मुंबई, ता. 20: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणूक-2024 साठीचा जाहिरनामा सोमवार ( ता.22) रोजी चर्चगेट जवळील एमसीए लाऊंज येथे सकाळी साडेअकरा वाजता प्रकाशित होणार आहे. अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर आधारीत हा जाहिरनामा असल्याचे परांजपे यांनी स्पष्ट केले.
या जाहिरनामा प्रकाशन सोहळ्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्यासह पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, वाय.पी. त्रिवेदी, बाबा सिध्दीकी, रूपालीताई चाकणकर, सुरज चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकसित भारतासाठीची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहिरनामा असून सार्वजनिक सेवा आणि पायाभूत प्रकल्पांसह आर्थिक प्रगतीचा संकल्प यामधे व्यक्त करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सदरचा जाहिरनामा तयार करण्यात आला. दिलीप वळसे पाटील साहेब रूग्णालयात उपचार घेत असले तरी त्यांनी या जाहिरनामा तयार करताना सततचे मार्गदर्शन केल्याची माहिती आनंद परांजपे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव आणि प्रवक्ते संजय तटकरे देखील उपस्थित होते.