पब्लिक डिमांड : पुणे लोकसभा भाजपा Vs काँग्रेस
पुणे लोकसभा मतदारसंघात 2019 साली भाजपाचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत एकूण 49 टक्के मतदान झालं होतं. यामध्ये गिरीश बापट यांना 632835 तर मोहन जोशी यांना 308207 एवढी मते मिळाली होती. त्यानंतर जवळपास 4 वर्ष खासदार गिरीश बापट यांनी खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर 29 मार्च 2023 ला दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालं. यानंतर पोटनिवडणूक झाली नसल्यानं सद्यस्थितीला इथं कोणीही खासदार नाही.
पुणे- पुणे लोकसभा मतदार संघात कसबा,शिवाजीनगर, कोथरूड, वडगांव शेरी, पर्वती, पुणे कँटोन्मेंट असे 6 विधानसभा मतदार संघ आहेत.महायुतीकडून भाजपा तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस अशी लढत होणार आहे. पूर्वीपासून काँग्रेसचा गड असलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघावर 2014 पासून भाजपाचा झेंडा फडकत आहे. सुरेश कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसची पुणे लोकसभेवरची पकड निसटल्यानंतर आता मतदार संघात महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळतंय.आणि महायुतीत भाजपाला पुण्यातील उमेदवारी दिली जाणार आहे. भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून माजी खासदार संजय काकडे,माजी महापौर मुरलीधर मोहोळ,सुनील देवधर,माजी आमदार जगदीश मुळीक अशी नावे इच्छुक असल्याचे आणि त्यांनी उमेदवारीसाठी तयारी सुरु केल्याचे भाजपच्या मतदारांच्या वर्तुळातही पोहचलेले आहे.
शिवसेनेची पारंपरिक मते १ लाख ५० हजार
कोथरूडमध्ये शिवसेनेची ४० हजार तर शिवाजीनगर,कसबा,पर्वती विधानसभा मतदार संघात शिवसेनेची प्रत्येकी २०/२० हजार मते आहेत.या शिवाय वडगाव शेरी मध्ये ३०हजार आणि कॅन्टोनमेन्ट मतदार संघात १५ हजार मते शिवसेनेची असल्याचे मानले जाते.आता शिवसेनेचे विभाजन होऊन २ तुकडे झालेत मात्र पुणे लोकसभा मतदार संघात कोणत्या शिवसेनेचा प्रभाव आहे हे महत्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख शिरूर लोकसभा मतदार संघात येतात.पुणे लोकसभेला त्यांचा किती प्रभाव पडेल हे या निवडणुकीत दिसणार आहे.
राजकीय समीक्षक सांगतात कि पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर जी काही माहिती वरिष्ठांची सूत्रे पोहोचवितात त्यानुसार विचार करूनच आणि निवडून येण्याची क्षमता एवढा एकच निकष पाहून पक्ष उमेदवारी देत असतो.प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलवर पुण्यात मात्र भाजपकडून कोण विजयाचा मार्ग अगदी सुकर करू शकतात तर अशी दोन नावे पुढे येत आहे.त्यात पहिले नाव माजी खासदार संजय काकडे यांचे आहे तर दुसरे नाव माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आहे. याबाबत विचारता ग्राउंड लेव्हलवर माहिती घेणारी भाजपची मंडळी सांगतात कि,या दोघांचे नाव पुणे लोकसभा मतदार संघात सर्वानांच परिचित आहे.मतदारांना काकडे हे उपद्रवी वाटत नाहीत,कोणत्याही जाती धर्माच्या कडून या नावाला विरोध होताना दिसत नाही आणि विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी नवनवीन प्रकल्प ते पुण्यात आणू शकतात असाही विश्वास वाटतो. मोहोळ सार्वधिक काळ महापौरपदावर असल्याने आणि फलकबाजीने,वृत्तपत्रांतील बातम्यांनी लोकसभा मतदार संघात परिचित झाले आहेत .पण पूर,अस्वच्छता,आरोग्य अशा पातळीवर त्यांच्या कामाबाबत मतदारांत वेगळी प्रतिक्रिया आहे.महापौरपदाच्या कारकिर्दीत त्यांच्याकडून नवीन प्रकल्प आणले गेलेले नाहीत.पण एक उमदा आणि देखणा तरुण,उत्साही कार्यकर्ता म्हणून ते या मतदार संघाला परिचित आहेत. आणि भाजपचा पारंपरिक मतदार त्यांच्या मागे राहील असा ग्राउंड लेव्हलवरील कार्यकर्त्यांना देखील विश्वास आहे.भाजपच्या पारंपरिक मतदाराबरोबर विविध जाती धर्मात काकडे चालतील,ठीक आहे असे सांगणारे मतदार हि काकडे यांची जमेची प्लस बाजू असल्याने काकड़े एक क्रमांकावर आणि मोहोळ दोन क्रमांकावर आहेत.अन्य इच्छुकांच्या नावाबाबत विचारता कित्येक मतदारांना मुळीक यांचे नाव परिचित नाही,वडगाव शेरी वगळता अन्य विधानसभा मतदार संघात त्यांचे नाव माध्यमांच्या जाहिरातीतून आता इच्छुक म्हणून पोहोचते आहे. प्रत्यक्षात त्यांचा अन्य मतदार संघातील मोजके कार्यकर्ते वगळता थेट मतदारांना ते ठाऊकच नाही .
लोकसभा आणि महापालिका यांचा घनिष्ठ संबध
वर्षानुवर्षे पुणे लोकसभा आणि पुणे महापालिका यांचा घनिष्ठ संबध राहिला आहे.२०१७ ला झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला भरभरून यश मिळाले ९४ नगरसेवक निवडून आले. इतिहासात प्रथमच भाजपला महापालिकेवर मिळालेल्या या विजयाचे शिल्पकार म्हणून काकडे यांना खासदार बापटांनी श्रेय दिले होते आणि पेढा भरविला होता. महापालिका आणि लोकसभा जेव्हा एकाच नेतृत्वाच्या हाथी येते तेव्हा शहराच्या विकासाला गती मिळते असा इथला अनुभव आहे. आणि इथल्या खासदाराच्या खांद्यावर महापालिकेवर झेंडा फडकविण्याची जबाबदारी येऊन पडते हाही इथल्या राजकीय वाटचालीचा भाग राहिला आहे. तो पेलवू शकेल अशा उमेदवाराच्या हाथी आता उमेदवारीची पताका देण्याचा विचार करावा लागणार आहे.
सुनील देवधर हे नाव देखील ठराविक माध्यमातून लोकांना आता समजू लागले आहे पण यांना ओळखणारे या मतदार संघात नागरिक नाहीत. आणि मतदारही नाहीत त्यांची संस्था आता कार्यक्रम करू लागल्याचे दिसते आहे पण त्याचीही माहिती फारच अल्प कार्यकर्त्यांना आहे. त्यात आता कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णींना राज्यसभेवर घेतल्याने पक्षाचे वरिष्ठ पुन्हा लोकसभेला ब्राम्हण उमेदवार देतील काय ? असा सूत्रांचा प्रश्न आहे.पुणे लोकसभा मतदारसंघाला पूर्वीपासूनच काँग्रेसचे गड समजला जायचं.1952 ते 2014 पर्यंत पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे 10 खासदार निवडून आले आहे. मात्र, 2014 ला भाजपाकडून अनिल शिरोळे तर 2019 ला भाजपकडून खासदार गिरीश बापट हे विजयी झाले. यामुळं सद्यस्थितीला पुणे भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय.आता यावेळीही भाजपाला हा गड राखायचा आहे.यावेळी त्यांना अजित पवार गटाची ग्राउंड लेव्हलवर साथ किती कशी मिळेल हे पाहावं लागणार आहे. आणि काँग्रेसचा उमेदवार कितपत लढवय्या आहे. राष्ट्रीय पातळीवरून काँग्रेस या जागेला किती महत्व देणार आहे हे पाहून इथली राजकीय रणनीती भाजपाला आखावी लागणार आहे. चंद्रकांत पाटील हे आयत्यावेळी बाहेरून आणलेले उमेदवार भाजपने इथे विजयी करवून दाखविले होते.पण पुन्हा पुन्हा असे केल्याने पक्षातील मूळ कार्यकर्त्यांची घुसमट मोठ्या प्रमाणावर होईल आणि पुन्हा पुन्हा तोच फॉर्म्युला चालेल काय यावरही पक्ष विचार केल्याशिवाय राहणार नाही.
- मतदार संघाची आकडेवारी :
- पुणे लोकसभा मतदार संघात निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार एकूण 18 लाख 6 हजार 953 मतदार असून यात 9 लाख 34 हजार 194 पुरूष मतदार तर महिला मतदार हे 8 लाख 72 हजार 759 आहेत.
- कसबा मतदार संघात 2 लाख 72 हजार 747 मतदार आहे (पुरुष-135215, महिला- 137502, तृतीयपंथी-30)
- पुणे कँटोन्मेंट मतदार संघात 269588 एवढे मतदार आहे (पुरुष- 137922, महिला- 131638, तृतीयपंथी- 28)
- पर्वती मतदार संघात 334136 एवढे मतदार आहेत. (पुरुष- 171299, महिला- 162749, तृतीयपंथी- 88)
- कोथरूड मतदार संघात 401419 एवढे मतदार आहेत. (पुरुष- 210571, महिला- 190828, तृतीयपंथी- 20)
- शिवाजीनगर मतदार संघात 272798 एवढे मतदार आहे. (पुरुष- 138514, महिला- 134243, तृतीयपंथी- 41)
- वडगांव शेरी मतदार संघात एकूण 452628 मतदार आहेत. (पुरुष- 235322, महिला- 217205, तृतीयपंथी- 101)