भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ राम कथा ‘ या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या नृत्य कार्यक्रमातून रसिकांना विलोभनीय अभिव्यक्तीचे दर्शन घडले!
शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था यांच्यातर्फे हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. श्रीमती उषा आर.के. यांच्या संकल्पनेतील या कार्यक्रमात ज्येष्ठ भरतनाट्यम कलाकार सत्यनारायण राजू यांनी प्रभावी नृत्य सादरीकरण केले.संगीत संयोजन डी.एस. श्रीवास्तव यांचे होते.
श्रीमती उषा आर.के. यांनी ‘ राम कथा ‘ या नृत्य कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. ज्येष्ठ भरतनाट्यम कलाकार सत्यनारायण राजू यांनी ‘ राम कथा ‘ या भरतनाटयम् च्या सादरीकरणातून प्रभू श्रीराम यांचा जीवनप्रवास रसिकांसमोर उलगडला.
रामायणातील दशरथ, कौसल्या, कैकयी, मंथरा, श्रीराम, सीता, लक्ष्मण, जटायू, हनुमान, रावण ही सर्व पात्रे सत्यनारायण राजू यांनी अभिनय आणि नृत्य कौशल्याने समर्थपणे साकारली, आणि रसिकांना खिळवुन ठेवणारी ‘रामकथा ‘ प्रस्तुत केली.
हा कार्यक्रम शनिवार, २० एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०३ वा कार्यक्रम होता.ज्येष्ठ नृत्यगुरु डॉ.सुचेता भिडे – चापेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले . डॉ . सुचेता भिडे- चापेकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. अमीरा पाटणकर यांनी निवेदन केले.