Home Blog Page 1149

केजरीवाल यांच्या अटकेनंतर राहुल गांधी म्हणाले, डरा हुआ तानाशाह, एक मरा हुआ लोकतंत्र बनाना चाहता है।

केजरीवाल यांच्या अटकेनंतर वाढता असंतोष

नवी दिल्ली:केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध केला असून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील, असे दिल्लीच्या मंत्री आतिशी यांनी सांगितले. केजरीवालच तुरुंगातून सरकार चालवणार. येथे केजरीवाल यांच्या कायदेशीर पथकानेही सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे.

केजरीवाल यांच्या अटकेनंतर काही वेळातच आम आदमी पार्टीतर्फे आतिशी यांनी ही प्रतिक्रिया दिली असून आता केजरीवाल कारागृहातून आपलं कर्तव्य बजावतील, असंही त्या म्हणाल्या आहेत. तसंच, ईडीने केलेल्या या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून आम्ही आज रात्रीच सर्वोच्च न्यायालयात तत्काळ सुनावणीची मागणी केली आहे, असंही आतिशी यांनी स्पष्ट केलं आहे.

हे एक राजकीय षडयंत्र असून या प्रकरणात 500हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश होता तरीही दोन वर्षांत त्यांना एक रुपयाही हस्तगत करता आलेला नाही, अशी टीकाही आतिशी यांनी केली आहे.

अटक करून केजरीवाल यांना ED मुख्यालयात नेण्यात आले. ईडीच्या मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कार्यालयाभोवती निमलष्करी दलाच्या चार कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांचे 100 हून अधिक कर्मचारीही उपस्थित आहेत.

देशभरातून या अटकेवरून असंतोष व्यक्त होत आहे

प्रियंका गांधी शरद पवार सुप्रिया सुळे आणि अनेक नेत्यांनी यावरुन मोदींना लक्ष्य केले आहे

दिल्लीचे CM केजरीवाल यांना अटक

नवी दिल्ली;मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाल्याची माहिती केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील नेत्या आतिशी यांनी दिली आहे.

अबकारी कर घोटाळा प्रकणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर ईडीचे पथक गुरुवारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झालं होतं.दोन तासांच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला होता. केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला होता.

ईडीने पाठवलेल्या समन्सप्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीच्या नोटीसनंतर अरविंद केजरीवाल यांनी चौकशीसाठी येण्यापूर्वी अटक न करण्याची हमी मागितली होती. मात्र, ती याचिका फेटाळून लावण्यात आली होती.

याचिका फेटाळून लावल्याच्या काही तासांतच ईडीचं पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झालं होतं. तिथे दोन तास चौकशी केल्यानंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली.

कॉंग्रेसची उमेदवारी रविंद्र धंगेकरानांच … जाहीर

दुसर्‍या यादीत 57 जणांना उमेदवारी

कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित

काँग्रेसकडून नंदुरबार अमरावती नांदेड पुणे लातूर सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. नंदुरबारमधून गोवळ पडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर लातूरमधून शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. भाजपने महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर केल्याच्या नंतर काही दिवसातच आता आज महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकरांचे नाव जाहीर केले आहे.आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे धंगेकर लोकसभेच्या रिंगणात आल्याने या निवडणुकीत आणखीनच रंग भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धंगेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते.पुणे लोकसभा ही काँग्रेसची तशी परंपरागत जागा. मात्र जवळपास 10 वेळा खासदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसची ही जागा मोदी लाटेत म्हणजेच 2014 साली भाजपकडे गेली.

कधीकाळी हा मतदारसंघ बॅरिस्टर गाडगीळ, जयंतराव टिळक त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली म्हणून ओळखला जायचा. पण मोदी लाटेत अनिल शिरोळे आणि त्यानंतर गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेवर विजय मिळवला. मुख्यत: काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत पुणे लोकसभेत होते.

13 मार्च रोजी भारतीय जनता पक्षाने लोकसभा उमेदरांच्या नावाची घोषणा केली त्यात मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आबा बागुल यांनी उमेदवारीचा आग्रह धरला होता पण दिल्लीपर्यंत त्यांचा आग्रह पोहोचू शकला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेस मध्ये सुरुवाती पासून धंगेकर हेच नाव आघाडीवर होते.

आता खरी लढत मोहोळ विरुद्ध धंगेकर

पुणे लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेस आणि भाजपा अशा दोन विचारधारांमध्ये विभागलेला मतदारसंघ आहे.महाविकास आघाडी आणि महायुती अशी नवी समीकरणं उदयाला आल्याने त्याचाही परिणाम शहराच्या राजकारणावर झालेला दिसतोय.

यंदा आता खरी लढत मोहोळ विरुद्ध धंगेकर अशीच होणार असून अन्य उमेदवार मते खाण्यासाठी कोणाला निवडून आणण्यासाठी तर कोणाला पाडण्यासाठी उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये वडगाव शेरी, पर्वती, कोथरूड, कसबा पेठ, शिवाजीनगर, पुणे छावणी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 पैकी 1आमदार, भाजपचे चार आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. तसं पाहायला गेलं तर या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व जास्त आहे. पण कॉंग्रेस मधून बंडखोरी झाली नाही तर किंवा सरळ लढत झाली तर, आणि गत 5/7 वर्षांत भाजपचे पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याची व्यवस्थीत चर्चा जनतेत घडवून आणली तर कॉंग्रेसला येथे विजय मिळविता येऊ शकतो.असा विश्वास राजकीय समीक्षक व्यक्त करत आहेत.

ईडीची टीम केजरीवालांच्या घरी,आपची टीम सुप्रीम कोर्टाच्या दारी-ED ची टीम जबरदस्तीने घरात घुसल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप

अरविंद केजरीवालांना अटकेपासून दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार


नवी दिल्ली- दिल्ली उच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला आहे. काही तासांनंतर ईडीची टीम त्याच्या घरी पोहोचली. तपास यंत्रणा त्यांची चौकशी करू शकते, असे सांगण्यात येत आहे. आज दुपारी दिल्ली उच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटकेतून दिलासा देण्यास नकार दिला आहे. गुरुवारी, 21 मार्च रोजी उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून वाचवण्याची विनंती फेटाळली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केजरीवाल यांना 9 समन्स बजावले आहेत, मात्र केजरीवाल हजर झाले नाहीत.
यापूर्वी केजरीवाल यांनी न्यायालयाला सांगितले होते की, ते अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहण्यास तयार आहेत. तपास यंत्रणा त्यांना अटक करणार नाही, याची खात्री त्यांना दिली पाहिजे.
त्याचवेळी हायकोर्टाने ईडीला उत्तर देण्यास आणि नवीन अंतरिम याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. आता या प्रकरणी 22 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली उच्च न्यायालयाचे खंडपीठ गुरुवारी केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. मद्य घोटाळाप्रकरणी आजच ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. 17 मार्च रोजी त्यांना 9वे समन्स पाठवण्यात आले होते.

केजरीवाल यांनी 19 मार्च रोजी या समन्सविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर 20 मार्च रोजी सुनावणी झाली. कोर्टाने समन्स पाठवण्यासाठी ईडीला वारंवार बोलावले आहे. तपास यंत्रणेला बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल यांना 27 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 17 जानेवारी, 3 जानेवारी आणि 2023 मध्ये 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबर रोजी समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, ते एकदाही चौकशीसाठी गेले नाहीत.

केजरीवाल यांचे वकील म्हणाले- सीएम सुरक्षा मिळाल्यास हजर होतील,20 मार्च रोजी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि विक्रम चौधरी यांनी केजरीवाल यांची बाजू न्यायालयात मांडली. ते म्हणाले- ईडीने आप नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक केली आहे. तपास यंत्रणा केजरीवाल यांनाही अटक करू शकते.वकील म्हणाले- केजरीवाल पळून जात नाहीत. त्यांना सुरक्षा दिली तर ते पुढे येतील. जरी ईडी त्याला आरोपी, संशयित किंवा साक्षीदार म्हणून बोलावत आहे की नाही हे सांगत नाही. त्यावर न्यायालयाने म्हटले होते की, ते हजर झाल्यावरच समजेल की त्यांना आरोपी म्हणून बोलावले जात आहे की साक्षीदार म्हणून बोलावले जात आहे ते.

https://twitter.com/AapKaKejariwal/status/1770791512260931873

ED ने 17 मार्च रोजी केजरीवाल यांना दिल्ली जल बोर्ड टेंडर घोटाळा प्रकरणात मद्य धोरण घोटाळा प्रकरणासह समन्स पाठवले होते. जल बोर्ड टेंडर घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना मिळालेले हे पहिले समन्स आहे. याप्रकरणी त्यांना 18 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, मात्र ते गेले नाहीत. अशाप्रकारे ईडीने केजरीवाल यांना आतापर्यंत 10 समन्स पाठवले आहेत.

रविवारी चिंचवडला मावळ लोकसभेचा रणसंग्राम

दिशा फाऊंडेशनचा उपक्रम
बारणे, वाघेरेंसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती

पिंपरी, पुणे (दि. २१ मार्च २०२४) दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकसभेचा रणसंग्राम – मावळ लोकसभा’ या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी, २४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, महाविकास आघाडीचे मावळचे घोषित उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासह पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, भाजपचे पिंपरी शहराध्यक्ष शंकर जगताप, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे (शरद पवार गट), प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर हे या कार्यक्रमातील चर्चेत सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार योगेश कुटे कार्यक्रमाचे सूत्रसंवादक असणार आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुचर्चित मतदारसंघ मानला जातो. येथील विविध मुद्द्यांचा राजकीय अंगाने परामर्ष घेण्यासाठी मावळ लोकसभेचा रणसंग्राम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने राजकीय पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील विविध प्रश्न तथा समस्यांवर आधारित सविस्तर चर्चा होणार आहे. सदर कार्यक्रमासाठी सर्वांना प्रवेश असून काही जागा राखीव असणार आहेत.

मोहोळांना शुभेच्छा देण्यासाठी मुंडे पुण्यात

पुणे : पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक शहर आहे. या शहरातील उमेदवार मुरलीधर मोहोळ हे माझे युवा मोर्चातील सहकारी आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत जवळचे आहेत. म्हणूनच त्यांच्या भेटीसाठी मी येथे खास आली आहे. मोहोळ प्रचंड बहुमताने विजयी होतील आणि दिल्लीला जातील, असा विश्वास भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. ‘पुण्याच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील’, असेही त्या म्हणाल्या.

पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कर्वे रस्त्यावरील २४ तास खुल्या संपर्क कार्यालयाला मुंडे यांनी भेट दिली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकारांशी संवाद साधताना मुंडे म्हणाल्या ‘आ. मिसाळ या माझ्या मोठ्या भगिनी तर मुरलीधर मोहोळ हे माझे छोटे बंधू असून त्यांची मोठी बहीण म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुण्यात आली आहे. त्यांना मोठा विजय प्राप्त होवो, असेही मुंडे म्हणाल्या.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘मी लोकसभेसाठी आजवर उमेदवार नव्हते, मात्र निवडणूक लढवण्याचा मला अनुभव आहे. वयाच्या १७ व्या वर्षांपासून मी प्रचार करत आहे. मला २२ वर्षांचा राजकारणाचा अनुभव आहे. ही माझी पाचवी निवडणूक आहे. पक्षाने सांगितले तर राज्यभर प्रचार करेन. परंतु, सध्या मी माझ्या निवडणुकीकडे लक्ष दिले आहे. मी माझ्या आणि मुरलीधर मोहोळ यांच्याही विजयाविषयी आश्वस्त आहे’

स्व. गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत रमल्या पंकजा !

मोहोळ यांच्या २४ तास खुल्या कार्यालयाच्या राजकीय कारकीर्दीवर प्रकाश टाकणारी छायाचित्रे लावली असून यात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याही छायाचित्रांचा समावेश यात आहे. त्यातील प्रत्येक फोटोची आठवण मुंडे यांनी जाणून घेतली.

‘नाद अनाहत’ मासिकाच्या पहिल्या अंकाचा येत्या २६ला प्रकाशन सोहळा

पुणे ता. २१: उद्गार भारततर्फे प्रकाशित होत असलेल्या ‘नाद अनाहत’ मासिकाचा प्रकाशन सोहळा येत्या मंगळवारी ( दि.२६) तारखेला पार पडणार आहे. गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रस्ता येथे हा कार्यक्रम सायंकाळी ६.३० ते ९.०० या वेळेत रंगेल. भारत वर्षाचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक पुनरुत्थान घडविणारे जननायक नरेंद्र मोदी अर्थातच ‘नाद अनाहत’चा प्रथम नरेंद्र मोदी विशेषांक यावेळी प्रकाशित होईल.
महंत शिवगिरी महाराज यांच्या शुभहस्ते तर उद्गार भारत प्रकाशनच्या संस्थापिका आसावरी पाटणकर, नाद अनाहत मासिकाचे संपादक सुजीत भोगले, व उदयनाथ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल.
कला, संस्कृती आणि इतिहास या विषयांना वाहिलेले ‘धर्मयुग’ हे साप्ताहिक अत्यंत लोकप्रिय होते. हे साप्ताहिक बंद पडल्यानंतर या विषयांना वाहून घेतलेले एकही साप्ताहिक, पाक्षिक किंवा मासिक छापले जात नव्हते. ‘नाद अनाहत’ हे मासिक धर्म, कला, संस्कृती, इतिहास आणि अध्यात्म या विषयांनाच समर्पित असेल. या मासिकातून दर्जेदार साहित्य प्रकाशित करण्याचा आमचा प्रयत्न असून ‘नाद अनाहत’ रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास आसावरी पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, ‘सीव्हिजिल ॲप’ वर तक्रार करा

मुंबई, दि. २१ : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या निवडणुका एकूण सात टप्प्यात होणार असून त्यासाठी मागच्या शनिवारपासून देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार नागरिकांना आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सीव्हिजिल सिटीझन ॲप’ विकसित केले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

आचारसंहिता कालावधीत काय करावे आणि काय करु नये याविषयी निवडणूक उमेदवार, प्रशासन आणि राजकीय पक्षांना माहिती दिली जाते. पण, काहीवेळेला या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते. त्याची तक्रार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहे. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार किंवा माहिती निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सीव्हिजिल ॲप विकसित केले आहे. या मोबाईल ॲपद्वारे मतदारांना आता थेट आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. या सीव्हिजिल ॲपवर तक्रार प्राप्त होताच तातडीने त्यावर कारवाई केली जाते. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाते.

हे सीव्हिजिल ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रदान करणे आवश्यक आहे. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारींच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे.

वैशिष्ट्य

सीव्हिजिल ॲप हा वापरकर्त्यांना आदर्श आचारसंहिताच्या उल्लंघनाची तक्रार करण्याची अनुमती देतो. नागरिकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. उल्लंघनाचे स्थान ट्रॅक करण्यासाठी जीपीएस वापरतो. वापरकर्त्यांना केवळ थेट घटना चित्रित करण्याची अनुमती देतो. तक्रारीच्या प्रगतीचा मागोवा घेतो.

वापर कसा करायचा

एन्ड्रॅाईड मोबाईलमधील गुगल प्ले स्टोर आणि आयफोनमधील ॲप स्टोर या ॲपमध्ये जाऊन सीव्हिजिल (cVIGIL) सर्च करा. त्यानंतर ॲप डाऊनलोड करा. त्यानंतर ॲप उघडून मोबाईल क्रमांक, पत्ता, मतदारसंघ समाविष्ट करुन खाते तयार करा. तुम्हाला ज्या उल्लंघनाची तक्रार करायची आहे ते निवडा आणि स्थळ, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हिडिओंसह घटनेचे तपशील टाका. त्यानंतर तक्रार सबमिट करा.

अचूक कृती व देखरेख

या ॲप्लिकेशनचा वापर करून, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न जाताही काही मिनिटांतच नागरिक राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार नोंदवू शकतात. हा सीव्हिजिल ॲप जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाशी जागरूक नागरिकांना जोडतो. ज्यामुळे एक जलद आणि अचूक कृती, देखरेख आणि अहवाल प्रणाली तयार होते.

लाईव्ह फोटो, व्हिडिओ

या ॲपच्या अचूकतेसाठी ॲपमधून फक्त लाईव्ह लोकेशनवर आधारित फोटो, व्हिडिओ घेतले जातात. जेणेकरुन भरारी पथक, स्थिर संनिरीक्षण चमुंना वेळेत कार्यवाही करणे शक्य होईल.

तातडीने होते कारवाई

या ॲपवर तक्रार दाखल होताच भारत निवडणूक आयोग तुमच्या तक्रारीची चौकशी करेल आणि योग्य ती कार्रवाई करेल.

डाटा सुरक्षा

या ॲपवरील डाटा हा सुरक्षित ठेवला जातो. हा डाटा इतर कोणत्याही थर्ड पार्टीला दिला जात नाही. याशिवाय हा डाटा एन्ड टू एन्ड इन्क्रिप्टेड ठेवला जातो.

डिजिटल कॉपीराईटचे गुन्हे आणि सायबर सुरक्षा जागरुकतेला प्राधान्य देण्याची गरज

‘मालवेअर’च्या प्रसाराचे पायरसी वेबसाइट्स मोठे माध्यम— ब्रिजेश सिंह

आयएसबी इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्सेसचा सायबर सुरक्षेबाबतचा अहवालाचे प्रकाशन

मुंबई, दि. २१ : पायरसी वेबसाइट्स मालवेअरचा प्रसार करण्यासाठी मोठे मध्यम बनले आहेत. ग्राहक केवळ पायरेटेड मुव्ही किंवा टीव्ही शो पाहत नसून ते त्यांच्या ‘डिव्हाइस’शी तडजोड करत आहेत आणि तुमचे ‘ डिव्हाईस’ ‘दुसरे तुम्हीच’ आहात. त्यात तुमची ओळख, तुमचे बँकिंग तपशील, तुमचे मित्र आणि कुटुंबीयांचे तपशील असतो. अनेक वर्षांपासून ज्या गोष्टी संदिग्ध होत्या, त्यांचा आता या अहवालात खुलासा करण्यात आला आहे. आयएसबी (इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस) चा अहवाल या बदलाची सुरुवात आहे, असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.

आयएसबी (इंडियन स्कूल ऑफ बिझनेस) द्वारे सायबर सुरक्षेबाबत सर्वंकष अभ्यास करण्यात आला. या अभ्यासावरील अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, दक्षिण आशियाचे अमेरिकी बौद्धिक संपदा सल्लागार जॉन कॅबेका, प्रादेशिक संचालन प्रमुख नील गणे आणि आयएसबी ‘ ‘इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्स’चे प्रा. मनीष गंगवार आदी मान्यवरांच्या हस्ते वाणिज्य दूतावास, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

यावेळी कार्यकारी संचालक मनीष गंगवार, ला ट्रोब युनिव्हर्सिटी (मेलबर्न) येथील सायबर सुरक्षा विभागाचे सहायक प्रा. डॉ. पॉल वॉटर्स, कॅरिन टेंपल यांनीही आपली मते मांडली.

‘आयएसबी इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्स’ चे प्रा. गंगवार आणि डॉ. श्रुती मंत्री, मेलबोर्नच्या ‘ला ट्रोब युनिव्हर्सिटी’ येथील सायबर सिक्युरिटीचे सहायक प्राध्यापक डॉ. पॉल वॉटर्स यांनी ‘दि पायरसी- मालवेअर नेक्सस इन इंडिया : अ परसेप्शन आणि अनुभव आणि अनुभवजन्य विश्लेषण’ या कार्यक्रमाचे आयोजन वाणिज्य दूतावास, मुंबई येथे अलायन्स फॉर क्रिएटिव्हिटी अॅण्ड एन्टरटेन्मेट (एसीई), आयएसबी इन्स्टिट्यूट ऑफ डेटा सायन्स (आयआयडीएस ) आणि एसीई यांनी युनायटेड स्टेट्स पेटंट अॅण्ड ट्रेडमार्क ऑफिस (यूएसपीटीओ) च्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.

अहवालातील निष्कर्ष

अहवालात प्रौढ उद्योग ५७ टक्के आणि जुगाराशी संबंधित जाहिरातीच्या ५३ टक्के तुलनेत पायरसी साइट्समध्ये प्रवेश केल्याने मालवेअर संसर्गाचा ५९ टक्के जास्त धोका उद्भवतो. ‘वायरस टोटल’ चा उपयोग करून १५० वेबसाइट्सच्या विश्लेषणात मालवेअर, संशयास्पद क्रियाकलाप, फिशिंगचे प्रयत्न आणि स्पॅम यासारख्या सायबर जोखीम असल्याचे समोर आले. मानक पायरसी संकेतस्थळांच्या तुलनेत “स्कॅम पायरसी संकेतस्थळ” उपयोग कर्त्यांना सायबर धोक्यांना समोर आणण्याचा धोका जास्त असतो.

मालवेअर वितरण पायरसी साइट संचालकांसाठी अतिरिक्त महसूल उत्पन्न करण्यासाठी भारतात ऑनलाइन पायरसी फायदेशीर राहिली आहे. भारतीय ग्राहक पायरसी साइट्सचा उपयोग करतांना त्यांच्या खऱ्या सायबर जोखमीला कमी लेखतात, पायरसी संकेतस्थळाशी संबंधित सायबर सुरक्षा धोक्यांकडे लक्ष देण्याची तातडीची गरज आहे यावर भर देतात. इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या (आयएसबी ) सायबर सुरक्षा तज्ञांनी केलेल्या तळागाळातील धारणा आणि अनुभव अध्ययनात (ग्राऊंड पर्सेप्शन ॲण्ड एक्सपिरिअन्स स्टडी) मालवेअर संसर्गाचा भारतीय ग्राहकांसाठी ५९ टक्के जोखीम असलेल्या पायरसी वेबसाइट्स एक प्रमुख धोका असल्याचे समोर आले आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे १८-२४ वर्षे वयोगटातील उपयोगकर्ते जे या प्लॅटफॉर्मवर जास्त व्यस्त असतात त्यांच्यात सायबर धोक्यांबाबत कमी जागरूकता असल्याचे दिसून आले.

हे सर्वेक्षण हे २३ ते २९ मे २०२३ या कालावधीत करण्यात आले. ‘YouGov’ नॅशनल ऑम्निबसचा भाग म्हणून भारतातील १०३७ उत्तररदात्यांचा यात समावेश आहे. भारतातील प्रौढ नागरिकांच्या वारंवारतेच्या प्रमाणात लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांवर आधारित १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील ऑनलाइन लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डेटाचे संतुलन करण्यात आले.

हा संपूर्ण अहवाल https://www.isb.edu/content/dam/sites/isb/India-Piracy-and-Cyber-Threats-Report-DM.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

निष्ठावंतांना संधी दिली पाहिजे, अन्यथा त्याचे विपरीत  पडसाद उमटतील-कॉंग्रेसमध्ये आक्रमक भूमिका

पुणे-यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी एकीकडे रवींद्र धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या बातम्या माध्यमातून येत असताना दुसरीकडे निष्ठावंतांना संधी दिली पाहिजे, अन्यथा त्याचे विपरीत  पडसाद सहाही विधानसभा मतदार संघात निश्चित उमटतील, अशी आक्रमक भूमिका घेत पर्वती विधानसभा मतदार संघातील  सर्व ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी आणि  कार्यकर्त्यांनी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करताना पक्ष श्रेष्ठींनी तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा तटस्थ राहण्याचा इशारा यावेळी पक्षाच्या निरीक्षक व अन्य पदाधिकाऱ्यांना दिला.

लोकसभा निवडणुकीसाठी पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या पर्वती ब्लॉकची बैठक संपन्न झाली.माजी उपमहापौर आबा बागुल यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी निरीक्षक मुख्तार शेख, अभय छाजेड, द. स पोळेकर, मार्केटयार्ड ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, पर्वती ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे, सतीश पवार, इम्तियाज तांबोळी, इर्शाद शेख आदींसह पदाधिकारी – कार्यकर्ते तसेच तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष घनश्याम वाळुंजकर, संताजी प्रतिष्ठान कोथरूडचे अध्यक्ष रमेश भोज, प्रकाश कर्डिले, हरीश देशमाने,अप्पा खवळे, दिपक ओव्हाळ,ओबीसी सेल पर्वतीचे अध्यक्ष रफिकभाई अलमेल, विनायक मुळे,जयकुमार ठोंबरे, पुणे पीपल्स बँकेच्या संचालिका निशा करपे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी लोकसभा निवडणुकीत जर निष्ठावंतांना डावलले जात असेल तर कार्य कसे करायचे, असा थेट सवाल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निरीक्षकांना विचारला. ज्यांनी आजवर पक्षाशी प्रामाणिकपणे राहून काम केले. त्यांनाच बाजूला सारण्याचे राजकारण होत असेल तर आता पक्षाच्या श्रेष्ठींनी निष्ठावंत म्हणजे काय ? याची व्याख्या जाहीररीत्या सांगावी, असे आव्हानही यावेळी भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी दिले. कोणत्याही स्थितीत निष्ठावंतांना संधी मिळालीच पाहिजे तरच एकदिलाने काम केले जाईल, असेही यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून मी समाजकारण आणि राजकारणात कार्यरत आहे. काँग्रेसचा निष्ठावंत आहे. सलग ३०वर्षे निवडून येत आहे आणि विकासाला सदैव प्राधान्य दिले आहे. पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळात रुजवली आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षात मरगळ होती. त्यामुळे जाहीर सभा घ्या आणि पुणेकरांचा कौल घेवून उमेदवार ठरवा हे पत्र दिले मात्र त्याला लेटर बॉम्बचे स्वरूप दिले. मात्र, काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत आहे हे वातावरण निर्माण झाले.ते पत्र जर लेटर बॉम्ब होते मग आता पुढे पहा काय होते. पुढील भूमिका ही कार्यकर्ते, समर्थक, मतदारांशी बोलून लवकरच ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच आताचे जे स्थानिक नेते आहेत.त्यांना पूर्वी कुणी थारा देत नव्हते. अशा नेत्यांची नावे विकासकामांच्या कोनशिलेवर माझ्याच आग्रहामुळे आयुष्यभर कोरली गेली. याची आठवणही आबा बागुल यांनी पक्षांतर्गत राजकारण करणाऱ्या स्थानिक नेत्यांना यावेळी करून दिली.


डॉ अभिजीत मोरे यांची आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी नियुक्ती

पुणे-डॉ अभिजीत मोरे यांची आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी आज नियुक्ती करण्यात आली. आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सह प्रभारी गोपाल इटालिया व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके – पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे.

डॉ अभिजीत मोरे हे आरोग्य चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते असून एक दशकाहून अधिक काळ त्यांनी सातत्याने सरकारी व खाजगी आरोग्य सेवेतील अनेक समस्यांबाबत प्रबोधन, प्रशिक्षण, आंदोलन, लेखन अशा विविध माध्यमातून काम केले आहे. अरविंद केजरीवाल यांच्यामुळे प्रभावित होऊन त्यांनी राजकीय परिवर्तनासाठी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला.

डॉ अभिजीत मोरे वर्ष 2014 पासून आम आदमी पार्टीमध्ये कार्यरत असून या अगोदर त्यांनी आम आदमी पार्टीमध्ये महाराष्ट्र राज्य प्रवक्ते, पुणे संघटन मंत्री या पदांवर काम केले आहे. डॉ अभिजीत मोरे हे आम आदमी पार्टीच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये सातत्याने कार्यरत असून पुणे शहरातील अनेक महत्त्वाच्या नागरी प्रश्नांवर, आरोग्य- शिक्षण- वीज- पाणी यासारख्या सार्वजनिक सेवांबाबत त्यांनी आवाज उठवला आहे. पुणे महानगरपालिकेतील अनेक घोटाळे त्यांनी उघडकीस आणले आहेत.

अल्पवयीन मुलांना दुचाकी वापरण्याचा परवाना नसताना त्यांना गाडी वापरण्यास दिल्याने पालक सहआरोपी …वाहनांची तोडफोड:दहशत प्रकरणात कारवाई

पुणे- पुणे शहरामध्ये वाहनांच्या तोडफोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. वाहनांची तोडफोड करणारे आरोपी हे अल्पवयीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या 9 अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल करुन अल्पवयीन मुलांना हत्यारे पुरवणाऱ्या लोहाराला अटक करण्यात आली आहे.दांडेकर पुल नव महाराष्ट्र भागात तीन दुचाकांवरुन येऊन काही मोटार सायकलची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (दि.18) घडली होती. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात आयपीसी 427, 34, 143, 147, 148, 149 सह मोटार वाहतूक कायदा, आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस काद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा 9 अल्पवयीन मुलांनी केल्याचे निष्पन्न झाले.दाखल गुन्ह्यात पोलिसांनी अल्पवयीन मुलांना हत्यारे देणारा लोहार भावेश दिपक चव्हाण (वय-21 रा. रविवार पेठ, पुणे) याला देखील अटक केली आहे. तसेच अल्पवयीन मुलांकडे दुचाकी वापरण्याचा परवाना नसताना त्यांना गाडी वापरण्यासाठी दिल्यामुळे त्यांच्या पालकांना सह आरोपी करुन गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलांनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी जप्त केल्या आहेत.तोडफोडीच्या गुन्ह्यामध्ये अल्पवयीन बालकांचा सहभाग आढळुन आल्यास त्यांच्यावर व त्यांना गुन्ह्यासाठी मदतकरणाऱ्यांवर तसेच मुलांच्या पालकांवर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार , पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, प्रकाश मरगजे, अनिस तांबोळी, सुर्या जाधव, दयानंद तेलंगे-पाटील, सद्दाम शेख, अमोल दबडे, अमित चिव्हे, पुरुषोत्तम गुन्ला, अक्षय खन्ना यांच्या पथकाने केली.


नांदेड व परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड दि. २१ : नांदेड शहर व तसेच अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यातून आज दिनांक २१ मार्चला सकाळी 06:09 व 06:19 मिनिटांनी  दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अधिकृतरित्या  दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केल वर अनुक्रमे 4.5 व 3.6 अशी नोंदविण्यात आलेली आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे.

नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

पैलवान कधीच म्हातारा होत नसतो..:भजनाला वयाशी जोडणे, हेही चुकीचेच; व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा पलटवार

पुणे- बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्यातच अजित पवार यांनी शरद पवार यांचे वय झाले आहे, त्यांनी आता भजन, कीर्तन करावे अशी टीका केली होती. अजित पवार यांच्या टीकेला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

वय नाही तर जिद्द महत्त्वाचे असते असे म्हणत रोहित पवार यांनी एक व्हिडिओ देखील ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक वयस्क व्यक्ती कुस्ती खेळताना दिसत आहे. या व्हिडिओत दिसते त्या प्रमाणे वयाकडे बोट दाखवून तुम्ही थांबत का नाही? असा प्रश्न विचारायचा नसतो, तर पैलवान कधीच म्हातारा होत नसतो, अशा शब्दात रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. यामध्ये रोहित पवार यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे देखील उदाहरण दिले आहे. कोवळ्या वयात त्यांनी अध्यात्माचा पाया घातला हे कळणे देखील महत्त्वाचे असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवार यांनी शरद पवार यांचे आता वय झाले असून त्यांनी भजन कीर्तन करावे, अशा शब्दात टीका केली होती. त्यांच्या या टिकेनंतर पवार कुटुंबीय आणि तसेच राज्यातील राजकारणातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तोच धागा पकडत आता आमदार रोहित पवार यांनी देखील अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

अजित पवार यांचे सख्खे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनी देखील अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. अजित पवार हा नालायक माणूस असल्याचे म्हणत श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. याचे पडसाद राज्याच्या राजकारणात दिसून आले त्यामुळे अजित पवार हे कुटुंबामध्ये एकटे पडले का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. श्रीनिवास पवार यांनी केलेल्या या टीकेचा परिणाम मात्र, युगेंद्र पवार यांना भोगावे लागले. बारामतीकरांनी युगेंद्र पवार यांना घेराव घालत यासंबंधीचा जाब विचारला होता. या सर्व पार्श्वभूमीवर पवार विरुद्ध पवार ही लढाई आता कोणत्या पातळीवर जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या संबंधी एक व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला आहे. त्याबरोच त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकाही केली आहे. ते म्हणाले की, ‘वय नाही तर जिद्द महत्वाची असते, हेच व्हॉटसअपवर आलेल्या कुस्तीच्या या व्हिडिओतून दिसतं… म्हणूनच वयाकडं बोट दाखवून ‘तुम्ही थांबत का नाही?’ असा प्रश्न विचारायचा नसतो..पैलवान कधीच म्हातारा होत नसतो.. राहिला प्रश्न भजनाचा, तर भजन हा व्यक्तिगत भक्तीचा विषय असल्याने कोणत्याही वयात भजन करता येतं. त्यामुळं भजनाला वयाशी जोडणं, हेही चुकीचं आहे.. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी कोवळ्या वयात भक्ती आणि अध्यात्माचा पाया रचला हे कळणंही महत्त्वाचं असतं आणि ते कळायला अध्यात्मावर भक्ती आणि आस्था लागते.’

माझे राजकारण सर्वसमावेशक त्यामुळे विजय निश्चित -पंकजा मुंडे

पुणे-लोकसभा निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही. मी 17 वर्षांची असताना रजनीताई यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला होता. बीड जिल्हा पुढारलेला आहे. मी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असते. 22 वर्षे मी त्याठिकाणी काम करत आहे, माझ्या विषयी कोणाला कटुता नाही. माझे राजकारण सर्वसमावेशक असल्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या की, मी माझ्या विकास कामांवर निवडणूक लढवत आहे. लोकसभा लढवण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. पण माझे राजकारण सर्वसमावेशक आहे. लोकांचीही मला साथ आहे. त्यामुळे मी सन्मानकारक मतांनी निवडून येईल असा मला विश्वास आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी पुण्यातील भाजपचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड येथील जनसंपर्क कार्यालयास भेट देत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी आमदार माधुरी मिसाळ ,आमदार उमा खापरे या उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, मी लोकसभा निवडणूक निमित्ताने बीड जिल्ह्यात जात असताना, विविध उमेदवार यांना भेटत आहे. मोहोळ यांना शुभेच्छ देण्यासाठी मी सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात आले आहे. मोहोळ यांची मी मोठी बहीण असून त्यांचा निवडणुकीत चांगला विजय झाला पाहिजे.

अहमदनगर येथे देखील मी उमेदवारास भेटणार आहे. त्यानंतर बीड येथे जाणार आहे. महाविकास आघाडी कडून बीडमध्ये तुल्यबळ उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. याबाबत त्या म्हणाल्या, निवडणूक ही सक्षमपणे लढण्यासाठी असते, माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली असून बीड येथून माझा विजय होईल. बदलत्या राजकीय घडामोडीत निवडणुकीत चांगला परिणाम आपल्या पदरात पाडून घेणे प्रयत्न प्रत्येक उमेदवाराचा असतो .मला पक्षाने सांगितले तर बारामतीसह इतर ठिकाणी राज्यात प्रचारास जाईल. मनसेला सोबत घेतल्याने पक्षाला फायदाच होणार असल्याने याबाबत बोलणी सुरू असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.