Home Blog Page 1183

अवैध दारूसह सुमारे २ कोटी ८२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे, दि. २८: आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अवैध दारू निर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून गेल्या दोन महिन्यात २ कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने १ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत छापे टाकत ४२६ वारस गुन्ह्यांची नोंद व ४११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २० हजार ६७५ लिटर गावठी हातभट्टी दारू, ७६१ लिटर देशी मद्य, १८ हजार २९५ लिटर विदेशी मद्य, १३८ लिटर बिअर व १ हजार ८२३ लिटर ताडीसह ३६ वाहने असा २ कोटी ८१ लाख ९१ हजार ३४९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ९३ अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या व सराईत आरोपी विरूद्ध चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्रासाठी दाखल ४४२ प्रस्तावांपैकी २४८ जणांचे बंधपत्र घेण्यात आले असून ९७ लाख ७१ हजार रुपये बंधपत्राची रक्कम घेण्यात आली आहे. बंधपत्र घेतल्यानंतर ४१ प्रकरणांत नियमाचे उल्लंघन निदर्शनास आले.

१ एप्रिल २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरुद्ध तसेच अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाई करून २०३ गुन्हे नोंदवले. त्यामधील ४६८ आरोपीना अटक करुन न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने १७० आरोपींना दोषी ठरविले असून या आरोपींना ५ लाख ८३ हजार १०० रूपये इतका द्रव्य दंड ठोठविला आहे. यामुळे अवैध मद्य विक्री करणाऱ्यांसोबतच अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांनाही चाप बसणार आहे.

अवैध मद्य व्यवसायात गुंतल्याबद्दल वारंवार गुन्हे नोंदविलेले तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करुनही वर्तणुकीत बदल झाला नाही अशा आरोपीविरूद्ध एम.पी.डी.ए कायदा १९८१ अंतर्गत पोलीस कारवाई करण्यात येते. यामध्ये दाखल ४८ प्रकरणात पोलीस आयुक्तालयाकडून कारवाई करून १० आरोपी विरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. परवानाकक्षा नमुना एफएल-३ अनुज्ञप्तीविरुद्ध एकूण २४९ नियमभंग प्रकरणे, त्यापैकी ३ निलंबन संख्या व ४४ लाख ९० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बिअर/वाईन शॉपी (एफएलबीआर-२) अनुज्ञप्तीविरुध्द ४४ नियमभंग प्रकरणे, १५ निलंबन संख्या, ७ लाख ३० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असून ४ आरोपींचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. किरकोळ अनुज्ञप्ती कक्षाबाहेरील तसेच रूफ टॉप विरूद्ध ३४ नियमबाह्य प्रकरणात कारवाई केलेली असून १७ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कारवाईसाठी १४ नियमित व ३ विशेष पथके तयार
आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री तसेच परराज्यातील मद्य, अवैध ताडी आदींची विक्री, अवैध ढाब्यांवर मद्याची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने एकुण १४ नियमित व ३ विशेष पथके तयार केली ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. तसेच रात्रीची गस्त घालण्यात येणार आहे. राज्याचा महसूल चुकवून परराज्यातून येणाऱ्या मद्य साठ्यावर तसेच किरकोळ अनुज्ञप्तीचे व्यवहार विहीत वेळत चालू नसल्यास व काहीही आक्षेपार्ह आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

नागरिकांना अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री याबाबत माहिती मिळाल्यास टोल फ्री क्र. १८००२३३९९९ व दूरध्वनी क्र. ०२०-२६०५८६३३ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत यांनी केले आहे.

औंधमध्ये एम्स उभारण्याच्या घोषणेचे स्वागत-ससून वरील भार हलका होईल:-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – राज्य सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या घोषणेचे स्वागत असून, त्यामुळे ससून रूग्णालयावरील भार हलका होईल, अशी प्रतिक्रिया आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केली आहे.

ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या धर्तीवर औंध येथे ८०० बेड्सच्या क्षमतेचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन सुमारे दोन वर्षांपूर्वी उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार शिरोळे यांनी केले होते. शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ससून हॉस्पिटलला अजून एक सक्षम पर्याय उपलब्ध व्हावा, असा या निवेदनातील मागणीमागे उद्देश होता. औंध येथे ८४ एकर जागा विनावापर पडून आहे. त्याजागी हॉस्पिटल व्हावे, अशी मागणी होती आणि त्याच जागी एम्स हॉस्पिटल होत आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. नागपूर येथील एम्स हॉस्पिटलमध्ये ८३० बेड्सची सुविधा उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर पुण्यातही एम्स हॉस्पिटल साकारणार आहे. ही सुविधा लवकरात लवकर उपलब्ध व्हावी, यासाठी पाठपुरावा करेन, असे आमदार शिरोळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

मातृभाषा हे संवादाचे उत्कृष्ट माध्यम – प्राचार्या डॉ. बिंदू सैनी

एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये
मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२४) जागतिकीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे व्यवहारिक व ज्ञानभाषा म्हणून इतर भाषा वापरल्या जातात. परंतु कौशल्य आत्मसात करण्यासाठी, एखादी नव संकल्पना समजून घेणे किंव्हा प्रभावीपणे सादर करण्यासाठी आपली मातृभाषा हेच संवादाचे उत्कृष्ट माध्यम आहे असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी (दि. २८) मराठी राजभाषा दिन निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. सैनी बोलत होत्या. इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. यामधे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे नाटक सादर केले. गायन, नृत्य, पारंपरिक लोकगीते देखील सादर केली. अशिता भोंडवे या विद्यार्थिनीने मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. वंदना सांगळे, मंजुषा नाथे, सुनीता पाटील, योगिता देशमुख, सुचिता फूलारी आणि जयश्री काळे या शिक्षिकांनी देखील मार्गदर्शन केले.
एस. बी. पाटील स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

शिवसेनेने बुधवार पेठ मेट्रो स्थानकाचे केले कसबा पेठ नामांतरण

पुणे-कसब्यात असलेल्या मेट्रो स्थानकाला प्रशासनाकडून बुधवार पेठ नाव देण्यात आले होते , शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) कसबा मतदारसंघाचे विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण यांनी मेट्रो प्रशासनाला दोन वर्षा पूर्वी नाव बदलणे संधर्भात पत्र दिले आसूनही स्टेशनला बुधवार पेठ स्टेशन असा बोर्ड लावण्यात आला होता . या विरोधात कसबा मतदारसंघातील संतप्त शिवसैनिक व स्थानिक नागरिकांनी तो बोर्ड तोडून आज आखेर शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते कसबा पेठ स्टेशन” आसा बोर्ड लावला .

कसबा पेठेत होऊ घातलेल्या मेट्रो स्टेशनला बुधवार पेठ हे नाव देऊन मेट्रो अधिकारी व राज्य शासन कोणती भूमिका पार पाडत आहे ? या स्टेशन बरोबरच माता रमाई आंबेडकर पुतळ्याजवळील स्टेशनला रमाई स्मारकाने जागा देऊनही रुबी हॉल नाव देण्यात आले. आरटीओ जवळील स्थानकाला मंगळवार पेठ नाव देण्यात आले, त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक संस्था सुरू करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना माफक दरात शिक्षण उपलब्ध करून दिले असताना त्यांचे नाव न देता दुसरेच नाव कसे दिले जाते ? अशा अनेक ठिकाणी मेट्रोने स्थानकांना चुकीची नाव दिली आहेत ती त्वरित बदलण्यात यावीत अन्यथा महामेट्रो कार्यालयावर उग्र आंदोलन करण्यात येईल. असे संजय मोरे शहरप्रमुख, पुणे म्हणाले .

मेट्रो प्रशासनाकडून कसबा पेठेत होऊ घातलेल्या स्टेशनला बुधवार पेठ स्टेशन नाव बदलून कसबा पेठ स्टेशन हे नाव दिले जात नाही तोवर कसबावासी शांत बसणार नाही. असे मुकुंद चव्हाण म्हणाले .

यावेळी आंदोलनात पुणे शहरप्रमुख संजय मोरे, कसबा विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण,अनिल जाधव,नागेश खडके, शुभम दुगाणे,राजेंद्र शिंदे, नंदु काळे, जुबेर तांबोळी,कुणाल शेलार, बकुळ डाखवे,गणेश आगरकर,संजय पायगुडे, विनायक गायकवाड,प्रमोद रसाळ,शिरीष गायकवाड,अशोक मांढरे,बाळासाहेब मेमाणे, विनायक मेमाणे,बाळासाहेब बोराडे,रमेश साळुंके,राजाभाऊ नानेकर, सुनील वैद्य,सतीश रुके, विजय जगताप,सुरेश आढाव ,ओमकार वैद्य, नीलेश पाटसकर, प्रशांत कोलते,महेश जगनाडे
महिला आघाडी :- गौरी चव्हाण ,निकिता मारटकर , स्वाती ठकार,मीनाक्षी हरिश्चंद्र उपस्थित होते.

विदेश प्रवास निषिध्द हे महर्षी दयानंद सरस्वती यांनी नाकारले – आचार्य सोनेराव

महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त शोभायात्रा, व्याख्यान

पिंपरी, पुणे (दि. २८ फेब्रुवारी २०२४) पूर्वीच्या काळात समुद्र ओलांडून विदेशात जाणे निषिध्द मानले जात होते. हे नाकारून शिक्षण, व्यापार, उद्योग, व्यवसायासाठी ‘सिंधू बंदी’ उठवण्याचे महान कार्य महर्षी दयानंद सरस्वती यांनी केले. जाती, वर्ण व्यवस्था नाकारून, वेदांचे पठण, ज्ञान सर्वांसाठी खुले करीत अस्पृश्यता संपवण्याचे प्रथम पाऊल त्यांनी उचलले. नाभिक समाजाच्या व्यक्तीच्या घरी जेवण करून रोटी बेटी व्यवहार वाढवून जातिव्यवस्थेवर आधारित व्यवसाय बंदी मिटविण्याचे क्रांतिकारी कार्य विसाव्या शतकात महर्षी दयानंद सरस्वती यांनी केले आहे असे प्रतिपादन आचार्य सोनेराव यांनी केले.
आर्य समाज संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त पिंपरी येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात आचार्य सोनेराव बोलत होते. यावेळी पिंपरी आर्य समाज मार्गदर्शक मुरलीधर सुंदरानी, पंडित विश्वनाथ शास्त्री, विवेक शास्त्री, अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, उपाध्यक्ष उत्तम दंडीमे, सचिव हरीश तिलोकचंदानी, खजिनदार जयराम धर्मदासानी, ग्रंथालय सचिव दिनेश यादव, आर्यवीर दलाचे पिंपरी प्रमुख संजय भाट, जिल्हा सचिव दिगंबर रिद्धीवाडे, उपमंत्री कमलेश धर्मदासानी, दत्ता सूर्यवंशी, सदस्य अतुल आचार्य, महिला प्रमुख नलिनी देशपांडे, शाळेचे सचिव संजय वासवानी, मुख्याध्यापक सलू मॅडम आदींसह विद्यार्थी, शिक्षक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी पिंपरी कॅम्प, पिंपरी गाव परिसरातून सकाळी शालेय विद्यार्थ्यांनी शोभायात्रा काढली होती. यावेळी शिवकालीन युद्धशास्त्रातील चित्त थरारक प्रात्यक्षिके रवींद्र जगदाळे व सहकाऱ्यांनी सादर केली.

भाजपकडून राज्यातील लोकसभेच्या २३ जागांवर निवडणूक निरीक्षकांची यादी जारी

भाजपच्या निरीक्षकांची पूर्ण यादी-
भिवंडी- योगेश सागर, गणेश नाईक
धुळे- श्रीकांत भारतीय, राम शिंदे
नंदरुबार- संजय भेगडे, अशोक उके
जळगाव- प्रविण दरेकर, राहुल आहेर
रावेर- हंसराज अहिर, संजय कुटे
अहमदनगर- रविंद्र चव्हाण, देवयानी फरांदे
जालना- चैनसुख संचेती, राणा जगजीतसिंह
नांदेड- जयकुमार रावल, सुभाष देशमुख
बीड- सुधीर मुनगंटीवार, माधवी नाईक
लातूर- अतुल सावे, सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर- मुरलीधर मोहोळ, सुधीर गाडगीळ
माढा- भागवत कराड, प्रसाद लाड
सांगली- मेधा कुलकर्णी, हर्षवर्धन पाटील
नागपूर- मनोज कोटक, अमर साबळे
भंडारा-गोंदिया- प्रविण दाटके, चित्रा वाघ
गडचिरोली- अनिल बोंडे, रणजीत पाटील
वर्धा- रणधीर सावरकर, विक्रांत पाटील
अकोला- संभाजी पाटील, विजय चौधरी
दिंडोरी- राधाकृष्ण विखे पाटील, संजय कानेकर
उत्तर मुंबई- पंकजा मुंडे, संजय केळकर
उत्तर-पूर्व मुंबई- गिरीश महाजन, निरंजन डावखरे
उत्तर मध्य मुंबई- धनंजय महाडिक, राजेश पांडे

एनडीआरएफ, पोलिसांना उपयुक्त गार्डियन व मॅव्ह रिक ड्रोनचे लोकार्पण 

एन्हान्सेफ इंडिया चे शरद श्रीवास्तव, तनुश्री श्रीवास्तव यांचा पुढाकार ; वीरचक्र प्राप्त कर्नल ललित राय (निवृत्त),  सेना मेडल प्राप्त मेजर जनरल अलोक देब यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : दंगल नियंत्रणासाठी व विविध मोहिमांसाठी पोलिसांना उपयुक्त, पूर-भूकंपासारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत औषधे पोहचविण्यासाठी तसेच उत्तम आवाज असलेल्या पोलीस आणि लष्कराच्या गरजेनुसार साकारलेल्या गार्डियन या अत्याधुनिक ड्रोनचे लोकार्पण पुण्यात झाले. तसेच, विशेषत: पोलीस आणि लष्करातील जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी उपयुक्त असलेल्या मॅव्ह रिक या ड्रोनचेही लोकार्पण झाले.

एन्हान्सेफ इंडिया चे संचालक शरद श्रीवास्तव, व्यवस्थापकीय संचालक तनुश्री श्रीवास्तव यांनी हे अत्याधुनिक ड्रोन साकारले असून त्याचे लोकार्पण हॉटेल हयात पुणे येथे आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी वीरचक्र प्राप्त कर्नल ललित राय (निवृत्त), सेना मेडल प्राप्त मेजर जनरल अलोक देब (निवृत्त), कर्नल अनुप महाजन (निवृत्त), ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.प्रताप परदेशी, आयोजक शरद श्रीवास्तव, तनुश्री श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

ललित राय म्हणाले, कारगिल युद्धात अशा प्रकारची उपकरणे असती, तर कदाचित आपल्या भारतीय सैनिकांचे जीव वाचविता आले असते. पाकिस्तानकडे त्याकाळी अगदी अत्याधुनिक नाही, परंतु ड्रोनचा काही प्रमाणात वापर केला गेला होता, आम्ही मशिनगनने ते पाहणीसाठी पाठविलेले ड्रोन पाडले होते. जम्मू-काश्मीरमधील डोडा भागातील दहशतवाद्यांशी मुकाबला करण्याकरिता देखील अशा प्रकारच्या अत्याधुनिक ड्रोनचा उपयोग झाला असता, अशी आठवण यावेळी त्यांनी सांगितली.

ते पुढे म्हणाले, ड्रोन हे छोटे उपकरण असते, तरी ते अत्यंत महत्वाचे आहे. रशिया-युक्रेन युद्धात आपण पाहिले की युद्धाचा प्रकार बदलला आहे. ड्रोनच्या माध्यमातून रणगाडे देखील उध्वस्त होऊ शकतात. मिसाईल पेक्षा ड्रोनचा खर्च कितीतरी पटीने कमी आहे. पर्वतरांगांमध्ये लढताना याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे लष्कराला आणि इतर सुविधांसाठी सामान्यांकरिता देखील ड्रोन उपयुक्त आहे.

अ‍ॅड.प्रताप परदेशी म्हणाले, पोलिसांना गणेशोत्सव, जगन्नाथ यात्रा यांसारख्या गर्दीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता या अत्याधुनिक ड्रोनचा उपयोग होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेत आधुनिक ड्रोन निर्मिती करुन श्रीवास्तव कुटुंबाने मोठा वाटा उचलला आहे.

शरद श्रीवास्तव म्हणाले, देशांतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आम्ही हे ड्रोन साकारले आहेत. पोलीस, लष्कर, एनडीआरएफ सारख्या सुरक्षा व्यवस्था यांच्या अपेक्षा पूर्ण करीत हे ड्रोन साकारण्यात आले आहेत. यांची उडण्याची क्षमता १५ किमी पर्यंत असून १५ किलो वजन देखील हे ड्रोन वाहून नेऊ शकतात. सर्च लाईटस्, स्पिकर्स पीए सिस्टिम देखील यावर असल्याने नागरी क्षेत्रांमध्ये देखील याचा वापर करता येणे शक्य आहे. कोणत्याही प्रकारच्या वातावरण याचा वापर करता येणार असून गुन्हे रोखण्यासाठी आणि आपत्कालिन परिस्थितीशी लढा देण्यासाठी पोलीस यंत्रणा व इतर यंत्रणांना हे ड्रोन उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने चर्चा सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महाविद्यालयांची भूमिक मोलाची- श्रीकांत देशपांडे

पुणे, दि. 28: मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा असून यात महाविद्यालयांनी मोलाची भूमिका बजावावी, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

‘मराठी भाषा गौरव दिन’ व ‘जागतिक एनजीओ दिना’निमित्त राज्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्राध्यापकांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधताना ते बोलत होते.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच वर्शिप अर्थ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, पुण्याच्या स्वीप समनव्य अधिकारी अर्चना तांबे यांच्यासह जिल्ह्यांचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, स्वीप समनव्य अधिकारी, वर्शीप अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष पराग मते, व्यवस्थापकीय संचालक तेजस गुजराथी, निवडणूक साक्षरता मंडळ राज्य समन्वयक अल्ताफ पिरजादे तसेच व जिल्हास्तरीय समन्वयक तसेच विविध जिल्ह्यातील सुमारे ४५० मुख्याध्यापक, प्राचार्य, नोडल अधिकारी उपस्थित होते.

निवडणूकीत विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून नेमणूक करणार
यावेळी होणाऱ्या निवडणूकांमध्ये अभिनव कल्पना राबविण्यात येणार असल्याचे सांगून श्री. देशपांडे म्हणाले, निवडणूक प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी त्यांना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर त्यांना विविध बाबींसाठी स्वयंसेवक म्हणून कामाची संधी दिली जाणार आहे. तसेच मतमोजणीच्या ठिकाणी विद्यार्थी प्रतिनिधी स्वयंसेवक म्हणून संधी दिल्या जाणार आहेत. त्याबद्दल त्यांना सहभागाचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहेत.

श्री. देशपांडे पुढे म्हणाले, मागील वर्षभरात निवडणूक साक्षरता मंडळद्वारे मतदारनोंदणीसाठी तसेच अन्य उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना अद्यापही १० मार्चपर्यंत मतदार नोंदणी करू शकत असल्याचे सांगण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. भारत निवडणूक आयोग आणि शिक्षण विभाग यांच्यात दिल्ली येथे झालेल्या सामंजस्य कराराची सविस्तर माहितीही त्यांनी दिली.

पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत घरोघरी भेटी दिल्या, यात विद्यार्थ्यांचाही सहभाग मोठा होता. या लोकसभा निवडणुकीवेळी राज्यातील सर्व जिल्ह्यात यासारखे घरोघरी भेटी, पथनाट्यांद्वारे जनजागृती, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी फिरत्या व्हॅनद्वारे जनजागृती करावी, यासाठी महाविद्यालयांना जिल्हाधिकारी आणि वर्शीप अर्थ फाऊंडेशनची मदत होईल.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी निवडणुकीत काय कामे करावी याबद्दल मार्गदर्शन करीत प्राचार्यांच्या प्रश्नांचे निरसन करत संवाद साधला. नोडल अधिकाऱ्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण सूचनांची दाखल घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

या ऑनलाईन बैठकीचे प्रास्ताविक श्री. गुजराथी यांनी केले. भारत निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ सल्लागारांनी नुकतेच मुंबई येथे भेट दिली असता निवडणूक साक्षरता मंडळाद्वारे आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करुन हे काम इतर राज्यातही नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे श्री. गुजराथी म्हणाले.

माजी खासदार नीलेश राणे यांना महापालिकेचा जोरदार झटका,साडेतीन कोटींचा कर थकवल्याचा आरोप करत पुण्यातील मालमत्ता केली सील

पुणे- पुणे महापालिका अधिकाऱ्यांना धमक्या दिल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर आरोप असताना आता पुणे महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा माजी खासदार नीलेश राणे यांना पुणे महापालिकेने जोरदार झटका दिला आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागाने येथील आर डेक्कन मॉलमधील मिळकतीचा सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा कर थकवल्या प्रकरणी नीलेश राणे यांच्या मालमत्तेला सील ठोकण्याची कारवाई केली आहे.पुण्यातील डेक्कन भागातील आर डेक्कन मॉलमध्ये माजी खासदार नीलेश राणे यांची मालमत्ता आहे. या मालमत्तेचा सुमारे 3 कोटी 77 लाख 53 हजार रुपयांचा कर नीलेश राणे यांनी थकवला होता. या थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या कर संकलन विभागाने राणे यांना अनेकदा नोटीस बजावली. पण त्यांनी करभरणा केला नाही. अखेर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नीलेश राणे यांच्या या मालमत्तेला सील ठोकले. महापालिकेने नीलेश राणे यांच्या 3 मजल्यांच्या मिळकतीचे वरचे 2 मजले सील केले आहेत.

पुणे महापालिकेकडून मालमत्ता कराच्या वसुलीसाठी शहरात धडक मोहीम राबवण्यात येत आहे. या प्रकरणी अनेक मिळकतींना सील ठोकण्याची कारवाई केली जात आहे. या अंतर्गत नीलेश राणे यांच्या मालमत्तेलाही गत 2 वर्षांपासून सातत्याने नोटीसा बजावण्यात येत होत्या. पण प्रत्येक नोटीसीनंतर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात होता. यामुळे प्रशासनाने या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई केली नव्हती. काही महिन्यांपूर्वी बजावण्यात आलेल्या नोटीसीनंतर थेट महापालिका आयुक्तांनाच फोन करून कारवाई न करण्याची सूचना करण्यात आली होती. यामुळे कारवाई लांबली. पण अखेर मंगळवारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी ठोस कारवाई करत नीलेश राणे यांच्या मालमत्तेला सील ठोकले.लवकरच हेच अधिकारी आता एका दानशूर उद्योजकाकडे दावा केलेली,पण त्याने नाकारलेली ३ कोटी २० लाखाची थकबाकी देखील वसूल करणार असल्याचे वृत्त आहे.

इको फॅक्टरी फाउंडेशनच्या शाश्वत भारत सेतूचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

0

द इको फॅक्टरी फाउंडेशनने (टीईएफएफ) पुणे, भारतातील अनन्यसाधारण व चाकोरीबाह्य शाश्वत भारत सेतू- विनिंग नेट झिरो विकसित केले आहेशून्य कार्बन उत्सर्जन व शाश्वत भारताचे ध्येय साध्य करण्यात मदत करणारे हे एक फिरते अध्ययन व जागरूकता केंद्र आहे. 

नागपूर: भारत सरकारमधील रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयांचे मंत्री नितीन गडकरी यांनी शाश्वत भारत सेतू- विनिंग नेट झिरो या केंद्राचे उद्घाटन रविवारी नागपूरमध्ये केले. हे केंद्र द इको फॅक्टरी फाउंडेशनने विकसित केले आहे. लोकांपासून पृथ्वीपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशा शाश्वत जीवनशैली, उपाय आणि पद्धतींना समर्पित असे अतिप्रगत अनुभव हे केंद्र देते. यातून नेट झिरो इंडिया अर्थात शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने जाण्यात मदत होऊ शकते. 

द इको फॅक्टरी फाउंडेशनचे संस्थापक आनंद चोरडिया यांनी वेस्ट टू वेल्थ, जल व्यवस्थापन, ऊर्जा बचत यांसारख्या अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याद्वारे होणारे कार्बन उत्सर्जन कसे कमी करावे, चक्राकार अर्थव्यवस्थेचे महत्त्व तसेच ग्रामीण, शहरी, औद्योगिक व व्यक्तिगत विभागांत शाश्वतता कशी साध्य करावी हेही स्पष्ट केले आहे. व्यापक स्तरावर शून्य उत्सर्जन कसे साध्य करावे यावर त्यांनी भर दिला. 

गडकरीनी सर्वांना उद्देशून भाषण करताना या अनन्यसाधारण उपक्रमाची प्रशंसा केली आणि तो विकसित करणाऱ्यांचे अभिनंदन केलेते म्हणाले,”अशा प्रकारचे अपवादात्मक दर्जाचे केंद्र सुरू केल्याबद्दल द इको फॅक्टरी फाउंडेशनचे खूप अभिनंदन. शाश्वत भारत सेतूने अगदी महत्त्‍वाच्या मुद्दयाला स्पर्श केला आहे. त्यामुळे आपल्या पर्यावरणाचे आणि पर्यायाने वसुंधरेचे संवर्धन होणार आहे. शाश्वत भारत सेतूने ‘वेस्ट टू वेल्थ’ या संकल्पनेने उदाहरण घालून दिले आहे. केवळ पर्यावरणाला लाभदायक ठरणारे नाहीत, तर समुदायांसाठी उपजीविकेच्या संधीही निर्माण करणारे शाश्वत उपाय हे केंद्र पुरवणार आहे.” नेट झिरो उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योगदान देण्याच्या दृष्टीने हे केंद्र संपूर्ण राष्ट्राला प्रेरित करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 

टीईएफएफचे संस्थापक आनंद चोरडिया या ऐतिहासिक क्षणाविषयी म्हणाले,“प्रत्येकाला शून्य कार्बन उत्सर्जन करणारी तसेच शाश्वत जीवनशैली सहजतेने स्वीकारण्याची प्रेरणा देण्याच्या तसेच त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या आमच्या ध्यासाची चालना शाश्वत भारत सेतू-विनिंग नेट झिरो हे केंद्र विकसित करण्यामागे होती. शाश्वत भारत सेतू हा खऱ्या अर्थाने भारताला शून्य कार्बन उत्सर्जनाकडे घेऊन जाणारा पूल आहे असे मला ठामपणे वाटते. हे केंद्र खूप जणांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना प्रेरित करेल अशी आशाही आम्हाला वाटते, जेणेकरून हे सर्व जण शाश्वत भविष्यकाळाकडे जाणाऱ्या प्रवासात सहभागी होऊ शकतील.”

द इको फॅक्टरी फाउंडेशन (टीईएफएफ): 

द इको फॅक्टरी फाउंडेशन (टीईएफएफ) पुणे, ही आनंद चोरडिया यांनी २०१६ मध्ये स्थापन केलेली सेक्शन एट ना-नफा तत्त्वावरील संस्था आहे. शाश्वत जीवनशैली आणि उत्पादनांच्या तत्त्वाचा प्रसार करण्याचे ध्येय आमच्यापुढे आहे.  ग्रामीण, शहरी, औद्योगिक आणि व्यक्तिगत अशा चार प्रमुख विभागांमध्ये शाश्वतता साध्य करण्यावर आम्ही काम करतो. 

शाश्वत भारत सेतू विषयी: 

आपल्या वसुंधरेच्या पुनरुज्जीवनासाठी खूपच साधे आणि सहज अनुकरण करण्याजोगे उपाय आहेत हे अनेकांना माहीत नाही किंवा ते त्याबद्दल अनभिज्ञ आहेत. शाश्वत भारत सेतू विविध माहितीपूर्ण सादरीकरणांनी आणि आकर्षक साहित्यातून तयार करण्यात आला आहे. लोक ते पृथ्वी अशा विविध स्तरांवर शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने जाण्यात उपयुक्त ठरतील अशा शाश्वत जीवनशैली आणि पद्धती दाखवण्यासाठी शाश्वत भारत सेतू समर्पित आहे. तुम्ही हे माहितीपूर्ण सादरीकरण आणि प्रदर्शन बघाल, तेव्हा अधिक शाश्वत व पर्यावरणपूरक अशा जबाबदार भविष्यकाळाच्या दिशेने व्यक्ती, संस्था आणि समुदाय कशा प्रकारे ठोस पावले उचलू शकतात हे तुम्हाला कळेल. मिशन लाइफ- लाइफस्टाइल फॉर इन्व्हॉर्न्मेंट आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या राष्ट्रीय उद्दिष्टांशी तसेच संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास उद्दिष्टांशी हे केंद्र उत्तमरित्या जोडलेले आहे. जैवविघटनशील कचऱ्याचा वापर कसा करायचा, प्लास्टिक कसे रिसायकल करायचे याची माहिती हे केंद्र देते. त्याचप्रमाणे आपण पर्यावरणपूरक निवडी कशा करू शकतो, कार्बन उत्सर्जनातील आपला वाटा कसा कमी करू शकतो हेही सांगते. हे फिरते केंद्र भारतभरात प्रवास करणार आहे. 

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ च्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ मधील ‘मस्त मलंग झूम’ गाणं आऊट 

 आगामी ॲक्शन थ्रिलर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ मधील दुसरे गाण ‘ मस्त मलंग झूम’ हे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अक्षय कुमार आणि बॉलिवूडचा तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ यांच्या समावेश पाय-टॅपिंग डान्स मूव्ह असलेलं हे गाणं नक्कीच प्रेक्षकांना आकर्षित करणार यात शंका नाही.
 अरिजित सिंग, विशाल मिश्रा आणि निखिता गांधी यांनी हे गाणं गायल असून विशाल मिश्रा यांनी संगीत दिले आहे तर इर्शाद कामिल यांनी गाणं लिहिल आहे. बडे मियाँ छोटे मियाँच्या साउंडट्रॅकमध्ये हे गाणे चार चाँद लावून जाणार आहे. टायगर श्रॉफ चा #TigerEffect या गाण्यातून दिसणार आहे. 

 पूजा एन्टरटेन्मेंट आणि एएझेड फिल्म्स निर्मित, अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

https://www.instagram.com/reel/C34QPB2PRu9/?igsh=MXFleTY4aXV4aDd1NA==

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण-पश्चिम महाराष्ट्रामध्ये १९ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल

पुणे, दि. २८ फेब्रुवारी २०२४: वीजग्राहकांच्या सेवेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणारे महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचारी सध्या कंपनीवरील आर्थिक संकटामुळे थकीत वीजबिलांची वसूली मोहीम राबवित आहे. यात थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. या सरकारी कामात कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण, धक्काबुक्कीचे प्रकार होत असल्यास त्याची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाईसाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे.

दरम्यान गेल्या पाच महिन्यांत पश्चिम महाराष्ट्रात अभियंता, कर्मचाऱ्यांना मारहाण व धक्काबुक्की करण्याचे पुणे व सोलापूर जिल्ह्यात प्रत्येकी ६ आणि सांगली जिल्ह्यात एक असे एकूण १३ प्रकार घडले आहे. या प्रकरणातील १९ आरोपींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच आरोपींच्या अटकेची देखील कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात आली आहे. तसेच विविध कलमांनुसार आरोपींना दोन ते १० वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा वेळेत भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. महावितरणचे अभियंतेअधिकारी व कर्मचारी थकबाकीदारांकडे जाऊन वीजबिलांची थकीत रक्कम भरण्याची विनंती करीत आहेत. मात्र ती अव्हेरून शिवीगाळ व मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. शासकिय कामात अडथळा आणणेसरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे किंवा कार्यालयांची तोडफोड करणे आदी प्रकरणांमध्ये भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांन्वये शिक्षेची तरतूद आहे. महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्तव्य बजावता यावे यासाठी शिवीगाळ व मारहाणीच्या प्रकरणांमधील व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करण्यासाठी महावितरणच्या उच्चस्तरावरून पाठपुरावा सुरु करण्यात आला आहे.  

वीज ही सर्वांसाठी अत्यावश्यक व मूलभूत गरज आहे. महावितरण केवळ सरकारी कंपनी असल्याने वीजबिल नियमित भरले जात नसल्याने थकबाकी वाढत आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईसाठी आवश्यकतेनुसार स्थानिक पोलीस विभागाचे सहकार्य व संरक्षण घेण्याची सूचना पुणे प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी केली आहे. तसेच व्यवस्थापन संबंधित अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही नुकत्याच झालेल्या आढावा बैठकींमधून श्री. नाळे यांनी दिली. वीजग्राहकांनी देखील थकबाकीचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

दोन ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद – सरकारी कामात अडथळा आणणे (कलम ३५३), कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, अपशब्द वापरणे (कलम ५०४), धमकी देणे (कलम ५०६), मारहाण करणे (कलम ३३२ व ३३३), कार्यालयात जबरदस्ती प्रवेश करून तोडफोड करणे (कलम ४२७), सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, कार्यालयात गोंधळ घालणे (कलम १४३, १४८ व १५०), अनधिकृत जमाव गोळा करणे (कलम १४१ व १४३) आदी प्रकारांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलमांन्वये कारवाईची तरतूद आहे. या विविध कलमांन्वये दोन ते १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

अंगणवाडीतील मुलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डेस्कबॅगचे वाटप

0

मुंबई, दि. २८: मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मधून  अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांना डेस्कबॅग वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  कुर्ला पाईपलाईन भागातील १३८ क्रमांकाच्या अंगणवाडीतील मुलांना या डेस्कबॅगचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले.

‘वर्षा’ निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. यावेळी एसबीआय कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र बन्सल, कृष्णन कुट्टी, रोशन नेगी, सहकार देवगिरीचे फाऊन्डेशनचे संचालक राजेंद्र जोशी, अनंत अंतरकर, मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव तथा मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॉ. अमोल शिंदे आदी उपस्थित होते.

सीएसआर निधीमधून लोकाभिमुख कामांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ‘शासन आपल्या दारी’ ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान तसेच दिव्यांग बांधवांसाठी आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी विविध साधनांचे आणि उपयुक्त उपकरण संचांचे वाटप जनकल्याण कक्षातर्फे करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना डेस्कबॅग वाटपासाठी एसबीआय कॅप्स मार्केटकडून उपलब्ध सीएसआर निधीतून ठाणे आणि पालघर येथील ३०३० विद्यार्थ्यांना तर  ऑन लॅबोरेटरिज लिमिटेड यांच्याकडील सी एस आर मधून  अंगणवाड्यांमधील ४६०० मुलांना ह्या डेस्कबॅगचे वाटप करण्यात येणार आहे. आज त्यातील काही मुलांना प्रातिनिधिक स्वरूपात त्याचे वाटप झाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी लहानग्यांशी संवाद साधत चांगला अभ्यास करा, पहिला नंबर मिळवा.. अभ्यासासोबत भरपूर खेळा असे मुख्यमंत्र्यांनी मुलांना सांगितले.

डेस्कबॅग ह्या वजनाने अगदी हलक्या असून स्कूल बॅगबरोबरच फोल्डिंग डेस्कची देखील सुविधा त्यात आहे. या बॅगमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यास मदत होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

फायटरने बॉक्स ऑफिसवर जगभरात 360 कोटींचा गल्ला केला पार

 सिद्धार्थ आनंदच्या फायटरने अलीकडेच सिनेमांमध्ये महिनाभराचा कालावधी पूर्ण केला आहे आणि तो अजूनही हा चित्रपट मोठ्या दिमाखात सुरू आहे. 2024 चा पहिला हिट चित्रपट म्हणून फायटर ला ओळख मिळाली. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर या चित्रपटाने जगभरातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये 360 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 

 जगभरातील 360 कोटी ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शनमधून, चित्रपटाने देशांतर्गत बाजारातून 259 कोटींहून अधिक कमाई केली आहे, तर विदेशी बॉक्स ऑफिसमध्ये, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित चित्रपटाने 101 कोटींहून अधिक कमाई केली आहे. इंस्टाग्रामवर जाताना, Marflix Pictures ने शेअर केले, “जागतिक स्तरावर मन जिंकणे! #Fighter Forever ” Fighter ने सिध्दार्थ आनंदच्या हिट स्ट्रीकचा विस्तारही सेमी-हिट ते ऑल टाइम ब्लॉकबस्टर पर्यंतच्या 8 बॅक टू बॅक यशांसह केला आहे.

https://www.instagram.com/p/C30BKhfocv3/

 सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आणि Marflix Pictures च्या सहकार्याने Viacom18 Studios द्वारे निर्मित, फायटर स्टार हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. फायटर आता थिएटरमध्ये आहे.

लेखनाच्या माध्यमातून पोलिस समाजातील चांगले संवादक होऊ शकतात-अशोक धीवरे

ईश्वरी प्रकाशन तर्फे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक इंदलकर लिखित जेनिफर अँड द बीस्ट या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : सामान्यतः पोलीस हे अक्षरशत्रू असतात, ते कधीही आपल्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन लेखन करत नाहीत असा समज आहे. परंतु अशोक इंदलकर यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे हा समाज खोटा ठरला असून पोलीस हे समाजातील चांगले संवादक होऊ शकतात, त्यामुळे पोलिसांनी लेखनातून व्यक्त झाले पाहिजे आणि समाजाच्या व्यथा  मांडल्या पाहिजेत, अशी भावना महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे माजी प्रमुख अशोक धिवरे यांनी व्यक्त केले.
ईश्वरी प्रकाशन तर्फे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक इंदलकर लिखित जेनिफर अँड द बीस्ट या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन अशोक धीवरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य वन्य विभागाचे माजी प्रधान सचिव सुनील लिमये, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, प्रकाशक संतोष धायबर यावेळी उपस्थित होते.

अशोक धिवरे म्हणाले, जेनिफर अँड द बीस्ट या पुस्तकाची कथा केवळ जंगलापूर्ती मर्यादित नाही तर या पुस्तकाला वैश्विक अधिष्ठान आहे. ही कथा केवळ जंगलातील प्राण्यांची नाही तर धर्म, जात यांच्या पलीकडे जाऊन ही कथा माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रवृत्त करते, त्यामुळे ही कथा सर्वांनी वाचली पाहिजे.

श्रीपाल सबनीस म्हणाले, मराठी भाषेतील पुस्तके इंग्रजीसह इतर भाषांमध्ये भाषांतरित केली तर खऱ्या अर्थाने मराठी भाषा ही वैश्विक रूप धारण करू शकेल. मराठी भाषेमध्ये अनेक दर्जेदार कलाकृती आहेत, परंतु आपण त्यांना केवळ एका विशिष्ट भाषेमध्ये किंवा प्रादेशिकतेमध्ये अडकवून ठेवतो त्यामुळे मराठी भाषेची श्रीमंती ठराविक माणसांसाठी मर्यादित राहते. मराठी भाषेची श्रीमंती इतर भाषांमध्ये पोहोचण्यासाठी मराठी साहित्य क्षेत्रामध्ये भाषांतर मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे.

सुनील लिमये म्हणाले, सरकारी अधिकारी यांना व्यक्त होण्यासाठी मर्यादा असतात, परंतु ते जर लेखनाच्या माध्यमातून व्यक्त झाले तर त्या कलाकृतीमध्ये जिवंतपणा असतो आणि अशा जिवंत कलाकृती समाजाला नेहमीच आवडतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपले अनुभव विविध माध्यमातून मांडणे गरजेचे आहे.

अशोक इंदलकर म्हणाले, पोलीस दलामध्ये नोकरी करण्यापूर्वी मी लेखक होतो आणि मी तो लेखनाचा छंद कायम जपलेला आहे. पोलीस कमी लिहितात अशी अनेकदा तक्रार केली जाते परंतु त्यांनी लेखन केले तर ते अस्सल असते ते समाजाला भावते. जुन्नर आणि राधानगरी या भागामध्ये पोलीस सेवेमध्ये काम करताना मला आलेले अनुभव मी या पुस्तकाच्या माध्यमातून गोष्टी स्वरूपात लोकांसमोर मांडले आहेत ते निश्चितच  वाचकांना आवडेल.

मुखपृष्ठ कार राहुल बळवंत, अनुवादक सुरश्री जोशी, अशोक काकडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अश्विनी पळनीटकर यांनी सूत्रसंचालन केले. व्यंकटेश कल्याणकर यांनी प्रास्ताविक केले.