पुणे- महापालिकेत अनेक शासकीय अधिकारी येतात आणि जातात,त्याचे फारसे कोणाला काही वाटत नाही पण काही अत्यंत मोजके अधिकारी लक्षात राहतात,काहींच्या बदली होण्याने अनेकांना हायसे वाटते तर काहींच्या बदली होण्याने अनेकांना..हि बदली व्हायला नको होती असे वाटते काळ संध्याकाळी झालेल्या अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या बदलीने तर अनेकांना वाईट वाटले आहे,चांगले अधिकारी मिळत नाहीत आणि मिळाले तर फार काळ ते इथे राहत नाहीत आणि अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी त्यांच्या विकास कामांच्या स्वप्नांवर,प्रकलापांवर आभाळ कोसळण्याची शक्यता निर्माण होते. किमान ३ वर्षे अधिकाऱ्याला काम मिळायला हवे असा संकेत असताना अनेक अधिकारी ४/५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ राहिल्याची उदाहरणे असताना अवघ्या १४ महिन्यात ढाकणे यांच्या बदलीने त्यांची शहर विकासाच्या कामाची दिशा जणू हरवणार आहे. महापालिकेत येणारे एक बातमीदार राजू हिंगे यांनी या बदलीबाबत एक लक्षवेधी पोस्ट सोशल मीडिया वर टाकली आहे..अगदी त्याच पोस्टने अनेकांना आपल्या भावना व्यक्त कराव्याश्या वाटू लागल्या आहेत

विकास ढाकणे यांनी वाहतूक समस्येला मनावर घेतले होते, यावर अभ्यास करायला त्यांनी आल्या आल्या सुरुवात केली ६ महिने नियोजनात घालविले आणि १५ रस्त्यांचे नियोजनासाठी हालचालींना प्रारंभ केला,रस्त्यावरील अनावश्यक,लोकांना उपयुक्त नसणाऱ्या बाबी हटविणे,मोठं मोठाले रस्ते करणे तसेच पायी चालायला प्रशस्त जागा असू देणे आणि रस्तोरस्ती पार्किंग ची समस्या सोडविणे यांना प्राधान्य देऊन त्यांनी नियोजनाला प्रारंभ केला खडकी येथे एका रस्त्याचे काम केले.गणेश खिंड रस्त्यावर काम सुरु केले, रुंदीकरणाला त्यांनी प्राधान्य दिले.
क्रीडासंकुलांची दुरवस्था त्यांना मानवली नव्हती, पुण्यासारख्या शैक्षणिक माहेर घरातून पदकांवर पदके मिळविणारे खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडा संकुले हि राष्ट्रीय स्तरावर वा राज्य स्तरावर नामांकित पुरस्कार प्राप्त अशा खेळाडूंना सोपवून त्यांच्याकडून तरुणाईला उत्कृष्ट क्रीडापट्टू या संकुलातून कसे करता येईल यासाठी त्यांचे नियोजन सुरु झाले होते…पण आता हे सारे अधुरे सोडून त्यांना बदली च्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे.
ढाकणे एक सकारात्मक अधिकारी, अडचणीतून मार्ग काढून सुकरतेकडे नेणारे अधिकारी अशी प्रतिक्रिया अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या कडून मिळते आहे आणि नागरिकांकडूनही तसेच सांगितले जाते आहे. रामटेकडी औद्योगिक वसाहत येथे राहणारे आनंद उत्तरकर म्हणाले,रामटेकडी, हडपसर जवळील रस्त्याच्या अपूर्ण कामाबाबत आपण अतिरिक्त आयुक्त श्री ढाकणे यांची भेट घेतली होती, ढाकणे यांना आम्ही गेल्या गुरुवारी त्यांच्या कार्यालयात भेटलो.६ महिने रखडलेल्या कामाबाबत आता नव्याने पुन्हा इतका चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा नव्हती पण मिळालेला प्रतिसाद एक सुखद आश्चर्याचा धक्का होता. लवकरच रस्ता पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ते 10 दिवसांत पूर्ण झालाही.त्यामुळे 6 महिन्यांहून अधिक काळ प्रलंबित असलेले काम 10 दिवसांत पूर्ण झाले. नागरिकांप्रती असलेली अशी संवेदनशीलता वाखाणण्याजोगी आहे आणि त्यामुळे व्यवस्थेवरचा विश्वासही निर्माण होतो. हिलसाईड सोसायटी आणि रामटेकडी औद्योगिक वसाहतीच्या वतीने मी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचे त्यांच्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार मानतो.

स्वतः ढाकणे काय म्हणाले,’
आपल्या सगळ्यांचे प्रेम बघून मन खूप भरून आले.रस्ते,शाळा,हॅास्पिटल,क्रीडांगणे, उद्याने,ॲाडिटोरियम यांचा खूप विचारपूर्वक योजनाबध्द कार्यक्रम हाती घेतला होता.काल संध्याकाळी सावरकर भवनला भेट दिली.२ नवीन कोर्ट PMC ला मिळतील असा शब्द उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी रविवारी दिला होता.तिथे नियोजन केले. नंतर बालगंधर्वला गेलो.इतका सुंदर कायापालट होतोय पाहून खूप आनंदी होतो. VIP room,make up room,नवीन पडदा,लाईट्स,साऊंड.खूप बरं वाटलं.VIP room मध्ये बालगंधर्वला आतापर्यंत झालेल्या महत्वाच्या अविस्मरणीय प्रसंगांचं कोलाज करायचं ठरलं.टीव्हीची साईज,मेक अप रूम मध्ये स्टेजवरचं लाईव्ह प्रक्षेपण,प्रत्येक रूममध्ये 5 star हॅाटेलसारखं पासवर्ड/कार्ड लॅाक,गोदरेज तिजोरी,AC चे मॅाडेल अगदी कोहलर/टोटो चे टॅायलेट फिटींग्स लागतायेत.
घरी आलो तर ॲार्डर….मिळाली बदलीची…
असो सरकारी नोकरी म्हणजे हे सगळं आलंच.
देवाने MPSC नंतर UPSC त उत्तीर्ण केलं हाच खूप मोठा आशीर्वाद.जिकडे मिळेल तिकडे जाऊ.पोलीस,रेल्वे,केंद्रीय मंत्रालय,राज्य मंत्रालय,PCMC,PMC सगळीकडे खूप काही करायला मिळालं.सर्वोत्कृष्ट परिक्षाधीन अधिकारी पासून,तीन वेळेस केंद्रीय मंत्रालयाच्या पुरस्कारापासून तर महाराष्ट्र शासनाचा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रथम पुरस्कार सगळे काही मिळाले.चांगले वरिष्ठ भेटले.पण तुमच्या सारखे जिवाभावाचे मित्र भेटले हे खूप मोठं भाग्य.असाच स्नेह ठेवा.पुण्यात घर आहे.कुठेही गेलो तरी पुण्यासाठी काम चालूच ठेवू.जिकडे जाऊ तिकडे सिस्टीम आणि आपला देश चांगला करण्याचा प्रयत्न करू
सिव्हिल सर्व्हिसेसचे 2008 बॅचचे अधिकारी विकास ढाकणे यांनी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार अवघ्या १४ महिन्यापूर्वी स्वीकारला . पीएचडी व्यतिरिक्त त्यांनी एम.ए. (अर्थशास्त्र), बी.एसी. (कृषी), आणि एल. एल. बी. पदवी प्राप्त केलेली.या अगोदर ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्री यांचे विशेष कर्तव्य अधिकारी म्हणूनही काम केले आहे.श्री. ढाकणे यांना विविध प्रशासकीय पदांवर काम करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या सेवेत त्यांनी भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्र्याचे खाजगी सचिव म्हणून काम केले आहे आणि रेल्वेच्या मुंबई, अहमदाबाद, पुणे, सोलापूर विभागांवर सहायक आणि विभागीय सुरक्षा आयुक्त या पदांवर उत्कृष्ट काम केले आहे.त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल, त्यांना 2014, 2018 आणि 2019 मध्ये महासंचालक पदक (DG ) पुरस्कार आणि 2021 मध्ये ‘राजीव गांधी प्रशासकीय उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. राजपथ, दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये त्यांनी परेड कमांडरचा सन्मान पटकावला आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट प्रोबॅशनरी अधिकारी पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.वाचन, ट्रेकिंग आणि दिग्दर्शन ही त्यांची विशेष आवड आहे. त्यांनी आत्तापर्यंत पाच नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.याशिवाय विद्यापीठ स्तरावर ऍथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.