भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ कुसुमाग्रज शब्दोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.’संवाद,पुणे’ आणि ‘अनन्वय ‘संस्था यांनी हा कार्यक्रम सादर केला .मराठी भाषा दिनानिमित्त कुसुमाग्रजांच्या काव्य,नाट्य,गीत संगीत आणि साहित्याचा वेध या कार्यक्रमातून घेतला गेला. खासदार श्रीनिवास पाटील हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले . ‘अनन्वय’ संस्थेच्या ‘कवी शब्दांचे ईश्वर’ या संवादमालिकेतील कवी कुसुमाग्रज यांच्याशी साधलेल्या संवादाच्या चित्रफीतीचे लोकार्पण श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमात करण्यात आले. खासदार श्रीनिवास पाटील यांनी मराठी भाषेतील सर्व ज्ञानपीठ प्राप्त व्यक्तिमत्त्वांना आणि त्यांच्या कार्य कर्तुत्वाला उजाळा दिला.
भारतीय विद्या भवन पुणे केंद्राच्या अध्यक्ष डॉ. लीना मेहेंदळे यांनी कुसुमाग्रज यांच्या अनुवादित हिंदी कविता वाचून दाखविल्या.सुनील महाजन यांनी आभार मानले.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले आणि कलाकारांचा सत्कार केला.मकरंद टिल्लू, मनीषा निश्चल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
निर्मिती सुनील महाजन(संवाद,पुणे) यांची होती संहिता,दिग्दर्शन डॉ.माधवी वैद्य यांची होती.संयोजन निकिता मोघे यांचे होते.धीरेश जोशी,धनेश जोशी,डॉ,माधवी वैद्य,कियान बोरकर यांनी काव्यवाचन केले .संगीत राहुल घोरपडे यांचे होते . कुमार करंदीकर ,मनीषा पवार-जोशी,राहुल घोरपडे यांनी काव्य गायन केले. त्यांना कुमार करंदीकर(हार्मोनियम), नीलेश श्रीखंडे (तबला), मंदार देव (सिंथेसायझर),विलास क्षीरसागर (ताल वाद्य) यांनी साथसंगत केली.
हा कार्यक्रम मंगळवार,२७ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १९७ वा कार्यक्रम होता.