Home Blog Page 1184

आरे कॉलनीतील स्वांतत्र्यवीर सावरकर उद्यानाला आली अवकळा

0

उद्यानाचे सुशोभीकरण, स्वतंत्र देखभाल यंत्रणा उभारण्याची माजी नगरसेविका प्रिती सातम यांची मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मागणी

मुंबई
आरे कॉलनीतील स्वांतत्र्यवीर सावरकर उद्यानाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. सद्यस्थितीत हे उद्यान प्रेमी युगुल आणि मद्यपींचा अड्डा बनला आहे. दिवसरात्र अनेक तळीराम येथ तळ ठोकून असतात. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. याबाबत कारवाई करावी तसेच उद्यानाचे सुशोभिकरण करून त्याची देखभाल करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी अशी मागणी मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्याकडे गोरेगाव पूर्व येथील भाजपच्या माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी पत्राद्वारे केली आहे

उद्यानाचे सुशोभिकरण व नुतनीकरण हे म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्यावतीने सन २०२०-२१च्या क वर्ग पर्यटन निधीतून करण्यात आले होते. उद्यानाच्या सुशोभिकरण आणि नुतनीकरणाचे लोकार्पण तत्कालिन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. लोकार्पणानंतर स्थानिक आमदार रविंद्र वायकर यांनी आपल्यासह आपल्या नेत्यांचे फोटो प्रदर्शित करत सावरकर उद्यानाचे नामफलक प्रत्येक प्रवेशद्वारांवर लावले आहेत. पण सदर उद्यानाचे लोकार्पण झाल्यानंतर उद्यानाच्या देखभालीकडे आ. वायकर यांनी लक्षच दिले नाही. परिणामी आज दोन ते अडीच वर्षांपूर्वी बनवलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली आहे.

स्वा. सावरकर यांच्या प्रति देशवासियांना तीव्र आदर आहे. हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते म्हणून सावरकर यांची ओळख असून कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सावरकर यांचे नाव असणाऱ्या या उद्यानाची दुरवस्था झालेली पाहून अतिव दु:ख होत आहे. स्वा.सावरकरांच्या नावे असलेल्या या उद्यानाला आलेला हा बकालपणा कुणाही राष्ट्रप्रेमी जनतेला आवडणार नाही. या उद्यानाचे सुशोभिकरण व नुतनीकरण करत लोकार्पण करणाऱ्या उबाठा शिवसेनेने काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी सलगी करत आघाडी केली आहे. त्यामुळे त्यांना आता सावरकरांबाबत कोणताही आदर आणि प्रेम राहिलेले नाही. त्यांच्या पक्षाने हिंदुत्वच सोडल्याने त्यांना आता सावरकरांचाही विसर पडू लागला आहे. सदर उद्यानाची दुरवस्था होत असतानाच वायकरांना या उद्यानाची देखभाल राखण्याचा प्रयत्न किमान सावरकर यांच्या नावासाठीही करावासा वाटत नाही. यातच त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट होत आहे असेही माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी म्हटले आहे.

या उद्यानातील प्रत्येक झाड हे पाण्याअभावी सुकून गेले आहे, गवताचा भाग सुकून, करपून गेला आहे. पायवाटांमध्ये कचरा पसरल्याने लोकांना चालताही येत नाही. कचरा दररोज साफ स्वच्छ केला जात नसल्याने एकप्रकारे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे सावरकर यांच्या नावाने सुरु असलेल्या उद्यानाची जागा आता खंडर बनले असून त्याचा फायदा आता नशेबाज लोक आणि प्रेमी युगलांकडून घेतला जात आहे. या उद्यानांमध्ये दिवसा आणि रात्री दारु पिणारे आणि गर्दुल्ल्यांचा वावर असतो. दारु पिऊन याच ठिकाणी बॉटल्स टाकल्या जातात, बऱ्याचदा दारु पिऊन बॉटल्स तिथेच फोडून टाकल्या जातात. याचा काचा जिथे तिथे पडलेल्या दिसून येत आहेत. गर्दुल्ले उद्यानातील कोपऱ्यात बसून असल्याने तसेच त्यांचा वावर असल्याने या उद्यानांमध्ये आता सर्वसामान्य जनता सकाळी किंवा संध्याकाळी फिरण्यास किंवा बसण्यास जाण्याचीही हिंमत दाखवत नाहीत. संध्याकाळच्यावेळी प्रेमी युगलांचाही वावर वाढतच चालला आहे. त्यांच्या विकृत चाळ्यांमुळे या उद्यानातील खेळण्याची साहित्य असूनही पालक मुलांना याठिकाणी घेऊन येण्यास तयार होत नाही. या उद्यानाच्या शेजारी दुध सागर आणि महानंदा या निवासी वसाहती असून या सर्वांसाठी हे उद्यान डोकेदुखी ठरु लागले आहे. उद्यानातील नशेबाज लोक आणि विकृत चाळे करणारे प्रेमी युगल यामुळे या दोन्ही वसाहतींमधील लोकांना या मार्गावरुन ये -जा करण्यास भीती वाटत आहे, त्यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सावरकर यांचे नाव या उद्यानाला आहे, पण त्यात अशाप्रकारे धंदे चालत असल्याने एकप्रकारे तमाम हिंदुंच्या भावना भडकल्या जात आहेत. त्यामुळे स्थानिक आमदारांनी आपले फलक लावून या उद्यानाची दुरवस्था करून तमाम सावरकर प्रेमींच्या अवमान केला आहे. सदर उद्यान हे प्रेमी युगल आणि नशेबाजांसाठी एक अड्डा निर्माण करून दिला का असा सवाल आता स्थानिक रहिवाशांकडून केला जात आहे. त्यामुळे सावरकरांच्या नावाने खुले केलेले हे उद्यान या भागातील जनतेला सुसज्ज असे निर्माण करून देण्यासाठी याचे सुशोभिकरण करून त्यांची योग्यप्रकारे देखभाल राखण्यासाठी निधी उपलब्ध करून देत प्रयत्न केले जावे. या उद्यानाचे सुशोभिकरण करून त्यांची देखभाल राखल्यास खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना श्रध्दांजली ठरेल असेही प्रिती सातम यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे

माटुंग्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नमो युवा चौपाल, नमो वॉरियर्स कार्यक्रम यशस्वी

0

मुंबई

विकसित भारताचे आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम तरुणाई करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर भारताच्या युवा शक्तीचा प्रचंड विश्वास आहे असे प्रतिपादन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज येथे केले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने माटुंगा येथे आयोजित नमो युवा चौपाल कार्यक्रमात ते बोलत होते. भाजयुमो मुंबई अध्यक्ष तजिंदर सिंह तिवाना यांच्या पुढाकाराने अभियान यशस्वी करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत देश विकसित भारत बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे. विकसित भारतासाठी देशाची दिशा काय असेल हे देशातील तरुणाईच ठरवणार आहे. नमो युवा चौपाल आणि नमो वॉरियर्स अभियानाच्या माध्यमातून हजारो तरुणांना जोडण्याचे काम होत आहे असेही मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.

यावेळी मुंबई भाजपा सरचिटणीस संजय उपाध्याय, मुंबई भाजपा उपाध्यक्ष पवन त्रिपाठी, भाजपा दक्षिण मध्य जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर, माजी नगरसेविका नेहल शाह आणि भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

जपानमध्ये विकास आणि संशोधन प्रस्तावांचे स्वागत – हिरोयुकी मात्सुमोतो

जपान टीएसके टोकियो सिस्टीम्स कैहात्सु कंपनी आणि पीसीसीओई मध्ये करार संपन्न

पिंपरी, पुणे (दि. २८ फेब्रुवारी २०२४) जपान मध्ये सध्य स्थितीत कुशल अभियंत्याना करिअरच्या खूप संधी आहेत. जपानी भाषा शिकण्यासाठी पात्रत्ता म्हणून ग्राह्य धरली जाणारी जेएलपीटीएन ३ ही परीक्षा उत्तीर्ण करून विद्यार्थ्यांनी करिअरसाठी जपानची निवड करावी असे आवाहन हिरोयुकी मात्सुमोतो यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, पीसीसीओई आणि जपान मधील टीएसके टोकियो सिस्टीम्स कैहात्सु कंपनी लिमिटेड यांच्या मध्ये भारत आणि जपान कला, संस्कृती आणि भाषा आदान प्रदान सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी टीएसके टोकियो सिस्टीम्स कैहात्सु कंपनी लिमिटेडचे हिरोयुकी मात्सुमोतो, ताकेशी इबुसुकी, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, कंपनीचे सल्लागार ताकेशी इबुसुकी, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे , डीन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डॉ. शितलकुमार रवंदळे, प्रा. गीतांजली झांबरे आदि उपस्थित होते.
मात्सुमोतो म्हणाले की, आमची कंपनी ही सायबर सुरक्षा प्रणाली, व्यावसायिक वाढीसाठी माहिती तंत्रज्ञान विकसन, कुशल मनुष्यबळ आदी क्षेत्रात कार्यरत आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंट क्षेत्रात विद्यार्थ्यांना फंडिंग करण्यासाठी इच्छुक आहे. तसे प्रस्ताव आमच्या पर्यंत आल्यास आम्ही त्याचे स्वागत करू.
प्रोसिड टेक्नोलॉजीसचे संचालक समीर लघाटे, स्वाती भागवत यांनी जपान मधील करिअरच्या उज्ज्वल संधी याबाबत सादरीकरण केले.
पीसीसीओई इंटरनॅशनल रिलेशन सेलच्या पुढाकाराने या माहिती आदान – प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वागत डॉ. गोविंद कुलकर्णी, प्रास्ताविक, आभार डॉ. रोशनी राऊत यांनी केले.

भाजपाकडून काकडे – मोहोळ करू शकतात विजयाचा मार्ग सुकर ?

पब्लिक डिमांड : पुणे लोकसभा भाजपा Vs काँग्रेस

पुणे लोकसभा मतदारसंघात 2019 साली भाजपाचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत एकूण 49 टक्के मतदान झालं होतं. यामध्ये गिरीश बापट यांना 632835 तर मोहन जोशी यांना 308207 एवढी मते मिळाली होती. त्यानंतर जवळपास 4 वर्ष खासदार गिरीश बापट यांनी खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर 29 मार्च 2023 ला दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं. यानंतर पोटनिवडणूक झाली नसल्यानं सद्यस्थितीला इथं कोणीही खासदार नाही.


पुणे- पुणे लोकसभा मतदार संघात कसबा,शिवाजीनगर, कोथरूड, वडगांव शेरी, पर्वती, पुणे कँटोन्मेंट असे 6 विधानसभा मतदार संघ आहेत.महायुतीकडून भाजपा तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस अशी लढत होणार आहे. पूर्वीपासून काँग्रेसचा गड असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघावर 2014 पासून भाजपाचा झेंडा फडकत आहे. सुरेश कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसची पुणे लोकसभेवरची पकड निसटल्यानंतर आता मतदार संघात महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळतंय.आणि महायुतीत भाजपाला पुण्यातील उमेदवारी दिली जाणार आहे. भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून माजी खासदार संजय काकडे,माजी महापौर मुरलीधर मोहोळ,सुनील देवधर,माजी आमदार जगदीश मुळीक अशी नावे इच्छुक असल्याचे आणि त्यांनी उमेदवारीसाठी तयारी सुरु केल्याचे भाजपच्या मतदारांच्या वर्तुळातही पोहचलेले आहे.

शिवसेनेची पारंपरिक मते १ लाख ५० हजार
कोथरूडमध्ये शिवसेनेची ४० हजार तर शिवाजीनगर,कसबा,पर्वती विधानसभा मतदार संघात शिवसेनेची प्रत्येकी २०/२० हजार मते आहेत.या शिवाय वडगाव शेरी मध्ये ३०हजार आणि कॅन्टोनमेन्ट मतदार संघात १५ हजार मते शिवसेनेची असल्याचे मानले जाते.आता शिवसेनेचे विभाजन होऊन २ तुकडे झालेत मात्र पुणे लोकसभा मतदार संघात कोणत्या शिवसेनेचा प्रभाव आहे हे महत्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख शिरूर लोकसभा मतदार संघात येतात.पुणे लोकसभेला त्यांचा किती प्रभाव पडेल हे या निवडणुकीत दिसणार आहे
.

राजकीय समीक्षक सांगतात कि पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर जी काही माहिती वरिष्ठांची सूत्रे पोहोचवितात त्यानुसार विचार करूनच आणि निवडून येण्याची क्षमता एवढा एकच निकष पाहून पक्ष उमेदवारी देत असतो.प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलवर पुण्यात मात्र भाजपकडून कोण विजयाचा मार्ग अगदी सुकर करू शकतात तर अशी दोन नावे पुढे येत आहे.त्यात पहिले नाव माजी खासदार संजय काकडे यांचे आहे तर दुसरे नाव माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आहे. याबाबत विचारता ग्राउंड लेव्हलवर माहिती घेणारी भाजपची मंडळी सांगतात कि,या दोघांचे नाव पुणे लोकसभा मतदार संघात सर्वानांच परिचित आहे.मतदारांना काकडे हे उपद्रवी वाटत नाहीत,कोणत्याही जाती धर्माच्या कडून या नावाला विरोध होताना दिसत नाही आणि विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी नवनवीन प्रकल्प ते पुण्यात आणू शकतात असाही विश्वास वाटतो. मोहोळ सार्वधिक काळ महापौरपदावर असल्याने आणि फलकबाजीने,वृत्तपत्रांतील बातम्यांनी लोकसभा मतदार संघात परिचित झाले आहेत .पण पूर,अस्वच्छता,आरोग्य अशा पातळीवर त्यांच्या कामाबाबत मतदारांत वेगळी प्रतिक्रिया आहे.महापौरपदाच्या कारकिर्दीत त्यांच्याकडून नवीन प्रकल्प आणले गेलेले नाहीत.पण एक उमदा आणि देखणा तरुण,उत्साही कार्यकर्ता म्हणून ते या मतदार संघाला परिचित आहेत. आणि भाजपचा पारंपरिक मतदार त्यांच्या मागे राहील असा ग्राउंड लेव्हलवरील कार्यकर्त्यांना देखील विश्वास आहे.भाजपच्या पारंपरिक मतदाराबरोबर विविध जाती धर्मात काकडे चालतील,ठीक आहे असे सांगणारे मतदार हि काकडे यांची जमेची प्लस  बाजू असल्याने काकड़े एक क्रमांकावर आणि मोहोळ दोन क्रमांकावर आहेत.अन्य इच्छुकांच्या नावाबाबत विचारता कित्येक मतदारांना मुळीक यांचे नाव परिचित नाही,वडगाव शेरी वगळता अन्य विधानसभा मतदार संघात त्यांचे नाव माध्यमांच्या जाहिरातीतून आता इच्छुक म्हणून पोहोचते आहे. प्रत्यक्षात त्यांचा अन्य मतदार संघातील मोजके कार्यकर्ते वगळता थेट मतदारांना ते ठाऊकच नाही .  

लोकसभा आणि महापालिका यांचा घनिष्ठ संबध
वर्षानुवर्षे पुणे लोकसभा आणि पुणे महापालिका यांचा घनिष्ठ संबध राहिला आहे.२०१७ ला झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला भरभरून यश मिळाले ९४ नगरसेवक निवडून आले. इतिहासात प्रथमच भाजपला महापालिकेवर मिळालेल्या या विजयाचे शिल्पकार म्हणून काकडे यांना खासदार बापटांनी श्रेय दिले होते आणि पेढा भरविला होता. महापालिका आणि लोकसभा जेव्हा एकाच नेतृत्वाच्या हाथी येते तेव्हा शहराच्या विकासाला गती मिळते असा इथला अनुभव  आहे. आणि इथल्या खासदाराच्या खांद्यावर महापालिकेवर झेंडा फडकविण्याची जबाबदारी येऊन पडते हाही इथल्या राजकीय वाटचालीचा भाग राहिला आहे. तो पेलवू शकेल अशा उमेदवाराच्या हाथी आता उमेदवारीची पताका देण्याचा विचार करावा लागणार आहे. 

सुनील देवधर हे नाव देखील ठराविक माध्यमातून लोकांना आता समजू लागले आहे पण यांना ओळखणारे या मतदार संघात नागरिक नाहीत. आणि मतदारही नाहीत त्यांची संस्था आता कार्यक्रम करू लागल्याचे दिसते आहे पण त्याचीही माहिती फारच अल्प कार्यकर्त्यांना आहे. त्यात आता कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर घेतल्याने पक्षाचे वरिष्ठ पुन्हा लोकसभेला ब्राम्हण उमेदवार देतील काय ? असा सूत्रांचा प्रश्न आहे.पुणे लोकसभा मतदारसंघाला पूर्वीपासूनच काँग्रेसचे गड समजला जायचं.1952 ते 2014 पर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे 10 खासदार निवडून आले आहे. मात्र, 2014 ला भाजपाकडून अनिल शिरोळे तर 2019 ला भाजपकडून खासदार गिरीश बापट हे विजयी झाले. यामुळं सद्यस्थितीला पुणे भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय.आता यावेळीही भाजपाला हा गड राखायचा आहे.यावेळी त्यांना अजित पवार गटाची ग्राउंड लेव्हलवर साथ किती कशी मिळेल हे पाहावं लागणार आहे. आणि काँग्रेसचा उमेदवार कितपत लढवय्या आहे. राष्ट्रीय पातळीवरून काँग्रेस या जागेला किती महत्व देणार आहे हे पाहून इथली राजकीय रणनीती भाजपाला आखावी लागणार आहे. चंद्रकांत पाटील हे आयत्यावेळी बाहेरून आणलेले उमेदवार भाजपने इथे विजयी करवून दाखविले होते.पण पुन्हा पुन्हा असे केल्याने पक्षातील मूळ कार्यकर्त्यांची घुसमट मोठ्या प्रमाणावर होईल आणि पुन्हा पुन्हा तोच फॉर्म्युला चालेल काय यावरही पक्ष विचार केल्याशिवाय राहणार नाही.

  • मतदार संघाची आकडेवारी : 
  • पुणे लोकसभा मतदार संघात निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार एकूण 18 लाख 6 हजार 953 मतदार असून यात 9 लाख 34 हजार 194 पुरूष मतदार तर महिला मतदार हे 8 लाख 72 हजार 759 आहेत.
  • कसबा मतदार संघात 2 लाख 72 हजार 747 मतदार आहे (पुरुष-135215, महिला- 137502, तृतीयपंथी-30)
  • पुणे कँटोन्मेंट मतदार संघात 269588 एवढे मतदार आहे (पुरुष- 137922, महिला- 131638, तृतीयपंथी- 28)
  • पर्वती मतदार संघात 334136 एवढे मतदार आहेत. (पुरुष- 171299, महिला- 162749, तृतीयपंथी- 88)
  • कोथरूड मतदार संघात 401419 एवढे मतदार आहेत. (पुरुष- 210571, महिला- 190828, तृतीयपंथी- 20)
  • शिवाजीनगर मतदार संघात 272798 एवढे मतदार आहे. (पुरुष- 138514, महिला- 134243, तृतीयपंथी- 41)
  • वडगांव शेरी मतदार संघात एकूण 452628 मतदार आहेत. (पुरुष- 235322, महिला- 217205, तृतीयपंथी- 101)

माथाडी कामगारांचे आमरण व साखळी उपोषण आंदोलन आझाद मैदान येथे तिसऱ्या दिवशीही सुरूच.

0

मुंबई:
सरकार जोपर्यंत माथाडी कायदा मोडीत काढणारे सुधारणा विधेयक क्रमांक ३४/२०२३ आणि सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ मागे घेत नाही तोपर्यंत कालपासून सुरू असलेले माथाडी कायदा बचाव कृती समितीचे आमरण व साखळी उपोषण आंदोलन चालूच राहील. माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात निक्षुन सांगितले. तर ९४ वर्षाचे बाबा आढाव यांनीही सरकारला निर्वाणीचा इशारा दिला की, गेल्या अनेक दिवसांपासून सरकारला आम्ही पत्रव्यवहार आणि समक्ष भेटून माथाडी कामगार कायद्यात बदल करण्याच्या सरकारच्या विधेयकांमुळे माथाडी कामगार कसा उध्वस्त होणार आहे. हे समजावून सांगितले, पण सरकार योग्य संवाद साधण्यसाठी तयारच नाही म्हणूनच आमचं हे आंदोलन सरकार विधेयके मागे घेत नाही तोपर्यंत चालूच राहणार आहे.
माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या आजच्या दुसऱ्या दिवशीच्या आझाद मैदान येथील आमरण व साखळी उपोषण आंदोलनाला विविध लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी आपला पांठीबा व्यक्त करण्यासाठी भेट दिली.
या आंदोलनस्थळी भाषण करताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की ५५ वर्षांचा माथाडी आणि सुरक्षा रक्षक कायदा मोडीत काढण्याचा सरकारचा डाव आहे. याला आपण तीव्र विरोध करायलाच पाहिजे गेल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत भाजपा सरकारने तीन काळे कायदे आणले, पण आपल्या सर्वांच्या दबावाने ते थांबले यावरून दिसून येतं की, या सरकारचा हेतू चांगला नाही. माथाडी कामगार कायद्यात बदल करणारे विधेयक ३४ मुळे माथाडी कामगार आणि संघटना नष्ट होणार आहेत आणि म्हणूनच हे कुटील कारस्थान रोखण्यासाठी आम्ही पुरोगामी विचारांचे सर्व लोक तुमच्या पाठीशी आहोत असेही ते म्हणाले.
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माजी खासदार भालचंद्र मुणगेकर माथाडी कामगारांच्या या आमरण व साखळी उपोषण आंदोलनात बोलताना म्हणाले की, तुमच्यामागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. सरकारमधले लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी तुमच्या पाया पडतात आणि निवडून गेले की, त्यांच्या पायाशी तुम्हाला जावं लागतं अशा प्रकारची लोकशाहीची विटंबना जगात कुठेही नाही. वेगवेगळ्या क्लृप्त्या करून माथाडी कायदा बदलण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, या बदलांचा मी आणि ही जाहीर सभा निषेध करीत आहे. पुढे ते असेही म्हणाले की, हा कायदा उध्वस्त करण्याचं कारस्थान आपल्याला हाणून पाडायचं आहे तर, जनआंदोलन राष्ट्रीय समन्वयचे संजय गोकाक म्हणाले की, सध्या अन्यायाविरूध्द लढणाऱ्या कामगार, शेतकरी, यांच्या मार्गात खिळे ठोकले जातात, अश्रुधुर सोडतात, गोळ्याही घातल्या जातात असं सरकारचं काम चालू आहे. म्हणून या सरकारचं डोकं ठिकाणावर नाही म्हणूनच बाबा आढाव आणि आम्हाला इथं याव लागलं. आमचा या कायदा बदलाला विरोध असून माथाडी कायद्यात कधीही बदल खपवून घेतले जाणार नाहीत. तर नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचाही आंदोलनाला पांठीबा असल्याचं त्यांनी जाहीर केलं. संवाद साधण्यासाठी सरकार तयार नाही आणि म्हणूनच भारताच्या संविधानाने दिलेले अधिकार शाबूत ठेवण्यासाठी ही लढाई आहे असेही ते म्हणाले, तर शेतकरी कामगारांचे नेते सुभाष लोमटे म्हणाले की, माथाडी कायद्यात बदल करण्याचा सरकारच्या कुटील हेतुमुळे ८०% माथाडी कामगारांचं जगणं धोक्यात आलं आहे.
माजी कामगार मंत्री आणि आमदार गणेश नाईक म्हणाले की, कामगार, शेतकरी ज्या देशात दु:खी आहे, त्या देशाची प्रगती कधीच होत नाही. तुम्ही माथाडी कामगारांसाठी जो लढा देत आहात त्या लढ्यात मी तुमच्या सोबत आहे. कायद्यात बदल करून कामगारांना रस्त्यावर आणण्याचं काम या सरकारचं चालू आहे मात्र यातून मार्ग काढण्याचा प्रयन्त करेन आणि यातून मार्ग नक्कीच निघेल याची मला खात्री आहे.
माथाडी कायदा बचाव कृती समिती, महाराष्ट्र राज्य च्या दुसऱ्या दिवशीच्या आमरण व साखळी उपोषणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विधानरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी कामगार मंत्री हुसेल दलवाई, कामगार नेते आमदार भाई जगताप, रोहित पवार, आमदार सचिन अहिर, आमदार अशोक पवार, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार प्रविण दटके यांनीही भेट दिली व आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाने कामगार आयुक्त सतीश देशमुख, सह कामगार आयुक्त लोखंडे मॅडम, कामगार विभागाचे उप सचिव खताळ व अन्य अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी पाठविले होते, त्यांचे चर्चा झाली, परंतु त्यांच्या चर्चेतून उपोषणकर्त्यांचे समाधान झाले नाही, दरम्यान आझाद मैदान पोलीस स्टेशन परिमंडळ-१ चे उपायुक्त यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयातून उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाला सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांची विधानभवनामध्ये भेट करून देण्यात आली. उद्या दि. २८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी कायदा बचाव कृती समितीबरोबर संबंधितांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतू नरेंद्र पाटील व इतर नेत्यांनी निक्षून सांगितले की विधेयके मागे घेतल्याशिवाय आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही. हे उपोषण आंदोलन दि. २८ फेब्रुवारी रोजी देखील चालू ठेवण्याचा निर्णय माथाडी कायदा बचाव कृती समितीने घेतला आहे.

सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून निम्हण यांच्या कार्याची वाटचाल – आमदार शिरोळे

पुणे, ता.२७: पुण्याचे युवा उद्योजक, माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वादिवसानिमित्त ‘सुपर सनी वीक्’चे आयोजन १७ ते २५ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले होते. या कालावधीत जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या तर, १९ ते २४ फेब्रुवारी या दरम्यान पुण्यातील १२ ठिकाणी मोफत आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती अभियान राबिवण्यात आले . यामध्ये नागरिकांना नवीन आधार कार्ड नोंदणी, नाव दुरुस्ती, मोबाईल नंबर , ईमेल आइडी , फोटो सुधारीत करणे, पत्ता बदलणे अशी कामे मोफत करून देण्यात आली. यासह पोस्टाची ‘सुकन्या समृद्धी योजना’ व आरडी बचत खाते योजना सुरू करण्यासाठी लागणारी पहिली रक्कम सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून भरून नागरिकांची खाती सुरू करुन देण्यात आली.या योजनेचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला.

खडकी , बोपोडी, गोखलेनगर, औंध, वडारवाडी परिसरातील नागरिकांचा या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. योजनेचा शुभारंभ आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्या हस्ते डेक्कन येथे केला. या वेळी दत्ता खाडे, मुकारी आलगुडे, आदित्य माळवे,दायानंद इरकल, विनोद ओरसे, गणेश बगाडे, रवींद्र साळेगावकर आदी उपस्थित होते.

आमदार शिरोळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “प्रशासकीय योजनेचा
लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून देणे हेच खरे सच्चा कार्यकर्ता असल्याचे अभिप्रेत आहे . नागरिकांच्या गरजा ओळखून धेतलेला कार्यक्रम लोकहिताचा आहे. सुत्रसंचालन उमेश वाघ, समद शेख यांनी केले , संयोजन सचिन इंगळे, गणेश शिंदे, गणेश शेलार , अमित मुरकुटे, टिंकू दास, पप्पू परदेशी, राहुल कांबळे, अरूण चव्हाण, संजय माझिरे , सचिन मानवतकर, नागेश कांबळे, किरण पाटील, अनिष गाडे यांनी केले. आभार अनिकेत कपोते यांनी म्हणाले.

सुंदरी’ मालिका पुन्हा एकदा रोमांचक वळणावर; मालिकेतून साहेब उर्फ वनिता खरात घेणार प्रेक्षकांचा निरोप

सुंदरी’ने घडवून आणलेली आई-मुलीची भेट अनूच्या जीवावर बेतणार; हल्ल्यामध्ये साहेबही गमावणार जीव

आई आणि मुलीचं नातं हे जगावेगळं असतं. आईसोबत रक्ताचंच नातं असलं की त्यांच्या भावना ख-या असतात किंवा तेव्हाचं ते नातं टिकतं असं नसून आई या नात्याने आपुलकीने सांभाळ करणारी एखादी स्त्री पण ख-या आई इतकाच जीव बाळाला लावू शकते हा विचार ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेतून मांडला गेला आहे. सावी ही जरी अनू आणि आदित्यची मुलगी असली तरी सुंदरीने सावीला आईचं प्रेम, आईची माया दिली आहे. त्यामुळे सुंदरी आणि सावी मधलं आई मुलीचं नातं हे दिवसेंदिवस फुलत चाललेलं प्रेक्षकांनी अनुभवलं आहे.

‘सुंदरी’ मालिका पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांना कथेशी खिळवून ठेवलं जाईल अशा घटना घडताना दाखवल्या आहेत. आता ‘सुंदरी’ ही मालिका पुन्हा एकदा नव्या वळणावर पोहचणार आहे. काही महिन्यांपूर्वी ‘साहेब’ या खलनायिकेची एंट्री मालिकेत झाली होती जी भूमिका अभिनेत्री वनिता खरात साकारत होती. आता साहेब हे पात्रं प्रेक्षकांचा निरोप घेणार असून मालिकेत रोमांचक असे सीन्स पाहायला मिळणार आहेत.

‘सुंदरी’ सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता सन मराठीवर प्रदर्शित होणार आहे.

वाचन संस्कृतिच्या संवर्धनासाठी ‘पुणे पुस्तक परिक्रमा’


पुणे, दि. 27 – राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पुणे पुस्तक महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे पुस्तक परिक्रमा’ या अभियानाचे उद्घाटन माजी राज्यसभा खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आले.

यावेळी कुलगुरु सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, सल्लागार समितीचे सदस्य राजशेखर जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठी राजभाषा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता.

या उपक्रमाअंतर्गत पुस्तकांची व्हॅन घेऊन शहराच्या विविध भागांत पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. त्यामुळे वाचनप्रेमींना पुस्तके पाहण्याची, चाळण्याची, वाचण्याची आणि विकत घेण्याची संधी मिळणार आहे. वाचन संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी हा अभिनव उपक्रम उपयुक्त ठरेल असे मत डॉ. जाधव यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना आणि शहरातील नागरिकांना पुस्तकांच्या स्वरूपात जोडण्यासाठी हा उपक्रम यशस्वी ठरेल असा विश्वास कुलगुरु डॉ. गोसावी यांनी व्यक्त केला.

या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय पुस्तक न्यासाची मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील दर्जेदार पुस्तके वाचकांना त्यांच्या परिसरात उपलब्ध होतील. एका पुस्तकाच्या खरेदीवर एक पुस्तक विनामूल्य मिळणार आहे. वाचन संस्कृतिचे संवर्धन करण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सवाच्या वतीने हाती घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांपैकी हा एक उपक्रम आहे.

झोपडीधारकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी व्हावे अन्यथा आंदोलन करू-माजी आमदार मोहन जोशी

पुणे – झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करताना ते ५ किलोमीटर पर्यंतच्या अंतरात कुठेही करावे, या तरतुदीला विरोध असून, त्या विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्याधिकाऱी निलेश गटणे यांना दिला आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन नियमावलीत डिसेंबर २०२३मध्ये केलेले बदल बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्याचे असून वर्षानुवर्षे पुण्यातील झोपडपट्टीत राहाणाऱ्या कुटुंबांना विस्थापित करणारे आहेत, असा आरोप मोहन जोशी आणि माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने, मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. या या शिष्टमंडळात माजी महापौर रजनी त्रिभुवन, लताताई राजगुरू, राजेंद्र शिरसाट, खंडू सतिश लोंढे, सुरेश कांबळे, विनोद रणपिसे, विठ्ठल गायकवाड, कुणाल राजगुरू, विकास कांबळे, मोहम्मदभाई शेख, अजित थेरे, अविनाश अडसूळ, अमित अगरवाल, जय चव्हाण, बाबा सय्यद, सचिन बहिरट, राजू देवकर, गणेश गुगळे, अन्वर पठाण आणि संतोष कांबळे यांचा समावेश होता.

झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० टक्के मान्यता आणि ५ किलोमीटरपर्यंत कोठेही पुनर्वसन हा नियमावलीतील बदल अन्यायकारक आहे. झोपडपट्टीत राहाणाऱ्या महिलांना आजूबाजूच्या उच्चभ्रू वस्तीत रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात, शहराच्या विकास आराखड्यात सुद्धा एचडीएच, इडब्ल्यूएस अशी आरक्षणे जागतिक मानांकनाप्रमाणे शहराच्या मध्यवर्ती भागात टाकावे लागतात. त्यातून सामाजिक समतोल साधला जातो, असे निवेदनात म्हटले आहे.

उपनगरांमध्ये झोपडपट्ट्या आहेत, त्यांना ५ किलोमीटर अंतरावर न्यावयाचे ठरल्यास पुणे महापालिका हद्दीबाहेरच त्यांचे पुनर्वसन करता येईल आणि बिल्डर्सना हा अधिकार नियमावलीतील बदलामुळे प्राप्त झाला आहे. झोपडपट्टीतील झोपडीधारकांचे पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी झाले पाहिजे, अशी मागणी आहे. ५ किलोमीटर अंतरावर पुनर्वसन या तरतुदीचा फेरविचार करणारा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनात दिला आहे.

आत्मा कार्यालयातील राज्य समन्वयक कंत्राटी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २७ : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कृषी संचालक आत्मा पुणे यांच्या कार्यालयातील राज्य स्तरावर राज्य समन्वयक हे कंत्राटी पद दरमहा ५० हजार रुपये मानधनावर भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी ४ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य समन्वयक पदासाठी आवश्यक अटी व शर्ती, अर्जाचा नमुना व शैक्षणिक अर्हता कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेच्या http://atmamaharashtra.com/job या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र उमेदवारांनी ४ मार्च पर्यंत कृषी संचालक आत्मा, महाराष्ट्र राज्य, साखर संकुल, दुसरा मजला, शिवाजीनगर पुणे-४११००५ या पत्त्यावर अर्ज सादर करावेत, असे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी कळविले आहे.

भारतीय रिझर्व बँकेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता सप्ताहाचे आयोजन

पुणे, दि. २७ : भारतीय रिझर्व बँकेच्यावतीने २६ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत आर्थिक साक्षरता सप्ताह राबविण्यात येत असतो. त्याचाच भाग म्हणून भारतीय रिझर्व बँक, जिल्हा अग्रणी बँक व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोणावळा येथे विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता सप्ताह अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास भारतीय रिझर्व बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक सुभान बाशा, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापक प्रवीण नलावडे, जिल्हा अग्रणी बँकेचे पी.एस.सरडे, लोणावळा शाखा व्यवस्थापक राकेश कुमार, औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणावळाच्या प्राचार्या प्रतिभा चव्हाण- शिंदे आदी उपस्थित होते.

यावर्षीच्या सप्ताहाची संकल्पना ‘योग्य सुरुवात करा – वित्तीय स्मार्ट बना’ अशी ठेवण्यात आलेली आहे. या सप्ताहाअंतर्गत विद्यार्थ्यांना बचत आणि चक्रवाढीची शक्ती, विद्यार्थ्यांसाठी बँकिंग सुविधा तसेच डिजिटल व सायबर सुरक्षा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कौशल्य शिक्षणानंतर उद्योग सुरू करण्यासाठी शासकीय योजना अंतर्गत उपलब्ध असलेल्या कर्ज योजनांची माहितीही देण्यात आली.

मराठी भाषा दिनानिमित्त ‘कुसुमाग्रज शब्दोत्सव’ उत्साहात साजरा

भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम

पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ कुसुमाग्रज शब्दोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.’संवाद,पुणे’ आणि ‘अनन्वय ‘संस्था यांनी हा कार्यक्रम सादर केला .मराठी भाषा दिनानिमित्त कुसुमाग्रजांच्या काव्य,नाट्य,गीत संगीत आणि साहित्याचा वेध या कार्यक्रमातून घेतला गेला. खासदार श्रीनिवास पाटील हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले . ‘अनन्वय’ संस्थेच्या ‘कवी शब्दांचे ईश्वर’ या संवादमालिकेतील कवी कुसुमाग्रज यांच्याशी साधलेल्या संवादाच्या चित्रफीतीचे लोकार्पण श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमात करण्यात आले. खासदार श्रीनिवास पाटील यांनी मराठी भाषेतील सर्व ज्ञानपीठ प्राप्त व्यक्तिमत्त्वांना आणि त्यांच्या कार्य कर्तुत्वाला उजाळा दिला.

भारतीय विद्या भवन पुणे केंद्राच्या अध्यक्ष डॉ. लीना मेहेंदळे यांनी कुसुमाग्रज यांच्या अनुवादित हिंदी कविता वाचून दाखविल्या.सुनील महाजन यांनी आभार मानले.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले आणि कलाकारांचा सत्कार केला.मकरंद टिल्लू, मनीषा निश्चल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

निर्मिती सुनील महाजन(संवाद,पुणे) यांची होती संहिता,दिग्दर्शन डॉ.माधवी वैद्य यांची होती.संयोजन निकिता मोघे यांचे होते.धीरेश जोशी,धनेश जोशी,डॉ,माधवी वैद्य,कियान बोरकर यांनी काव्यवाचन केले .संगीत राहुल घोरपडे यांचे होते . कुमार करंदीकर ,मनीषा पवार-जोशी,राहुल घोरपडे यांनी काव्य गायन केले. त्यांना कुमार करंदीकर(हार्मोनियम), नीलेश श्रीखंडे (तबला), मंदार देव (सिंथेसायझर),विलास क्षीरसागर (ताल वाद्य) यांनी साथसंगत केली.

हा कार्यक्रम मंगळवार,२७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १९७ वा कार्यक्रम होता.

वाट्टेल ती चौकशी करा ,शरद पवारांचे सरकारला खुले आव्हान


पुणे-जरांगे यांच्या आंदोलनाच्या पाठीशी शरद पवार असल्याचा आरोप आज भाजप आमदार यांनी विधानसभेत आणि विधानपरिषदेत केल्यावर या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी एस आय टी चौकशीचे आदेश दिलेत . आज यावर पुण्यात प्रतिक्रिया देताना खुद्द शरद पवार यांनी भाजपचे सर्व आरोप अत्यंत पोरकटपणाचे असून आजवर असा पोरकटपणा पाहिला नाही सांगत वाट्टेल ती चौकशी करा ,न्यायमूर्तींची नेमणूक करा, कर नाही त्याला डर कशाला ?असे सांगत सरकारला प्रतिआव्हान दिल्याचे मानले जाते आहे. आपण सर्वात अगोदर जरांगे यांना भेटून तुमच्या मागण्या काय आहेत , आणि दोन समाजत दुही निर्माण होईल असे काही करू नका असे प्रत्यक्ष भेटून सांगितले होते , सरकारने कॉल रेकॉर्ड तपासावे काय हवे ते करावे , राजेश टोपे यांना उलट सरकारने या प्रकरणी मदत मागितली होती आणि हे मिटावे म्हणून टोपे सरकारला मदत करत होते पण आता टोपेंनाच सरकार दोषी ठरवू पाहत असेल तर यापुढील काळात अशा सरकारला कोणीही मदत करायला पुढे येणार नाही , टोपे १०० टक्के यात दोषी नाहीत हे मी जाणून आहे असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना मदत, तरुणांसाठी नोकऱ्या, महिला सुरक्षेला अर्थसंकल्पात भोपळा.

0

सरकारचे अपयश व भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस – नाना पटोले

महायुती सरकारला आर्थिक शिस्त नाही, ‘ऋण काढून सण साजरा’ करण्यासारखा प्रकार.

मुंबई, दि. २७ फेब्रुवारी
महायुती सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्पात निवडणुक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक समाज घटकाला खूष करण्यासाठी केवळ घोषणा केल्या आहेत. राजकीय तोडफोड, महागाई, बेरोजगारी, पेपरपुटी, समाजा-समाजात भांडणे लावण्याचे सरकारने केलेले प्रकार यामुळे राज्यातील जनतेमध्ये या ट्रिपल इंजिन सरकारबद्दल तीव्र असंतोष आहे. लोकसभा निवडणुकीत जनता या महायुतीचा ‘हिशोब’ करणार आहे. सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, सरकारचे हे अपयश व भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला आहे, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

अंतरिम अर्थसंकल्पावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सरकारने कोणत्या विभागाला किती रुपयांची तरतूद केली याच्या मोठ्या घोषणा केल्या परंतु सरकारचा आतापर्यंतचा अनुभव पाहता यातील कशाचाही फायदा सर्वसामान्य जनतेला होणार नाही. राज्यातील शेतकरी आज मोठ्या संकटात आहे पण सरकार त्यांना मदत करत नाही. मागील काळात जाहीर केलेली मदतही अद्याप मिळालेली नाही. राज्यातील तरुण रस्त्यावर आहेत, नोकरी भरती होत नाही. स्पर्धा परिक्षांमध्ये घोटाळे होत आहेत, पेपर फुटण्याचे प्रकार वाढले आहेत परंतु सरकारने तरुणांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही. महिला सक्षमीकरणाबद्दल अर्थमंत्र्यांनी काही घोषणा केल्या पण क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांच्या महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकी किती सुरक्षित आहेत हे सर्वांना माहित आहे. हजारो महिला व मुली बेपत्ता आहेत, महिला अत्याचार वाढले आहेत, सरकार जर खरेच महिला सक्षमीकरणाबद्दल गंभीर असते तर महिला अत्याचार वाढले नसते.
सरकार प्रत्येक अधिवेशनात पुरवण्या मागण्या आणते पण त्याचे पुढे काय झाले याचे उत्तर मिळत नाही. सरकारने आधी ७५ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या होत्या त्यानंतर ४० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आल्या आणि आता ८ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडलेली असते, दिवाळखोरी निघालेली असते त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवण्या मागण्या सादर केल्या जातात. या मागण्या कशासाठी आणल्या आहेत? महायुती सरकारला आर्थिक शिस्त नाही, राज्यावर कर्जाचा डोंगर करुन ठेवला आहे. ‘ऋण काढून सण साजरा’ करण्यासारखा हा प्रकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसीत भारताच्या संकल्पनेला पुरक असा अर्थसंकल्प असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा पोकळ आहे. कारण मोदींची गॅरंटीच फसवी आहे तर मोदींच्या पावलावर चालणाऱ्या या महायुती सरकारच्या गॅरंटीवर तरी कोण विश्वास ठेवणार? असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.

जरांगे पाटलांनी फडणवीसांवर लावलेल्या आरोपांची SIT चौकशी करा: नाना पटोले.

सरकार दिवाळखोरीत निघाल्यानेच सातत्याने पुरवणी मागण्या.

जनतेच्या घामाच्या एका-एका पैशाचा हिशोब सरकारने द्यावा.

साखर कारखान्यांना पैसे देता मग शेतकऱ्यांना मदत का देत नाही?

मुंबई, दि. २७ फेब्रुवारी
मराठा समाजाच्या आरक्षणावरुन सरकारने राज्यात वाद निर्माण केले आहेत, सरकारच समाजा-समाजात तेढ निर्माण करत आहे. मराठा समाजावरून राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण बिघडलेले आहे. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काय बोलणे झाले हे जाहीर करण्याची मागणी काँग्रेस सातत्याने करत आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांची एसआयटी मार्फत चर्चा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्यांवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सरकारने आधी ७५ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या होत्या त्यानंतर ४० हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आल्या आणि आता ८ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडलेली असते, दिवाळखोरी निघालेली असते त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवण्या मागण्या सादर केल्या जातात. या मागण्या कशासाठी आणल्या आहेत? आधीच्या पुरवणी मागण्यांच्या पैशांचे काय झाले? सरकारने २०० कोटी रुपये साखर कारखान्यांना दिले त्यानंतर पुन्हा ५०० कोटी साखर कारखान्यांना दिले. जनतेचे पैसे साखर कारखान्यांना दिले जात आहेत मग शेतकऱ्यांच्या वाट्याला किती पैसे गेले? किती शेतकऱ्यांना लाभ दिला,याची माहिती सरकारने दिली पाहिजे. पैसे कुठे गेले हे जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे, हा पैसा त्यांच्या घामाचा आहे. सरकारकडे पैसे नसल्याने कर्ज काढून सरकार चालवले जात आहे हे जनतेला सांगा व जनतेची माफी मागा.

विदर्भ मराठवाड्यासह काही भागात अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, सर्वे कशाचा करता, तातडीने मदत करा. अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत द्या फक्त कारखानदारांचे खिसे भरु नका. रोज ८ शेतकरी आत्महत्या म्हणजे एका वर्षात २५०० शेतकरी आत्महत्या होत आहेत. २०१३-१८ दरम्यान मराठी शेतकऱ्यांच्या २८ टक्के आत्महत्या झाल्या तर २०१९ ते २०२४ मध्ये त्या ९४ टक्के झाल्या आहेत. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. जगणे कठीण झाल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हणून पुरवण्या मागण्यात ते मंजूर करून घेतले पण शेतकऱ्यांन ते पैसे मिळाले नाहीत. पुरवणी मागण्यातून घेतलेल्या एका एका पैशाचा हिशोब सरकारला द्यावा लागेल.
सरकार तरुणांच्या भविष्याशी खेळत आहे. नोकर भरती करत नाही, तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाला पण सरकार पुरावा मागत आहे, परिक्षांमध्ये कॉपी घोटाळा झाला, पेपर फुटले, अधिकारीच कॉपी पुरवत होतो हेही उघड झाले आहे. सरकार क़ॉपीबाज झाले आहे का? हा राजकारणाचा विषय नाही तर आम्ही जनभावना मांडत आहोत आणि सरकारला त्याचे उत्तर द्यावे लागेल, असे नाना पटोले म्हणाले.