Home Blog Page 1086

अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला

बारामती :अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. कन्हेरीच्या मारोती मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे.
1967 पासून आतापर्यंत पवार कुटुंबीयातला कुठलाही सदस्य निवडणुकीला रिंगणात उतरला की त्याचा प्रचाराचा शुभारंभ होतो बारामती तालुक्यातील कन्हेरी इथल्या मारुती मंदिरातून होतो.
आज सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी अजित पवारांचा मुलगा जय पवार आणि अजित पवारांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यातच अजित पवारांनी आणि सुनेत्रा पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोठं शक्ती प्रदर्शन केलं आणि त्यानंतर आज अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ केला.

यावेळी सुनेत्रा पवार सभेत म्हणाल्या कि,
मी बारामतीची सून, बारामतीकरांचे फेडेल ऋण त्यामुळे घड्याळाला जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्यासाठी आवाहन केले.

नारायणगाव जवळ ड्रग्जच्या गुप्त लॅब:आंतरराज्यीय अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश

मुंबईदि. १९ : केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाने केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातून कार्यरत आंतरराज्यीय अमली पदार्थाचे रॅकेट उघड झाले असून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यामध्ये एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर अंदाजित १३५ कोटी रकमेचे १९९.२९ किलो अल्प्राझोलम तसेच एक वाहन आणि दोन कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास आणि कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या मुंबई पथकाने कान्हूर मेसाई तालुका शिरुर, जि.पुणे याठिकाणी एका संशयित वाहनाला अडवून त्यातील साहित्याची बारकाईने तपासणी केल्यावर संशयास्पद पावडर आणि काही प्रयोगशाळेची उपकरणे आढळून आली. याचा पाठपुरावा करताना एक गुप्त युनिट मिडगुलवाडी, (जिल्हा, पुणे) येथे सापडले. याची तपासणी करताना त्या गुप्त प्रयोगशाळेत 173.34 किलो अल्प्राझोलमचे उत्पादन कच्च्या मालासह सापडले. या गुप्त प्रयोगशाळेत अत्याधुनिक गोष्टी होत्या, यामध्ये उपकरणे, जनरेटर, ड्रायर इत्यादी साहित्य आढळून आले. पुढील एका कारवाईत नारायणगाव जवळ, ता.आंबेगाव, जि. पुणे येथे २५.९५ किलो अल्प्राझोलम कच्च्या मालाच्या प्रचंड साठ्यासोबत आणखी एक गुप्त उत्पादन युनिट आढळून आले. दोन्ही युनिट हे दुर्गम भागात जेथे वाहनाने पोहोचणे कठीण आहे, अशा ठिकाणी होते. याबाबतच्या सविस्तर तपासात असे आढळून आले की या दोन्ही ठिकाणी अमंलीपदार्थाचा (ड्रग्ज) पुरवठा करणाऱ्या एकाच समूहाद्वारे या गुप्त लॅब चालवल्या जात होत्या.

तसेच मंचर येथे ताडीचे दुकान चालवणारा एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या अल्प्राझोलमची विक्री करताना त्याला अटक करण्यात आली. पुणे येथून या सर्व बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या एका महत्वाच्या सूत्रधाराची माहिती मिळाली, त्याला त्याच्या एका साथीदारासह मिरारोड, ठाणे येथून अटक करण्यात आली. या तपास प्रक्रियेत सबळ माहिती आणि आक्षेपार्हय पुरावे सापडले आहेत. अवैध उत्पादित अल्प्राझोलम महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये विशेषतः अवैधरित्या ताडी तयार करण्यासाठी विकले जात होते. अल्प्राझोलमचा उपयोग कृत्रिमरीत्या ताडीची क्षमता वाढवण्यासाठी आणि कृत्रिम ताडी तयार करण्यासाठी केला जातो. अशी भेसळयुक्त ताडी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात याची एक मोठी बाजारपेठ आणि समाजाच्या निम्न स्तरातील ग्राहकवर्ग याच्याकडून याची खरेदी होते.

निवडणूक आचारसंहितेच्या काळात मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या अशा अवैध उत्पादनाला आणि वाहतुकीला अटकाव करणाऱ्या कार्यवाहीत मोठे यश मिळाले आहे.

केंद्रात व राज्यात सत्ता आणि पुण्यात ६ आमदार व सुमारे १०० नगरसेवक असूनही गेल्या १० वर्षात पुण्याच्या विकासाला खीळ का बसली? रवींद्र धंगेकर यांचा सवाल

0

पुणे-केंद्रात व राज्यात सत्ता आणि पुण्यात ६ आमदार व सुमारे १०० नगरसेवक असूनही गेल्या १० वर्षात पुण्याच्या विकासाला खीळ का बसली?आणि पुण्याच्या विकासाबद्दल भाजपला आकस आहे काय? असे  प्रश्न पुणेकरांना पडले आहेत. त्यामुळेच पुण्यात भाजप बद्दल नकारात्मक भावना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गेल्या १० वर्षात केंद्र व राज्य सरकारमध्ये सत्ता असूनही भाजपने मोठा विकासनिधी पुण्यासाठी आणला नाही त्यामुळे वाहतूक कोंडी, सुरळीत पाणी पुरवठा, पर्यावरण असे अनेक प्रश्न आता बिकट बनले आहेत. आपल्या पुण्याला खऱ्या अर्थाने ‘सुखी शहर’ करण्यासाठी परिवर्तन करा आणि पंजाच्या चीन्हापुढील बटन दाबून काँग्रेसला विजयी करा असे आवाहन महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज केले.

पार्वती विधानसभा मतदार संघातील पदयात्रा संपल्यानंतर ते बोलत होते.

यापूर्वी‘काय म्हणतात पुणेकर? निवडून येणार धंगेकर’ च्या जोरदार घोषणा देत महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पर्वती विधानसभा मतदार संघात अतिशय उत्साही प्रचार केला.

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रचाराचा धडाका सुरू केला. सकाळच्या सत्रात उत्साही कार्यकर्ते कसबा विधानसभा मतदार संघात पदयात्रा केल्यानंतर, संध्याकाळी त्यांनी पर्वती विधानसभा मतदार संघात प्रचार यात्रा घेतली. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी या पदयात्रेत सहभागी होत, धंगेकर यांचा अतिशय उत्साहाने प्रचार केला. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी आणि अन्य मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते अशा विविध पक्षांचे अनेक कार्यकर्ते आवर्जून सहभागी झाले होते. यामध्ये अभय छाजेड, नितीन कदम, अश्विनी कदम,बंडू नलावडे, बाळासाहेब ओसवाल,अनिल सातपुते ,सतीश पवार, शशीकांत तापकीर, सचिन तावरे, रमेश सोनकांबळे, संतोष पाटोळे , नरेंद्र व्यवहारे,  हरीश यादव, अशोक हरणावळ,  बाळासाहेब भांबरे, जयकुमार ठोंबरे, अर्जुन जानगवळी, डी एच पोळेकर, संजय उपरंडे, स्वप्नील नाईक, संतोष गेले, गणेश लगट, विजय शिंदे, आशुतोष शिंदे, सचिन देढे, सुरेश चौधरी, मृणालिनी वाणी, ऋषिकेश भुजबळ, तुषार नांदे, प्रतीक खोपडे,  सतीश पवार, संतोष गेडे, सुधीर ढमाले, ताई कसबे, अमोल परदेशी, अर्चना शहा, आकाश मोहिते, सोमनाथ खंडाळे, अजय मिसळ महादेव जाधव, धर्मेंद्र धावरे, जयराम भोसले, श्रीरंग खंडाळे, अक्षय सागर, रोहित पवार, अमोल खंडाळे, मुकुंद काकडे, प्रवीण खत्री, शैलेश मोहिते, बाळासाहेब मोहिते, पराग थोरात आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.

  सर्वत्र स्वागत या पदयात्रेची सुरुवात शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजता सहकारनगर भागातील गजानन महाराज मंदिर येथून झाली. या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी अतिशय आनंदाने रवींद्र धंगेकर यांचे स्वागत केले. त्यानंतर ड्रम, ताशा या वाद्यांच्या  साथीने पदयात्रेस सुरुवात झाली. बागुल उद्यान परिसर, शिवदर्शन, सहकारनगर, शनी मंदिर- तावरे कॉलनी – संजय नगर – शिंदे हायस्कूल – तावरे बेकारी – ट्रेजर पार्क – मोगल वसाहत – गोल मंदिर- सहकार नगर पोलीस स्टेशन – नवजीवन चौक – खांडेकर शाळा– दाते बसस्टॉप– महात्मा गांधी चौक – लक्ष्मण उकीरंडे यांचे रेशन दुकान पासून आत – खंडाळे  चौक – ओम मित्र मंडळ चौक – लुंकड शाळा – विणकर सभागृह – तीन हत्ती चौक – संभाजी नगर मार्गे प्रवास करत ही पदयात्रा सातारा रस्ता येथील शंकर महाराज वसाहत येथे समाप्त झाली.

 पदयात्रे दरम्यान अनेक ठिकाणी स्थानिक महिलांनी धंगेकर यांचे औक्षण केले. तर स्थानिक कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तसेच निवडणूकिसाठी शुभेच्छा देखील दिल्या. अनेक ठिकाणी धंगेकर यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच फटाक्यांचा जल्लोष देखील यावेळी पाहण्यास मिळाला.

पदयात्रेप्रसंगी धंगेकर यांनी ठीकठिकाणी मंदिरांचे दर्शन घेतले. शिवदर्शन येथे राहुल युवक संघटना कार्यालय येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे दर्शनही त्यांनी घेतले. या प्रचार सभेदरम्यान त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला, तसेच परिसरातील व्यापारी वर्ग, विक्रेते, कामगार यांच्याशीही संवाद साधला. नागरिकांनी अतिशय आनंदाने धंगेकर यांचे स्वागत केले. अनेक नागरिक स्वतः वाहन थांबवून धंगेकर यांना अभिवादन करत होते. तर काही जण काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या पंजासोबत, धंगेकर यांच्यासोबत तसेच प्रचारासाठी सजविण्यात आलेल्या विशेष वाहनासोबत सेल्फी देखील घेत होते. एकूणच पहिल्याच दिवशी घेण्यात आलेल्या या पदयात्रेला नागरिकांनी देखील उस्फूर्त प्रतिसाद दिला.

पुण्याहून नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचता येणार केवळ एका तासात – खासदार बारणे

काळेवाडी, दि. 19 एप्रिल – पुण्याहून नवी मुंबई येथे होत असलेल्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत अवघ्या एक तासात पोहोचता येईल, असे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

खासदार बारणे यांनी गुरुवारी वाकड व पिंपळे निलख भागातील प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. थेरगाव येथील स्वीस काऊंटी व काळेवाडी येथील सोनिगरा विहार या दोन मोठ्या सोसायट्यांना भेट देऊन मतदारांशी संवाद साधला.
काळेवाडी येथील सोनिगरा विहार सोसायटीत प्रीतम पांडे यांनी पुण्यासाठी नवीन विमानतळाच्या विषयाबाबत छेडले असता, खासदार बारणे यांनी वरील उत्तर दिले. त्यावेळी सोनिगरा विहार सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर देवरे तसेच अन्य पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये नवी मुंबई, पनवेल येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. पुण्यातून या विमानतळापर्यंत अवघ्या एक तासात पोहोचणे शक्य होईल, असे नियोजन करण्यात येत आहे. पुणे- लोणावळा लोहमार्गाचे चौपदरीकरण होत आहे. त्याच्या खर्चास नुकतीच मंजुरी मिळाली आहे. कर्जत- पनवेल लोहमार्गाचे काम सुरू आहे. कर्जत- लोणावळा लोहमार्गासाठी डीपीआर बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. लोहमार्गाची ही कामे पूर्ण झाल्यानंतर पुणे ते पनवेल सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्यात येईल. पनवेल ते विमानतळापर्यंत मेट्रो सेवा सुरू होत आहे. त्यामुळे पुण्यातून नवीन विमानतळापर्यंत अवघ्या एक तासात पोहोचणे शक्य होईल.

स्वीस काऊंटी सोसायटीमध्ये अध्यक्ष डॉ. जयंत बाहेती, कमलेश मुथा, अशोक झिलपेलवार, माजी नगरसेवक कैलास बारणे, संतोष माऊली बारणे आदींनी खासदार बारणे यांचे स्वागत केले. गेल्या दहा वर्षात केलेल्या विविध विकास कामांची माहिती यावेळी बारणे यांनी दिली.

वाकड परिसरात भेटीगाठी

खासदार बारणे यांनी सकाळच्या सत्रात वाकड परिसरातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्यासमवेत शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस तसेच तानाजी बारणे, नितीन कान्हेरे, अथर्व खोल्लम, भरत कस्पटे आदी पदाधिकारी होते. मोहनशेठ विनोदे, भरत आल्हाट, विक्रम विनोदे, गंगाधर विनोदे, राहुल विनोदे, शांताराम विनोदे, कन्हैयालाल भूमकर, नारायणराव भिकू विनोदे, मोहन भूमकर, राजाभाऊ भुजबळ, रामभाऊ वाकडकर, श्याम वाकडकर, अमोल अरुण कस्पटे, सागर कस्पटे, श्री कलाटे, सुरेश एकनाथ कलाटे, किरण कलाटे, सूरज भुजबळ, विजयशेठ बाफना, रणजीत आबा कलाटे, बजरंग कलाटे, बाळासाहेब तथा तुकाराम विनोदे, भारती विनोदे आदींच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी भेट देऊन त्यांना सहकार्याचे आवाहन केले. सर्वांनी त्यांचे स्वागत व सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

पिंपळे निलख येथे हरिनाम सप्ताहास भेट

खासदार बारणे यांनी पिंपळे निलख येथे भारतीय खाद्य महामंडळ (एफसीआय) सदस्य अनिल संचेती यांच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळी भुलेश्वर नांदगुडे पाटील, काळूराम नांदगुडे पाटील, वसंत लुणावत, संजय पटेल, अनंतराव दौंडकर, वसंतराव आम्रे, अनंत कुंभार नागेश जाधव, सचिन पवार, प्रभाकर नीलकंठी, चेतन जाधव आदी उपस्थित होते.

माजी नगरसेविका आरती चोंधे व संकेत चोंधे, दिलीप बालवडकर, नितीन इंगवले, निखिल दळवी, संजय दळवी, निरंजन दळवी, नितीन दळवी, प्रतीक दळवी, प्रदीप दळवी, माऊली साठे, हरिभाऊ साठे, सचिन साठे, मिलिंद साठे, काळूराम नांदगुडे, अनिल कामठे, विक्रम कामठे, सागर कामठे, पांडुरंग इंगवले, विनायक इंगवले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सर्वांनी बारणे यांचे उस्फूर्त स्वागत करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. पिंपळे निलख येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहास देखील खासदार बारणे यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतले.

वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी होणार देहूरोड ते बालेवाडी उड्डाणपूल – खासदार बारणे

पुनावळे, दि. 19 एप्रिल – देहूरोड, किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्त्यावर देहूरोड ते बालेवाडी असा तब्बल साडेआठ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

खासदार बारणे यांनी आज (शुक्रवारी) सकाळच्या सत्रात पुनावळे भागातील प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. माजी नगरसेवक चेतन हुशार भुजबळ यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत बोलताना बारणे यांनी वरील माहिती दिली. त्यावेळी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ‌ तसेच हुशार भुजबळ, हिरामण भुजबळ, संतोष दर्शले, शरद दर्शले, अतुल ढवळे, हेमंत कोयते, राजेश दर्शले, शंकर नाना गायकवाड, अतुल काटे, दीपक मोढवे पाटील, रेश्मा भुजबळ आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड हा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. या भागातील दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्त्यावर देहूरोड ते बालेवाडी असा साडेआठ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे. त्यासाठी 6,600 कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. भूसंपादनासाठी स्थानिक शेतकऱ्यांचे सहकार्य मिळाल्यानंतर या उड्डाणपुलाचे काम सुरू होऊ शकेल. थेट जाणारी वाहतूक उड्डाण पुलावरून गेल्यामुळे स्थानिक वाहतुकीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागेल.

निगडी ते वाकड या नियोजित मेट्रो मार्गावर पुनावळे हे स्टेशन असणार आहे. त्यामुळे या भागातील विकासाला अधिक गती मिळेल, असे बारणे यांनी सांगितले. शहराची 2040 पर्यंतची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन नियोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही बारणे यांनी यावेळी दिली. पुनावळे कचरा डेपो रद्द करण्याबाबत आपण सातत्याने पाठपुरावा केला होता, याकडेही बारणे यांनी लक्ष वेधले.

आमदार अश्विनी जगताप यांनी बारणे यांना शुभेच्छा दिल्या. उमेदवाराचे चिन्ह हे श्रीरामाचे धनुष्यबाण आहे. अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडलेला हा बाण आहे. त्यामुळे बारणे यांचा विक्रमी विजय निश्चित आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार बारणे यांचे नेहमी सहकार्य मिळते, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आत्ता आम्ही बारणे यांचा प्रचार करीत असलो तरी तीन महिन्यांनी विधानसभा निवडणूक आहे. तेव्हा तेही आम्हाला मदत करतील, असे आमदार जगताप म्हणाल्या.

श्री काळभैरवनाथ व श्रीरामाचे दर्शन

पुनावळे येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर तसेच श्रीराम मंदिरात जाऊन खासदार बारणे व आमदार जगताप यांनी दर्शन घेतले. त्यानंतर शेखर ओव्हाळ, संतोष दर्शले, रेखा दर्शले, कुंदा दर्शले, रवींद्र साहेबराव ताजणे, रामदास काटे, आतिश काटे, पांडुरंग काटे, राजाराम काटे, शुभम काटे, सचिन काटे यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी सदिच्छा भेट दिली.

रावेत येथे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या ‌निवासस्थानी देखील त्यांनी भेट दिली. त्यावेळी माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे उपस्थित होते. सर्व ठिकाणी औक्षण करून बारणे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

पवारांनी शेताच्या बांधातच रहावं, शेजारचा देवाचा बांध रेटू नये


भाजपा चे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा टोला

पुणे अयोध्या येथील मंदिरात बाल रामचंद्राची मूर्ती आहे. याची माहिती न घेताच प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही याची चौकशी नास्तिक म्हणवणार्‍या पवार साहेबांनी करू नये. त्यांनी आपल्या शेताच्या बांधातच बोलावे, देव, धर्म, देऊळ या त्यांच्या प्रांतात नसलेल्या बांधात घुसखोरी करू नये, असा टोला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री . माधव भांडारी यांनी शुक्रवारी लगावला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अयोध्येतील मंदिरात सीतेची मूर्ती का नाही, असा सवाल अलिकडेच उपस्थित केला आहे. त्यासंर्दभात भांडारी बोलत होते.

भांडारी म्हणाले की, पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने असे विधान करण्यापूर्वी प्राथमिक माहिती घेतली असती तरी बरे झाले असते. कुटुंबातील
सुनेला बाहेरची म्हणून आपला स्त्री शक्तीबद्दलचा खरा दृष्टिकोन दाखवणार्‍या साहेबांनी ऊसाचा उतारा, द्राक्षाची छाटणी, डाळींब लागवड यासारख्या त्यांच्या अभ्यासाच्या विषयांवर हवे तितके बोलावे. मात्र देव-धर्म, संस्कृती विषय त्यांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही. अभ्यास नसलेल्या अशा विषयांबद्दल बोलून पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने आपल्या ‘मती’चे दिव्यदर्शन घडवू नये.

पवार साहेबांच्या कृषी क्षेत्रातील ज्ञानाबद्दल सर्वांनाच आदर आहे. त्यांनी आपल्या संबंधित क्षेत्राबाबत मत प्रदर्शन केले तर कोणाचाच आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र ते स्वत:ला नास्तिक म्हणवतात. त्यामुळे प्रभू रामचंद्राच्या मंदिरात सीतामाईची मूर्ती का नाही, याची काळजी त्यांनी करू नये, असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, पवार साहेबांना बोलण्यासाठी विषय हवा असला तर बारामती तालुक्यातील जिरायती भागाला का पाणी मिळू शकले नाही, यासारखा चांगला विषय नाही. सध्या ते बारामतीतच अडकून पडल्याने त्यांना आपल्या तालुक्यातील जिरायती भागाला का पाणी मिळू शकले नाही, याबाबतचा शोध निबंध तयार करता येईल.

एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट आयोजित एचआर कॉनक्लेव्हला प्रतिसाद

पिंपरी, पुणे (दि. १९ एप्रिल २०२४) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट पुणे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सेनिल मॅनेजमेन्ट (एनआयपीएम) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डायव्हर्सिटी हार्मोनी क्राफ्टिंग एन इनक्लुजिव्ह फ्युचर’ विषयावर एचआर कॉनक्लेव आयोजन करण्यात आले होते.
यावेळी एनआयपीएम पुणे चॅप्टरचे चेअरमन कल्याण पवार, सचिव अजित ठाकूर आणि डॉ. अभय कुलकर्णी, एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवडकर आदी उपस्थित होते.
डॉ. वहिदा पठाण (मॉडरेटर, एनआयपीएम, पुणे चॅप्टर), डॉ. मीनल राव (ग्रुप हेड एचआर, इंडस्ट्रिअल प्रोडक्ट्स बिझनेस, थर्मेक्स लिमिटेड), डॉ. ईला पाठक-झा (डायरेक्टर, स्टुडंड वेलफेयर, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे), ओजस्विनी सपाटणीकर (हेड, पीपल स्ट्रॅटर्जी, इन्टॅनगल्स लॅब प्रायव्हेट लिमिटेड), रिनत मॉस्कोविच (व्हाईस प्रेसिडेंट, बीव्हीजी इंडिया लिमिटेड), तनिंदर कौर (ओडी ट्रेनर) आणि शितल इंगळे (एचआर डायरेक्टर, फाइव्ह डी सोल्युशन्स) यांनी पॅनेल डिस्कशन दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविधतेचे महत्त्व आणि प्रत्येक व्यक्तीला कंपनीमध्ये कशी वागणूक दिली पाहिजे, याबद्दल मार्गदर्शन केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रा. डॉ. इरम अन्सारी यांच्या सह विद्यार्थी प्रतिनिधी मयूर मराठे, अनुराधा कांबळे, रक्षंदा कुनघाडकर, आकांक्षा चव्हाण, प्रिन्स शहारे, सेलिना सजी, आदित्य उत्तेकर, अनिरुद्ध पाटसकर, पूर्णिमा हंगर्गे, साक्षी गाडेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी राजनंदिनी सावळकर हिने केले.

श्रीरामाच्या व धर्माच्या नावावर मतं मागण्याचा नरेंद्र मोदींचा केवीलवाणा प्रयत्न: नाना पटोले

छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करणारा भाजपा कोणत्या तोंडाने शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागतो?

खोट्या मोदी गॅरंटीवर जनतेचा विश्वास नाही, १० वर्षे जनतेच्या खिश्यावर दरोडा टाकून अदानीचे घर भरण्याचा उद्योग.

पराभव दिसू लागल्यानेच मोदींकडून राहुल गांधी, काँग्रेस व इंडिया आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न.

मुंबई, दि. १९ एप्रिल
देश स्वतंत्र झाल्यापासून मोदी सरकार येईपर्यंत भारत देश जगाच्या पाठीवर ताठ मानेने व विकासाची विविध क्षेत्रे पादाक्रांत केलेला देश बनला होता. देशात जर नैराश्याचे वातावरण असते तर एवढी प्रगती साधलीच नसती. नरेंद्र मोदी व भाजपा हेच सतत निराशेच्या गर्तेत असल्याने त्यांना सर्वत्र निराशाच दिसते. १० वर्ष सत्ता असताना विकास कामे न केल्याने काँग्रेसला शिव्या देणे, प्रभूरामाच्या व धर्माच्या नावावर मते मागण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदी करत आहेत, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा जिल्ह्यातील प्रचार सभेत केलेल्या आरोपांचा नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकारच्या काळात विकास कामे झाली नाहीत हा पंतप्रधान मोदींचा आरोप धादांत खोटा व केवळ राजकीय आहे. खरे पाहता काँग्रेस सरकारनेच ६० वर्ष विविध क्षेत्रात दैदिप्यमान विकास काम केली. काँग्रेस पक्षाच्या सरकारांनीच सार्वजनिक क्षेत्रातील संस्था उभारल्या. नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात ज्या सरकारी संस्था विकून देश चालवला त्या काँग्रेस सरकारने स्थापन केल्या होत्या याचा मोदींना विसर पडलेला दिसतो. देशात सर्व काही २०१४ नंतरच झाले हे मोदींचे विधान गोड गैरसमज असलेल्या अंधभक्तासारखेच आहे. मोदी यांनी या सभेत राहुल गांधी, काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीवर बिनबुडाचे आरोप केले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला शिवाजी महारांजाचे नाव घेण्याचा अधिकार नाही. शिवाजी महाराजांचे नाव फक्त मते मागण्यासाठी केला जात आहे. अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक बनवण्याच्या जलपुजनाचा कार्यक्रम डिसेंबर २०१६ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला पण आजपर्यंत या शिवस्मारकाची एक विटही रचलेली नाही. निवडणुका आल्या की भाजपाला छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण येते.

नरेंद्र मोदी यांनी १० वर्षाच्या काळात जनतेच्या खिश्यावर दरोडा टाकून अदानीचे घर भरण्याचे काम केले आहे. मोदींनी फसवल्याची भावना जनतेत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोदी गॅरंटीवर कितीही भर दिला तरी जनता त्यावर विश्वास ठेवत नाही. मोदींची गॅरंटी खोटी असल्याचा अनुभव १० वर्षात देशातील जनतेला आलेला आहे, आता जनता खोट्या मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवत नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

यवतमाळ – वाशीम क्षेत्रात अनेक विकासात्मक कामे मोदी सरकारच्या काळात झाली

खासदार भावना गवळी, हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत वाशीम येथे आयोजित शिवसैनिकांच्या संवाद मेळाव्याला शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले मार्गदर्शन

यवतमाळ दि.१९: यवतमाळ – वाशीम लोकसभा क्षेत्रामध्ये कृषी, सहकार, सिंचन, रेल्वे, रस्ते, आरोग्य यांच्यासंदर्भातील विकासात्मक कामे मोदी सरकारने पूर्ण केलेली आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी देखील मोदी सरकारने आणि राज्यातील महायुती सरकारने केलेली आहे. पूर्वीपासूनच मतदारसंघातील जनतेने कायमच भाजपा, शिवसेनेला मोठी साथ दिली आहे. आगामी काळातील मतदारसंघाच्या विकासासाठी लोकसभेत महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांना जनता भरघोस मतांनी विजयी करेल असा विश्वास शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

शिवसेना मित्रपक्ष महायुतीच्या यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सौ. राजश्री हेमंत पाटील (महल्ले) यांच्या प्रचारार्थ वाशीम येथे आयोजित शिवसैनिकांचा संवाद मेळाव्यास शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. याप्रसंगी, खासदार हेमंत पाटील, खासदार भावना गवळी, शिवसेना प्रवक्ता व पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख प्रा. शिल्पा बोडखे, जिल्हा प्रमुख विजय खाजोडे, जिल्हा प्रमुख महादेव ठाकरे, महिला आघाडी संघटक वैशाली येळणे, तालुका प्रमुख माणेरा दीपक दरसडे, तालुका प्रमुख मनीष गवले, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब ठाकरे, संपर्क प्रमुख वाशिम विधानसभा हुकूम तुटके, तालुका प्रमुख वाशिम प्रकाश महल्ले, शहर प्रमुख वाशिम शाम दुरतकर यांच्यासह इतर पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी, राजश्री पाटील या अभ्यासू आणि उच्चशिक्षित उमेदवार असल्याने विकासाच्या नवनव्या योजना आणून त्या मतदारसंघाचा सर्वागीण विकास साधू शकतात असे सांगितले. लोकसभा निवडणुकीत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्वाधिक खासदार निश्चितपणे निवडून येतील अशी खात्री डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची नवे नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती

नवी दिल्‍ली, 19 एप्रिल 2024 

सरकारने नवे नौदल प्रमुख म्हणून  पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एनएम, व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची नियुक्ती केली आहे.व्हाईस ॲडमिरल  त्रिपाठी सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 30 एप्रिल 2024 रोजी दुपारी ते हा पदभार स्वीकारतील. सध्याचे नौदल प्रमुख, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एनएम ॲडमिरल आर हरी कुमार हे 30 एप्रिल 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

15 मे 1964 रोजी जन्मलेले व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांना 1 जुलै 1985 रोजी भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्त करण्यात आले. दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्र तज्ञ म्हणून, त्यांनी सुमारे 39 वर्षे प्रदीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिले. नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून सेवा बजावली होती. 

A person in a military uniformDescription automatically generated

व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी भारतीय नौदलाच्या विनाश, किर्च आणि त्रिशूल जहाजांची धुरा सांभाळली आहे. त्यांनी विविध महत्त्वाच्या संचालन आणि कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडल्या ज्यात वेस्टर्न फ्लीटच्या फ्लीट ऑपरेशन्स ऑफिसर; नौदल संचालन संचालक; नेटवर्क सेंट्रिक ऑपरेशन्सचे प्रधान संचालक आणि नवी दिल्लीच्या नेव्हल प्लॅन्सचे प्रधान संचालक यांचा समावेश आहे.

रिअर ॲडमिरल असताना त्यांनी सहाय्यक नौदल प्रमुख (नीती आणि योजना) आणि ईस्टर्न फ्लीट कमांडिंग फ्लॅग ऑफिसर म्हणून काम केले आहे. व्हाइस ॲडमिरल म्हणून धुरा वाहताना, त्यांनी प्रतिष्ठित भारतीय नौदल अकादमी, एझिमालाचे कमांडंट; नौदल संचालन महासंचालक; पश्चिम नौदल कमांडचे कार्मिक प्रमुख आणि ध्वज अधिकारी कमांडिंग-इन-चीफ म्हणून कर्तव्य बजावले आहे.

रिवा सैनिक शाळा आणि खडकवासलाच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेल्या व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज;नेव्हल हायर कमांड- करंज, अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स नेव्हल वॉर कॉलेज येथे नौदलाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे


मांजरी – शिरुर लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगत मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सर्वसामान्य जनतेच्या जनजीवनातील सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का? मांजरी येथील जेतवन बुद्ध विहार ट्रस्टला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट दिली यावेळी डॉ. कोल्हे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले की, आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं, परवा कोणीतरी म्हणलं की पाहिजे तेवढा निधी देतो, पण कचाकच बटन दाबा. पण ही लोकशाही मूल्यांची अवहेलना होत आहे. हा निधी आपल्याच पैशातून दिला जातो. असं म्हणत अजित पवार यांच्या विधानावर डॉ. अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान आढळराव पाटील यांनी देखील आपल्या खेडच्या प्रचार दौऱ्यात उमेदवारी अर्ज भरण्याआधीच पराभव मान्य करत त्यांनी शेवटची निवडणूक म्हणून जाहीर केलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्या आधीच त्यांनी सांगून टाकलं की, त्यांची ही शेवटची निवडणूक. समोर पराभव दिसत असल्याने सहानुभूती मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याचे डॉ. कोल्हे यांनी बोलताना सांगितले. त्याचबरोबर १५ वर्षाच्या संसदीय कामगिरीच्या जोरावर निवडणूकला सामोरे जायला हवं होतं. परंतु तसं काहीच पाहायला मिळत नाही. केवळ वयक्तिक टीका आणि सहानुभूती या जोरावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला जातोय. याशिवाय मतदारसंघात १५ वर्षांत काहीही काम केलं नाही, कोणताही मोठा प्रकल्प आणता आला नाही. त्यामुळे माजी खासदार सपशेल फेल ठरलेले असताना असा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

सर्वसामान्य मतदार सुज्ञ झाला आहे, जर कोणी म्हणलं की ही माझी शेवटीची निवडणूक आहे, याचा अर्थ पुन्हा २०२९ ला मत मागायला येणार नसाल तर मतदारांशी बांधीलकी कशी ठेवणार ? असा प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले आढळराव पाटील यांना डॉ. अमोल कोल्हे सवाल केला. ही कोणाची व्यक्तिगत निवडणूक नाही. ही कोणाची पहिली निवडणूक की, कोणाची दुसरी निवडणूक याचा मतदारांना काहीही घेणं देणं नाही. ही देशाची निवडणूक आहे, पुढील पाच वर्षे हा देश कोणाच्या हातात द्यायचा ही त्याची निवडणूक आहे.

दैनिक भास्कर या फार मोठ्या वृत्तपत्रातच्या सर्वेत ३९ जागा महाविकास आघाडीला दाखवल्या आहेत. महागाई वाढली आहे, कोणाला नोकऱ्या नाही सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का.? त्यामुळे आपल्याला देशात इंडिया आघाडीचे सरकार देशात निवडून देण्याची गरज असल्याच्या भावना डॉ. अमोल कोल्हे यांनी मांजरी येथे बोलताना व्यक्त केल्या.

यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार महादेव अण्णा बाबर, प्रशांत जगताप, प्रवीण तुपे, विक्रम शेवाळे, राहुल घुले, निलेश मगर, सागर बताले, मोनिष गायकवाड, सुनील गोरे, निलमताई गायकवाड, रोहिदास लांडगे, श्री कांबळे, सोपान लगड, मेहुल कापसे यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 सारसबाग येथील रस्ता बळकावलेल्या गब्बर स्टॉलधारकांना महापालिकेच्या खर्चाने फूड प्लाझा बांधून देणे गैर

पुणे- महानगरपालिकेने नागरिकांचे पैसे खर्च करून सारसबाग येथील रस्ता बळकावलेल्या गब्बर स्टॉल धारकांना महानगरपालिकेच्या खर्चाने फूड प्लाझा बांधूनदेणे गैरअसून असा प्रकार महापालिकेने अजिबात करू नये , अशी मागणी माजी नगरसेवकांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे आज केली आहे.पुणेकर नागरिकांच्या पैशातून ठराविक लोकांचे पुनर्वसन करू नये. आज हा पायंडा सारसबाग या ठिकाणी पडला तर उद्या अनेक ठिकाणी स्टॉलधारक एकत्र येऊन  महानगरपालिकेच्या म्हणजे पर्यायाने पुणेकरांच्या पैशाने फूड प्लाझा बांधून मागतील, रस्ते रद्द करण्याची मागणी करतील. त्यामुळे याबाबत आपण जे धोरण स्वीकारले आहे त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.पुणे महानगरपालिकेच्या विकासा आराखड्यातून एखादा रस्ता रद्द करणे योग्य नाही. हा रस्ता रद्द झाल्याशिवाय हा फूड प्लाझा अस्तित्वात येऊ शकत नाही. या ठिकाणी अनेक राजकीय नेत्यांचे त्यांच्या संबंधितांचे स्टॉल आहेत. रस्ता रद्द करू नये आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या म्हणजे पर्यायाने पुणेकर नागरिकांच्या पैशातून ठराविक लोकांचे पुनर्वसन करू नये. पुणेकर जागरूक आहेत व आम्ही त्यांचे प्रतिनिधित्व करतो म्हणून जर असे काही करण्याचा प्रयत्न केला तर मनपा विरोधात राज्य शासनाकडे आणि त्यांनीही ऐकले नाही तर हायकोर्टाकडे  दाद मागावी लागेल. आपण सर्वांगीण अभ्यास करून याबाबत निर्णय करावा व चर्चेसाठी वेळ द्यावा असेही या माजी नगरसेवकांनी म्हटले आहे.

‘कर सहायक’ मुख्य परीक्षेसह टंकलेखन कौशल्य चाचणी निकाल नियमानुसार

मुंबईदि. १९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा – 2023 मधील पूर्व परीक्षेसाठीच्या आवेदनापत्रात ‘कर सहायक’ संवर्गाचा विकल्प दिलेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेसाठी आणि टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता गुणवत्तेवर पात्र ठरविण्यात आले असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा – 2023 या परीक्षेचा निकाल आयोगाकडून दिनांक 16 एप्रिल, 2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे. निकाल संगणकीय संस्करण पद्धतीने तयार करण्यात आला असून पूर्णत: अचूक आहे. प्रस्तुत पदासाठी अर्ज केलेला नसतानाही उमेदवार पात्र ठरले असल्याची तसेच पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेली नसतानाही टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरले असल्याची बाब काही वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून ती पूर्णत: चुकीची आहे.

आयोगाकडून निकालाची कार्यवाही प्रचलित नियमांआधारे करण्यात आलेली असून ती योग्य आहे. प्रस्तुत निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येत नाही. शासनस्तरावर प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याच्या अधीन राहून उमेदवारांची शासनास शिफारस करण्यात येते.

कर सहायक या संवर्गाकरिता प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व अंशकालीन पदवीधर उमेदवार या वर्गवारीस आरक्षण नाही. तथापि, सदर वर्गवारीच्या काही उमेदवारांनी अर्जात सामाजिक आरक्षणाचा (अ.ज.,अ.जा.,वि.जा.(अ), भ.ज.(ब), भ.ज.(क), भ.ज.(ड), इ.माव., आ.दु.घ. इ.) तसेच अन्य समांतर आरक्षणाचा (महिला, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग इ.) दावा केलेला आहे. सदर दावे व उमेदवारांनी लेखी परीक्षेत प्राप्त केलेले गुण विचारात घेऊन त्यांचा टंकलेखन कौशल्य चाचणीच्या निकालाकरिता विचार करण्यात आला आहे. या परीक्षेच्या जाहिरातीमधील परि. क्र. 6.3.4 मध्ये नमूद केल्यानुसार सदर उमेदवारांना टंकलेखन प्रमाणपत्रे धारण करण्यापासून संबंधित शासन निर्णयांन्वये सूट देण्यात आली आहे.

आयोगाकडून सर्वच परीक्षा अत्यंत सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने घेण्यात येतात तसेच प्रचलित नियमांनुसार व निव्वळ गुणवत्तेवर निवडप्रक्रिया राबविण्यात येतात. आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निकालाच्या अनुषंगाने विपर्यास करणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्यांकडे उमेदवारांनी लक्ष न देता आगामी परीक्षांच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे, असे आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

भाजपने जनतेची फसवणुक केली- महाविका‌स आघाडीचा आरोप

पुणे-मागील दहा वर्षाच्या सत्ता काळात भाजप सरकारने इलेक्ट्रोल बॉन्ड, नोटबंदी या माधमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र त्या पूर्ण केल्या नाहीत. घोषणा करून जनतेला फसवणाऱ्या भाजपच्या पायाखालची वाळू आता घसरू लागली आहे, त्यामुळे पुणे लोकसभा मतदार संघाच्या बाहेरील उमेदवार एमआयएम व वंचितच्या माध्यमातून उभे करण्यात आले, असा आरोप महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या शहराध्यक्षांनी केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख गजानन थरकुडे, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेवक रफीक शेख, अजित दरेकर उपस्थित होते.

अरविंद शिंदे म्हणाले, भाजपने इलेक्ट्रोल बॉन्ड आणि नोटबंदीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. विरोधकांवर बोलणारे भाजप नेते या दोन विषयांवर शब्द काढत नाहीत. जे पंतप्रधान दहा वर्षात‌ पत्रकारांना उत्तर देवू शकले नाहीत, मग‌ ते जनतेला काय खरे बोलणार. दहा वर्ष जनतेला फसवणारे भाजप आज विकासाच्या नाही तर प्रभू श्रीरामाच्या नावाने मते मागत आहे. पुण्याचे उमेदवारही रामाचे नाव घेवून मते मागत आहेत. मात्र पुणेकर व देशातील सर्व मतदार या निवडणुकीत राम मंदिरावर नाही तर विकासावर मतदान करतील. भाजपच्या पायाखालची वाळू घसरत आहे. त्यामुळे भाजपने वंचित व एमआयएमला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. ते‌ कसे उभे‌ केले हे त्यांनात माहित. यांना पुणे मतदार‌संघात उमेदवार मिळाला नाही, म्हणून दोन्ही उमेदवार शिरुर मतदार संघातून आयात केले. या दोन पक्षाला मत म्हणजे भाजपला मत, हे दलित आणि मुस्लिम समाजाला कळून चुकले आहे‌. त्यामुळे या निवडणुकीत मतदान करताना पुणेकर महागाई, बेरोजगारी व शहरातील ढासळलेला कायदा‌ व सुव्यवस्थेचा डोळ्यासमोर ठेवून धंगेकर यांना निवडून देतील, अशा विश्वास‌ शिंदे यांनी व्यक्त केला.

प्रशांत जगताप म्हणाले, भाजपचे जे उमेदवार आहेत ते महापालिकेत स्थायी‌ समिती अध्यक्ष होते, महापौर होते. या काळात त्यांनी पुणेकरांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा वेगवेगळ्या टेंडरमध्येच लक्ष घातले.   भाजपने समान पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून डोळ्यात धुळफेक‌ केली आहे. विविध योजनेच्या नावाखाली पुणेकरांना फसवण्याचे काम केले आहे. आता निवडणुकीच्या काळात महायुतीला शहरात मुळशी पॅटर्न आणायचा आहे, असेही‌ते म्हणाले.

गजानन थरकुडे म्हणाले, भाजपने कोथरुडमधून पालकमंत्री, खासदार दिले. कोथरूडला सत्ताकेंद्र केले. तरीही कोथरुडचा विकास झाला नाही. कोथरुडचा जो विकास‌ झाला तो माजी मंत्री शशिकांत सुतार यांच्याच काळात झाला. चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना काय कामे केली त्यातील केवळ चार कामे त्यांनी सांगावीत. विकासाचे गाजर दाखवून निवडणुक लढवली जात आहे. सुनेला पाठवा दिल्लीत लेकीला ठेवा गल्लीत अशी डॉ. निलम गोऱ्हे यांच्या टिकेचा समाचार घेताना थरकुडे म्हणाले, गोऱ्हे यांना स्वत:ला नगरसेवक म्हणून निवडून येता‌येत नाही, ना त्या एक नगरसेवक निवडून आणू शकत नाहीत. तरीही शिवसेनेने त्यांना गेल्या २० ते २२ वर्षे विधान परिषदेच्या आमदार केले.

21 राज्यांतील 102 जागांसाठी मतदान संपले:5 वाजेपर्यंत राजस्थानात 50% , मध्य प्रदेशात 63%, ; बंगालमध्ये सर्वाधिक 77% मतदान

नवी दिल्ली-

18 व्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान सुरू झाले आहे. जागांच्या दृष्टीने हा सर्वात मोठा टप्पा आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहील.

याशिवाय अरुणाचल प्रदेशच्या 60 आणि सिक्कीमच्या 32 विधानसभा जागांसाठीही मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांतील प्रत्येकी एका लोकसभेच्या जागेवर एकाच वेळी मतदान होणार आहे.

या टप्प्यात मणिपूरच्या दोन लोकसभा जागांवर (मणिपूर इनर आणि मणिपूर बाह्य) मतदान होत आहे. 26 एप्रिल रोजी बाहेरील जागांच्या काही भागांमध्येही मतदान होणार आहे.

2019 मध्ये लोकसभेच्या या 102 जागांपैकी भाजपने 40, द्रमुकने 24 आणि काँग्रेसने 15 जागा जिंकल्या होत्या. इतरांना 23 जागा मिळाल्या होत्या. या टप्प्यात बहुतांश जागांसाठी या तीन पक्षांमध्ये लढत आहे.

पहिल्या टप्प्यात 1,625 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये 1,491 पुरुष आणि 134 महिला उमेदवार आहेत. 8 केंद्रीय मंत्री, एक माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यपालही यावेळी रिंगणात आहेत.

या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी होणार आहे. एकूण 7 टप्प्यात 543 जागांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. सर्व जागांचे निकाल ४ जूनला लागणार आहेत.