रायगडावरील मेघडंबरीची हुबेहूब प्रतिकृती
पुणे : ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे ब्रीद असणाऱ्या आणि समाजातील बहुजनांसाठी शिक्षणाचे व्रत घेतलेल्या शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या प्रांगणातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचे अनावरण करण्यात आले. कोल्हापूरचे श्रीमंत स्वर्गीय शाहू महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या संस्थेच्या प्रांगणात हा पुतळा असून रायगडावरील मेघडंबरीची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्या हस्ते मेघडंबरीचे उद्घाटन झाले. यावेळी संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष विलास गव्हाणे, कमल व्यवहारे आणि सर्व सभासद यावेळी उपस्थित होते. विशाल ताजनेकर आणि नागेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मेघडंबरी साकारण्यात आली.
अण्णा थोरात म्हणाले, श्री शिवाजी मराठा सोसायटी १९१८ पासून बहुजन समाजाला शैक्षणिक संधी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांनी संस्थेची स्थापना थोर योद्धा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मरणार्थ पुण्यात केली. त्याचे प्रतीक म्हणून शिवरायांचा पुतळा १६ एप्रिल १९७१ साली संस्थेच्या प्रांगणात स्थापित करण्यात आला. याच पुतळ्याचे नूतनीकरण करीत त्यावर मेघडंबरी साकारण्यात आली आहे.