पिंपरी : ही निवडणूक देशाच्या जनतेला काय वाटत, शेतमालाला हमी मिळणार का? महागाई कमी होणार का? तरुणांना रोजगार मिळणार का. ? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आहे. कोणाला काय वाटत याची नाही. आणि म्हणूनच मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही, असं खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणालेत.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज भोसरी विधानसभेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माजी शेवटची निवडणूक आहे, असं म्हणत मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. यावर माध्यमांनी डॉ. कोल्हे यांनी विचारणा केली असता डॉ. कोल्हे म्हणाले की, ही लोकसभेची निवडणूक आहे. कोणाची पहिली निवडणूक की शेवटची याची नाही. त्यामुळे आढळराव पाटील यांच्या वयाचा मान ठेवत मी त्यांना एवढंच सांगेल की आपण देशाचं बोलूयात, देशाचं, जनेतेच बोलूयात. त्यांना काय वाटत मला काय वाटत यापेक्षा जनतेला काय वाटत हे महत्वाचं आहे.
सीसीटीव्ही फूटेज च्या आधारे चोरट्यांच्या हालचाली, त्यांचे राहणीमान आणि गुन्हा करण्याच्या पद्धतीचे अवलोकन केले असून त्याआधारे काही संशयितांची खातरजमा केली जात आहे. संशयास्पद वाटणाऱ्या काही पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.–प्रशांत ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरूर
शिरूर – येथील भर बाजारपेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिराच्या पुजाऱ्याला लोखंडी टॉमी ने मारहाण करून त्याचे हातपाय बांधून चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीतील रोकड व पद्मावती देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. आज (ता. २०) पहाटे दीड ते दोन च्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने बाजारपेठेत खळबळ उडाली. दानपेटीत सुमारे दोन लाख रूपयांची रक्कम असावी, असा अंदाज मंदिर ट्रस्ट च्या विश्वस्तांनी वर्तविला असून, पोलिस दप्तरी तीस हजार रूपयांची जबरी चोरी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.श्री गोडीजी पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिर ट्रस्ट चे येथील कापड बाजार परिसरात रस्त्यालगत मंदिर असून, या मंदिराच्या देखरेखीसाठी पोपट सोनबा घनवट (वय ७२, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) या खासगी सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी तीन चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
उद्या महावीर जयंती असून, त्याआधी मंदिरात चोरी होऊन, भाविकांनी श्रद्धेने टाकलेल्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याने खेद वाटतो. मंदिर सुरक्षेकामी दिवसपाळीसाठी एक व रात्रपाळीसाठी एक असे दोन सुरक्षा रक्षक नेमले आहेत. परंतू तिघा चोरट्यांनी त्यांनाच जबरी मारहाण करून मंदिरात लुटालूट केली. पोलिसांनी या चोरीचा तातडीने छडा लावावा.–सतिष धाडिवाल, अध्यक्ष, श्री गोडीजी पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिर ट्रस्ट, शिरूर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, घनवट हे मंदिराच्या सुरक्षा कामी रात्रपाळीस नेमणूकीस होते. मंदिराच्या मागील बाजूस पहारा देत असताना पहाटे दोन च्या सुमारास तीन चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूने मंदिर परिसरात प्रवेश केला. घनवट यांना पाहताच चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवत मंदिराच्या चाव्यांची मागणी केली.मात्र, चाव्या माझ्याकडे नाहीत तर पुजाऱ्याकडे असल्याचे सांगताच चोरट्यांनी त्यांना लोखंडी टामी ने मारहाण करीत खाली पाडले. एका चोरट्याने त्यांच्या छातीवर स्क्रू ड्रायव्हर रोखला. इतर दोघांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा कटावणीने तोडून मंदिरात प्रवेश केला. दर्शनी बाजूला असलेल्या दानपेटीचे कुलूप व कडीकोयंडा तोडून त्यांनी पेटीतील रोकड आपल्याकडील बॅगांमध्ये भरली. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याकडे वळविला. गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा कटावणीने तोडून गाभाऱ्यातील पद्मावती मातेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र घेऊन चोरट्यांनी मागील दरवाजाने पोबारा केला.दरम्यान, काही वेळाने सुरक्षा रक्षक घनवट यांनी, हातापायाला बांधलेल्या दोऱ्या तोंडाने सोडवून स्वतःची सुटका करून घेतली व मंदिरात पूजाअर्चेचे काम पाहणारे रमेश पुजारी यांना हा प्रकार कळविला. त्यांनी तातडीने मंदिराच्या ट्रस्टींना या प्रकाराची दिल्यानंतर वेगाने यंत्रणा हलली. पोलिस पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मंदिर व परिसरातील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याआधारे तपास केला जात आहे. दरम्यान, आज सकाळी शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव यांनी पोलिस पथकासह घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. आमदार ॲड. अशोक पवार, जैन श्रावक संघाचे संघपती भरत चोरडिया यांनीही मंदिराला भेट देत तातडीने या चोरीचा छडा लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या धाडसी चोरीच्या प्रकारातून चोरीला काय गेले यापेक्षा भाविकांच्या श्रद्धेला कुठेतरी धक्का बसला आहे. हा समस्त शिरूरकरांच्या भावनेचा विषय असून, या चोरीबाबत व तपासाबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्याशी संपर्क साधून तातडीने तपास लावण्याबाबत आग्रह धरला आहे.-ॲड. अशोक पवार, आमदार, शिरूर – हवेली.
भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ राम कथा ‘ या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या नृत्य कार्यक्रमातून रसिकांना विलोभनीय अभिव्यक्तीचे दर्शन घडले!
शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था यांच्यातर्फे हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. श्रीमती उषा आर.के. यांच्या संकल्पनेतील या कार्यक्रमात ज्येष्ठ भरतनाट्यम कलाकार सत्यनारायण राजू यांनी प्रभावी नृत्य सादरीकरण केले.संगीत संयोजन डी.एस. श्रीवास्तव यांचे होते.
श्रीमती उषा आर.के. यांनी ‘ राम कथा ‘ या नृत्य कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. ज्येष्ठ भरतनाट्यम कलाकार सत्यनारायण राजू यांनी ‘ राम कथा ‘ या भरतनाटयम् च्या सादरीकरणातून प्रभू श्रीराम यांचा जीवनप्रवास रसिकांसमोर उलगडला.
रामायणातील दशरथ, कौसल्या, कैकयी, मंथरा, श्रीराम, सीता, लक्ष्मण, जटायू, हनुमान, रावण ही सर्व पात्रे सत्यनारायण राजू यांनी अभिनय आणि नृत्य कौशल्याने समर्थपणे साकारली, आणि रसिकांना खिळवुन ठेवणारी ‘रामकथा ‘ प्रस्तुत केली.
हा कार्यक्रम शनिवार, २० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०३ वा कार्यक्रम होता.ज्येष्ठ नृत्यगुरु डॉ.सुचेता भिडे – चापेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले . डॉ . सुचेता भिडे- चापेकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. अमीरा पाटणकर यांनी निवेदन केले.
पीसीसीओईआर मध्ये राज्यस्तरीय ‘टेक्नोवेट-२०२४’ स्पर्धा संपन्न
पिंपरी, पुणे (दि. २० एप्रिल २०२४) – आजच्या स्पर्धात्मक जगात, विद्यार्थ्यांनी प्रगत शिक्षणावर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग सारख्या साधनांच्या वापरावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. उच्च तंत्रज्ञानामुळे साधने कितीही वाढली, विकसित झाली तरी निरंतर शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे मत डॉ. संजय तलबार यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) मध्ये ‘टेक्नोवेट-२०२४’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. टेक्नोवेट २०२४ मध्ये विविध तंत्रज्ञानावर आधारित बीजीएमआय-व्हॅलोरंट, कॅड ओ क्रिएट, फास्ट अँड फ्यूरियस, आयपीएल लिलाव, एम यू एन, शार्क टॅंक, टेक-संगम एस्केप रूम, ब्रो कोड, ट्रेझर हंट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयांतील ५०० हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. याचा बक्षीस वितरण समारंभ संजय तलबार यांच्या हस्ते पार पडला. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी स्वागत केले. डॉ. सुशांत वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. संतोष रणदिवे आणि डॉ. सुशांत वाघमारे यांनी केले.कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विविध संस्थांचे विद्यार्थी उपस्थित होते.
मुंबई, ता. 20: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणूक-2024 साठीचा जाहिरनामा सोमवार ( ता.22) रोजी चर्चगेट जवळील एमसीए लाऊंज येथे सकाळी साडेअकरा वाजता प्रकाशित होणार आहे. अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर आधारीत हा जाहिरनामा असल्याचे परांजपे यांनी स्पष्ट केले. या जाहिरनामा प्रकाशन सोहळ्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्यासह पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, वाय.पी. त्रिवेदी, बाबा सिध्दीकी, रूपालीताई चाकणकर, सुरज चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकसित भारतासाठीची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहिरनामा असून सार्वजनिक सेवा आणि पायाभूत प्रकल्पांसह आर्थिक प्रगतीचा संकल्प यामधे व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सदरचा जाहिरनामा तयार करण्यात आला. दिलीप वळसे पाटील साहेब रूग्णालयात उपचार घेत असले तरी त्यांनी या जाहिरनामा तयार करताना सततचे मार्गदर्शन केल्याची माहिती आनंद परांजपे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि प्रवक्ते संजय तटकरे देखील उपस्थित होते.
इंदिरा गांधींनी आचारसंहितेच्या काळात जेलमध्ये असलेल्या विरोधकांना तातडीने सोडून दिले
मोदी – शहा यांनी राजकारणाचा व्यापार मांडला : पुण्यात ज्या पक्षाचा खासदार निवडून येतो, त्याच पक्षाची केंद्रात सत्ता येते- मोदी लाट ओसरल्याने लोकसभा त्रिशंकु येईल :
पुणे-नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राजकारणाचा व्यापार मांडला असून भाजपमधील ३० टक्के नेते इतर पक्षातून आयात केलेले आहेत. हे करूनही भाजप मजबुत झालेली नाही. लोकसभेच्या १०२ जागांसाठी झालेल्या मतदानावरून मोदी यांची लाट ओसर्याचे लक्षात येते. त्यामुळे या निवडणुकीत भाजप महायुतीला दोनशे ते सव्वा दोनशे जागा मिळतील, आणि त्रिशंकु लोकसभा अस्तित्वात येईल, असे भाकीत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले.
पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सप्तर्षी बोलत होते.डॉ. सप्तर्षी म्हणाले, कोणताही पक्ष ४०० पार म्हणतो, तेव्हा थडकी भरते. ऐवढी काय भाजपची किमया आहे, की लोकांनी त्यांना चारशे पार जागा निवडून द्याव्यात. आरएसएसला हिंदु राष्ट्र आणायचे आहे. त्यामुळे त्यांच्या जिवावर भाजप ४०० पारचा नारा देत आहे. या निवडणुकीत मोदी शहांचा पाडाव होणे गरजेचे आहे. तरच देशातील लोकशाही आणि संविधान सुरक्षात राहिल. मोदी शहांचा पराभव झालातरच भाजपही जिवंत राहणार आहे. पैसे खाल्लेल्या लोकांना धमकावून, जेलची भिती दाखवून भाजपसोबत घेतले जात आहे. अजित पवार व त्यांचे नऊ मंत्री हे भाजपसोबत जाणे, हे त्याचेच उदाहरण आहे. हे करूनही भाजप मजबुत झालेली नाही. मोदी-शहा ही व्यापारी जोडगोळी आहे. त्यांनी धाडी टाकून देणग्या घेतल्या. जनतेचा पैसा व्यापाऱ्यांनी वाटून घेतला. भाजपचे ३० टक्के लोक आयात केल्याने आयात आणि भाजपमधील हयात यांच्यात संघर्ष होणार आहे.
मोदींनी निवडणुकीतले एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. बेकारी व महागाईचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. मोदींना अर्थव्यवस्थेचे अकलन आहे, असे वाटत नाही. नोट बंदीमुळे कसलाही काळा पैसा बाहेर आला नाही. इंदिरा गांधींनी आणीबाणीनंतर तुरुंगातील सगळ्यांना बाहेर सोडले, आचारसंहितेचा आदर केला.
जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनामुळे भाजपची अडचण झाली आहे. मराठा मतदार नाराज झाल्याने राज्यात भाजप विरोधी लाट निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात भाजपला अनुकुल वातावरण नाही.त्यामुळे यंदा मागच्या वेळी पेक्षा कमी जागा मिळणार आहेत. पुण्यात काँग्रेसचा मतदार आहे. पुण्याचा जो खासदार निवडून येतो, तेव्हा वर त्या पक्षाची सत्ता येते. कलमाडी जेव्हा काँग्रेसपासून दूर गेले, तेव्हा त्यांना पराभव पत्करावा लागला.
संविधान आहे तर आपण आहोत, अशी भावना दलित व मुस्लिमांची आहे, त्यामुळे ते आघाडीच्या मागे उभे राहतील. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने वंचित व एमआयएमला मते मिळणार नाहीत. पुणे जिल्ह्यातील चारही जागा महाविकास आघाडीजिंकेल, असा विश्वासही डॉ. सप्तर्षी यांनी व्यक्त केला.
गडचिरोली दि.२० : १२-गडचिरोली-चिमूर मतदारसंघात १११ वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार या वृद्ध महिलेने गृह मतदानाची सुविधा नाकारत प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान नोंदविले. फुलमती बिनोद सरकार या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजीचा आहे. नातवाच्या दुचाकीवर बसून त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन स्वतः मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला.
लोकशाहीच्या उत्सवात सर्वजण सहभागी होत मतदानासाठी बाहेर निघत होते. यातच तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत, या १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले. वयोवृद्ध फुलमती सरकार यांनी स्वतः मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी घेतलेला पुढाकार इतर मतदारांपुढे एक आदर्शवत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली आहे. तर अहेरी विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक अधिकारी आदित्य जीवने यांनी फुलमती आजीचे अभिनंदन करत मतदान प्रक्रियेत नोंदवलेल्या सहभागाबद्दल त्यांना धन्यवाद दिले आहे.
पुणे : पुणे लोकसभेचे (Pune Lok Sabha Election 2024) महायुतीचे (Mahayuti) भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचा जोरदार प्रचार सध्या सुरू आहे. भाजपाचे सर्व स्थानिक नेते त्यामध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहेत. मात्र, भाजपा नेते संजय काकडे अजूनही प्रचारात सहभागी झाल्याचे दिसत नाहीत. त्यामुळे काकडे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, ही नाराजी दूर करण्यासाठी काल रात्री भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी काकडे यांची भेट घेऊन मनधरणी केल्याचे वृत्त आहे.(Sanjay Kakade)
भाजपा नेते आशिष शेलार हे काल पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी नाराज भाजपा नेते संजय काकडे यांची भेट घेतली. शेलार यांनी या भेटीत काकडेंना प्रचारात सहभागी होण्याची विनंती केल्याचे समजते. तसेच काकडे यांनीही मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे, शेलार यांना सांगितले आहे.
नुकतेच संजय काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेली फूट आणि दुभंगलेल्या पवार कुटुंबियांतील (Pawar Family) बिघडलेल्या संबंधावरून दुख व्यक्त केले होते. पवार कुटुंबियांनी निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले होते. परंतु, ही फूट भाजपाने पाडलेली नाही, असेही ते म्हणाले होते.
दरम्यान, संजय काकडे सध्या राजकीय हालचालींपासून अलिप्त राहात असल्याचे जाणवल्याने काल रात्री आशिष शेलार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.
‘मोदी काळातील’ वाढीव कर्ज फेडण्याचा संकल्प भाजपच्या जाहीरनाम्यात का नाही..? पुणे दि १९ –मोदी सरकार येण्यापूर्वी २०१४ पर्यंत, डॅा मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए १ आणि २ अंतर्गत देशाने जीडीपी वाढीचा दर, आयात-निर्यात दर, ‘डॉलर-प्रती रुपयाचा दर’ योग्यर्त्या नियंत्रित राखला तसेच महागाई दर ही नियंत्रित केला होता. परंतु २०१४ अखेर देशावर असलेली एकूण कर्जाची थकबाकी ५३.८७ लाख कोटी रुपये होती ती मात्र आज (२०२४)मध्ये सु २०५ लाख कोटीच्या घरात गेली असल्याने या “वाढीव कर्ज फेडी बाबत” भाजप च्या जाहीर नाम्यात कुठेही मोदींची गॅरंटी वा नियोजन वा कोणताही संकल्प का दिसत नाही.. असा सवाल करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी “मोदी सरकार देशावरील स्वकाळात वाढलेले चौपट कर्ज सोईस्कर लपवत असल्याची प्रखर टीका काँग्रेस ने केली..! २००९-२०१४ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील मनमोहन सिंग सरकारने कच्चे क्रुड तेल सु १२६ डॉलर ने खरेदी करून सुध्दा, देशवासियांना पेट्रोल ६८ रुपये प्रति लिटर, डीझेल ३९ रुपये प्रति लिटर आणि घरगुती एलपीजी गॅस ३९० रू च्या किंमतीत उपलब्ध करून दिला होता. तरीही UPA सरकार काळात ‘भारत आर्थिक महासत्ता’ होऊ घातला होता’..याचे स्मरण देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी करून दिले. काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी डॅा मनमोहनसिंग सरकार पाय उतार होण्यापुर्वी, देशाची तत्कालीन आर्थिक परिस्थितीच्या वास्तवाची आठवण करून देताना सांगितले की, भारतावर २०१४ पर्यंतच्या एकुण ६४ वर्षात व सु १४ पंतप्रधानांची कारकिर्द मिळून, मात्र ५३.८७ लाख रुपयांचे कर्ज होते, मात्र आज मोदी सरकारच्या एकाच पंतप्रधान पदाच्या व १० वर्षांच्या काळात (२०२४)मध्ये कर्जाची रक्कम सु २०५ लाख कोटीच्या घरात गेली असल्याने या “वाढीव चारपट कर्ज फेडी बाबत” भाजप’च्या जाहीर नाम्यात कुठेही मोदींची गॅरंटी वा संकल्प दिसत नाही..! तसेच देशातील राष्ट्रीय बँकांची लुट करून मल्या, मोदी, चोकसी, ऋषी अग्रवाल इ नी नेलेला पैसा परत आणणे बाबत मोदींनी ‘जाहीर नाम्यात’ अवाक्षर ही काढलेले नाही..या विषयी काँग्रेस राज्य प्रवक्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. स्वतःच्या अपयशाचे खापर सतत पुर्वीच्या सरकारवर, नेहरू – गांधीवर फोडून मोदी सरकार नामा निराळे होऊ शकत नसल्याचे सांगितले. मोदी सरकारचा कार्यकाळ ‘किमान काही अंशी तरी दाखवण्या सारखा असता तर २०१४ ते २०२४ एकुण वाढलेल्या कर्जाबाबतची वास्तवता दर्शवणारी श्वेतपत्रिका जारी केली असती..! मात्र आरबीआय गंगाजळीस पहील्यांदा हात लावण्याची नामुष्की येणाऱ्या व देशास कर्जबाजारी करणाऱ्या भाजपला मोदींच्या ऊधळपट्टीमुळे देशावरील ‘चौपट वाढीव कर्जाची’ जबाबदारी ही भाजपला घ्यावी लागेल केवळ ‘मोदी हमी’चा प्रपोगंडा करत, रामा’चे नांव घेत व चोरीचे समर्थन करीत भाजप पळ काढू शकणार नाही..! देशाच्या बुडत्या अर्थव्यवस्थेचे उत्तर भाजपला भावी काळात द्यावे लागेल, असा इशाराही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने दिला..!
काँग्रेसच्या वाढत्या लोकप्रियतेचा मोदींना धसका, भाषणाच्या प्रत्येक वाक्यात मोदींकडून काँग्रेस नामाचा जप.
मुंबई, दि. २० एप्रिल २०२४ मोदी सरकार घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक करते असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परभणीच्या प्रचार सभेत सांगितले. पण नरेंद्र मोदी चीनला घाबरतात म्हणूनच चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी करुन जमीन बळकावली, आपले २० सैनिक मारले तरीही नरेंद्र मोदींना आजपर्यंत ते कसे दिसले नाही, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा देशाच्या विभाजनाचा मुद्दा उपस्थित करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. विभाजनाला काँग्रेस जबाबदार असल्याचा मोदींचा आरोप धांदात खोटा आहे. आरएसएसच्या खोटे बोलण्याच्या तालमीत तयार झालेल्या नरेंद्र मोदींकडून वेगळी अपेक्षा करणे चुकीचेच आहे परंतु पंतप्रधान पदावरील व्यक्तीने बोलताना अभ्यास करुन बोलावे अशी अपेक्षा असते. वास्तविक पाहता स्वातंत्र्य चळवळीत भाजपा, जनसंघ अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काहीही योगदान नाही. नरेंद्र मोदी ज्या विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात तेच लोक मुस्लीम लीगबरोबर सरकारमध्ये सहभागी होते आणि त्याच परिवारातील संघटनेने द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला होता, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहित असायला हवे. पंतप्रधान मोदी चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरडी चिंता आहे. सोयाबीन, बाजारी, ज्वारी, कापसाच्या पिकाचे महत्व सांगताना या पिकांना भाजपा सरकारच्या काळात भावच मिळला नाही, कवडीमोल भावाने विकावे लागले. मराठवाड्याचा शेतकरी संकटात असताना भाजपा मात्र शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी पक्ष फोडण्यात व्यस्त होता आणि आता निवडणुका आल्या की मोदींना शेतकऱ्यांची आठवण झाली. उज्वला गॅस, हर घर नल योजना, पंतप्रधान आवास योजना, मोफत राशन या योजनांचा पाढा मोदींनी वाचला परंतु ५ किलो मोफत धान्य देऊन गरिबांना महागाईच्या खाईत लोटले, उज्वला गॅसच्या नावाखाली गरिबांचे रॉकेल बंद केले व ११०० रुपयांचा गॅसही घेता येत नाही अशा योजनांचा उपयोग काय? आपण गरिबी पाहिली असल्याने गरिबांसाठी काम करत असल्याचे मोदींनी सांगितले पण मोदींच्या १० वर्षाच्या काळातच देशातील गरिब अधिक गरिब झाला आहे. गरिबाला जगणे कठीण झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी भाषणात सातत्याने काँग्रेस नावाचा जप केला. काँग्रेस पक्षाला देशभरात मिळत असलेले जनसमर्थन व भाजपाचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने पराभवाच्या धास्तीने नरेंद्र मोदी भाषणात काँग्रेस नामाचा जप करत आहेत, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.
संत निरंकारी सत्संग भवन गंगाधाम बरोबर व्यापक देशव्यापी रक्तदान अभियान व सत्संग समारोहांचे आयोजन
पुणे, २० एप्रिल, २०२४- सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात ‘मानव एकता दिवस’ मुख्य समारोहाचे आयोजन बुधवार, दि.२४ एप्रिल, २०२४ रोजी ग्राउंड नं. २, निरंकारी चौक, बुराड़ी, दिल्ली येथे करण्यात आले आहे. हा दिवस युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांचे परोपकारी जीवन आणि त्यांच्या लोककल्याणकारी भावनेला समर्पित आहे. या कार्यक्रमात दिल्ली व आजुबाजुच्या राज्यांमधून हजारोंच्या संख्येने श्रद्धालु भक्त सहभागी होऊन बाबा गुरबचनसिंहजी आणि मिशनचे अनन्य भक्त चाचा प्रतापसिंहजी यांना आपली श्रद्धा सुमने अर्पण करतील आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा प्राप्त करण्याबरोबरच सद्गुरुचे अनमोल प्रवचन श्रवण करतील. पुणे झोन मध्ये संत निरंकारी सत्संग भवन,गंगाधाम त्याचबरोबर इतर अठरा ठिकाणी मानव एकता दिवसानिमित्त विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले आहे. संत निरंकारी मंडळाचे पुणे झोनचे प्रभारी आदरणीय श्री.ताराचंद करमचंदानी यांनी माहिती देताना सांगितले, की सद्गुरुच्या असीम कृपेने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अवघ्या विश्वामध्ये विविध ठिकाणी संत निरंकारी मिशनची समाजकल्याण शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या विद्यमाने रक्तदान शिबिरांच्या अविरत श्रृंखलेचे व्यापक स्तरावर आयोजन केले जाईल ज्यामध्ये मानवतेच्या भल्यासाठी रक्तदात्यांकडून रक्तदान करुन नि:स्वार्थ सेवेचे उदाहरण प्रस्तुत केले जाईल. पुण्यामध्ये संत निरंकारी सत्संग भवन ,गंगाधाम येथे आयोजित शिबिरामध्ये रक्त संकलन करण्यासाठी ससून,वाय.सी.एम,कमांड अशा विविध इस्पितळांचे प्रशिक्षित डॉक्टर्सची टीम सहभागी होणार आहे. त्याबरोबर इतर राज्यांमध्ये तेथील स्थानिक इस्पितळाचे डॉक्टर्स व नर्स रक्त संकलित करण्यासाठी उपस्थित राहतील. याशिवाय सर्व ठिकाणी मानव एकता दिवसानिमित्त सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात येईल. रक्तदानाच्या जनजागृतीसाठी मिशनचे सेवादार आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊन नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी प्रेरणा देत आहेत. युगप्रर्वतक बाबा गुरबचनसिंहजी यांनी आपले संपूर्ण जीवन मानवतेच्या कल्याणार्थ समर्पित केले; त्यांनी ब्रह्मज्ञानाद्वारे मानवाला मानवाशी जोडून प्रेम व गोडीगुलाबीने नांदण्याची निर्मळ धारा प्रवाहित केले व प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपले स्थान निर्माण केले. प्रत्येक भक्ताच्या जीवनाला वास्तविक रूपात एक व्यावहारिक दिशा प्रदान केली ज्यासाठी मानवता त्यांची सदैव ऋणी राहील. त्यांची दिव्य शिकवण वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज सत्य ज्ञानाच्या रूपात सर्वत्र प्रवाहित करत आहेत ज्याच्या प्रकाशाने प्रत्येक मानव आपले जीवन सकारात्मक रूपात कल्याणकारी बनवत आहे.
रक्तदान महादान – सेवेचे लक्ष्य महान उल्लेखनीय आहे, की युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी यांनी सन् १९८६ मध्ये सुरु केलेल्या रक्तदानाच्या परोपकारी मोहिमेने आता महाअभियानाचे रूप धारण केले असून त्याचा चरमोत्कर्ष झाल्याचे पहायला मिळत आहे. या शिबिरांमध्ये आतापर्यंत १३,३१,९०६ युनिट रक्त मानवमात्राच्या भल्यासाठी दिले गेले असून या सेवा निरंतर जारी आहेत.
पुणे (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्ष हा दोन खासदारांपासून, ३०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा पक्ष आहे. हे साध्य करण्यासाठी भाजपने कधीही कोणतेही षडयंत्र केले नाही केवळ कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि मतदारांचा विश्वास मिळवत हे साध्य करून दाखवले आहे, हा इतिहास फार जुना नाही. देशातील मतदारच भाजपला तिसऱ्यांदा विजयी करत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पाहण्यासाठी उत्सुक आहे. सर्वच गोष्टी जर भाजपच्या बाजूने असतील, तर विजयासाठी पुण्यात भाजपला षडयंत्र करण्याची गरज नाही हे सामान्य मतदाराही समजते. उलट काहीही करा पण निवडणूक जिंकून सत्ता काबीज करा, हे अलिखित आणि अघोषिक धोरण गेली ६०-७० वर्षे देशात राबवणाऱ्या काँग्रेसचे चरित्र षडयंत्र रचण्याचेच आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी केला आहे.
एमआयएम पक्षाची पुण्यात अनिस सुंडके यांना उमेदवारी मिळणे हे पराभवाच्या भीतीपोटी भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड यांनी पत्रकाव्दारे केला आहे. त्या आरोपांचा समाचार शहराध्यक्ष घाटे यांनी सुस्पष्ट शब्दात घेतला. ते म्हणाले, ‘गेली दहा वर्षे काँग्रेस सत्तेच्या बाहेर असल्याने त्यांना येनकेनप्रकारे त्यांना सत्ता हवी असल्याने त्यासाठी ते षडयंत्र रचण्याची शक्यता नाकारती येत नाही. पुण्यातील मतदारांनी सन २०१४ आणि २०१९ साली मोदीजींसाठी कसे मतदान केले याचा इतिहास ताजा आहे. यावेळीही मतदारांनी त्यांचे मन बनवले असून आता पुण्यातील नाही तर देशातील मतदार मोदीजींना पुन्हा तिस-यांचा पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे.
घाटे यांनी सांगितले की, ‘अन्य पक्षातून काँग्रेसमध्ये केवळ तिकीटासाठी आलेल्या रविंद्र धंगेकरांना काँग्रेसने काही महिन्यापूर्वी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. आता पुन्हा त्यांनाच लोकसभेसाठी उमेदवारी दिली असल्याने धंगेकरांना उमेदवारीवरुन कार्यकर्त्यांच्यातील मोठा वर्ग नाराज आहे. ही नाराजी व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून भाजपसारख्या पक्षावर षडयंत्राचे आरोप केले जात आहेत.
राहता राहिला एमआयएम ही भाजपची बी टीम असल्याचा दावा, तो दावा किती पोकळ आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. निवडणूक आयोगाने हैद्राबादमधील ५ लाख ४० हजार बोगस मतदारांची नावे काढून टाकली आहेत. तसेच हैद्राबादमध्ये मोठ्या संख्येने बोगसमतदार असल्याचा आरोपच तेथील भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी जाहीरपणे केला होता. जर एमआयएम ही भाजपची बी टीम असती तर भाजपचे त्यांचे नुकसान ऐन निवडणुकीत केले असते का’
ज्या काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात शपथेवर श्रीराम काल्पनिक असल्याचे सांगितले होते, त्याच काँग्रेसच्या सर्व नेत्यांवर रामनवमीच्या शुभेच्या देऊन पत्रकार परिषद सुरू करण्याची वेळ का आली ? आमची सत्ता राज्यात १९९५ साली आली पण नंतर पंधरा वर्षे नाही आली. जेव्हा काँग्रेसच्या कारभाराला लोक कंटाळले आणि त्यांनी २०१४ साली भाजपला सत्तेवर बसवले. जे राज्यात तेच केंद्रात, स्व. अटलजींचे सरकार २००४ साली गेल्यानंतर काँग्रेसची सत्ता देशात आली, पण अवघ्या दहाच वर्षात देशातील जनतेने बहुमताने भाजपला केंद्रात सत्ता दिली. त्यासाठी कोणतेही षडयंत्र करावे लागले नाही, कारण ते भाजपचे चरित्रच नाही, असेही घाटे यांनी स्पष्ट केले.
प्लास्टिक हे पृथ्वीला लागलेले ग्रहण असून ते सोडविण्यासाठी युवा विद्यार्थी पुढे सरसावले आहेत. प्लास्टिकची समस्या सोडविण्यासाठी आयोजित विशेष स्पर्धेला भारतीय विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित या विशेष स्पर्धेचे विजेते पुढील आठवड्यात जाहीर होणार आहेत.
येथील ग्रीन तेर फाऊंडेशनच्या पुढाकाराने पर्यावरण संरक्षणासाठी नेट झिरो ही संकल्पना उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये राबविली जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचलनालय (एआयसीटीई) आदींच्या सहयोगाने शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेतले जात आहेत. येत्या २२ एप्रिल रोजी जगभरात वसुंधरा दिन साजरा होत आहे. यानिमित्त विशेष राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयआयटी, आयआयएम, एनआयटी यसह अनेक नामांकीत संस्थांमधील तब्बल ६०० हून अधिक युवा विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत दोन टप्प्यामध्ये परीक्षा घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना १५ मिनिटात २५ प्रश्नांची उत्तरे ऑनलाईन पद्धतीने द्यायची आहेत. यात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी दुसऱ्या परीक्षेसाठी पात्र असतील. दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या संदर्भातील काही समस्यांचे विषय दिले जातील. विद्यार्थी त्याचा अभ्यास करुन सादरीकरण (पीपीटी) तयार करतील. त्यानंतर ते ऑनलाईन पद्धतीने जमा करतील. फाऊंडेशनचे संस्थापक संचालक आणि ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ नेट झिरो मोहिमेचे मार्गदर्शक इरिक सोल्हेम आणि फाऊंडेशनच्या समन्वयक आर्किटेक्ट दुर्गा कामत या तिघांची समिती विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे परीक्षण करेल. तीन विजेत्यांची त्यातून निवड केली जाणार आहे. प्रथम विजेत्या विद्यार्थ्याला ४ हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र तर उपविजेत्या दोन स्पर्धकांना १ हजार रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेसच्या साक्षी पटेल आणि नरेश साहू हे परीश्रम घेत आहेत.
नेट झिरोचे मुख्य उद्दीष्ट मानवनिर्मित कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये पूर्णपणे थांबविण्यासाठी नेट झिरो ही महत्वाकांक्षी मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील ५००हून अधिक विद्यापीठे, शेकडो महाविद्यालये, आयआयटीसारख्या नामांकीत संस्था सहभागी झाल्या आहेत. याद्वारे देशातील जवळपास १ लाख विद्यार्थी पर्यावरण संरक्षणासाठी सज्ज होत आहेत.
यंदाचे घोषवाक्य (थीम) यंदाच्या वसुंधरा दिनाचे घोषवाक्य (थीम) प्लास्टिक विरुद्ध ग्रह (प्लॅनेट) असे आहे. त्यानिमित्त प्लास्टिकवर आधारीत ही स्पर्धा घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यातील प्रश्नमंजुषा ही अतिशय आव्हानात्मक अशी आहे. तसेच, सिंगल युज प्लास्टिकचा प्रश्न सोडविण्यासाठी दुसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. मुख्य मार्गदर्शक सोल्हेम हे प्लास्टिक योद्धा म्हणून ख्यात आहेत. त्यांच्यामुळेच प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी आणि त्यावर बंदी घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारावर आता संयुक्त राष्ट्रात वाटाघाटी सुरू आहेत.
नेट झिरोच्या माध्यमातून ही पहिलीच स्पर्धा घेतली जात आहे. त्यास उदंड प्रतिसाद लाभलेला पाहून यापुढील काळात अधिक नाविन्यपूर्ण स्पर्धा, उपक्रम राबविले जातील. तरुणांना पर्यावरणाप्रती अधिक आस्था आहे हे सुद्धा स्पष्ट झाले. – डॉ. राजेंद्र शेंडे, संस्थापक संचालक, ग्रीन तेर फाऊंडेशन
पुणे: अमेरिकेच्या ज्या कोलंबिया विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जातात परिस्थिती नसतानाही शिकून त्या विद्यापीठातील एक आदर्श म्हणून नावाजले जातात. त्या कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून सन्मान करते. त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विषयी लिहिलेल्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच विचारवंत डॉ. सुरज एंगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
लेखक जगदीश ओहोळ यांनी हे पुस्तक लिहिले आहे. अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात ‘आंबेडकराईट स्टुडंट्स ऑफ कोलंबिया’ यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून हार्वर्ड विद्यापीठाचे स्कॉलर, लेखक, विचारवंत डॉ. सुरज एंगडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून कोलंबिया विद्यापीठातील जर्नालिझम विभागाचे प्रमुख जेलनी कॉब हे उपस्थित होते. यावेळी अमेरिकेतील आंबेडकराईट स्टुडंटस ऑफ कोलंबिया’ प्रमुख व कार्यक्रमाचे आयोजक विकास तातड, अभ्यासक चारुदत्त म्हसदे, नाशिक येथील संविधान प्रचारक शिवदास म्हसदे, मिलिंद अवसरमोल, नितीन सूर्यतळे (आंबेडकर इंटरनॅशनल मिशन), फिलिप मार्टिन (Phillip Martin, senior investigative reporter ) यांसह कोलंबिया विद्यापीठातील अनेक दिग्गज मान्यवरांची विशेष उपस्थित होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन तेथे करण्यात आले.
अमेरिकेतील ‘आंबेडकराईट स्टुडंटस ऑफ कोलंबिया’चे प्रमुख विकास तातड म्हणाले, कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झाले. आज येथे अनेक विद्यार्थी बाबासाहेबांच्या प्रेरणेतून शिक्षण घेत आहेत. कोलंबियात ‘आंबेडकराईट स्टुडंटस ऑफ कोलंबिया’च्या माध्यमातून भीमजयंती सह वेळोवेळी आम्ही आंबेडकरी विचारांचे विविध कार्यक्रम घेत असतो. या जयंती महोत्सवात भारतातील वक्ते व लेखक जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले ‘जग बदलणारा बापमाणूस’ या प्रेरणादायी पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. हे पुस्तक नव्या पिढीला जागतिक व सर्वव्यापी बाबासाहेब सांगणारे महत्वाचे पुस्तक आहे.
लेखक जगदीश ओहोळ म्हणाले, पुस्तकावर लोक जे प्रेम करत आहेत, ते पुस्तकातील आशय आणि त्यातून त्यांना पटलेले जागतिक प्रेरणादायी बाबासाहेब, यामुळे लोक इतका भरभरून प्रतिसाद देत आहेत. नव्या पिढीला, नव्या भाषेत मोटिव्हेशनल आणि सर्वांचे बाबासाहेब आंबेडकर सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. लवकरच या पुस्तकाच्या इंग्रजी व हिंदी भाषेतील आवृत्ती प्रकाशित करणार आहोत.
ग्लोबल गांधीयन मानद डॉक्टरेट मनोज कदम, राजेंद्रसिंह वालिया यांना प्रदान
पिंपरी, पुणे (दि. २० एप्रिल २०२४) आज आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ग्लोबल गांधीयन मानद डॉक्टरेट प्रदान करून गौरविण्यात येत आहे. हा अभिमानाचा क्षण असून डॉक्टरेट मिळविलेल्या व्यक्तींबरोबरच समाजाचा आणि राष्ट्राचा ही गौरव आहे. गांधी पीस फाऊंडेशन नेपाळ, कर्तव्य फाऊंडेशन यांनी विविध क्षेत्रातील कर्तव्यदक्ष व्यक्तींचा गौरव करून समाजाला नवी दिशा दिली आहे; हे कौतुकास्पद आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. गांधी पीस फाऊंडेशन नेपाळ, कर्तव्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सहावा ग्लोबल गांधीयन फिलॉसॉफी मानद डॉक्टरेट प्रदान सोहळा निगडीतील ग. दि. माडगूळकर सभागृहात शनिवारी (२० एप्रिल) पार पडला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मॅक्सवेल्स ग्रुपचे संचालक मनोज कदम यांनी मनुष्यबळ आणि कौशल्य विकासाव्दारे अनेकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या याबद्दल तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राजेंद्रसिंह वालिया, ज्येष्ठ पत्रकार डॉ. महेंद्र देशपांडे यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी गांधी पीस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. लाल बहादूर राणा, डॉ. सुनीलसिंह पुरणसिंह परदेशी, कर्तव्य फाऊंडेशनचे डॉ. विरेंद्र सिंह टिळे, डॉ. राजेंद्र आहेर, डॉ. महेंद्र देशपांडे, गांधी पीस फाऊंडेशनच्या आंतरराष्ट्रीय राजदूत डॉ. आशा पाटील, डॉ. श्वेता चौगुले आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. लाल बहादूर राणा, डॉ. महेंद्र देशपांडे, डॉ. आशा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. सुनीलसिंह परदेशी यांनी केले. आभार डॉ. विरेंद्रसिंह टिळे यांनी मानले.