Home Blog Page 1181

एक कोटी घरांमध्ये छतांवर मोफत सौर पॅनल बसवण्याच्या योजनेला मंजुरी

0

नवी दिल्ली , 29 फेब्रुवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने छतांवर सौर पॅनल (आर टी एस)बसवण्यासाठी आणि 1 कोटी कुटुंबांना दर महिना 300 युनिट्सपर्यंत  मोफत वीज उपलब्ध करून देण्यासाठी 75,021 कोटी रुपये खर्चाच्या पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजनेला मंजुरी दिली आहे. पंतप्रधानांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी ही योजना सुरू केली होती.

या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :

घरगुती सौर पॅनल साठी केंद्रीय आर्थिक सहाय्य

  1. या योजनेअंतर्गत 2 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी खर्चाच्या 60% आणि 2 ते 3 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी अतिरिक्त प्रणाली खर्चाच्या 40% केंद्रीय आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल. सध्याच्या प्रमाणित किंमतीनुसार,  1 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी 30,000 रुपयांचे अनुदान, 2 kW क्षमतेच्या प्रणालीसाठी 60,000 रुपयांचे अनुदान,3 kW आणि त्याहून अधिक क्षमतेच्या प्रणालीसाठी 78,000 रुपयांचे अनुदान, दिले जाईल.
  2. सर्व कुटुंबाना राष्ट्रीय पोर्टलच्या माध्यमातून अनुदानासाठी अर्ज करता येईल आणि छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी योग्य विक्रेत्याची निवड करता येईल. हे राष्ट्रीय पोर्टल कुटुंबाना योग्य प्रणालीचे आकारमान, लाभाचा अंदाज, विक्रेत्याचे मानांकन इत्यादींविषयी समर्पक माहिती देऊन निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांना सहाय्य करेल.
  3. कुटुंबांना त्यांच्या छतांवर सध्या 3 kW पर्यंतच्या सौर पॅनल सिस्टीमच्या स्थापनेसाठी  सुमारे 7% इतक्या तारण-मुक्त कमी व्याजदर असलेल्या कर्जाचा लाभ घेता येईल.

योजनेची इतर वैशिष्ट्ये 

  1. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात एकआदर्श सौर ग्राम विकसित केले जाईल. हे गाव ग्रामीण भाग, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज समित्यांमध्ये त्यांच्या भागात छतावरील सौर पॅनेल बसवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एक आदर्श उदाहरण ठरेल
  2. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज समित्यांना त्यांच्या क्षेत्रात छतावर सौर पॅनेल बसवण्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनांचा फायदा होईल.
  3. ही योजना नवीकरणीय ऊर्जा सेवा कंपनी (RESCO) वर आधारित मॉडेल्ससाठी देयक सुरक्षिततेसाठी तसेच आर टी एस मधील नाविन्यपूर्ण प्रकल्पांसाठी निधी प्रदान करते.

फलनिष्पत्ती आणि परिणाम 

या योजनेच्या माध्यमातून कुटुंबाना आपल्या वीज बिलात बचत करता येईल तसेच वितरण कंपन्यांना अतिरिक्त विजेची विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल. 3 kW क्षमतेच्या प्रणाली द्वारे एका कुटुंबाला दरमहा सरासरी 300 युनिट्स विजेची निर्मिती करता येईल.

या प्रस्तावित योजनेमुळे निवासी क्षेत्रात छतांवरील सौर पॅनेलद्वारे 30 GW सौर क्षमतेच्या व्यतिरिक्त, 1000 BUs वीज निर्मिती होऊ शकेल आणि परिणामी रूफटॉप व्यवस्थेच्या  25 वर्षांच्या कार्यकाळात 720 दशलक्ष टन इतके कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन कमी होईल.या योजनेमुळे दळणवळण, पुरवठा साखळी, विक्री, स्थापना, संचालन आणि देखभाल आणि इतर क्षेत्रात मिळून सुमारे 17 लाख थेट रोजगार उपलब्ध होतील असा अंदाज आहे.

पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजनेचे लाभ मिळवणे

केंद्र सरकारने या योजनेच्या उदघाटनानंतर लगेचच जनजागृती करण्यासाठी आणि  इच्छूक कुटुंबाना अर्ज सादर करता यावेत या उद्देशाने मोठी मोहीम सुरु केली आहे. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी कुटुंब  https://pmsuryaghar.gov.in वर स्वतःची नोंदणी करू शकतात.

शरद पवार गटाचा सोशल मीडिया कार्यकर्ता योगेश सावंतला अटक-हो योगेश आमचा कार्यकर्ता -रोहित पवार

आमदार रोहित पवार यांनी योगेश कदम आमचा कार्यकर्ता असल्याचे ठणकावून सांगितले. पोलिसांनी त्याला पोलिस स्टेशनला आणले होते. त्याचा जबाब घेतला. आता त्याला कोर्टात हजर करणार आहेत. मी स्वतः त्याला भेटण्यासाठी जात आहे. सत्ताधाऱ्यांनी उगीच अॅक्टिंग करू नये. जाहीरपणे सांगतोय, तो आमचा कार्यकर्ता आहे, असे रोहित पवार म्हणाले.

मुंबई- मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया घेणारा एक व्हिडिओ तथाकथित गावरान विश्लेषक नामक एका यूट्यूब चॅनलवर प्रकाशित झाला. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने ब्राह्मण समाजाला संपवण्याचे वक्तव्य केले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एकेरी वक्तव्य करत त्यांच्यावर टीका केली. योगेश सावंतने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला. पण पोलिसांनी हा व्हिडिओ टाकणाऱ्या चॅनेलवर कारवाई करण्यापूर्वीच योगेश सावंतला अटक केली. आता त्याच्या अटकेचे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीव्र पडसाद उमटत आहेत.

भाजप आमदार राम कदम यांनी विधानसभेत योगेश सावंतवर फडणवीस यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. एका व्हायरल क्लिपमध्ये राज्यात जातीवाद पसरवण्याचे षडयंत्र दिसून येत आहे. या व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याची व त्यांच्यासारख्या ब्राह्मणांना अवघ्या 3 मिनिटांत संपवण्याची भाषा करण्यात आली आहे. योगेश कदमचे संबंध बारामतीशी आहेत. आमदार रोहित कदम यांनी या कदमला सोडण्यासाठी पोलिसांना फोन केला. या दोघांचा काय संबंध आहे? असा सवाल राम कदम यांनी या प्रकरणी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अवमानास्पद पोस्ट शेअर केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी योगेश सावंत नामक तरुणाला अटक केली आहे. योगेश सावंत असे या तरुणाचे नाव आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सोशल मीडिया सेलचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या अटकेवरून गुरुवारी विधानसभेत सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या आमदारांत तीव्र शाब्दिक चकमक उडाली.

योगेश सावंतवर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अवमानास्पद भाषा वापरून त्यांना जीवे मारण्याच्या धमकीची पोस्ट शेअर केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी रात्री त्याला अटक केली. त्याच्यावर भादंवि कलम 153(अ), 500, 505(3), 506(2) व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीनेही मुंबई पोलिसांच्या या कारवाईचा निषेध केला आहे. एका ट्यूब चॅनलने व्हिडिओद्वारे मराठा आंदोलक तरुणाची घेतलेली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सोशल मीडियाचे योगेश सावंत यांनी सोशल मिडियावर शेअर केली, जे कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य ठरत नाही. योगेशला अटक करून सरकारने चालवलेल्या मुस्कटदाबीचा आम्ही निषेध करतो. योगेश, आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत, असे महाविकास आघाडीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘मविआ’चा जागावाटपाचा फार्म्युला ठरला?:ठाकरे 23, कॉंग्रेस 16, पवार गट 9 जागांवर लढणार; ‘वंचित’साठी ठाकरेंंच्या कोट्यातून जागा

मुंबई- महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. सुरूवातीपासून आग्रही असलेले शिवसेना ठाकरे गट लोकसभेच्या 48 पैकी 23 जागांवर लढणार आहे. त्यापैकी 2 जागा ठाकरे गट मित्रपक्षांना देणार आहे. तर काँग्रेसच्या वाटेला 15 ते 17 जागा मिळणार असून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 9 ते 11 जागा मिळणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून देण्यात आली.ठाकरे गट मुंबईत 4 जागा लढण्याच्या तयारीत आहे. शरद पवार गट उत्तर मुंबईसाठी उत्सुक नाही. त्यामुळे उत्तर मुंबईची जागा कुणी लढणार नसेल तर ठाकरे गट लढणार असेही सांगितले जात आहे.

ठाकरे गटाचा सुरुवातीपासूनच लोकसभेच्या 48 पैकी 23 जागांवर दावा आहे. विशेष म्हणजे यापैकी 21 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढणार आहे. तर 2 जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी ठाकरे गटाची आहे. यातली हातकणंगले ही एक जागा ठाकरे गट राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडायला तयार आहे. तर अकोल्याची एक जागा ठाकरे गट मित्रपक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीला देखील सोडायला तयार आहे. वंचित सोबत आल्यास त्यांना आणखी एक ते दोन जागा दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठाकरे गट जवळपास 23 जागांवर लढणार आहे. यात विशेष करून कोल्हापूरच्या जागेवर सध्या पेच आहे. ही जागा सध्या शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. कोल्हापूरचे खासदार सध्या ठाकरे गटाचे आहेत. पण काँग्रेसला ही जागा हवी आहे. कोल्हापूरचे छत्रपती घराण्याचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी काँग्रेसला ही जागा हवी आहे.

कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात ठाकरे गटाने काँग्रेसकडे सांगलीची जागा मागितली आहे. हातकणंगले ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जातेय. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, कल्याण डोंबिवली, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, रामटेक, बुलढाणा, हिंगोली आणि यवतमाळ या जागांवर ठाकरे गट निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावची, अकोला या जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस आपल्या कोट्यातून एक जागा वंचितला देण्याच्या तयारीत आहे. तसेच लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर आणि सांगली अशा जागा काँग्रेसच्या वाटेला आहेत. भिवंडी जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी दावा केलाय. तसेच त्यांनी उमेदवारावरही दोन्ही पक्षांनी दावा केलाय. उत्तर मध्य मुंबई ही जागा काँग्रेसच्या वाटेला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला बारामती, शिरुर, बीड, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, माढा, सातारा, वर्धा या जागा मिळण्याची दाट शक्यता आहे.

माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी घेतली चित्रपट उद्योगातील हितधारकांची एनएफडीसी येथे भेट

मुंबई-

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज मुंबईत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) संकुलाला भेट दिली. माहिती आणि प्रसारण सचिवांनी चित्रपट उद्योग संस्था, निर्माते संघटना आणि स्टुडिओच्या प्रतिनिधींसोबतही एक बैठक घेतली. इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्यूसर्स असोसिएशन, द फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया, टी-सीरिज, यशराज फिल्म्स, जिओ स्टुडिओज, वॉर्नर ब्रदर्स पिक्चर्स, डिस्नी स्टार इंडिया, पीव्हीआर. आयनॉक्स पिक्चर्स, व्हायकॉम 18 स्टुडिओ, सोनी पिक्चर्स, पॅरामाउंट पिक्चर्सचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव(फिल्म्स) आणि एनएफडीसीचे एमडी पृथुल कुमार आणि सीबीएफसीच्या सीईओ स्मिता वत्स शर्मा देखील यावेळी उपस्थित होते.

चित्रपट उद्योग हा देशासाठी  आर्थिक वाढीला चालना देणारा मोठा  घटक आहे, असे माहिती आणि प्रसारण सचिवांनी यावेळी बोलताना सांगितले. माहिती आणि प्रसारण मंत्रालय मनोरंजन उद्योगाची वृद्धी आणि कल्याणासाठी काम करेल आणि देशातील मनोरंजन व्यवसायाला सुविधा उपलब्ध करून देईल, असे आश्वासन माहिती आणि प्रसारण सचिवांनी चित्रपट उद्योग संघटनांना दिले. मनोरंजन उद्योगाला फायदेशीर असलेले उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहन त्यांनी हितधारकांना केले. चित्रपट आणि मनोरंजन उद्योग हा केवळ एक उद्योग नाही तर त्यामध्ये लोकांच्या मनावर एक प्रभाव निर्माण करण्याचे मोठे सामर्थ्य आहे, असे ते म्हणाले. यामुळे देश आणि जनतेचे भविष्य साकारण्यात एक महत्त्वाची भूमिका मनोरंजन उद्योग बजावू लागतो, असे त्यांनी सांगितले.    

माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी हितधारकांना त्यांच्या चिंता आणि तक्रारी मांडण्याचे आवाहन केले, जेणेकरून सरकार आणि भागधारक त्यांच्या चिंता दूर करण्यासाठी आणि मनोरंजन उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करू शकतील. या संदर्भात सचिव म्हणाले की या उद्योगाला जागतिक स्पर्धेला आणि जगात घडणाऱ्या तंत्रज्ञानविषयक बदलांना देखील तोंड द्यायचे आहे. एनएफडीसीच्या पायाभूत सुविधा आणि सामग्रीचा अधिक चांगल्या प्रकारे कसा वापर करता येईल याचा विचार चित्रपट उद्योगातील हितधारकांनी करण्याचे आवाहन देखील माहिती आणि प्रसारण सचिवांनी केले.

संस्थात्मक अर्थसाहाय्य, भांडवलीकरण आणि पायाभूत सुविधा, सर्व राज्यांमध्ये चित्रिकरणाच्या परवानग्या आणि मंजुरीसाठी एक खिडकी प्रणाली, चित्रपट पायरसीबाबत जागरुकता निर्माण करणे, कमी कालावधीत अनुदान देणे, थेट परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी अधिक चांगले प्रोत्साहनलाभ आणि प्रोत्साहनात्मक आशयाला जलदगतीने मंजुरी यांसारख्या आपल्या चिंतांची माहिती चित्रपट उद्योगातील हितधारकांनी त्यांना दिली.

त्यांच्या या चिंतांचे निराकरण करण्यासाठी भविष्यात अशा प्रकारच्या आणखी बैठका आयोजित करण्याचे आश्वासन जाजू यांनी दिले. संयुक्त सचिव(फिल्म्स) पृथुल कुमार यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची यावेळी माहिती दिली, ज्यामध्ये सिनेमॅटोग्राफ कायद्यात 40 वर्षांनी झालेली सुधारणा आणि चित्रपट आशयाचे संरक्षण करण्यासाठी पायरसीविरोधी उपाययोजना, भारतात चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहनलाभ योजना, ऍनिमेशनला प्रोत्साहन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC); राष्ट्रीय चित्रपट वारसा मिशन, पुरस्कार आणि चित्रपट महोत्सव यांचा समावेश होता. सीबीएफसीच्या सीईओ स्मिता वत्स शर्मा यांनी सीबीएफसी चंदीगड येथे सुरू होणारे एक नवीन सुविधा केंद्र, वेळापत्रकात पारदर्शकतेसाठी प्राधान्याने तपासणीच्या तरतुदी आणि ई-सिनेप्रमाण पोर्टलवर डिजिटायझेशन वाढवणे  अधोरेखित केले.

जाजू यांच्या एनएफडीसीच्या पहिल्या अधिकृत भेटीदरम्यान त्यांनी एनएफडीसीच्या विविध विभाग प्रमुखांसोबत देखील बैठक घेतली. माहिती आणि प्रसारण सचिवांनी याच संकुलात असलेल्या एनएफडीसी- भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला देखील भेट दिली.

नदी सुधारणा प्रकल्पाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या मागणीसाठी पुण्यात निदर्शने 

अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांना निवेदन 
पुणे :पुणे शहरात चालू असलेल्या मुळा मुठा नदी सुधारणा प्रकल्पात नियमांची पायमल्ली होत असून सर्व कामाचे आय.आय.टी.(चेन्नई ) मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करावे ,तसेच याकामात प्रकल्प अधिकारी श्रीनिवास बोनाला यांच्याकडून झालेल्या अर्थपूर्ण व्यवहारांची समिती नेमून चौकशी करण्यात यावी,या मागणीसाठी पुणे महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली.पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांना निवेदन देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते नीलेश प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने २८ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. हे ऑडिट आणि चौकशी होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. एकनाथ शिंदे,कृष्णा जाधव,कुणाल हेंद्रे,दगडू जोशी,संदीप निकम,गणेश जोशी,स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर भर टाकून नदी प्रदूषित केली आहे.वाळू उपसा करण्यात आला आहे.प्रकल्प अधिकारी यांनी अर्थपूर्ण व्यवहार करून ठेकेदारावर कारवाई केली नाही.नदीपात्र कमी झाल्याने पावसाळ्यात लोकवस्तीत पाणी शिरणार आहे.त्यामुळे आतापर्यंत झालेल्या कामाची चौकशी करण्याची गरज आहे,असे या निवेदनात म्हटले आहे.मुळा मुठा नदी सुधारणा प्रकल्पासाठी वापरण्यात आलेला मुरूम,वाळू,राडारोडा रॉयल्टी न भरता वापरण्यात आला आहे. हे सर्व काम निकृष्ट असून प्रकल्प अधिकरी बोनाला यांची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी निवेदनात करण्यात आली  आहे.निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री,केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ,पर्यावरण विभाग मुख्य सचिव, उप सचिव,विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,पुणे पालिका आयुक्त यांना देण्यात आले आहे. 

पुरस्कार नामांकनात ‘बापल्योक’ चित्रपटाची बाजी

चित्रभाषेच्या जाणिवा समृद्ध करणं हे चित्रपट महोत्सवांचे उद्दिष्टय असते. या उद्देशानेच आजवर अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये सहभागी होत गौरविल्या गेलेल्या ‘बापल्योक’ चित्रपटाने झी चित्र गौरव पुरस्कार आणि  मटा सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या नामांकन विभागातही दमदार बाजी मारली आहे. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात तब्ब्ल १७ आणि मटा सन्मान पुरस्कार सोहळ्यात ३ नामांकने मिळवत ‘बापल्योक’ चित्रपटाने आपली  छाप पाडली आहे.

मकरंद माने दिग्दर्शित‘बापल्योक’ चित्रपटाने आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. आता झी चित्र गौरव पुरस्कार नामांकनामध्ये  या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन,  छायांकन ,संगीत  गीतकार, गायक, पार्श्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा, कलादिग्दर्शन, संकलन, अभिनेता सहाय्यक अभिनेता, साऊंड डिझायनर अशा १७ विभागांमध्ये  नामांकने मिळाली आहेत तर मटा सन्मान पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता, गीतकार, संगीत दिग्दर्शन या तीन विभागासाठी नामांकने  आहेत.       

‘बापल्योक’ चित्रपट आपले वेगळेपण सिद्ध करणार याबद्दल खात्री होती. सशक्त आशयाचा हा चित्रपट आणणे आव्हानात्मक होते. आमच्या या प्रयत्नांची मोठय़ा पातळीवर दखल घेतली गेल्याचे समाधान चित्रपटाचे निर्माते विजय शिंदे यांनी व्यक्त केले. आपल्या चित्रपटासाठी झी आणि मटा सारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे नामांकन मिळणे ही फारच आनंदाची गोष्ट असल्याचे अभिनेता शशांक शेंडे यांनी सांगितले. 

वडिल मुलाच्या नात्याचे मर्म सांगणारा आणि ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे, विठ्ठल काळे पायल जाधव, नीता शेंडे यांच्या अभिनयाने नटलेल्या ‘बापल्योक’ चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा

पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा, मराठी स्वाक्षरी स्पर्धा, तसेच पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करून विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली.

प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती, तसेच मराठी राजभाषा दिवसाचे औचित्य साधून सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.  संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालयात विविध कार्यक्रम आयोजिले होते. ‘सूर्यदत्त’चे संचालक प्रशांत पितालिया, प्रा. धनंजय अवसरीकर, प्राचार्य डॉ. मिथिलेश विश्वकर्मा, प्राचार्य डॉ. सीमी रेठेरेकर, उपप्राचार्य दीपक सिंग, विभाग प्रमुख अतुल देशपांडे आदी उपस्थित होते.
प्रशांत पितालिया यांनी विद्यार्थ्यांशी मार्गदर्शनपर संवाद साधला. ते म्हणाले, “आपण सर्वांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगावा. इंग्रजी भाषा येत नाही, याचा न्यूनगंड बाळगू नये. आपल्या बोली भाषेतील शब्दांनी भाषा समृद्ध होते. शुद्ध मराठी भाषा येत नसल्याचे भय न बाळगता आपल्या भाषेतून व्यक्त होण्याचा प्रयत्न करावा. अधिकाधिक शब्द शिकण्याची संधी शोधून शब्दसंग्रह वाढवावा. दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर केल्यानेच भाषा विकसित होईल. काळाची गरज ओळखून अन्य भाषा शिकण्यासही प्राधान्य द्यावे.”

वक्तृत्व स्पर्धेमध्ये शिवनाथ काशीद, गायत्री राजगुरू, यश मंडल, सत्यजित दाभाडे यांनी यश प्राप्त केले. मराठी स्वाक्षरी स्पर्धेत विशाखा साळुंके, गायत्री राजगुरू, ईश्वरी देव या विद्यार्थ्यांची स्वाक्षरी सर्वोत्कृष्ट ठरली. इंग्रजी शब्दाला मराठी शब्द सुचविण्याची आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकाना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. प्रणिता गांधी, पूजा भुजबळ, तृप्ती लासरेकर, विद्या जोशी या ग्रंथालय सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन ईश्वरी देव या विद्यर्थिनीने केले.

पुणे उद्रेकाच्या उंबरठ्यावर: महिलांमध्ये लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा मूक धोका वाढत आहे

0

पुणे-: महाराष्ट्रामध्ये १५ वर्षांपुढील वयोगटातील २४ टक्के लोक लठ्ठ असल्याचे लॅन्सेटचा अहवाल सांगतो. पुण्यातील रहिवाशांची वाढती टक्केवारी वजन जास्त असण्याच्या आणि लठ्ठपणाच्या गटात मोडते. तरूण महिलांमध्‍ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असताना तरूण लठ्ठ महिलांवरील आणखी एका अहवालामधील निष्‍पत्तींमधून निदर्शनास येते की, तरूण महिला वाढत्या वजनासंदर्भात आरोग्‍यदायी राहण्‍याऐवजी आकर्षक लुकला प्राधान्‍य देण्‍याचा ट्रेण्‍ड सध्‍या सुरू आहे. वर्ल्ड ओबेसिटी डे अर्थात जागतिक लठ्ठपणा विरोधी दिनाच्या औचित्याने डॉक्टर्स लठ्ठपणा आणि हृदयाचे आरोग्य यांतील आंतरसंबंध अधोरेखित करतात व अतिस्थूलता वा लठ्ठपणा आणि त्याअनुषंगाने येणारे इतर आजार यांच्याविषयी जागरुकता वाढविण्याची आवश्यकता ते ठळकपणे मांडतात. लठ्ठपणावरील, विशेषत: महिलांच्या बाबतीत या समस्येवरील हस्तक्षेप लवकरात लवकर सुरू करण्याच्या गरजेवर ते भर देतात.

सह्याद्री हॉस्पिटलमधील कॅथ लॅबच्या डिरेक्टर डॉ. प्रिया पालिमकर ही बाब तपशीलात समजावून सांगतात, “लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा झटका किंवा कोरोनरी आर्टरी डिजिज यांचा वाढता धोका यांच्यातील संबंध सुस्थापित आहेत. शरीरातील अतिरिक्त मेदामुळे अशा काही जैविक बदलांना निमित्त मिळते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांध्ये प्लाकचा थर साचण्याचा धोका आणखी वाढतो, ज्यामुळे अंतिमत: हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

विशेषतः स्त्रियांमध्ये, ही लक्षणे पुसट आणि नजरेतून सहज सुटून जावीत अशी असतात. पुरुषांच्या बाबतीत सर्वसाधारणपणे छातीत दुखणे हे लक्षण जाणवते त्याउलट ब्लॉकेज असलेल्या महिलांमध्ये असाधारण लक्षणे जाणवतात.” ‘यामुळे या आजाराचे लवकर निदान होणे अवघड बनते.” डॉ. प्रिया पुढे सांगतात, “अशा संदिग्ध लक्षणांच्या आड खरी समस्या लपून जाते, त्यामुळे केवळ महिलांमध्ये दिसून येणाऱ्या, हार्मोन्सच्या पातळीतील बदलांसारख्या असाधारण धोकादायक घटकांना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.”

महिलांनी आपल्या या आगळ्यावेगळ्या लक्षणांविषयी जागरुक असले पाहिजे आणि हृदयविकाराची शक्यता कमी करण्यासाठी आवश्यक ती पाउले उचलली पाहिजेत. घामाघूम होणे, मळमळणे, चक्कर आल्यासारखे वाटणे किंवा अचानकपणे थकवा जाणविणे ही वरकरणी हृदयविकाराची ठराविक लक्षणे वाटत नाहीत, मात्र स्त्रियांमध्ये ती सरसकट दिसून येतात. दुर्दैवाने महिलांना हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे जाणवू लागतात तेव्हा बरेचदा त्यांचा चुकीचा अर्थ लावला जातो. याचे कारण महिलांमध्ये दिसणारी लक्षणे ही अस्पष्ट असतात. यात धाप लागणे, मळमळणे किंवा उलटी होणे आणि पाठ किंवा जबडा दुखणे अशा लक्षणांचा समावेश होतो. इतर महिलांना गरगरल्यासारखे वाटू शकते, छातीच्या खालच्या भागात किंवा पोटाच्या वरच्या भागात वेदना जाणवू शकतात किंवा प्रचंड थकल्यासारखे वाटू शकते. 

या समस्यांवरील प्रभावी उपचारांसाठी आणि व्यवस्थापनासाठी लवकरात लवकर निदान होणे अत्यावश्यक असते. लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी डॉ. प्रिया संतुलित आहाराचा समावेश असलेली निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचा आणि ताणतणावांचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला देतात. साखरेच्या पेयांना पर्याय शोधणे आणि झोपेला प्राधान्य देणे यांसारख्या छोट्या-छोट्या बदलांचाही मोठा प्रभाव पडू शकतो. गंभीर स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये अँजिओप्लास्टी सारखी प्रक्रिया जी उच्च यश दराने केली जाऊ शकते, ज्यामध्ये शरीराचा लहानात लहान छेद घेऊन केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला जातो. लठ्ठपणा असलेल्या तरुण महिलांमध्ये कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) चे निराकरण करण्यासाठी मेटल-लेस अँजिओप्लास्टीचे उदयोन्मुख तंत्र, बायोरिसॉर्बेबल स्कॅफोल्ड्स (BRS) ज्याला विरघळणारे स्टेंट असेही म्हणतात आणि ड्रग-कोटेड बलून (DCB) चा वापर यामधून कार्डियोलॉजीमधील मोठी प्रगती दिसून येते. कायमस्वरूपी इम्प्लांट न ठेवण्याच्या क्षमतेसह ही उपचारपद्धती धमन्‍यांचे कार्य पूर्ववत करते, तसेच भावी उपचारांसाठी मार्ग सुलभ करते.

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नवीन सीईओची नियुक्ती

पुणे, २९ फेब्रुवारी २०२४:  आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने आपल्या सीईओ पदी श्री पमेश गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. २६ फेब्रुवारी २०२४ पासून आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारलेले श्री. पमेश गुप्ता गेल्या २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून मोठमोठ्या टीम्सचे नेतृत्व करत आहेत, पीअँडएल जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत, व्यवसाय धोरणे विकसित करण्यात तसेच परिवर्तन व्यवस्थानावर भर देत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आहेत. गेली अनेक वर्षे श्री गुप्ता यांनी आयडिया सेल्युलर लिमिटेड आणि भारती एअरटेल यासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये वरिष्ठ स्तरावर काम केलेले आहे. आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलला पुढील स्तरावर घेऊन जाण्यासाठी आवश्यक सखोल व व्यापक अनुभव आणि नेतृत्व कौशल्ये त्यांच्याकडे पुरेपूर आहेत. श्री पमेश गुप्ता यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये बॅचलर ऑफ इंजिनीयरिंग, युनायटेड किंगडममधील नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीमधून मास्टर इन इलेक्ट्रॉनिक्स आणि कॅनडातील मॅकगिल युनिव्हर्सिटी मॉन्ट्रियलमधून एमबीए केले आहे. 

गेली ८ वर्षे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे सीईओ पद सांभाळणाऱ्या श्रीमती रेखा दुबे यांनी पदत्याग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता श्री गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुण्यातील एक मल्टी-स्पेशालिटी मेडिकल सेंटर आहे. सहानुभूतीपूर्ण, दयाळू भावनेने, दर्जेदार आरोग्य सेवा परवडण्याजोग्या किमतींमध्ये उपलब्ध करवून देण्यासाठी हे हॉस्पिटल वचनबद्ध आहे.  अनेक औद्योगिक संस्थांकडून प्रमाणित करण्यात आलेल्या या हॉस्पिटलला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आणि पुरस्कार मिळाले आहेत. वर्षानुवर्षे, वंचितांना सेवा देण्याचे आपले उद्दिष्ट पूर्ण करताना आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने समाजाला सर्वोत्तम दर्जाचे उपचार प्रदान करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.

लष्कराच्या दक्षिण कमांडने अलंकरण समारंभात आपल्या युनिट्सचा, जवानांचा आणि अधिकाऱ्यांचा केला सन्मान

पुणे, 29 फेब्रुवारी 24

लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने पुण्यातील आरएसएएमआय मधील बिपिन रावत सभागृहात लष्करी भव्यतेसह एक औपचारिक सन्मान समारंभ आयोजित केला होता. या समारंभात, मातृभूमीच्या सेवेसाठी समर्पण, साहस, शौर्य आणि उत्कृष्ट प्रदर्शनासाठी 35 वैयक्तिक पदकांच्या मानकऱ्यांना आणि 29 युनिट्सना सन्मानित करण्यात आले. लष्कराच्या जवानांनी आणि दक्षिण कमांडच्या युनिट्सनी हा सन्मान स्विकारला. या समारंभाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार प्राप्त सैनिक, अधिकारी तसेच माजी सैनिकांसाठी 28 फेब्रुवारी 2024 रोजी एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप अँड सेंटर, गार्ड रेजिमेंटल सेंटर आणि पॅरा रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटर च्या बँड पथकाने मार्शल संगीत सादर केले. बँड सदस्यांद्वारे विशेष कलाविष्काराच्या रूपात भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध राग देखील सादर करण्यात आले. अरुंधती पटवर्धन यांच्या नृत्याविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
29 फेब्रुवारी 2024 रोजी, लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह, परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशेष सेवा पदक, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, दक्षिण कमांड यांनी या समारंभाचे अध्यक्षपद भूषवले. या समारंभात एकूण 13 सेना पदके (शौर्य), 08 सेना पदके ( प्रतिष्ठित सेवा ), 02 युद्ध सेवा पदके, 13 विशिष्ट सेवा पदके, 27 जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ युनिट सन्मान आणि 02 लष्करप्रमुख युनिट सन्मान प्रदान करण्यात आले.
लष्कराच्या प्रथेप्रमाणे, वैयक्तिक शौर्य आणि आपल्या कर्तव्याप्रती असामान्य निष्ठेचे प्रदर्शन करत स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तींना आणि युनिट्सना विविध पुरस्कार प्रदान करण्यासाठी वर्षातून एकदा सन्मान समारंभ आयोजित केला जातो. लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशेष सेवा पदक, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ सदर्न कमांड यांनी आपल्या भाषणात सर्व पुरस्कार विजेत्यांचे आणि युनिट सन्मानपत्र प्राप्तकर्त्यांचे अभिनंदन केले आणि पुरस्कार विजेत्यांचे अनुकरण करण्यासाठी तसेच भारतीय सैन्याच्या सामूहिक उद्दिष्टांमध्ये योगदान देताना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सर्व श्रेणींतील जवानांना प्रोत्साहित केले.
आर्मी कमांडर यांनी सदर्न कमांड आणि त्यांच्या सर्व तुकड्यांनी संपूर्ण भारतातील तैनाती दरम्यान केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचेही वर्णन केले तसेच सदर्न कमांड आणि भारतीय सैन्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

सारंग कुलकर्णी, नागेश आडगावकर, अनुजा झोकरकर यांना उस्ताद बिस्मिला खान युवा पुरस्कार 

भारती विद्यापीठ  स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टस् च्या विद्यार्थ्यांना संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार

पुणे: भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टसचे सारंग कुलकर्णी (सरोद वादक), नागेश आडगावकर, अनुजा झोकरकर (गायक) या विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिला खान युवा पुरस्कार मिळाला आहे.

पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ चे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह आणि प्र कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टस् चे संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी अभिनंदन केले आहे.

प्रा. शारंगधर साठे म्हणाले, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टस् हे आज संगीत, नृत्य विषयातील शिक्षण गुरुकुल पद्धतीने देणारे एक अग्रगण्य महाविद्यालय ठरले आहे. संपूर्ण भारतातून आणि विदेशातून इथे संगीत आणि नृत्य शिकण्यासाठी विद्यार्थी येतात.

संगीत नाटक अकादमीच्या वतीने उदयोन्मुख कलाकारांना मिळणारा हा पुरस्कार सारंग कुलकर्णी (गुरु पंडित राजन कुलकर्णी), नागेश आडगावकर (गुरु उस्ताद रशीद खान), आणि अनुजा झोकरकर (गुरु पंडिता कल्पना झोकरकर) तीन विद्यार्थ्यांना जाहीर झाला आहे, ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. कला शिकताना गुरुकुल पद्धत आणि विश्वविद्यालय पद्धत याची जी सांगड आमच्याकडे घातली आहे याचे हे फळ आहे. या तीनही विद्यार्थ्यांनी स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टस् मधून गुरुशिष्य परंपरेमध्ये संगीत विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.

मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने वैद्यकीय साहित्य संच, रायगड जिल्ह्यातील मुलांसाठी ऑनलाईन कौशल्य प्रशिक्षण

0

मुंबई, दि. २९ :- मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पुणे, ठाणे व रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वैद्यकीय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यातील सावरोली येथील ३० विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला.

कोपरन रिसर्च लॅबोरेटरीज, सँडोज प्रायव्हेट लिमिटेड,  एमेरिकेअर्स  इंडिया फाऊंडेशन यांच्या वतीने सामुदायिक वैद्यकीय साहित्याचे तसेच ऑनलाईन प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.

साहित्य वितरण व उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले यांच्यासह  कोपरन लॅबोरेटरीजचे सुरेंद्र सोमाणी, वरूण सोमाणी, अजित जैन, राकेश दोशी, संजय दोशी, सुनील सोधानी, ललित राजपुरोहीत, श्रीमती व्ही.पी.एस. नायर,  सँडोजचे सुधीर भांडारे, समीर कोरे, पंकज गुप्ते, अजित जांभळे, लुसी दास यांच्यासह अमेरिका केअरचे अनिर्बण मित्रा, अशोक राणा, गुरुप्रसाद जानवेकर उपस्थित होते. तसेच या सर्व कामात सहकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी वाशिमच्या अस्मिता मल्टीपर्पज एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मनोज भगत, वैशाली भगत, स्वराज्य सेवा वाघमोडे प्रतिष्ठानच्या डॉ. राजकुमार वाघमोडे, अक्षय पाटील यांच्यासह  सावरोलीचे सरपंच संतोश बैलमारे, खोपोलीच्या वायएके पब्लिक स्कूलच्या उपप्राचार्या पूनम गुप्ता , सहकार देवगिरी फाऊंडेशनचे अनंत अंतरकर, डॉ. राजेंद्र जोशी उपस्थित होते.

प्रत्येक उत्सव मंडळाच्या माध्यमातून किमान पाचशे ते सहाशे  कुटुंबांना तसेच दहा ते बारा चाळी, सोसायट्यांमधील नागरिकांपर्यंत वैद्यकीय साहित्य पोहोचविण्यात येणार आहे.  यासाठी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील नोंदणीकृत सार्वजनिक उत्सव मंडळे, को-ऑप सोसायटी यांना एकूण २९१ संच तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड एकूण ७९ संच, रायगड जिल्ह्यातील खालापूर व बिरवाडी, महाड येथे १२ वैद्यकीय साहित्य संच देण्यात आले. आठवी, नववी, दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी HTML व Coding चे बेसिक प्रशिक्षण मिळाल्यास पुढील भविष्यासाठी उपयोगी ठरू शकेल. शहरी भागातील मुलांसोबत स्पर्धेत उतरताना आत्मविश्वास तयार होईल. यासाठी  रायगड मधील सावरोली, उंबरे, ता.खालापूर, बिरवाडी, ता. महाड येथील ३० विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या साहित्य वितरण कार्यक्रमाचे संयोजन मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख तथा राज्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, समन्वयक मनोज घोडे-पाटील, सतिश जाधव आदींनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा ते कळंब रेल्वेगाडीचा शुभारंभ, लोकार्पण

0

यवतमाळ :  वर्धा – यवतमाळ – नांदेड या रेल्वे मार्गावरील वर्धा ते कळंब या रेल्वे गाडीचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी वर्धा ते कळंब दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून ई-उद्घाटन केले. शुभारंभाप्रसंगी कळंब रेल्वे स्थानकावर खासदार रामदास तडस, रेल्वे अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.

वर्धा –यवतमाळ- नांदेड असा नवीन रेल्वे मार्ग झाला असून आज दि. २८ फेब्रुवारी रोजी या मार्गावरील वर्धा ते कळंब या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले. लोकार्पणाप्रसंगीच वर्धा ते कळंब रेल्वेगाडी देखील सुरु करण्यात आली.

शुभारंभानंतर दि. २९ फेब्रुवारीपासून वर्धा ते कळंब गाडी क्रमांक 51119 आणि कळंब ते वर्धा गाडी क्रमांक 511120 च्या नियमित सेवा सुरू होणार आहेत. या गाड्या रविवार आणि बुधवार वगळता आठवड्यातून पाच दिवस चालतील, याशिवाय या गाड्यांना देवळी आणि भिडी स्थानकावर नियोजित थांबे असतील आणि मार्गावरील प्रवाशांच्या गरजा पूर्ण करतील.

या रेल्वे सेवांचा परिचय प्रदेशातील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याचा लाभ प्रवासी, व्यवसाय आणि स्थानिक समुदायांना होईल, सुरळीत कनेक्टिव्हिटी सुलभ होईल आणि कळंब आणि वर्धा दरम्यान अखंड प्रवास शक्य होणार आहे.

मौलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक महामंडळ योजनांसाठी ‘एनएमएफडीसी’च्या ५०० कोटींच्या कर्जाला कायमस्वरुपी हमी – उपमुख्यमंत्री अजित पवार 

0

मुंबई, दि. 29 : राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाकडून (एनएमएफडीसी) राज्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी कर्ज मिळण्यासाठी देण्यात आलेल्या शासन हमीची मर्यादा आठ वर्षांऐवजी कायमस्वरुपी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. हा निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पुढाकार आणि केलेल्या प्रयत्नांबद्दल ‘जमिअत-उलेमा-ए-महाराष्ट्र’ सह अनेक मुस्लिम संस्था, संघटनांनी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे आभार मानले आहेत.

अल्पसंख्याक समुदायांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी शासनातर्फे विविध योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजाच्या आर्थिक विकासासाठी कर्जयोजना राबविण्यात येते. या योजनांसाठी ‘एनएमएफडीसी’ कडून महामंडळाला कर्जपुरवठा करण्यात येतो. या कर्जपुरवठ्यासाठी राज्यशासनाच्या हमीची मर्यादा आठ वर्षांसाठी 30 कोटींवरुन 500 कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय याआधी घेण्यात आला होता. त्या निर्णयात सुधारणा करुन 500 कोटींची शासन हमीची मर्यादा आठ वर्षांऐवजी कायमस्वरुपी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयामुळे अल्पसंख्याक विशेषत: मुस्लिम समाजातील युवकांच्या रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. अल्पसंख्याकांसाठीच्या विकास योजना अधिक प्रभावी        व शाश्वत होण्यास मदत होणार आहे. यातून मुस्लिम बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाला गती मिळणार आहे, अशी भावना मुस्लिम संस्था, संघटनांकडून व्यक्त होत आहे.

आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश

0

मुंबई, दि. २९: आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. आज विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस डॉक्टरांना पदस्थापनेचे आदेश ऑनलाईन देण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

आरोग्य विभागाने युद्धपातळीवर ही भरती प्रक्रिया यशस्वीपणे राबविली. मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची भरती झाली असून त्या माध्यमातून राज्यातील सामान्य नागरिकांना वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील १७२९ रिक्त पदांसाठी एमबीबीएस व बीएएमएस उमेदवारांचे एकूण २९ हजार ५५६ अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त झाले होते. ६५७५ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी अर्ज केले होते. एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन अंतिम गुणवत्ता यादीनुसार १४४६ एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यांना आज पदस्थापनेचे आदेश देण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी गट-अ या संवर्गातील १७२९ रिक्त पदे नामनिर्देशनाने भरण्याबाबत शासनाने ३० जानेवारी २०२४ रोजी मान्यता दिली होती. याबाबत दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध जाहिरात करण्यात आली होती. पदभरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. १ ते १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर छाननी प्रक्रिया पूर्ण करून आज आदेशही देण्यात आले. अत्यंत कमी दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले.

विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.