पुणे, दि. २१ मार्च २०२४: पुणे परिमंडलातील ५ लाख ८७ हजार २८६ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही १२४ कोटी ७७ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे नाईलाजास्तव गेल्या २० दिवसांमध्ये १८ हजार ९५२ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ही मोहिम आणखी तीव्र करण्यात येत असल्याने थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
महावितरणची संपूर्ण आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसूलीवरच आहे. वीजबिलांच्या वसूलीमधूनच वीजखरेदीसह विविध देणी दरमहा द्यावी लागतात. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसूलीला मोठा वेग देण्यात आला आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी सर्व अधीक्षक अभियंते कार्यकारी अभियंते व इतर अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत. स्वतः मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार परिमंडलात विविध ठिकाणी दौरे करून शाखा कार्यालयांपर्यंत थकबाकी वसूलीचा आढावा घेत आहेत.
पुणे शहरात एकूण २ लाख ५४ हजार ९११ वीजग्राहकांकडे ४६ कोटी ६३ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती २ लाख १७ हजार ६२५ ग्राहकांकडे ३२ कोटी ३२ लाख रुपये, वाणिज्यिक ३४ हजार ८६९ ग्राहकांकडे ११ कोटी ६४ लाख रुपये, औद्योगिक २ हजार ४१७ ग्राहकांकडे २ कोटी ६७लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या २० दिवसांमध्ये ९ हजार ७२६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरात एकूण १ लाख ४५ हजार ६२२ वीजग्राहकांकडे ३२ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती १ लाख २३ हजार ४८६ ग्राहकांकडे १९ कोटी ९३ लाख रुपये, वाणिज्यिक १८ हजार ४९१ ग्राहकांकडे ८ कोटी २८ लाख रुपये, औद्योगिक ३ हजार ६४५ ग्राहकांकडे ३ कोटी ९९ लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या २० दिवसांमध्ये ४ हजार ५३९ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण १ लाख ८६ हजार ७५३ वीजग्राहकांकडे ४५ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती १ लाख ६७ हजार १७ ग्राहकांकडे ३२ कोटी ८७ लाख रुपये, वाणिज्यिक १७ हजार ३१३ ग्राहकांकडे ८ कोटी ५९ लाख रुपये, औद्योगिक २ हजार ४२३ ग्राहकांकडे ४ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ४ हजार ६८७ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २३) व रविवारी (दि. २४) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.