पिंपरी, पुणे (दि.६ जानेवारी २०२४) लाठ्या काठ्या, ढोल- ताशा, झांज पथक, मर्दानी खेळ, पोवाडा, शाहीर, गोंधळी, करपल्लवी आदींच्या सादरीकरणाने आज १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात शिवराज्याभिषेक सोहळा अवतरला. रोमहर्षक या सोहळ्यावेळी ‘हरहर महादेव….जय भवानी जय शिवाजी…’ च्या जयघोषाने मुख्य सभा मंडप दुमदुमून गेला.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज नाट्य संमेलनात ‘प्रभो शिवाजी राजा’ हा कार्यक्रम पृथ्वी इनोव्हेशनच्या वतीने सादर करण्यात आला. यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर,अभिनेते नागेश भोसले, सुशांत शेलार, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेश सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते. या शिवराज्याभिषेक सोहळ्यात शिवबाचा जन्म, अफजखानाचा वध ते शिवराज्याभिषेक पर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला. गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर शाहीर यशवंत जाधव यांनी शिव जन्माचा ‘एके काळी सह्याद्री हसला’ हा रोमहर्षक पोवाडा सादर केला. त्यानंतर ठाकर नृत्य, कोळी गीत सादर करण्यात आले.
त्यानंतर करपल्लवी या आगळ्या वेगळ्या सादरीकरणातून शिवकाळात गोंधळ मधून सांकेतिक भाषा कशी वापरली जायची, याचे सुरेख सादरीकरण केले. या संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान शिवाजी महाराजांची आज्ञा पत्रांचे वाचन, वासुदेव, भलरी देवा भलरी, विठ्ठल माऊली, बाल शिवबाचा पाळणा अन् शेवटी मर्दानी खेळांच्या सादरीकरणात शिवराज्याभिषेक सोहळा सादर करण्यात आला. अवघी शिवसृष्टी उभी केलेल्या या नेत्रदीप सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
यावेळी अभिनेते नागेश भोसले यांच्या हस्ते सादरकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भोसले म्हणाले, शिव राज्याभिषेक कोणताही असो, तो पाहताना अंगावर शहारे येतातच. आता झालेले सादरीकरण हे उत्तूंग अभिनव आहे. खरोखरच डोळ्यांचे पारणे फिटले.
गौरी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
‘हरहर महादेव….जय भवानी जय शिवाजी…’ च्या जयघोषाने शंभराव्या नाट्य संमेलनाचा मुख्य सभा मंडप दुमदुमूला
विकासकामांच्या शिदोरीमुळेच ‘महाविजय’ निश्चित!
• चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
• पुणे लोकसभा – भाजपा सुपर वॉरियर्सशी संवाद
पुणे –
भाजपाच्या कार्यकर्त्याने लढलेल्या प्रत्येक लढाईनंतर पक्षाची ताकद वाढली. मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना व महायुती सरकारच्या कामांची शिदोरी असल्यानेच आगामी निवडणुकांत ‘महाविजय’ निश्चित आहे, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असून तोच पक्षाची संपत्ती आहे, असेही ते म्हणाले.
शनिवारी (ता.६ जानेवारी) ते पुणे लोकसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्सशी संवाद साधत होते. यावेळी त्याच्यासोबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, श्रीनाथ भिमाले,प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, आ. माधुरी मिसाळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. सुनील कांबळे, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, माधव भंडारी, शेखर इनामदार, वर्षा डहाळे, मेधा कुलकर्णी, हेमंत रासने, पुनीत जोशी, रवी साळेगावकर, राजेंद्र शिळीमकर, वर्षा तापकीर, महेश पुंडे, सुभाष जंगले, राहुल भंडारी, राघवेंद्र बापू मानकर, इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशात विकासाची नवीन संकल्पना साकारली जात आहे. २०४७ मध्ये विकसित भारताचा उद्देश पूर्ण करण्यासाठी २०२४ मध्ये देशवासींनी पुन्हा एकादा भाजपाच्या हाती केंद्रीय सत्तेची चाबी सोपविण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्रात भाजपाने ‘महाविजय-२०२४’ हा निश्चय केला आहे. या संकल्पपूर्तीसाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे. ज्या पक्षाजवळ नरेंद्र मोदींसारखे नेतृत्त्व असेल तेथे विजय निश्चित आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याने तीन तास पक्षकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.
• नमो अॅप ठरणार गेम चेंजर
पंतप्रधान मोदी यांनी मागील नऊ वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती देणारे ‘नमो अॅप’ प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांच्या मोबाईल डाऊनलोड करावे. विकसित भारत ब्रॅंड अम्बेसिडर झाल्याने भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांना पंतप्रधान मोदी यांच्याशी थेट जोडण्याची संधी मिळणार आहे. नमो अॅप भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी गेम चेंजर ठरू शकते असे सांगून श्री बावनकुळे यांनी ऍप संदर्भातील प्रात्यक्षिक उपस्थिताना दिले.
• पुण्यात भाजपाचा विजय होणार
पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचा विजय होईल. ५१ टक्के मते घेऊन महायुतीचाच उमेदवार जिंकेल. गेल्या वेळेपेक्षाही मोठा विजय पुण्यात होईल, अशी योजना आम्ही तयार केली आहे, असे श्री बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वात राज्यात ४५ प्लस लोकसभा व २२५ प्लस विधानसभा जागांवर महायुतीचा महाविजय साकारणार आहे. यात भाजपाचे सुपर वॉरियर्स विजयाचे शिलेदार ठरतील.
• संक्रातीपासून महायुतीचे मेळावे
संक्रांतीच्या पावनपर्वावर राज्यात १४ तारखेपासून राज्यात प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे होणार आहेत. हे सर्व जिल्हास्तरीय मेळावे आहेत. फेब्रुवारी महिन्यात विभागीय मेळावे आहेत. मार्च महिन्यात राज्याचा मेळावा होईल. महायुती बूथस्तरापर्यंत मतदान केंद्रस्तरापर्यंत तालुकास्तरापर्यंत एकत्रित आणि एकजुटीने जनतेपर्यंत जाईल.
• दिवसभर विविध कार्यक्रमांत उपस्थिती
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पुणे दौऱ्यात विविध कार्यक्रमात सहभागी झाले. सकाळी बालेवाडी येथे ज्योर्तिलिंग पादुका दर्शन घेतले. दुपारी दिवंगत आ. लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ आयोजित अटल महाआरोग्य शिबरात सहभागी झाले. गंजपेठ येथे झालेल्या ओबीसी स्नेह मेळावा व बिबवेवाडी येथे राजस्थानी समाज मेळाव्यात सहभागी होत मार्गदर्शन केले. हडपसर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.
Bitsolives Pvt.Ltd या कंपनीच्या गणेश सागरला अटक – ८४ लाखाची फसवणूक; नागरिकांना पोलिसांचे आवाहन
पुणे- बक्सकॉईन या क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन त्याद्वारे अधिक नफा मिळवुण देण्याचे अमिष दाखवुन ८४ लाखाची फसवणुक करणा-या आरोपीस पुणे पोलिसांनी अटक केली आहे. Bitsolives Pvt.Ltd या कंपनी कडून फसवणूक झालेल्यांनी तातडीने संपर्क साधावा असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’ सायबर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हयातील आरोपीतांनी वेळो वेळी वेग-वेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या सेमिनार मध्ये फिर्यादी यांना तसेच इतर गुंतवणुकदारांना जादा परतावा देण्याच्या बहाण्याने बक्सकॉईन या क्रिप्टोकरन्सीमध्ये तसेच मल्टीलेव्हल गार्केटिंगसारख्या प्लॅनमध्ये गुंतवणुक करावयास सांगुन आरोपीतांनी चालू केलेले प्लॅटफॉर्म, प्लॅन्स्, वेबसाईट, पोर्टल हे जाणीवपुर्वक फसवणूक करण्याच्या उद्देशाने कालांतराने बंद करुन फिर्यादी तसेच त्यांचे इतर ०७ सहकारी गुंतवणुकदार यांना गुंतवणुक केलेल्या रकमेवर कोणताही परतावा न देता त्यांची एकुण रक्कम ८४,३४,६४१.७६/ रुपये ची आर्थिक फसवणूक केली म्हणुन फिर्यादी यांनी दि. २७/११/२०२१ रोजी फिर्याद दिल्याने सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गु.रजि.नं. ५४/२०२१, भा.दं. वि. कलम ४०६, ४२०, ३४ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा २००० कलम ६६ डी सह एम.पी.आय.डी. क. ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयामध्ये यापुर्वी आरोपी नामे गणेश शिवकुमार सागर, वय ४७ वर्षे, रा. फ्लॅट नं. ए-१०४,
पहिला मजला, एस.बी. युथ, सीजीएचएस, प्लॉट नं. ६ बी, सेक्टर २, फेज १, द्वारका, गव्हर्मेंट स्कुल शेजारी, नवी दिल्ली- ११००७५ यास दिल्ली येथुन अटक करण्यात आली असुन त्याचे विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आलेले आहे. नमुद गुन्हयातील बिटसोलाईव्हज प्रा.लि. कंपनी, दुबई यामधील डायरेक्टर यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या सेमिनार मध्ये बक्सकॉईन या क्रिप्टोकरन्सीमध्ये तसेच मल्टीलेव्हल मार्केटिंगसारख्या प्लॅनमध्ये गुंतवणुक करावयास सांगुन आरोपीतांनी चालू केलेले प्लॅटफॉर्म, प्लॅन्स्, वेबसाईट, पोर्टल हे जाणीवपुर्वक फसवणूक करण्याच्या उद्देशाने कालांतराने बंद करुन फिर्यादी तसेच त्यांचे इतर ०७ सहकारी गुंतवणुकदारांची मोठ्या रकमेची फसवणुक केली असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. नमुद गुन्ह्यामध्ये आरोपी नागे प्रशांत कुमार कमलेश भाई ब्रम्हभट, वय ३४ वर्षे, सध्या रा. ४०४, अॅन्डालुस प्लाझा, मंखुल, बुर दुबई, कायमचा पत्ता- हाऊस नं. २२/२११, मारुती धाम, जीआयडीसी, मकरपुरा, वडोदरा, गुजरात यास आर्थिक गुन्हे शाखा, सुरत शहर, गुजरात येथील डीसीबी पोलीस स्टेशन, गु.र.नं. ११२१००१५२२००७५/२०२२ या गुन्हयामध्ये अटक केली असुन नमुद आरोपी हा इकडील दाखल गुन्ह्यात पाहिजे आरोपी असुन त्यास मध्यवर्ती कारागृह, लाजपोर, सुरत, गुजरात येथुन दि. ०५/०१/२०२४ रोजी सदर गुन्ह्यामध्ये ताबा घेऊन दिनांक ०६/०१/२०२४ रोजी १०:२१ वा. अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीतास आज रोजी न्यायालयासमोर हजर केले असता अटक आरोपीस दि. ०९/०१/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांडमंजूर करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर सावंत हे करीत आहेत.
सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेकडून आवाहन करण्यात येत आहे की, वर नमुद Bitsolives Pvt.Ltd या कंपनीच्या नावाचा वापर करून गुंतवणुक करण्याचे सांगुन कोणाची फसवणुक झाली असल्यास त्यांनी सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचेशी संपर्क करावा.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, श्री. विक्रांत देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे आर.एन. राजे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मिनल सुपे- पाटील, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोउपनि प्रमोद खरात, सपोउपनि संदेश कर्णे, पोलीस अंमलदार राजेश केदारी, अश्विन कुमकर, प्रविणसिंग राजपुत, वैभव माने, दिनेश मरकड, शिरीष गावडे, निखील पासलकर सर्व नेमणुक सायबर पोलीस स्टेशन यांनी केला असून तपासामध्ये उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.
ऑफिसमधील अकरा लाखाची रोकड चोरली पण ५ दिवसात पोलिसांच्या तावडीत सापडलाच
पुणे -ऑफिसमधील अकरा लाखाची रोकड चोरली पण गावी पाळण्याच्या तयारीत असलेला आरोपी ५ दिवसातच पोलिसांच्या तावडीत सापडला, या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’दि. ३०/१२/२०२३ रोजी सायंकाळी ०६/०० वा. ते दि. ३१/१२/२०२३ रोजी ११/३० वा. चे सुमारास एस के पी कॅम्पस बालेवाडी पुणे येथिल ज्ञानसागर इन्सिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च या ऑफिसमधील रोख ११,५०,००/- रुपये चोरी गेले बाबत चतुःश्रृंगी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ९५३/२०२३ भा.द.वि. कलम ३८० प्रमाणे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल होता.
दाखल गुन्हयाचा गुन्हे शाखा युनिट ०४, समांतर तपास करत असताना तांत्रीक विश्लेषणाद्वारे दाखल गुन्हयामध्ये आरोपी निष्पन्न करुन दि.०५/०१/२०२४ रोजी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सारस साळवर व वैभव रणपिसे यांना त्यांचे बातमीदारामार्फत सदर गुन्हयातील आरोपी वाल्मिक पाटील हा संगमवाडी पार्किंग क्र. ३ येथे आला असून तो गावी जाण्याच्या तयारीत असले बाबत बातमी मिळाली.
सदर बातमीच्या अनुषांगाने लागलीच गुन्हे शाखा, युनिट ४, पुणे शहर कडील पथकाने संगमवाडी पार्किंग क्र. ०३ येथे जावून शिताफिने वाल्मिक संजय पाटील वय ३१ वर्षे, रा. माळीवाडा, अमलेश्वरनगर, ता. अंमळनेर, जि. जळगांव यांस ताब्यात घेतले. त्याचे कब्जात एकुण रु. ८,४८,६५०/- एवढी रोख रक्कम मिळून आली. सदर रकमेबाबत आरोपीकडे तपास केला असता त्याने सदरची रक्कम एस के पी कॅम्पस बालेवाडी पुणे येथिल ज्ञान सागर इन्स्टयुट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च या ऑफिस मधुन चोरल्याचे सांगुन गुन्हयाची कबुली दिली. दाखल गुन्हा उघडकीस आणून गुन्हयातील आरोपीस पुढील कारवाई कामी चतुःश्रृंगी
पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-२ सतीश गोवेकर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांचे मार्गदर्शनाखाली, सहा. पोलीस फौजदार शितल शिंदे, पोलीस अंमलदार विठ्ठल वाव्हळ, सारस साळवी, प्रविण भालचिम, वैभव रणपिसे, यांनी केली आहे.
किसान आंदोलनांच्या धर्तीवर लढा द्या : बाबा कांबळे
- हिट अँड रन विरोधात पंजाब मधील भवाणीगड पटियाला येथे चालकांचा रास्ता रोको
- ऑटो, रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो बस फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे देखील सहभागी
पिंपरी-
शेतकरी हिताच्या विरोधात निर्णय घेतल्यानंतर देशभरातील शेतकरी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले होते. त्यांनी केंद्र सरकारविरोधात चिकाटीने लढा दिला. लाठ्या खाल्ल्या. त्यांच्या लढ्यापुढे सरकारला माघार घ्यावी लागली. शेतकऱ्यांची हीच चिकाटी पाहून त्यांच्याप्रमाणे हिट अँड रन विरोधात लढा द्यायला हवा. केंद्राने रचलेला हिट अँड रनचा जुलमी कायदा माघार घ्यायला भाग पाडू, असे प्रतिपादन ऑटो, रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो बस फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.
केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणी 3 जानेवारी पासून दिल्ली जंतर मंतर येथे बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनासाठी देशभरातील ऑटो, बस, ट्रक, टेम्पो ड्रायव्हर संघटनेचे प्रतिनिधी दिल्ली येथे दाखल झाले. आंदोलनाची ही लाट पंजाब मध्ये देखील पोचली. पंजाब मधील भवाणीगड पटियाला येथील ट्रक, टेम्पो चालकांनी दिवसभर रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी आंदोलनात सहभागी होत बाबा कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
केंद्र सरकारच्या विरोधात विविध मागण्यासाठी ऑटो, रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो बस चालक मालक आंदोलन करत आहेत. अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड असा असलेला काळा कायदा सरकारने तात्काळ मागे घ्यावा. देशातील सर्व चालक आणि मालकांसाठी राष्ट्रीय कल्याण मंडळाची स्थापना करावी. त्याद्वारे सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, मुलांना शिक्षणाच्या सुविधा आणि वृद्धापकाळात पेन्शन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा. सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा. दिल्लीत चालकांसाठी राष्ट्रीय स्मारक बांधावे आदी मागण्यांसाठी बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आंदोलन झाले. महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड, पुणे आणि महाराष्ट्रातून ऑटो व ट्रक टेम्पो चालकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. संबधित आरटीओ कार्यालयावर आंदोलन करून पाठिंबा देण्यात आला आहे.पंजाब मध्ये देखील रास्ता रोको करण्यात आले. या आंदोलनात बाबा कांबळे सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले.
बाबा कांबळे म्हणाले की, हिट अँड रन प्रकरणी देशभरातील २५ कोटी चालक आंदोलन करत आहेत. काही जण आंदोलन बंद झाल्याची चुकीची माहिती देत आहेत. मात्र हे आंदोलन मागे हटलेले नाही. देशभरात आंदोलन सुरूच आहे. केंद्र सरकार देशभरातील 25 कोटी वाहनचालकांवर अन्याय करत असून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र देशभरातील चालकांच्या जोरावर होणाऱ्या अन्यायावर मात करून लढा जिंकू असा निर्धार बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.
बहिणीला भेटायला गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात घावला,भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडला मोक्यातील फरार असलेला आरोपी
पुणे-दक्षिण पुण्यातील मोक्यात फरारी असलेल्या आरोपीला काल भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. अनेकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पाळलेला हा आरोपी बहिणीला भेटायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात घावला.या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंबर ६४५/२०२३ भा.दं. वि. कलम ३०७, ३८५, ३८७, ३२४, ४५२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६(२), सह क्रि. लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७, आर्म अॅक्ट कलम ४(२५), म पो अधि ३७ (१) सह १३५, बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधि. २०१५ कलम ८३ (२)
महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) या गुन्हयातील पाहीजे आरोपी तुषार कृष्णा कुचेकर, वय १९ वर्षे, रा. विठ्ठल रुक्मीणी मंदीराशेजारी, शनिनगर, जांभुळवाडी, पुणे हा गुन्हा दाखल झाल्यापासुन मिळुन येत नव्हता. त्याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे शोध घेताना तो वारंवार पोलीसांनी लावलेल्या सापळ्यातुन निसटत होता.
आरोपी तुषार कृष्णा कुचेकर, वय १९ वर्षे, रा. विठ्ठल रुक्मीणी मंदीराशेजारी, शनिनगर, जांभुळवाडी, पुणे याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार गुप्त बातमीदारांचे नेटवर्क सक्रीय करुन व तांत्रिक विश्लेषणावरुन शोध घेत असताना पोलीस अंमलदार चेतन गोरे, अभिजीत जाधव यांना नमुद आरोपी हा भुमकर ब्रिज, समर्थ सोसायटी, दुसरा मजला, आंबेगाव, पुणे येथे त्याचे बहिणीस भेटण्यासाठी आला आहे अशी खात्रीलायक बातमी मिळली.
तात्काळ तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन आरोपीताचा शोध घेतला असता तो सदर ठिकाणी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाईकामी गुन्हयाचे तपासी अधिकारी सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे. नारायण शिरगावकर यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्यांनी सदर आरोपीला नमुद गुन्हयामध्ये अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय पुराणिक, श्री. गिरीश दिघावकर, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार चेतन गोरे, अभिजीत जाधव, सचिन सरपाले, शैलेश साठे, महेश बारावकर, मंगेश पवार, निलेश जमदाडे, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे, मितेश चोरमोले, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.
स्वच्छ पाणी, सांडपाणी तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जा प्रदर्शनाचे आयोजन
पिंपवड,- स्वच्छ पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणी व सांडपाण्याविषयी आधुनिक तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे १० ते १२ जानेवारी रोजी “इंडिया वॉटर शो अँड रीन्यूएबल एनर्जी एक्स्पो” हे प्रदर्शन असणार आहे. या प्रदर्शनात प्रामुख्याने पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया संयंत्र प्रणाली आणि तंत्रज्ञान, ओझोन निर्मिती प्रणाली, चाचणी उपकरणे, आरओ प्लांट्स, अल्कधर्मी पाणी, फिल्टर्स, बाष्पीभवन प्रणाली, रूफ टॉप सोलर, सौर पॅनेल सारखी अक्षय ऊर्जा उपकरणे पाहायला मिळणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता (पर्यावरण) संजय कुलकर्णी प्रदर्शनाचे उदघाटन करणार असल्याची माहिती आयोजक सादिक शेख आणि एस शंकर यांनी दिली.
प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते कॉन्फरन्सचे उदघाटन होणार आहे. या चर्चासत्रामध्ये शासनाचे नवीन सौर ऊर्जा धोरण आणि नियमांविषयीचे महावितरणचे अभियंता डॉ. संतोष पटनी यांचे मार्गदर्शन तर हायड्रोजन ऊर्जेचा परिचय मास्माचे माजी अध्यक्ष संजय कुलकर्णी हे करून देणार आहेत. यावेळी मास्माचे अध्यक्ष शशिकांत वाकडे व माजी अध्यक्ष रोहन उपासनी उपस्थित असणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (मास्मा), सस्टेनेबिलिटी आणि एनर्जी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने व मुंबईतील प्रोपल एंटरप्रायझेस यांच्यावतीने हे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील या क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञ, उत्पादक आणि विक्रेते या प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत. तर उत्पादने आणि सेवांची यावेळी प्रात्यक्षिके सादर होणार असून नवीन उत्पादनांचे आणि तंत्रज्ञानावर विविध तंज्ञाचे मार्गदर्शन यावेळी मिळणार आहे.
लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना पाण्याचा पुरवठा मर्यादित होत आहे. उद्योग, शेती आणि दैनंदिन वापरासाठी पाण्याचा अधिक वापर होत आहे. अशातच मोठ्या शहरांमध्ये सांडपाणी हे एक मौल्यवान स्त्रोत असू शकते. मर्यादित गोड्या पाण्याच्या पुरवठ्यावरील ताण कमी करण्याबरोबरच, सांडपाण्याचा पुनर्वापर केल्याने प्रवाह आणि तलावांची गुणवत्ता सुधारू शकते ज्यामुळे ते प्राप्त होणारे सांडपाणी कमी होते. सांडपाण्यावर पुन्हा दावा केला जाऊ शकतो आणि पीक आणि लँडस्केप सिंचन, भूजल पुनर्भरण किंवा मनोरंजक हेतूंसाठी पुन्हा वापरला जाऊ शकतो. त्यामुळे सांडपाणी क्षेत्रातील तसेच अक्षय ऊर्जा क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहिती आयोजक सादिक शेख आणि एस शंकर यांनी दिली.
गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जूनपासून प्रवेश -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- उपलब्ध निधी १५ फेब्रुवारी पर्यंत खर्च करा
- ४७२.६३ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी
- पायाभूत विकास कामांना प्राधान्य
- अंमलबजावणीमध्ये गडचिरोली राज्यात दुसरा
नागपूर/गडचिरोली : गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून आवश्यक सर्वसुविधा उपलब्ध झाल्यामुळे येत्या जून २०२४ पासून प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार सर्वश्री देवराव होळी, कृष्णा गजभे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, पोलिस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंग, जिल्हा पोलिस अधिकारी श्री.निलोत्पल, नियोजन उपायुक्त धनंजय सुटे तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. उर्वरित लोकप्रतिनिधी व अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे गडचिरोली येथून सहभागी झाले होते.

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आष्टी-आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे काम वनविभागामुळे अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. नागरिकांना दळणवळणासाठी होणारा त्रास लक्षात घेता पूर्वी वाहतूक असलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करावा असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले. वन विभागाकडून या मार्गाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या परवानगी संदर्भात तात्काळ प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मार्कंडा तीर्थक्षेत्राच्या विकासाठी शंभर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला असून या कामाला प्राधान्याने सुरुवात करण्याच्या सूचना देतांना पालकमंत्री म्हणाले की, भारतीय पुरातत्व विभाग तसेच राज्य शासनाच्या विभागांनी पर्यटकांच्या सुविधेसाठी आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य द्यावे. गडचिरोली जिल्ह्यात खनिज संपत्ती आधारीत उद्योग मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. या उद्योगांसाठी आवश्यक सुविधा प्राधान्याने निर्माण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करावा व त्यानुसार अंमलबजावणी करावी.
गडचिरोली येथील विमानतळाचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेली जमीन उपलब्ध झाली असून विमान सेवेमुळे पर्यटन तसेच उद्योगांनाही चालना मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती असल्यामुळे महाराष्ट्राचा स्टिलहब होण्याची क्षमता जिल्ह्यात आहे. सुमारे 348 हेक्टर क्षेत्रामध्ये उत्खनाला मंजुरी देण्यात आली असून मोठ्या प्रमाणात असलेली खनिज संपदा विविध उद्योगाला प्रोत्साहन ठरणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात येत असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.
जिल्हा वार्षिक योजना प्रारुप आराखडा मंजूर
जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2024-25 वर्षासाठीच्या 472 कोटी 63 लाख रुपयांच्या आर्थिक मर्यादेत प्रस्तावित नियतवय प्रारुप आराखड्यास पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.
प्रारुप आराखड्यामध्ये सर्वसाधारण योजनेत 297 कोटी रुपये, आदिवासी उपाययोजनेत 137 कोटी 52 लक्ष रुपये आदिवासी उप योजना क्षेत्राबाहेरील योजनेसाठी 2 कोटी 10 लक्ष रुपये , तर अनुसूचित जाती उप योजनेसाठी 36 कोटी रुपयांचा समावेश आहे. विविध अमंलबजावणी अधिकाऱ्यांनी 919.16 कोटी रुपयांची अधिकची मागणी केली आहे.
जिल्हा वार्षिक योजना 2022-23 अखेर 507 कोटी 27 लक्ष रुपये इतका निधी खर्च केला असून एकूण खर्चाची टक्केवारी 99.93 आहे. या खर्चाला यावेळी मंजूरी देण्यात आली. वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत जिल्ह्यास 356 कोटी 89 लक्ष निधी प्राप्त झाला आहे त्यापैकी 285 कोटी 90 लक्ष रुपये वितरित करण्यात आले. 31 डिसेंबर अखेरपर्यंत 209 कोटी 60 लक्ष रुपये खर्च झाला आहे. एकूण 73.31 टक्के खर्च झाला आहे. उर्वरित निधी 15 फेब्रुवारी पर्यंत खर्च करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्यात. खर्चाच्या टक्केवारी मध्ये गडचिरोली जिल्हा दुसऱ्या स्थानावर असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आष्टी ते सिंरोचा या महामार्गाचे काम वनविभागामुळे अनेक दिवसापासुन बंद आहे. हा मार्ग त्वरीत सुरु व्हावा , अशी सूचना केली. तसेच जिल्ह्यातील विद्युत उपकेंद्राची उभारणी, खनिकर्म निधीच्या खर्चासंदर्भात स्थनिक जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत आदी सूचना केल्यात. आमदार कृष्णा गजभे, देवराव होळी, खासदार अशोक नेते आदींनी क्रीडा संकुल प्रशासकीय इमारत उद्योगांचा विकास, सिंचन प्रकल्प, कृषी उद्योग आदी संदर्भात विविध सूचना केल्या.
जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी सी-60 पथकाने नक्षल विरोधी अभियानांतर्गत बजावलेल्या लक्षणीय कामगिरीच्या अनुषंगाने तयार केलेल्या कॉफीटेबलबुकचे विमोचन तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या वार्षिक पुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी जिल्हाधिकारी संजय मीना यांनी मान्यवरांचे स्वागत करुन जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजनांची माहिती खर्चाची टक्केवारी तसेच वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत प्रारुप आराखडा संदर्भात माहिती दिली. जिल्ह्याच्या 2047 पर्यंतच्या व्हिजन आराखड्याचे यावेळी सादरीकरण केले.
१२५६ वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा; पेसा क्षेत्रातील पदे वगळून होणार वनरक्षकांची भरती
मुंबई: वनरक्षक पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत बराच काळ असलेल्या युवा उमेदवारांची प्रतिक्षा संपली असून १२५६ वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
वन विभागाकडून एकूण २१३८ वनरक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या २१३८ वनरक्षक पदांसाठी २ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने टीसीएस-आयओएन मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. मात्र अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सर्वच पदभरती प्रक्रिया बाधित झाली होती.
वनमंत्री श्री. मुनगंटीवार हे या प्रश्नातून मार्ग काढण्याकरता सातत्याने प्रयत्नरत होते. वनमंत्र्यांच्या या सततच्या पाठपुराव्यास यश आले असून खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता चालना मिळाली आहे. त्यानुसार शासनाने अनुसूचित क्षेत्र (पेसा) सोडून उर्वरित १२५६ वनरक्षक पदांची भरती करण्यास मान्यता देत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वनरक्षक पदभरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या वनरक्षक पदभरती परीक्षेत एकूण तीन लाख ९५ हजार ७६८ परिक्षार्थींनी ऑनलाईन परीक्षा दिली होती त्यातील एकूण दोन लाख ७१ हजार ८३८ परीक्षार्थी ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. या पुढील भरती प्रक्रियेत टीसीएस आयओएन कडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रांची छाननी, शारीरिक गुणवत्ता चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील. ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे गुण एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या नवीन गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीला प्रादेशिक निवड समितीकडून मान्यता घेतल्यानंतर अंतिम टप्प्यात निवडसूचीतील उमेदवारांची २५ कि.मी. आणि १६ कि.मी. चालण्याची चाचणी घेण्यात येईल. या अंतिम चाचणीतून पात्र उमेदवार निवडून त्यातून वनरक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया दि.१७ जानेवारी पासून सुरू करण्यात येत असून वनवृत्तातील उमेदवार संख्येनुसार १५ दिवस ते ४४ दिवस या कालावधीत ही प्रक्रिया वनवृत्तनिहाय पूर्ण केली जाईल. सर्वात कमी उमेदवार असलेल्या अमरावती वनवृत्तात ही प्रक्रिया १५ दिवसात पूर्ण होणे अपेक्षित असून सर्वात जास्त उमेदवार असलेल्या कोल्हापूर वनवृत्तात ४४ दिवसात, त्यापाठोपाठ ठाणे आणि नागपूर वनवृत्तात ४० दिवसात तर उर्वरित चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, छत्रपती संभाजी नगर, धुळे, नाशिक, पुणे या वनवृत्तात प्रत्येकी २० दिवसात वनरक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. या भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यांची माहिती वन विभागाच्या संबंधित संकेतस्थळांवर वेळोवेळी दिली जाणार आहे.
राज्यात JN.1 व्हेरियंट रुग्णांची संख्या 139:सर्वाधिक रुग्ण पुण्यात; कोरोनाच्या 154 रुग्णांची नव्याने नोंद तर दोघांचा मृत्यू
मुंबई-राज्यात कोरोनाच्या 154 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 172 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवारी राज्यात दोन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 98.17 टक्क्यांवर पोहोचलं आहे तर मृत्यू दर हा 1.81 टक्के इतका आहे.
राज्यात शनिवारी कोरोनाच्या 14,790 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 2,421 इतक्या आरटीपीसीआर चाचण्या होत्या तर 12,369 इतक्या चाचण्या या RAT चाचण्या आहेत. आजच्या दिवसाचा कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा 1.04 टक्के इतका आहे.
JN 1 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 139
JN 1 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या ही 139 इतकी झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत. पुण्यात एकूण 91 रुग्ण असून त्या खालोखाल नागपूरमध्ये 30 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालोखाल ठाण्यामध्ये 5 तर बीडमध्ये 3, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 आणि नांदेडमध्ये 2 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे केंद्र सरकारने आधीच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते.देशात JN-1 प्रकारांच्या संख्येत झालेली वाढ पाहता केंद्राने राज्यांना केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या कोविड-19 च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. JN-1 प्रकाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने सर्व रुग्णालयांना इन्फ्लूएंझा सारखा आजार आणि श्वसनाच्या आजारावर लक्ष ठेवण्यास आणि अहवाल देण्यास सांगितले आहे.
ताप, सर्दी आणि खोकला आढळल्यास कोविड चाचणी करुन घेण्याचा सल्ला टास्क फोर्सकडून देण्यात आलाय. कोविड टास्क फोर्सची 2 जानेवारी रोजी बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना झाल्यास गृह विलगीकरणात पाच दिवस राहावे लागेल. हवा खेळती राहिल अशा खोलीत रहावे. इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी मास्क वापरावे. घरातील ज्येष्ठ नागरिकांनी किंवा अतिजोखिम असलेल्यांनी मास्क वापरावे. अति जोखिम व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास रुग्णालयात दाखल करण्यात यावे. अशा सूचना टास्क फोर्सकडून देण्यात आल्यात.
दरम्यान नव्या कोरोना व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर लवकरच औषधोपचारासंदर्भात टास्क फोर्स क्लिनिकल प्रोटोकॉल जाहीर करणार आहेत. पण सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कोविड टास्क फोर्सकडून करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी असं देखील आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय. दरम्यान परिस्थिती चिंताजनक नसली तरी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे, असं आवाहन करण्यात आले.
भाच्याने घेतला मामाला मारहाणीचा 11 वर्षांनंतर बदला- मोहोळच्या खुनामागील कारण शोधल्याचा पोलिसांचा दावा
पुणे-कुख्यात गुंड शरद मोहोळ याने २०१२मध्ये नामदेव कानगुडे, विठ्ठल गांडले यांना मारहाण केली होती. त्याचा बदला ११ वर्षांनंतर कानगुडे, गांडले यांचा भाचा साहिल पोळेकर घेत ५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी घेतला. त्यानेच गोळीबार करून मोहोळचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. २०१० ते २०१२ कालावधीत पोळेकरच्या दोन्ही मामांनी मोहोळच्या मावस भावाला एका प्रकरणात मारहाण केली. त्यानंतर मोहोळने या दोघांना बदडून काढले. नंतर तो सतत त्यांचा अपमान करत होता. एका व्यवहारातील पैसेही कानगुडेंना परत करण्यास मोहोळने नकार दिला. म्हणून पोळेकरने त्याचा काटा काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार पोळेकर यांनी तीन ते चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्राबाहेरून पिस्तूल आणले. त्यानंतर तो मोहोळशी गोड बोलून, येता – जाता पाया पडून त्याच्या टोळीत विश्वास मिळवून सामील झाला. आणि त्याने मोहोळच्या हालचालींबाबत त्याच्या साथीदारांना वेळोवेळी माहिती पुरवणे सुरू केले. मोहोळ नेमका कुठे कधी जातो, त्याच्यासोबत कोण कोण असते, याचा पूर्ण अभ्यास झाल्यावर त्याने हल्ल्याचा कट रचला. खून केल्यावर आरोपी एका दुचाकीवरून पसार झाले. त्यानंतर पुढे जाऊन दुचाकी सोडून देत कात्रजला रिक्षाने गेले. तेथे साहिलच्या मामाने चारचाकी पाठवली होती. त्यातून ते कोल्हापूरकडे पसार होण्याच्या मार्गावर होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ॲड. रवींद्र वसंतराव पवार (४०, रा. नांदेगाव, ता. मुळशी), ॲड. संजय रामभाऊ उडान (वय ४३, रा. भुसारी काॅलनी, कोथरुड) हे शिवाजीनगर न्यायालयात कार्यरत वकील कात्रजपासून आरोपींसोबत होते, असे तपासात स्पष्ट झाले आहे.
सीसीटीव्ही, इन्स्टाग्रामुळे तत्काळ सापडले
तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील म्हणाले, मोहोळवरील हल्ला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला. साहिलने इन्स्टाग्रामवर ‘मी येरवड्यात जाणार’ असे रिल तसेच फरार होण्यासाठी वापरलेल्या चारचाकीचा क्रमांक टाकला होता. तो क्रमांक आम्ही चेकनाका पथकांना दिला होता. साहिल, नामदेव, विठ्ठल यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे.
६ जणांना ५, तर २ वकिलांना ३ दिवस कोठडी
मोहोळ खून प्रकरणात साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा, कोथरुड), नामदेव महिपती कानगुडे (वय ३५, रा. भूगाव, ता. मुळशी), अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे (वय २४, रा. स्वराज्य मित्र मंडळाजवळ, पर्वती), चंद्रकांत शाहू शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा), विनायक संतोष गव्हाणकर (वय २०, रा. पौड, ता. मुळशी), विठ्ठल किसन गांदले (वय ३४, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा, कोथरुड), ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान यांना २४ तासात अटक झाली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्यासमोर त्यांना शनिवारी सकाळच्या सत्रात हजर करण्यात आले. तेव्हा सहा आरोपींना दहा जानेवारीपर्यंत तर दोन वकिलांना आठ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
एक आरोपी वकील न्यायालयात रडले
खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात दोन वकिलांना अटक झाल्याने बार असोसिएशन वकिलांनी सुनावणीस गर्दी केली होती. न्यायाधीशांच्या सूचनेवरून बार असोसिएशन अध्यक्षांनी हस्तक्षेप वकिलांना न्याय दालनाबाहेर काढले. त्यानंतर झालेल्या सुनावणीत आरोपी ॲड. रवींद्र पवार ढसाढसा रडले. आरोपींनी संपर्क केल्यानंतर पोलिसांना शरण जाण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली होती, असा दावा त्यांनी केला.
सल्ला देत असताना वकिलांना पकडले
ॲड. निंबाळकर यांनी आरोपी वकिलांतर्फे असा युक्तिवाद केला की, साहिल, नामदेव हे यापूर्वीच्या गुन्ह्यात त्यांचे पक्षकार आहेत. त्यांना या प्रकरणात सल्ला देत असताना, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वकिलांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केलेली नाही. कोथरुड पोलिस ठाण्यातील कदम नामक एका जुन्या पोलिस उपनिरीक्षकांना आरोपींच्या शरणागतीची माहिती दिली होती. कोणत्याही वकिलाला पक्षकारास सल्ला देण्याचा अधिकार आहे.
आशानगर येथील पाण्याच्या टाकीची पाहणी !!लवकरच उद्घाटन होईल:आ. सिद्धार्थ शिरोळे
पुणे : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील आशानगर येथे महापालिकेच्या २४ x ७ योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणीआमदार सिध्दार्थ शिरोळे यांनी केली. यावेळी टेस्टिंग ट्रायलची कामे त्वरित पूर्ण करून देण्याच्या सूचना पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
मी व आमचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक गेली ४ वर्षे या पाण्याच्या टाकीच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. मला आनंद आहे की लवकरच या टाकीचे काम पूर्ण होणार असून याचे भव्य उद्घाटन करण्यात येणार आहे,असे आ.शिरोळे यांनी पाहणी नंतर सांगितले.
या पाण्याच्या टाकीमुळे आशानगर, वैदूवाडी, चतुःश्रृंगी परिसर, पीएमसी कॉलनी, जनवाडी, जनता वसाहत, डिफेन्स कॉलनी, निलज्योती सोसायटी, म्हाडा कॉलनी भागातील नागरिकांना येत्या १० ते १५ दिवसांमध्ये पुरेशा दाबाने व दिवसा वेळेवर पाणी मिळेल, अशी माहिती आ.शिरोळे यांनी दिली.
त्याच प्रमाणे संपूर्ण गोखलेनगरला देखील पुरेशा दाबाने व वेळेवर पाणीपुरवठा होणार आहे. तसेच गोखलेनगर भागासाठी मॅफको येथे पाण्याच्या टाकीचे काम सुरु असून त्याचा देखील सातत्याने पाठपुरावा सुरु आहे,असे आ.शिरोळे यांनी सांगितले.
यावेळी गणेश बगाडे, आदित्य माळवे,योगेश बाचल, सतीश बहिरट, किरण ओरसे, हेमंत डाबी, सुरेश शिंदे, विकास डाबी, रमेश भंडारी, आकाश बगाडे, गौतम लोखंडे, संतोष जगताप तसेच पुणे मनपा पाणीपुरवठा विभागाचे सबंधित अधिकारी उपस्थित होते.
कॉमेडियन नवीन प्रभाकर याचा १४ जानेवारीला खास शो रंगणार
पिंपरी : ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमातील ‘पहचान कौन’ या अभिनयासाठी ओळखला जाणारा कॉमेडियन म्हणजे नवीन प्रभाकर. स्टँडअप कॉमेडी असो किंवा गायन, अभिनय असो नेहमीच नवीन ने प्रेक्षकांना मनमुराद आनंद दिला आहे. तसेच ‘बॉम्बे टू गोवा’, ‘खिलाडी 786’ आणि ‘फाटा पोस्टर निखला हिरो’ यांसारख्या अनेक बॉलीवूड चित्रपटात तसेच ‘सोहम’ ‘ आपडी थापडी’ आदी मराठी चित्रपटात देखील त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता हा कॉमेडी किंग पुणेकरांना हसवायला येत आहे.
आर. एम इव्हेंट्स आणि मोना सिंग यांच्या वतीने कॉमेडी किंग नवीन प्रभाकर याचा ‘कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर कॉमेडी नाईट्स’ हा विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येत्या १४ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी चिंचवड येथील एलप्रो सिटी स्क्वेर मॉल येथे, सायंकाळी 6 वा. हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये नवीन सोबत ‘भाबिजी घर पर हे’ फेम प्रेम चौधरी आणि ‘वेंत्रिलो क्युस्ट’ मधील राजकुमार रॅन्चो या दोघांचा देखील सहभाग असणार आहे. त्यामुळे विनोदाचा आनंद द्विगुणिक होणार यात शंका नाही.
५५ वा महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेता ‘कॉपी’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर
मुंबई: दहावी बारावीच्या मुलांना उघडउघड कॉपी करण्यास मुभा देणाऱ्या आज कित्येक शाळा अस्तित्वात असून त्यावर खूप दुर्मिळ बोललं जातं. परंतु दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे या लेखक दिग्दर्शकाच्या जोडीने ‘कॉपी’ या चित्रपटातून या दुर्मिळ भाष्याला छेद देऊन समाजासमोर एक अत्यंत गंभीर प्रश्न उभा केला आहे. चित्रपटाचा ८ जानेवारी २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून चित्रपट प्रेक्षकांचं चित्त वेधून घेणार आहे.
‘कॉपी’ हा चित्रपट ५५ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पदार्पण, १० व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट बाल कलाकार आणि इतर अनेक नामांकित चित्रपट महोत्सवात पुरस्कृत झाला आहे. लोकप्रिय अभिनेते मिलिंद शिंदे, अंशुमन विचारे, कमलेश सावंत, अनिल नगरकर, जगन्नाथ निवांगुणे, विपुल साळुंखे, राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडकर, पूनम राणे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे, रवी विरकर, श्रद्धा सावंत या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. दया प्रभा, आश्रू वानखेडे आणि हेमंतकुमार धाबडे या त्रिकुटाने कॉपीचे दिग्दर्शन केले आहे.
चित्रपटाच्या कथेतून ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापनाकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराचा उलगडा केला आहे. शिवा, प्रकाश आणि प्रिया एका खेड्यात राहत असून अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत आहेत. एकीकडे शाळेतील इतर मुले कॉपी करून परीक्षा देत आहेत तर दुसरीकडे कित्येक मैल चालत येऊन हे गरीब त्रिकुट प्रामाणिकपणे परीक्षा देत आहे. पण त्याचवेळी शिक्षण अधिकारी कॉपीचे दृश्य बघून शाळा बंद करण्याचे आदेश देतो. चित्रपटाच्या या वळणावर मूळ कथानक सुरू होऊन पुढे काय घडते हे चित्रपटात पहायला मिळणार आहे.
“प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क असणारा शिक्षण हा अतिशय संवेदनशील आणि महत्वपूर्ण विषय ‘कॉपी’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवताना आम्हाला अभिमानास्पद भावना आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
अटल सागरी सेतू वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य करणारा प्रकल्प- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई,दि.६ : देशातील सर्वात जास्त २२ किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (मुंबई पारबंदर प्रकल्प) या प्रकल्पामुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ठ साध्य होणार आहे. मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासांचे अंतर अवघ्या २० मिनिटांत पार होणार असल्याने या वेगवान वाहतुकीमुळे मुंबईकरांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचा (एमटीएचएल) ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (मुंबई पारबंदर प्रकल्प) चे १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत असून त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज या अटल सेतूची ठिकठिकाणी थांबून पाहणी करून आढावा घेतला. यावेळी कौशल्य विकास उद्योजगता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आय.एस. चहल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त (एमएमआरडीए) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. अश्विनी जोशी, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे, नवी मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अटल सेतू नवी मुंबई, रायगड यासह इतर शहरांना जोडत असून त्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रकल्प, मोठे उद्योग समूह येणार आहेत. त्यातून या परिसराचाही विकास होणार आहे. हा मार्ग शिवडी येथून सुरु होवून समुद्रमार्गे चिर्ले येथील न्हावा शेवा येथ इतर मार्गांना जोडला जातो. मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या संपणार असून मुंबई ते नवीमुंबईत अवघ्या 20 मिनिटात जाता येणार आहे. प्रकल्पाचे काम पर्यावरणाचा समतोल राखून पूर्ण केले असून समतोलामुळे शिवडी समुद्र परिसरात फ्लेमिंगो पक्षी वाढले आहेत. हा सेतू मार्ग मुंबई- गोवा महामार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जात असल्याने विविध मोठे उद्योग, विकासात्मक प्रकल्प नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने परिसराचाही विकास होणार आहे. युवकांच्या रोजगारासाठी ५०० स्किल कौशल्य विकास केंद्रे सुरू केली असून जनतेच्या हितासाठी महत्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत, आणखी विकासात्मक निर्णय घेत आहे.
परिसर सुशोभिकरण, वृक्षारोपणाच्या सूचना
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिवडी ते चिर्ले या अटल सेतू पुलाची पाहणी करतानाच ठिकठिकाणी उतरुन तेथील सुविधांची माहिती घेत त्याअनुषंगांने विविध सूचना एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दिल्या. अटल सेतूची नियमित स्वच्छता राखण्याबरोबरच परिसर सुशोभिकरण आणि वृक्षारोपण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
सेतूवरील वाहतूक नियंत्रण केंद्राला मुख्यमंत्र्यांची भेट

चिर्ले टोल प्लाझाजवळील वाहतूक नियंत्रण केंद्राला (कमांड सेंटर) मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. अटल सेतूवरील वाहतुकीचे नियंत्रण आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे कार्य आदींचीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनासह एमएमआरडीए अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. अटल सेतूची पाहणी केल्यानंतर चिर्ले येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

अटल सेतूविषयी थोडक्यात
मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग (एमटीएचएल) हा अति जलद, अति महत्त्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील आदर्श नमुना
५०० बोइंग विमाने व १७ आयफेल टॉवर एवढ्या वजनाच्या लोखंडाचा वापर.
शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू एकूण २२ किमी लांबीचा असून त्यातील १६.५० किमी भाग समुद्रामध्ये तर उर्वरित ५.५० किमी भाग जमिनीवर.
भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू तर जगातील 12 व्या क्रमांकाचा सागरी सेतू. सागरी सेतूसाठी 18 हजार कोटी रुपयांचा खर्च.
सागरी सेतू मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा.
मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्ग यातील अंतर सुमारे १५ किमीने कमी झाले.
महासेतू पूर्ण होण्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागला.
