मुंबई- महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. सुरूवातीपासून आग्रही असलेले शिवसेना ठाकरे गट लोकसभेच्या 48 पैकी 23 जागांवर लढणार आहे. त्यापैकी 2 जागा ठाकरे गट मित्रपक्षांना देणार आहे. तर काँग्रेसच्या वाटेला 15 ते 17 जागा मिळणार असून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 9 ते 11 जागा मिळणार असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून देण्यात आली.ठाकरे गट मुंबईत 4 जागा लढण्याच्या तयारीत आहे. शरद पवार गट उत्तर मुंबईसाठी उत्सुक नाही. त्यामुळे उत्तर मुंबईची जागा कुणी लढणार नसेल तर ठाकरे गट लढणार असेही सांगितले जात आहे.
ठाकरे गटाचा सुरुवातीपासूनच लोकसभेच्या 48 पैकी 23 जागांवर दावा आहे. विशेष म्हणजे यापैकी 21 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढणार आहे. तर 2 जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी ठाकरे गटाची आहे. यातली हातकणंगले ही एक जागा ठाकरे गट राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडायला तयार आहे. तर अकोल्याची एक जागा ठाकरे गट मित्रपक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीला देखील सोडायला तयार आहे. वंचित सोबत आल्यास त्यांना आणखी एक ते दोन जागा दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ठाकरे गट जवळपास 23 जागांवर लढणार आहे. यात विशेष करून कोल्हापूरच्या जागेवर सध्या पेच आहे. ही जागा सध्या शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. कोल्हापूरचे खासदार सध्या ठाकरे गटाचे आहेत. पण काँग्रेसला ही जागा हवी आहे. कोल्हापूरचे छत्रपती घराण्याचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी काँग्रेसला ही जागा हवी आहे.
कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात ठाकरे गटाने काँग्रेसकडे सांगलीची जागा मागितली आहे. हातकणंगले ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जातेय. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, कल्याण डोंबिवली, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, रामटेक, बुलढाणा, हिंगोली आणि यवतमाळ या जागांवर ठाकरे गट निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावची, अकोला या जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस आपल्या कोट्यातून एक जागा वंचितला देण्याच्या तयारीत आहे. तसेच लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर आणि सांगली अशा जागा काँग्रेसच्या वाटेला आहेत. भिवंडी जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी दावा केलाय. तसेच त्यांनी उमेदवारावरही दोन्ही पक्षांनी दावा केलाय. उत्तर मध्य मुंबई ही जागा काँग्रेसच्या वाटेला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला बारामती, शिरुर, बीड, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, माढा, सातारा, वर्धा या जागा मिळण्याची दाट शक्यता आहे.