Home Blog Page 1084

बारामती लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती

पुणे, दि. २१: जिल्ह्यातील ३५- बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.

निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून श्रीमती जॉएस लालरेम्मावी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह येथील कक्ष क्रमांक ए-२०३ असा असून त्यांचा संपर्क क्रमांक ९३०९३६१९२८ असा आहे. तसेच निवडणूक पोलीस निरीक्षक यांच्या संपर्क अधिकारी वृषाली देसाई असून त्यांचा संपर्क क्रमांक ९४२२८०२२७६ असा आहे, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

२९ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

पुणे-राजगुरुनगर परिसरात कडूस येथील चांडाेली येथे जेईई आणि आयआयटी परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या २९ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला. जेवणानंतर ८० विद्यार्थ्यांना त्रास हाेऊ लागल्याने त्यातील २२ मुले व सात मुली अशा एकूण २९ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. चार जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात हलवण्यात अाले. कडूस येथे दक्षणा फाउंडेशनमध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यातून जेईई आणि आयआयटी अशा विविध पूर्वपरीक्षांची तयारी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचे निवासी वसतिगृह अाहे. गरीब कुटुंबातील हुशार मुले यांना आयआयटी व वैद्यकीय पूर्वपरीक्षेसाठी माेफत मार्गदर्शन मिळत असल्याने माेठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी येत असतात. शुक्रवारी रात्री याठिकाणी विद्यार्थ्यांना बटाटा भाजी, चपाती, डाळ, भात असे जेवण तयार करुन देण्यात अाले हाेते. विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर त्यांना अचानक जुलाब, डाेकेदुखी, मळमळ, उलटीचा त्रास हाेऊ लागला. त्यामुळे वसतिगृहात धावपळ उडाली आणि काही विद्यार्थ्यांना माेठ्या प्रमाणात त्रास हाेत असल्याने २९ जणांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना वायसीएम रुग्णालयात हलवण्यात आले, तर काही जणांवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत अाहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिळताच, राजगुरुनगर पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेऊन चाैकशी सुरु केली अाहे. अन्नाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयाेगशाळेत पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

राहुल गांधींना फूड पॉइझनिंग…सभा रद्द

खर्गे म्हणाले,’UPA सरकारच्या काळात कच्चे तेल आंतरार्ष्ट्रीय बाजारात $105 होते,तेव्हा ६६ रुपये पेट्रोलचे दार होते आता ते $86 प्रति बॅरल आहे तरीही मोदींनी ते कमी न करता १०० पार करण्याचा प्रयत्न सातत्याने केला

सतना, मध्य प्रदेश-काँग्रेसचे स्टार प्रचारक राहुल गांधी यांना फूड पॉइझनिंग झाल्याने त्यांचा रविवारी सतना येथील दौरा सभा रद्द झाली आहे.
राहुल गांधी यांचा दौरा रद्द झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रविवारी सतना येथे मेळाव्याला संबोधित करण्यासाठी पोहोचले.मल्लिकार्जुन खरगे बीटीआय मैदानावर म्हणाले, ‘राहुल येऊ शकले नाही याबद्दल मला सर्वप्रथम माफी मागायची आहे. त्यांना फूड पॉइझनिंग झाली आहे. मला सतना येथे जायचे आहे, असे त्यांनी सांगितले. आता याची भरपाई कोणी करू शकत असेल तरच तुम्ही करू शकता. इथून मला रांचीला जायचं आहे. तिथे इंडिया आघाडीची सभा आहे. मलाही पोहोचायचे होते, पण इथे आल्याने मी तिथे उशिरा पोहोचेन.

ते म्हणाले, “मी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. आम्ही कुठेही गेलो, लोकांचे मुख्य प्रश्न म्हणजे महागाई आणि बेरोजगारी. महागाई गरिबांचे कंबरडे मोडत आहे. जीव घेत आहे. कोणीही सुखी नाही. फक्त एक माणूस आनंदी आहे. मोदी.”

आधी ठरलेल्या कार्यक्रमानुसार राहुल सतना येथे काँग्रेसचे लोकसभा उमेदवार सिद्धार्थ कुशवाह डब्बू यांच्या समर्थनार्थ सर्वसाधारण सभा घेणार होते. यापूर्वी 8 एप्रिल रोजी त्यांनी मांडला आणि शहडोल येथे निवडणूक सभा घेतल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सतना येथे 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

दोन व्यक्ती देशातील प्रत्येक गोष्ट विकत आहेत

दोन व्यक्ती देशातील प्रत्येक गोष्ट विकत आहेत. विमानतळ, रस्ते, रेल्वे विकले. अदानी आणि अंबानी घेणारे आहेत, मोदी आणि शहा विकणारे आहेत. बँका उद्ध्वस्त केल्या. 16 लाख कोटी रुपये श्रीमंतांचे कर्ज माफ झाले, पण गरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही.

खरगे यांनी कमलनाथ यांचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘कमलनाथ सत्तेत असताना चमत्कार घडले. 27 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. ओबीसींना 27 टक्के आरक्षण दिले. 100 रुपयांत 100 युनिट वीज दिली.

खरगे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल 66 रुपये प्रति लिटर होते, आता ते 100 रुपये लिटर आहे.

डिझेल 52 रुपये प्रति लिटर होते, ते आता 88 रुपये प्रति लिटर आहे.

कच्चे तेल (आम्ही ते बाहेरून आयात करतो) $105 होते, आता ते $86 प्रति बॅरल आहे.

त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी व्हायला हवेत, पण मोदींनी भाव वाढवत ठेवले.

घरगुती गॅस सिलिंडर 414 रुपयांना मिळत होता, तो आता 903 रुपयांना आहे

पीठ 210 रुपयांत 10 किलो असायचे, आज 437 रुपये आहे.

दूध 39 रुपये प्रतिलिटर होते, आज ते 66 रुपये/लिटर आहे.

देशी तूप 300 रुपये प्रति लिटर होते, आज ते 705 रुपये आहे.

मोहरीचे तेल 52 रुपयांवरून 150 रुपये प्रतिलिटर झाले.

तूर डाळ 80 रुपये/किलोवरून 128 रुपये झाली.

संविधान बदलण्यासाठी बहुमताची मागणी करत आहेत

मोदीजी म्हणतात की डॉ.आंबेडकर वरून खाली आले तरी संविधान बदलणार नाही. हे माझे नाहीत, हे त्यांचे शब्द आहेत. तुम्ही ऐकले आणि वाचले असेल. मी विचारतो, जर हे खरे असेल तर तुमचे खासदार का म्हणतात, भागवत का म्हणतात, आमदार का म्हणतात की आम्हाला दोन तृतीयांश बहुमत द्या, आम्ही संविधान बदलू. सांगितले की नाही. असे त्यांचे म्हणणे आहे. अशा व्यक्तीच्या नेतृत्वाला मत देणार का?

मोदी शहांना एक न्याय आणि अन्य लोकांना दुसरा न्याय -निवडणूक आयोगाचा हम करेसो कायदा चालू देणार नाही

उद्धव ठाकरे म्हणाले- प्रचार गीतातून ‘जय भवानी’, ‘हिंदू’ काढणार नाही:मोदी-शहांनी देवाच्या नावे मत मागणे निवडणूक आयोगाला चालते का? आधी त्यांच्यावर कारवाई करा

मुंबई-मशाल चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटाने नवे प्रचार गीत तयार केले आहे. या प्रचार गीतामधील दोन शब्द काढावे असे निवडणूक आयोगाने सांगितले असून त्यासाठी नोटीस पाठवली आहे. आम्ही जय शिवाजी जय भवानीमधील प्रचार गीतामधील जय भवानी शब्द काढावा असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. हुकुमशाहीसमोर आम्ही झुकणार नाही, प्रचार गीतामधून जय भवानी शब्द काढणार नाही,

भवानी मातेचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आमच्यावर कारवाई करण्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री देवाच्या नावाने मत मागतात ते चालते का? त्यांच्यावर कारवाई करा असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच लोकसभा निवडणूक आयोगाकडून शिवसेना ठाकरे गटाला नोटीस आल्याची बातमी समोर येत आहे. ज्यामध्ये ठाकरे गटाच्या प्रचार गीतातून जय भवानी, हिंदू धर्माचा उल्लेख असलेले शब्द काढा, असे सांगण्यात आल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. याबाबत आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका आहेत. त्यासाठी एक प्रेरणा गीत लागते. म्हणून आम्ही आम्ही मशाल गीत काढले आहे. यावर निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र लिहून दोन शब्द काढायला लावले. हिंदू तुझा हा धर्म जाणून घे हे मर्म यामधील हिंदू धर्म शब्द काढायला लावला. तसेच गाण्याच्या बॅकग्राऊंडला असलेल्या जय भवानी, जय शिवाजी घोषणेमधील जय भवानी शब्द काढा, असे निवडणूक आयोगाने सांगितल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी देवाच्या नावावर मते मागतात. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. त्यावर अद्याप निवडणूक आयोगाचे उत्तर आले नाही. ते हिंदू धर्मावर मते मागतात. आम्ही हिंदू धर्माच्या आधारावर मत मागितले नाही. निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यावे, जर आमच्यावर कारवाई करायचे आहे तर यांच्यावर देखील कारवाई करावी लागेल.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही देखील राम भक्त आहोत हनुमान भक्त आहोत. आई तुळजा भवानी राज्याचे दैवत आहे. जय भवानी जय शिवाजी ही आपण घोषणा करतो. हे आम्ही बोलणारच. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. कुलदैवतेबद्दल एवढा आकस आहे. ही हुकूमशाही आहे.

अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी…

0

मुंबई : निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि पुरावा म्हणून जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी व हरकती मागवण्यासाठी हा साधारण १० दिवसांचा कालावधी गृहीत धरला गेला आहे.

राज्यात पाचव्या टप्प्यात  दि. २० मे रोजी  धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर- मध्य, मुंबई दक्षिण- मध्य आणि  मुंबई दक्षिण या १३ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघांसाठी नामनिर्देशन सादर करण्याची अखेरची तारीख ३ मे २०२४ आहे.

त्यानुसार, या लोकसभा मतदार संघातील ज्या पात्र नागरिकांनी दि. १ एप्रिल २०२४ रोजीपर्यंत आपल्या वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असतील व त्यांचे नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट झालेले नसेल, अशा नागरिकांनी या मतदारसंघामध्ये नवीन मतदार नोंदणीसाठी दि. २२ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज केल्यास (ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने) त्यांची नावे मतदार यादीत (अन्यथा पात्र असल्यास) समाविष्ट होऊ शकतील. यामुळे सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासून, जर नाव नसल्यास त्वरीत दि. २२ एप्रिल २०२४ पर्यंत मतदार नोंदणीचा अर्ज क्र. ६ भरावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Ø  मतदार यादीत नाव कसे तपासावे

voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline अॅपचा वापर करून मतदार यादीत आपले नाव शोधा

वैयक्तिक तपशिलाच्या पर्यायांतर्गत नाव, आडनाव, वडील किंवा पतीचं नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ या तपशिलाच्या आधारे किंवा मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे किंवा मोबाइल क्रमांकाच्या आधारे ( तो जर तुमच्या मतदार ओळखपत्राशी जोडला असेल तर) किंवा Voter Helpline App वर मतदार ओळखपत्रावरील क्यू आर कोड स्कॅन करूनही मतदार यादीत आपले नाव शोधता येते.

Ø  मतदार नोंदणीचा अर्ज कसा भरावा

अर्ज क्र. ६ – नवमतदार नोंदणी

ऑनलाइन पद्धतीने – voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline App चा वापर करून मतदार नोंदणीचा अर्ज भरा

ऑफलाइन पद्धतीने- आपले छायाचित्र, तसेच वय आणि सर्वसाधारण निवासाच्या स्वतःची स्वाक्षरी असलेल्या पुराव्यासह आपल्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाला भेट द्या. अधिक तपशिलांसाठी लिंक:  https://ceoelection.maharashtra.gov.in/SearchInfo/VHCs.aspx

मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच वयाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखल, भारतीय पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, दहावी किंवा बारावीचे निकालपत्र या दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच सर्वसाधारण निवासाचा पुरावा म्हणून भारतीय पासपोर्ट, आधारकार्ड,  राष्ट्रीय, श्येड्युल्ड बँक किंवा टपाल विभागाचे खात्याचे चालू पासबूक, पाणी, वीज तसेच स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचे किमान एका वर्षाच्या आतील देयक,  नोंदणीकृत भाडे करार, नोंदणीकृत विक्री करार या दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

voters.eci.gov.in हे संकेतस्थळ तसेच Voter Helpline या अॅपवरून मतदार नोंदणीचा अर्ज क्र. ६ कसा भरावा, मतदार यादीत नाव कसे तपासायचे याचे मार्गदर्शनपर व्हिडिओ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या CEO Maharashtra या युट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांचे दुवे :

फेसबूक: https://www.facebook.com/ChiefElectoralOfficerMaharashtra

युट्यूब: https://www.youtube.com/@ceomaharashtra211

इन्स्टाग्राम: https://www.instagram.com/ceo_maharashtra/

एक्स (ट्विटर): https://twitter.com/CEO_Maharashtra

निवडणूक प्रक्रियेविषयीच्या शंका किंवा प्रश्नांसाठी १८०० २२ १९५० या मतदार मदत क्रमांकावर संपर्क साधावा.

0000

सावधान….भारतीय लोकशाहीत पेड न्यूजला थारा नाही…!

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने दि.16 मार्च 2024 “आदर्श आचार संहिता” जाहीर केली आहे. लोकसभेत योग्य, कार्यक्षम व लोकाभिमुख दृष्टिकोन असलेला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी प्रत्येक भारतीय  मतदाराने मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येते. मतदान करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने मतदारांनी कुठल्याही आमिषाला वा प्रलोभनाला बळी पडू नये. तसेच धाकदपटशाहीला भीक न घालता मतदारांनी सद्सद्विवेकबुद्धीने मतदान करावे. महत्वाचे म्हणजे निवडणुका मुक्त, निर्भय व शांततामय वातावरणात पार पडाव्यात, यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी अन् प्रसारमाध्यमांनी सहकार्य करावे, असे निवडणूक आयोगाकडून आवाहन करण्यात आले आहे.

मागील काही सार्वत्रिक निवडणुकींचे सिंहावलोकन केल्यावर देशात काही ठिकाणी पेड न्यूज च्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. खरे तर, अशा घटना लोकशाहीला मारक आहेत. त्याचप्रमाणे पेड न्यूज हे मुक्त व शोधपत्रकारितेलाही बाधक आहे. यास्तव वृत्तपत्रे अन् त्यांच्या प्रतिनिधींनी “पेड न्यूज” ला अजिबात थारा देऊ नये. सर्वात महत्वाचे म्हणजे सुदृढ लोकशाहीसाठी उमेदवारांनीदेखील आपल्या प्रचार मोहिमेदरम्यान पेड न्यूजचा आधार घेवू नये. कारण पेड न्यूज हा लोकशाही संवर्धनाच्या मार्गातील मोठा अडसर आहे, हे लक्षात द्यावे.

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने पेड न्यूजसंदर्भात केलेली व्याख्या “एखाद्या उमेदवाराने पैशाच्या मोबदल्यात किंवा विशेष मेहरनजरेच्या बदल्यात प्रसिद्धी माध्यमाद्वारे केलेली बातमी, वृत्तांकन, विश्लेषण वा प्रसारण” अशी आहे. असे कृत्य केल्याचे निष्पन्न झाल्यावर त्या संबंधीत प्रसारमाध्यम, वृत्तपत्र आणि उमेदवाराच्या लोकप्रियतेला तडा जावून जनमानसातील विश्वासाहर्ता नाहीशी होत असते. म्हणजेच एखाद्या उमेदवाराने, राजकीय पक्षाने वा त्याच्या संघटना किंवा संस्थेने मतदारांना प्रभावित करण्याच्या हेतूने वर्तमानपत्रे, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ( विभिन्न चॅनल्स) यांच्याद्वारे सोयीनुसार बातम्या प्रसिद्ध-प्रसारित करणे, हे सर्व प्रकारे पेड न्यूजच्या कक्षेत येतात, हे उमेदवार व माध्यमांनी जरूर लक्षात घ्यावे.

सांगण्याचे तात्पर्य म्हणजे वृत्तांकनाच्या (दृकश्राव्य) बदल्यात घेतलेला पैसा वा भेटवस्तू याला “भ्रष्टाचाराचे कृत्य” म्हणून घोषित केल्याने, तो आता शिक्षापात्र अपराध आहे. म्हणूनच पेड न्यूजसारख्या गैरप्रकारांना प्रसारमाध्यमांनी स्वतःहूनच मज्जाव करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

उमेदवारांनी प्रचार मोहिमेत केलेल्या खर्चाचा अचूक लेखा ठेवून, त्याचे विवरणपत्र संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे तसेच खर्च नियंत्रण समितीच्या नोडल अधिकाऱ्यांकडे सादर करणे, निवडणूक आयोगाने अनिवार्य केले आहे. त्यात कसूर करणे हाही एक अपराधच आहे, याची संबंधितांनी नोंद द्यावी.

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तर “पेड न्यूज” हा निकोप पत्रकारितेची संभाव्य कीड आहे. यासाठी पत्रकारांनीच पुढाकार घेवून “पेड न्यूज” या अनैतिक बाबीला अस्वीकृत करून हद्दपार करायला हवे. वृत्तपत्रे व दूरचित्रवाहिन्यांनी पत्रकारितेची मूल्ये शिरसावंद्य मानून, लोकशाहीची बूज राखायला हवी. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हे लोकशाहीचे पाईक असल्याने, त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातून पेडन्यूजला हद्दपार करण्यास कटिबद्ध व्हावे. घटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटना अन् भारतीय लोकशाहीचा जगाच्या पाठीवर सर्वत्र नावलौकिक आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील सर्वपक्षीय उमेदवार, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमे (प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमे) या सर्वांनी योग्य ती खबरदारी घेऊन लोकशाहीला मारक असलेल्या पेड न्यूजचा मार्ग अवलंबू नये, असे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे. आपण अशा प्रकारे कर्तव्यपूर्ती केल्यामुळे भारतीय लोकशाही जागतिक स्तरावर सदैव आदर्श लोकशाही म्हणून गणली जाईल, हे निश्चित!

00000

-मनोज सुमन शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील न्यू गर्ल्स होस्टेलमधील घटनेची डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून गंभीर दखल; प्रत्यक्ष पाहणी करून घेतला आढावा.

तात्काळ उपाययोजना करण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाला दिल्या सूचना

मुंबई दि.२०: डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील न्यू गर्ल्स होस्टेलला आज सायंकाळी भेट दिली. येथील ५० हुन अधिक विद्यार्थिनींना दूषित पाणी प्यायल्याने पोटदुखी, जुलाब यांसारखा त्रास झाल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर आले होते, त्यापार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही भेट दिली आहे. यावेळी, कला शिंदे, शालिनी सुर्वे, ऍड. जाधव, कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, उपकुलसचिव अशोक घुले, विद्यापीठ अभियंता छाया नलवडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बाधित विद्यार्थिनींची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांना आधार दिला. यावेळी विद्यार्थिनींनी डॉ. गोऱ्हे यांना वसतिगृहातील परिस्थितीबाबत माहिती देऊन परिसरात अनेक सुधारणा होणे आवश्यक असल्याचे सांगितले, त्यानुसार डॉ. गोऱ्हे यांनी विद्यापीठाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना केल्या. त्यामध्ये विद्यार्थिनींच्या मागणीनुसार डॉ. गोऱ्हे यांनी पुढील गोष्टींची गरज असल्याचे लक्षात आणून दिले,
१)टँकरद्वारे जे पाणी येते त्याची तपासणी होणे आवश्यक आहे.

२) पाणी शुद्धीकरण करण्याचे यंत्र देखील तपासण्यात यावे.

३) तसेच जेवणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १०-१० मुलीचा ग्रुप तयार करून एका प्रतिनिधीची नेमणूक करावी.

४) वसतिगृहाच्या प्रत्येक खोल्यांमधील दुरुस्तीचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात याव्यात.

५)वसतिगृहातील सर्व खोल्यांचे निर्जंतुकीकरण तात्काळ करून घेण्यात यावे.

६) विद्यार्थिनींची तब्येत खराब होते आहे त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने कारणे न देता योग्य ती दखल घेऊन उपाययोजना कराव्यात.

अशा सूचना डॉ. गोऱ्हे यांनी विद्यापीठ प्रशासनाला केल्या आहेत. विद्यापीठाच्यावतीने लवकरच योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तथापि, याबाबतचा सविस्तर अहवाल महामहिम राज्यपाल रमेश बैस यांना पाठविणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

शेलारांच्या नंतर आज चंद्रकांतदादाही काकडेंच्या भेटीला…

पुणे- (Pune Lok Sabha Election 2024)मनसे सोडून वंचित मधून वसंत मोरे उभे राहत आहेत ,एम आय एम ने देखील सुंडकेंना उमेदवारी दिली आहे ,काँग्रेसचे उमेदवार धंगेकर यांची कोंडी अशा पद्धतीसह त्यांच्या पक्षांतर्गत पातळीवरून ही होत आहे तर दुसरीकडे भाजपाने आता आपल्याही पक्षातील नाराजीला गंभीरतेने घेतल्याचे दिसून येते आहे. काल मुंबईतील भाजप नेते आशिष शेलार यांनी पुण्यातील माजी खासदार संजय काकडे यांची भेट घेतली . आणि त्यानंतर आज पुण्यातील भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील आज काकडे यांची भेट घेतली . Chandrakant Patil Meets Sanjay Kakade

काकडे हे स्वतः लोकसभेसाठी इच्छुक असताना भाजपकडून प्रत्यक्षात माजी महापौर मोहोळ  (Murlidhar Mohol)यांना उमेदवारी दिली गेली . यामुळे पक्षांतर्गत नाराजी पसरली आणि काकडे हे प्रचारात आणि एकूणच पक्षाच्या कामकाजात कुठे दिसत नाहीत असे चित्र निर्माण झाले त्यांच्यासह काही नगरसेवक देखील प्रचारापासून दूर राहू लागले आता एकूणच निवडणूक व्यूहरचनेत सर्व राजकीय पातळीवर आघाडीवर राहू पाहणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी या नाराजीचीही दखल गांभीर्याने घेतली असून काकडे यांची नाराजी दूर करून त्यांना पक्षाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु केल्याचे वृत्त आहे. संजय काकडे हे माजी राज्यसभा सदस्य आहेत , महापालिकेत भाजपाची सत्ता आणण्यात त्याचे मोठे योगदान होते, या शिवाय मराठा आणि बहुजन समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग सहाही विधानसभा मतदार संघात आहे . काकडे यांचे निवडणूक राजकारणापासून दूर राहणे नुकसानीचे ठरू शकते या विचाराने नेत्यांनी काकडे यांच्याशी संपर्क साधून चर्चा करत त्यांची समजूत काढून त्यांना मूळ प्रवाहात पुन्हा आणायचे प्रयत्न सुरु केल्याचे वृत्त आहे.

भारताच्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक – बारणे

पिंपळे सौदागर, दि. 20 एप्रिल – ‘वोट फार डेव्हलपमेंट’, ‘वोट फॉर मोदी’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत पिंपळे सौदागर भागातील विविध सोसायटीमधील उच्चशिक्षित रहिवाशांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा दिला.

खासदार बारणे यांनी शुक्रवारी संध्याकाळी पिंपळे सौदागर भागातील विविध सोसायट्यांना तसेच पदाधिकारी व मान्यवरांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. विवांता सोसायटी, जरवरी को-ऑपरेटिव्ह सोसायटी, रोझलँड रेसिडेन्सी, डॅफोडिल्स सोसायटी, कुंजीर रेसिडेन्सी, साई निसर्ग पार्क दोन आदी सोसायट्यांमधील रहिवाशांना भेटून खासदार बारणे यांनी संवाद साधला. त्यांच्या समवेत माजी नगरसेवक विठ्ठल तथा नाना काटे, शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, कुंदन जाचक, मनोज ब्राह्मणकर, सुदर्शन देसले आदी पदाधिकारी होते.

रोझलँड रेसिडेन्सीमध्ये उपाध्यक्ष विक्रम शिंदे, डॅफोडिल्स सोसायटीमध्ये अध्यक्ष राजू शेलार यांनी खासदार बारणे यांचे स्वागत केले. दोन्ही ठिकाणी झालेल्या कोपरा सभांमध्ये सोसायटीतील सभासदांनी बारणे यांच्या उत्स्फूर्त स्वागत केले. साई निसर्ग पार्क दोन सोसायटीत अध्यक्ष वीरेंद्र वारुडे, सचिव सुदर्शन देसले, मनीष सुपाते, मानसिंग वाघ यांनी बारणे यांचा सत्कार केला.

आम्हाला विकास हवा आहे. त्यामुळे आमचे मत नरेंद्र मोदींना पर्यायाने खासदार बारणे यांनाच राहील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या विकासाची गती कायम राखण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, असे बारणे यांनी सांगितले.

पिंपळे सौदागरमध्ये माजी नगरसेवक विठ्ठल तथा नाना काटे यांच्या कार्यालयात खासदार बारणे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी नगरसेविका शीतल काटे याही उपस्थित होत्या. गावातील प्राचीन महादेव मंदिरात जाऊन बारणे यांनी आशीर्वाद घेतले. त्यावेळी अर्जुन काटे, मनोहर काटे, ज्ञानेश्वर हांडे, मुरलीधर काटे, विलासराव काटे, विजू काटे, गुलाब काटे, माऊली काटे, शंकर काटे आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार बारणे यांनी रामचंद्र जाचक, कुंदन जाचक, भानुदास काटे पाटील, भाजपचे ओबीसी मोर्चा महाराष्ट्र संपर्कप्रमुख मनोज ब्राह्मणकर, चंदन कुंजीर, वसंत काटे, विठ्ठल झिंजुर्डे, विजय काटे, लक्ष्मण कुंजीर, संदीप काटे, स्वप्नील काटे, प्रियंका काटे, जालिंदर साठे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सर्व ठिकाणी बारणे यांचे स्वागत व सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संजय काटे यांच्या पेट्रोल पंपावरील कार्यालयासही खासदार बारणे यांनी भेट दिली.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारणे सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज

चिंचवड, 20 एप्रिल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे सोमवारी (22 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानिमित्ताने महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.

खासदार बारणे हे सोमवारी सकाळी 10 वाजता आकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने पीएमआरडीए कार्यालयापर्यंत जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्यासह महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, महेंद्र थोरवे, महेश बालदी, उमा खापरे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. चिंचवड, पिंपरी, मावळ, कर्जत-खालापूर, पनवेल व उरण या सहाही विधानसभा मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते आकुर्डी येथे येणार आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खासदार बारणे यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करीत प्रचारात आघाडी घेतली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अधिक जोमाने प्रचाराची दुसरी फेरी सुरू होईल. त्यात अनेक बड्या नेत्यांच्या सभांचाही समावेश असणार आहे.

” आयात होणाऱ्या महागाईवर नियंत्रणाची गरज ‘

आशियाई विकास बँकेने (एशियन डेव्हलपमेंट बँक- एडीबी) नुकताच एक आर्थिक अहवाल प्रसिद्ध केला असून आशिया खंडातील विविध देशांमधील वाढती महागाई, व्याजदर वाढीचा रेटा, सकल राष्ट्रीय उत्पन्न ( जीडीपी) याबाबतचा आढावा घेतला आहे. विशेषतः भारतातील सध्याची महागाई ही “आयात” केली जात असल्याबद्दल  चिंता व्यक्त केली असून यावर राष्ट्रीय पातळीवर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत  व्यक्त करण्यात आले आहे. याबाबतचा हा धांडोळा.

आशिया खंडातील
कॉकेशस पर्वत, मध्य, पूर्व, दक्षिण,दक्षिणपूर्व आशिया व पॅसिफिक प्रदेशातील एकूण 46 देशांचा यात समावेश आहे. या सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेची पाहणी आशियाई विकास बँकेने नुकतीच करून त्यांचा अहवाल प्रसिद्ध केला. या सर्व राष्ट्रांमध्ये पुढील वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाची वाढ किंवा महागाईची टक्केवारी याबाबत गेल्या तीन वर्षांचा आढावा घेऊन 2025 मध्ये काय स्थिती असू शकेल यावर मतप्रदर्शन व्यक्त केले आहे.  भारताबाबत बोलायचे झाले तर 2025 या वर्षात भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) सर्वाधिक म्हणजे 7.2 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.  त्याचवेळी भारतातील भाववाढीचा किंवा चलनवाढीचा दर 4.5 टक्क्यांच्या घरात राहील असाही अंदाज व्यक्त केला आहे. अन्य सर्व देशांच्या तुलनेत भारताची कामगिरी आर्थिक विकास दरामध्ये सर्वात चांगली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. आपल्या शेजारील चीनमध्ये हा आर्थिक विकासाचा दर केवळ 4.5 टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून तेथे महागाईचा दर 1.5 टक्के राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जन्मापासूनचा सख्खे शेजारी पाकिस्तान या देशाची अर्थव्यवस्था जेमतेम 2.8 टक्के दराने वाढण्याचा अंदाज असून त्यांच्याकडे महागाईचा दर 2024 या वर्षात 25 टक्के तर 2025 मध्ये 15 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

आशिया खंडातील विविध देशांचा सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा सरासरी आकडा 4.90 टक्के असून महागाईचा दरही 3 ते 3.2 टक्क्यांच्या घरात राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रत्यक्षात काही देशांची आर्थिक स्थिती यापेक्षाही कमी किंवा चिंताजनक असण्याची शक्यता आहे. म्यानमार मध्ये दहा टक्के महागाईचा दर तर पाकिस्तान मध्ये हा 15 टक्क्यांच्या घरात वर्तवण्यात आला आहे. आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्रीलंकेमध्ये 2024 मध्ये आर्थिक विकासाचा दर 1.90 राहील टक्के राहील तर 2025 मध्ये हा दर 2.5 टक्क्यांच्या घरात अपेक्षित धरला आहे. त्यामानाने श्रीलंकेमध्ये महागाईला आळा घालण्यात बऱ्यापैकी यश मिळाले असून गेल्या तीन वर्षांपूर्वीची 46.4 टक्क्यांची महागाई 2024 मध्ये 7.5 टक्क्यांवर आली आहे व पुढील वर्षात म्हणजे 2025 मध्ये ती 5.5 टक्क्यांच्या घरात राहील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जानेवारी महिन्यात संपूर्ण जगभरात तापमान वाढीने नवीन उच्चांकी पातळी नोंदवलेली होती व संपूर्ण पृथ्वीतलावरील तापमान वाढलेले होते. आशिया खंडातही या वाढत्या तापमानाचा गंभीर परिणाम होत असून पुढील काही काळात अत्यंत टोकाचे हवामान अनुभवास येण्याची शक्यता अहवालात  वर्तवण्यात आली आहे. त्याचा परिणाम प्रतिकूल परिणाम विविध देशांच्या कृषी क्षेत्रावर आणि अन्य क्षेत्रांवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः  अल्प उत्पन्न अर्थव्यवस्था असणाऱ्या काही देशांच्या अन्नधान्य सुरक्षिततेवर याचा परिणाम होईल असा अंदाज अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती बँकेचे पतधोरण हे अद्यापही खूप अस्थिर किंवा अनिश्चित असून त्याचा प्रतिकूल परिणाम आशिया खंडातील अनेक देशांवर व शेअर बाजारांवर होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अमेरिकेतील महागाईचे निर्मूलन अपेक्षेपेक्षा संथ होत असल्याने त्यांच्या व्याजदर रचनेमध्ये लवकर बदल होण्याची शक्यता कमी आहे. याचा परिणाम जागतिक पातळीवर बहुतेक सर्व देशांमध्ये व्याजदर हे कमी होण्याची शक्यता दिसत नाही. चीनमधील एकूण राष्ट्रीय उत्पन्न व तेथील महागाईचा दर याबाबतही स्वतंत्र मत व्यक्त करण्यात आले असून सध्या तेथे मालमत्तेची बाजारपेठ अत्यंत क्षीण होत असून घरगुती वापरामध्ये सुद्धा चांगली अपेक्षित वाढ होत नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

भारतीय अर्थ व्यवस्थेबाबत मत व्यक्त करताना संपूर्ण आशिया खंडामध्ये भारतातील अर्थव्यवस्थेचा विकासदर हा सर्वाधिक राहणार असून एकूण होणारी गुंतवणूक, घरगुती मागणी मध्ये होत असलेली वाढ त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स व अन्य सेवांच्या निर्यातीमुळे सकल राष्ट्रीय उत्पन्न चांगले राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

भारतात गेल्या दोन-तीन वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही चांगल्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला व महागाई दर मर्यादेपेक्षा जास्त वर जाणार नाही याची दक्षता घेतली परंतु ती खूप खाली आणण्यात त्यांना यश आलेले नाही. देशात बेरोजगारी व महागाई हे सर्व सामान्यांना जाचक ठरणारे प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारताला आयात केलेल्या महागाईचा जास्त फटका बसण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आयात केलेली महागाई म्हणजे देशात मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते व त्याच्या किंमती किंवा उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ होते तेव्हा त्याचा परिणाम देशांतर्गत भाववाढीवर होतो. अर्थशास्त्राच्या संकल्पनेनुसार  कोणत्याही उत्पादन खर्चामध्ये  कच्चामाल किंवा अन्य सेवा यांचा वापर होत असताना त्याच्या किंमती वाढत असतात तेव्हा त्याचा बोजा स्वाभाविकपणे ग्राहकांवर पडतो आणि महागाई वाढण्यास हातभार लागतो. डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण हे प्रामुख्याने आयात होणाऱ्या महागाईचे प्रमुख कारण आहे. जेव्हा रुपयाची घसरण होते तेव्हा आपल्याला जास्त प्रमाणावर डॉलर खरेदी करून वस्तू किंवा सेवा आयात कराव्या लागतात. स्वाभाविकच आपला उत्पादन खर्च वाढत राहिल्याने त्याचा परिणाम महागाईवर होत राहतो. पाश्चिमात्य देशांमध्ये होणाऱ्या व्याजदर वाढीचा परिणाम भारतीय चलन घसरण्यामध्ये होतो.  त्याचप्रमाणे अनेक वेळा आयातीचा खर्च वाढल्याचा  फटका आपल्या भाववाढीला बसत असतो. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती  उत्पादन कमी झाल्यामुळे वाढतात तेव्हा आयातीचा खर्च लक्षणीयरित्या वाढतो व त्याचा परिणाम देशातील उत्पादन व सेवा यांच्या भाववाढीवर होतो. एकंदरीत कोणत्याही प्रकारे उत्पादन खर्चामध्ये होणारी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वाढ ही एकूणच भाववाढीला कारणीभूत ठरते.  सध्या तरी काही प्रमाणात आपला वाढता आयात खर्च कारणीभूत आहे असे लक्षात आले आहे. अनेक वेळेला व्यवसाय व्यापारामध्ये उत्पादन खर्च वाढला तर वस्तूच्या किमती किंवा सेवांच्या किमतीमध्ये वाढ होते. ग्राहकांच्या मागणी पुरवठ्यावर जरी वस्तू किंवा सेवांच्या किमती ठरत असल्या तरी सुद्धा उत्पादन खर्चात होणारी वाढ ही सुद्धा महागाईला हातभार लावते. आंतरराष्ट्रीय बाजारात विनिमय दरामध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असली तरीसुद्धा उत्पादन खर्चातील प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष आयात खर्च वाढीमुळे देशातील महागाईला हातभार लागतो. त्या दृष्टीने आयातीवर काही प्रमाणात निर्बंध आणून उत्पादन खर्च कमी करण्याकडे लक्ष केंद्रित करता येऊ शकते. परिणामतः आयात केलेल्या महागाईवर निश्चितपणे मार्ग काढता येऊ शकतो. देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वहात असले तरी रिझर्व बँक ऑफ इंडिया व केंद्र सरकारचे प्रशासन यांनी याबाबत जागरूक राहून योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे हे निश्चित.

प्रा. नंदकुमार काकिर्डे
( लेखक पुणे स्थित ज्येष्ठ अर्थविषयक पत्रकार व बँक संचालक आहेत)

४०० पार चा भाजपाचा नारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणे व आरएसएस, मोदींचे संविधान आणण्यासाठी.

मुंबई, दि. २० एप्रिल
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस असल्याचे स्पष्ट करणारे ठरले आहे. जनता भाजपाच्या जुमलेबाजीला बळी पडली नाही, १० वर्षांच्या अन्याय काळ ला जनतेने मतपेटीतून उत्तर दिलेले आहे. भाजपा दक्षिण व मध्य भारतात साफ तर उत्तर व पूर्व भारतात हाफ झाली असून उर्वरित टप्प्यातही हाच ट्रेंड कायम राहिल. नरेंद्र मोदी सरकार हे आता शेवटच्या काही दिवसांचे पाहुणे असून ४ जूननंतर देशात काँग्रेस इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसच्या मीडिया विभागाचे चेअरमन जयराम रमेश यांनी व्यक्त केला आहे.
अमरावती येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयराम रमेश म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा ४०० पार चा नारा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हटवणे व आरएसएस व मोदींचे संविधान आणण्यासाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तसे स्पष्टपणे सांगण्याची हिंमत नाही म्हणून त्यांचे बगलबच्चे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. सामाजिक न्याय हा संविधानाचा मुळ सिद्धांत आहे आणि यालाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुरुवातीपासून विरोध आहे. लोकसभेची ही लढाई विचारधारांची आहे, यात काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीचे मित्र पक्ष हे संविधान वाचवण्यासाठी एकत्र येऊन लढत आहेत. भारतीय जनता पक्षाने अजित पवार, अशोक चव्हाण व प्रफुल्ल पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले व आज त्यांनाच भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ करून बाजूला बसवत आहेत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभाग विरोधकांच्या मागे लावून त्यांना धमकावण्यात येत आहे.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा व भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात आली व या यात्रेतून ५ न्याय व २५ गॅरंटी बनवन्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व एमएसपी कायदा बनवणे, केंद्र सरकारची रिक्त ३० लाख पदे भरणे, संविधानात दुरुस्ती करून आरक्षणाची ५० टक्यांवरील मर्यादा हटवणे, गरिब महिलांना दरवर्षी १ लाख रुपये देणे अशा महत्वाच्या गॅरंटी आहेत. या गॅरंटी काँग्रेस पक्ष देशभरातील ८ कोटी कुटुंबापर्यंत पोहचवणार आहे.
पंतप्रधान मोदी मुलाखतींमध्ये व भाषणात सर्व गोष्टींवर बोलतात पण महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, चीनचे आक्रमण यावर बोलत नाहीत. देशाची जनता मोदींच्या जुमल्यावर आता विश्वास ठेवणार नाही. २००३ मध्ये काँग्रेस पक्ष राजस्थान, छत्तीसगड विधानसभा निवडणूक हरला पण त्यांनतर २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाजपेयी सरकारचा पराभव करुन काँग्रेस आघाडी सत्तेत आली होती. यावेळीही २००४ च्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल, असा विश्वासही जयराम रमेश यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषेला काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर, अमरावती लोकसभेचे उमेदवार आ. बळवंत वानखेडे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार विरेंद्र जगताप, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बब्लू देशमुख, प्रवक्ते एड. दिलीप एडतकर, भैय्या पवार आदी उपस्थित होते.

कोथरुड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा खर्च निरीक्षकांकडून आढावा

पुणे, दि.२०: भारत निवडणूक आयोगाकडून पुणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत खर्च विषयक बाबींच्या निरीक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक कमलेश मखवाना यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या काटेकोर नोंदी ठेवण्यासह विविध पथकांच्या माध्यमातून निवडणुकीत पैसे, दारू आदींच्या अवैध वापरावर लक्ष ठेवावे असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसीलदार अंजली कुलकर्णी, सहायक खर्च निरीक्षक अस्मिता देशमुख, स्वप्निल खोल्लम आदी उपस्थित होते.

श्री.मखवाना यांनी मतदारसंघात पाषाण-सुस रोड येथील वरदायिनी सोसायटीजवळ उभारलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाला भेट दिली. निवडणुकीशी संबंधित उमेदवाराकडून होणाऱ्या खर्चाबाबत वाहनांची योग्यरीत्या तपासणी करून सर्व वाहनांची तपासणी करताना व्हिडिओग्राफी करावी, अवैधरित्या वाहतूक होणारे पैसे, दारू किंवा इतर आमिषाच्या बाबींवर कडक लक्ष ठेवण्यात यावे, मतदार संघात अंतर्गत भागात वाटप होणाऱ्या हस्तपत्रिका बाबत माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीमार्फत विशेष लक्ष ठेवावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

श्री. मखवाना यांनी कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन कक्षातील कामकाजाचा आढावा घेतला.  एक खिडकी कक्ष, आचारसंहिता कक्ष, निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष यांचे  कामकाज तपासून कामाबाबत समाधान व्यक्त केले. सर्व बाबतीत सहायक खर्च निरीक्षक यांच्याशी संपर्कात राहून निवडणूक कामकाज पार पाडावे, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! नांदेड,परभणी येथील जाहीर सभांत पंतप्रधान मोदी यांचे आवाहन

गरीबीची कुचेष्टा आणि गरीबांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसने जनतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्या इंडीया आघाडीतील पक्षांचा परस्परांवर विश्वास नाही, त्यामुळे आता जनतेनेही काँग्रेस व इंडीया आघाडीवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन करत विरोधकांवर घणाघाती हल्ले करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी महायुतीच्या महाविजय संकल्प सभांतून मराठवाडा ढवळून काढला. जनतेने मला प्रेम दिले, माझ्यावर विश्वास टाकला,आणि मला भरभरून आशीर्वाद ही दिले, पुढील काळात देशाचा वेगवान विकास करून मी याची परतफेड करेन, अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली.
‘महायुती’ चे नांदेडचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोहाळीकर आणि परभणीचे उमेदवार महादेव जानकर (रासप) यांच्या प्रचार सभांमधून मराठवाड्यातील मतदारांशी संवाद साधताना मोदी यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानातून ‘एनडीए’ च्या विजयाची खात्री अधोरेखित झाल्याचा विश्वासही व्यक्त केला. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सर्वत्र ‘एनडीए’ ला एकतर्फी मतदान झाले असून निवडणुकीआधीच पराभूत मानसिकतेत असलेल्या इंडी आघाडीकडे निवडणूक लढण्याची उमेद नाहीच आणि अनेक मतदारसंघांत उमेदवारही नाहीत, अशी टीका त्यांनी केली. नांदेड येथील सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण, खा.डॉ. अजित गोपछडे आदी उपस्थित होते. परभणी येथील सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड आदी उपस्थित होते.
आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीतील नेत्यांचा परस्परांवर विश्वास नाही आणि देशातील जनतेवरही विश्वास नाही. देशातील 25 टक्के मतदारसंघांत या आघाडीचे पक्ष एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहेत. ज्यांचा परस्परांवर विश्वास नाही, त्यांच्यावर देशातील जनतेने विश्वास का ठेवावा, असा सवाल करून, एकमेकांविरुद्ध लढणाऱ्या या आघाडीला मतदानाच्या पहिल्या टप्प्यातच मतदारांनी नाकारले आहे, असे श्री.मोदी म्हणाले. 4 जूनला निवडणुकीच्या निकालानंतर या आघाडीचे नेते एकमेकांच्या झिंज्या उपटतील, कपडे फाडतील असे भाकितही त्यांनी वर्तविले.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही मोदी यांनी परखड टीका केली. अमेठीमधून पराभूत झाल्यानंतर राहुल गांधी वायनाडमध्ये आले, पण तेथेही त्यांना पराभव चाखावा लागणार असून वायनाडमधील मतदान पार पडल्यानंतर पळ काढून दुसरा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे, असे ते म्हणाले. ज्या परिवाराच्या भरवशावर काँग्रेस पक्ष चालतो, त्या परिवाराचा स्वतःवरच भरवसा राहिलेला नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसचा गरीबांवर विश्वास नाही, त्यांनी विदर्भ मराठवाड्याच्या विकासाचा गळा घोटला, त्यांच्यामुळे शेतकरी, गरीब दुबळा झाला, उद्योग विकासाला खीळ बसली, लाखो तरुणांना घरदार सोडून स्थलांतर करावे लागले. मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात लाखो घरांना नळाचे पाणी मिळू लागले आहे. पीक विम्याची हमी शेतकऱ्यांना मिळाली आहे,किसान सन्मान निधीमुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे ओझे हलके झाले,भरड धान्याला जगभरात प्रतिष्ठा मिळवून दिल्याने मराठवाड्याच्या शेतकऱ्याला मोठे लाभ मिळणार आहेत, असेही श्री.मोदी म्हणाले.
काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात केलेल्या प्रत्येक जखमेवर आम्ही इलाज आणि उपचार करू, ही मोदींची गॅरंटी आहे अशी ग्वाही देऊन ,त्यांनी मराठवाडा विकासाकरिता केंद्र व राज्य सरकारांनी केलेल्या कामांची यादीच जनतेसमोर सादर केली. गेल्या पाच वर्षांतील विकास कामे ही तर केवळ सुरुवात आहे, पुढच्या पाच वर्षांत विकासाची कामे अधिक गतिमान होतील, असेही श्री. मोदी यांनी सांगितले. 370 च्या जाचातून काश्मीरची मुक्तता, तिहेरी तलाक प्रथेतून मुस्लिम महिलांची मुक्तता, देशातील कोट्यवधी महिलांचे लखपती दीदीसारख्या योजनांतून सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी ही आमची कामगिरी आहे. म्हणूनच गेल्या दहा वर्षांत सुरू झालेल्या विकास यात्रेला बळ देण्यासाठी ‘एनडीए’ च्या उमेदवारांना विजयी करा. कारण हे उमेदवार निवडून आल्यानंतर मोदींना ताकद देणार असून विकासाला बळ देतील, असे पंतप्रधानांनी नमूद केले. 2024 ची निवडणूक केवळ सरकार बनविण्यासाठी होणारी निवडणूक नाही, तर भारताला समृद्ध आणि विकसित बनविणे हे या निवडणुकीचे लक्ष्य आहे. देशासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी रात्रंदिवस मेहनत करणार असून कोणीही कितीही अडथळे आणले तरी आता माघार नाही, देशातील जनतेच्या डोळ्यातील स्वप्नांची पूर्तता करणे हाच आमचा संकल्प आहे, असा निर्धार ही श्री. मोदी यांनी व्यक्त केला.

२३ जागांचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाला चारच जागा मिळतात ही शोकांतिका – डॉ. अमोल कोल्हे

पिंपरी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेत भाजप सोबत जाण्यास पसंती दिली. राज्य सरकारमध्ये सामील होत शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अनेक आमदार देखील अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाले. परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट नाराज झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. त्यावर माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या पक्षातील नाराजी विषयी डॉ. अमोल कोल्हे यांनी भाष्य केले आहे.

डॉ. कोल्हे मध्यमांशी बोलताना म्हणाले की, खरं तर हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अशा प्रकारच्या नाराजी असणे स्वाभाविक आहे. कारण जे नेतृत्व एकेकाळी २३ जागांचे निर्णय घेऊ शकत होते त्यांना अवघ्या आता चार जागा मिळतात. ही परिस्थिती लोकसभेला असेल तर विधानसभेला काय परिस्थिती असेल हा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे.

त्याचबरोबर महायुतीची खूप मोठी घसरण होणार आहे. सर्व्हे मध्ये देखील ज्या चार जागा अजित दादांना भाजपने देऊ केल्या आहेत त्या चारही जागा मिळत नसल्याचे चित्र सर्व्हेमधून समोर आले आहे. दरम्यान ज्या जागा मिळाल्या आहेत त्या चार जागांवर एक घरात उमेदवारी द्यावी लागली तर एक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना जागा लढवावी लागत आहे आणि उर्वरित दोन जागांवर उमेदवार आयात करावे लागले असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नाराजी अशी पक्षाच्या बाहेर येत असेल तर ही लोकसभा निवडणुक आणि त्यानंतर होणारी विधानसभा निवडणूकीचे चित्र संभ्रमात असल्याच्या चर्चा देखील जोर धरू लागल्या आहेत.