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. २२ किमी लांबीचा देशातील पहिला सागरी सेतू असून त्यामुळे मुंबई शहर नवी मुंबई, गोवा, पुणे यांना कनेक्ट होणार आहे. राज्याचा सर्वांत महत्वाकांक्षी आणि गेमचेंजर प्रकल्प असल्याचे सांगत यामुळे इंधन आणि वेळेची बचत होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे रायगड आज दोन तासांहून अधिक वेळ लागतो. आता मुंबईतून चिर्लेपर्यंत १५ मिनिटात पोहोचणे या प्रकल्पामुळे शक्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चिर्ले येथून मुंबई पुणे आणि त्याचबरोबर गोव्यालादेखील हा सागरी सेतू कनेक्ट करणार आहे. त्याचबरोबर वसई विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरीडॉरला कनेक्ट करेल.

अटल सेतू पर्यावरणपूरक प्रकल्प

एमटीएचएल अटल सेतूचा फायदा लाखो लोकांना होणार असून १२ जानेवारीला त्याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा सागरी सेतू करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. त्यामध्ये स्टील डेक वापरले त्यामुळे जास्तीची वहन क्षमता निर्माण झाली आहे. हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे त्यामुळे इथले फ्लेमिंगो जाऊ नये म्हणून काम करत असताना नॉईज बॅरिअरचा वापर करण्यात आला आहे. तसेच रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिल आणि टेम्पररी इम्बाक्टमेंट या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

चार हावडा ब्रीज होतील, सहा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी होतील एवढे स्टील वापरण्यात आले आहे. पृथ्वीला दोन वेळा प्रदक्षिणा होतील एवढ्या वायर्स ह्या प्रकल्पात वापरल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईकरांसाठी एमटीएचएल आणि कोस्टल रोड हे दोन्ही गेमचेंजर असून ह्या नवीन वर्षात दोन्ही प्रकल्प सामान्यांना खुले करून त्यांना नव्या वर्षाची भेट मिळणार आहे.

समाजवादी विचारसरणी व जनतेच्या  प्रश्नांवर आधारित कार्यक्रम इंडिया आघाडीला विजयी करु शकेल : परिषदेतील सूर

पुणे :
 ‘देशातील लोकशाही व संविधान यांचे संरक्षण करण्यासाठी समाजवादी विचारसरणीच्या आधारेच जनतेसमोर जावे लागेल. याबरोबरच वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, दलित व अल्पसंख्याकांवरील अत्याचार, शेतकऱ्यांचा आक्रोश अशा सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आधारित कार्यक्रम या आधारेच इंडिया आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तापालट करु शकेल’, असा सूर समाजवादी विचारवंत व कार्यकर्ते यांच्या पुणे येथील साने गुरुजी स्मारक भवन येथे झालेल्या राज्यस्तरीय व्यापक परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
‘ इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख घटक पक्षांनी संतुलित भूमिका घ्यावी’ असे आवाहनही करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व माजी आमदार डॉ.कुमार सप्तर्षि, राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष  सुभाष वारे, विद्यमान अध्यक्ष सुभाष लोमटे, एडव्होकेट राम शरमाळे इ. मान्यवरांनी मार्गदर्शन केले.  पन्नालाल सुराणा यांनी समक्ष येता न आल्यामुळे संदेश व शुभेच्छा दिल्या.
 देशाला पुरोगामी विचार महाराष्ट्राने दिला असून समाजवादाची पाळेमुळे महाराष्ट्रात खोलवर रुजलेली असून समाजवादाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचला, तर महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट मत डॉ .कुमार सप्तर्षी यांनी या परिषदेमध्ये व्यक्त केले. आज देशात लोकशाही संपुष्टात आले असून अघोषित आणीबाणी केंद्र सरकारने लादलेली आहे. त्यामुळे भाजपा सरकारला सतेतून बाहेर काढणे हा एकमेव उद्देश समोर ठेवून येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व समाजवादी कार्यकर्त्यांनी झोकुन कामाला लागावे असेही आवाहन डॉ .कुमार सप्तर्षी यांनी केले.
महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला समाजवादी विचाराची गरज असून समाजवादी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पंचायत पासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये सक्रिय राहून लोकशाहीचा खून करणाऱ्या भाजपा सरकारला सत्तेबाहेर काढण्यासाठी जीवाचे रान करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. सुभाष वारे यांनी केले. देशाची घटना सुरक्षित ठेवणे हे देशातील सर्व सामाजिक संघटना, सामाजिक विचारवंत व समाजवादी पक्षाची जबाबदारी असल्याचे स्पष्ट मत यावेळी बोलताना राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष सुभाष लोमटे यांनी व्यक्त केले.
 महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनासाठी समाजवादी पार्टी संपूर्ण शक्तीनिशी तयार असून येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला सतेतून बाहेर काढण्यासाठी सर्व कार्यकत्यांनी जीवाचे रान करावे असे आवाहन समाजवादी पार्टीचे कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी केले आहे.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष डॉ पी. डी. पाटोदेकर यांनी तर आभार प्रदर्शन समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते अॅड रेवण भोसले यांनी केले.
 या कार्यक्रमामध्ये प्रा. शरद जावडेकर, विठ्ठल सातव, शिवाजीराव परुळेकर, अनिस अहमद, राहुल गायकवाड, प्रताप देसाई, विनायक लांबे, वाल्मीक घाडगे, कुमार राऊत, जितेंद्र सतपाळकर, प्रशांत दांडेकर, अशोक गायकवाड, उषा कांबळे, दत्ता पाकीरे, साधना शिंदे, प्रशांत दांडेकर इ. प्रमुखांनी चर्चेत भाग घेतला. या परिषदेस राज्याच्या विविध भागातील समाजवादी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन-तंत्रज्ञानाचे गुलाम होऊ नका, त्याचा फायदा करून घ्या : परिसंवादात उमटला सुर

पिंपरी, पुणे (दि. ७ जानेवारी २०२४) ऑनलाईन एन्टरटेन्मेंट’ आणि ‘चॅट जीपीटी’ हे रंगभूमीसाठी पर्याय ठरू शकत नाही. रंगभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलीजन्स – एआय) पेक्षा भावनिक नातेसंबंध (इमोशनल इंटेलीजन्स) महत्वाचा असतो. त्यामुळे या तंत्रज्ञानाला घाबरण्यापेक्षा ते तंत्रज्ञान समजून घ्या.
ए. आय. चे गुलाम होऊ नका, त्याचा फायदा करून घ्यावा. त्याचा आपल्या लेखनासाठी फायदा कसा करून घ्यायचा हे लेखकांनी समजून घ्यावे. त्यामुळे ‘ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि ‘चॅट जीपीटी’चे धोके जरी असले तरी ते समजून घेऊन त्याचा उपयोग करून घ्यावा, असा सूर रविवारी शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात आयोजित केलेल्या परिसंवादात उमटला.
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात रविवारी ”ऑनलाईन एन्टरटेन्मेंट” आणि ‘चॅट जीपीटी’ चा रंगभूमीवर परिणाम होतोय का?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता या परिसंवादात अभिनेते सुनील बर्वे, ज्येष्ठ नाटककार विजय केंकरे, लेखक नीरज शिरवईकर सहभागी झाले होते, त्यांच्याशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहक अजित भुरे यांनी संवाद साधला. यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष किरण येवलेकर, तळेगाव शाखेचे सुरेश धोत्रे, जयराज काळे आदि मान्यवर उपस्थित होते.
या परिसंवादात बोलताना नाटककार विजय केंकरे म्हणाले, ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि ‘चॅट जीपीटी’ मुळे क्षणिक काळाचे नाटकार, लेखक तयार होतील अशी भीती आहे. कोरोना काळात चॅट जीपीटी किंवा ए. आय. चा उपयोग झाला असला तरी आता असे लेखक फार काळ टिकणार नाही. कारण हे तंत्रज्ञान ढोबळ स्वरूपाचे आहे. लेखकाच्या सृजनशीलतेला पर्याय नाही. शिवाय रंगभूमीवर होणारे प्रयोग हे केवळ नाटककारच करू शकतात चॅट जीपीटी किंवा ए. आय. ते लिहू शकत नाही. असे प्रयोग झाले तरी ते टिकणार नाहीत. नाटक आणि सिनेमा ही टिकाऊ गोष्ट आहे ही जाणीव लेखकाला असेल तर चॅट जीपीटी किंवा ए. आय. हा धोका होऊ शकत नाही.
सुनील बर्वे म्हणाले, कोरोना काळात आम्ही कलाकारांनी मिळून ऑनलाईन ड्रामा कॉम्पिटिशन सुरू केली होती. कलाकार निराशेच्या गर्तर्तेत जाऊ नये, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी ही स्पर्धा आम्ही घेतली होती. पण कोरोना नंतर प्रेक्षक नाट्यगृहात परत आले. ऑनलाईन हे माध्यम मर्यादीत आहे. रंगभूमीवर आर्टिफिशियल इंटीलीजन्स पेक्षा इमोशनल इंटीलीजन्सला जास्त महत्व आहे.
लेखक नीरज शिरवईकर म्हणाले, चॅट जीपीटी किंवा ए. आय.चा वापर मी केलेला आहे. ते एक साचेबद्ध माध्यम आहे. त्यात कोणत्याही प्रकारच्या भावना नसतात. त्यामुळे चांगल्या लेखकांनी याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घ्याव्या. हे तंत्रज्ञान कसं वापरायचं हे कळालं तर लेखकांना यांची मदतच होईल.

मंत्री, आमदार, खासदार कधी लोकांवर लाठीचार्ज करायला सांगतात, कधी पोलीसांच्या कानशीलात लगावतात-युपी बिहार हून राज्याची अवस्था वाईट

कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सत्ताधारी महाराष्ट्राचा बिहार करणार आहे का? असा सवाल मी विचारला होता. हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघाले, अशी जहरी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत राज्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आहे.

जयंत पाटील यांनी म्हटले आहे की. “यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, पंजाबराव देशमुख आणि अनेक मोठ्या नेतृत्वाचा आदर्श या महाराष्ट्राला आहे. या नेत्यांनी कधी आपली पातळी खाली जाऊ दिली नाही. मात्र आज सत्तेत सामील असलेले मंत्री, आमदार, खासदार कधी सामान्य माणसांवर लाठीचार्ज करायला सांगतात, कधी पोलिस बांधवांच्या कानशीलात लगावतात तर कधी एकमेकांचा पाणउतरा करतात. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पार धिंडवडे काढले जात आहेत. हे महाराष्ट्र बघतोय ! जाहीर निषेध”, असे म्हणत जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तार यांनी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते. यावेळी त्यांनी शिवीगाळही केली होती. त्यानंतर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पुणे येथील कार्यक्रमात पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावली होती. हे प्रकरण शांत होत नाही तोच काल मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटलांची एका बैठकीतच एकमेकांना शिवीगाळ करणारा ऑडियो व्हायरल झाला. यावरूनच सध्या विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सिल्लोडमध्ये बुधवारी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी सत्तार यांनी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते. तर अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात बैठकीतच वाद झाला आणि दोघांनी अश्लील भाषेत एकमेकांना सुनावल्याचे पाहायला मिळाले. याची ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावरूनच जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

बाप हा बाप असतो , बाप कधी रिटायर होत नसतो:जितेंद्र आव्हाड यांचे अजितदादांना प्रत्युत्तर

मुंबई-वय झाल्यानंतर थांबायचे असते,पण काही जण ऐकत नाही, 84 वय झाले तरी काहीजण निवृत्त होत नाहीत, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या या टीकेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले आहे. बापाला रिटायर करायच नसते..बाप हा बाप असतो , बाप कधी रिटायर होत नसतो असा टोला जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना लगावला आहे.

दरम्यान पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, बापाला रिटायर करायचे नसते. बाप हा बाप असतो , बाप कधी रिटायर होत नसतो. बाप कुटुंबातील ऊर्जा स्रोत आहे.

प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, असे वादग्रस्त वक्तव्य करून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रोष ओढावून घेतला. त्यातच आता आव्हाड यांनी We Are Back असे सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू केले आहे. मात्र, संघर्ष प्रेजेन्ट्स माध्यमातून ठाणे फेस्टिव्हल 2024 असे ही म्हटले आहे. संघर्ष ही Jitendra Awhad यांची ओळख असून ती एक त्यांची सामाजिक संस्थाही आहे. त्यातच आव्हाडांनी We Are Back म्हटल्याने नेमके हा कार्यक्रम कधी असणार आहे. त्यामध्ये ते श्रीराम हे मांसाहारी असल्याचे पुरावे तर घेऊन येणार नाही ना?. तर ठाणे फेस्टिव्हलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी असल्याने यामध्ये यावेळी ‘गीतरामायण’ हा संगीतमय कार्यक्रम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवारांचे वक्तव्य काय?

सरकारी नोकरीत 58व्या वर्षी निवृत्ती आहे. केंद्र सरकारच्या नोकरीत 60व्या वर्षी निवृत्ती होते. राजकारणातही निवृत्तीला काही ठरावितक वय आहे. मात्र, काही जण 84 वर्ष वय पूर्ण झाले तरी, काही जण थांबायला तयार नाहीत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा टोला लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणाजेच ठाण्यात अजित पवार गटाचा मेळावा पार पडत आहे. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर वयावरून पुन्हा एकदा शरद पवारांवर नाव न घेता टीका केली आहे. वय 84 झाले तरी काही जण रिटायर्ड होत नाहीत, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. वय झाले की थांबायचे असते पण काही जण अती करतात, असे त्यांनी म्हटले आहे.

वय 84 झाले तरी थांबायला तयार नाहीत:उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुन्हा शरद पवार यांना टोला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले कौतुक

मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणाजेच ठाण्यात अजित पवार गटाचा मेळावा पार पडत आहे. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर वयावरून पुन्हा एकदा शरद पवारांवर नाव न घेता टीका केली आहे. वय 84 झाले तरी काही जण रिटायर्ड होत नाहीत, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. वय झाले की थांबायचे असते पण काही जण अती करतात, असे त्यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पवार म्हणाले की, वय झाले की, थांबायचे असते. पण काही जण हट्टीपणा करतात. कुठे तरी थांबा, आम्ही कामे करायला समर्थ आहोत. कोरोनाच्या काळात काही जणांनी मला सल्ला दिला की, मंत्रालयात जाऊ नका, कोरोना होईल, पण मेलो तरी चालेल तरी, लोकांची कामे करत राहणार, असा निर्धार करून मी रोज सकाळी 8 वाजता मंत्रालयात जात होतो, असे पवारांनी म्हटले आहे.

अ. भा. नाट्य संमेलना व्यतिरिक्त सुद्धा बाल नाट्य नगरी झाली पाहिजे – अभिनेत्री निलम शिर्के-सामंत

पिंपरी, पुणे (दि. ६ जानेवारी २०२४) शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात स्वतंत्र बाल नाट्य नगरी  करण्यात आली ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. नाट्य चळवळीला गती देण्यासाठी आणि बालकांना चालना देण्यासाठी नाट्य परिषदेने दरवर्षी संमेलना व्यतिरिक्त सुद्धा बाल नाट्य नगरी भरवली पाहिजे असे मत अभिनेत्री निलम शिर्के – सामंत यांनी व्यक्त केले.  
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात यंदा पहिल्यांदाच बालनगरी ही वेगळी बालरंगभूमी तयार करण्यात आली आहे. या बालनगरीचे उद्घाटन शनिवारी अभिनेत्री निलम शिर्के – सामंत आणि सविता मालपेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आदि उपस्थित होते.
यावेळी भाऊसाहेब भोईर म्हणाले, कला क्षेत्राने मला खूप आधार दिला, माझ्या जगण्याला नवी दिशा दिली आहे. १०० वे नाटय संमेलन ही माझ्या २७ वर्षापासून सुरू असलेल्या वाटचालीची फलनिष्पत्ती आहे असे मला वाटते. नाटय संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाल नाटय नगरी साकारण्यात आली आहे. शहरातील पालकांनी आपल्या मुलांना रविवारीही इथे घेऊन यावे कारण नाटक हे संस्कार घडवणारे माध्यम आहे.
या बालनगरीत शनिवारी गजरा नाट्य छटांचा, क्लाउन माईम ‌ॲक्ट आणि  व्यावसायिक बालनाट्य – बोक्या सातवंडे यांचे सादरीकरण झाले. तर रविवारी  माझी माय -( सकाळी ९:०० ते ९:४५) ढब्बू ढोल रिमोट गोल (सकाळी १० ते १२), पपेट शो – पपेटरी हाऊस मुंबई (दु. १२. १५ ते १२. ४५) गोष्ट रंग (दु. २ ते २.४५ ), गोष्ट सिम्पल पिल्लाची – ग्रीपस थिएटर (सायं ३:३० ते ४:००), बालगीते – ( सायं ५ ते ६) हे कार्यक्रम होणार आहेत.

एकांकिका, व्यावसायिक नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, पुणे (दि.६ जानेवारी २०२४) शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची आज पिंपरी चिंचवड शहरात जोरदार सुरुवात झाली. नाट्य संमेलना निमित्त शहरात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये एकांकिका, व्यावसायिक नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. नाट्य संमेलनाच्या या सर्व कार्यक्रमांना मुख्य मंडपासह शहरातील अन्य नाट्यगृहातील कार्यक्रमांनाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक, सुनील गोडबोले, विजय पटवर्धन, अमोल बावडेकर यांच्या हस्ते रंगमंच पूजन झाले. या नंतर फिरोज मुजावर यांनी गणेश वंदना सादर केली. ऋतूजा  फुलकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. नंतर पु. ल. देशपांडे लिखित आणि भाऊसाहेब भोईर निर्मित ‘तुज आहे तुजपाशी’ या व्यावसायिक नाटकाचा  प्रयोग रंगला, त्याला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे अभिनेते डॉ. संजीवकुमार पाटील आणि नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य किरण येवलेकर यांच्या हस्ते रंगमंच पूजन करण्यात आले. यानंतर प्रायोगिक नाटक पुनरुत्थान याचे सादरीकरण करण्यात आले, यास रसिकांनी मोठी गर्दी केली होती. त्या नंतर अभिनेते प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या व्यावसायिक नाटकाला हाऊस फुल्ल चा बोर्ड लागला. 
भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके आणि सुहास जोशी यांच्या हस्ते रंगमंच पूजन करण्यात आले. यानंतर गणेश वंदना सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत यचकल आणि स्मिता कुलकर्णी यांनी केले. अभिनेता भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांचे मालवणी भाषेतील व्यावसायिक विनोदी नाटक ‘करून गेलो गाव’  या नाटकाचा प्रयोग रंगला. यालाही रसिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
ग. दि. माडगूळकर नाट्यगृह मुख्य रंगमंच येथे आमदार उमा खापरे यांच्या हस्ते रंगमंच पूजन करण्यात आले. यानंतर ‘जोडी तुझी माझी’ या नाटकाचा प्रयोग झाला. यानंतर झालेल्या मराठी, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग. दि. माडगूळकर नाट्यगृहाच्या रंगमंच २ येथे दिवसभर विविध एकांकिका सादर करण्यात आल्या त्या पाहण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली.
नाटय संमेलनात सादर होणारी विविध कार्यक्रमांना शहरवासीयांच्या कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासाठी नाटय संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी सर्व नाट्यगृहाला भेटी दिल्या. यावेळी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते.

‘नांदी’ स्मरणिकेतून १०० वर्षातील नाट्य संमेलन अध्यक्षांच्या कारकीर्दीला मिळाला उजाळा

पिंपरी, पुणे (दि.६ जानेवारी २०२४) १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे शनिवारी चिंचवड, श्री मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे
दिमाखदार सोहळ्यात उद्धघाटन झाले. या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने एक वैशिष्ट्यपूर्ण स्मरणिका तयार करण्यात आली आहे. १०० व्या नाट्य संमेलनाचे औचित्य साधून या स्मरणिकेत आजवर झालेल्या १०० नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि त्यांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला आहे. ‘नांदी’ असे या स्मरणिकेला नाव देण्यात आले असून १०० व्या नाट्य संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी याचे अनावरण करण्यात आले.    
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्ष अध्यक्ष शरद पवार, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, उद्योगमंत्री उदय सामंत,१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाटय संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर,अभिनेते मोहन जोशी, अशोक हांडे, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे , कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल,
खासदार श्रीरंग बारणे, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, आ. उमा खापरे, अण्णा बनसोडे, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.
स्मरणिके विषयी बोलताना नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य सुहास जोशी यांनी ही स्मरणिका ३० दिवसांपेक्षाही कमी दिवसात पूर्ण केली आहे. या स्मरणिकेत १०० नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि त्यांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यात आला आहे. या सर्व नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या फोटोंचा देखील यामध्ये समावेश आहे. एका नाट्य रसिकाकडे १९६६ पासून नाटकाच्या तिकिटाचा संग्रह आहे. त्या नाटकाच्या तिकिटांचे कोलाज देखील आहे. तसेच पंडित नंदकिशोर कपोते यांचा ‘नाटकातील नृत्याचे महत्व’ या विषयांवरील लेख, त्याच प्रमाणे लावणी सांम्राज्ञी संजीवनी मुळे – नगरकर यांचा ‘नाटकातील लोक कलेच महत्व’ असे लेख आहेत. राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, पद्मश्री गिरीष प्रभूणे, पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त शेखर सिंह आयुक्त, नाटकार, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांचेही लेख ‘नांदी’ मध्ये आहेत. याशिवाय मधु जोशी यांचा सांस्कृतिक मागोवा हा लेख, संगीत रंगभूमीच्या अभ्यासक डॉ. वंदना घांगुर्डे यांचा ‘संगीत रंगभूमी व मराठी नाटक’ हा लेख आहे. गेली ६२ वर्ष राज्यात महाराष्ट्र शासनाची राज्य नाट्य स्पर्धा सुरू आहे. यावर प्रकाश टाकणारा एक लेख पि. डी. कुलकर्णी यांचा आहे. तसेच ‘गाढवाचं लग्न’ फेम वसंत अवसरिकर यांचा लेख आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेच्या वाटचालीचा देखील लेख यामध्ये आहे. मुखपृष्ट प्रसिद्ध नैपथ्यकार प्रदीप मुळे यांनी तयार केले आहे. १०० वे नाट्य संमेलन असल्याने तंजावरमध्ये झालेल्या पहिल्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांपासून आज पर्यंतच्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांपर्यंतचा इतिहास व नाट्य संमेलनाचा प्रवास यामध्ये आहे. ही स्मरणिका स्मरणात राहणारी आणि संग्रही ठेवणारी झाली आहे.