पुणे-लोकसभा निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही. मी 17 वर्षांची असताना रजनीताई यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला होता. बीड जिल्हा पुढारलेला आहे. मी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असते. 22 वर्षे मी त्याठिकाणी काम करत आहे, माझ्या विषयी कोणाला कटुता नाही. माझे राजकारण सर्वसमावेशक असल्यामुळे माझा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला.पंकजा मुंडे पुढे बोलताना म्हणाल्या की, मी माझ्या विकास कामांवर निवडणूक लढवत आहे. लोकसभा लढवण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. पण माझे राजकारण सर्वसमावेशक आहे. लोकांचीही मला साथ आहे. त्यामुळे मी सन्मानकारक मतांनी निवडून येईल असा मला विश्वास आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी पुण्यातील भाजपचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड येथील जनसंपर्क कार्यालयास भेट देत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी आमदार माधुरी मिसाळ ,आमदार उमा खापरे या उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, मी लोकसभा निवडणूक निमित्ताने बीड जिल्ह्यात जात असताना, विविध उमेदवार यांना भेटत आहे. मोहोळ यांना शुभेच्छ देण्यासाठी मी सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात आले आहे. मोहोळ यांची मी मोठी बहीण असून त्यांचा निवडणुकीत चांगला विजय झाला पाहिजे.
अहमदनगर येथे देखील मी उमेदवारास भेटणार आहे. त्यानंतर बीड येथे जाणार आहे. महाविकास आघाडी कडून बीडमध्ये तुल्यबळ उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. याबाबत त्या म्हणाल्या, निवडणूक ही सक्षमपणे लढण्यासाठी असते, माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली असून बीड येथून माझा विजय होईल. बदलत्या राजकीय घडामोडीत निवडणुकीत चांगला परिणाम आपल्या पदरात पाडून घेणे प्रयत्न प्रत्येक उमेदवाराचा असतो .मला पक्षाने सांगितले तर बारामतीसह इतर ठिकाणी राज्यात प्रचारास जाईल. मनसेला सोबत घेतल्याने पक्षाला फायदाच होणार असल्याने याबाबत बोलणी सुरू असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.