पहिला रायगड जिल्हा बरबाद होणार
मुंबई-जगाचा इतिहास हा भूगोलावर अवलंबून आहे, सर्व वाद हे जमिनीसाठी होतात, महाराष्ट्राचा भूगोल हा धोक्यात आहे, इथल्या जमिनी विकत घेऊन महाराष्ट्राचं अस्तित्व संपवलं जात आहे असं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. याची सुरूवात रायगडपासून होणार असून न्हावा शेवा शिवडी सीलिंकमुळे रायगडचं वाटोळं होणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ते मराठी नाट्य संमेलनामध्ये बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले की, जगाचा इतिहास हा भूगोलावर म्हणजे जमिनीवर अवलंबून आहे. आतापर्यंत सर्व आक्रमकांनी जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भूगोल काबिज करण्यासाठी जो संघर्ष आहे त्याला इतिहास म्हटलं जातंय. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे. तो अतिशय हुशारीने विकत घेतला जात आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचं अस्तित्व संपवलं जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राज ठाकरे म्हणाले की, रायगड जिल्हा पहिला बरबाद होणार. बाहेरचे लोक येतात, जमिनी घेतातयत आणि मालक होणार. त्यामुळे रायगडचे लोक इथे नोकर होणार. न्हावा शेवा शिवडी सीलिंकने रायगडचं वाटोळं होणार. या आधी मी पुण्याबद्दल तसं सांगितलं होतं, आता तेच होतंय.
बुलेट ट्रेनची गरज काय हे मला अजूनही कळालं नाही. दोन तासामध्ये मुंबईमधून अहमदाबादला जाण्याने कुणाचा फायदा होणार आहे? त्यासाठी एक लाख कोटी रपये कशाला खर्च करायला पाहिजे? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
महाराष्ट्रातल्या मध्यमवर्गीय समाजाने सर्व ठिकाणी पुढे आले पाहिजे, राजकारण असो वा समाजकारण असो त्यामध्ये मध्यमवर्गाने भाग घेतला पाहिजे. कारण महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली. देशातल्या सर्व विचारांना महाराष्ट्राने जन्म दिला. जातीपाती आणि इतर गोष्टींमध्ये आपण बरबटून जाण्यापेक्षा आपण सुज्ञ झाले पाहीजे असं राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र एकसंध राहू नये म्हणून सर्वजण प्रयत्न करत आहेत, आज जे काही जातीपातीच्या नावावर सुरू आहे त्यामागे कुणीतरी वेगळेच आहेत असं राज ठाकरे म्हणाले. जसं आमच्या भाषणाला रिटेक नाही, तसं नाटकाला ही रिटेक नसतो. खरं तर हल्ली सकाळी सकाळी बातमी पाहिली की म्हणावं वाटतं की थोडं रिटेक घ्या असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.