ईश्वरी प्रकाशन तर्फे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक इंदलकर लिखित जेनिफर अँड द बीस्ट या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : सामान्यतः पोलीस हे अक्षरशत्रू असतात, ते कधीही आपल्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन लेखन करत नाहीत असा समज आहे. परंतु अशोक इंदलकर यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे हा समाज खोटा ठरला असून पोलीस हे समाजातील चांगले संवादक होऊ शकतात, त्यामुळे पोलिसांनी लेखनातून व्यक्त झाले पाहिजे आणि समाजाच्या व्यथा मांडल्या पाहिजेत, अशी भावना महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे माजी प्रमुख अशोक धिवरे यांनी व्यक्त केले.
ईश्वरी प्रकाशन तर्फे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक इंदलकर लिखित जेनिफर अँड द बीस्ट या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन अशोक धीवरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य वन्य विभागाचे माजी प्रधान सचिव सुनील लिमये, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, प्रकाशक संतोष धायबर यावेळी उपस्थित होते.
अशोक धिवरे म्हणाले, जेनिफर अँड द बीस्ट या पुस्तकाची कथा केवळ जंगलापूर्ती मर्यादित नाही तर या पुस्तकाला वैश्विक अधिष्ठान आहे. ही कथा केवळ जंगलातील प्राण्यांची नाही तर धर्म, जात यांच्या पलीकडे जाऊन ही कथा माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रवृत्त करते, त्यामुळे ही कथा सर्वांनी वाचली पाहिजे.
श्रीपाल सबनीस म्हणाले, मराठी भाषेतील पुस्तके इंग्रजीसह इतर भाषांमध्ये भाषांतरित केली तर खऱ्या अर्थाने मराठी भाषा ही वैश्विक रूप धारण करू शकेल. मराठी भाषेमध्ये अनेक दर्जेदार कलाकृती आहेत, परंतु आपण त्यांना केवळ एका विशिष्ट भाषेमध्ये किंवा प्रादेशिकतेमध्ये अडकवून ठेवतो त्यामुळे मराठी भाषेची श्रीमंती ठराविक माणसांसाठी मर्यादित राहते. मराठी भाषेची श्रीमंती इतर भाषांमध्ये पोहोचण्यासाठी मराठी साहित्य क्षेत्रामध्ये भाषांतर मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे.
सुनील लिमये म्हणाले, सरकारी अधिकारी यांना व्यक्त होण्यासाठी मर्यादा असतात, परंतु ते जर लेखनाच्या माध्यमातून व्यक्त झाले तर त्या कलाकृतीमध्ये जिवंतपणा असतो आणि अशा जिवंत कलाकृती समाजाला नेहमीच आवडतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपले अनुभव विविध माध्यमातून मांडणे गरजेचे आहे.
अशोक इंदलकर म्हणाले, पोलीस दलामध्ये नोकरी करण्यापूर्वी मी लेखक होतो आणि मी तो लेखनाचा छंद कायम जपलेला आहे. पोलीस कमी लिहितात अशी अनेकदा तक्रार केली जाते परंतु त्यांनी लेखन केले तर ते अस्सल असते ते समाजाला भावते. जुन्नर आणि राधानगरी या भागामध्ये पोलीस सेवेमध्ये काम करताना मला आलेले अनुभव मी या पुस्तकाच्या माध्यमातून गोष्टी स्वरूपात लोकांसमोर मांडले आहेत ते निश्चितच वाचकांना आवडेल.
मुखपृष्ठ कार राहुल बळवंत, अनुवादक सुरश्री जोशी, अशोक काकडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. अश्विनी पळनीटकर यांनी सूत्रसंचालन केले. व्यंकटेश कल्याणकर यांनी प्रास्ताविक केले.