तात्यासाहेब थोरात उद्यान वाचविण्यासाठी आंदोलन; मोनोरेलला नागरिकांचा तीव्र विरोध
पुणे : तात्यासाहेब थोरात उद्यान हे कोथरूडकरांचा श्वास आहे. या उद्यानातील वनसंपदा नष्ट करून येथे मोनोरेल स्टेशन उभारण्याचा घाट प्रशासनाकडून रचला जात आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी दिलेल्या हाकेला धावून जात आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी (ता. २१) सकाळी आंदोलन केले व ‘उद्यान वाचवू’ असा नारा दिला.
मोनोरेलसाठी तात्यासाहेब थोरात उद्यानातील वृक्षांवर व येथील निसर्गसंपदेवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी आज सकाळी एकत्र येवून आमदार रवींद्र धंगेकर यांना दूरध्वनी केला व तात्यासाहेब थोरात उद्यानात येण्याची विनंती केली. आमदार रवींद्र धंगेकर हे अवघ्या काही क्षणात तात्यासाहेब थोरात उद्यानात पोहोचले. त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले व या उद्यानाचा प्रशासनापासून आपण बचाव करू, असा शब्द नागरिकांना दिला.
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, हे अत्यंत सुंदर व नेटके उद्यान शशिकांतभाऊ सुतार यांच्या कार्यकाळात झालेले आहे. हे उद्यान म्हणजे इथल्या नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने फार मोठी सुविधा आहे. इथल्या उद्यानाचे सौंदर्य नष्ट करणे म्हणजे लोकांचा श्वास नष्ट करण्यासमान आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांनी अनेकदा अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना वेळ दिली गेली नाही. पण, यापुढे आम्ही आणि महाविकास आघाडी इथल्या नागरिकांसोबत कायम आहोत. इथले नागरिक येणाऱ्या काही दिवसांत जनआंदोलन उभे करणार आहेत. त्यातही आम्ही सहभागी असू.
आमचा विकासाला अजिबात विरोध नाही. आम्ही विकासाच्या बाजूनेच आहोत. पण, विकास साधत असताना जनतेला नेमके काय हवे आहे, याचाही प्रशासनाने नीट अभ्यास करायला हवा. पर्यावरण नष्ट करून विकास होवू नये, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्ही या उद्यानाचे प्रशासनापासून रक्षण करू.