पुणे-राजगुरुनगर परिसरात कडूस येथील चांडाेली येथे जेईई आणि आयआयटी परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या २९ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला. जेवणानंतर ८० विद्यार्थ्यांना त्रास हाेऊ लागल्याने त्यातील २२ मुले व सात मुली अशा एकूण २९ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. चार जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात हलवण्यात अाले. कडूस येथे दक्षणा फाउंडेशनमध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यातून जेईई आणि आयआयटी अशा विविध पूर्वपरीक्षांची तयारी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचे निवासी वसतिगृह अाहे. गरीब कुटुंबातील हुशार मुले यांना आयआयटी व वैद्यकीय पूर्वपरीक्षेसाठी माेफत मार्गदर्शन मिळत असल्याने माेठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी येत असतात. शुक्रवारी रात्री याठिकाणी विद्यार्थ्यांना बटाटा भाजी, चपाती, डाळ, भात असे जेवण तयार करुन देण्यात अाले हाेते. विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर त्यांना अचानक जुलाब, डाेकेदुखी, मळमळ, उलटीचा त्रास हाेऊ लागला. त्यामुळे वसतिगृहात धावपळ उडाली आणि काही विद्यार्थ्यांना माेठ्या प्रमाणात त्रास हाेत असल्याने २९ जणांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना वायसीएम रुग्णालयात हलवण्यात आले, तर काही जणांवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत अाहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिळताच, राजगुरुनगर पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेऊन चाैकशी सुरु केली अाहे. अन्नाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयाेगशाळेत पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.