पुणे- पुणे महापालिका अधिकाऱ्यांना धमक्या दिल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर आरोप असताना आता पुणे महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा माजी खासदार नीलेश राणे यांना पुणे महापालिकेने जोरदार झटका दिला आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागाने येथील आर डेक्कन मॉलमधील मिळकतीचा सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा कर थकवल्या प्रकरणी नीलेश राणे यांच्या मालमत्तेला सील ठोकण्याची कारवाई केली आहे.पुण्यातील डेक्कन भागातील आर डेक्कन मॉलमध्ये माजी खासदार नीलेश राणे यांची मालमत्ता आहे. या मालमत्तेचा सुमारे 3 कोटी 77 लाख 53 हजार रुपयांचा कर नीलेश राणे यांनी थकवला होता. या थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या कर संकलन विभागाने राणे यांना अनेकदा नोटीस बजावली. पण त्यांनी करभरणा केला नाही. अखेर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नीलेश राणे यांच्या या मालमत्तेला सील ठोकले. महापालिकेने नीलेश राणे यांच्या 3 मजल्यांच्या मिळकतीचे वरचे 2 मजले सील केले आहेत.
पुणे महापालिकेकडून मालमत्ता कराच्या वसुलीसाठी शहरात धडक मोहीम राबवण्यात येत आहे. या प्रकरणी अनेक मिळकतींना सील ठोकण्याची कारवाई केली जात आहे. या अंतर्गत नीलेश राणे यांच्या मालमत्तेलाही गत 2 वर्षांपासून सातत्याने नोटीसा बजावण्यात येत होत्या. पण प्रत्येक नोटीसीनंतर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात होता. यामुळे प्रशासनाने या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई केली नव्हती. काही महिन्यांपूर्वी बजावण्यात आलेल्या नोटीसीनंतर थेट महापालिका आयुक्तांनाच फोन करून कारवाई न करण्याची सूचना करण्यात आली होती. यामुळे कारवाई लांबली. पण अखेर मंगळवारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी ठोस कारवाई करत नीलेश राणे यांच्या मालमत्तेला सील ठोकले.लवकरच हेच अधिकारी आता एका दानशूर उद्योजकाकडे दावा केलेली,पण त्याने नाकारलेली ३ कोटी २० लाखाची थकबाकी देखील वसूल करणार असल्याचे वृत्त आहे.