मंदिरातील निर्माल्याचा खत म्हणून वापरश्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पुना सिटी यांच्यावतीने उपक्रमाचे आयोजन
पुणे : टिळक चौकातील श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर परिसरातील देवराईमध्ये देशी झाडांची रोपे लावण्यात आली आहेत. या लावलेल्या झाडांचे पालकत्व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी घेतले. मंदिरात निर्माण होणाऱ्या निर्माल्याचा खत म्हणून वापर करून मंदिर परिसरात देवराई बहरली आहे. यामध्ये आणखी देशी झाडे लावण्यात आली आहेत.
श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब ऑफ पुना सिटी यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष दीपक थोरात, प्रमुख सरकारी वकील अॅडव्होकेट विश्वास सातपुते, इंटरनॅशनल लायन्स क्लबचे माजी गव्हर्नर अजित शेठ आणि अभय शास्त्री, लायन्स क्लबचे पुना सिटी प्रेसिडेंट नंदकुमार पापळ, माजी प्रेसिडेंट बजरंग आकडे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप थोरात, विश्वास भोर, अमर लांडे, गोंधळी समाजाचे अध्यक्ष परेश गरुड, श्रीकांत कुराडे, सामाजिक कार्यकर्ते नंदू दळवी, गौरव जाजू, रवींद्र फटाले, राजेंद्र मोरे यांच्या हस्ते ही सर्व झाडे लावण्यात आली. श्री लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टचे विश्वस्त दिलीप बांदल, दिलीप काळभोर दीपक थोरात व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दीपक थोरात म्हणाले, देशी झाडांचे महत्त्व कळावे आणि आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने मंदिरातर्फे ही फळझाडे लावण्यात आली. यात चिक्कू, आंबा, जांभूळ, नारळ अशी विविध फळ झाडे लावण्यात आली आहेत. मंदिर परिसरात देवराईची निर्मिती केल्याने निसर्गाचे अस्तित्व येथे निर्माण झाले आहे. मंदिरात फुले, फळे आणि पाने यांच्यापासून निर्माण होणारे निर्माल्य खत म्हणून वापरले जाते. त्यामुळे झाडांची वाढ चांगल्या पद्धतीने होत आहे. विविध पक्षांचे या देवराईत वास्तव्य वाढले आहे.