Home Blog Page 1104

तुळशीबाग, शनिपार परिसरात वीज खंडित-खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडली

पर्यायी वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी खोदाईच्या परवानगीची प्रतीक्षा

पुणे, दि०८ एप्रिल २०२४: महावितरणच्या मंडई २२/११ केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करणारी भूमिगत वीजवाहिनी पुणे महानगरपालिकेच्या पाइपलाइनच्या खोदकामात १५ दिवसांपूर्वी तोडण्यात आली होती. त्याच ठिकाणी पुन्हा रविवारी (दि. ७) रात्री ९ वाजता बिघाड झाला. त्यामुळे मंडई परिसरातील तुळशीबाग, शनिपार, विश्रामबाग वाडा आदी परिसरात खंडित झालेला १५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवारी (दि. ८) सकाळच्या सुमारास पूर्ववत करण्यात आला.

दरम्यान मंडई उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या पर्यायी वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी ५ मीटर खोदाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी दि. १ एप्रिलला महावितरणकडून लेखी परवानगी मागण्यात आली. मात्र पालिकेकडून ती मिळाली नसल्याने पर्यायी स्वरूपात वीजपुरवठा उपलब्ध करून देता आला नाही.

याबाबत माहिती अशी, पर्वती विभाग अंतर्गत मंडई २२/११ केव्ही उपकेंद्रातून मंडई, तुळशीबाग, लक्ष्मी रोड आदी परिसरातील सुमारे १७ हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. या उपकेंद्राला रास्तापेठ व नवी पेठ या दोन स्वतंत्र २२ केव्ही भूमिगत वाहिन्यांद्वारे वीजपुरवठ्याची सोय आहे. दरम्यान १५ दिवसांपूर्वी यातील रास्तापेठ वीजवाहिनी पुणे महानगरपालिकेच्या पाइपलाइनच्या खोदकामात तोडण्यात आली. संबंधित कंत्राटदाराने या वाहिनीच्या दुरुस्तीचे व जाईंटिंगचे काम केले होते. त्याच दरम्यान नवी पेठ वीजवाहिनीमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मंडई उपकेंद्राच्या वीजपुरवठ्याची पर्यायी स्त्रोत बंद झाला. या वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडे ५ मीटर रस्ताखोदाईची परवानगी मागण्यात आली. परंतु ती मिळाली नाही.

दरम्यान रविवारी (दि. ७) रात्री ९ वाजता रास्तापेठ वीजवाहिनीला १५ दिवसांपूर्वी लावलेला जाईंट खराब झाल्याने वीजवाहिनी नादुरुस्त झाली. खोदाई परवानगी न मिळाल्याने नवीपेठ वीजवाहिनीचा पर्यायी उपलब्ध नव्हता. त्यामुळे मंडई उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडल्याने सुमारे १७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. यानंतर महावितरणकडून मंडई उपकेंद्राच्या ६ पैकी ५ वीजवाहिन्यांना तासाभरात अथक प्रयत्नांनी पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात आला. मात्र उन्हाळ्यामुळे वीजभार वाढल्यामुळे महालक्ष्मी या वीजवाहिनीवरील तुळशीबाग, शनिपार, विश्रामबाग वाडा, नागनाथ पार येथील १५०० ग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागला. तो सकाळच्या सुमारास पूर्ववत करण्यात आला. महावितरणकडून रास्तापेठ भूमिगत वीजवाहिनीचे रविवारी रात्री ११.३० वाजता दुरुस्ती काम सुरु करण्यात आले. सकाळी ११ वाजता ते पूर्ण झाल्यानंतर चाचणी घेऊन या वीजवाहिनीद्वारे मंडई उपकेंद्राचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

महावितरणचे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन आता सौर ऊर्जेवर

0

पुण्यातील सौर प्रकल्पाची संचालक श्री. प्रसाद रेशमे यांच्याकडून पाहणी

पुणे, दि०८ एप्रिल २०२४: राज्यातील महावितरणच्या विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्सला आता सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. चार्जिंग स्टेशन्सच्या वीजपुरवठ्यासाठी त्याच परिसरात सौर प्रकल्प उभारून ‘हरित ऊर्जे’ची निर्मिती करण्यात येणार आहे.

दरम्यान विद्युत वाहनाच्या चार्जिंग स्टेशनला हरित ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करणारा पहिला प्रकल्प पुण्यातील गणेशखिंड येथे साकारत आहे. या चार्जिंग स्टेशनसाठी उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाची महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे यांनी शनिवारी (दि. ५) पाहणी केली.

महावितरणकडून अनेक उपकेंद्र व प्रशासकीय इमारतीच्या आवारात विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. यात पुणे परिमंडलामध्ये शहरी व ग्रामीण भागात एकूण १८ ठिकाणी विद्युत वाहनांचे चार्जिंग स्टेशन्स कार्यान्वित झाले आहेत. या चार्जिंग स्टेशनला हरित ऊर्जेतून वीजपुरवठा करण्यासाठी आता चार्जिंग स्टेशनलगतच्या इमारतीवर किंवा खुल्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे.

गणेशखिंड येथील ‘प्रकाशभवन’ इमारतीच्या छतावर ६० किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम निविदा प्रक्रियेनंतर सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पातून दरमहा निर्माण होणाऱ्या सुमारे ७ हजार २०० युनिट विजेचा ‘प्रकाशभवन’ परिसरातील विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनला पुरवठा करण्यात येईल. संचालक (प्रकल्प) श्री. प्रसाद रेशमे यांनी या सौर ऊर्जा प्रकल्पाची तांत्रिक पाहणी केली. तसेच इतर चार्जिंग स्टेशन्ससाठी सौर ऊर्जा निर्मितीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच हा सौर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री संजीव राठोड, अनिल गेडाम, अमित कुलकर्णी, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांची उपस्थिती होती.

श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल – ‘पुणे परिमंडल अंतर्गत महावितरणने कार्यान्वित केलेल्या चार्जिंग स्टेशनला हरित ऊर्जेतून वीजपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून १८ पैकी जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशनला हरित ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न आहे’.

फडणवीसांसह त्यांचे नेते घाबरलेत,रोहित पवारांचा हल्लाबोल

पुणे- विनोद तावडे साहेबांकडे महाराष्ट्र राज्याचे सगळे अधिकार जात आहेत. राज्यातले सगळे मोठे निर्णय ते घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन कमी होत आहे. फडणवीस आणि त्यांचे नेते घाबरले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घरवापसी होणार आहे. यावरून रोहित पवार यांनी केली आहे.

खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं. खोट्या फाईल काढून जसं केजरीवालांना आत टाकलं तसा त्यांचा प्लॅन असावा, अशी टीका रोहित पवार यांनी भाजपवर केली.रोहित पवार म्हणाले की, मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही. त्यांच्या अडचणी खूप आहेत. भाजप खोट्या फाईल काढून त्यांच्यावर कारवाई करू शकतं. खडसे साहेबांची तब्येत खूप खराब आहे. अशा तब्येतीत त्यांना भाजप जेलमध्ये देखील टाकू शकते. भाजपने असे खोटे आरोप करून अनेक नेत्यांची ताकद कमी केली आहे. नेत्यांना भीती दाखवली जात आहे. खडसेंना ब्लॅकमेल केलं गेलं असावं. खोट्या फाईल काढून जसं केजरीवालांना आत टाकलं तस त्यांचा प्लॅन असेल, असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला आहे.रोहित पवार म्हणाले की, फडणवीस साहेब आता वैतागले आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे नेते असून देखील विनोद तावडे साहेबांकडे महाराष्ट्र राज्याचे सगळे अधिकार जात आहेत. राज्यातले सगळे मोठे निर्णय ते घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय वजन कमी होत आहे. फडणवीस आणि त्यांचे नेते घाबरले आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

रोहित पवार म्हणाले की, प्रवीण माने हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. याबाबत रोहित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, प्रवीण माने यांचा खूप मोठा व्यवसाय आहे. त्यांची खूप मोठी संपत्ती आहे. त्यामुळे माने मनातून गेले की त्यांना मारून नेलं हे बघावं लागेल. नेते गेले मात्र लोक आपल्यासोबत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे तीन लाखांच्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कुणाचाही दबाव नाही आणि मी कोणावरही नाराज नाही, 15 दिवसांत दिल्लीत वरिष्ठांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश करणार-एकनाथ खडसे

मुंबई–मी 15 दिवसांत दिल्लीत वरिष्ठांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असे एकनाथ खडसेंनी स्वतः सांगताना आपल्यावर कुणाचाही दबाव नाही आणि आतापण कोणावरही नाराज नाही उलट मीच ४२ वर्षाच्या पक्षाशी असलेल्या लगावामुळे नाराज होतो आता ती नाराजीची तीव्रता उरलेली नाही असे स्पष्ट केले आहे.

एकनाथ खडसे यांनी स्वत: माध्यमांशी बोलताना हा खुलासा केला. खडसे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मी कायमच ऋणी राहिल. शरद पवारांनी आपल्याला संकट काळात मदत केली. त्यामुळे त्यांना विसरणे अशक्य आहे. परंतु मला माझ्या मुळ पक्षात असले पाहिजे, अशी साद अनेक ज्येष्ठ नेत्यांनी घातली होती. त्यानंतर मी विचार करून हा निर्णय घेतला आहे.
भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मी भेट घेतली. भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. येत्या 15 दिवसांच्या आत हा प्रवेश व्हावा, अशा स्वरुपाचा माझा प्रयत्न आहे. चंद्रपूरच्या सभेत वगैरे माझा भाजप प्रवेश नाही. माझा भाजपप्रवेश हा दिल्लीला होणार आहे. दिल्लीला केंद्रीय नेतृत्वाकडून मला ज्यादिवशी बोलवणं येईल त्याच दिवशी माझा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.जुन्या कार्यकर्त्यांनी विनंती केली.एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता. पण भाजपमध्ये जुने कार्यकर्ते आणि नेत्यांशी चर्चा करत असताना तुम्ही पक्षात परत आले पाहिजे. तुम्ही परत आले तर बरं होईल, अशी चर्चा आमची आणि वरिष्ठांमध्ये नेहमी होत असे. हे काय आजचं नव्हतं. चार ते सहा महिन्यांपासून त्यांनी अशाप्रकारची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून चर्चा सुरु होती, असेही खडसे म्हणाले.भाजपच्या जडणघडणीत माझा सहभाग
भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीमध्ये माझे योगदान राहीलं आहे. गेले अनेक वर्ष मी या घरामध्ये राहिलो आहे. चाळीस-बेचाळीस वर्ष ज्या भाजपमध्ये मी राहिलो त्यामुळे माझा लगाव जाण्याचा होता. काही कारणासाठी माझी नाराजी झाली. त्यामुळे मी या पक्षातून बाहेर पडलो होतो. माझ्या नाराजीची तीव्रता कमी झाली म्हणून मी माझ्या पक्षात जाण्याचा पुन्हा विचार करतोय, असेही एकनाथ खडसे म्हणाले. खडसे म्हणाले की, माझ्या पक्षप्रवेशाने कोणाचीही नाराजी नाही मी सर्वांना घेऊन चालणारा आहे. माझ्याविषयी कोणाची नाराजी असेल तर मी ते दूर करण्याचा प्रयत्न करेन. माझी नाराजी कमी झाली. त्यामुळे मी हा निर्णय घेतला.माझ्यावर कोणताही दबाव नाही
एकनाथ खडसे म्हणाले की, मला तुरुंगात टाकण्याचा कुठलाही धाक माझ्या मनात नव्हता. मी जामीनावर आहे. त्यामुळे मला पर्मनंट जामीन मिळाला आहे. त्यामुळे केस चालत राहील आणि मला कोणी उठून जेलमध्ये टाकेल, अशी देखील परिस्थिती आज तरी नाही. मी या संदर्भात निश्चित आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

निवडणूक आणि प्रचार : राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

या देशातील प्रत्येक नागरिक हा भारतीय असून भारतीय म्हणून त्याला प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे. यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण होणे ही एक अट महत्त्वाची आहे. ज्याला निवडणुकीत उभे राहायचे आहे, असा व्यक्ती स्त्री-पुरुष कोणीही कुठल्यातरी राजकीय पक्षाचा सदस्य असायला हवा अथवा अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतो.

जीवन जगत असताना ज्याप्रमाणे आपल्या आयुष्याला आपण काही नियम घालून दिलेले असतात. त्यामुळे आपले स्वतःचे आयुष्य हे सुखकर होत असते. त्याप्रमाणेच निवडणूक लढवितांनाही भारतीय निवडणूक आयोगाने काही बंधने नियम घालून दिलेले आहेत त्याचे पालन आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि निवडणूक लढवितांना दोन्ही वेळेस केल्यास फायदाच होतो .

सध्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्याने राजकीय पक्षांनी घ्यावयाची काळजी हे महत्त्वाचे आहे. कारण, यावेळी ऐकणारा वर्ग /प्रेक्षक/ नागरिक हा मोठा असतो. त्यामुळे त्याचे पडसाद समाजात सकारात्मक तसेच नकारात्मक ही होऊ शकतात. म्हणून निवडणूक प्रचार प्रसाराच्या वेळेस राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. कारण, हेच निवडून आलेले लोकप्रतिनिधी भारतीय संसदेत बसून कायद्याचे राज्य चालवितात त्यावेळी त्यांना सर्वसमावेशक विचार करावा लागतो. तीच भावना त्यांनी निवडणुकीच्या काळात पक्षाचे ध्येय धोरणे मांडताना तसेच मतदारसंघातील मुद्दे मांडताना विचारपूर्वक ठेवावी.

निवडणुकीचा प्रचार-प्रसार करताना जातीपाती वरून कुठलेही आक्षेपार्य भाषण देता येत नाही. तसेच जातीचा उल्लेख करणे राजकीय पक्षांनी टाळायला हवे. कुठली एक जात श्रेष्ठ आणि कुठली एक जात निम्न असे न बोलता पक्षाचे ध्येय धोरणे अथवा भविष्यात जनतेला आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा बद्दल बोलणे जास्त सुसंगत असते.

ज्याप्रमाणे जातीपातीवर बोलणे टाळले पाहिजे त्याप्रमाणेच धर्म द्वेष न करता एखाद्या धर्माला विशेष महत्त्व न देता आपल्या संविधानामध्ये जो सर्वधर्म समभावाचा संदेश आहे तो जोपासणे आणि त्या परीने आपल्या राजकीय पक्षांचा अथवा उमेदवारांनी स्वतःचा प्रचार प्रसार करणे अपेक्षित आहे.

भारतीय घटनेच्या उद्देशिकेत सामाजिक सलोखा पाळणे असे उल्लेखित असून सामाजिक सलोखा असल्यास समाजाची प्रगतीच होते अधोगती होत नाही याचे भान निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांनी  ठेवल्यास निवडणूक चा हा काळ सर्वांसाठी सूसह्यय आणि प्रबोधनाचा ठरेल.

 निवडणुकीत उभे राहणारे उमेदवार हे प्रभावी व्यक्तिमत्व असतात. त्यामुळे त्यांचे असंख्य फॉलोवर्स अनुयायी असतात. जे  त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधून बऱ्याच गोष्टी शिकून स्वतःच्या आयुष्यात त्याप्रमाणे वागतात. निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवाराने कायदा व सुव्यवस्था पालन करून त्याप्रमाणे प्रचार प्रसार केला तर आपसूकच त्यांचे फॉलोवर्स अनुयायी देखील त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था पालन करतील. त्यामुळे या निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे हे प्रत्येक उमेदवाराचे कर्तव्य आहे.

आताचा काळ  हा सामाजिक माध्यमाचा काळ आहे. माध्यमांवर लाखो फॉलोवर्स असतात जे आपल्या नेत्याला उमेदवाराला फॉलो करतात या समाज माध्यमांवर एक संदेश खूप मोठी हानी करू शकतो त्याप्रमाणे प्रबोधनही करू शकतो. त्यामुळे सामाजिक माध्यमाचा वापर करताना तो काळजीपूर्वक विशेषतः निवडणुकीच्या काळात अधिक जागरूकपणे करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्याचे कुठलेही  वाईट पडसाद उमटणार नाहीत.

निवडणुकीचा काळाचे  वातावरण भारावलेले असते त्यामुळे शब्दच्छलाने शब्द भेद तयार होऊन एखादा वाद विकोपाला जाण्याचे नाकारता येत नाही अशावेळी कार्यकर्ता प्रवक्त्यांमध्ये स्पष्टता हवी.

अंततः सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणूक ही कोणासाठी आहे निवडणुकीच्या मागचा उद्देश काय आहे मतदान कशासाठी करायला हवे मतदार कोण आहे कारण संपूर्ण निवडणूक ही भारताचे नागरिक म्हणजेच मतदार ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत असे नागरिक या सर्व प्रक्रियेचा महत्त्वाचा हिस्सा आहेत.  त्यामुळे मतदान का करावे यासंदर्भात जागृतीची प्रयत्न राजकीय पक्षांकडून उमेदवारांकडून होणे गरजेचे आहे. मतदार जागृती उपक्रम अधिकाधिक केल्यास मतदानाचा टक्का वाढेल आणि एका चांगल्या लोकशाहीला ते पोषक असे ठरेल त्यामुळे या सर्व निवडणूक प्रक्रियेत राजकीय पक्षाची भूमिका ही महत्त्वाची असून मतदार जागृती त्यांच्यावतीने अधिकाधिक व्हावी असे अपेक्षित आहे.

अंजु कांबळे निमसरकर,

माहिती अधिकारी,जिल्हा माहिती कार्यालय बीड

डॉ. कोल्हें चा वाघोलीत प्रचारा दरम्यान जनसंवाद

वाघोली – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा आज गावभेट दौरा वाघोली येथील “निओ सिटी” या सोसायटीमधून सुरुवात झाला. यावेळी नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. वाघोली येथे मोठ्या प्रमाणात इतर जिल्ह्यातून आणि इतर राज्यातून नोकरीनिमित्त स्थलांतरित झालेले मतदार आहेत.

या दौऱ्यात वाघोलीतील स्थानिक ग्रामस्थांसह इतर नागरिकांनी डॉ. कोल्हे यांच्या दौऱ्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी सोसायटीच्या चेअरमन, सचिव व रहिवासी वर्गाने मोठ्या उत्साहाने स्वागत केले. खासदार डॉ. कोल्हे यांनी विविध सोसायटीच्या नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आरोग्याच्या प्रश्नाबाबत लक्ष वेधले, लोकसंख्या निहाय देशात हॉस्पिटल असायला हवे त्यासाठीच आपण “इंद्रायणी मेडिसिटी” हा प्रकल्प देशात पहिला शिरूर लोकसभा मतदारसंघात उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे सांगितले. वाघोलीकरांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला पुणे – नगर रोड देशात मॉडेल होतोय याचा मला आनंद होतोय. वाघोलीपर्यंत मेट्रोचा प्रवास करता येणार आहे. मेट्रो, रेल्वे, रोड यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय. असे मत यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी नागरिकांशी बोलताना व्यक्त केले.

आम्ही सर्वजण तुमच्या सोबतच आहोत, आमच्या सर्व समस्या आपल्या माध्यमातून सोडविल्या जात आहेत या पुढेही सोडविल्या जातील हा आमचा विश्वास आहे, तुम्ही केवळ सांसदरत्न खासदार नसून स्वाभिमानी खासदार आहात, महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीमध्ये राखण्याचे काम फक्त खासदार डॉ. अमोल कोल्हे करत आहेत असे मत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर देशातील आर्थिक, सामाजिक, विकासाचे धोरण ठरविण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमागे भक्कम उभे आहोत असा विश्वास देखील उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.

यावेळी आमदार अशोकबाप्पू पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक खंडेभारड, संदीप गोते, शिवदास उबाळे, वसुंधरा उबाळे, राजेंद्र सातव, बाळासाहेब सातव, स्वप्नील कुंजीर, स्मिता कडू, शैलेश पवार, राजू पाटील, अमोल मुळे, सचिन साबळे, देशमुख सर, स्वप्नील जैन, चेअरमन गावडे, नितीन मतांडे, किरण मनकावले, लहू नवसुपे यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.

दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

मुंबई दि. ७ : येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत.केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्रे असावीत यावर भर दिला असून ‘दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्यात येणार आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३० मतदान केंद्रांचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. जळगावमध्ये २२, पुण्यामध्ये २१, ठाण्यामध्ये १८ आणि नाशिकमध्ये १५ दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. अकोला, कोल्हापूर, लातूर, पालघर, परभणी, रायगड अश्या ६ जिल्ह्यात प्रत्येकी १ दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहे. गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि वाशिम या जिल्ह्यात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र नसेल.

या वर्षी मतदार यादीमध्ये एकूण ६,०४,१४५ इतके दिव्यांग मतदार चिन्हांकित आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्केपेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

दिव्यांग मतदारांसाठी (PwDs) सक्षम ॲप

भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सक्षम” हे ॲप उपलब्ध करुन दिलेले आहे. त्या माध्यमातुन तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस ६,०४,१४५ इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत.

कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीकांत शेटे

पुणे : मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या साल २०२४ ते २०२७ कालावधीसाठी विश्वस्त पदासाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली. एकूण ९ पुरुष विश्वस्त व २ महिला विश्वस्त या पदासाठी १७ पुरुष उमेदवार उभे राहिले होते. सौ. दिपा तावरे व सौ. पल्लवी नेऊरगावकर या २ महिला विश्वस्तांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार श्री. श्रीकांत शेटे, श्री. निलेश वकील, अॅड. ऋग्वेद निरगुडकर, श्री. सूरज गाढवे, श्री. अक्षय ढेरे, श्री. भूषण रुपदे, श्री. सौरभ धोकटे, श्री. आशुतोष शेरे, श्री. मंदार देशपांडे, श्री. मोरेश्वर घोळे, श्री. भूषण ढेरे, श्री. वरद ठकार, श्री. विशाल चौधरी, श्री. सचिन म्हसवडे, श्री. गिरीश देशपांडे, श्री. दर्शन भुतडा, श्री. आशुतोष वैद्य या उमेदवारांपैकी निवडून आलेले उमेदवार खालील प्रमाणेः

  1. श्री. श्रीकांत शेटे : अध्यक्ष

2.श्री. सूरज गाढवे :- उपाध्यक्ष

  1. सौ. दिपा तावरे :- सचिव
  2. श्री. अक्षय ढेरे: सहसचिव
  3. श्री. भूषण रुपदे :- कोषाध्यक्ष
  4. अॅड. ऋग्वेद निरगुडकर :- सह कोषाध्यक्ष
  5. श्री. आशुतोष शेरे :- सह कोषाध्यक्ष
  6. श्री. निलेश वकील: कार्याध्यक्ष
  7. श्री. मंदार देशपांडे :- स्वागताध्यक्ष
  8. सौ. पल्लवी नेऊरगावकरः हिशोब तपासनीस
  9. श्री. सौरभ धोकटे :- समन्वयक

अध्यक्ष श्री श्रीकांत शेटे यांची निवड एकमताने झाली. निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. दीप्ती माहूरकर यांनी काम पाहिले व सर्व निवडणूक प्रक्रिया पार पडली.

ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. निळकंठ मालाडकर यांच्या ‘स्वानंदी’ कथासंग्रह आणि ‘राजस’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

पिंपरी, पुणे (दि. ७ एप्रिल २०२४) समाजात वावरत असताना लेखक वास्तववादी घटना, अनुभव ग्रहण करतो आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्या लेखणीतून उतरवतो. तसेच दैनंदिन जीवनात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक याबरोबरच वैचारिक प्रगल्भता याचे प्रतिबिंब डॉ. मालाडकर यांच्या लेखणीतून उतरले आहे. ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या क्षेत्रात काम करता त्याचा प्रभाव तुमच्या विचारसरणीवर होतो. मालाडकरांच्या लेखणीतून वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राजन लाखे यांनी केले.
ज्येष्ठ वैज्ञानिक, साहित्यिक डॉ. निळकंठ मालाडकर यांच्या ‘स्वानंदी’ कथासंग्रह आणि ‘राजस’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी येथे करण्यात आले. यावेळी कर्नल (निवृत्त) सुरेश पाटील, लेखक डॉ. निळकंठ मालाडकर, उज्ज्वला मालाडकर, डॉ. समीर मालाडकर, डॉ. मनिष मालाडकर, दिपाली मालाडकर, एच. ए स्कूलच्या माजी विद्यार्थी संघाचे मोहन बाबर, सुयश कुलकर्णी, विजय भिसे आदी उपस्थित होते.
डॉ. मालाडकर यांच्या वैज्ञानिक कथांमधून वास्तववादी जीवनाची अनुभूती वाचकांना येईल. सध्या सर्जनशीलतेवर कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रयोग सुरू आहेत; याचा पुढील पिढीवर काय परिणाम होईल हे लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे, असे उज्ज्वला मालाडकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
डॉ. मालाडकर यांच्या कथा, कवितांमधून सर्जनशीलता, समाजाप्रती प्रेमळ पण तेवढाच कणखर माणूस वाचकांना पहायला मिळतो. ९१ वर्षांच्या या तरुणाची विज्ञानाबरोबर साहित्यातील मुशाफिरी कौतुकास्पद असून आपल्याला नवी दिशा देणारी आहे, असे कर्नल (नि.) सुरेश पाटील म्हणाले.
विजय भिसे, सुयश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. आभार उज्ज्वला मालाडकर यांनी मानले. यावेळी डॉ. मालाडकर यांच्या काही मोजक्या कवितांचे वाचन करण्यात आले. एच. ए. स्कूलच्या माजी विद्यार्थी संघाने कार्यक्रमाचे संयोजन केले.
चौकट –
जीवनात अमुलाग्र बदल – डॉ. निळकंठ मालाडकर
आज विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड मोठी क्रांती झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मनुष्याच्या जीवनात अनेक बदल झाले असून आपल्या भावविश्वावर त्याचा चांगला – वाईट परिणाम होतो आहे. त्यावर कुठेतरी चौकट आखून भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन मात केली पाहिजे, असे डॉ. मालाडकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भारतीय जवानांवर आधारित ‘झुंज’ कविता सादर केली. याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिली.

अजित पवार, चंद्रकांत पाटील व उदय सामंत उपस्थितीत मावळ लोकसभा महायुती समन्वय बैठकीचे आयोजन -खर्डेकर

पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रकांत पाटील व उदय सामंत उपस्थितीत उद्या मावळ लोकसभा महायुती समन्वय बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती येथे पुणे, शिरूर, बारामती, लोकसभा क्लस्टरमधील महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी दिली. ते म्हणाले ,’मावळ लोकसभा मतदारसंघाची बैठक दि.8 एप्रिल सोमवारी सकाळी 10 वाजता, हॉटेल रागा पॅलेस,मदर तेरेसा फ्लायओव्हर जवळ,काळेवाडी चिंचवड बी आर टी रस्ता, काळेवाडी,येथे संपन्न होईल. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,शिरूर, बारामती, पुणे लोकसभा क्लस्टर चे प्रमुख चंद्रकांतदादा पाटील तसेच . उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीस महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे,भाजपा चे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे,आ. सुनील शेळके, आ. अश्विनीताई जगताप, आ. अण्णा बनसोडे, आ. उमाताई खापरे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय माशिलकर, उपनेते इरफान सय्यद,भाजपा पिं.चिं अध्यक्ष शंकरभाऊ जगताप ,शिवसेनेचे अध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर, राष्ट्रवादी चे अध्यक्ष अजित गव्हाणे,आर पी आय (आठवले गट ) चे स्वप्नील कांबळे,परशुराम वाडेकर, चंद्रकांताई सोनकांबळे, कुणाल वाव्हळकर,इ मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करतील असे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी सांगितले. आर पी आय (खरात गट ) रासप, शिवसंग्राम,पीपल्स रिपब्लिकन पार्टी ( जोगेंद्र कवाडे गट ),लोकजनशक्ती पक्ष, जनता दल सेक्युलर,जय मल्हार क्रांती संघटना,तसेच प्रहार संघटना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, महाराष्ट्र क्रांती सेना,लहुजी सेना,लहुजी शक्ती सेना ,ह्या मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या बैठकीत प्रचाराचे नियोजन करण्यात येईल असेही खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील तीन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

पुणे,दि.७: पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर नियुक्त ३ हजार २७५ अधिकारी,कर्मचाऱ्यांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीबाबत शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षण
देण्यात आले.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब गीते, नायब तहसीलदार सायली धस, मनुष्यबळ व प्रशिक्षण नोडल अधिकारी गजानन देशमुख उपस्थित होते.

दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राच्या पहिल्या दिवशी मार्गदर्शन करताना श्री. गीते यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली. भारतीय लोकशाहीचे घटक असल्याची भावना मनात ठेवून प्रत्येकाने कर्तव्यात आपापली जबाबदारी पार पाडावी, मतदानाचे दिवशी मतदान अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रशिक्षणार्थींना सुलभ संदर्भासाठी मतदान केंद्राध्यक्ष मार्गदर्शिकांचे वितरण करण्यात आले. उपस्थितांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या शंकांचे श्री. गीते यांनी यावेळी निरसन केले.

कोथरुड मधील नागरिकांनी धंगेकर यांना दिला ४२ हजारांचा निधी

पुणे : जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या धंगेकर यांना कोथरूडच्या मेळाव्यात नागरिकांनी ४२ हजाराचा निधी जमा करून दिला आहे.

पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गाठीभेटी, मेळाव्याच्या माध्यमातून धंगेकर यांचा प्रचारही सुरू आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा नुकताच मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात आमदार रवींद्र धंगेकर यांना कार्यकर्त्यांनी स्वइच्छेने निधी जमा केलेल्या निधीची पिशवी धंगेकर यांना भेट म्हणून दिली. “आम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती माहिती आहे. त्यामुळेच आम्ही लोकसहभागातून जमा केलेला निधी फुल ना फुलाची पाकळी स्वरूपात तुम्हाला भेट म्हणून देत आहोत”, असे सांगत सुट्या पैशांची पिशवी दिली.

लोकसभेची उमेदवारी देवून काँग्रेस पक्षाने, महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांच्यावर नवा विश्वास टाकला आहे. अचानक ही नवी जबाबदारी धंगेकर यांच्या खांद्यावर आली आहे. त्यामुळे आर्थिक अडचण भासू नये म्हणून त्यांच्या कुटुंबातील एक घटक म्हणून आम्ही लोकसहभागातून जमा केलेली रक्कम त्यांना आज दिली. हा निधी जमा करताना दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंतची मदत कोथरुडकर नागरिकांनी केली आहे, अशी माहिती कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे ब्लॉक उपाध्यक्ष विजय खळदकर यांनी दिली.

यावेळी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, जनतेचे प्रेम हेच माझे बळ आहे. मी आर्थिक अडचणीत आहे, असे आजवर कोणाला सांगितले नव्हते. पण, न सांगताही कार्यकर्त्यांना, जनतेला मनातले कळते. यातून माझे आणि जनतेचे नाते किती घट्ट आहे, हेच दिसते. जनतेसोबत असलेले आपुलकीचे नाते टिकून असल्यानेच मी या निवडणुकीत विजयी होणार, असा मला विश्वास आहे. जनतेचे ऋण मी कधीही विसरणार नाही.

दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी या निधीची पिशवी निवडणूक खर्चासाठी पक्षाचे पदाधिकारी चंदूशेठ कदम यांच्याकडे सुपूर्द केली.

‘हर घर मोदी परिवार’ अभियानात भाजपच्या दहा हजार कार्यकर्त्यांचा सहभाग

पुणे, 6 एप्रिल : भाजपच्या 44व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ‘हर घर मोदी परिवार’ या अभियानाअंतर्गत पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ १० हजार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून १० लाख मतदारांपर्यंत ‘मोदींचा नमस्कार’ पोहोचविण्यात आला. घरोघरी मिळालेला पुणेकरांचा उत्साह भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा ठरला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शहर अध्यक्ष धीरज घाटे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, माजी अध्यक्ष जगदीश मुळीक, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी अभियानात प्रमुख सहभाग घेतला.

या अभियानाअंतर्गत आज सकाळी सहाही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले. त्यानंतर दहा हजार कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर जाऊन अडीच लाख कुटुंबातील दहा लाख मतदारांशी संवाद साधला.

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना, काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या 370 वे कलम हटविले, पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले, 80 कोटी जनतेला मोफत धान्य, 12 कोटी शौचालयांची बांधणी, विकसित भारताच्या दिशेने वाटचाल या मोदी सरकारच्या महत्त्वाच्या उपलब्धींची मतदारांना माहिती देण्यात आली.

बावनकुळे म्हणाले, ‘विकसित भारताच्या संकल्पनेला जनतेने साथ द्यावी अशी विनंती आम्ही करत आहोत. त्याला पुणे शहरातील मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोदींनी दहा वर्षे केलेले कार्य आणि विकसित भारताचा संकल्प यामुळे जनता कमळ चिन्हाचे बटन दाबून तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान पदाची संधी देईल असा विश्वास वाटतो.’

पाटील म्हणाले, ‘अब की बार 400 पार ही आमची घोषणा आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही घरोघर संपर्क करीत आहोत. लाभार्थी आणि नवमतदारांशी विशेष संपर्क केला जात आहे. लाभार्थ्यांच्या योजना आणि सरकारची दहा वर्षातील कामगिरी लोकांना समजावून सांगण्यात येत आहे. मतदारांना मोदींची गॅरंटी असून ती प्रत्यक्ष मतपेटीतून दिसून येईल.’

मोहोळ म्हणाले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून मी जनसेवेचे व्रत घेतले आहे. महायुतीने पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी मला दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात देश विकसित भारताच्या दिशेने प्रगती करत आहे. विकसित पुण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षात शहरात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले आहे. पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी आपण मला मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत, ही विनंती.’

घाटे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा शाश्वत विकास होत आहे. त्यामुळे पुणेकर मतदार आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. मुरलीधर मोहोळ हे आजपर्यंतच्या विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आहे.’

पुण्यामध्ये आयोजित केलेल्या योग महोत्सवात हजारो योगप्रेमींची उपस्थिती

पुणे , 07 एप्रिल 24

आंतरराष्ट्रीय योग दिवसाला 75 दिवस बाकी असताना त्याची उलटगणना सुरू करण्याच्या सोहळ्यानिमित्त पुण्यामध्ये वाडिया महाविद्यालयाच्या क्रीडांगणात आयोजित केलेल्या योग महोत्सवाला योगप्रेमींनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाची राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था आणि मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था यांनी संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले होते. 7 एप्रिल रोजी पहाटे 6 वाजता सुरू झालेल्या कॉमन योगा प्रोटोकॉल (CYP) च्या सरावात हजारो योगप्रेमींनी सक्रीय सहभाग घेतला. उत्साह आणि सहभागाच्या या उल्लेखनीय प्रदर्शनातून वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणासाठी योगाभ्यासाचे वाढते महत्त्व अधोरेखित होत झाले . या कार्यक्रमाला विश्वास मंडलिक, अध्यक्ष, योग विद्या गुरुकुल, नाशिक, प्रतिष्ठित योगगुरू, विजयालक्ष्मी भारद्वाज, संचालक, आयुष मंत्रालय, डॉ. सत्यलक्ष्मी, संचालक, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, पुणे आणि वैद्य डॉ. काशिनाथ समागंडी, MDNIY चे संचालक उपस्थित होते. त्यांच्या सहभागामुळे योगशास्त्राला प्रोत्साहन देण्याची आणि व्यक्ती आणि समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्याची बांधिलकी प्रदर्शित होऊन या कार्यक्रमाची शोभा आणखी वृद्धिंगत झाली.

आयुष मंत्रालय, राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, अनेक मान्यवर आणि तज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी बोलताना , आयुष मंत्रालयाचे उपमहासंचालक सत्यजित पॉल म्हणाले, अतिशय निसर्गरम्य वातावरणात या अद्भुत योग महोत्सवाचे आयोजन पुण्यात होत आहे ही अतिशय आनंदाची आणि अभिनंदनाची बाब आहे. निरोगी आणि अधिक चांगल्या भविष्यासाठी योगसाधना ही एक जागतिक चळवळ आहे. यावेळी त्यांनी उपस्थितांनी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली आणि त्यांचे अभिनंदन केले.

आंतरराष्ट्रीय योग दिन-2024 हा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. यापूर्वीच्या वर्षांमध्ये झालेल्या कार्यक्रमांच्या आधारावर योग महोत्सव 2024 योगसाधनेच्या पुनरुत्थान सोहळ्याचे प्रतिनिधित्व करत असून या अंतर्गत उलट गणनेच्या अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे.

योगविद्या गुरुकुल, नाशिक चे अध्यक्ष विश्वास मंडलिक यावेळी बोलताना म्हणाले, की योगसाधना ही भारताच्या समृद्ध वारशाची एक अद्भुत देणगी आहे जिने संपूर्ण जगाला निरोगी स्थान बनवण्यासाठी अनेक लाभ दिले आहेत. मुळामध्ये योग म्हणजे एक आध्यात्मिक शिस्तबद्धता आहे जी मन आणि शरीर यामध्ये सुसंवाद निर्माण करणाऱ्या सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे.

योगसाधनेचा अंगिकार करून व्यक्ती निरोगी, आनंदी आणि अधिक परिपूर्ण जीवन जगण्याच्या त्याच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून आत्म-सुधारणेच्या प्रवासाचा प्रारंभ करते.

आजच्या भव्य कार्यक्रमात सामाईक योग शिष्टाचाराला मोठ्या प्रमाणावर महत्त्व देण्यात आले. मान्यवरांच्या भाषणानंतर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या योगतज्ञांकडून संस्थेच्या संचालकांच्या नेतृत्वाखाली योगसाधनेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, ज्यामध्ये 5000 पेक्षा जास्त योग साधकांना सामाईक योग शिष्टाचाराचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे आयुष मंत्रालय, एमडीएनआयवाय आणि इतर योग संस्थांच्या विविध समाज माध्यमांद्वारे थेट प्रसारण करण्यात आले. भारतीय योग संस्थेने त्यांच्या महाराष्ट्र शाखेसोबत आंतरराष्ट्रीय योग दिवस-2024 च्या 75व्या दिवसाला देखील पाठबळ दिले.

निवडणूक प्रक्रियेत समन्वय साधून संघ भावनेने कामे करा-डॉ. सुहास दिवसे

बारामती दि. ७ : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन निवडणूक सुरळीतपणे पाडणे ही सामुहिक जबाबदारी आहे; सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी संवाद साधत संघभावनेने, समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले.

बारामती विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांवर नियुक्त केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष व इतर सहायक कर्मचारी यांच्याकरीता माळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते. यावेळी बारामती विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्यात निवडणुकीसाठी चांगली तयारी करण्यात आली आहे. निवडणुक विषयक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी, विशेषत: महिला कर्मचाऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा व्यवस्था तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाहतूक व्यवस्था, अल्पोहार, भोजन, निवास व्यवस्था आदीबाबत काळजी घ्यावी. आरोग्यविषयक सुविधेकरीता २०० रुग्णालयासोबत करार करण्यात आले आहेत.

प्रत्येक निवडणूक प्रक्रियेत काही बदल होत असतात. त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवीन बदल समजून घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करणे गरजेचे आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी वेळेला फार महत्व आहे, त्यादृष्टीने कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करावे. या प्रशिक्षणाचा लाभ येत्या निवडणुकीत होणार असल्याने प्रशिक्षण काळजीपूर्वक पूर्ण करावे. निवडणुक प्रक्रियेत सहकारी तसेच मतदारांसोबत चांगला संवाद ठेवा, अशा सूचना डॉ. दिवसे यांनी दिल्या.

दोन दिवसीय प्रशिक्षण सत्रात एकूण २ हजार ६०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये मतदान प्रक्रियेसंबंधी विविध पैलूंची श्री. नावडकर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

यावेळी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राची जोडणी, हाताळणी, यंत्र चालू व बंद करणे तसेच सील करणे याबाबतचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार श्री. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.