अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांना निवेदन
पुणे :पुणे शहरात चालू असलेल्या मुळा मुठा नदी सुधारणा प्रकल्पात नियमांची पायमल्ली होत असून सर्व कामाचे आय.आय.टी.(चेन्नई ) मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करावे ,तसेच याकामात प्रकल्प अधिकारी श्रीनिवास बोनाला यांच्याकडून झालेल्या अर्थपूर्ण व्यवहारांची समिती नेमून चौकशी करण्यात यावी,या मागणीसाठी पुणे महानगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली.पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांना निवेदन देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते नीलेश प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने २८ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. हे ऑडिट आणि चौकशी होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. एकनाथ शिंदे,कृष्णा जाधव,कुणाल हेंद्रे,दगडू जोशी,संदीप निकम,गणेश जोशी,स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर भर टाकून नदी प्रदूषित केली आहे.वाळू उपसा करण्यात आला आहे.प्रकल्प अधिकारी यांनी अर्थपूर्ण व्यवहार करून ठेकेदारावर कारवाई केली नाही.नदीपात्र कमी झाल्याने पावसाळ्यात लोकवस्तीत पाणी शिरणार आहे.त्यामुळे आतापर्यंत झालेल्या कामाची चौकशी करण्याची गरज आहे,असे या निवेदनात म्हटले आहे.मुळा मुठा नदी सुधारणा प्रकल्पासाठी वापरण्यात आलेला मुरूम,वाळू,राडारोडा रॉयल्टी न भरता वापरण्यात आला आहे. हे सर्व काम निकृष्ट असून प्रकल्प अधिकरी बोनाला यांची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री,केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ,पर्यावरण विभाग मुख्य सचिव, उप सचिव,विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,पुणे पालिका आयुक्त यांना देण्यात आले आहे.