Home Blog Page 1154

शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या ऐतिहासिक सभेने भाजपासह फुटीरसेनेची झोप उडाली: नाना पटोले

बाळासाहेब ठाकरेंनीच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत युपीएला दोनदा पाठिंबा दिला, हे विसरले का?

तीन-चार पक्ष फिरणाऱ्या व ५० खोक्यांसाठी गद्दारी करणाऱ्या लाचारांनी राहुल गांधी व काँग्रेसवर बोलू नये.

बानवकुळे हेच मुळात सिनेमातील विनोदी पात्र, स्वतःच्या पक्षात किंमत आहे का? ते आधी पहा!

काँग्रेसकडून जनतेला ५ न्यायासह २५ गॅरंटी, मोदीसारखी जुमलेबाजी व फेकूगिरी नव्हे.

मुंबई, दि. १८ मार्च

शिवाजी पार्कवरील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या ऐतिहासीक सभेने एक नवा इतिहास रचला आहे. इंडिया आघाडीच्या देशभरातील नेत्यांच्या उपस्थितीत या सभेला ‘जनसागर’ लोटला होता. शिवाजी पार्कवरील सभेने भाजपाला आपला पराभव समोर दिसू लागला आहे त्यामुळे नैराश्येतून चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत सारख्यांना धडकी भरली आहे. शिवाजी पार्कवरील सभेने ‘मोदानी’ सरकारच्या अंताची सुरुवात झाल्याने, त्यांची झोप उडाली आहे, असे सडेतोड प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

शिवाजी पार्कवरील सभा व राहुल गांधी यांच्यावर टीका करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेत नाना पटोले पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी सर्वात मोठे खंडणी वसुलीचे रॅकेट चालवतात या राहुल गांधी यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची धमक आधी भाजपाने दाखवावी. शिवाजी पार्कवरील सभेने देशात परिवर्तनाचा संकेत दिला आहे हे स्पष्ट असून पराभवाच्या भितीपोटी भाजपा व गद्दारसेनेचे लाचार या सभेवर अनावश्यक टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केल्यापासून भाजपाला पोटशूळ उठला आहे. ‘हिंदुत्व खतरे में’ अशी कोल्हेकुई भाजपाचे नेते करत असतात व त्यांच्याच सुरात सुर मिसळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे री ओढत असतात. भाजपाने देशभरातील विविध राज्यात राजकीय तडजोडी केल्या, काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षासोबत सरकार स्थापन करून भाजपाने दीड दोन वर्ष संसार केला तेंव्हा यांचे ‘हिंदुत्व खतरे में’ आले नाही का? बाळासाहेबांचा एखादा व्हिडिओ दाखवून ते काँग्रेस विरोधी होते हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसच संबंध लपून राहिलेले नाहीत. बाळासाहेबांनीच काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील व प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता, याची माहिती कदाचित या लोकांना नसावी किंवा त्यांना विसरण्याचा रोग जडला असावा त्यामुळे या मंडळींनी उगाच बोंबाबोंब करु नये.

शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी नव्हती, हास्यजत्रा होती अशी बाष्कळ बडबड करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभेची गर्दी पाहण्यासाठी मोठ्या भिंगाचा चष्मा वापरुन पहावे. मोदींच्या सभेला भाडोत्री गर्दी कशी जमावावी लागली, हे यवतमाळच्या सभेने अख्या महाराष्ट्रानेही पाहिले आहे. चंद्रशेखर बावनकुळे हेच एक ‘विनोदीपात्र’ आहेत आणि भाजपात बावनकुळेंची काय किंमत आहे, हे विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यावरून दिसले आहे. ज्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला उमेदवारीही मिळत नाही, यावरुन पक्षातील त्यांची किंमत काय, हे कळते.

काँग्रेस पक्षाने ५ न्यायासह २५ गॅरंटी दिल्या आहेत, सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा या गॅरंटीतून प्रयत्न केला जाणार आहे. ही काँग्रेस पक्षाची गॅरंटी आहे, कोणत्या एका व्यक्तीची नाही, मोदींसारखी फेकूगिरी व जुमेलबाजी तर नक्कीच नाही. बावनकुळेंची पात्रता असेल तर त्यांनी नक्कीच या गॅरंटींचा अभ्यास करावा. मागील १० वर्षात भाजपा व मोदींनी काय दिवे लावलेत ते भाजपाच्या नेत्यांना व त्यांच्या विकास रथांना गावागातून लोक हुसकावून लावत आहे, यावरून दिसतेच आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करून बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, पक्ष, चिन्ह चोरून नेले आहे. तथाकथीत महाशक्तीच्या नादाला लागून त्यांनी केलेले कृत्य खरे शिवसैनिक विसरणार नाहीतच पण ५० खोक्यांसाठी केलेल्या गद्दारांनी ‘हिंदु खतरे में’ म्हणणे अत्यंत हास्यास्पद आहे. लोकसभेच्या एका एका जागेसाठी भाजपाकडे भीक मागवी लागणाऱ्या व प्रत्येकवेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांची परवानगी घ्यावी लागणाऱ्या एकनाथ शिंदे यांना काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर बोलण्याचा अधिकार काय?. बाळासाहेब ठाकरे असताना ज्या लोकांची ‘मातोश्री’च्या बाहेर स्टुलवर बसण्याची लायकी नाही तेच लोक खरी शिवसेना आमचीच, असा उसना आव आणत आहेत. खुर्चीसाठी व ५० खोक्यांसाठी आपले ‘इमान’ घाण ठेवणाऱ्या गद्दार उदय सामंत, प्रविण दरेकर या पालापाचोळ्याबद्दल बोलावे एवढी त्यांची कुवत नाही. दररोज सकाळी भोंगा वाजवण्याचे काम त्यांच्या मालकांनी त्यांना दिले आहे ते त्यांनी करावे व तेवढीच त्यांची ‘पात्रता’ आहे. शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीची ‘शक्ती’ पाहून भाजपासह गद्दारसेनेची तंतरली आहे. देशात परिवर्तन होणार हे अटळ असून बेरोजगार होणाऱ्या भाजपा व गद्दारसेनेच्या लोकांना काँग्रेस पक्षाच्या गॅरंटीतून एक वर्षाची ‘अप्रांटीसशिप’ नक्की मिळेल, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

मुद्रणालय चालकांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील तदतुदींचे पालन करावे- डॉ.सुहास दिवसे

पुणे, दि. १८: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मुद्रणालय चालकांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदींचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, पूना प्रेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहूल मारुलकर, सदस्य रवींद्र जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, निवडणुकीदरम्यान उपयोगात आणले जाणारे हस्तपत्र, हस्तपुस्तिका, भित्तीपत्रके आदी छापिल प्रचारसाहित्याच्या छपाईसंदर्भात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२७ए नुसार तरतुदींचे पालन होणे आवश्यक आहे. त्यानुसार निवडणूक प्रचारसाहित्यावर मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता असणे बंधनकारक आहे.

प्रकाशकाने ओळखीचा पुरावा म्हणून ओळखणाऱ्या दोन व्यक्तींनी साक्षांकित केलेले स्वस्वाक्षरीत प्रतिज्ञापत्र दोन प्रतीत मुद्रकाकडे सादर करणे आवश्यक आहे. मुद्रकाने छपाईनंतर प्रतिज्ञापत्र आणि प्रचारसाहित्याची एक प्रत तात्काळ जिल्हाधिकारी यांना पाठविणे आवश्यक आहे.

या कलमाचा भंग झाल्यास सहा महिन्यापर्यंतचा तुरुंगवास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. तरी जिल्ह्यातील सर्व मुद्रणालय चालकांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाचे पालन करुन वेळोवेळी माहिती सादर करावी. मुद्रणालय संघटनेनेदेखील आपल्या सर्व सदस्यांना या तरतुदीची माहिती द्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी बैठकीदरम्यान केले.

संशयास्पद बँक व्यवहारांची माहिती बँकांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ द्यावी-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू असून संशयास्पद बँक व्यवहारांवर बँकांनी लक्ष ठेवावे आणि अशा सर्व व्यवहारांची माहिती जिल्हा प्रशासनाला तात्काळ द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निवडणूक खर्च समन्वयक अधिकारी सोनाप्पा यमगर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रविण नलावडे यावेळी उपस्थित होते.

डॉ.दिवसे म्हणाले, निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यातील बँकाकडून होणाऱ्या व्यवहारांची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमांच्या संशयास्पद व्यवहारांवर प्रशासन करडी नजर ठेवून आहे. बँकांनी त्यांच्या स्तरावर समन्वयक अधिकारी नियुक्त करुन जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांच्यामार्फत अशाप्रकारच्या संशयास्पद बँक व्यवहारांची माहिती जिल्हा प्रशासनाला तात्काळ उपलब्ध करुन द्यावी. आर्थिक व्यवहाराच्यादृष्टीने संवेदनशील असलेल्या काही भागात जिल्हा प्रशासनातर्फे विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, पतसंस्था, वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याचे पुन्हा आवाहन

पुणे, दि. १८: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व अनधिकृत व धोकादायक जाहिरात फलक, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरीत जाहिरात फलक मालक, जागा मालक, विकासक, जाहिरातदार संस्था यांनी हटवावेत किंवा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ३१ मार्चपर्यंत ते लावण्याची परवानगी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पीएमआरडीए क्षेत्रात असलेल्या मुख्य चौक, गर्दी वा वर्दळीच्या ठिकाणी, जास्त लांबी, रुंदी व उंचीचे, उंच इमारतीवरील कमाल मर्यादेपेक्षा मोठे तथा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अनधिकृत, धोकादायक असलेले आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स येणाऱ्या उन्हाळी वाऱ्यामुळे पडून किंवा कोसळून जीवितहानी वा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनधिकृत, धोकादायक होर्डिंग, आकाशचिन्ह, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स त्वरीत हटविण्यात आले नसल्यास पीएमआरडीकडून निष्कासित करण्यात येतील. तसेच होर्डिंगमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित जाहिरातदार संस्था यांना व्यक्तिशः जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही पीएमआरडीचे विकास परवानगी विभागाचे महानगर नियोजनकार सुनिल मरळे यांनी कळविले आहे.

भारती विद्यापीठ संघाने पटकावले विजेतेपद-शिअरफोर्स आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग    

पुणे : विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग शिअरफोर्स स्पर्धेत भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपद पटकावले.

वानवडी येथील ‘एस.आर.पी.एफ.’च्या मैदानावर ही स्पर्धा झाली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू परेश शिवलकर, राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू सुयोशा शेट्टी, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू प्रसाद खटावकर, संस्थेचे सचिव जितेंद्र पितळीया, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसन्न देसाई, ज्येष्ठ आर्किटेक्ट मनोज तातूसकर, खिरीड टुरिझमचे संतोष खिरीड उपस्थित होते. महाविद्यालयाच्या क्रीडा संघातील तेजल अंधारे ऋषिकेश वखारे आदित्य पवार नमन पारेख यांनी आयोजनात सहभाग घेतला.
स्पर्धेतील मुलांच्या गटातील फुटबॉल स्पर्धेतील अंतिम लढतीत भारती विद्यापीठ संघाने ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघावर सडनडेथमध्ये ६-५ अशी मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल नोंदविण्यात अपयश आले. त्यामुळे पेनल्टी शूटआउटचा अवलंब करण्यात आला. यातही ५-५ अशी बरोबरी झाली. यात भारती विद्यापीठकडून आर्यासेन, ईसाक, रिषी, दीपककुमार, प्रियांशू यांनी गोल केले, तर ब्रिककडून अथर्व वानकडे, मनीष यादव, जयेश खैरे, शुभम अग्रवाल, अंश अग्रवाल यांनी गोल केले. सडनडेथमध्ये भारती विद्यापीठकडून दिनांको मोदकने गोल केला, तर ब्रिकच्या शिवम राठोडला गोल करण्यात अपयश आले.

फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत भानुबेन कॉलेजने पिंपरी-चिंचवडच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली. यात श्रुती वीरने दहाव्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला.

व्हॉलीबॉलमध्ये पाटील स्कूल विजेते

व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात आकुर्डीच्या डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत पाटील स्कूलने सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर २५-९, २५-२७, १५-७ अशी मात करून विजेतेपद पटकावले. व्हॉलिबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात सिंहगड कॉलेजने या पराभवाची परतफेड केली. अंतिम लढतीत सिंहगड कॉलेजने डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघावर २५-१६, २५-२२ अशी मात केली.

बास्केटबॉलमध्ये पाटील स्कूलचीच बाजी

बास्केटबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटात डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर संघानेच बाजी मारली. अंतिम लढतीत पाटील स्कूलने मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर ४५-३४ असा विजय मिळवला. मुलींच्या गटात मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत मराठवाडा कॉलेजने भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर ३२-३१ असा रोमहर्षक विजय मिळवला.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू

१.    व्हॉलिबॉल मुली – कांचन (डी. वाय. पी. सी. ओ. ए., आकुर्डी).

२.    व्हॉलिबॉल मुले – पुरुषोत्तम मुसमाडकर (डी. वाय. पी. सी. ओ. ए., आकुर्डी)

३.    बास्केटबॉल मुली – शांभवी शिंदे (एमएमसीओए) आणि आश्लेषा नेहेरे (एमएमसीओए)

४.    बास्केटबॉल मुले – सिद्धांत केंजळे (एमएमसीओए)

५.    फुटबॉल मुली – समीक्षा पाटील (एसबीपीसीओए) आणि वैष्णवी निवेकर (बीएनसीए)

६.    फुटबॉल मुले – अंश अग्रवाल (बीएसओए) आणि दीपक कश्यप (बीव्हीडीयू)

शिवाजी मराठा सोसायटीतील छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळ्यावरील मेघडंबरीचे अनावरण

रायगडावरील मेघडंबरीची हुबेहूब प्रतिकृती
पुणे : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे ब्रीद असणाऱ्या आणि समाजातील बहुजनांसाठी शिक्षणाचे व्रत घेतलेल्या शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या प्रांगणातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचे अनावरण करण्यात आले. कोल्हापूरचे श्रीमंत स्वर्गीय शाहू महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या संस्थेच्या प्रांगणात हा पुतळा असून रायगडावरील मेघडंबरीची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्या हस्ते मेघडंबरीचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष विलास गव्हाणे, कमल व्यवहारे आणि सर्व सभासद यावेळी उपस्थित होते.  विशाल ताजनेकर आणि नागेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मेघडंबरी साकारण्यात आली.

अण्णा थोरात म्हणाले,  श्री शिवाजी मराठा सोसायटी १९१८ पासून बहुजन समाजाला शैक्षणिक संधी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे.   कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांनी संस्थेची स्थापना थोर योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ पुण्यात केली. त्याचे प्रतीक म्हणून शिवरायांचा पुतळा १६ एप्रिल १९७१ साली संस्थेच्या प्रांगणात  स्थापित करण्यात आला. याच पुतळ्याचे नूतनीकरण करीत त्यावर मेघडंबरी साकारण्यात आली आहे.

वडापाव विक्रेत्याने आत्महत्येसाठी मंत्रालयातील वरच्या मजल्यावरुन मारली उडी

मुंबई- वडापावची हातगाडी लावणाऱ्या एका विक्रेत्याने मंत्रालयातील वरच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त येथे समजले आहे. सदरील व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अरविंद बंगेरा असे या व्यक्तीचे नाव असून या व्यक्तीची वडापावची गाडी आहे. मात्र महानगरपालिकेच्या वतीने वारंवार वडापावची गाडी तोडण्यात येत असल्याने या व्यक्तीने आंदोलन केले असल्याचे बोलले जात आहे. सदरील व्यक्तीने बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला.

बोरवली मधील या वडापाव विक्रेत्याने हे आंदोलन नेमके कशासाठी केले, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र, सदरील व्यक्तीने मंत्रालयातून वरच्या मजल्यावरुन कुदी मारल्यामुळे मंत्रालयात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मंत्रालयात यासाठी आधीच संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. या जाळीवर व्यक्ती पडल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, या दरम्यान त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची घोषणाबाजी करत प्रशासनाच्या कारभारावर टीका केली.या व्यक्ती चे नाव अरविंद बंगेरा असून ते बोरिवली येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ते वडापावची गाडी चालवतात. मात्र, प्रशासनाच्या वतीने वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप सदरील व्यक्तीने केला आहे. अखेर सहन न झाल्याने या व्यक्तीने थेट मंत्रालय गाठत मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावरुन उडी मारली. प्रशासनाच्या वतीने मंत्रालय परिसरात जाळी बसवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

वसंत मोरे उभे राहिले तर ….मोहन जोशींना फटका – असे का म्हणाले, चंद्रकांतदादा पाटील

पुणे -काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर,आबा बागुल, अरविंद शिंदे, मोहन जोशी अशी इच्छुकांची जंत्री असताना…जर लोकसभेला वसंत मोरे अपक्ष म्हणून उभे राहिले तर भाजपाची नाही तर मोहन जोशींची मते खातील असे विधान आज पत्रकार परिषदेत मंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी केल्याने,काँग्रेसची उमेदवारी यंदा देखील खेचून आणण्यात मोहन जोशी यशस्वी होणार किंवा कसे याबाबत राजकीय चर्चेला आता उधाण येऊ पहाते आहे.धंगेकर -मोहोळ अशी सरळ लढत माध्यमांनी रंगविली आहे तर आबा बागुलांनी निष्ठेचा रंग आस्मानी चढविला आहे. अशा स्थितीत चंद्रकांतदादांनी मोहन जोशींचे नाव घेऊन धुराळा उठविला आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवाराने विचार करूनच निवडणुकीला उभे राहावे.’ अशा शब्दात देखील चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसच्या या इच्छुकांना चिमटा काढला आहे.

पुणे, बारामती, शिरूर लोकसभा क्‍लस्टरच्या प्रमुख पदाची जबाबदारी पाटील यांच्याकडे आहे. त्यानुसार, त्यांनी सोमवारी पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. दीपक मानकर,संदीप खर्डेकर,श्रीनाथ भीमाले,अजय भोसले आदि यावेळी उपस्थित होते.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले,”भाजपसाठी पुणे लोकसभेची निवडणूक अवघड आहे, असा विरोधकांचा समज आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या सेनेची लाखभर मते कमी झाली, तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची दीड लाख मते वाढणार असल्याने आमचे मताधिक्‍य चांगलेच वाढेल. म्हणून विरोधी पक्षाच्या उमेदवाराने विचार करूनच निवडणुकीला उभे राहावे.

पाटील म्हणाले, ‘राज्यातील ४८ जागा भाजप जिंकणार असून मोदी फॅक्‍टर अद्यापही कायम आहे. मी स्वतः गणवेश बदलून तुमच्यासोबत येतो, आपण १०० लोकांना भेटून सर्वेक्षण करू. त्यापैकी ९० जणांकडून मोदी यांचेच नाव येईल. यावरूनच मोदी फॅक्‍टर किती लोकांपर्यंत पोचला आहे, हे तुम्हाला कळू शकेल. इलेक्‍ट्रॉल बॉन्डमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही.

सगळे पैसे धनादेशाने आले आहेत. त्यामुळे विरोधकांनी किती आरोप केले तरी महाराष्ट्रातील जनतेला त्यासंबंधीचे वास्तव माहीत आहे. ‘वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढल्यास भाजपला किती फटका बसेल, या प्रश्‍नावर पाटील यांनी भाजपला कमी फटका बसेल, मात्र जास्त फटका मोहन जोशी यांना बसेल, असे सांगत मोहन जोशी हेच विरोधी पक्षाचे उमेदवार असतील, असे अप्रत्यक्षपणे जाहीर केल्याने सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या.भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारीची चाचपणी सुरू आहे. आत्तापर्यंत तीन उमेदवारांबाबत भाजपकडून विचार करण्यात आला आहे. मात्र सोलापूरमध्ये सारे काही अलबेला नसल्याचे पाटील यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या मतदारसंघातील उमेदवाराबाबत लक्ष घातले आहे. ते प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घेत असल्याने अनेकांची झोप उडाली असून फडणवीस योग्य उमेदवार देतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.सोलापूरच्या उमेदवाराबाबत बोलताना पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. त्याचवेळी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहे का ? याविषयी पाटील यांनी “देवेंद्र फडणवीस यांना राजकारणामध्ये जितके लांब दिसते, तितके कोणालाच दिसत नाही. ते कधीच चुकीचा पत्ता काढत नाहीत’ असे विधान केले.

कोल्हापूर मध्ये चारही जागावर मी निवडणुक लढवून जिंकण्यास पात्र असताना देखील, गृहमंत्री अमित शाह यांनी मला भविष्यातील गणिते करुन पुण्यातून निवडणुक लढण्यास सांगितले त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी मला शिकवण देऊ नये. फडणवीस असे डॉक्टर झाले की त्यांना कोणतेही निदान पटकन हाेते व त्यावर लगेच इंजेक्शन देता येते. त्यामुळे इतरजण त्यांना दबकून असतात. फडणवीस यांना जेवढे लांबचे दिसते तितके हल्ली काेणाला दिसत नाही ते कधी चुकीचा पत्ता टाकत नाही. रक्ताचे नात्याचे घरात देखील मतभेद असतात. ते मतभेद काेणीतरी त्या कुटुंबाला सांगून संपवू शकताे. पवार कुटुंबाला एकमेकाला काय मते व्यक्तशी करु वाटतात याबद्दल मी भाष्य करणार नाही.

समाविष्ट गावांसाठी मर्जीनुसार राजकीय कार्यकत्यांची समिती नेमण्याची मनमानी लोकशाहीविरोधी

पुणे- महापालिकेच्या आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कायम पुढे पुढे ढकलत , मतदानाच्या बाबतीत EVM ची सक्ती लादणाऱ्या सरकारी व्यवस्थेने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतःच्या मर्जीनुसार राजकीय कार्यकत्यांची समिती गावांच्या विकास कामांसाठी नेमणे म्हणजे लोकशाहीचा गाला घोटण्यासारखे आहे. असा आरोप करत या निर्णयाला आता न्यायालयात आव्हान द्यावे लागेल ,लोकांना आपले प्रतिनिधी निवडण्याचा हक्क आहे त्यानुसार निवडू द्या , त्यांच्यावर तुमच्या मर्जीतले कार्यकर्ते लादु नका असा इशारा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिला आहे .

या संदर्भात शिवसेनेच्या संजय मोरे, गजानन थरकुडे, शंकरनाना हरपळे, राजाभाऊ होले, बाळासाहेब भांडे, भरत कुंभारकर, समीर तुपे, आनंद गोयल, मा नगरसेवक बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, दिलीप व्यवहारे, सूरज मोराळे, अजय परदेशी, नागेश खडके, ओंकार शेवाळे यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले आहे . यावेळी संजय मोरे म्हणाले कि,’विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चार दिवसांपूर्वी भाजप व शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 सदस्यांची म्हणजे एकूण 18 सदस्यांची नेमणूक समाविष्ट गावांसाठी करण्यात आली. आचारसंहिता सुरू होणार म्हणून काल परत अजित पवार गटाच्या 9 सदस्यांची यादी प्रसिद्ध झाली. त्यात माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, दत्ता धनकवडे इत्यादी जुन्या पुण्यातील माजी नगरसेवकांचा खरतर या गावांशी काही संबंध नसताना सुद्धा समाविष्ट गावांच्या लोकप्रतिनिधी सदस्य पदी निवड केली आहे. यापूर्वी महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांसाठी अशी समिती नेमलेली नव्हती. 1997 साली महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 38 गावांना पाच वर्ष लोकप्रतिनिधीत्व नव्हतं. 2002 सालात या गावांचे वेगळे प्रभाग करून त्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले. त्यामुळे आज त्या भागांमध्ये चांगला विकास होत आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही गावं शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये येतात. त्यासाठीच राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांनी हे तुष्टिकरणाच राजकारण केलेले आहे. आणि त्यातून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीतील पक्षांची नाजुक स्थिती लक्षात घेता, त्या भागातील नागरिकांना आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचं धोरण आपली सत्ता टिकवण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांचे नगर विकास खातं करीत आहे.कायद्यामध्ये या समितीला कुठे स्थान द्यावे, याचे निकष नाहीत आणि या संदर्भामध्ये सर्व कागदपत्रे तपासून बघितली तर अशी समिती शासन दरबारी शिफारस केलेली नाही. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याच्या दोन दिवस आधी एक आणि त्याच दिवशी सकाळी दुसरी अशा प्रकारची सदस्यांची नावांची यादी हे राजकीय तुष्टीकरण आणि लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. शासनाने आणि विभागीय आयुक्ताने या समितीची दखल घेऊ नये, कारण या संदर्भात महामयीम राज्यपाल यांच्या स्वाक्षरीचा अध्यादेश नाही. त्यामुळे ही समितीच बेकायदेशीर आहे. शासनाने आणि विभागीय आयुक्त यांनी या समितीला कायदेशीर स्थान नसल्यामुळे या बेकायदेशीर सदस्यांच्या सल्ल्याने या समाविष्ट गावांचा विचार करू नये. कायद्याने विभागीय आयुक्त यांना असे सदस्य नेमण्याचा एमएमसी ॲक्ट प्रमाणे कुठलेही अधिकार नाहीत. विशेष म्हणजे सरकारलाही नाहीत आणि महापालिका आयुक्त यांना तर नाहीच नाही. विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून एक सत्तेचं वेगळच केंद्र निर्माण करण्याचा आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न असणारा हा निर्णय आहे. 48 तासांमध्ये हि समिती रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेतला नाही, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यासंदर्भामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करेल. आणि सर्वात महत्त्वाचं लोकप्रतिनिधी जनता निवडते. यांच्या अध्यादेशामध्ये, अध्यादेश नसलेल्या पत्रामध्ये लोकनियुक्त सदस्य शासन लोकनियुक्त कसं करू शकते ? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कायद्याला मान्य नसणारी कायदाबाह्य राजकीय तुष्टीकरण करण्यासाठी केलेली ही समिती याविरुद्ध शिवसेना मोठं जन आंदोलन उभारेल.

शिकाऊ वृत्ती कायम ठेऊन ज्ञान वाढवत राहा

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचे प्रशिक्षणार्थींना आवाहन

पुणे, दि. १८ मार्च २०२४: ‘महावितरणमध्ये गेल्या वर्षभरात वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच ग्राहकसेवेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा पुढे निश्चितच फायदा होईल. मात्र आयुष्यभर शिकाऊ वृत्ती कायम ठेऊन कौशल्य विकासासाठी ज्ञान वाढवत राहा. केवळ ते आज उपयोगाचे नाही म्हणून दुर्लक्ष करू नका. आत्मसात केलेले हेच ज्ञान भविष्यात उत्तुंग भरारी घेण्यास उपयुक्त ठरेल’, असे मत मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सोमवारी (दि. १८) व्यक्त केले.

पुणे परिमंडलामध्ये अप्रेंटिस म्हणून एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २० विद्युत अभियंत्यांना रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. कार्यक्रमाला सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) ज्ञानदा निलेकर, प्रशिक्षणाचे समन्वयक डॉ. संतोष पाटणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्युत अभियांत्रिकीची पदवी व पदविका उत्तीर्ण असलेल्या या २० प्रशिक्षणार्थींना गेल्या वर्षभरात पुणे परिमंडलाच्या विविध कार्यालयाद्वारे उपकेंद्र, वीजवाहिन्या, वितरण रोहित्रांची देखभाल व दुरुस्ती, वीजजोडण्या व मीटरची तपासणी, भूमिगत वीजवाहिन्यांची चाचणी, ग्राहक संवाद, वीजसुरक्षा, ऑनलाइन ग्राहकसेवा, सौर ऊर्जा प्रकल्प, विद्युत वाहनांचे चार्जिंग स्टेशन आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.

मुख्य अभियंता श्री. पवार म्हणाले की, ‘विजेसारख्या तांत्रिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवायचे असेल तर स्वतःचे कौशल्य व ज्ञान विकसित करणे अतिशय महत्वाचे आहे. वीजक्षेत्र हे सेवा क्षेत्र आहे. त्यामुळे केवळ पैसा हेच आयुष्याचे ध्येय न ठेवता या क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी व सेवा कामातून माणसं कमावण्याचे ध्येय ठेवा. यश व समाधान दोन्ही नक्की मिळेल’.

या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी विद्युत अभियंत्यांनी प्रातिनिधिक मनोगतामध्ये ‘वीजक्षेत्रातील प्रत्यक्षात तांत्रिक माहिती व ज्ञान मिळाल्याने आत्मविश्वास वाढला. सकारात्मकता आली. अभियंता व कर्मचाऱ्यांची अखंड सुरू असलेली ग्राहकसेवा जवळून पाहता आली. सांघिक कामाचा प्रत्यय आला’, असे मत व्यक्त केले.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पदावरून हटविले.

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांची बदली रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांना तीन वर्षांचा निकष लागू करू नये म्हणून राज्य सरकारने केलेली मागणी निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा सोमवारी फेटाळली. निवडणूक आयोगानेच चहल यांना पदावरून हटवले आहे. तशी घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने फेब्रुवारी अखेरीस दिला होता. या आदेशामुळे चहल यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार होत्या. थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी नसल्याने आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांना आदेशातून वगळावे, अशी विनंती करणारे पत्र राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पाठविले होते. मात्र आयोगाने सरकारची ही विनंती फेटाळून लावली होती.

स्त्री जन्माचा सार्थ अभिमान – प्राजक्ता गायकवाड

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पिंपरी, पुणे (दि. १८ मार्च २०२४) स्त्री जन्माचा सार्थ अभिमान आहे असे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने महिला दिन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान चिंचवड, सायन्स पार्क येथे करण्यात आला.
यावेळी अभिनेत्री सायली गोडबोले, विभागीय सचिव गणेश मोकाशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, परिषदेचे प्रतिनीधी एम. जी. शेलार, हवेली पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश निकाळजे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अविनाश अदक, उपाध्यक्ष सुरज साळवे, जिल्हा प्रतिनीधी श्रावणी कामत, चिराग फुलसुंदर, विनय सोनवणे, अशोक कोकणे, रामकुमार शेडगे, महावीर जाधव, संतोष गोतावळे, सिद्धांत चौधरी, मारुती बानेवार आदींसह पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड मनपा प्रशासन अधिकारी संगीता बांगर, पुणे मनपा उपायुक्त प्रतिभा पाटील, उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, वन विभाग अधिकारी ऋतुजा भोरडे, मनपा शाळेतील नॅशनल कबड्डी चॅम्पियन मनीषा राठोड तसेच महिला पत्रकार, महिला पोलिस आदींसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या वेळी प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या की, आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ज्या महिला लढत असतात त्यांना प्रोत्साहन देऊन सन्मान करणे इतरांना प्रेरणादायी आहे. महाराणी येसूबाई पात्रासाठी जे प्रेम मला जनतेतून मिळालं त्यांची जन्मभर ऋणी राहील. मांजरांना घाबरणारी मी, पण भूमिकेमुळे घोडेस्वारी शिकले. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने माझा सन्मान केला आता मला आणखी उत्कृष्ठ काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. हा पुरस्कार भेटणे ही यशाची पहिली पायरी आहे. जीवनात आणखी मोठे शिखर गाठायचं आहे.
अभिनेत्री सायली गोडबोले यांनी राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर व्याख्यान दिले.
प्रास्ताविक करताना अध्यक्ष अनिल वडघुले म्हणाले की, आता सर्वच क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठवला आहे. शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, सहकार, व्यापार, पत्रकारिता, पोलिस, प्रशासन अशा सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इतर युवती, महिलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी केला आहे.
कवी अनिल दीक्षित, विनोद शिंदे, गजानन परब, आनंद रांजणे या कवींनी कविता सादर करून दाद मिळवली.
सूत्रसंचालन प्रा. अपर्णा शिंदे, आभार सुरज साळवे यांनी मानले.

इलेक्टोरल बाँडमधून भाजपची दरोडेखोरी : अशोक वानखेडे

पुणे :

युवक क्रांती दलातर्फे आयोजित ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांच्या ‘वेध लोकसभा निवडणुकीचा’ या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. रविवार,दि.१७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता हे व्याख्यान गांधी भवन(कोथरूड) येथे झाले . अध्यक्षस्थानी युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ.कुमार सप्तर्षी होते.युवक क्रांती दलातर्फे कार्यवाह जांबुवंत मनोहर,मुस्कान परवीन बाबासाहेब,सुदर्शन चखाले,अप्पा अनारसे यांनी संयोजन केले.

संदिप तापकीर, श्याम तोडकर, डॉ.उर्मिला सप्तर्षी, डॉ प्रविण सप्तर्षी, अन्वर राजन, राजन खान,प्रशांत कोठडीया, राहुल डंबाळे आदि मान्यवर उपस्थित होते.

जांबुवंत मनोहर यांनी व्याख्यान आयोजनामागील भुमिका स्पष्ट केली.

अशोक वानखेडे म्हणाले, ‘ देशावर कब्जा घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे. भाजप कडून सत्तेचे लोणी खाण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याचा वेडेपणा सुरू आहे. देशाला वाचविण्या साठी पुन्हा लढाई लढण्याची गरज आहे. समाजात चाललेला वेडेपणा आपण पुढे होऊन रोखण्याची गरज आहे.

दलीत, मुस्लीम यांना लक्ष्य केले जात आहे. हा संक्रमण काल चालू आहे. जनतेला आपली ताकद ओळखली पाहिजे.२०२४ नंतर बोलण्या, ऐकण्याच्या अवस्थेत आपण राहणार नाही. म्हणून आताच बोलले पाहिजे, आणि लोकशाही, संविधान वाचवले पाहिजे.

उच्चवर्णीय सत्तेत राहावेत, मनुस्मतीप्रमाणे सत्ता चालावी अशी मनिषा बाळगून संविधानावर हल्ला सुरू आहेत.मोदी सरकारने १० वर्षात कर्जाच्या खाईत लोटले आहे. पुलवामा मुद्द्यावर राज्यपाल मलिक यांचा प्रतिवाद मोदी का करु शकत नाहीत? असा प्रश्न वानखेडे यांनी विचारला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात भाजप ला पूर्ण अपयश आले आहे. युवकाना या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे.इलेक्टोरल बाँड मुळे केंद्र सरकार पूर्ण नग्न झाले असून या सरकारने सरकारी यंत्रणांना विरोधकांवर छू करण्यासाठी वापरले आहे. जर तुमचा स्वतःचा परिवार नाही, तर पैशाचा हव्यास कशाला ? देशात दरोडेखोरी का चालली आहे? असे प्रश्नही वानखेडे यांनी विचारले. काँग्रेसपेक्षा प्रादेशिक पक्षांकडून या लोकसभा निवडणुकीत अधिक अपेक्षा आहेत, असेही वानखेडे यांनी सांगितले.

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,’ लोकसभेला मतदान करताना दोन वेळा चूक झाली आहे. मोदी सरकार ही वेड्या माणसांनी शहाण्या माणसाना केलेली शिक्षा आहे.यावेळी विवेक बुद्धी वापरली पाहिजे. आगामी दोन महिने जनजागरण केले पाहिजे. समाजातील सकारात्मतेने कार्यरत असलेल्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि हे क्रूर सरकार घालवले पाहिजे

एमआयटी डब्ल्यूपीयूत हॅकएमआयटी-डब्ल्यूपीयू २०२४

पुणे, दि. १८ मार्च : विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि इनव्हेंशनची संस्कृती वाढविण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित ‘ हॅकएमआयटी-डब्ल्यूपीयू’ २०२४ चे उद्घाटन १९ मार्च रोजी सकाळी ११ वा युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात होणार आहे.
याच्या उद्घाटन प्रसंगी गोदरेज अँड बॉयस एमएफजी कंपनी, लि.चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यावसायीक प्रमुख पुष्कर गोखले आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (सिस्टम आणि ऑपरेशन्स) चे संचालक विनोद अग्रवाल हे प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थित होणार आहे. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व उपस्थित राहणार आहेत.
तसेच कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. कृष्णा वरखडे व डॉ. कृष्णप्रसाद गुणाले यांची उपस्थिती राहणार आहे.
एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम २१ मार्च पर्यंत होणार आहे. या संदर्भात प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी सांगितले की, माइंड टू मार्केट आणि पेपर टू प्रोडक्ट ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी खूप महत्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव देऊन त्यांना चालना द्यावी व त्यांची बौद्धिक क्षमता वृद्धिंगत करून त्यांना उद्योजक बनविण्याचे धोरण प्रत्यक्षांत आणण्याच्या हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. आत देशात नोकरी मागणारे नाही तर नोकरी देण्यार्‍यांची संख्या वाढवायची आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्टार्ट अप इंडिया संस्कृति वाढविण्यासाठी हॅकेथॉनची मदत होणार आहे.

रिक्षा चालकांकडून बाबा कांबळे यांचा सन्‍मान

  • कल्‍याणकारी महामंडळासाठी पाठपुरावा केल्‍याबद्दल व्‍यक्‍त केली कृतज्ञता
  • रिक्षा चालक, कष्टकऱ्यांना न्‍याय देणे हे माझे कर्तव्‍य : बाबा कांबळे

पिंपरी-

विविध आंदोलने, निवेदने देऊन रिक्षा चालकांच्‍या कल्‍याणकारी मंडळासाठी पाठपुरावा करत यश मिळवून दिले. याबद्दल ऑटो, टॅक्सी, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे व महाराष्ट्र रिक्षा पंचायत राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक बाबा कांबळे यांचा पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील चालक मालकांनी सन्‍मान केला. पिंपरी येथील बाबा कांबळे यांच्‍या कार्यालयात भेट घेऊन हा सन्‍मान करण्यात येत आहे रिक्षा चालकांसाठी केलेल्‍या कामाप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त केली. या सन्‍मानाला उत्‍तर देताना बाबा कांबळे म्‍हणाले की, सर्वसामान्‍य कष्टकरी, रिक्षा चालकांच्‍या न्‍याय हक्‍कासाठी आयुष्य समर्पित केले आहे. त्‍यामुळे कल्‍याणकारी मंडळासाठी झालेला निर्णय हे माझ्या लढ्याचे यश असले तरी त्‍यासाठी पाठपुरावा करणे हे माझे कर्तव्‍य असल्‍याचे प्रतिपादन बाबा कांबळे यांनी व्‍यक्‍त केले.

या वेळी. लोणावळा येथील वरिष्ठ नेते बाबुभाई शेख लोणावळा शहराध्यक्ष आनंद सदावर्ते परीक्षा चालका उपस्‍िथत होते.

रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी बाबा कांबळे यांच्‍या नेतृत्‍त्‍वात सातत्‍याने पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्‍या भेटी घेऊन निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आहे. प्रत्‍यक्ष भेट घेऊन कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी केली होती. या पाठपुराव्‍याला आणि मागणीला यश आले आहे. राज्‍य सरकारने संघटनेला दिलेला शब्द पाळत कल्‍याणकारी मंडळ स्‍थापन करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. त्‍याचा पहिला भाग म्‍हणून मंडळ स्‍थापन करण्यासाठी तब्‍बल ५० कोटी रुपये निधी देखील मंजूर केला आहे. या निर्णयामुळे राज्‍यातील २० लाख ऑटो, रिक्षा, टॅक्सी चालकांच्‍या आनंदात भर पडली आहे. यासाठी पाठपुरावा करून यश मिळवून दिल्‍याबद्दल पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरसह जिल्‍ह्यातील रिक्षा चालकांनी बाबा कांबळे यांचे आभार मानले आहेत. कांबळे यांच्‍या पिंपरी येथील कार्यालयात भेटण्यासाठी रिक्षा चालक गर्दी करत आहेत. तसेच बाबा कांबळे यांचा सन्‍मान करण्यात आला.

या सत्‍काराला उत्‍तर देताना बाबा कांबळे म्‍हणाले की, रिक्षा चालकांच्‍या सत्‍कारातून आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते. रिक्षा चालकांच्‍या पाठिंब्यामुळे कल्‍याणकारी मंडळ स्‍थापन करण्याची दखल राज्‍य सरकारला घ्यावी लागली. येथून पुढेही ज्‍या मागण्या प्रलंबित आहेत. त्‍याला न्‍याय देण्यासाठी लढणार आहे. रिक्षा चालकांना हक्‍क मिळवून देण्यासाठी लढणे हे माझे कर्तव्‍य असल्‍याचे बाबा कांबळे म्‍हणाले.

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’च्या ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ च्या टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवलेली असतानाच आता या चित्रपटाचे जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा धमाकेदार ट्रेलर सोहळा नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकारांनी आपले ‘चाळीशी’तील किस्से शेअर करण्यासोबतच ‘साला कॅरेक्टर’ या गाण्यातील हूक स्टेपही सादर केली. पत्रकार मित्रांनीही या कार्यक्रमात आपले ‘चाळीशी’तील अनुभव शेअर केले.

‘फॅार्टी इज द न्यू थर्टी’ असे हल्ली म्हटले जाते आणि याचा अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटात येणार आहे. ट्रेलरमध्ये सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे हे ‘यंगस्टर्स’ धमाल करताना दिसत आहेत. मात्र ट्रेलर पाहाता त्यांच्या आयुष्यात काहीतरी ट्विस्ट आलेला दिसतोय. आता हा ‘चोर’ कोण असणार, याचे उत्तर आपल्याला २९ मार्चला मिळणार आहे. चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच अंर्तमुखही करणार आहे. ट्रेलर, तगडी स्टारकास्ट यावरून हा चित्रपट म्हणजे एक मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असणार हे नक्की !

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृद् गंध फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आदित्य इंगळे दिग्दर्शक असून विवेक बेळे यांनी लेखन केले आहे. तर नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चे निर्माते आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ”चाळीशी हा आयुष्याच्या असा टप्पा आहे जेंव्हा आलेल्या स्थैर्यामुळे जगण्यात एक विचित्र एकसुरीपणा येतो. आणि मग सुरू होतो ‘एक्साईटमेंट’ शोधण्याचा खेळ! आणि मग जी धमाल घडते आणि असलेल्या नात्यांचीच पुन्हा नव्याने ओळख होते हे मांडणारा हा चित्रपट आहे. चित्रपट बघताना प्रेक्षक मनमुराद हसतीलही आणि कधी भावनिकही होतील. हा चित्रपट जरी चाळिशी उलटून गेलेल्या चोरांचा आहे तसाच चाळिशीत येऊ घातलेल्या चोरांसाठीही आहे.”