पुणे -काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर,आबा बागुल, अरविंद शिंदे, मोहन जोशी अशी इच्छुकांची जंत्री असताना…जर लोकसभेला वसंत मोरे अपक्ष म्हणून उभे राहिले तर भाजपाची नाही तर मोहन जोशींची मते खातील असे विधान आज पत्रकार परिषदेत मंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी केल्याने,काँग्रेसची उमेदवारी यंदा देखील खेचून आणण्यात मोहन जोशी यशस्वी होणार किंवा कसे याबाबत राजकीय चर्चेला आता उधाण येऊ पहाते आहे.धंगेकर -मोहोळ अशी सरळ लढत माध्यमांनी रंगविली आहे तर आबा बागुलांनी निष्ठेचा रंग आस्मानी चढविला आहे. अशा स्थितीत चंद्रकांतदादांनी मोहन जोशींचे नाव घेऊन धुराळा उठविला आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवाराने विचार करूनच निवडणुकीला उभे राहावे.’ अशा शब्दात देखील चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसच्या या इच्छुकांना चिमटा काढला आहे.
पुणे, बारामती, शिरूर लोकसभा क्लस्टरच्या प्रमुख पदाची जबाबदारी पाटील यांच्याकडे आहे. त्यानुसार, त्यांनी सोमवारी पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. दीपक मानकर,संदीप खर्डेकर,श्रीनाथ भीमाले,अजय भोसले आदि यावेळी उपस्थित होते.यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले,”भाजपसाठी पुणे लोकसभेची निवडणूक अवघड आहे, असा विरोधकांचा समज आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या सेनेची लाखभर मते कमी झाली, तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची दीड लाख मते वाढणार असल्याने आमचे मताधिक्य चांगलेच वाढेल. म्हणून विरोधी पक्षाच्या उमेदवाराने विचार करूनच निवडणुकीला उभे राहावे.
पाटील म्हणाले, ‘राज्यातील ४८ जागा भाजप जिंकणार असून मोदी फॅक्टर अद्यापही कायम आहे. मी स्वतः गणवेश बदलून तुमच्यासोबत येतो, आपण १०० लोकांना भेटून सर्वेक्षण करू. त्यापैकी ९० जणांकडून मोदी यांचेच नाव येईल. यावरूनच मोदी फॅक्टर किती लोकांपर्यंत पोचला आहे, हे तुम्हाला कळू शकेल. इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही.
सगळे पैसे धनादेशाने आले आहेत. त्यामुळे विरोधकांनी किती आरोप केले तरी महाराष्ट्रातील जनतेला त्यासंबंधीचे वास्तव माहीत आहे. ‘वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढल्यास भाजपला किती फटका बसेल, या प्रश्नावर पाटील यांनी भाजपला कमी फटका बसेल, मात्र जास्त फटका मोहन जोशी यांना बसेल, असे सांगत मोहन जोशी हेच विरोधी पक्षाचे उमेदवार असतील, असे अप्रत्यक्षपणे जाहीर केल्याने सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या.भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारीची चाचपणी सुरू आहे. आत्तापर्यंत तीन उमेदवारांबाबत भाजपकडून विचार करण्यात आला आहे. मात्र सोलापूरमध्ये सारे काही अलबेला नसल्याचे पाटील यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या मतदारसंघातील उमेदवाराबाबत लक्ष घातले आहे. ते प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून घेत असल्याने अनेकांची झोप उडाली असून फडणवीस योग्य उमेदवार देतील, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.सोलापूरच्या उमेदवाराबाबत बोलताना पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. त्याचवेळी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरु आहे का ? याविषयी पाटील यांनी “देवेंद्र फडणवीस यांना राजकारणामध्ये जितके लांब दिसते, तितके कोणालाच दिसत नाही. ते कधीच चुकीचा पत्ता काढत नाहीत’ असे विधान केले.
कोल्हापूर मध्ये चारही जागावर मी निवडणुक लढवून जिंकण्यास पात्र असताना देखील, गृहमंत्री अमित शाह यांनी मला भविष्यातील गणिते करुन पुण्यातून निवडणुक लढण्यास सांगितले त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी मला शिकवण देऊ नये. फडणवीस असे डॉक्टर झाले की त्यांना कोणतेही निदान पटकन हाेते व त्यावर लगेच इंजेक्शन देता येते. त्यामुळे इतरजण त्यांना दबकून असतात. फडणवीस यांना जेवढे लांबचे दिसते तितके हल्ली काेणाला दिसत नाही ते कधी चुकीचा पत्ता टाकत नाही. रक्ताचे नात्याचे घरात देखील मतभेद असतात. ते मतभेद काेणीतरी त्या कुटुंबाला सांगून संपवू शकताे. पवार कुटुंबाला एकमेकाला काय मते व्यक्तशी करु वाटतात याबद्दल मी भाष्य करणार नाही.