Home Blog Page 1150

महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित, दोन दिवसात निर्णय: नाना पटोले

भारतीय जनता पक्ष घाबरल्यानेच महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान.

१० वर्षात देश बरबाद करणाऱ्या भाजपाला सत्तेतून खाली खेचने हेच मविआचे लक्ष्य.

मुंबई, दि. २१ मार्च
महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा झाली असून वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, माकपा या मित्रपक्षांशी बोलणी झालेली आहे, वंचितसोबतही आजही चर्चा झाली आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवारही जवळपास निश्चित झाले आहेत. सर्व मित्र पक्षांशी चर्चा करून महाविकास आघाडीचे जागावाटप आणि उमेदवार दोन तीन दिवसात जाहीर होतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.

टिळक भवन मध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आज सकाळी चर्चा झाली. या चर्चेत काँग्रेसकडून मी तर शिवसेनेकडून खासदार संजय राऊत उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलणी केली. जागा वाटपाबरोबर प्रचार सभा व इतर मुद्द्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. राज्यातील सर्व ४८ जागा महाविकास आघाडीत लढवत आहे. आघाडीतील सर्व मित्रांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. चर्चेनंतर काही जागांची अदलाबदल होऊ शकते आणि याबाबतचा निर्णय दोन दिवसात होईल.
भारतीय जनता पक्षाने मागील १० वर्षात देश बरबाद केला आहे. लोकशाही, संविधानाला न जुमानता मनमानी कारभार केला आहे. महाविकास आघाडी मजबूत करून भाजपाच्या या अत्याचारी सरकारला सत्तेतून खाली खेचणे हेच लक्ष्य आहे. राहुल गांधी यांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला त्या आसुरी शक्तीविरोधात काँग्रेसचा लढा आहे. परंतु भाजपाकडे मुद्देच नसल्याने त्यांनी शक्ती शब्दाचा विपर्यास केला आहे. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत असताना, देशभरात महिला अत्याचार होत असताना भाजपा व मोदींना नारी शक्तीची आठवण का झाली नाही आजच नारी शक्ती कशी आठवली? गुजरातमध्ये एकाच टप्प्यात मतदान होत आहे, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेण्याची काही गरज नव्हती परंतु भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेतले जात आहे.
लोकसभा निवडणूक लढवणार का, या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मी काँग्रेस पक्षाचा एक शिपाई आहे, पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य आहे. २०१९ मध्ये पक्षाने आदेश देताच नागपूर लोकसभा निवडणूक लढवली होती, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश प्रवक्ते भरतसिंह आदी उपस्थित होते.

अभिनेत्री आरती पुरी यांची पुढची गब्रू गँग 26 एप्रिलला रिलीज होणार

अमृतसरच्या दोलायमान रस्त्यावर डुबकी मारा, जिथे प्रत्येक पतंगप्रेमीचे स्वप्न एका प्रतिष्ठित बक्षीसभोवती फिरते – हाय-फ्लाय काइट कप. हृदयस्पर्शी गाणी, तीव्र स्पर्धा आणि आनंददायी प्रेमकथेने भरलेल्या पंजाबच्या रंगीबेरंगी गल्ल्यांमधून आनंददायी प्रवासात आमच्यासोबत सामील व्हा.
गब्रू गँग तुम्हाला एका 8 वर्षांच्या मुलाच्या असाधारण प्रवासात घेऊन जाते ज्याची पतंग उडवण्याची आवड त्याला भारतातील प्रथम क्रमांकाचा पतंग उडवणारा बनण्यास प्रवृत्त करते.
इंटरग्लोब डेव्हलपमेंट्स, ओम सूरज प्रॉडक्शन, किंगमेकर्स एंटरटेनमेंट आणि अमृतसर टॉकीज यांच्या बॅनरखाली, गब्रू गँग २६ एप्रिल २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दूरदर्शी समीर खान दिग्दर्शित, अशोक गोयंका, आरती पुरी यांच्या गतिमान त्रिकूटाने निर्मित , आणि समीर खान, विवेक सिन्हा, गबरू गँग सोबत अभिषेक दुहान, सृष्टी रोडे, अवतार गिल, आरती पुरी, अभिलाष कुमार आणि मुकेश भट्ट यांच्या प्रतिभावान समूहात आहेत.
टीझर पतंग उडवण्याच्या स्पर्धांचे उत्साहवर्धक वातावरण दाखवते, जिथे प्रत्येक सहभागी अतुलनीय उत्साहाने त्यांचे कौशल्य दाखवतो. क्लिष्ट युक्तीपासून ते आकाशातील मोक्याच्या लढाईपर्यंत, प्रत्येक क्षण एड्रेनालाईन-पंपिंग ॲक्शन आणि नेल-बिटिंग सस्पेन्सने भरलेला असतो.

अमृतसरच्या गजबजलेल्या रस्त्यावर, जिथे प्रत्येक पतंगप्रेमी प्रतिष्ठित हाय-फ्लाय कप जिंकण्याचे स्वप्न पाहतो, तिथे एक तरुण मुलगा गर्दीतून उभा राहतो. भेटा राजबीर सलुजा, एक 8 वर्षांचा विद्वान, ज्याच्या पतंग उडवण्याच्या आवडीची सीमा नाही. त्याचे विश्वासू मित्र अर्शद आणि उदय यांच्यासोबत, राजबीर एका उल्लेखनीय प्रवासाला सुरुवात करतो ज्यामुळे त्याला पतंग उडवण्याच्या यशाच्या शिखरावर पोहोचते.
दलेर मेहंदी, सुखविंदर सिंग, अल्तमश फरीदी, मंज म्युझिक आणि देव नेगी यांसारख्या गायकांच्या उत्कृष्ट पंक्तीसह, गबरू गँग याआधी कधीही नसलेल्या संगीतमय गाण्यांचे वचन देते. आत्मा ढवळून टाकणारे सुर आणि पाय-टॅपिंग बीट्स तुम्हाला अशा जगात घेऊन जाऊ द्या जिथे प्रत्येक गाणे जीवनाचा उत्सव आहे.

दिग्दर्शक समीर खान यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण टीमच्या सर्जनशील तेजाने, गबरू गँग आकर्षक कथाकथन, चित्तथरारक व्हिज्युअल्स आणि भावपूर्ण संगीत यांचे परिपूर्ण मिश्रण एकत्र आणते. सुनील पटेल आणि शैलेश अवस्थी त्यांच्या लेन्सद्वारे पंजाबचे सार टिपत आहेत आणि समीर खान आणि अतित जयदेव एडिटिंग रूममध्ये जादू विणत आहेत, सिनेमाच्या जादूने मंत्रमुग्ध होण्याची तयारी करतात.

राजबीर आणि त्याचे मित्र त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करत असताना हसण्यासाठी, रडण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी तयार व्हा. पॅनोरमा स्टुडिओद्वारे वितरित. हा चित्रपट 26 एप्रिल 2024 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

भावगंधर्वांनी जागवल्या लतादीदींच्या स्वरमयी आठवणी

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ विभावरी आपटे-जोशी यांना ‘दीदी पुरस्कार’ प्रदान
पुणे : “लतादीदीचा मी बाळ होतो. शेवटपर्यंत तिने माझी काळजी घेतली. तिच्या कंठात साक्षात ईश्वराचा अंश होता. वयाच्या पाचव्या वर्षापासून ती बाबांच्या सानिध्यात गात होती. विविध भाषांतील लहेजा, शब्द समजून घेत ती सर्व प्रकारची गाणी गायची. तिने गायलेली सर्वच गाणी अजरामर झालेली आहेत. तिच्यात संवेदनशीलपणा होता. सामाजिक जाणीव होती. लतादीदीच्या जाण्याने संगीत सागरातील एक हिमनग कोसळला आहे. दोन वर्षांनंतरही मी पूर्णपणे सावरलेलो नाही, अशा शब्दांत लतादीदींचे बंधू भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या बहिणीविषयीच्या आठवणी जागवल्या.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने संगीत क्षेत्रातील सेवेबद्दल दिला जाणारा ‘दीदी पुरस्कार’ ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्या हस्ते गायिका विभावरी आपटे-जोशी यांना प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात आयोजित कार्यक्रमात भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर, प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, भारती मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, संयोजन समिती सदस्य व गायिका मनीषा निश्चल, निश्चल लताड आदी उपस्थित होते.
यावेळी सादर झालेल्या ‘विश्वमोहिनी लता दीदी’ या सांगीतिक मैफलीने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह गायक राहुल देशपांडे, गायिका विभावरी आपटे-जोशी, मनीषा निश्चल, प्राची देवल, गायक श्रेयस बेडेकर यांनी लतादीदींची अजरामर गाणी सुरेल पद्धतीने सादर केली.
श्रीरामचंद्र कृपाळू भजमन या गीताने मैफलीची सुरुवात झाली. त्यांनतर लग जा गले… एक प्यार का नगमा है… रुक जा रात ठहर जा रे चंदा… आज कल पाव जमी पर पडते नहीं मेरे… अखेरचा हा तुला दंडवत… तू तेव्हा तशी… ये दिल और उनकी निगाहो के साये… अशा अजरामर गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्रोत्यांमधून प्रत्येक गाण्यानंतर ‘वन्स मोअर’ची दाद मिळत होती.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याविषयी हृदयनाथ मंगेशकरांनी लिहिलेल्या आठवणींचे वाचन करत मास्टरजींच्या काही चीजा सादर केल्या. तसेच मंगेशकर आणि देशपांडे कुटुंबियातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. लतादीदींची काही गाणी व त्यातील बारकावे, त्यावेळचे किस्से मंगेशकर यांनी सांगितले. 
रवींद्र खरे यांचे ओघवते निवेदन, सिंथेसायझरवर विवेक परांजपे व अमृता ठाकूरदेसाई, तबल्यावर डॉ. राजेंद्र दूरकर व विशाल गंड्रतवार, बासरीवर निलेश देशपांडे, सतारीवर प्रसाद गोंदकर, ऑक्टोपॅडवर ऋतुराज कोरे, गिटारवर विशाल थेलकर यांनी साथसंगत केली.

लोकल तंत्रज्ञान ग्लोबल व्हावे -पद्मश्री डाॅ.प्रल्हाद रामराव

‘एमआयटी एडीटी’त सहाव्या राष्ट्रीय परिषदेला प्रारंभ

पुणेः भारतातील तंत्रज्ञानाने सध्या जगाला भुरळ घातली आहे. चांद्रयान सारख्या अंतराळ मोहीमा, जगातील सर्वांत मजबूत मिसाईल, विविध प्रकारचे ट्रोन्स बनवून आपल्या शास्त्रज्ञांनी जगाचे लक्ष आकर्षित केले आहे. भारत आता सॉफ्टवेअरसह हार्डवेअर क्षेत्रातही स्वावलंबी बनला आहे. त्यामुळे या स्पर्धात्मक युगात आपल्याकडील लोकल तंत्रज्ञानाला प्रचंड मागणी मिळत असल्याने ते ग्लोबल व्हायला हवे, असे मत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे(डीआरडीओ) माजी संचालक व एस-व्यासा विद्यापीठ बंगळुरूचे प्र.कुलगुरू पद्मश्री डाॅ.प्रल्हाद रामराव यांनी मांडले.

        ते एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठात ‘इनोव्हेटिव्ह ग्लोबल टेक्नॉलॉजी ट्रेंड्स’ या विषयावर आधारीत सहाव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. याप्रसंगी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डाॅ.पराग काळकर, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहीत दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.विरेंद्र भोजवानी आदी उपस्थित होते. 
डाॅ.रामराव पुढे म्हणाले की, भारतात सध्या अणुऊर्जेवर मोठ्या स्थरावर संशोधन चालू आहे. अणू उर्जेचा सकारात्मक वापर करून अगदी तालुका स्तरावर ऊर्जा निर्मितीतून गावांच्या ऊर्जेच्या गरजा भागवण्याचे उद्दिष्ट आता शास्त्रज्ञांचे, असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 
प्रा.डाॅ.काळकर यांनी याप्रसंगी आपल्या भाषणातून टेक जायंट्स, एआय, मेटाव्हर्स तंत्रज्ञानाचे फायदे व तोट्यांबद्दल मत व्यक्त केले. तसेच त्यांनी मेक इन इंडिया सारख्या भारत सरकारच्या योजनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती रुजल्याचेही स्पष्ट केले.
यावेळी बोलताना प्रा.डाॅ.सुनीता कराड म्हणाल्या, एमआयटी एडीटी विद्यापीठ दरवर्षी ही राष्ट्रीय परिषद आयोजित करते. यंदा या परिषदेचे सहावे वर्ष असून त्यामाध्यमातून आत्तापर्यंत ६०+ स्टार्टअप्स व २००० हून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार देण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. यंदा २० हून अधिक विषय घेवून विद्यापीठात वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळेला पुढील तीन दिवस ही परिषद पार पडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  दीपप्रज्वलन व सरस्वती पूजेद्वारे सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डाॅ.सुनीता कराड यांनी तर आभार डाॅ.रामचंद्र पुजेरी यांनी मानले. तर डाॅ.स्नेहा वाघटकर व डाॅ.स्वप्निल शिरसाठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पसायदान द्वारा कार्यक्रमाची सांगता झाली. 

तंत्रज्ञानाच्या धोक्यांपासून सावध रहा-प्रा.डाॅ.कराड-यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा.डाॅ. मंगेश कराड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी विकसित भारत@2047 संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेत संशोधकांचा सर्वांत मोठा हातभार लागणार आहे. भारतातील युपीआय, आधार सारख्या योजना आता फ्रान्ससारख्या देशाने स्विकारल्या आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस एआय सारख्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करत असताना त्यातील डिफेक सारख्या धोक्यांपासून आपण सावध रहायला हवे, असा इशाराही त्यांनी दिला.

वीजग्राहकांकडे अद्यापही १२४ कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी-२० दिवसांमध्ये १८ हजार ९५२ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

पुणे, दि. २१ मार्च २०२४: पुणे परिमंडलातील ५ लाख ८७ हजार २८६ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही १२४ कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे नाईलाजास्तव गेल्या २० दिवसांमध्ये १८ हजार ९५२ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ही मोहिम आणखी तीव्र करण्यात येत असल्याने थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणची संपूर्ण आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसूलीवरच आहे. वीजबिलांच्या वसूलीमधूनच वीजखरेदीसह विविध देणी दरमहा द्यावी लागतात. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसूलीला मोठा वेग देण्यात आला आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी सर्व अधीक्षक अभियंते कार्यकारी अभियंते व इतर अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत. स्वतः मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार परिमंडलात विविध ठिकाणी दौरे करून शाखा कार्यालयांपर्यंत थकबाकी वसूलीचा आढावा घेत आहेत.

पुणे शहरात एकूण २ लाख ५४ हजार ९११ वीजग्राहकांकडे ४६ कोटी ६३ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती २ लाख १७ हजार ६२५ ग्राहकांकडे ३२ कोटी ३२ लाख रुपये, वाणिज्यिक ३४ हजार ८६९ ग्राहकांकडे ११ कोटी ६४ लाख रुपये, औद्योगिक २ हजार ४१७ ग्राहकांकडे २ कोटी ६७लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या २० दिवसांमध्ये ९ हजार ७२६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहरात एकूण १ लाख ४५ हजार ६२२ वीजग्राहकांकडे ३२ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती १ लाख २३ हजार ४८६ ग्राहकांकडे १९ कोटी ९३ लाख रुपये, वाणिज्यिक १८ हजार ४९१ ग्राहकांकडे ८ कोटी २८ लाख रुपये, औद्योगिक ३ हजार ६४५ ग्राहकांकडे ३ कोटी ९९ लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या २० दिवसांमध्ये ४ हजार ५३९ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण १ लाख ८६ हजार ७५३ वीजग्राहकांकडे ४५ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती १ लाख ६७ हजार १७ ग्राहकांकडे ३२ कोटी ८७ लाख रुपये, वाणिज्यिक १७ हजार ३१३ ग्राहकांकडे ८ कोटी ५९ लाख रुपये, औद्योगिक २ हजार ४२३ ग्राहकांकडे ४ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ४ हजार ६८७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २३) व रविवारी (दि. २४) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in  वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.

कोथरूडकरांच्या हाकेला धावून आले रवींद्र धंगेकर

तात्यासाहेब थोरात उद्यान वाचविण्यासाठी आंदोलन; मोनोरेलला नागरिकांचा तीव्र विरोध

पुणे : तात्यासाहेब थोरात उद्यान हे कोथरूडकरांचा श्वास आहे. या उद्यानातील वनसंपदा नष्ट करून येथे मोनोरेल स्टेशन उभारण्याचा घाट प्रशासनाकडून रचला जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी दिलेल्या हाकेला धावून जात आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी (ता. २१) सकाळी आंदोलन केले व ‘उद्यान वाचवू’ असा नारा दिला.

मोनोरेलसाठी तात्यासाहेब थोरात उद्यानातील वृक्षांवर व येथील निसर्गसंपदेवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी आज सकाळी एकत्र येवून आमदार रवींद्र धंगेकर यांना दूरध्वनी केला व तात्यासाहेब थोरात उद्यानात येण्याची विनंती केली. आमदार रवींद्र धंगेकर हे अवघ्या काही क्षणात तात्यासाहेब थोरात उद्यानात पोहोचले. त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले व या उद्यानाचा प्रशासनापासून आपण बचाव करू, असा शब्द नागरिकांना दिला.

आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, हे अत्यंत सुंदर व नेटके उद्यान शशिकांतभाऊ सुतार यांच्या कार्यकाळात झालेले आहे. हे उद्यान म्हणजे इथल्या नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने फार मोठी सुविधा आहे. इथल्या उद्यानाचे सौंदर्य नष्ट करणे म्हणजे लोकांचा श्वास नष्ट करण्यासमान आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांनी अनेकदा अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना वेळ दिली गेली नाही. पण, यापुढे आम्ही आणि महाविकास आघाडी इथल्या नागरिकांसोबत कायम आहोत. इथले नागरिक येणाऱ्या काही दिवसांत जनआंदोलन उभे करणार आहेत. त्यातही आम्ही सहभागी असू.

आमचा विकासाला अजिबात विरोध नाही. आम्ही विकासाच्या बाजूनेच आहोत. पण, विकास साधत असताना जनतेला नेमके काय हवे आहे, याचाही प्रशासनाने नीट अभ्यास करायला हवा. पर्यावरण नष्ट करून विकास होवू नये, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्ही या उद्यानाचे प्रशासनापासून रक्षण करू.

– रवींद्र धंगेकर, आमदार

आपलं बालपण आपल्याला आठवायला लावणारी ‘इंद्रायणी’ २५ मार्चपासून कलर्स मराठीवर

सालस तरीही खोडकर अशी इंदू आपण सर्वांनीच प्रोमोमधून पाहिली. मूर्ती लहान परंतु तिला पडणारे प्रश्न किती महान आहेत, हेसुद्धा आपण पाहिले. तिचे मार्मिक प्रश्न मोठ्यामोठ्यांना अचंबित करणारे आहेत. तितकेच विचार करायलाही भाग पाडणारे आहेत अशी ही निरागस, गोंडस आणि निष्पाप इंदू आख्या गावाची म्हणजेच विठूच्या वाडीची लाडकी आहे. लवकरच सर्वांची लाडकी इंदू म्हणजेच ‘इंद्रायणी’ आपल्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘इंद्रायणी’ या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. तत्पूर्वी ‘इंद्रायणी’ मालिकेच्या संपूर्ण टीमने पुण्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट दिली आणि आरती केली. या कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तिरेखेची ओळखही करून देण्यात आली. ‘इंदू’ कोण आहे, तिचे आई वडील कोण आहेत, तिचे जग कसे आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. या सगळ्यांची उत्तरे देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजनही यावेळी करण्यात आले. यावेळी ‘इंदू’ची भूमिका साकारणारी सांची भोईर, अनिता दाते, संदीप पाठक स्वानंद बर्वे, आयुष उलगड्डे, राघव घाडगे यांच्यासह दिग्दर्शक विनोद लव्हेकर उपस्थित होते. दिग्दर्शक आणि कलावंतांनी यावेळी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला.

हल्ली आपल्याला सगळी उत्तरं सहज सापडण्याच्या काळात आपल्याला प्रश्न पडणंच संपलंय… यामुळे माणसाचं माणूस म्हणून घडणंही खुंटत चाललंय. अशा या गतिशील नि यंत्रयुगात मुलांचं निरागसपण जोपासणारी, त्यांची माणूस म्हणून जडणघडण करणारी मालिका विनोद लव्हेकर या संवेदनशील दिग्दर्शकाने आणि तितकाच चिंतनशील लेखक चिन्मय मांडलेकरने प्रेक्षकांच्या भेटीला आणलीय.

अवघ्या महाराष्ट्राला एक कोडं पडलंय .. कोण आहे इंदू??? इंदू आहे एक निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ पण तितकीच विचारी मुलगी. इंदूच्या भेटीची रसिकांची आतुरता आता शिगेला पोहोचलीय.

कला, साहित्य आणि विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राला संत परंपरेचीही तितकीच मोठी परंपरा आहे. याच संत परंपरेने महाराष्ट्राला विचारांची बैठक घालून दिली आहे. याच संस्कारात वाढलेली ही इंद्रायणी. २५ मार्चपासून सायंकाळी ७ वाजता ‘इंद्रायणी’ आपल्या लाडक्या कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मालिकेबद्दल दिग्दर्शक विनोद लव्हेकर म्हणतात, ‘’ मला फार आनंद आहे की, पुण्यनगरीत आणि तेही विठ्ठल रखुमाई मंदिरासारख्या पावन ठिकाणी आमच्या मालिकेची पहिली झलक समोर आली आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार कमाल आहेत. परंतु विशेष कौतुक आहे ते बालकलाकारांचे. त्यांच्यातील निरागसता, समजूतदारपणा वाखाणण्याजोगा आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे बालकलाकार या मालिकेतून प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकतील.’’

कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे म्हणाले की, ‘इंद्रायणी’ ही खऱ्याखुऱ्या माणसांची आपल्या मातीतली… आपल्या मातीचा खरा सुगंध घेऊन आलेली कथा आहे. जी रसिकांना निश्चितच भिडेल. मालिकाविश्वात आपलं वेगळेपण इंद्रायणी नक्कीच सिद्ध करेल, याची आम्हाला खात्री आहे. तर कलर्सच्या रिजनल क्लस्टर हेड सुषमा राजेश यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार असून त्याच पद्धतीचं रिअलिस्टिक स्टोरी टेलिंग आमच्या मालिका करताना दिसतील.

“ इंद्रायणी” मालिकेत इंदूची भूमिका करणारी बालकलाकार साताऱ्याची सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरतेय. तसंच गुणी अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना पुन्हा एकदा सुखद धक्का देत आहेत. या दोन तगड्या कलाकारांबरोबर “जय जय स्वामी समर्थ “ मध्ये चोळप्पाच्या भूमिकेद्वारे रसिकांची मनं जिंकणारा स्वानंद बर्वे हा कलाकारही या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. चिन्मय मांडलेकर लिखित या मालिकेची निर्मिती ‘जीव झाला येडापिसा’ , ‘राजारानीची गं जोडी’ आणि ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणारे पोतडी एंटरटेनमेंट करत आहे.

सुनेत्रा पवारांना मिळालेल्या पाठबळाने आमराई बहरली


बारामती, पुणे: काल सुनेत्रा पवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले आणि बारामती शहरातील जनतेच्या सदिच्छा भेटीला त्यांनी सुरुवात केली.

बारामती शहरात सदिच्छा भेटी घेत असतानाच अनेकांचे सुनेत्रा पवार यांना अनेक फोन येत होते. त्यावर विचारणा होती, ‘वहिनी तुम्ही आमच्याकडे केव्हा येणार?’. जनतेतून अशा भावना व्यक्त झाल्या. पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतशबाजी, वाद्यांच्या गजरातूनही सुनेत्रा पवार यांचे भव्य स्वागत झाले.

यावेळी आमराई परिसरातील बुरुड सोसायटी, वडार कॉलनी, सुहासनगर, चंद्रबननगर, कोअर हाऊस, वडकेनगर, भीमनगर, सिद्धार्थनगर यासह विविध ठिकाणी त्यांनी भेट दिली.

जय गणेश तरुण मंडळाच्या गणेश दर्शनाने सदिच्छा भेटिना सुरुवात झाली. या दरम्यान, हजरत राजबाघसवार बाबा सय्यद ताजोद्दिन चिश्ती दर्गा येथे जाऊनही त्यांनी दर्शन घेतले.

माजी नगरसेविका सविता बबन लोंढे यांची प्रकृती ठिक नसल्या कारणाने सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

या भेटीगाठी दरम्यान संपूर्ण आमराई परिसर राष्ट्रवादी काँग्रेस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावरील प्रेमाने बहरून गेला होता.

यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष जय पाटील, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता गायकवाड यांच्यासह विवीध सलचे, संघटनांचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोट्यावधी कुळांच्या उद्धारकाला सुनेत्रा पवार यांच्यातर्फे अभिवादन…


बारामती, पुणे:महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा २०मार्च हा दिवस. त्यामुळे या सत्याग्रह दिनानिमित्त बारामती येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे जाऊन कोटी कुळांच्या उद्धारकास सुनेत्रा पवार यांनी अभिवादन केले.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वभूषण आहेत आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निगराणीखाली सुशोभित देखणे झालेले येथील हे स्मारक बारामतीचे भूषणच आहे.

लढण्याचे, अन्याया विरोधात उभं राहण्याचे बळ, प्रेरणा देणाऱ्या आजच्या दिवशी महामानवाला अभिवादन करून ती प्रेरणा मिळाली “असे सुनेत्रा पवार यांनी प्रतिपादन केले.

यावेळी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जय पाटील, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, अभिजित चव्हाण, नवनाथ बल्लाळ, गणेश सोनवणे, गौतम शिंदे, बिरजू मांढरे, रणधीर मोहिते, सचिन मोरे, बबलू जगताप, अनिता जगताप, रमेश मोरे, अभिजित सोनवणे, नितीन मोहिते, सचिन काकडे, शब्बिरभाई शेख, सुरेश शिंदे, मयुरी शिंदे, साधू बल्लाळ, कांबळे गुरुजी असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

आम आदमी पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष सीमा शिवाजी गुट्टेंचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

मुंबई, दि. २० मार्च
लोकसभा निवडणुकीच्या धामधुकीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढत आहे. आम आदमी पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष सीमा शिवाजी गुट्टे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सोमवारी टिळक भवनमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी नाना पटोले यांनी सीमा गुट्टे यांचे काँग्रेस कुटुंबात स्वागत केले.

सीमा गुट्टे यांनी सामाजिक, शैक्षणिक व महिला सशक्तीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आम आदमी पार्टीच्या पुणे जिल्हा महिला बचत गटाच्या जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मुलींच्या शैक्षणिक समस्यांवर कार्यशाळा आयोजित करणे, महिलांसाठी आरोग्य शिबिरे, सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय उत्सवांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग राहिला आहे.
“देश सध्या बिकट परिस्थितीतून जात असताना काँग्रेसची विचारधाराच या देशाला तारु शकते. सर्व समाज घटकांना न्याय देण्याची काँग्रेस पक्षाची परंपरा राहिली आहे. भारत जोडो न्याय यात्रेमुळे सर्वसामान्य जनतेचा काँग्रेस पक्षावरील विश्वास आणखी दृढ झाला आहे. भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान महिला सक्षमिकरणावर विशेष भर देत ‘महिला न्याय’ च्या पाच गॅरंटी काँग्रेस पक्षाने दिलेल्या आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत असून लवकरच इतर पक्षातील आणखी लोक काँग्रेसमध्ये प्रवेश करतील” असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले.
या पक्षप्रवेशावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे हे उपस्थित होते.

शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मतदान जनजागृती

पुणे, दि. २० : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वीप उपक्रम राबविण्यात येत असून २०८ वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात शिक्षकांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पालक, विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मतदान जागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.

मतदार यादीत नाव शोधण्यासाठी, मतदार नोंदणी आणि नावात बदल करण्यासाठी, त्यांच्या डिजिटल छायाचित्र, मतदार स्लिप डाउनलोड करण्यासाठी मतदार हेल्पलाइन ॲप कसे वापरता येईल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान असलेल्या परिसरात मतदान जागृती करण्याबाबत आवाहन करुन मतदानाची शपथ देण्यात आली.

निवडणूकीतील लोकशाहीचे महत्त्व आणि मतदानाचे महत्त्व पटवून देण्याविषयी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी वडगाव शेरी मतदार संघातील स्वीपचे नोडल अधिकारी सुहास नवले व कर्मचारी उपस्थित होते.

महिलेला पाठविला मेसेज मग ब्लॅकमेलला कंटाळून केली आत्महत्या -नऱ्हेतील प्रकार

पुणे-ओळखीच्या महिलेस व्हाॅटसअपवर मेसेज केल्यावर त्याआधारे महिला व तिच्या पतीने संबधित मेसेज पाठविणाऱ्या व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून तब्बल 13 लाख रुपये उकळले. तसेच आणखी पैशाची मागणी संबंधित दांम्पत्य करत असल्याने या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाने विषारी आैषध प्राश्न करुन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशाेक जाेशी (वय-38,रा. नऱ्हे,पुणे) असे आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे.

याप्रकरणी वैष्णवी गणेश चव्हाण (वय-२६) व गणेश चव्हाण (२८,दाेघे रा.खैरेवाडी,विद्यापीठ राेड, पुणे) यांचेवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १३/१/२०२४ ते २१/२/२०२४ यादरम्यान घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत आराेपी विराेधात गाेपाल कांजी भाई जाेशी (वय-३३) यांनी तक्रार दाखल केलीआहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गाेपाल जाेशी यांचा भाऊ मयत अशाेक जाेशी याने वैष्णवी चव्हाण हिचे व्हाॅटसअपवर मेसेज पाठवला हाेता.

त्याचे आधारे मयत याची पोलिसात तक्रार करण्याची वारंवार तिने धमकी दिली. संबंधित आराेपी जाेडप्याने मयत अशाेक यास ब्लॅकमेल करुन वेळाेवेळी पैशाची मागणी करुन जबरदस्तीने 13 लाख रुपये घेतले. परंतु त्यानंतरहीत्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी पुन्हा अशाेक याचे ऑफिसवर येऊन त्याला पोलिसात तक्रार करण्याची धमकी देऊन त्यास ब्लॅकमेल करुन पुन्हा पैशाची मागणी केली. त्यामुळे त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याने अशाेक याने विषारी औषध पिल्याने त्याचा त्यात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहे.

मुंबई मनपाच्या आयुक्तपदी भूषण गगराणी: ठाणे आयुक्तपदी सौरभ राव तर नवी मुंबईत कैलास शिंदे

मुंबई-भूषण गगराणी हे 1990 सालच्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा कार्यभार होता. मात्र, आता ते मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असतील.मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदी सौरभ राव तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदी कैलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीचे रनधुमाळी चालू असताना मुंबईतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्यामुळे सर्वांचेच लक्ष याकडे वेधले गेले.

ज्या अधिकाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ झाला आहे, त्या सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आधीच केल्या होत्या. मात्र असे असताना देखील महाराष्ट्र सरकारने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नाहीत. महाराष्ट्रा प्रमाणेच अशी स्थिती देशभरातली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त एकबालसिंग चहल यांची देखील बदली करण्यात आली होती. मात्र त्यांना पदावर हटवल्यानंतर त्या जागेवर कोणता अधिकार येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार आता भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुसार तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळापासून एकाच पदावर असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणूक आयोगाने केल्या आहेत.

मोदींची विचारसरणी औरंगजेबासारखी:उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल; कत्तलखाने, गोमांस निर्यातदारांकडून निवडणूक रोखे घेतल्याचा दावा

बुलढाणा-मोदींची विचारसरणी औरंगजेबासारखी आहे, अशी तिखट टीका संजय राऊत यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाला पुन्हा एकदा धार येणार आहे. ठाकरे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शहांवर देखील टीकास्त्र सोडले.कत्तलखाने आणि गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून निवडणूक रोखे घेऊन भाजप हिंदुत्व शिकवणार असेल तर जनता तुम्हाला निवडणुकीत कापल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, ज्या शिवसेनेने तुम्हाला सत्तेची गादी दाखवली त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. भाजपवाले स्वातंत्र्य लढ्यात कधीच नव्हते. मग तुमच्याकडून आम्ही काय शिकायचं? गद्दारी का अशी विचारणा केली. ते म्हणाले की त्यांच्याकडे प्रचंड धनसंपत्ती आहे पण माझ्याकडे जनसंपत्ती आहे. ज्या गद्दारांना शिवसैनिकांनी आमदार खासदार केले होते त्याच गद्दारांना आता माझा शिवसैनिक या मातीत गाडणार असल्याचे ते म्हणाले. ज्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसैनिकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांच्यावर तुम्ही खोट्या केसेस दाखल करता, फक्त थोडे दिवस थांबा, असा इशारा त्यांनी दिला.उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप सातत्याने हिंदुत्वाच्या नावाने बोलत असते. मात्र, यांच्याकडे आहे तरी काय? देशप्रेम सांगत असाल, तर आम्ही सगळा इतिहास काढू. भाजपचे बाप जादे सुद्धा स्वातंत्र्यलयात नव्हते अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ते पुढे म्हणाले की तुमच्याकडून शिकायच तरी काय? गद्दारी? भाजपने अनेकांना गद्दार केले. दोन पक्ष फोडून आलो सांगतात याची लाज वाटली पाहिजे. हिंदुत्वाच्या वेडापायी आम्ही निवडून देत होतो याचीच लाज वाटते असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सिंदखेडराजामधील सभेमध्येही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली. ते म्हणाले की मला तुम्ही कुटुंबप्रमुख मानलं. मी सांगितलेलं ऐकलं म्हणून कोरोना काळात आपण वाचू शकलो. आताही सांगतोय भाजपच्या भूलथापांच्या नादी लागू नका. हुकुमशाहीला आजच गाडून टाका असे ते म्हणाले. मी तुम्हाला तळमळीने सांगतो यावेळी चूक करू नका. गद्दारीला मते देऊ नका, समोर हुकूमशाहीचं संकट असल्याचे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून त्याला मार हे शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला कधीच शिकवलं नाही. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे मिंध्यांना शरम वाटली पाहिजे, माझा महाराष्ट्र इकडे ओरबाडला जात असताना तुम्ही दिल्लीश्वरांच्या पायासमोर लोटांगण घालताय? ‘जय जिजाऊ, जय शिवराय‘ हे नातं काय आहे हे दाखवायचं असेल, तर गद्दारांना येणाऱ्या निवडणुकीत पाडावंच लागेल. समोर कितीही भला मोठा शत्रू असला, तरी आपला राष्ट्राभिमान लाचारीसारखा त्यांच्या पायावर वाहून टाकायचा नाही, असे ते म्हणाले.

निवडणूक आचारसंहिता भंगाच्या ३५ तक्रारींवर कार्यवाही पूर्ण

पुणे, दि.२०: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा संपर्क केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्राकडे तसेच सी- व्हिजील पोर्टलवर प्राप्त ४६ तक्रारीपैकी योग्य असलेल्या ३५ तक्रारींवर कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात आली असून ११ तक्रारीवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली आहे.

जिल्ह्यात २१ विधानसभा मतदारसंघात १३५ भरारी पथके व १२९ स्थिर पथके नियुक्त केली आहेत. या पथकामार्फत सी-व्हीजील पोर्टलवर प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करण्यात येत आहे. १६ मार्चपासून पर्वती विधानसभा मतदार संघात १८, कसबा -६, पुणे कॅन्टोन्मेंट आणि मावळ ४, कोथरूड आणि चिंचवड-३, पुरंदर, वडगाव शेरी, बारामती, खडकवासला आणि पिंपरी प्रत्येकी १, तर चुकीच्या तक्रारी ३ अशा एकूण ४६ तक्रारी सी-व्हीजील पोर्टलवर दाखल झाल्या. त्यापैकी ३५ तक्रारी योग्य आढळल्याने त्यावर त्वरित कारवाई करण्यात आली. उर्वरित ११ तक्रारी संदर्भात कार्यवाही सूरू आहे.

प्राप्त झालेल्या तक्रारी ह्या विनापरवानगी लावण्यात आलेले बॅनर व पोस्टर बाबत आहेत. नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करावयाच्या असल्यास सी- व्हिजिल पोर्टल, १८००२३३०१०२ आणि १९५० टोल फ्री क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. या कक्षाद्वारे तातडीने तक्रारींची दखल घेण्यात येईल. हा कक्ष २४ तास सुरू राहणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला आलेल्या तक्रारीनुसार भरारी पथके आवश्यक कारवाई करतील, अशी माहिती नियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली आहे.