Home Blog Page 1103

महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी गैरवापर,रुपाली चाकणकरांवर कारवाई करा: संध्या सव्वालाखे

मुंबई, दि. ८ एप्रिल
महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाचा वापर आता राजकीय कार्यक्रमासाठी केला जात असून महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या आयोगाच्या कार्यालयातूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचे काम आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे म्हणाल्या की, महिला आयोगाचे अध्यक्षपद हे संवैधानिक पद आहे, महिला आयोगाच्या कार्यालयातच आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरणकर यांनी पक्ष प्रचाराचे काम करून पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे.पक्ष प्रचाराचे काम वरिष्ठाच्या दबावाखाली करावे लागत आहे का, हे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले पाहिजे. चाकणकर या दडपणाखाली पक्ष प्रचाराचे काम करत असतील तर ते अयोग्य व चुकीचा पायंडा पाडणारे व असंवैधानिक आहे. महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी जे कार्यालय आहे त्या कार्यालयातून राजकीय प्रचाराचे काम व्हायला नको. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून रुपाली चाकरणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत असल्याचे संध्याताई सव्वालाखे यांनी स्पष्ट केले.

249 वा आर्मी ऑर्डनन्स कोअर दिन साजरा

पुणे, 8 एप्रिल 2024

आर्मी ऑर्डनन्स कोअर (AOC) ने दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी त्यांचा दोनशे एकोणपन्नासावा स्थापना दिवस साजरा केला.
या महत्त्वाच्या समारंभाला, लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह , पीव्हीएसएम, एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, जीओसी-इन-सी, दक्षिण विभाग यांनी आर्मी ऑर्डनन्स कोअरच्या सर्व श्रेणीतील अधिकारी आणि जवानांचे अभिनंदन केले तसेच भारतीय सैन्याला उच्च दर्जाच्या आयुधांची रसद पुरवण्याच्या त्यांच्या व्यावसायिकतेचा आणि वचनबद्धतेचा गौरव केला. आर्मी ऑर्डनन्स कोअर 1775 मध्ये ‘बोर्ड ऑफ ऑर्डनन्स’ म्हणून अस्तित्वात आले आणि त्यांच्यावर सैन्याला शस्त्रे, दारूगोळा आणि उपकरणे यांचे पद्धतशीर वितरण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. स्थापनेनंतर, ‘बोर्ड ऑफ ऑर्डनन्स’ मध्ये अनेक बदल झाले, आणि ते 1922 मध्ये इंडियन आर्मी ऑर्डनन्स कोअर म्हणून ओळखले जाऊ लागले. भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर 1950 मध्ये त्यातील ‘भारतीय’ हे विषेश नाम वगळण्यात आले. संस्थेला आता ‘आर्मी ऑर्डनन्स कोअर’ म्हणून संबोधले जाते आणि भारतीय सैन्याला उपकरणे, सुटे सामान आणि दारूगोळा यांची ने-आण करण्याची याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.

नवोन्मेषाचा आनंद घेऊन रंगला’चिरायू’

‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ म्हणजेच ‘गुढीपाडवा’ उत्साहाने आणि उमेदीने साजरे करण्याची आपली परंपरा आहे. मराठी मनोरंजनसृष्टीही त्याला अपवाद नाही.  नवनवे संकल्प आणि कार्य-प्रकल्पांसोबत मनोरजंनाची गुढी उभारत मराठी नववर्षाचं स्वागत ‘चिरायू’तर्फे दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दणक्यात साजरं केलं जातं. यंदाही गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी ‘शेलार मामा फाऊंडेशन’ आणि ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने  नववर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं. ‘चिरायू २०२४’ साठी अवघं मराठी कलाविश्व एकवटलं होतं. 

‘शेलार मामा फाऊंडेशन’ आणि ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने आयोजित ‘चिरायू २०२४’ चे वैशिष्ट्य म्हणजे नवोन्मेषाच्या आनंदासोबतच पडद्यामागे राबणाऱ्या कलाकर्मींची दखल ‘चिरायू’ च्या मंचावर आवर्जून घेतली गेली. कलेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या सतीश लिंगाप्पा खवतोडे (कपडेपट), देविदास दरवेशी  (नेपथ्य), डॉ. खुशाले (रुग्णसेवा),  रेखा सावंत (केशभूषा) यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यंदाच्या या  सोहळ्यात रील स्टार्स रोहित मावळे  (फूड व्लागर),  आरजे प्रणित (स्टंड अप कामेडी), रोहन पाटकर (वाईल्ड लाईफ फोटोग्राफी),  वैष्णवी नाईक (फॅशन एंड लाईफस्टाईल) सुमन धामणे आजी  (खाद्यपदार्थ/ फूड) यांचाही गौरव करण्यात आला. ‘श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या सायली, रुद्र, हंसिका या लहानग्यांनी सुरेख गुढ्यांची निर्मिती केल्याबद्दल त्यांचं खास कौतुक ‘चिरायू’ च्या मंचावर करण्यात आलं.  

याप्रसंगी बोलताना‘चिरायू’चे सुशांत शेलार यांनी सांगितले की, ‘नव्या उमेदीने आम्ही नववर्षाची सुरुवात करीत असून मनोरंजनाच्या माध्यमातून कलेचा वसा समृद्धपणे जपण्याचा तसेच  मराठी सृष्टीला नाविन्याचा आयाम देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. वीणा ग्रुप, मुंबई बीट्स, नील ग्रुप, समर्थ व्हिजन हे यंदाच्या ‘चिरायू २०२४’ चे प्रायोजक होते.  

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित ‘अल्केमी २०२४’, आंतरमहाविद्यालयीन महोत्सवात तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे : मनमोहक नृत्य, सुमधुर गायन यासह विविध कलागुणांचे सादरीकरण, जिंकण्याच्या वृत्तीने खेळत आणि इनोव्हेशन, तंत्रज्ञानाच्या अविष्कारातून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचे, उत्साहाचे दर्शन घडवले. निमित्त होते, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (एआयटी) आयोजिलेल्या ‘अल्केमी २०२४’, आंतरमहाविद्यालयीन क्रीडा-सांस्कृतिक व तंत्रज्ञान महोत्सवाचे! दिघी येथील ‘एआयटी’च्या कॅम्पसमध्ये झालेला ‘अल्केमी-२०२४’ महोत्सव ‘पेस’ (क्रीडा), ‘अमेथिस्ट’ (सांस्कृतिक) आणि ‘सोल्युशन्स’ (तंत्रज्ञान) याचा त्रिवेणी संगम होता. ४० पेक्षा अधिक महाविद्यालयातून जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभागी घेतला. अमेरिका, इंग्लंड यासह भारतातील सात आयआयटी, पाच आयआयआयटीमधून विद्यार्थी सहभागी झाले होते.

‘पेस २०२४’ क्रीडा महोत्सवात बास्केटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, लॉन टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कबड्डी, स्क्वॅश आदी स्पर्धा झाल्या. ‘सोल्युशन्स’मध्ये रोबो रेस, ड्रोन ड्रॅग, शॉर्टेस्ट कोड, बाईक शो, सायबर सिक्युरिटी, रोबो वारस, मॉडेल मेकिंग अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आपले तांत्रिक कौशल्य लावत तंत्रज्ञानाचे अद्भुत अविष्कार दाखवले. ‘अमेथिस्ट’मध्ये पथनाट्य, प्रश्नमंजुषा, नाट्य, नृत्य, गायन व अन्य १३ प्रकारच्या स्पर्धा होत्या.
कांस्यपदक विजेता भारतीय तिरंदाज अतुल वर्मा यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. प्रसंगी ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडीयर (नि.) अभय भट यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. खेळ आपल्याला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देतात. आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी खेळ उपयुक्त असल्याचे वर्मा म्हणाले. स्पर्धेचे बक्षीस वितरण भारतीय ऍथलेट सुमी कलीवरण यांच्या हस्ते झाले. कठोर परिश्रम व स्मार्ट वर्क केले, तर कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे सुमी कलीवरण म्हणाल्या. सहसंचालक कर्नल (नि.) मनोज कुमार प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
एआयटी पुणे (क्रिकेट – मुले व मुली), एमएमसीईओई पुणे (कबड्डी), पीआयसीटी पुणे (व्हॉलीबॉल-मुले), झील सीओईआर पुणे (व्हॉलीबॉल-मुली), एआयटी पुणे (बास्केटबॉल-मुले), एमआयटी डब्ल्यूपीयू पुणे (बास्केटबॉल-मुली), एनडीए पुणे (स्क्वॅश-मुले-एकेरी) यांनी विजय मिळवला. गायन स्पर्धेत एमआयटीएडीटी पुणे (सोलो), एएफएमसी पुणे (ड्युएट), जेएसपीएम पुणे (सोलो नृत्य व समूहनृत्य), एएफएमसी पुणे (नृत्य ड्युएट) यांनी यश मिळवले. तांत्रिक स्पर्धेत आयआयटी मंडी, पीआयसीटी, सीओईपी, एमआयटी एडीटी, कमिन्स इंजिनिअरिंग, सिंहगड इंजिनिअरिंग, एआयटी पुणे यांनी यश संपादन केले. 

डिजिटल लॉक्सने आणली घरगुती व्यवस्थापनात क्रांती: गोदरेज लॉक्सच्या अभ्यासातून उघड

मुंबई, ०८ एप्रिल २०२४: भारतामध्ये घरगुती कामातील सहाय्यकांची भूमिका केवळ मदतीच्या खूप पलीकडची आहे. तो/ती लाखो कुटुंबांच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य घटक बनलेले असतात. गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्सने केलेल्या अलीकडील अभ्यासात भारतीय कुटुंबांचे घरगुती मदतनीसांबाबत खोलवर रुजलेले अवलंबित्व उलगडले आहे. ‘लिव्ह सेफ, लिव्ह फ्रीली’ असे शीर्षक असलेले हे सर्वसमावेशक संशोधन कुटुंब आणि त्यांचे  घरगुती मदतनीस यांच्यातील गहन आणि सखोल संबंधांवर प्रकाश टाकते. घरकामाच्या मदतीसाठी वक्तशीरपणाशी तडजोड करण्याची तयारी सुद्धा असते असे या पाहणीतील धक्कादायक आकडेवारी सांगते.

मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि भोपाळ या प्रमुख भारतीय शहरांमधील २,००० प्रतिसादकांचा समावेश असलेल्या या अभ्यासातून एक विशेष बाब समोर येते: महत्त्वाच्या भेटींसाठी नियोजित वेळ ठरलेली असतानाही अर्ध्या तासाहून अधिक काळ घरगुती मदतनीसांची वाट पाहत असल्याचे ४९% सहभागींनी मान्य केले. शिवाय, १५% प्रतिसादकर्त्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांच्या घरगुती मदतनीसांच्या सर्वोत्कृष्ट महत्त्वावर जोर दिला. केवळ मदतीच्या पलीकडे त्यांच्याशी एक भावनिक बंध तयार होतो असे सांगितले.

या माहितीबाबत भाष्य करताना गोदरेज लॉक्स अँड आर्किटेक्चरल फिटिंग्ज अँड सिस्टीम्सचे व्यवसाय प्रमुख श्याम मोटवानी म्हणाले, “आमच्या अभ्यासाचे निष्कर्ष म्हणजे केवळ आकडेवारी मांडणी नाही तर मोठ्या सामाजिक प्रवाहाचे सूचक आहेत. आम्ही आधुनिक भारतीय घरातील आव्हाने आणि हरतऱ्हेच्या वेगवेगळ्या योजनांचे व्यवस्थापन करण्यात असलेली गुंतागुंत ओळखतो. त्यामुळे, गोदरेज लॉक्सद्वारे विशिष्ट प्रकारच्या डिजिटल लॉकसह सुरक्षितता आणि सुविधेला प्राधान्य देणारा उपाय सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो.”

चुकीच्या किल्ल्यांमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी आणि नियंत्रित प्रवेश देण्यासाठी तयार केलेली डिजिटल लॉक्स घरगुती व्यवस्थापनासाठी विनाअडथळा अखंड सुविधा पुरवितात. कोणत्याही व्यत्ययाशिवाय वेळापत्रकांचे सुरळीत पालन सुनिश्चित करत वापरकर्ता-अनुकूल ॲपद्वारे घरमालक जगभरातील कोठूनही कुटुंबातील सदस्यांना आणि घरकाम मदतनीसांना प्रवेश देऊ शकतात. जोडीला, हे तंत्रज्ञान घरमालकांना त्यांच्या जागेत कोण कोण येत आहे यावर लक्ष ठेवण्यास सक्षम करते. त्यामुळे सुरक्षा आणि मनःशांती दोन्ही वाढते.

‘लिव्ह सेफ, लिव्ह फ्रीली’ या अभ्यासाचे उद्दिष्ट केवळ घरकामातील मदतीबाबत मानवी वर्तन समजून घेणे नव्हे तर सुरक्षितता आणि सोयीसाठी स्मार्ट-होम उपकरणांचा अवलंब कसा करता येईल याचा मागोवा घेणे हा आहे. व्यापक पोहोच आणि माहितीपूर्ण निष्कर्षांसह हा संशोधन अभ्यास समकालीन भारतीय समाजात घरगुती व्यवस्थापनाची पुर्नव्याख्या करण्यासाठी आधारभूत म्हणून काम करतो.

‘एमआयटी एडीटी’त मराठी नवर्षाचा हर्षोल्लास

पुणेः ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, विद्यार्थ्यांचे बहारदार नृत्याविष्कार अशा प्रफुल्लीत वातावरणात मराठी नववर्ष (गुढीपाडव्याचा) हर्षोल्लास पहायला मिळाला.
विद्यापीठात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विविध जात, धर्म, प्रांतांच्या विद्यार्थांना महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि परंपरा यांचे प्रतिक या उत्सवाद्वारे दाखविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राची पारंपारिक ओळख असणाऱ्या शिवराय ढोल-ताशा पथकाच्या सुरेल वादनाने करण्यात आली. त्यानंतर झालेल्या लोकनृत्य स्पर्धेत 25 हून अधिक नृत्य सादरीकरणे झाली, ज्यामध्ये महाराष्ट्रासह भारताच्या वेगवेगळ्या भागांतील संस्कृतींचे दर्शन घडविण्यात आले. ज्यामध्ये लावणी, पोवाडे, जोगवा-गोंधळ, उत्सवी तेलंगण नृत्य, आकर्षक गरबा, नाजूक मोहिनीअट्टम, उत्साही बिहू नृत्य, अशा विविध प्रकारच्या नृत्याअविष्कारांचा समावेश होता.


नृत्य स्पर्धेत स्कृल ऑफ मॅनेजमेंटच्या आर्या नांबियारने विजेतेपद तर श्रुती खंडागरेने उपविजेतेपद पटकाविले. तसेच गट प्रकारात लीप ऑफ ग्रेस ग्रुपच्या लावणी फ्युजनने बाजी मारली, तर ग्रूव्हन्स ग्रुपच्या आसामच्या बिहू नृत्याने दुसरा क्रमांक पटकावला.
नृत्य स्पर्धेनंतर स्पेक्ट्र-४.० चे देखील आयोजन करण्यात आले. गुढीपाडव्याच्या मंगलमय मुहुर्तावर विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश तु.कराड यांच्या हस्ते मुलींच्या वसतिगृहासाठीच्या सह्याद्री क्रीडा संकुलाचे उद्घाटन देखील करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, विंग कमांडर मोहन मेनन, प्रा. डाॅ. सुराज भोयर, प्रा. पद्माकर फड, प्रा. डॉ. अतुल पाटील आदी उपस्थित होते.

लकडी पूल विठ्ठल मंदिर परिसरातील देवराई मध्ये वृक्षारोपण

मंदिरातील निर्माल्याचा खत म्हणून वापरश्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पुना सिटी यांच्यावतीने उपक्रमाचे आयोजन

पुणे : टिळक चौकातील श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर परिसरातील देवराईमध्ये देशी झाडांची रोपे लावण्यात आली आहेत. या लावलेल्या झाडांचे पालकत्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी घेतले.  मंदिरात निर्माण होणाऱ्या निर्माल्याचा खत म्हणून वापर करून मंदिर परिसरात देवराई बहरली आहे. यामध्ये आणखी देशी झाडे लावण्यात आली आहेत.

श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पुना सिटी यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी  ट्रस्टचे कोषाध्यक्ष दीपक थोरात,  प्रमुख सरकारी वकील अॅडव्होकेट  विश्वास सातपुते,  इंटरनॅशनल लायन्स क्लबचे माजी गव्हर्नर अजित शेठ आणि अभय शास्त्री, लायन्स क्लबचे पुना सिटी प्रेसिडेंट नंदकुमार पापळ, माजी प्रेसिडेंट बजरंग आकडे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप थोरात, विश्वास भोर, अमर लांडे, गोंधळी समाजाचे अध्यक्ष परेश गरुड, श्रीकांत कुराडे, सामाजिक कार्यकर्ते नंदू दळवी, गौरव जाजू, रवींद्र फटाले, राजेंद्र मोरे यांच्या हस्ते ही सर्व झाडे लावण्यात आली. श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टचे विश्वस्त दिलीप बांदल, दिलीप काळभोर दीपक थोरात व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 
दीपक थोरात म्हणाले,  देशी झाडांचे महत्त्व कळावे आणि आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने मंदिरातर्फे ही फळझाडे लावण्यात आली. यात चिक्कू, आंबा, जांभूळ, नारळ अशी विविध फळ झाडे लावण्यात आली आहेत. मंदिर परिसरात देवराईची निर्मिती केल्याने निसर्गाचे अस्तित्व येथे निर्माण झाले आहे. मंदिरात फुले, फळे आणि पाने यांच्यापासून निर्माण होणारे निर्माल्य खत म्हणून वापरले जाते. त्यामुळे झाडांची वाढ चांगल्या पद्धतीने होत आहे. विविध पक्षांचे या देवराईत वास्तव्य वाढले आहे.

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,मावळात ‘धनुष्यबाण’च चालवा – अजित पवार

पिंपरी, दि. 8 एप्रिल – कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ‘धनुष्यबाण एके धनुष्यबाण’च चालवावे, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज दिल्या.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या सर्व घटक पक्षांची संयुक्त बैठक काळेवाडी येथील ‘रागा पॅलेस’मध्ये झाली. त्यावेळी पवार बोलत होते. बैठकीस भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, पुनर्वसन व मदत खात्याचे मंत्री अनिल पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, सुनील शेळके, क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, रिपब्लिकन पक्षा आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर तसेच अमित गोरखे, बापूसाहेब भेगडे, रवींद्र भेगडे, गणेश खांडगे, भाऊ गुंड, निलेश तरस, राजेंद्र तरस आदी पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मी कोणाला कोठेही पाठवलेले नाही- अजितदादा

अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार सांगतात, ‘दादांनीच मला इकडे पाठवले आहे’, पण ते साफ खोटे आहे. दादांनी कोणाला कोठेही पाठवलेले नाही. असल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. हलक्या कानाचे राहू नका. कितीही मैत्री अथवा नाते असले तरी निवडणुकीच्या काळात तरी विरोधी पक्षातील उमेदवाराला भेटू नका. ही गावकी-भावकीची निवडणूक नाही. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, सुरक्षिततेसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्षम नेते पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे. त्यामुळे या निवडणुकीत मावळामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांनाच प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घ्यावी.

भारताने गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली झपाट्याने प्रगती केली आहे, असे सांगून पवार म्हणाले की, विकासाची गॅरंटी म्हणजे काय हे मोदी यांनी दाखवून दिले आहे. देशात विकासाचे एकच नेतृत्व आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी. त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे भारताला जगात मानाचे स्थान मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील विकासाचे राजकारण करण्याची भूमिका आहे. त्यामुळे मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतला.

‘देशात विकासाची वज्रमूठ’

मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची वज्रमूठ तयार झाली आहे. त्यांच्या खंबीर नेतृत्वामुळे देश सुरक्षित वाटतो. भारताची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर नेण्याचे काम मोदी यांनी केले. भारताचे अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान होणे गरजेचे आहे, असे पवार म्हणाले.

विरोधकांकडे विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे खोटे नाटे आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. नरेंद्र मोदी राज्य घटना बदलणार आहेत, नागरिकत्व सुधारणा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे, ही शेवटची निवडणूक आहे, यापुढे मोदींची हुकूमशाही राहील, अशी खोटी भीती निर्माण केली जात आहे. त्याला सडेतोड उत्तर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दिले पाहिजे, असे पवार यांनी सांगितले.

राज्यघटनेतील दुरुस्ती देशहितासाठीच – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यघटनेत करण्यात आलेल्या दुरुस्त्या या देशहितासाठीच करण्यात आल्या आहेत. काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मोदी यांना तीन चतुर्थांश बहुमताची म्हणजेच 400 खासदारांची आवश्यकता आहे. त्यांना ती ताकद देण्यासाठी महायुतीचा प्रत्येक उमेदवार विजयी झाला पाहिजे. त्यासाठी नाराजी, रुसवे-फुगवे, मान-अपमान सर्व बाजूला ठेवून काम करावे.

प्रत्येक मतदारसंघात मोदी हेच उमेदवार – उदय सामंत

महायुती विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या तिघांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. त्यांना सर्व मित्र पक्षांची साथ आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, याचा विचार कोणीही करू नये. प्रत्येक मतदारसंघात मोदी, शिंदे, फडणवीस व पवार हेच उमेदवार आहेत, असे समजून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम करावे, असे आवाहन उदय सामंत यांनी केले.

विकासकामे पाहून मत द्या – बारणे

खासदार बारणे यांनी त्यांच्या भाषणात गेल्या दहा वर्षात केलेल्या प्रमुख विकास कामांचा आढावा सादर केला. पवना धरणातील गाळ काढून साठवण क्षमता वाढवणे, पुणे लोणावळा लोहमार्गाचे चौपदरीकरण, मेट्रोचा निगडी-किवळे-वाकड तसेच वाकड-नाशिक फाटा-चाकण असा मार्ग विस्तार, तळेगाव शिक्रापूर रस्त्याचे रुंदीकरण, देहूरोड ते वाकड उड्डाणपूल असे मोठमोठे विकास प्रकल्प मार्गी लावण्याचे त्यांनी सांगितले. पिंपरीत पासपोर्ट सेवा कार्यालय, बहुतांश रेल्वे स्थानकांचा विकास व सुशोभीकरण, हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीला मदत, कारला येथील एकविरा देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा, वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी अशा अनेक कामांचा बारणे यांनी उल्लेख केला.

लक्ष्मणभाऊंचे नाव विरोधकांनी वापरू नये – शंकर जगताप

भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप त्यांचे नाव व फोटो वापरून महाविकास आघाडीच्या उमेदवाराने गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न थांबवावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिला. 2019 च्या निवडणुकीपासून लक्ष्मणभाऊ महायुती बरोबर आहे. त्यांनी शेवटपर्यंत महायुती धर्माचे पालन केले. त्यांचा तोच वारसा आम्ही पुढे चालवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री अनिल पाटील तसेच बाळासाहेब पाटील, बाळा भेगडे, अश्विनी जगताप, सुनील शेळके, अजित गव्हाणे आदी नेत्यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. काही कार्यकर्त्यांनीही त्यांचे मनोगत मांडले. संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले.

अजितदादा पवार यांना “नित्यप्रेरणा” हे प. पू.गोळवलकर गुरुजी यांचे पुस्तक भेट – संदीप खर्डेकर.

मावळ लोकसभा महायुतीची समन्वय बैठक संपन्न

पुणे-आज मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांची समन्वय बैठक काळेवाडी येथे पार पडली. ह्या महाबैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी अजितदादा पवार, चंद्रकांतदादा पाटील, उदय सामंत, अनिल पाटील, मावळ चे महायुती चे उमेदवार श्रीरंगअप्पा बारणे सर्व आमदार, पक्षाध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी महायुतीचे समन्वयक व भाजपा चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. माधव सदाशिव ( गुरुजी ) गोळवलकर यांच्या चरित्रावर आधारित “नित्य प्रेरणा” हे पुस्तक भेट देऊन अजितदादा यांचा सत्कार केला. सदर पुस्तकाचे स्वरूप एक दिवस – एक पान – एक विचार असे असून यात श्री गुरुजींच्या विचारांचे संकलन आहे.अजितदादांनी आस्थेने पुस्तकाची माहिती घेतली.

ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा

पुणे : ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजपसोबत राहिलेला आहे व या निवडणुकीत देखील देशाचे भाग्यविधाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी ब्राह्मण समाजातील सर्व संस्थांनी एकमुखाने महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला.देशात सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्या निमित्ताने पुण्यातील ब्राह्मण समाजाच्या संस्थांसोबत भाजप नेते राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला. यावेळी राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी,भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेश प्रवक्ते व महायुती समन्वयक संदीप खर्डेकर, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वजीत देशपांडे, व्यावसायिक किशोर सरपोतदार इ मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

तसेच यावेळी प्रामुख्याने शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण मंडळाचे विश्राम कुलकर्णी, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे राजेंद्र कुलकर्णी, सुनील पारखी,अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिक चे पुणे केंद्राचे विश्वनाथ भालेराव, ब्राह्मण महासंघाचे चैतन्य जोशी,ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या ऍड. ईशानी जोशी, रिपाई ब्राह्मण आघाडीचे ऍड. मंदार जोशी, सर्व शाखीय ब्राह्मण महासंघाचे अशोक जोशी,प्रमोद जोशी,परशुराम सेवा संघाचे सर्वश्री उपेंद्र जपे, ऋषिकेश सुमंत, स्वप्निल कुलकर्णी, धीरज जोशी, शैलेश खोपटीकर, डॉ. संजीवनी पांडे, श्रुती कुलकर्णी,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे विजय शेकदार,वृषाली शेकदार, केतकी कुलकर्णी, पल्लवी गाडगीळ, आदींसह सर्वच संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले ब्राह्मण समाज हा नेहमीच देशाच्या प्रगतीत वाटा उचलणारा समाज आहे, ब्राह्मण समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाने अमृत नावाची संस्था देखील सुरू केली आहे व वेळोवेळी ब्राह्मण समाजाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार व स्वतः वैयक्तिक पातळीवर देखील आपण प्रयत्न करतच असतो या सर्व संस्था अतिशय उत्तम काम करीत आहेत व त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू.

पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले गेली 25 वर्ष ज्या भागातून मी राजकारण करत आहे तो संपूर्ण भाग ब्राह्मण बहुल असून ब्राह्मण समाजाने नेहमीच मला पुत्रवत प्रेम दिले आहे माझ्यासाठी नेहमीच खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या या समाजाला मी देखील कोणतीही तक्रारीची संधी देणार नाही देशाची यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पंतप्रधान मोदींचे हात बळकट केले पाहिजे.
ह्या बैठकीत विधानसभा निहाय मेळावे घेऊन महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याचे ठरविण्यात आले.

भर सभेत धमकीची चिठ्ठी, शरद पवारांनी वाचून दाखविली

घड्याळाला मतदान केले नाही तर पाणी मिळणार नाही, कारखान्याला ऊस जाणार नाही,अशा धमक्यांना घाबरू नका, त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आता आली आहे,

सुपे येथील सभेत शरद पवार यांना उपस्थितांमधून एक चिठ्ठी देण्यात आली. घड्याळाला मतदान केले नाही तर पाणी मिळणार नाही, कारखान्याला ऊस जाणार नाही, असा मजकूर या चिठ्ठीत होता. शरद पवार यांनी ही चिठ्ठी वाचून दाखवली. अशा धमक्यांना घाबरू नका, त्यांना दुरुस्त करण्याची वेळ आता आली आहे, या शब्दात त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे वाभाडे काढले.शरद पवार यांनी आज उंडवडी कडेपठार, कारखेल, देऊळगाव रसाळ, सुपे येथे दौरा केला. उंडवडी व सुपे येथे त्यांची सभा पार पडली. या सभेत त्यांनी जनाई-शिरसाई योजनेच्या कामाची जबाबदारी मी ज्यांच्यावर दिली होती, त्यांनी ती पार पाडली नाही. मी गेली २० वर्षे स्थानिक विषयात लक्ष घालत नव्हतो. परंतु आता लक्ष घालून मी माझी जबाबदारी पार पाडेन, असे स्पष्ट केले. बारामतीच्या जिरायत भागाने नेहमीच मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे या माझ्या माणसांचे प्रश्न सोडवणे ही माझीच जबाबदारी असल्याचे पवार म्हणाले.शरद पवार यांनी आज बारामतीच्या जिरायत भागाचा दौरा केला.जनाई-शिरसाई पाणी योजनांसंबंधी शरद पवार यांनी या दौऱ्यात भाष्य केले.जनाई-शिरसाई योजना या बारामती तालुक्याच्या जिरायत भागातील शेती सिंचनासाठी राबविण्यात आल्या. परंतु योजना सुरु झाल्यापासून त्याचे दुखणे सुरु आहे. योजनांचे वीज बिल परवडत नाही. पाणी येत नाही, पोटचाऱ्यांची कामे नाहीत, असे अनेक प्रश्न योजनेसंबंधी आहेत. याच विषयावरून मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी सुपे येथे उपोषण झाले होते. उपोषणकर्त्यांची खा. सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली होती. त्यानंतर लागलीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भेट घेतली होती. त्याच कालावधीत काही लोकांनी गोविंदबागेत शरद पवार यांची भेट घेत या विषयात लक्ष घालण्याचे आवाहन केले होते.हा प्रश्न तापतो आहे हे लक्षात येताच अजित पवार यांनी सुप्यात शेतकरी मेळावा घेतला होता. हे काम करायचे झाले तर मीच करू शकतो, कोणीही मायचा लाल हे काम करू शकत नाही, हा दावा त्यांनी केला होता. शरद पवार यांनीही त्याला प्रत्युत्तर म्हणून, ही योजना माझ्या सहीने मार्गी लागल्याचे सांगितले होते. जिरायती भागातील मते या दोन्ही गटासाठी लोकसभा निवडणूकीत निर्णायक आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी थेट मंत्रालयात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. उपसा सिंचन योजना सौर उर्जेवर चालविण्याचा निर्णय घेतला होता.शिवाय उपोषणकर्त्यांना ठोस आश्वासने देत त्यांचे उपोषण मागे घेण्यात मोठी भूमिका बजावली होती. या सगळ्या घडामोडीनंतर आता शरद पवार जिरायती भागात अॅक्टीव्ह झाले आहेत.त्यामुळे जनाई-शिरसाई योजनांचा श्रेयवाद रंगला आहे.
00:13 / 03:15

तब्बल ११ हजार १११ द्राक्षांनी सजले ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर

श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन ; गुढीपाडव्याच्या निमित्ताने भाविकांना द्राक्षांचा प्रसाद
पुणे : कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात तब्बल ११ हजार १११ द्राक्षांची आकर्षक सजावट करण्यात आली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही आरास मंदिरात करण्यात आली असून भाविकांना द्राक्षांचा प्रसाद देण्यात येणार आहे. काळ्या, हिरव्या व पिवळ्या द्राक्षांनी मंदिराचा गाभारा सजविण्यात आला होता. 
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात द्राक्षांची व फुलांची आरास करण्यात आली होती. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.
श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात द्राक्षांची केलेली सजावट पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.

मन प्रसन्न ठेवण्यासाठी पंच सुत्रांचा आधार घ्यावा- तनुश्री गर्भसंस्कारतर्फे आयोजित कार्यक्रमात गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांचा सल्ला

पुणे, दि. 8 एप्रिल : “जीवनात सदैव प्रसन्न राहण्यासाठी प्रथम मी जीवंत आहे, द्वितीय रोज स्वतःला आरशात पहा, तृतीय समोरील व्यक्तीचे बरोबर आहे, चतुर्थ शरीर व मन मजबूत राहण्यासाठी रोज व्यायाम करा आणि आयुष्यभर शिकत रहा. या पंचसुत्रांच्या आधारे मनःशांती मिळते” असा सल्ला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांनी दिला.
स्व. मनसुखलालाजी गुगळे स्मृतीप्रित्यर्थ तनुश्री गर्भसंस्कार परिवारातर्फे न्यू सांगवी येथील साई चौक स्थित संस्कृती लॉन्समध्ये आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध गप्पष्टककार व अष्टपैलू व्यक्तिमत्व डॉ. संजय उपाध्ये यांना पहिला ‘तनुश्री जनसंस्कार पुरस्कार’ डॉ. सुप्रिया गुगळे, डॉ. अनिल गुगळे व डॉ. तन्वी गुगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.  तसेच ‘ मुद्रा शक्ती’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गोपल बोहरा, अनिल शर्मा व मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी मंचावर अभिनेत्री शिवानी सोनार, डॉ. यश वेलणकर, अभिनेत्री गार्गी फुले, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, बालकलाकार अन्यया टेकावडे , वैद्य सुनीमय दामले, डॉ. सुगंधा रानडे,  ब्रह्माकुमारी संजीवनी दीदी, डॉ. अनुप भारती उपस्थित होते.
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, “जीवनात खूप मोठे तत्वज्ञानी बनण्यापेक्षा विनोदी बना. माणसाने रसग्रहण करण्याची क्षमता वाढवावी. मन अप्रसन्न होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये आपल्या मनासारखे न घडणे, स्वतःची इमेज झटकून सर्वांमध्ये न मिसळणे आणि घरातील वर्तमानपत्र मन प्रसन्न करत नाही. जीवनात श्वास, विश्वास आणि आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा आहे. ”
डॉ. सुप्रिया गुगळे म्हणाल्या,”मोबाइलच्या काळात मानवाचा एकमेकांशी सूर हरविला आहे. तो सूर शोधण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तनुश्री परिवार हा सर्वाच्या मनाच्या ठाव घेऊन स्वतःशी संवाद साधण्यासाठी कार्य करीत आहेत.”
डॉ. अनुप भारती म्हणाले, “मोबाइल ने ब्रेन कॅप्चर केला आहे. लहान मुलांचा मेंदू पूर्ण प्रगत न झाल्याने त्यांना योग्य व अयोग्याचे निर्णय घेता येत नाही. रिल्समुळे व्यक्ती हा आभासी जगात वावरतांना दिसतो. त्यातच सोशल मिडिया मानवाला बोथट करीत आहे. मोबाइलमुळे संशयीपणा, मानसिक आजार हे वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे या पासून दूर रहा.”
डॉ. यश वेलणकर म्हणाले,”सतत विचार करीत राहणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या आहे. त्यातच मोबाइलमुळे ओव्हर थिंकिंग वाढत आहे. अशा वेळेस सजगता आणि भान ठेऊन मन प्रसन्न ठेवता येते.”
त्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, अभिनेत्री गार्गी फुले, अभिनेत्री शिवानी सोनार, वैद्य सुविनय दामले, डॉ. तन्वी गुगळे व अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडले.
या प्रसंगी किशोर खाबिया, शुभांगी दामले,विजय जकातदार, प्रविण खाबिया, उषा जैन   यांच्या सहित अन्य व्यक्तिंचाही सत्कार करण्यात आले.
या नंतर ‘मिले सूर हमारा तुम्हारा’ या अनोख्या थीमच्या माध्यमावर गाण्यांचा कार्यक्रम झाला.
डॉ. भाग्यश्री कश्यप यांनी सूत्रसंचालन केेले. श्री. मुनोत यांनी आभार मानले.

चाकण एमआयडीसी पसिरात वीज खंडित-महापारेषणच्या लोणीकंद उपकेंद्रात बिघाड;

पुणे, दि०८ एप्रिल २०२४: महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही अतिउच्चदाब लोणीकंद उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे चाकण एमआयडीसीमधील महापारेषणच्या तीन अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी महावितरणच्या ३४ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा देखील बंद पडला. त्यामुळे चाकण एमआयडीसी व परिसरातील सुमारे ४० हजार ३०० घऱगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी (दि. ८) सकाळी ९.३१ ते १०.१५ वाजेपर्यंत बंद राहिला.

याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या लोणीकंद ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून चाकण एमआयडीसीमधील चाकण ४०० केव्ही, चाकण फेज दोन २२० केव्ही व ब्रीजस्टोन २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रांना वीजपुरवठा केला जातो. मात्र आज सकाळी ९.३१ लोणीकंद उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे सुमारे १८१ मेगावॅट विजेची पारेषण तूट निर्माण झाली.

त्यामुळे भार व्यवस्थापनासाठी एलटीएस (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे चाकण एमआयडीसीमधील महापारेषणच्या तीनही अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी या उपकेंद्रांतून महावितरणच्या ३४ वीजवाहिन्यांचा देखील वीजपुरवठा खंडित झाला. चाकण एमआयडीसी व परिसरातील शिंदेगाव, सावरदरी, वराळे, वासुली, येलवाडी, खालुंब्रे, संगुर्डी, एमआयडीसी फेज दोन, भांबोरी, सारा सिटी, कुरुळी, नाणेकरवाडी, आळंदी फाटा, चिंबोली, निघोजे, मोई आदी गावांतील ८०० उच्चदाब व ५५०० लघुदाब औद्योगिक ग्राहक तसेच सुमारे ३५ हजार घरगुती व वाणिज्यिक ग्राहकांचा वीजपुरवठा सकाळी १०.१४ वाजेपर्यंत बंद राहिला.

मोदींचे,शहांचे राजकीय पूर्वज मुस्लिम लीग आणि इंग्रजांचे समर्थक-खरगेंचा हल्ला

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सोशल मीडियावर पोस्ट केली. मोदी आणि शाह यांच्या राजकीय आणि वैचारिक पूर्वजांनी स्वातंत्र्यलढ्यात भारतीयांच्या विरोधात ब्रिटिश आणि मुस्लिम लीगला पाठिंबा दिल्याचे खरगे यांनी लिहिले आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांची पोस्ट

मोदी-शहांच्या राजकीय आणि वैचारिक पूर्वजांनी स्वातंत्र्य चळवळीत भारतीयांच्या विरोधात ब्रिटिश आणि मुस्लिम लीगला पाठिंबा दिला.

आजही ते सामान्य भारतीयांच्या योगदानाने बनवलेल्या ‘काँग्रेस न्याय पत्रा’च्या विरोधात मुस्लिम लीगला आवाहन करत आहेत.

1942 मध्ये महात्मा गांधींच्या भारत छोडो या आवाहनाला आणि मौलाना आझाद यांच्या नेतृत्वाखालील चळवळीला मोदी-शहा यांच्या पूर्वजांनी विरोध केला होता.

तुमच्या पूर्वजांनी 1940 मध्ये बंगाल, सिंध आणि NWFP मध्ये मुस्लिम लीगसोबत आपली सरकारे स्थापन केली हे सर्वांना माहीत आहे.

श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नरला पत्र लिहून 1942 चे देश आणि काँग्रेसचे भारत छोडो आंदोलन कसे दडपले जावे हे लिहिले नव्हते का? आणि त्यासाठी ते इंग्रजांना साथ द्यायला तयार होते.

मोदी-शहा आणि त्यांचे नामनिर्देशित अध्यक्ष (जे.पी. नड्डा) आज काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल चुकीचे समज पसरवत आहेत.

मोदींच्या भाषणातून फक्त आरएसएसचा वास येतो. भाजपची निवडणूक दिवसेंदिवस इतकी बिकट होत चालली आहे की आरएसएसला आपला जुना मित्र मुस्लिम लीग आठवू लागला आहे.

एकच सत्य आहे –

काँग्रेस न्याय पत्रावर भारतातील 140 कोटी लोकांच्या आशा आणि आकांक्षांची छाप आहे.

त्यांची एकत्रित ताकद मोदीजींचा 10 वर्षांचा अन्याय दूर करेल.