भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टस् च्या विद्यार्थ्यांना संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार
पुणे: भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टसचे सारंग कुलकर्णी (सरोद वादक), नागेश आडगावकर, अनुजा झोकरकर (गायक) या विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय संगीत नाटक अकादमीचा उस्ताद बिस्मिला खान युवा पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यापीठ चे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह आणि प्र कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टस् चे संचालक प्रा. शारंगधर साठे यांनी अभिनंदन केले आहे.
प्रा. शारंगधर साठे म्हणाले, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टस् हे आज संगीत, नृत्य विषयातील शिक्षण गुरुकुल पद्धतीने देणारे एक अग्रगण्य महाविद्यालय ठरले आहे. संपूर्ण भारतातून आणि विदेशातून इथे संगीत आणि नृत्य शिकण्यासाठी विद्यार्थी येतात.
संगीत नाटक अकादमीच्या वतीने उदयोन्मुख कलाकारांना मिळणारा हा पुरस्कार सारंग कुलकर्णी (गुरु पंडित राजन कुलकर्णी), नागेश आडगावकर (गुरु उस्ताद रशीद खान), आणि अनुजा झोकरकर (गुरु पंडिता कल्पना झोकरकर) तीन विद्यार्थ्यांना जाहीर झाला आहे, ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. कला शिकताना गुरुकुल पद्धत आणि विश्वविद्यालय पद्धत याची जी सांगड आमच्याकडे घातली आहे याचे हे फळ आहे. या तीनही विद्यार्थ्यांनी स्कूल ऑफ परफॉंर्मिंग आर्टस् मधून गुरुशिष्य परंपरेमध्ये संगीत विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.