Home Blog Page 1153

भर दुपारी गळ्यातील अडीच लाखाचे मंगळसूत्र ओरबाडून नेले

पुणे- भर दुपारच्या वेळेत म्हणजे साडेतीन वाजता खराडीतील सुमा लिटल मिलेनिअम स्कूल , कृष्णा हॉटेल जवळून एका २८ वर्षीय तरुणीच्या गळ्यातून भामट्यांनी अडीच लाखाचे मंगळसूत्र हिसका देवून पळवून नेले .चंदन नगर मध्ये राहणारी हि महिला येथे आपल्या मुलाला घेण्यासाठी आली असता मोटार सायकलवरून आलेल्या दोघांनी हि जबरी चोरी केली

१३ लाखाच्या दागिन्यांची चोरी

चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात बालेवाडीत राहणाऱ्या एका ६० वर्षीय व्यक्तीने फिर्याद नोंदविली आहे. १२ नोव्हेंबर २३ ते १६ मार्च २४ दरम्यान बालेवाडीतील द पर्ल्स सोसायटीच्या मागे लक्ष्मी निवास या घरातून अज्ञात भामट्याने १३ लाख १० हजार रुपयांच्या दागिन्यांची पिशवी चोरून नेली आहे.

पुणे -सोलापूर ट्रॅव्हल कंपनीच्या बस प्रवासात सव्वाचार लाखाची चोरी

पुणे- पुणे ते सोलापूर अशा रात्रीच्या प्रवास करते समयी एका ५८ वर्षे वयाच्या महिलेच्या बैगेतून चोरट्यांनी सुमारे सव्वाचार लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या ट्रॅव्हल कंपनीचे नाव सांगितलेले नाही मात्र नारायण पेठेत राहणारी हि ५८ वर्षे वयाची महिला स्वारगेट वेगा सेंटर येथून प्रवासाला रात्री साडेअकरा वाजता निघाली होती आणि सकाळी ६ वाजता ती सोलापूरला पोहोचली या दरम्यान तिच्या बैगेतून चोरट्याने डागणे, रोकड,मोबाईल असा सवाचार लाखाचा ऐवज चोरून नेला .

पुण्यात पुन्हा चंदन चोरांची टोळी सक्रीय…?

पुणे- चंदन चोरणे आणि विकण्याच्या तस्करीवर पडदा पडला असे वाटत असताना पुन्हा ६ जणांच्या तोलणे कोरेगाव पार्क मधील चंदनाचे झाड कापून चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात एका सुरक्षा रक्षकाने पोलिसात तक्रार दिली आहे. त्याच्या गळ्याला तलवार लावून अन्य दरोडेखोरांनी चंदनाचे झाडच कापून नेल्याची फिर्याद कोरेगन पार्क पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. हि चोरी पाहते ३ ते पावणेचारच्या दरम्यान कोरेगाव पार्कच्या नॉर्थ मेन रोड वरील ३९७/ए बी लेन मधील एकांतिका अपार्टमेंट जवळ घडली.

याच दिवशी पाहते अडीच वाजता आणखी एक चंदनाचे झाड चोरीला गेल्याची घटना घडली आहे. चतुर्श्रुंगी पोलिसात याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. एन् सी एल इन्व्होषणपार्क पाषाण येथील व्हीन्चोर सेंटर कंपनीच्या गर्दन मधून एक चंदनाचे झाड कापून नेण्यात आले आहे.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या बोर्ड ऑफ ट्रस्ट वर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांची निवड

पुणे -राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या बोर्ड ऑफ ट्रस्ट वर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांची निवड झाली आहे. केंद्र शासनाकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे. बोर्ड ऑफ ट्रस्ट वर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये राजेश पांडे यांचा समावेश आहे.

भारत सरकारने राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या (NBT) सन २०२४ साठी १४ सदस्यांची बोर्ड ऑफ ट्रस्ट ची नावे जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातून भाजपा नेते तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. देशासह जगभरात ओळख असणाऱ्या आणि वर्ल्ड बुक फेअर सारख्या महोत्सवांचा माध्यमातून जगभरातील साहित्य विश्वाशी जोडलेले असलेल्या राष्ट्रीय पुस्तक न्यासाशी जोडले जाण्याची संधी यानिमित्ताने पांडे यांना मिळणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत १९५७ मध्ये वाचनाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सुरू करण्यात आलेली राष्ट्रीय पुस्तक न्यास ही संस्था आहे. या संस्थेची निर्णय प्रक्रिया बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या माध्यमातून पार पडते. ही संस्था देशभर विविध पुस्तक मेळावे आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून पुस्तक वाचनाला प्रोत्साहन देते, तसेच विविध चर्चासत्रे, कार्यशाळा, पॅनल चर्चा, पुस्तक प्रकाशन आदि उपक्रम राबवत असते. या संस्थेसोबत पुण्यामध्ये राजेश पांडे यांनी आयोजित केलेला ‘पुणे पुस्तक महोत्सव’ हा यशस्वी महोत्सव ठरला होता. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा प्रसार करतानाच या महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळे विश्वविक्रम ही करण्यात आले होते. संस्कृती रुजवण्यासाठी पुण्यासह साहित्य संमेलनात देखील या महोत्सवाचा महत्वाचा वाटा राहिला होता. या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची ठरते.
नॅशनल बुक ट्रस्ट (NBT) बोर्ड ऑफ ट्रस्टीजवर नियुक्ती झाल्यामुळे मला आनंद झाला आहे! यासाठी मी केंद्रीय मंत्री मा.श्री.धर्मेंद्र प्रधानजी आणि एनबीटीचे आभार मानतो की, त्यांच्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे. माझ्या सर्व अनुभवाचा उपयोग करून ट्रस्टमध्ये अधिकाधिक इनोव्हेटिव्ह योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल. महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीचा जागर जगाच्या पातळीवर व्हावा यासाठी आणि पुण्याचाही नावलौकिक तसेच पुण्याचा पुस्तक महोत्सव देखील जागतिक पातळीवर नेण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. महाराष्ट्राच्या साहित्यिक लँडस्केपसाठी अधिक संधी शोधून काढण्याची आणि पुणे पुस्तक महोत्सवाची वाढ करण्याची ही एक उत्तम संधी आहे असे मी मानतो.-राजेश पांडे

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला जन्मठेपेची शिक्षा


एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. लखन भय्या फेक एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मांना दोषी ठरवण्यात आलं आणि मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात प्रदीप शर्मांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती डेरे यांच्या खंडपीठाने त्यांना शिक्षा ठोठावणारा हा निर्णय दिला.उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांत प्रदीप शर्मा यांना मुंबई सत्र न्यायालयापुढे शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. 
गँगस्टर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा जवळचा हस्तक राम नारायण गुप्ता उर्फ लखन भय्या हा होता. मुंबईत तो छोटा राजनसाठी काम करत होता. 11 नोव्हेंबर २००६ मध्ये प्रदीप शर्मा आणि त्यांच्या पथकाकडून लखन भय्याला वाशी मधून उचलण्यात आलं. त्यावेळी त्याच्याबरोबर अनिल भेडा हा व्यक्ती होता. याच दिवशी संध्याकाळी मुंबईतल्या वर्सोवा या ठिकाणी असलेल्या नाना-नानी पार्कमध्ये लखन भय्याचं एन्काऊंटर करण्यात आलं.२००६ मध्ये झालेल्या लखन भय्या एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ती चकमक बनावट असल्याचं एसआयटी चौकशीत उघड झालं होतं. याप्रकरणीप्रदीप शर्मासह मुंबई पोलीस दलांतील १३ अधिकारी आणि पोलिसांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर २००८ मध्ये त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं. मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. प्रदीप शर्मा हे १९८३ च्या बॅचचे अधिकारी असून २०२० मध्ये ते निवृत्त होणार होते. परंतु त्याआधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून राजकारणात पाऊल ठेवले होते. मात्र राजकारणात त्यांना अपयश आलं. आता त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या इन्काऊंटरचं नेतृत्व माजी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी केले होते. ही एक कथित बनावट चकमक असल्याचा आरोप करत लखन भैय्याचा भाऊ आणि वकील राम प्रसाद गुप्ता यांनी न्यायालयात धाव घेतली होती. ज्या 2013 मध्ये मुंबईतील सत्र न्यायालयाने या प्रकरणात 13 पोलिसांसह 21 जणांना दोषी ठरवले आणि सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात न्यायालयाने प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठासमोर चकमक प्रकरणातील दोषींनी दाखल केलेल्या अपीलांवर सुनावणी सुरू होती.

वकील राम प्रसाद गुप्ता यांनी प्रदीप शर्माच्या निर्दोष सुटकेविरोधात अपील दाखल करून दोषींच्या शिक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला होता. या प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्या निर्दोष सुटकेविरोधात राज्य सरकारने याचिकाही दाखल केली होती. राज्य सरकारने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील राजीव चव्हाण यांनी प्रदीप शर्मा यांच्या निर्दोष सुटकेच्या विरोधात युक्तिवाद केला होता. परंतु त्यासंदर्भात न्यायालयाने आता निकाल दिला आहे.

राज ठाकरे, अमित शहा यांच्यातील बैठक संपन्न

नवी दिल्ली-स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी टक्कर एकीकडे भाजपा देत असताना दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे उद्धव ठाकरेंचे भाऊ राज ठाकरे यांच्या मनसेला महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीत घेण्याच्या घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची येथील शहा यांच्या निवासस्थानी बैठक झाली . त्यांच्यातील बैठक आता संपन्न झाली असून राज ठाकरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आता मुंबईत गेल्यावर राज ठाकरे दिल्लीतील भेटीबाबत बोलणार असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत त्यांची भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यांसह शहांशी चर्चा झाली. त्यामुळे या बैठकीत मनसेच्या महायुतीच्या प्रवेशाचा ठोस निर्णय झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या दिल्ली भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ”राज ठाकरे हे दिल्लीला गेले आहेत. त्यांच्या या भेटीबाबत सर्व माहिती येणाऱ्या काही तासांत स्पष्ट होईल. मात्र राज ठाकरे जो निर्णय घेतील तो राज्याच्या, पक्षाच्या आणि मराठी माणसाच्या हिताचाच असेल. ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणे हे आमचे कर्तव्य असून यापुढेही त्यांच्या आदेशाचे पालन करू”.

एक जागा मनसेच्या बाळा नांदगावकरांना ..

दरम्यान, मनसेने दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या 3 पैकी किमान 2 लोकसभा मतदारसंघांची मागणी केली. या तिन्ही जागा शिंदेसेनेकडे आहेत. त्यापैकी एक जागा मनसेच्या बाळा नांदगावकरांना देण्याची भाजपने तयारी दर्शवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची संमतीही घेण्यात आली. मात्र दक्षिण मुंबईची जागा भाजपला हवी आहे. शिंदेसेना नाशिक सोडणार नाही. त्यामुळे राखीव मतदारसंघ असलेल्या शिर्डीतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी देण्यावर एकमत होऊ शकतेे. यावर दिल्लीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

नलिनी कुलकर्णी, दिप्ती चंद्रचूड यांना यंदाचे महिला उद्योजिका पुरस्कार 

याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे आयोजन; विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, डॉ. सुप्रिया पुराणिक, खासदार प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती
पुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे महिला उद्योजिका पुरस्कार २०२४ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यांतर्गत वितरित होणारा स्वयंसिद्धा पुरस्कार नाशिकच्या अमोल इंडस्ट्रिज च्या संचालिका नलिनी कुलकर्णी यांना आणि युवा उद्योजिका पुरस्कार क्वालिटी पेंटस् अँण्ड कोटींग्ज प्रा.लि. च्या संचालिका दिप्ती चंद्रचूड यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला संस्थेचे कार्यवाह श्रीकांत जोशी, युवा कार्यकारिणी सदस्य प्रतिभा संगमनेरकर, भालचंद्र कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी , अंजली दारव्हेकर, मंजुषा वैद्य, कार्तिकी जोशी, मंदार महाजन, उपेंद्र केळकर, हर्षल लेले आदी उपस्थित होते.

टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात शनिवार, दिनांक २३ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानिमित्त नुकत्याच निवड झालेल्या व महिलांचे नेतृत्व करणाऱ्या संस्थेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा व राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचा विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर याचे हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर असणार आहेत. तर, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.सुप्रिया पुराणिक या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. युवा उपक्रमांतर्गत कै. सावित्री नारायण जोशी स्मरणार्थ स्वयंसिद्धा पुरस्कार आणि कै. मनोरमा शामराव कुंभोजकर स्मरणार्थ युवा उद्योजिका पुरस्कार दिला जातो. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यांतर्गत उद्योजिका पुरस्कार अपूर्वा कुलकर्णी, ईशा देशपांडे, ज्योत्स्ना आपटे, स्मृती कुकडे यांना देखील प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ ही संस्था १९४० साली स्थापन करण्यात आली. युवा हा उपक्रम २००४ साली स्व. चंद्रकांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील अधिवेशनात सुरु करण्यात आला होता.

निवडणुक काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी,आयकर विभाग, पुणे शाखेचा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असणार  

लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रिया संपूर्ण देशात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आयकर विभागाने निवडणुकांच्या काळात  होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष दिवसाचे 24 तास, आठवड्याचे सातही दिवस (24×7) कार्यरत असेल.

या कक्षात नागरिक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात किंवा पैशांच्या गैरवापराची माहिती देऊ शकतात. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली,सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर,या  जिल्ह्यांसाठी 2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये होणाऱ्या पैशांच्या अधिकाराच्या गैरवापराशी संबंधित माहिती / तक्रारी देण्यासाठी पुढील संपर्क क्रमांक, ईमेल किंवा पत्ता वापरला जाऊ शकतो.

टोल फ्री क्रमांक : 1800-233-0353 

टोल फ्री क्रमांक : 1800-233-0354

व्हॉट्सॲप क्रमांक : 9420244984

ईमेल आयडी : pune.pdit.inv@incometax.gov.in

नियंत्रण कक्षाचा पत्ता : रूम क्र. 829, 8वा मजला, आयकर सदन, बोधी टॉवर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे 411037.

यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैशाच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यास आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी 

प्रकाश आंबेडकरांना सायंकाळी ७ पर्यंतची वेळ; नाहीतर मविआ एकाचवेळी ४८ उमेदवार जाहीर करणार

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास तयार आहे. वंचित नाही आली तर उद्धव ठाकरे शिवसेना २२, काँग्रेस १६ आणि शरद पवार राष्ट्रवादी १० अशा जागा वाटून घेतल्या जाणार आहेत. जर वंचित आली तर ठाकरे २०, काँग्रेस १५, शरद पवार राष्ट्रवादी ९ आणि वंचितला ४ अशा जागा दिल्या जाणार आहेत. तसेच हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांना मविआ पाठिंबा देणार आहे. माढ्याची जागा जानकरांना दिली जाणार असल्याची चर्चा आहे. या दोन जागा त्या त्या पक्षांच्या कोट्यातून दिल्या जाणार आहेत.

मुंबई-वंचितला सोबत घेऊन लढायचे की नाही यावर आता निर्णय घेण्याची मविआवर वेळ आली आहे. कारण उमेदवार जाहीर करून त्यांना निवडणुकीच्या तयारीला देखील वेळ लागणार आहे. अशातच विलंब झाला तर हातच्या जागाही जायच्या अशी परिस्थिती येण्याची शक्यता आहे. यामुळे मविआने आज सायंकाळपर्यंत काय ते सांगा, असा संदेश वंचितला पोहोचता केला असल्याचे सांगितले जात आहे.भाजपाची पहिली यादी आली,लोकसभा निवडणूक जाहीर झाली, तरी देखील मविआचे काहीच ठरत नाही. वंचितने चारपैकी दोन जागाचा प्रस्ताव त्या हरणाऱ्या असल्याचे सांगून फेटाळला आहे. तसेच नवीन प्रस्ताव पाठवा असे सांगितले आहे.परंतु, मविआने अद्याप काही नवा प्रस्ताव दिलेला नाही.
गेल्यावेळी वंचित वेगळी लढल्याने काँग्रेसच्या बऱ्याच जागा गेल्या होत्या. मतांची विभागणी झाल्याने त्याचा फायदा शिवसेना-भाजपला झाला होता. यामुळे यावेळी वंचितला सोबत घेऊन लढण्याची तयारी मविआने केली होती. परंतु वंचितने जास्त जागा मागितल्याने सारे थांबले होते. आता आज सायंकाळपर्यंत वंचितने नाही कळविले तर मविआ आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.मविआने प्लॅन बी देखील तयार ठेवला असल्याचे सुतोवाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. वंचितने देखील स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. यामुळे या दोन्ही बाजुंची आघाडी झाली नाही तर त्याचा थेट फायदा भाजपा-शिवसेनेला होणार आहे.

नागरिकांच्या पैशातून महापालिकेने हटवले राजकीय कार्यकर्त्यांनी शहरभर केलेले विद्रुपीकरण

३४३३ भिंतीवरील लिखाण, पोस्टर, कटऑउट / होर्डिंग बॅनर, झेंडे हटवले

पुणे-अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले कि, शहरभर फुकटात आपला बडेजावी प्रचार,जाहिराती करण्यासाठी रंगविलेल्या भिंती ,लावलेले फ्लेक्स काढण्याचे काम महापालिकेने हाथी घेतले असून ४८ तासात बरेचसे विद्रुपीकरण हटवण्यात आले आहे.पुणे महानगरपालिकेकडून लोकसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहितेची तयारी सुरु झाली आहे शासकीय इमारती व सार्वजनिक जागेतील व खाजगी जागेतील अनधिकृत जाहिराती हटविण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आदेश प्राप्त झालेले आहेत
त्यानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतीत भिंतीवरील लिखाण, पोस्टर, कटऑउट / होर्डिंग बॅनर, झेंडे इतर इ. वर व इतर सर्व प्रकारच्या जाहिरातींवर परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून उपआयुक्त परवाना व आकाशचिन्ह विभाग माधव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील १५ महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय हद्दीमध्ये विविध ठिकाणी संबंधित परवाना निरीक्षक यांचेमार्फत निष्कासन कारवाई करणेत येत आहे.
शनिवार दि. १६/०३/२०२४ रोजी दुपारी ३:०० वाजता आचारसंहिता जाहीर झाल्या पासून पुणे महानगरपालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत शहरातील अनधिकृत जाहिरातींवर २४ तास, ४८ तास याप्रमाणे करण्यात आली
अश्या एकूण ४८ तासांत ३४३३ भिंतीवरील लिखाण, पोस्टर, कटऑउट / होर्डिंग बॅनर, झेंडे इतर इ. वर कारवाई करण्यात आलेली आहे. हे काम आचारसंहिता घोषित झाल्यापासून ७२ तासांत पूर्ण करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे.

विरोधकांची बेकायदा कामे सत्तेत आल्यावर कायदेशीर कशी होतात ? न्यायालयानेच केला प्रश्न

मुंबई: प्राथमिकदृष्ट्या राज्य सरकार केवळ विरोधकांवर कारवाई करताना आढळत आहे. विरोधक सत्तेत दाखल झाले की, कारवाई थंडावते. सर्व बेकायदा कामे कायदेशीर होतात, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारचे वाभाडे काढले.

साई रिसॉर्टप्रमाणेच संपूर्ण राज्याच्या किनारपट्टी क्षेत्रातील किती अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली, याची तपशीलवार माहिती देण्याचे निर्देश न्यायालयाने गेल्या सुनावणीत राज्य सरकारला दिले होते. सोमवारी सरकारी वकिलांनी केवळ रत्नागिरी जिल्ह्याचीच माहिती न्यायालयात सादर केली. त्यावर न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठाने सरकारला फटकारले. ‘संपूर्ण राज्य म्हणजे रत्नागिरी जिल्हा नव्हे. संपूर्ण राज्याची माहिती सादर करायचे निर्देश दिले होते.

प्रथमदर्शनी, साई रिसॉर्टवर राजकीय हेतूने कारवाई केल्याचे दिसते. काही दिवसांनी याचिकाकर्ते सत्ताधारी पक्षात सामील झाले, तर रिसॉर्टवरील कारवाई थांबेल आणि ते बांधकाम कायदेशीर होईल’, असा टोला न्या. जामदार यांनी सरकारला लगावला.

साई रिसॉर्टवरील कारवाई रोखण्याकरिता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कदम यांनी रिसॉर्टचा अनधिकृत भाग १५ एप्रिलपर्यंत तोडण्यात येईल, अशी हमी न्यायालयाला दिली. न्यायालयाने तोपर्यंत रिसॉर्टवर कारवाई न करण्याचे निर्देश सरकारला दिले.

न्यायालयाचे ताशेरे…

  • विरोधकांवर कारवाई करण्यात येते, सत्ताधाऱ्यांबरोबर असलेल्यांवर कारवाई केल्याचे दिसत नाही.
  • राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर तुम्ही आक्षेप घेतला होता. मात्र, तेच मंत्री केंद्रात गेल्यावर तुमचा आक्षेप मावळला. काय कारवाई केलीत?

भाजपच संपवणार शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष

0

 मुंबई: एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी हा पक्ष नकली आहे हे देशातील तिघांना नक्की माहिती आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असून ते त्यांचा तात्पुरता वापर करत आहेत.आता शिंदे यांचा वापर संपला असून भाजपच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष संपवणार आहेत, अशी परखड टीका कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी केली.

आम्ही निर्भय वरळीकर तर्फे ‘निर्भय बनो सभेचे’ आयोजन वरळी येथील बीडीडी चाळीतील वीर सुभाष मैदानात सोमवारी करण्यात आले होते. यावेळी सरोदे बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी उपस्थित होते. भाजप हा भ्रष्टाचारी आणि धर्मांध आहे. भाजप हा कायदा करून घोटाळा करत आहे. निवडणूक रोख्यांचा घोटाळा तसाच आहे.

”तुम मुझे चंदा दो, मे तुम्हे धंदा दुंगा” असा निवडणूक रोख्यांचा घोटाळा आहे. आता पुढे पीएम केअर फंडाचाही घोटाळा लवकरच समोर येईल, अशीही टीका सरोदे यांनी केले. मोदी यांनी देशाला कर्जबाजारी केले. राज्यात तेच मॉडेल राबविले जात आहे. पालिकेला कर्जबाजारी केले जाणार आहे. हे सरकार मुंबईचा सत्यानाश करत आहेत. मुंबईत लोकांना किमान सुविधा मिळत नसताना सुशोभीकरणावर कोट्यवधी खर्च करत आहेत, अशी टीकाही चौधरी यांनी केली.

…तर राहुल नार्वेकर यांच्याविरोधात सभा घेऊ!

राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे. भाजपने दक्षिण मुंबई मतदारसंघात त्यांना उमेदवारी दिली तर त्यांच्याविरोधात या मतदार संघात आम्ही निर्भय बनोच्या माध्यमातून दोन सभा घेऊ, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी दिला.

आर्थिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी आशिषकुमार चौहान यांचे मोलाचे योगदान

चौहान यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान

पुणे: नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे (एनएसई) सहसंस्थापक आशिषकुमार चौहान यांना आर्थिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला. मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आयोजित कार्यक्रमात ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या हस्ते चौहान यांना सन्मानित करण्यात आले.

प्रसंगी ‘सूर्यदत्त’चे सल्लागार प्रसन्न पाटील, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, संचालक डॉ. मनीषा कुंभार, मयूर शहा, प्रा. विवेक स्वामी, प्रा. शितल भुसारी, प्रा. रागिणी भट, प्रा. आदर्श कातराळे, प्रा. अस्मिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आशिषकुमार चौहान एक भारतीय व्यावसायिक आणि प्रशासक आहेत. भारताच्या राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. आयआयटी मुंबई आणि आयआयएम कोलकाता येथून शिक्षण पूर्ण केलेले चौहान नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाचे (एनएसई) सहसंस्थापक आहेत. ‘एनएसई’चे स्क्रीन आधारित ट्रेडिंग सेट करण्यात, तसेच निफ्टीचा इंडेक्स तयार करण्यात योगदान दिले आहे. १९९३-२००० या काळात त्यांनी ‘एनएसई’मध्ये केलेल्या कामामुळे त्यांना आधुनिक आर्थिक प्रवाहांचे जनक मानले जाते.”

“आशिषकुमार चौहान यांनी वित्त मंत्रालय, शिक्षण, एमएसएमई, सीबीडीटी तसेच भारतीय रिझर्व्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया यांसारख्या नियामकांसह सरकारच्या अनेक धोरण समित्यांमध्ये काम केले आहे. २० पेक्षा जास्त एक्सचेंजेस असलेल्या साऊथ एशिया फेडरेशन ऑफ एक्सचेंजेसचेही (एसएएफई) त्यांनी नेतृत्व केले. सध्या ते ‘डब्लूएफई’च्या बोर्डाचे सदस्य आहेत. यूएन, डब्ल्यूईएफ, डब्लूएफई, यूएनसीटीएडी, ओईसीडी अशा अनेक बहुपक्षीय संस्थांच्या व्यासपीठावर त्यांनी विचार मांडले आहेत. चौहान यांनी आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय असे योगदान दिले आहे. ‘एनएसई’ची स्थापनेतील त्यांचा सहभाग महत्वपूर्ण आहे,” अशा शब्दांत प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी चौहान यांच्या कार्याचा गौरव केला.

“भारतातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या अलाहाबाद विद्यापीठाचे कुलपती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. आयआयएम, एजेएनआयएफएम (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट), एनआयटी आणि आयआयआयटी यासह अनेक प्रसिद्ध सरकारी शैक्षणिक संस्थांच्या मंडळावर ते आहेत. इतर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये प्रतिष्ठित व्हिजिटिंग फॅकल्टी सदस्य म्हणूनही काम करतात. त्यांनी ‘बीएसई: द टेम्पल ऑफ वेल्थ क्रिएशन’ या पुस्तकाचे सह-लेखन केले आहे. ‘स्थिथप्रज्ञा: द प्रोसेस ऑफ मेंटेनिंग एन इक्विलिब्रियम’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. अशा या सर्वगुणसंपन्न व्यक्तीला सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आमचाच सन्मान होत असल्याची भावना आहे,” असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले. 

आशिषकुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत असल्याचे नम्रपणे नमूद केले. ‘सूर्यदत्त’च्या २५ वर्षांच्या वाटचालीचे कौतुक करत आशिषकुमार चौहान म्हणाले, “विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाचे व जागतिक दर्जाचे शिक्षण देऊन देशाच्या विकासात योगदान देणारी पिढी घडवण्यासाठी ‘सूर्यदत्त’ने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.

संगमनेर तालुक्यातील अल्पवयीन शाळकरी मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे पोलिसांना निर्देश

घटनेची जलद गतीने सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा करावी.

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये राहत असलेले का दहावीच्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यामधील आरोपींवर बाल लैगिक अत्याचार (पोक्सो)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी आणि गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबत तात्काळ अहवाल सादर करावा असे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संगमनेर पोलीस उपअधीक्षक यांना निर्देश दिले आहेत.

तसेच आरोपीला जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावेत. यामध्ये चौकशी अधिकारी म्हणून महिला पोलीस अधिकारी नेमावी. सर्व पुरावे मिळवावेत व लवकरात लवकर चार्ज शीट कोर्टामध्ये दाखल करावे. पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे. सदर आरोपींकडून मुलीच्या पालकांवर वारंवार दबाव आणला जातो आहे त्यामुळे तिच्या पालकांना त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करावे तसेच वेळप्रसंगी संरक्षण देण्यात यावे. या केससाठी सक्षम सरकारी वकील देण्यात यावा असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधीत पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले.

जिल्ह्यातील ३२ हजार फलक हटविले

पुणे, दि. १८ : भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत शासकीय जागेतील ११ हजार ८३, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १९ हजार ६५२ आणि खाजगी जागेवरील १ हजार ८१५ असे एकूण ३२ हजार ५५० जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज हटविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिते पालन काटेकोरपणे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने ३३ मावळ लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ९६१, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे २ हजार ५५२, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २०७, ३४ पुणे लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ७८५, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १ हजार ४३१, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २५७, ३५ बारामती लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ४ हजार ४८८, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे ५ हजार २८१, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २३२ तर ३६ शिरूर लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ४ हजार ८४९, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १० हजार ३८८, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे १ हजार ११९ असे एकूण ३२ हजार ५५० जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज हटविण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचे कटाक्षाने पालन व्हावे म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज पूर्णपणे हटविण्याची कार्यवाही सुरू असून लवकरच ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे.
0000