पुणे -राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या बोर्ड ऑफ ट्रस्ट वर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांची निवड झाली आहे. केंद्र शासनाकडून ही नियुक्ती करण्यात आली आहे. बोर्ड ऑफ ट्रस्ट वर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये राजेश पांडे यांचा समावेश आहे.
भारत सरकारने राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या (NBT) सन २०२४ साठी १४ सदस्यांची बोर्ड ऑफ ट्रस्ट ची नावे जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातून भाजपा नेते तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. देशासह जगभरात ओळख असणाऱ्या आणि वर्ल्ड बुक फेअर सारख्या महोत्सवांचा माध्यमातून जगभरातील साहित्य विश्वाशी जोडलेले असलेल्या राष्ट्रीय पुस्तक न्यासाशी जोडले जाण्याची संधी यानिमित्ताने पांडे यांना मिळणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत १९५७ मध्ये वाचनाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सुरू करण्यात आलेली राष्ट्रीय पुस्तक न्यास ही संस्था आहे. या संस्थेची निर्णय प्रक्रिया बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या माध्यमातून पार पडते. ही संस्था देशभर विविध पुस्तक मेळावे आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून पुस्तक वाचनाला प्रोत्साहन देते, तसेच विविध चर्चासत्रे, कार्यशाळा, पॅनल चर्चा, पुस्तक प्रकाशन आदि उपक्रम राबवत असते. या संस्थेसोबत पुण्यामध्ये राजेश पांडे यांनी आयोजित केलेला ‘पुणे पुस्तक महोत्सव’ हा यशस्वी महोत्सव ठरला होता. वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा प्रसार करतानाच या महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळे विश्वविक्रम ही करण्यात आले होते. संस्कृती रुजवण्यासाठी पुण्यासह साहित्य संमेलनात देखील या महोत्सवाचा महत्वाचा वाटा राहिला होता. या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची ठरते.
नॅशनल बुक ट्रस्ट (NBT) बोर्ड ऑफ ट्रस्टीजवर नियुक्ती झाल्यामुळे मला आनंद झाला आहे! यासाठी मी केंद्रीय मंत्री मा.श्री.धर्मेंद्र प्रधानजी आणि एनबीटीचे आभार मानतो की, त्यांच्यामुळे मला ही संधी मिळालेली आहे. माझ्या सर्व अनुभवाचा उपयोग करून ट्रस्टमध्ये अधिकाधिक इनोव्हेटिव्ह योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल. महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीचा जागर जगाच्या पातळीवर व्हावा यासाठी आणि पुण्याचाही नावलौकिक तसेच पुण्याचा पुस्तक महोत्सव देखील जागतिक पातळीवर नेण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. महाराष्ट्राच्या साहित्यिक लँडस्केपसाठी अधिक संधी शोधून काढण्याची आणि पुणे पुस्तक महोत्सवाची वाढ करण्याची ही एक उत्तम संधी आहे असे मी मानतो.-राजेश पांडे