पुणे, दि. २० मार्च : ” एकनाथ महाराज यांनी भारूडाच्या रचनांची ताकद ओळखली होती. परंतू कालानुरूप समाजात याचा जास्त प्रचार झाला नाही. भारुडात नाचणार्या स्त्रीला भारतीय परंपरेत योग्य स्थान नव्हते तरी पण लेखिका पद्मजा कुलकर्णी यांनी पर्वा न करता या कलेसाठी जीवन समर्पित केले आहे. तसेच या चंदाताई यांनी या कलेत शिष्य परंपरा आणली होती.” असे विचार ज्येष्ठ साहित्यीक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे विद्यापीठाच्या कार्याध्यक्षांच्या ज्ञान सभागृहात कवयित्री भारूड साम्राज्ञी श्रीमती पद्मजा कुलकर्णी लिखित ‘ऊॅ श्री माँ अनवट काव्य भारूड संग्रहाचे प्रकाशन एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी माजी पोलीस महानिरिक्षक सुरेश खोपडे, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसन्तराव गाडगीळ, गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, आणि ललिता सबनीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,” या पुस्तकात लेखिकेने अध्यात्माबरोबरच व्यावहारिक जीवनाचे विविध पैलूंवरील दर्शन घडविले आहे. त्यांनी देवी देवतांची आरती, भक्ती व अध्यात्म मार्गाला संपूर्ण जगभरात पोहचविण्याचे कार्य केले आहे. भारुड लोककला ही मानवी दुःखांवर फुंकर घालण्याचे कार्य करीत असते. समाजात जात व धर्म यांना चौकटीत बंद करता येणार नाही. परंतू भारूडाच्या माध्यमातून यावर विश्लेषण व मार्मीक टिप्पणी करता येते.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” नियतीचा खेळ खूप गुह्य असतो. समर्पण भावनेने केलेल्या सर्व कार्यांना निश्चितच यश मिळते. त्याग, तपश्चर्या, ध्यास घेऊन लेखिकेने हे कार्य केले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले आहे. ऑक्सफर्ड येथे पुढील महिन्यात होणार्या कार्यक्रमात संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांचा संदेश दिला जाणार आहे.”
भारूड साम्रज्ञी पद्मजा कुलकर्णी म्हणाल्या,” वयाच्या १३व्या वर्षापासून मी गाणे लिहित आहे. संसारात राहून भारूड कलेच्या माध्यमातून विभिन्न गोष्टी समाजासमोर मांडल्या. ही लोककला जवळपास संपूर्ण जगभरात पोहचविण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे मला आंतरराष्ट्रीय कलाकार म्हणून घोषित केले.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, ” लोकसंगीतातील भारूड हे केवळ मनोरंजनाचे नाही तर ज्ञान प्रबोधनाचे माध्यम आहे. कलाकरांच्या माध्यमातून ही कला समाजापर्यंत पोहचविली जाते. परंतू पद्मजा कुलकर्णी यांनी भारूड सारखी लोककला परदेशा पर्यंत पोहचविली आहे.”
पं. वसन्तराव गाडगीळ यांनी शुभ आर्शिवाद दिले.
डॉ. महेश थोरवे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
महाराष्ट्रात भारूड कलेला शिष्य परंपरा होती- डॉ. श्रीपाल सबनीस – एमआयटीत भारूड साम्राज्ञी पद्मजा कुलकर्णी यांच्या पुस्तकांचे प्रकाशन
गिरीश बापटांचे समर्थक भाजपाबाहेर ..सुनील माने शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल
पुणे -महापालिकेचे तत्कालीन पदाधिकारी आणि तत्कालीन खासदार गिरीश बापट यांच्यातील सुप्त संघर्ष अनेकांना ठाऊक असेल ,बापट दिल्लीत गेले कि कसबा पेठेत पाण्याची समस्या निर्माण होत ,हि समस्या सोडविण्यासाठी अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील नियोजन मंडळाच्या बैठकीतून बापटांनी केलेला सभात्याग , आयुक्तांच्या बंगल्यात संघर्षात्मक पवित्र्याने प्रवेश करून तेथील पाण्याचे प्रेशर तपासण्याचे केलेलं आंदोलन आणि यावेळी त्यांच्या समवेत ना महापौर कोणी असणे ना स्थायी समिती अध्यक्ष असणे केवळ त्यांचे समर्थक असणे या गत काळातील घटनांचा आता काही प्रमाणात परिणाम दिसू लागला आहे, बापटांचे सहकारी समर्थक ,माजी पत्रकार सुनील माने यांनी भाजपा सोडून आता शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे .यावेळी अन्य काही पक्षातील कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला. सकाळपासून पवार यांच्या मोदी बाग येथील कार्यालयात अनेक जणांचे प्रवेश करण्यात आले.मनसेचे माजी नगरसेवक राहुल तूपेरे,माजी नगरसेवक आरिफ बागवान, हवेलीचे माजी पंचायत समिती सदस्य सुनील खेडेकर यांच्या सह काही कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्यात आला.
एकीकडे योगेश गोगावले, विजय काळे, अनिल शिरोळे अशा जुन्या फळीतील भाजपा नेत्यांना भेटून प्रचाराची मोहीम लोकसभेसाठी उघडली जात असताना जाणून बुजून काही प्रभावी मान्यवरांना डावलण्याची वृत्ती पुन्हा स्पष्ट दिसून येऊ लागल्याने त्याचा फटका पक्षाला बसू शकतो अशी कल्पना असूनही हेकेखोर वृत्तीने प्रचार यंत्रणा भाजपात आखली जातेय या पार्श्वभूमीवर बापट समर्थकांच्या वर्तुळात निराशेचे वातावरण आहे. ज्याचा फायदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला होताना दिसतो आहे. असे सूत्रांचे म्हणणे आहे.
प्रशांत जगताप काय म्हणाले,
मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर “आता शरद पवारांच्या नेतृत्वाचं काय होणार ?” असा प्रश्न सर्वांना पडला होता. अनेकांनी तर “शरद पवार की राजनीती का इरा खतम हुआ” असं म्हणत शरद पवारांचे नेतृत्व इतिहासजमा झाले अशा वल्गनाही केल्या. परंतु या लोकांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आहे हेच पुन्हा सिद्ध झाले.
शरद पवारांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली, जेव्हा जेव्हा राजकीय संकट आले तेव्हा तेव्हा शरद पवारांनी जनतेत जाऊन न्याय मागितला, प्रत्येक वेळी जनतेच्या पाठिंब्यावर शून्यातून विश्व निर्माण करत शरद पवारांनी आपले नेतृत्व अधिक भक्कम केले. यावेळीही सगळे मातब्बर सोडून गेल्यावर शरद पवारांनी आपल्या राजकारणाचा डाव नव्याने मांडण्यास सुरुवात केली आहे. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना आजही शरद पवारांच्या नेतृत्वाची भुरळ असल्याने त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षात जोरदार इंनकमिंग सुरू आहे.
शरद पवारांच्या पुणे येथील निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक राहुल तूपेरे, शेतकरी कामगार संघटनेचे प्रवक्ते भगवान जाधव, माजी नगरसेवक आरिफभाई बागवान, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनिल खेडेकर, स्व. खासदार गिरीशभाऊ बापट यांचे स्विय्य सहाय्यक सुनिल माने यांनी जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यात महत्वाची भूमिका बजावली.
“सर्व मान्यवरांच्या प्रवेशाने पक्षाला नक्कीच ताकत मिळेल हा विश्वास आहे.
सर्वांचे स्वागत व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !” अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी यावेळी दिली.
बापट आणि शरद पवार राजकीय विरोधक पण वैयक्तिक मित्र
वैयक्तिक हितसंबध आणि मित्रत्वाचे संबध यास बापटांनी कधीच राजकीय मतभेदातून बाधा येऊ दिली नव्हती त्यामुळे बापटांचे सर्व पक्षात मित्र होते. पण आता परिस्थिती बदलली आहे . भाजपचे स्थानिक काही मोजके नेते राजकीय स्पर्धेतून भेदभावाच्या राजकारणाला खतपाणी घालत असल्याचा आरोप होतो आहे. या लोकसभा निवडणुकीस प्रारंभापासूनच याची प्रचीती येऊ लागल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा राजकीय जाणकार सूत्रांनी केला आहे.
पुण्याची क्रितीका रेड्डी बनली ॲक्सिस बँकेच्या कला, हस्तकला आणि साहित्यासाठी संपूर्ण भारतातील स्पर्धा SPLASH ची विजेती
● सहा विजेत्यांना प्रत्येकी १ लाख रुपये आणि उपविजेत्याला प्रत्येकी रु. 50 हजाराची शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येणार
● स्पर्धेला ६.८ लाखांहून अधिक सहभागींकडून मोठा प्रतिसाद; 50 दशलक्षांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली स्पर्धा
पुणे , 20 मार्च 2024 : अॅक्सिस बँक ही भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक बँक आहे. बँकेने संपूर्ण भारतात घेतलेल्या कला, हस्तकला आणि साहित्यावरील वार्षिक स्पर्धा SPLASH च्या सहा राष्ट्रीय विजेत्यांची घोषणा केली. ही स्पर्धा 7-14 वयोगटातील मुलांसाठी होती. सर्व सहा अंतिम स्पर्धकांना प्रत्येकी १ लाख रुपये आणि उपविजेत्याला प्रत्येकी रु. 50 हजाराची शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येईल. हॅम्लेज, फॅबर कॅसल, अमेरिकन टुरिस्टर आणि BoAt सारख्या भागीदारांकडून प्रत्येकी 1 लाख, रोमांचक हॅम्पर्स आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि उपविजेत्याला रु. प्रत्येकी 50 हजार मिळणार आहेत.
7 ते 10 वर्षे वयोगटातील विजेते:
● कला : शिवाश सोनी, GDGPS, नवी दिल्ली
● हस्तकला : यशवी प्रेमकुमार, सेंथिल पब्लिक स्कूल, सेलम, तामिळनाडू
● साहित्य: क्रितीका रेड्डी, सिटी इंटरनॅशनल स्कूल औंध, पुणे, महाराष्ट्र
11 ते 14 वयोगटातील विजेते:
● कला : पी. अक्षिता, द प्रेसिडेंशियल स्कूल, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश
● शिल्प : देवयुध दास, दिल्ली पब्लिक स्कूल, उत्तर 24 परगणा, पश्चिम बंगाल
● साहित्य : स्तुती जैन, D.A.V. पब्लिक स्कूल, लुधियाना, पंजाब
एक माइलस्टोन म्हणून या स्पर्धेला देशभरातून ६.८ लाखाहून अधिक स्पर्धकांकडून प्रवेश मिळाला, ज्यात दरवर्षी ३६% वाढ झाली आहे. या उपक्रमाद्वारे, प्रत्येक मुलाला त्यांची प्रतिभा दाखविण्याच संधी मिळावी याची खात्री करून, बँकेने शारीरिकरित्या (शारीरिक आणि डिजिटल दोन्ही पद्धतीने) स्पर्धा आयोजित करून 50 दशलक्षांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचली आहे.
उपक्रमाबाबत बोलताना ॲक्सिस बँकेचे मुख्य विपणन अधिकारी अनूप मनोहर म्हणाले की, “आम्ही सर्व सहभागींचे आभार मानू इच्छितो आणि विजेत्यांनी ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल अभिनंदन करू इच्छितो. आमचा ठाम विश्वास आहे की तरुणांच्या मनात एक चांगल्या उद्यासाठी जग घडवण्याची, मोल्ड करण्याची आणि बदलण्याची ताकद आहे. ॲक्सिस बँक म्हणून आम्ही आमच्या पुढच्या पिढीसाठी एक चांगला समुदाय तयार करण्याच्या या प्रवासाचा भाग बनू इच्छितो. स्प्लॅशच्या माध्यमातून, आम्ही कला, हस्तकला आणि साहित्य यासारख्या सर्जनशील माध्यमांद्वारे तरुण मनांना त्यांच्या कल्पना, विचार आणि दृश्ये व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो आणि पुढेही करत राहू.”
नवीन पिढीमध्ये दयाळूपणाचा विचार रुजवण्याच्या आणि सद्भावना वाढवण्याच्या उद्देशाने, ॲक्सिस बँकेने 1,900+ शाळांपर्यंत पोहोचले आणि तिच्या 5000+ शाखा सक्रिय केल्या. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे प्रतिष्ठित कलाकार विक्रांत शितोळे यांच्यासह दिशा कथारानी, Imagimake च्या सह-संस्थापक; अमर चित्रकथेचे समूह कला संचालक सॅव्हियो मस्करेन्हास; आणि राजीव चिलाका, ग्रीन गोल्ड ॲनिमेशनचे सीईओ यांचा समावेश असलेल्या ज्युरी पॅनेलने या सहभागींना निवडले.
पेडल ऑपरेटेड वाॅशिंग मशिनने वेधले सर्वांचे लक्ष
पुणेः येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ स्कूल ऑफ इंजिनिअरिंग सायन्सच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पेडल ऑपरेडेट वाॅशिंग मशिनलला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद(अभाविप) व स्रिजान या उद्योजकता विकास केंद्रातर्फे आयोजित ‘डीपेक्स-२०२४’ या राज्यस्थरीय स्पर्धेत उपविजेते पदाचा किताब आपल्या नावावर केला. ‘डिपेक्स २०२४’ या स्पर्धेसाठी राज्यभरातून १ हजारांहून अधिक प्रकल्पांनी सादरीकरणासाठी नोंदणी केली होती. त्यातील केवळ ३०० प्रकल्पांची सादरीकरणासाठी निवड करण्यात आली. ज्यामध्ये एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या मेकँनिकल इंजिनिअरींग विभागाचे विद्यार्थी अनुराग निकम, युगंत पाटील, विनायक गोयल व मयुर माळी यांनी तयार केलेल्या पेडलच्या साहाय्याने चालणाऱ्या वॉशिंग मशिनने सर्वांचे लक्ष वेधून घेताना दुसरा क्रमांक पटकाविला. ज्यासाठी त्यांचा राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या प्रकल्पाला प्रा.अजयकुमार उगले यांचे मार्गदर्शन लाभले. प्रकल्पाबद्दल माहिती देताना ते म्हणाले, मशीन पोर्टेबल, इको-फ्रेंडली आहे आणि कपडे धुण्यासोबतच शारीरिक तंदुरुस्तीसाठी मदत करते. त्यामुळे क्रीडा संकुल, लष्कर आदी ठिकाणी या मशिनचा चांगला वापर केला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीनंतर विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ. मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ. मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, प्रा.डाॅ.विरेंद्र शेटे, डाॅ.सुदर्शन सानप यांनी कौतुक केले आहे.
ढाकणेंच्या बदलीने विकासकामांची स्वप्ने झाली दिशाहिन
पुणे- महापालिकेत अनेक शासकीय अधिकारी येतात आणि जातात,त्याचे फारसे कोणाला काही वाटत नाही पण काही अत्यंत मोजके अधिकारी लक्षात राहतात,काहींच्या बदली होण्याने अनेकांना हायसे वाटते तर काहींच्या बदली होण्याने अनेकांना..हि बदली व्हायला नको होती असे वाटते काळ संध्याकाळी झालेल्या अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या बदलीने तर अनेकांना वाईट वाटले आहे,चांगले अधिकारी मिळत नाहीत आणि मिळाले तर फार काळ ते इथे राहत नाहीत आणि अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी त्यांच्या विकास कामांच्या स्वप्नांवर,प्रकलापांवर आभाळ कोसळण्याची शक्यता निर्माण होते. किमान ३ वर्षे अधिकाऱ्याला काम मिळायला हवे असा संकेत असताना अनेक अधिकारी ४/५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ राहिल्याची उदाहरणे असताना अवघ्या १४ महिन्यात ढाकणे यांच्या बदलीने त्यांची शहर विकासाच्या कामाची दिशा जणू हरवणार आहे. महापालिकेत येणारे एक बातमीदार राजू हिंगे यांनी या बदलीबाबत एक लक्षवेधी पोस्ट सोशल मीडिया वर टाकली आहे..अगदी त्याच पोस्टने अनेकांना आपल्या भावना व्यक्त कराव्याश्या वाटू लागल्या आहेत

विकास ढाकणे यांनी वाहतूक समस्येला मनावर घेतले होते, यावर अभ्यास करायला त्यांनी आल्या आल्या सुरुवात केली ६ महिने नियोजनात घालविले आणि १५ रस्त्यांचे नियोजनासाठी हालचालींना प्रारंभ केला,रस्त्यावरील अनावश्यक,लोकांना उपयुक्त नसणाऱ्या बाबी हटविणे,मोठं मोठाले रस्ते करणे तसेच पायी चालायला प्रशस्त जागा असू देणे आणि रस्तोरस्ती पार्किंग ची समस्या सोडविणे यांना प्राधान्य देऊन त्यांनी नियोजनाला प्रारंभ केला खडकी येथे एका रस्त्याचे काम केले.गणेश खिंड रस्त्यावर काम सुरु केले, रुंदीकरणाला त्यांनी प्राधान्य दिले.
क्रीडासंकुलांची दुरवस्था त्यांना मानवली नव्हती, पुण्यासारख्या शैक्षणिक माहेर घरातून पदकांवर पदके मिळविणारे खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडा संकुले हि राष्ट्रीय स्तरावर वा राज्य स्तरावर नामांकित पुरस्कार प्राप्त अशा खेळाडूंना सोपवून त्यांच्याकडून तरुणाईला उत्कृष्ट क्रीडापट्टू या संकुलातून कसे करता येईल यासाठी त्यांचे नियोजन सुरु झाले होते…पण आता हे सारे अधुरे सोडून त्यांना बदली च्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे.
ढाकणे एक सकारात्मक अधिकारी, अडचणीतून मार्ग काढून सुकरतेकडे नेणारे अधिकारी अशी प्रतिक्रिया अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या कडून मिळते आहे आणि नागरिकांकडूनही तसेच सांगितले जाते आहे. रामटेकडी औद्योगिक वसाहत येथे राहणारे आनंद उत्तरकर म्हणाले,रामटेकडी, हडपसर जवळील रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत आपण अतिरिक्त आयुक्त श्री ढाकणे यांची भेट घेतली होती, ढाकणे यांना आम्ही गेल्या गुरुवारी त्यांच्या कार्यालयात भेटलो.६ महिने रखडलेल्या कामाबाबत आता नव्याने पुन्हा इतका चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा नव्हती पण मिळालेला प्रतिसाद एक सुखद आश्चर्याचा धक्का होता. लवकरच रस्ता पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ते 10 दिवसांत पूर्ण झालाही.त्यामुळे 6 महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित असलेले काम 10 दिवसांत पूर्ण झाले. नागरिकांप्रती असलेली अशी संवेदनशीलता वाखाणण्याजोगी आहे आणि त्यामुळे व्यवस्थेवरचा विश्वासही निर्माण होतो. हिलसाईड सोसायटी आणि रामटेकडी औद्योगिक वसाहतीच्या वतीने मी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचे त्यांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार मानतो.

स्वतः ढाकणे काय म्हणाले,’
आपल्या सगळ्यांचे प्रेम बघून मन खूप भरून आले.रस्ते,शाळा,हॅास्पिटल,क्रीडांगणे, उद्याने,ॲाडिटोरियम यांचा खूप विचारपूर्वक योजनाबध्द कार्यक्रम हाती घेतला होता.काल संध्याकाळी सावरकर भवनला भेट दिली.२ नवीन कोर्ट PMC ला मिळतील असा शब्द उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी रविवारी दिला होता.तिथे नियोजन केले. नंतर बालगंधर्वला गेलो.इतका सुंदर कायापालट होतोय पाहून खूप आनंदी होतो. VIP room,make up room,नवीन पडदा,लाईट्स,साऊंड.खूप बरं वाटलं.VIP room मध्ये बालगंधर्वला आतापर्यंत झालेल्या महत्वाच्या अविस्मरणीय प्रसंगांचं कोलाज करायचं ठरलं.टीव्हीची साईज,मेक अप रूम मध्ये स्टेजवरचं लाईव्ह प्रक्षेपण,प्रत्येक रूममध्ये 5 star हॅाटेलसारखं पासवर्ड/कार्ड लॅाक,गोदरेज तिजोरी,AC चे मॅाडेल अगदी कोहलर/टोटो चे टॅायलेट फिटींग्स लागतायेत.
घरी आलो तर ॲार्डर….मिळाली बदलीची…
असो सरकारी नोकरी म्हणजे हे सगळं आलंच.
देवाने MPSC नंतर UPSC त उत्तीर्ण केलं हाच खूप मोठा आशीर्वाद.जिकडे मिळेल तिकडे जाऊ.पोलीस,रेल्वे,केंद्रीय मंत्रालय,राज्य मंत्रालय,PCMC,PMC सगळीकडे खूप काही करायला मिळालं.सर्वोत्कृष्ट परिक्षाधीन अधिकारी पासून,तीन वेळेस केंद्रीय मंत्रालयाच्या पुरस्कारापासून तर महाराष्ट्र शासनाचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रथम पुरस्कार सगळे काही मिळाले.चांगले वरिष्ठ भेटले.पण तुमच्या सारखे जिवाभावाचे मित्र भेटले हे खूप मोठं भाग्य.असाच स्नेह ठेवा.पुण्यात घर आहे.कुठेही गेलो तरी पुण्यासाठी काम चालूच ठेवू.जिकडे जाऊ तिकडे सिस्टीम आणि आपला देश चांगला करण्याचा प्रयत्न करू
सिव्हिल सर्व्हिसेसचे 2008 बॅचचे अधिकारी विकास ढाकणे यांनी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार अवघ्या १४ महिन्यापूर्वी स्वीकारला . पीएचडी व्यतिरिक्त त्यांनी एम.ए. (अर्थशास्त्र), बी.एसी. (कृषी), आणि एल. एल. बी. पदवी प्राप्त केलेली.या अगोदर ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्री यांचे विशेष कर्तव्य अधिकारी म्हणूनही काम केले आहे.श्री. ढाकणे यांना विविध प्रशासकीय पदांवर काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या सेवेत त्यांनी भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्र्याचे खाजगी सचिव म्हणून काम केले आहे आणि रेल्वेच्या मुंबई, अहमदाबाद, पुणे, सोलापूर विभागांवर सहायक आणि विभागीय सुरक्षा आयुक्त या पदांवर उत्कृष्ट काम केले आहे.त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल, त्यांना 2014, 2018 आणि 2019 मध्ये महासंचालक पदक (DG ) पुरस्कार आणि 2021 मध्ये ‘राजीव गांधी प्रशासकीय उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. राजपथ, दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये त्यांनी परेड कमांडरचा सन्मान पटकावला आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट प्रोबॅशनरी अधिकारी पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.वाचन, ट्रेकिंग आणि दिग्दर्शन ही त्यांची विशेष आवड आहे. त्यांनी आत्तापर्यंत पाच नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.याशिवाय विद्यापीठ स्तरावर ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
स्मार्ट पुणे प्रकल्पाप्रमाणे स्मार्ट उमेदवाराचीही दाणादाण उडेल -काँग्रेसने लवकर उमेदवार जाहीर करावा
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात काँग्रेस भवन येथे बैठक संपन्न.
पुणे -स्मार्ट पुणे प्रकल्प कोणासाठी होता ?त्याचे काय झाले हेही पुणेकर जाणून आहेत,स्मार्ट पुणे प्रकल्पाप्रमाणे भाजपच्या स्मार्ट उमेदवाराचीही दाणादाण उडेल , काँग्रेसने लवकर उमेदवार जाहीर करावा अशी मागणी करत ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रा ६७०० किलोमीटरचे अंतर पार करून मुंबईत प्रभावीपणे दाखल होऊन यशस्वी सभा झाल्याबाबत अभिनंदन व आनंदाचा ठराव काल पुण्याच्या काँग्रेस भवनात मंजूर करण्यात आला .
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते, प्रमुख पदाधिकारी व ईच्छूक उमेदवारांची बैठक पार पडली. सर्व प्रथम सदर बैठकीत मुंबई येथे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रा ६७०० किलोमीटरचे अंतर पार करून मुंबईत दाखल झाली अतिशय यशस्वीपणे भव्य – दिव्य सभा झाली म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांनी आनंदाचा ठराव मांडला. त्यास चिटणीस संजय बालगुडे यांनी अनुमोदन दिले तर उपस्थितांनी हात वर करून ठराव समंत केला.यावेळी आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी,माजी मंत्री रमेश बागवे,बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड,माजी महापौर कमल व्यवहारे, माजी आमदार दिप्ती चवधरी, आबा बागुल संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, चंदूशेठ कदम, गोपाळ तिवारी, दत्ता बहिरट, सुनिल शिंदे, अविनाश बागवे, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, राजेंद्र शिरसाट, यशराज पारखी, राहुल शिरसाट, हेमंत राजभोज, अजित जाधव, राजू ठोंबरे, अक्षय माने, नरेंद्र व्यवहारे, मुकेश धिवार, संग्राम खोपडे, गुलाम हुसेन खान, आशितोष शिंदे, अभिजीत गोरे, विक्रम खन्ना, आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी लोकसभा निवडणुकीची रणनिती संदर्भात साधक बाधक चर्चा झाली. यावेळी उपस्थितांनी आपापली मते मांडली. जो कोणी उमेदवार पक्ष देईल त्याला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडुन आणून महाविकास आघाडीचे हात बळकट करायचे. त्यासाठी बुथ कमिटी सक्षम करणे आणि बुथ कमिट्यांच्या सदस्यांमार्फत मतदारांकडे पक्षाने केलेले कार्य व पक्षाचे ध्येय धोरण पोहचविणे. महायुतीने महाराष्ट्रात सत्तेत आल्यावर महाराष्ट्राच्या अनेक योजना रद्द केल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना र्भुदंड पडला आहे. गेल्या १० वर्षात पुण्यात भाजपाचे खासदार असून पुण्याचा सर्वांगीण विकास झालेला नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली हाजारो रूपये खर्च केले परंतु पुणे सिटी स्मार्ट झालेली नाही. वाहतुकीचा प्रश्न सुटलेला नाही, वाढते प्रदुषण, पाणी प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न आदी प्रश्न प्रलंबित आहे हे सर्व मुद्दे जनतेपुढे मांडले पाहिजे. काँग्रेस पक्षाचा उमेदवार भरघोस मतांनी निवडुन येणार असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
यानंतर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक जैन यांचे अल्पश: आजाराने निधन झाले उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना श्रध्दांजली वाहिली.
माणिकराव कदम आणि कार्यकर्त्यांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई-भारत राष्ट्र समिती (BRS) चे नेते माणिकराव कदम यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल राज्यप्रमुख पदी माणिकराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. कदम व त्यांचे सहकाऱ्यांचे पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी मोलाचं सहकार्य लाभेल असा विश्वास व्यक्त करत पक्षश्रेष्ठींनी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, आमदार प्रकाश सोळंके, कोष्याध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सह कोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी उपस्थित होते.
“अजितदादा अजिबात पोरके नाहीत. आमच्या सर्वांचं भलं मोठं कुटुंब हेच त्यांचं कुटुंब”- रुईकर
पुणे-“अजितदादांची गरज आम्हाला जास्त आहे. दादा एकटे आमच्यासाठी चिक्कार आहेत . कुटुंब,कुटुंबं काय करताय? दादाचे कुटुंब म्हणजे आम्हीच सर्व आहोत. आणि आमच्या या सर्वात मोठ्या कुटुंबावर घाला घालण्याचा प्रयत्न झाला तर छातीचा कोट करू. वेळच पडली तर दादासाठी जीव देऊ. निवडणुकीचा पेपर कितीबी अवघड आहे, असं भासवण्याचा प्रयत्न केला तरी आमचा अभ्यासच एवढा झालाय, की पहिल्या नंबरात पास होऊ. मागेल तेव्हा लागेल ते दिलं दादांनी. छोट्या छोट्या गावात कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली ती दादांनी. पक्ष, गट, तट, जात, धर्म न पाहता अगदी विरोधकांचेही काम केलं ते दादांनी. दादांच्या पाठीशी लाखोंचे आशीर्वाद आहेत, प्रचंड मोठ्या कामाचे बळ आहे. आणि एक लक्षात ठेवा, दादा अजिबात पोरके नाहीत. आमच्या सर्वांचं भलं मोठं जनकुटुंब हेच त्यांचं कुटुंब आहे. हे कुटुंब त्यांच्या पाठीशी असताना कशाला काळजी करताय? आपणच जिकणार आहोत, आपणच जिंकू.
अशी भावनिक साथ ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग चोधर आणि माजी नगरसेविका सुरेखा चौधर यांनी सुनेत्रावहिनी पवार यांच्या सदिच्छा भेटीप्रसंगी दिली.
अतिशय उत्स्फूर्तपणे लोक भावना या वेळी व्यक्त करत होते.त्या भावनांनी सारं वातावरण भारून, हेलावून जात आवेशाने पेटून उठले.
अजितदादा जेव्हा विद्या प्रतिष्ठानच्या उभारणीसाठी प्रत्यक्ष साईटवर उभे राहून झिजत, राबत होते. तेव्हा सुनेत्रा वहिनी देखील कधी त्यांच्या सोबत तर कधी दुपारी त्यांच्या जेवणाचा डबा घेऊन यायच्या. दादांना जेवण करायला सवड होईपर्यंत वहिनी अनेकदा रुई गावात यायच्या. त्यामुळे रुईची आणि रूईकरांची त्यांची ओळख तेव्हापासून आहे . तेव्हा जोडले गेलेले त्यांचे ते ऋणानुबंध वेळोवेळच्या त्यांच्या येण्या- जाण्यातून, संपर्कातून, दादांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामातून रुईंकरांशी बांधल्या गेलेल्या गाठी किती घट्ट आहेत हेच सर्वांना दिसून आले.
याप्रसंगी पांडुरंग चौधर यांनी दादांसाठी जीव देखील देऊ, असे सांगितले तर बाळासाहेब चौधर यांनी, दादांनी कधीच कोणाला दुखावले नाही, असे सांगताना उपस्थितांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
या सर्वांसह महिला पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच रुईचे अध्यक्ष या वेळी म्हणाले कि,”मी जाणीवपूर्वक गांभीर्याने सांगतो, दादा एकटे आहेत असे समजू नका. ते केवढे मोठे, त्यांचे कुटुंब, भावकी केवढी मोठी? याचे दर्शन जेव्हा मतदानातून होईल, तेव्हा दादांना घेरणाऱ्यांचे डोळे दिपतील. हे लिहून घ्या लिहून.” असे परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी अजिनाथ चौधर, मच्छिंद्र चौधर, बाळासाहेब चौधर, आबासाहेब चौधर, रामभाऊ पाटील, सत्यवान घाडगे, अतुल कांबळे, दादासाहेब चौधर, साईनाथ चौधर, नवनाथ चौधर, किशोर सावंत, अमर घाडगे, राजेंद्र साळुंखे, संजय साळुंखे, मधुआबा शिरसाट, पपू शेटे यांच्यासह रुई येथील ग्रामस्थ, पदाधिकारी, राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दिव्यांग कल्याणासाठी प्रयत्नशील : प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी
‘हाक दिव्यांगांची साथ लायन्सची’ उपक्रमांतर्गत लायन्स क्लबतर्फे दिव्यांगांना २६ व्हीलचेअर्सचे वाटप
पुणे : “सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून दिव्यांगासाठी लायन्स क्लबकडून सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे. दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनही प्रयत्नशील आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या पाहिजेत. त्यांच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. दिव्यांगांसाठी एकाच छताखाली सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी लायन्स क्लबने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करीत शासकीय स्तरावर लागणारी सर्वोतपरी मदत करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
लायन्स क्लब इंटरनॅशनल ३२३४ डी-२ च्या वतीने आयोजित ‘हाक दिव्यांगांची, साथ लायन्सची’ उपक्रमाअंतर्गत २६ दिव्यांगांना व्हीलचेअरचे वाटप प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. एरंडवणे येथील सेवासदन शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात माजी प्रांतपाल रमेश शहा, दीपक शहा, ‘सेवासदन’चे सरचिटणीस चिंतामणी पटवर्धन, दिव्यांग विभाग प्रमुख सीमा दाबके यांच्यासह लायन्स क्लबचे सभासद, दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सचिन नहार यांच्याकडून एक व्हीलचेअर भेट देण्यात आली.
दिव्यांगांसाठी लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतो. अनेकांचे या उपक्रमात सहकार्य मिळत आहे. दिव्यांगांना दैनंदिन जीवन जगताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे कार्य समाधान देऊन जाते, अशी कृतज्ञ भावना रमेश शहा यांनी व्यक्त केली.
दीपक शहा म्हणाले, दिव्यांगांना सर्व सोयींनी युक्त असे ‘लायन्स मेडिकल भवन’ उभारण्याचा आमचा मानस आहे. या मेडिकल भवनमध्ये दिव्यांगांसाठी सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा, शासकीय योजना, प्रशिक्षण केंद्र, कार्यशाळा उपलब्ध होणार असून, यासाठी लागणारी जागा मेधाताईंनी उपलब्ध करून द्यावी.
रमेश शहा यांच्या संकल्पनेतून ‘हाक दिव्यांगांची, साथ लायन्सची’ या उपक्रमाला सुरुवात झाली. आज या उपक्रमाअंतर्गत २५ दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर देण्यात आल्याचे सीमा दाबके म्हणाल्या. सूत्रसंचालन मेघना जोशी यांनी केले. आभार ऋजुता पितळे यांनी मानले.
पुण्यातून लढा असा मला आग्रह..खुद्द शरद पवार म्हणाले…
पुणे-मी लोकसभा निवडणूक लढवावी, असा अनेक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. खास करून मला पुण्यातून लढण्याचा आग्रह होतोय. त्याचबरोबर सातारा आणि माढ्यातूनही कार्यकर्ते आग्रह करत आहेत. परंतु मी माझ्या राजकीय आयुष्यात एकूण १४ निवडणुका लढलो आणि जिंकलो, आणखी किती निवडणुका लढवणार…? असा प्रश्न उपस्थित करत तसेही मी यापूर्वीच आता लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केलेली आहे, असे शरद पवार यांनी आज येथे म्हटले आहे. शरद पवार यांनी पुण्यातील मोदीबागेत त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी लोकसभेचं जागावाटप, मतदारसंघांचं गणित, वेगवेगळी राजकीय समीकरणे, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आदी विषयांवर शरद पवार यांनी आपली मतं मांडली.
पुण्यातील लोकसभा जागेसाठीभाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारीही जाहीर केलीय. ते प्रचारही करत आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण राहणार, याबाबत काँग्रेस कडून धंगेकर ,बागुल, जोशी ,शिंदे अशी अनेक नावे समोर येत आहेत. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. येथून मीच निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याची माहिती खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. शरद पवार हे मंगळवारी मोदीबाग येथील निवासस्थानी होते. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांना भेटले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबतही चर्चा झालेली आहे. ठाकरे गटाच्या प्रवक्ता व उपनेत्या सुषमा अंधारे, शिवसंग्राम पक्षाच्या प्रमुख ज्योती मेटे यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई सेवकांकडून मतदानाची शपथ
mपुणे, दि. १९: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत असून त्याअंतर्गत भोसरी विधानसभा मतदार संघात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई सेवकांना मतदानाची शपथ देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयामार्फत विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात इंद्रायणीनगर, चिखली, जाधववाडी, अंकुशराव लांडगे सभागृह या परिसरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुमारे ५०० सफाई सेवकांनी मतदानाची शपथ घेतली. यावेळी क क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, भोसरी विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी तानाजी दाते उपस्थित होते.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत महिला मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यात स्वीप व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असून महिलांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे व आपल्या परिसरातील महिलांनादेखील मतदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन पुणे जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे यांनी केले.
भाजपच्या शहर विद्रूपीकरण विरोधात शिवसेनेचा पुणे आयुक्ताना घेराव .
पुणे शहरात आचारसंहिता असताना सार्वजनिक मालमत्ता विद्रूपिकरण विषयात प्रशासनाच्या डोळेझाक पणा बाबत पुणे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आक्रमक .
पुणे :- लोकसभेचे देशभर बिगूल वाजले , आचारसंहिता सुरु झाली प्रशासनाने राजकीय नेत्यांचे बोर्ड झाकले , अनेक बॅनर काढले , पण आज पाच दिवस उलटूनही सत्ताधारी भाजप च्या विरोधात कणभर पण कारवाई झाली नाही हे प्रशासन भाजप साठीच राजकीय वरदान आहे काय ? असा प्रश्न शिवसेना पुणे शहराच्या वतीने करण्यात आला आणि पुणे शहर शिवसेनेच्या वतीने पुणे शहराचे नवनियुक्त आयुक्त यांस आज पुणे महानगर पालिकेत त्यांच्या कार्यालयात घेराव घालण्यात आला .पुणे मनपा प्रशासने यावर तत्पर कारवाई करावी अन्यथा शिवसेनेला लोकशाही च्या रक्षणार्थ पुणे मनपा विरोधात आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असे स्पष्ट सांगण्यात आले .आयुक्तांनीही आचारसंहितेची कारवाई चालू केली आहे आणि चुकीचे काम करणाऱ्यांवर आम्ही गुन्हा दाखल करू असे आश्वासन यावेळी दिले .यावेळी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे , शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार , बाळासाहेब ओसवाल, अविनाश साळवे, विशाल धनवडे , पल्लवी जावळे , संगीता ठोसर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, उपशहर प्रमुख समीर तुपे , आनंद गोयल, प्रशांत राणे, उमेश वाघ, युवासेना शहर अधिकारी राम थरकुडे, युवराज पारीख , गणेश काकडे, विभागप्रमुख अजय परदेशी, राजेश मोरे, राहुल जेकटे व शिवसैनिक उपस्थित होते .
या संदर्भात संजय मोरे म्हणाले कि,’ स्वच्छ सर्वेक्षणात तसेच आत्ताच झालेल्या G20 परिषदेत पुणे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील भिंती सुशोभीकरण केल्या होत्या , परंतू भारतीय जनता पक्षाच्या वतीने या आणि अनेक भिंतींवर राजकीय जाहिरातबाजी करुन स्वच्छ सर्वेक्षणात पुणेकरांची मान खाली घालविण्याचा प्रकार करुन शहर विद्रुपीकरण केले आहे.
तसेच देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असूनही पुणे मनपा प्रशासन धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहे ,शहरात सर्रासपणे भाजप ने निवडणूक चिन्ह, मोदींच्या घोषणा, भाजप नेत्यांची नावे भिंतींवर लावली आहेत यातून शहर विद्रूपीकरणात अजुन हातभार लावला जात आहे.मागील आठवड्यात शिवसेनेच्या वतीने आकाशचिन्ह व परवाना विभागाचे अधिकारी माधव जगताप यांना भेटून निवेदन देऊनही त्यावर आजतागायत कारवाई झालेली दिसत नाही .
२४ तासात भिंतीवरील कमळ पुसा अन्यथा…
तर हाताचा पंजा भेट देऊ–शहरातील शासकीय जागेवर ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे कमळाचे चिन्ह रंगवण्यात आले आहे. आचारसंहितेचे हे उल्लंघन आहे. त्यामुळे कारवाई बरोबरच या भिंती साफ झाल्या पाहिजेत. पुढील २४ तासात भिंतीवरील कमळ पुसले गेले नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू. भाजपवर कारवाई न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना हाताचा पंजा भेट देऊ, अशी भूमिका आमदार रविंद्र धंगेकर यांनी यावेळी मांडली.
पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग
मोहन जोशी, रविंद्र धंगेकर यांनी घेतली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट
पुणे : पुण्यात भाजपकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आला असून याबाबत काँग्रेसचे नेते मोहन जोशी, काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची मंगळवारी (ता. १९) भेट घेवून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी (ता. १६) लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली. मात्र, भाजपकडून आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन होत आहे. यातून ते सुरवातीच्या दिवसापासून निवडणूक हायजॅक करू पाहत आहेत. आचारसंहिता लागू असताना शहरातील गल्लीबोळातील भिंतीवर कमळाचे चित्र भाजप रंगवत आहे. आजही हे ‘विद्रुपीकरण’ सुरू आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आवर घालून दोषींवर योग्य ती कारवाई तातडीने करावी, अशी मागणी आम्ही यावेळी केली.
भाजपचे हे षडयंत्र
काँग्रेसचे नेते मोहन जोशी म्हणाले, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या की आदर्श आचारसंहिता लागू होते. निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहते. आचारसंहितेचा भंग केल्यास थेट कारवाईला सामोरे जावे लागते. त्यानुसार भाजपवर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्या पक्षाच्या चिन्हाचे जागोजागी रंगवलेले चित्र ७२ तास उलटल्यानंतरही कायम आहे. शहरात ठिकठिकाणी असे प्रकार पहायला मिळत आहे. काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून निवडणुका लढवण्याचे भाजपचे हे षडयंत्र आहे. ते आम्ही याआधी कसबा निवडणुकीत पाहिले होते. तरीपण विजय आमचाच झाला होता. हे भाजपने लक्षात ठेवावे, असेही ते यावेळी म्हणाले.
गुढीपाडव्याला हिंदुत्वाची गुढी उभारण्याचे आवाहन
मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांची माहिती
मुंबई दिनांक १९ मार्च २०२४
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई भारतीय जनता पार्टी तर्फे ६ एप्रिल रोजी चारशे कार्यक्रमाचे आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला “अब की बार चारसो पार” हा नारा बुलंद करण्याचे नियोजन आहे. तसेच हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडव्या दिवशी राम मंदिराच्या निर्माणाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाची गुढी उभारून स्वागत करूया असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले.
मुंबई भाजपा कोअर कमिटीची बैठक रंग शारदा येथे पार पडली. त्यानंतर आ. ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या बैठकीला कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आ. अतुल भातखळकर, आ. प्रविण दरेकर, आ. प्रसाद लाड, आ. मनीषाताई चौधरी, आ. अमित साटम, आ. योगेश सागर, आ. सुनील राणे, महामंत्री संजय उपाध्याय उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, मुंबईतील महायुतीचे सहाही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याकरिता आवश्यक ते कार्यक्रम राबवण्यासंबंधी चर्चा बैठकीत झाली. महायुतीच्या प्रचारात आम्ही सर्वात पुढे राहू.
गुढी पाढव्याला हिंदुत्वाची गुढी उभारून १ हजार ठिकाणी बैठका आणि जनसभांचे नियोजन केले आहे. सीएए च्या समर्थनात भाजपा मैदानात उतरणार आहे.
बरोबरीने १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान संरक्षक भाजपा कार्यकर्ता अशा आशयाचे १४ महत्त्वाचे मेळावे तसेच १४० वस्त्यांमध्ये संवादाचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत. रामनवमीनिमित्त कल्पक कार्यक्रम तसेच मुंबईतील वस्त्यांमध्ये कार्यक्रम घेण्यात येतील. महावीर जयंती आणि हनुमान जयंती या निमित्तानेही कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, एनडीए मजबुत होतेय, मोदीजींचा परिवार मोठा होतोय आणि मुंबईसह राज्यात इंडी आघाडीला पराभूत करणारी महाशक्ती महायुतीत परावर्तित होतेय याचा आम्हाला आनंद आहे.
पळपुटेपणाची लक्षणं उबाठा सेनेची
पळवणं आणि पळणं ही दोन्ही पळपुटेपणाची लक्षणं उबाठा सेनेची आहेत. उबाठा सेनेला आव्हान आहे की, हिंमत असेल तर निवडणुकीत एकटे आमच्यासमोर या.आपल्या स्वार्थासाठी वडिलांचे विचार, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व उद्धवजींनी सोडले, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी अहमद पटेल ते शर्जील उस्मानी यांच्यासमोर मुजरा केला, त्यांना हिंदुत्ववादी मतदारांनी झिडकारलंय, हे सत्य चित्र आहे. स्वतःच्या पक्षासाठी गर्दी जमू शकत नाही म्हणून आता २२ पक्षांना एकत्र घेऊन शिवाजी पार्कवर गर्दी जमवावी लागते, अशी उद्धवजींची आजची अवस्था आहे अशीही टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केली.
राज ठाकरेंशी युती करून भाजपा कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार ? : अतुल लोंढे
राज ठाकरे-भाजपा युती उत्तर भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार.
मुंबई, दि. १९ मार्च
भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेऊन भाजपाने उत्तर भारतीय बांधवांचा फक्त विश्वासघातच केला नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे. उत्तर भारतीय बांधवांना लाठ्या काठ्यांनी मारणा-या राज ठाकरेंना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केलेला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे म्हणाले की, छट पुजेला विरोधी करणारे, उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्या तसेच नेहमी उत्तर भारतीयांचा द्वेष करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेला भारतीय जनता पक्ष निवडणुकीसाठी महायुतीत घेत आहे, हा तमाम हिंदी भाषकांचा अपमान आहे, त्यांच्याशी गद्दारी आहे. ‘अब की बार ४०० पार’ च्या वल्गणा करणाऱ्या भाजपाला ‘एरा गैरा नत्थू खैरा’, ज्या पक्षाकडे एखादा आमदार आहे त्यांना सोबत घेण्याची गरजच का पडावी? ज्या उत्तर भारतीयांना मनसेने मुंबईतून हुसकावून लावले त्यांच्या गृहराज्यात भाजपाला मते मागण्याचा अधिकार राहिलेला नाही. राज ठाकरेंच्या मनसेशी युती करण्याची वेळ भाजपावर आली याचाच अर्थ भाजपाने महाराष्ट्रात तरी लढाईच्या आधीच पराभव मान्य केल्यासारखे आहे.
बाँड जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करून पाडले, त्यानंतर उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष व चिन्हही चोरले, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाही फोडला, एवढे करूनही भाजपाला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुक अवघड जात आहे हे दिसल्यानेच त्यांना ठाकरेंच्या विरोधात दुसरा ठाकरे उभा करावा लागतो एवढी नामुष्की भाजपावर आलेली आहे. भाजपा लोकसभा जिंकण्यासाठी काहीही करो परंतु त्यांचा पराभव अटळ आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.
