मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांचे प्रशिक्षणार्थींना आवाहन
पुणे, दि. १८ मार्च २०२४: ‘महावितरणमध्ये गेल्या वर्षभरात वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच ग्राहकसेवेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा पुढे निश्चितच फायदा होईल. मात्र आयुष्यभर शिकाऊ वृत्ती कायम ठेऊन कौशल्य विकासासाठी ज्ञान वाढवत राहा. केवळ ते आज उपयोगाचे नाही म्हणून दुर्लक्ष करू नका. आत्मसात केलेले हेच ज्ञान भविष्यात उत्तुंग भरारी घेण्यास उपयुक्त ठरेल’, असे मत मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सोमवारी (दि. १८) व्यक्त केले.
पुणे परिमंडलामध्ये अप्रेंटिस म्हणून एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २० विद्युत अभियंत्यांना रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. कार्यक्रमाला सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) ज्ञानदा निलेकर, प्रशिक्षणाचे समन्वयक डॉ. संतोष पाटणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्युत अभियांत्रिकीची पदवी व पदविका उत्तीर्ण असलेल्या या २० प्रशिक्षणार्थींना गेल्या वर्षभरात पुणे परिमंडलाच्या विविध कार्यालयाद्वारे उपकेंद्र, वीजवाहिन्या, वितरण रोहित्रांची देखभाल व दुरुस्ती, वीजजोडण्या व मीटरची तपासणी, भूमिगत वीजवाहिन्यांची चाचणी, ग्राहक संवाद, वीजसुरक्षा, ऑनलाइन ग्राहकसेवा, सौर ऊर्जा प्रकल्प, विद्युत वाहनांचे चार्जिंग स्टेशन आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.
मुख्य अभियंता श्री. पवार म्हणाले की, ‘विजेसारख्या तांत्रिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवायचे असेल तर स्वतःचे कौशल्य व ज्ञान विकसित करणे अतिशय महत्वाचे आहे. वीजक्षेत्र हे सेवा क्षेत्र आहे. त्यामुळे केवळ पैसा हेच आयुष्याचे ध्येय न ठेवता या क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी व सेवा कामातून माणसं कमावण्याचे ध्येय ठेवा. यश व समाधान दोन्ही नक्की मिळेल’.
या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी विद्युत अभियंत्यांनी प्रातिनिधिक मनोगतामध्ये ‘वीजक्षेत्रातील प्रत्यक्षात तांत्रिक माहिती व ज्ञान मिळाल्याने आत्मविश्वास वाढला. सकारात्मकता आली. अभियंता व कर्मचाऱ्यांची अखंड सुरू असलेली ग्राहकसेवा जवळून पाहता आली. सांघिक कामाचा प्रत्यय आला’, असे मत व्यक्त केले.