एन्हान्सेफ इंडिया चे शरद श्रीवास्तव, तनुश्री श्रीवास्तव यांचा पुढाकार ; वीरचक्र प्राप्त कर्नल ललित राय (निवृत्त), सेना मेडल प्राप्त मेजर जनरल अलोक देब यांची प्रमुख उपस्थिती
पुणे : दंगल नियंत्रणासाठी व विविध मोहिमांसाठी पोलिसांना उपयुक्त, पूर-भूकंपासारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत औषधे पोहचविण्यासाठी तसेच उत्तम आवाज असलेल्या पोलीस आणि लष्कराच्या गरजेनुसार साकारलेल्या गार्डियन या अत्याधुनिक ड्रोनचे लोकार्पण पुण्यात झाले. तसेच, विशेषत: पोलीस आणि लष्करातील जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी उपयुक्त असलेल्या मॅव्ह रिक या ड्रोनचेही लोकार्पण झाले.
एन्हान्सेफ इंडिया चे संचालक शरद श्रीवास्तव, व्यवस्थापकीय संचालक तनुश्री श्रीवास्तव यांनी हे अत्याधुनिक ड्रोन साकारले असून त्याचे लोकार्पण हॉटेल हयात पुणे येथे आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी वीरचक्र प्राप्त कर्नल ललित राय (निवृत्त), सेना मेडल प्राप्त मेजर जनरल अलोक देब (निवृत्त), कर्नल अनुप महाजन (निवृत्त), ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.प्रताप परदेशी, आयोजक शरद श्रीवास्तव, तनुश्री श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
ललित राय म्हणाले, कारगिल युद्धात अशा प्रकारची उपकरणे असती, तर कदाचित आपल्या भारतीय सैनिकांचे जीव वाचविता आले असते. पाकिस्तानकडे त्याकाळी अगदी अत्याधुनिक नाही, परंतु ड्रोनचा काही प्रमाणात वापर केला गेला होता, आम्ही मशिनगनने ते पाहणीसाठी पाठविलेले ड्रोन पाडले होते. जम्मू-काश्मीरमधील डोडा भागातील दहशतवाद्यांशी मुकाबला करण्याकरिता देखील अशा प्रकारच्या अत्याधुनिक ड्रोनचा उपयोग झाला असता, अशी आठवण यावेळी त्यांनी सांगितली.
ते पुढे म्हणाले, ड्रोन हे छोटे उपकरण असते, तरी ते अत्यंत महत्वाचे आहे. रशिया-युक्रेन युद्धात आपण पाहिले की युद्धाचा प्रकार बदलला आहे. ड्रोनच्या माध्यमातून रणगाडे देखील उध्वस्त होऊ शकतात. मिसाईल पेक्षा ड्रोनचा खर्च कितीतरी पटीने कमी आहे. पर्वतरांगांमध्ये लढताना याचा खूप उपयोग होतो. त्यामुळे लष्कराला आणि इतर सुविधांसाठी सामान्यांकरिता देखील ड्रोन उपयुक्त आहे.
अॅड.प्रताप परदेशी म्हणाले, पोलिसांना गणेशोत्सव, जगन्नाथ यात्रा यांसारख्या गर्दीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता या अत्याधुनिक ड्रोनचा उपयोग होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेत आधुनिक ड्रोन निर्मिती करुन श्रीवास्तव कुटुंबाने मोठा वाटा उचलला आहे.
शरद श्रीवास्तव म्हणाले, देशांतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आम्ही हे ड्रोन साकारले आहेत. पोलीस, लष्कर, एनडीआरएफ सारख्या सुरक्षा व्यवस्था यांच्या अपेक्षा पूर्ण करीत हे ड्रोन साकारण्यात आले आहेत. यांची उडण्याची क्षमता १५ किमी पर्यंत असून १५ किलो वजन देखील हे ड्रोन वाहून नेऊ शकतात. सर्च लाईटस्, स्पिकर्स पीए सिस्टिम देखील यावर असल्याने नागरी क्षेत्रांमध्ये देखील याचा वापर करता येणे शक्य आहे. कोणत्याही प्रकारच्या वातावरण याचा वापर करता येणार असून गुन्हे रोखण्यासाठी आणि आपत्कालिन परिस्थितीशी लढा देण्यासाठी पोलीस यंत्रणा व इतर यंत्रणांना हे ड्रोन उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने चर्चा सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.