सीसीटीव्ही फूटेज च्या आधारे चोरट्यांच्या हालचाली, त्यांचे राहणीमान आणि गुन्हा करण्याच्या पद्धतीचे अवलोकन केले असून त्याआधारे काही संशयितांची खातरजमा केली जात आहे. संशयास्पद वाटणाऱ्या काही पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.–प्रशांत ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरूर
शिरूर – येथील भर बाजारपेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिराच्या पुजाऱ्याला लोखंडी टॉमी ने मारहाण करून त्याचे हातपाय बांधून चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीतील रोकड व पद्मावती देवीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. आज (ता. २०) पहाटे दीड ते दोन च्या सुमारास घडलेल्या या प्रकाराने बाजारपेठेत खळबळ उडाली. दानपेटीत सुमारे दोन लाख रूपयांची रक्कम असावी, असा अंदाज मंदिर ट्रस्ट च्या विश्वस्तांनी वर्तविला असून, पोलिस दप्तरी तीस हजार रूपयांची जबरी चोरी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.श्री गोडीजी पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिर ट्रस्ट चे येथील कापड बाजार परिसरात रस्त्यालगत मंदिर असून, या मंदिराच्या देखरेखीसाठी पोपट सोनबा घनवट (वय ७२, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) या खासगी सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी तीन चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला.
उद्या महावीर जयंती असून, त्याआधी मंदिरात चोरी होऊन, भाविकांनी श्रद्धेने टाकलेल्या दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याने खेद वाटतो. मंदिर सुरक्षेकामी दिवसपाळीसाठी एक व रात्रपाळीसाठी एक असे दोन सुरक्षा रक्षक नेमले आहेत. परंतू तिघा चोरट्यांनी त्यांनाच जबरी मारहाण करून मंदिरात लुटालूट केली. पोलिसांनी या चोरीचा तातडीने छडा लावावा.–सतिष धाडिवाल, अध्यक्ष, श्री गोडीजी पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिर ट्रस्ट, शिरूर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, घनवट हे मंदिराच्या सुरक्षा कामी रात्रपाळीस नेमणूकीस होते. मंदिराच्या मागील बाजूस पहारा देत असताना पहाटे दोन च्या सुमारास तीन चोरट्यांनी मंदिराच्या मागील बाजूने मंदिर परिसरात प्रवेश केला. घनवट यांना पाहताच चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवत मंदिराच्या चाव्यांची मागणी केली.मात्र, चाव्या माझ्याकडे नाहीत तर पुजाऱ्याकडे असल्याचे सांगताच चोरट्यांनी त्यांना लोखंडी टामी ने मारहाण करीत खाली पाडले. एका चोरट्याने त्यांच्या छातीवर स्क्रू ड्रायव्हर रोखला. इतर दोघांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा कटावणीने तोडून मंदिरात प्रवेश केला.
दर्शनी बाजूला असलेल्या दानपेटीचे कुलूप व कडीकोयंडा तोडून त्यांनी पेटीतील रोकड आपल्याकडील बॅगांमध्ये भरली. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याकडे वळविला. गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप व कडी कोयंडा कटावणीने तोडून गाभाऱ्यातील पद्मावती मातेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र घेऊन चोरट्यांनी मागील दरवाजाने पोबारा केला.दरम्यान, काही वेळाने सुरक्षा रक्षक घनवट यांनी, हातापायाला बांधलेल्या दोऱ्या तोंडाने सोडवून स्वतःची सुटका करून घेतली व मंदिरात पूजाअर्चेचे काम पाहणारे रमेश पुजारी यांना हा प्रकार कळविला. त्यांनी तातडीने मंदिराच्या ट्रस्टींना या प्रकाराची दिल्यानंतर वेगाने यंत्रणा हलली. पोलिस पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मंदिर व परिसरातील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याआधारे तपास केला जात आहे.
दरम्यान, आज सकाळी शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव यांनी पोलिस पथकासह घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. आमदार ॲड. अशोक पवार, जैन श्रावक संघाचे संघपती भरत चोरडिया यांनीही मंदिराला भेट देत तातडीने या चोरीचा छडा लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या धाडसी चोरीच्या प्रकारातून चोरीला काय गेले यापेक्षा भाविकांच्या श्रद्धेला कुठेतरी धक्का बसला आहे. हा समस्त शिरूरकरांच्या भावनेचा विषय असून, या चोरीबाबत व तपासाबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्याशी संपर्क साधून तातडीने तपास लावण्याबाबत आग्रह धरला आहे.-ॲड. अशोक पवार, आमदार, शिरूर – हवेली.