महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त शोभायात्रा, व्याख्यान
पिंपरी, पुणे (दि. २८ फेब्रुवारी २०२४) पूर्वीच्या काळात समुद्र ओलांडून विदेशात जाणे निषिध्द मानले जात होते. हे नाकारून शिक्षण, व्यापार, उद्योग, व्यवसायासाठी ‘सिंधू बंदी’ उठवण्याचे महान कार्य महर्षी दयानंद सरस्वती यांनी केले. जाती, वर्ण व्यवस्था नाकारून, वेदांचे पठण, ज्ञान सर्वांसाठी खुले करीत अस्पृश्यता संपवण्याचे प्रथम पाऊल त्यांनी उचलले. नाभिक समाजाच्या व्यक्तीच्या घरी जेवण करून रोटी बेटी व्यवहार वाढवून जातिव्यवस्थेवर आधारित व्यवसाय बंदी मिटविण्याचे क्रांतिकारी कार्य विसाव्या शतकात महर्षी दयानंद सरस्वती यांनी केले आहे असे प्रतिपादन आचार्य सोनेराव यांनी केले.
आर्य समाज संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त पिंपरी येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात आचार्य सोनेराव बोलत होते. यावेळी पिंपरी आर्य समाज मार्गदर्शक मुरलीधर सुंदरानी, पंडित विश्वनाथ शास्त्री, विवेक शास्त्री, अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, उपाध्यक्ष उत्तम दंडीमे, सचिव हरीश तिलोकचंदानी, खजिनदार जयराम धर्मदासानी, ग्रंथालय सचिव दिनेश यादव, आर्यवीर दलाचे पिंपरी प्रमुख संजय भाट, जिल्हा सचिव दिगंबर रिद्धीवाडे, उपमंत्री कमलेश धर्मदासानी, दत्ता सूर्यवंशी, सदस्य अतुल आचार्य, महिला प्रमुख नलिनी देशपांडे, शाळेचे सचिव संजय वासवानी, मुख्याध्यापक सलू मॅडम आदींसह विद्यार्थी, शिक्षक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.