घटनेची जलद गतीने सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा करावी.
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये राहत असलेले का दहावीच्या विद्यार्थिनीवर अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. यामधील आरोपींवर बाल लैगिक अत्याचार (पोक्सो)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी आणि गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाबाबत तात्काळ अहवाल सादर करावा असे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संगमनेर पोलीस उपअधीक्षक यांना निर्देश दिले आहेत.
तसेच आरोपीला जामीन मिळू नये यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावेत. यामध्ये चौकशी अधिकारी म्हणून महिला पोलीस अधिकारी नेमावी. सर्व पुरावे मिळवावेत व लवकरात लवकर चार्ज शीट कोर्टामध्ये दाखल करावे. पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे. सदर आरोपींकडून मुलीच्या पालकांवर वारंवार दबाव आणला जातो आहे त्यामुळे तिच्या पालकांना त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करावे तसेच वेळप्रसंगी संरक्षण देण्यात यावे. या केससाठी सक्षम सरकारी वकील देण्यात यावा असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधीत पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले.