गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ विभावरी आपटे-जोशी यांना ‘दीदी पुरस्कार’ प्रदान
पुणे : “लतादीदीचा मी बाळ होतो. शेवटपर्यंत तिने माझी काळजी घेतली. तिच्या कंठात साक्षात ईश्वराचा अंश होता. वयाच्या पाचव्या वर्षापासून ती बाबांच्या सानिध्यात गात होती. विविध भाषांतील लहेजा, शब्द समजून घेत ती सर्व प्रकारची गाणी गायची. तिने गायलेली सर्वच गाणी अजरामर झालेली आहेत. तिच्यात संवेदनशीलपणा होता. सामाजिक जाणीव होती. लतादीदीच्या जाण्याने संगीत सागरातील एक हिमनग कोसळला आहे. दोन वर्षांनंतरही मी पूर्णपणे सावरलेलो नाही, अशा शब्दांत लतादीदींचे बंधू भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या बहिणीविषयीच्या आठवणी जागवल्या.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने संगीत क्षेत्रातील सेवेबद्दल दिला जाणारा ‘दीदी पुरस्कार’ ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्या हस्ते गायिका विभावरी आपटे-जोशी यांना प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात आयोजित कार्यक्रमात भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर, प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, भारती मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, संयोजन समिती सदस्य व गायिका मनीषा निश्चल, निश्चल लताड आदी उपस्थित होते.
यावेळी सादर झालेल्या ‘विश्वमोहिनी लता दीदी’ या सांगीतिक मैफलीने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह गायक राहुल देशपांडे, गायिका विभावरी आपटे-जोशी, मनीषा निश्चल, प्राची देवल, गायक श्रेयस बेडेकर यांनी लतादीदींची अजरामर गाणी सुरेल पद्धतीने सादर केली.
श्रीरामचंद्र कृपाळू भजमन या गीताने मैफलीची सुरुवात झाली. त्यांनतर लग जा गले… एक प्यार का नगमा है… रुक जा रात ठहर जा रे चंदा… आज कल पाव जमी पर पडते नहीं मेरे… अखेरचा हा तुला दंडवत… तू तेव्हा तशी… ये दिल और उनकी निगाहो के साये… अशा अजरामर गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्रोत्यांमधून प्रत्येक गाण्यानंतर ‘वन्स मोअर’ची दाद मिळत होती.
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याविषयी हृदयनाथ मंगेशकरांनी लिहिलेल्या आठवणींचे वाचन करत मास्टरजींच्या काही चीजा सादर केल्या. तसेच मंगेशकर आणि देशपांडे कुटुंबियातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. लतादीदींची काही गाणी व त्यातील बारकावे, त्यावेळचे किस्से मंगेशकर यांनी सांगितले.
रवींद्र खरे यांचे ओघवते निवेदन, सिंथेसायझरवर विवेक परांजपे व अमृता ठाकूरदेसाई, तबल्यावर डॉ. राजेंद्र दूरकर व विशाल गंड्रतवार, बासरीवर निलेश देशपांडे, सतारीवर प्रसाद गोंदकर, ऑक्टोपॅडवर ऋतुराज कोरे, गिटारवर विशाल थेलकर यांनी साथसंगत केली.